Jump to content

रुणझुणत्या पाखरा/आषाढाचा पहिला दिवस

विकिस्रोत कडून



 दक्षिण आफ्रिकेजवळच्या मादागास्कार बेटांतून मान्सून वारे हिंदी महासागरावर हिंदोळत गिरक्या घेत. तरंगत थेट केरळात येतात. ज्येष्ठाचं बोट धरून उत्तरेची वाट धरतात. पहिल्या पावसाच्या स्पर्शाने वृद्ध वडाच्या अंगावरही तृप्तीचे शहारे लहरतात. कर्नाटकात जेष्ठी पोर्णिमेला पेरणीचा मुहूर्त करतात. झाडांची पूजा म्हणजे वर्षाऋतूचे स्वागतच. ज्येष्ठी पोर्णिमेस वडाची पूजा केली जाते. त्यात पती सहवासाची शुभकामना असते.
 ज्येष्ठा पाठोपाठ आषाढ आभाळात दाटून येतो. घनगर्द सावळे मेघ ओथंबून येतात. आणि ओठावर कालिदास तरळू लागतो.
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाषलिष्ट सानुः
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श
 डोंगर शिखराला ढुशा देण्यासाठी वाकलेल्या उत्तर दिशेने जाणाऱ्या मेघराजा बरोबर, हिमालयातील कैलास पर्वतावरील अलकानगरीत रहाणाऱ्या आपल्या प्रिय पत्नीस... सखीस रामगिरीवरच्या यक्षाने आपल्या विरहार्त मनाचा संदेश... निरोप पाठवला. ते काव्य म्हणजे कवी कालिदासाचे काव्य 'मेघदूत'. आता हा यक्ष नागपूरजवळच्या रामगिरी पर्वतावर का रहात होता?
जे न देखे रवी ते देखे कवी...
 कवी कल्पनेच्या क्षितीजावर सतत नवनवे अंकुर फुटत असतात. कालिदास हा 'कवि कुलगुरू'. श्रेष्ठ भारतीय कवींची मोजदाद करावी म्हणून कालिदासाच्या नावाने करंगळी मोजली. आता दुसरे नाव? त्याच्या इतक्या योग्यतेचा दुसऱ्या कवीचे नाव सुचेना आणि करंगळीच्या शेजारच्या बोटाचे नाव पडले अनामिका.
अनामिका सार्थवती बभूव
 अनामिका हे नाव सार्थच ठरले.
कालिदास हा नाटककार होता. 'शाकुन्तलम्' या नाटकाचा अनेक परदेशी भाषात अनुवाद झाला. कालिदासाच्या जन्ममृत्यू बद्दल अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यातली एक अशी. कालिदास जन्मला ब्राह्मण कुटुंबात. परंतु लहानपणी आईवडिल मरण पावल्याने एका गवळ्याने त्याला वाढवले. तो देखणा, सुदृढ व बुद्धिमान होता. मात्र गुरुकुलात शिक्षण घेऊ शकला नाही. शेजारच्या राज्याच्या राजकन्येचा विवाह तेथील कपटी प्रधानाने या देखण्या मुलाशी लावला. आपला पती विद्या विभूषित नाही हे लक्षात येताच तिने त्याला हाकलून दिले. नंतर त्याने कालीमातेची उपासना केली वगैरे वगैरे... असला दैवी जोड देऊन कथा पूर्ण करण्यात आपली ख्याती आहेच. त्याने एखाद्या गुरूकुलात जाऊन विद्या ग्रहण केली असावी. असे म्हणूया. नंतर तो राजकन्येकडे आला. तिने त्याला प्रश्न केला "अस्तिकश्चिद् वाग्विशषः? तुझ्या वाणीत काही विशेष गुण आले का?
 कालिदासाने या प्रश्नातील प्रत्येक शब्दांपासून सुरुवात होणारे तीन काव्यग्रंथ निर्माण केले. 'अस्त्युत्तरस्यां दिशी देवात्मा' ही शिवपार्वतीपुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे. ही कुमारसंभवम् या काव्याची सुरूवात आहे. 'कश्चित्कान्ता विरह गुरूणा' ही मेघदूत या जगद्विख्यात रचनेची सुरूवात. तर, 'वागर्थाविवसंपृक्तौ' ही रघुवंश या काव्याची सुरुवात.
 कालिदास हा गुप्त घराण्यातील दुसरा चन्द्रगुप्त विक्रमादित्य याच्या दरबारात राजकवी होता. त्याचे वास्तव्य उज्जैनीत होते असे मानले जाते. त्याला हिमालयाचे विशेष आकर्षण होते.
 ...मेघदूत हे कवि प्रतिभेतून साकारलेले काव्य. त्याला पुराण वा देवकथेचा आधार नाही. त्याचे कथानक असे... एका यक्षाकडे ड्यूटी होती इन्द्रदेवाच्या पूजेसाठी १०८ कमळे आणून त्यातील भुंगे काढून टाकण्याची. हे काम करतांना यक्षाला सतत आठवण येत होती पत्नीशी केलेल्या शृंगार क्रीडांची. त्या व्यवधानात एका कमल कलिकेतला भुंगा आत तसाच राहिला. तो देवन्द्र इन्द्राला चावला. मग अर्थातच शाप. 'तू जिचा विचार करीत होतास तिचा आणि तुझा एक वर्ष विरह होईल,' लगेच यक्षाची पाठवणी नागपूर जवळच्या रामगिरी पर्वतावर झाली. आषाढाच्या पहिल्या दिवशी काळ्याभोर मेघरूपी बलदंड हत्तींचे थवे उत्तरेकडे जातांना पाहून यक्षाने त्या मेघांनाच दूत करून आपल्या पत्नीला आपली हृदय व्यथा व निरोप कळविला. तिचे निवासस्थान हिमालयातील कैलास शिखरावरील अलकानगरीत होते. तिथे जाण्याचा भौगोलिक मार्गही त्याने मेघाला सांगितला.
 काश्मिर, ओरिसा, बंगाल, मध्यप्रदेश येथील लोक त्याला आपला रहिवासी मानतात. पण तो भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा भारतीय महाकवी होता आणि आहे. त्याला हिमालयाचे, तेथील निसर्गाचे आकर्षण होते. कुमारसंभव, मेघदूत या काव्यात हिमालयाचे देखणे वर्णन त्याने केले आहे. 'उपमा' हे तर त्याचे वैशिष्ट्य राजकवी म्हणून निवड करण्यापूर्वी राजाने त्याला प्रश्न विचारला
कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृष्यते
 (कमलावर दुसरी दोन कमळे आहेत असे म्हणतात, पण ती दिसत नाहीत. तर कशी?)
 या श्लोकाची परिपूर्ती करतांना त्याने उत्तर दिले,
'बाले तव मुखाम्भोजात् कथमिन्द्रीवरद्वयम्
 बाले तुझ्या मुखकमलावर तुझे दोन निळे निरागस डोळे, ती जणु दोन कमळेच!
 असा हा कवी कुलगुरू. प्रत्येक भारतीयाने याच्या काव्याबद्दल, नाटकांबद्दल, त्याच्याबद्दल वाचले पाहिजे. तरच आपले 'भारतीयत्व' चहुअंगांनी बहरून जाईल. संपृक्त होईल.