रुणझुणत्या पाखरा/प्रस्तावना

विकिस्रोत कडून

प्रस्तावना


 कथा व कविता हे आरंभापासून वाङ्मयाचे मूलभूत प्रकार दिसून येतात. प्राचीन व मध्ययुगीन वाङ्मयात त्यांचीही सरमिसळ झालेली दिसते. ऋग्वेदात कथात्मता आणि काव्यात्मता यांचे एकजीव व अनेकदा मोठ्या विलोभनीय स्वरूपात प्रत्ययाला येते. कथा आणि कवितेचा जन्म जरी एका वेळी झालेला असला तरी कथात्मक वाङ्मयाचा विकास अधिक झालेला दिसून येतो. मुद्रण कलेमुळे अठराव्या शतकानंतर वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन अशी रुपे प्राप्त व्हायला लागली. प्रत्येक सजीवत्वाला काही अवस्थांमधून जाणे श्रम प्राप्रच असते. हे लक्षात घेऊन 'फॉर्म' ची 'फॉर्म' म्हणून जी वाटचाल आहे ती सांगणे महत्त्वाचे असते. वाङ्मयेतिहास लिहिणारांकडून नेमकी इथेच चूक होते. ते प्रायः अशा याची वाटचाल सांगताना दिसतात; 'फॉर्म' ची नाही. ही चूक आपल्याला टाळता आली पाहिजे.
 आणखी एक चूक संभाव्य असते. कथा आणि कादंबरी, एकांकिका आणि नाटक यांच्यातला फरक हा संख्यात्मक असतो; गुणात्मक नाही. जी. ए. कुळकर्णी किंवा आसाराम लोमटे यांच्या कथांना अनेकदा लघुकादंबरी म्हणता येईल. 'सावित्री' आणि 'मानव' मधील लेखनाची तपासणी करताना अशा प्रकारच्या फोल चर्चेचे घोळ घालता येतील. अनेकत्वातून एकख सूचित करणे हो सर्वच ललित कलांचा धर्म आहे. लघुकथेतील अनेकत्व हे कादंबरीच्या मानाने कमी असते असे म्हणावे हाच न्याय एकांकिका आणि नाटक यांना लावता येईल.
 मुद्रणकलेमुळे जसे वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन स्वरूप येऊ लागले तसे काळाच्या आणि उत्क्रांतीच्या ओघात नाट्यछटेसारखा एखादा वाङ्मय प्रकार नष्ट ही होऊ शकतो. लघु निबंधातून सर्वस्वी नवीन असा ललित गद्य जन्माला येतो हेही लक्षात घेतले पाहिजे.
 ललित गद्य हा एक उभयलिंगी वाङ्मयप्रकार आहे. त्यात कवितेची कमनीयता, स्त्रीसुलभता आणि वैचारिक आणि पौरुष यांचा सुंदर संयोग झालेला असतो.
 डॉ. सुधीर रसाळ यांनी 'अनुभवाचे असे आकार जे कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक या प्रकारातून व्यक्त होऊ शकत नाहीत, त्याला ललित गद्य म्हणावे अशी नास्तिपक्ष मांडणारी व्याख्या केली आहे. आठवणी प्रवासवर्णन, निसर्गवर्णन, विनोद, व्यक्तिचित्र अशा सगळ्यांना सामावून घेणारे ललित गद्य हे 'महापोर्ट' आहे असंही म्हटलं जातं.
 वरील तिन्ही विचारांत ललित गद्याची निरनिराळी वैशिष्ट्य आणि लक्षणं सूचित होतात.
 आजचे ललितगद्य हे पूर्वीच्या लघुनिबंधाचे उत्क्रांत रूप आहे. लघुनिबंधाला वैचारिक निबंधापेक्षा वेगळा मानून एक ललितकलेत समाविष्ट होणारा असा वाङ्मयप्रकार म्हणून इ.स.१५८० च्या आसपास प्रथम फ्रेंच लेखक माँर्तन यांनी रूढ केले असे मानले जाते. प्रा. नरहर कुरुंदकरांनी आल्फा ऑफ प्लो पासून लघुनिबंधाची सुरुवात मानली आहे. मराठीत ना. सी. फडके यांनी गुजगोष्ट म्हणून आणि वि. स. खांडेकरांनी लघुनिबंध म्हणून जो चार्ल्स लॅम्बना लिहिला तो या 'पर्सनल एस्से' ला मराठीत आणण्याच्या भूमिकेतून अनंत काणेकर, म. ना. अदवंत, हेही याच माळेचे मणी. इंग्रजी साहित्यात ज्याला 'एसे' किंवा निबंध म्हणतात त्यात विचारांची वस्तुनिष्ठ मांडणी असते. अनुभवाचे किंवा 'मी' चे निवेदन करणे हा त्याचा हेतू नसतो. तिथे अनुभव हे साध्य मुळीच असत नाही. त्या उलट लघुनिबंधाचे १ लघु निबंधात अनुभव आणि तदनुषंगिक विचारांचा विमुक्त असा आविष्कार असतो.
 मराठी समीक्षेत ललित वाङ्मयाचा एक प्रकार म्हणून चर्चा करताना त्याची तुलना ललित वाङ्मयाच्या इतर प्रकारांशी करण्याची पद्धत रूढ झाली आहे. कथा कादंबरी- एकांकिका- नाटक यांच्याशी त्याची तुलना करणे निरर्थक आहे. त्यातून डॉ. सुधीर रसाळांनी केली तशी अभावात्मक व्याख्याच संभवते. मग वेद जसे देवाचं वर्णन अमुक म्हणजे तो नाही, तमुक म्हणजे तो नाही. असं 'नेति नेति'च्या भाषेत करतात तसा प्रकार एक वाङ्मयप्रकार म्हणून ललित गद्याच्या बाबतीत होतो. आणि मग लघुनिबंधात विचार डोकावणे त्याच्या प्रकृतीला कसे बाधक आहे वगैरे बाळकळ मुद्दे मांडले जातात. उदा. 'एखाद्याने सहजच भेटीसाठी आलो अशी सुरुवात करून इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्या व सहज ओघात 'यंदा कर्तव्य आहे काय' असे विचारावे म्हणजे जसे वाटते, तसा प्रत्यय फडके- खांडेकरांचा निबंध वाचताना मला पुनः पुनः येतो. एका क्षणात भेटीसाठी येण्याचा हेतू कळला म्हणजे गप्पांतील स्वाभाविकपणा हा अभिनय हा लघुनिबंधात जाणवतो. शेवटी मतेच मांडायची म्हटल्यावर सगळा खेळकरपणा, सगळे चिंतनाचे प्रयोग, अभिनय ठरतात. विचार सजवून मांडण्याचा प्रयत्न करणारी धडपड ठरतात.
 एका प्रख्यात समीक्षकाचे हे विचार वाचून असे वाटते की जण 'विचार' या घटकाची ललितगद्याला ॲलर्जीच आहे की काय! 'विचार' प्रविष्ट झाला की ललित निबंध संपला!
 बाकीच्या वाङ्मयप्रकारामध्ये कितीही मोठी परिवर्तने झाली तरी याचे नाव बदलले नाही. हरिनारायण आपटे यांची ही कादंबरी आणि भालचंद्र नेमाडे यांची सुद्धा कादंबरीच; ना. सी. फडके यांची लघुकथा आणि जी. ए. कुळकर्णी यांची देखील लघुकथाच. गोविंद बल्लाळ देवल यांचे ते नाटक आणि महेश एलकुंचवार यांचे ते नाटकच! असे असताना मराठी लघुनिबंधाच्या बाबतीतच असे का व्हावे? त्याचे नाव टाकून देऊन त्याला ललितगद्य हे नवे नाव द्यावे लागावे?
 प्राचीन साहित्यात सगळे वाङ्मयप्रकार पद्यमय राहण्याच्या धडपडीत होते. मुद्रणकलेचा जेव्हा शोध लागलेला नव्हता तेव्हा लेखन जपण्याचा सगळा भार स्मरणशक्तीवर पडायचा तेव्हा गद्यरचना क्वचितच केली जायची. स्मरणसुलभता हे पद्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. संस्कृत न येणाऱ्या कित्येकांना गीतेचा पंधरावा अध्याय, रामरक्षा पाठ असते याचे कारण हे ग्रंथ पद्यात आहेत. वेदांचे जतन त्यांच्या या स्मरणसुलभतेमुळेच करणे शक्य झाले.
 प्राचीन साहित्यातला दासबोध हा वैचारिक गद्याचा ग्रंथ आहे (कविता नव्हे) तर ज्ञानेश्वरी हे ललित गद्य आहे (कविता नव्हे) असा विचार कधी कुणी का केला नाही याचे नवल वाटते. दासबोधात गद्याचे पौरुष फक्त आहे, करुणाष्टकात कवितेचे स्त्रीत्व फक्त आहे. पण ज्ञानेश्वरीत कवितेच्या ललित्याशी वैचारिकतेचा सुंदर संयोग झाला आहे. ज्ञानेश्वरी हा थेट माधव आचवट, दुर्गा भागवत इरावती कर्वे, गो. वि. करंदीकर, विजय तेंडुलकरांच्या प्रखर वैचारिकतेशी नाते सांगणारा प्राचीन काळातला सुंदरतम ललितगद्याचा ग्रंथ आहे.
 आता मी ही व्याख्या पुन्हा सांगतो की ललितगद्य हा उभयलिंगी वाङ्मयप्रकार आहे. वैचारिक निबंध आणि कवितेचा त्यात अप्रतिम 'अर्धनटनारीश्वर' झालेला दिसून येतो.
 प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, विनोदी लेख आणि निसर्गावर ललितगद्यात सर्वात महत्त्वाची ठरते ती लेखकाच्या संवेदनस्वभावाचा अपरिहार्य घटक असले व त्याची वैचारिकता त्याचे अलोकतारतम्य ही वैचारिकता एवढी तरह, सुक्ष्म, प्रखर आणि उत्कट असते की कवितेखेरीज कोणीच तिला पेलू शकत नाही. अशा वेळी भावुक होऊन वाचऊ म्हणतात की हे साक्षात् 'गद्यकाव्य'च आहे!
 कवीनं लिहिलेलं ललितगद्य हा माझ्यासाठी नेहमीच भुवया उंचवायला लावणारा, विलक्षण कौतुकाचा आणि स्वागताई प्रकार असतो.
 विंदा करंदीकर, आरती प्रभु, ग्रेस यांनी ललितगद्य लिहिले नसते तर?
 पाडगावकरांनी आपली सगळी शक्ती कवितेतच पणाला लावली आणि खर्चुन टाकली. या कवीने 'निंबोणीच्या झाडामागे' लिहून काय उपयोग? पु. ल. देशपांडे या कवीने अजिबात कविता न लिहिता सगळी शक्ती ललित गद्यावर पणाला लावली. मराठीचे सर्वश्रेष्ठ ललितगद्यकार तर ते आहेतच पण प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, विनोद आदी सर्व शक्यतांना कवेत घेणारी महान अशी त्यांची प्रतिभा होती. आणि पु. लं. एवढे कवितेवर कुणी प्रेम केले आहे काय?
 प्रखर तरीही तरल वैचारिकता आणि काव्यप्रतिभा या दोन गोष्टी एकाच संवेदनस्वभावात असणाराच श्रेष्ठ दर्जाचं ललितगद्य लिहू शकतो. प्रवासवर्णनात ते प्रवासस्थल निमित्त मात्र असते; व्यक्तिचित्रात ती व्यक्ती काय आहे या पेक्षा चित्रण करणाराला काय भावले हे महत्त्वाचे असते आणि परम कारुणिक असल्याशिवाय परिहासात्मक, सदअभिरुचीसंपन्न विनोद संभवत नाही. चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, माधव आवचट, मधुकर केचे, ग्रेस, गो. वि. करंदीकर, चि. त्र्यं. खानोलकर यांच्या प्रतिभेत ललितगद्याच्या सुंदर शक्यतांचा प्रदेश कवेत घेण्याची ताकद होती. मंगेश पाडगावकर, कुठे तरी कमी पडले. रमेश मंत्री, महेश एलकुंचवार, यांच्या संवेदनस्वभावात कणभर कविश्व नव्हते. म्हणून त्यांचे ललितगद्य यशस्वी होऊ शकले नाही.
 महान ललित गद्य लिहिले जाण्याची उपरोक्त सर्वच्या सर्व कारणे डॉ. शैला लोहिया यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वात आणि संवेदनस्वभावात उपस्थित आहेत.त्यांच्या सामाजिक कार्याची विशेषतः 'मानवलोक' या सेवाभावी संस्थेच्या द्वारा त्यांनी केलेल्या समाजसेवेची कीर्ती जगभर पसरली आहे. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार पचवलेल्या त्या कर्त्या सुधारक आहेत. याला जोडून त्या प्रकृतीने ललित लेखिका आहेत. लोकसाहित्याच्या गाढ्या व्यासंगाने त्यांच्या सगळ्याच लेखनाला एक लोकतत्त्वीय परिमाण प्राप्त झालेले आहे. मुख्यम्हणजे त्या भारीच्या कवयित्री आहेत. 'सिटीझन आर्टिस्ट' ही महान आणि समाजसन्मुख प्रतिभावंतासाठी वापरली जाणारी संज्ञा ही खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठीच योजिता येईल. प्रखर वैचारिकता हे त्यांच्या लेखनात सर्वत्र जाणवणारे सूत्र आहे. त्यामुळे विचार आणि कवितेच्या संयोगातून आलेले 'रुणझुणत्या पाखरा' या संग्रहातील ललित गद्य, ललित गद्याच्या सर्व महान आणि सुंदर शक्यतांचा प्रदेश कवेत घेऊनच आपल्या समोर ठाकले आहे.
 'संक्रांत... प्रकाशपर्व' या लेखात बालपणीची संक्रांत उमटते. समाजवादी घर, देवघर, देवपूजा वा कर्मकांड नाही. पण सणानिमित्त गोडधोड खायला मिळे संक्रांतीचे साखरतीळ ऊर्फ हलवा करण्याच्या घरोघरच्या पद्धती, फसलेल्या काटे न आलेल्या साखरतीळांची चेष्टा, कुचेष्टा. तेराव्या वर्षापर्यंत नवरात्र आपटे आजी कुमारिका म्हणून सन्मान करायच्या. मग याच वर्षी का नाही बोलवलं हा बालसुलभ प्रश्न प्रौढांना अर्थ सुचवून जातो. समाजजीवनाचा धांडोळा असा प्रत्येक लेखात स्वाभाविकपणे घेतला जातो. 'अक्षरांना अर्थ देऊन' मध्ये तेजस्वी 'महा-तारे' प्रेरणा देऊन जातात. 'हे स्वरांनो गंध व्हा रे' मध्ये बालकामगारांचे प्रश्रोपनिषद कासावीस बनवते, अस्वस्थ करून टाकते.
 कविवर्य भा. रा. तांब्यांनी तरुणपणी उत्कट प्रेम कविता तर लिहिलीच; पण वृद्धपणीदेखील प्रेमाविषयी त्यांना वाटणारे कौतुक, अप्रुप संपले नाही. डॉ. शैला लोहियांनी क्रांतिकारी असा प्रेमविवाह केला (याही अर्थाने त्या कर्त्यासुधारक) पण आज साठीनंतरही त्या प्रेमाचा, प्रेम विवाहाचा किती उत्साहाने पुरस्कार करतात आणि त्या मागची वैचारिक भूमिका सूचीत करतात ते 'प्रेम, धर्म, बांधीलकी', 'तू ऐल राधा,' 'थंडी, थंडी... थंडी,' किंवा 'आषाढाचा पहिला दिवस' या लेखांतून वाचण्यासारखे आहे. एकदा राधेला कुतूहलाने म्हणा, मत्सराने म्हणा रुक्मिणी सत्यभामांनी घरी बोलावलं. तिथे पाय धुवून, त्यावर चंदन कुंकुम रेखून, वस्त्र देऊन पाठवले. मात्र पाणी उकळते वापरले. राधेला काही फरक पडला नाही. परंतु त्या रात्री कृष्ण घरी परतला तो लंगडत लंगडतच त्याच्या पायावर पोळल्यामुळे मोठे फोड आले होते. ही सुंदर कथा मी या ललितगद्यातच प्रथम वाचली आणि विलक्षण प्रभावित झालो. असे प्रभावित करणारे, झपाटून टाकणारे अधूनमधून सारखे या लेखांतून भेटेल.
 ट्रंकेच्या बुडाशी एखादी अत्तराची कुपी जपून ठेवावी तशा डॉ. शैला लोहियांनी माहेरच्या आठवणींना जोपासले आहे. राष्ट्रीय भावनेने ओथंबलेले माहेर सूत कातणारे, खादी वापरणारे आईवडील. साने गुरुजी, एस. एम. जोशी, डॉ. राम मनोहर लोहिया, बॅ. नाथ पै, जयप्रकाश यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या लेखिकेचा खरंच हेवा वाटावा. त्यांची समृद्ध वैचारिक जडणघडण झाली ती या सर्वांच्या चर्चा ऐकून. ही वैचारिकताच त्यांच्या संवेदनस्वभावाचा अविभाज्य घटक झाली आहे. इतकेच नाही तर गेल्या तीस पस्तीस वर्षांच्या सगळ्या महान चळवळीत आणि आंदोलनात लेखिकेने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. त्यांचे पडघम या लेखांतून अनुभवता येतात. बंगलोर येथे २८ जानेवारी १९९५ रोजी झालेल्या 'जनसुनवाई' बहुएका 'जखमी झाडांच्या साक्षी ऐकताना' हा ललितलेख शीर्षकापासून अंतरंगापर्यंत वेधक आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या, विलक्षण अस्वस्थ करून टाकणाऱ्या अनुभवकथनांचा समारोप करताना त्या लिहितात, जनसुनवाईचा कार्यक्रम संपला होता. आता प्रत्येकीच्या देहात 'मनसुनबाई' सुरू होती. भूमिकन्या भवरीबाई, हा लेख तर विलक्षण जीवन, थरारक अनुभव अनोखे व्यक्तित्व लाभलेले भंवरीबाई हा लेख वाचणारे जन्मभर विसरू शकणार नाहीत. सेवा दलाचे 'महाराष्ट्र दर्शन' असेच प्रेरणादायी, चैतन्यमय अनुभूती देणारे. 'इंद्रदिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना' या श्रेणीमधले लेखिकेने अनुभवलेले असे अनेक मंतरलेले दिवस विलक्षण प्रत्ययकारित्वासह या संग्रहात अवतीर्ण झाले आहेत.
 या संग्रहात काही भावोरकट व्यक्तिचित्रंही आहेत. बाबा आमटे (त्र्याण्णव वर्षाच्या तरुणाकडून ऊर्जा चेतवून घेताना), वसंत बापट (हारवलेला वसंत), भास्कर चंदनशिव (फुलता मळा सतत बहरत राहो), साने गुरुजी (जून महिना आला की...), अनंत भालेराव (माहेरचा खोपा), महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सर्वांना माहीत असणारी ही नाव असली तरी त्यांचे वस्तुनिष्ठ चित्रण करण्याचा इथे प्रश्नच येत नाही. या व्यक्तिरेखा लेखिकेच्या अनुभवांगाचा भाग म्हणूनच साकारताना दिसतात. निवेदक 'मी' चा त्यांना झालेला अनुभव स्पर्श या व्यक्तिरेखांना वेगळी परिमाणे प्राप्त करून तर देतोच. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे असते ते त्यांतून सूचित होणारा लेखिकेचा जीवन विषयक दृष्टिकोन अनुभवणे विचारांचे एक सुंदर अस्तर याही, पटाला असतेच.
 ज्या कारणासाठी आपण डॉ. शैला लोहियांना 'सिटिझन आर्टिस्ट' म्हणून गौरविले तो सामाजिक कार्यकर्तीचा त्यांचा पिंड या पुस्तकात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा असा ललितलेखांचा विभाग होऊन येतो. शैला लोहिया ग्रामीण, दलित, परित्याक्ता, अन्यायपीडित महिलांसाठी कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कार्यकर्त्या आहेत. त्याच्यातला पीर पराई जाणणारा वैष्णवजन हे स्वतंत्र वहिरवातं नसून लेखक, कवी म्हणून असणाऱ्या संवेदनस्वभावाचा तो एक अविभाज्य घटक आहे. 'आला श्वास, गेला श्वास... एक भास' 'धोबीका कुत्ता', 'आमच्यातलं माणूसपण कमी होतय का?', 'हे विठुराया', 'आपणच लिहूया नवी कहाणी', 'सुफळ गोष्टी', 'सुभगा सावित्री,' 'आम्ही बाया', किती तरी अशा राणी' हे लेख वाचताना तीव्रतेने जाणवले की अशा स्वरूपाचं लेखन हे हजार वर्षाच्या मराठी साहित्याच्या परंपरेने कुणीही केलं नाही. हे लेख वाचल्याच्या रात्री तुम्हांला झोप येणार नाही. विलक्षण अस्वस्थ करून टाकण्याचं सामर्थ्य या लेखांत आहे. सौंदर्य माणसाला अस्वस्थ करतं आणि श्रेष्ठ दर्जाच्या सौंदर्यात माणसाला अस्वस्थ करतं आणि श्रेष्ठ दर्जाच्या सौंदर्यात माणसाला अधिकच अस्वस्थ करण्याचं सामर्थ्य असतं असं गुरुवर्य वा. ल. कुळकर्णी म्हणायचे. ते असं का म्हणायचे याच प्रत्यंतर देणारे असे हे लेख आहेत. कारण ते एका महान सिटीझन आर्टिस्टच्या लेखणीतून उतरले आहेत. कळवळ्याची ही महान जाती आपल्पाएरा जीवनाचे जे दर्शन घडवते ते खरोखर अस्वस्थ करून टाकणारे असते.
 डॉ. शैला लोहिया हे अत्यंत संपन्न, विदग्ध असं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे या लेखांचा सर्वांगांनी आस्वाद घ्यायला आपली रसिकताही चोखंदळ आणि विभिन्ननुगामी असावी लागते. ते एकेरी असेल तर हत्ती आणि दहा अंधळ्यांच्या गोष्टीला एखादा आंधळा व्हायची वेळ आपल्यावर यायची! हे लेख कळायला तुम्हांला प्राचीन, आधुनिक आणि लोकसाहित्याचे सूक्ष्म वाचन असावे लागते, समकालीन सामाजिक वास्तवाचे प्रखर भान असावे लागते, स्त्रीवाद आणि स्त्रियांच्या प्रश्नांची गुंतागुंत ज्ञात असावी लागते, बदलते आणि अजूनही न बदललेले खेडे माहिती असावे लागते. अनवट गाणाराला साथ करताना वादळांची भंबेरी उडावी तसे काहीसे सामान्य आणि एक पेडी वाचकांचे हे लेख वाचताना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 प्रस्तुत संग्रहात प्रवासवर्णनपर लेखांचाही एक मोठा विभाग आहे. 'भरदुपारी घनगर्द रानात', 'बीजिंगने दिलेला मंत्र रुजतोय का समाजवादी 'समुद्र आणि समूह', 'सात बहिणींच्या तनामनापर्यंत', कविताच ती...' 'कुलाई खोरे: देवभूमी,' 'अनाघ्रात समुद्रानुभव' या आणि अशा स्वरूपाच्या प्रवासवर्णनांत आपण त्या त्या स्थलप्रदेशांची नवी माहिती किंवा तिथला इतिहास समजून घ्यायचा नसतो. तर त्या त्या स्थलप्रदेशाचे व्यक्तिमत्त्व आणि त्याला भेट देणाऱ्या डॉ. शैला लोहियांचे व्यक्तिमत्त्व यांच्यातील अद्वैत साधणारी अनुभवविशिष्टतां अनुभवायची असते. या प्रकारच्या ललितगद्यांत प्रवासकालीन अनुभवांचा स्मृतिरुप संस्कार जागवून स्थलप्रदेशाचे भावचित्र आकाराला येते तेव्हा स्वाभाविकपणे डॉ. शैला लोहियांच्या अनुभूतीला त्या त्या स्थलप्रदेशाच्या वस्तुनिष्ठ वर्णनापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होते. डॉ. शैला लोहियांनी आपल्या प्रवासवर्णनपर लेखांचे स्वतंत्र पुस्तक केले पाहिजे इतके ते पृथगात्म आणि महत्त्वाचे आहेत एवढेच सुचवून ठेवतो.
 उर्दूत गझल मधील सर्वात आवडलेल्या शेराला हासिले गझल शेर म्हणतात. 'पुनव... पौर्णिमा', 'विधिव्रतांतली सामूहिकता', 'हिंदू जीवनदृष्टी', 'भादवाः कृषी समृद्धीचा', 'राखी: एक बंधन', 'आई म्हणोनी कोणी', 'पापड कुरुड्यांचे दिवस', 'दीपोत्सव', 'भूमिकन्या', 'दशम्या धपाट्याच्या चवींची वेळा आवस', 'रंगवल्ली... रांगोळी', 'घट' हे या संग्रहातले हासिले गझल शेर आहेत. अक्षरशः नादावून टाकले त्यांनी मला. पण त्याच बरोबर हेही जाणवले की त्यांचा आनंद कसा घ्यायचा हे समजून सांगायला दुर्गा भागवत किंवा द. ग. गोडसे हवे होते. किंवा आत्ताच्या आता हे लेख घेऊन डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. तारा भवाळकर किंवा डॉ. तारा परांजप्यांकडे जावे आणि या लेखांचे कौतुक त्यांच्या कडून ऐकावे.
 संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला ताजमहाल पाहून आल्यासारखे होते. यातल्या व्यक्ती, स्थळ, विचार, लोकसाहित्य धूसरपणे आठवत राहते पण आपल्या मनात वेगळंच चांदणे पडलेले असते. ते असते डॉ. शैला लोहियांच्या संवेदनशीलतेचे, त्यांच्या विचारांचे, त्यांच्या काव्यात्म प्रतिभेचे. आपल्या नकळत आपल्यावरचा ताबा या लेखांनी काढून घेतलेला असतो. उत्कृष्ट कलाकृतीकडून आणखी कोणती अपेक्षा करायची असते?

- प्रा. विश्वास वसेकर