रामस्तव

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


श्रीरामा ! नीरदश्यामा ! सुखधामा ! रघूत्तमा !

त्वत्पादनखचंद्राची ज्योत्स्रा माज्या हरू तमा. १


यास्तव स्मरतों नित्य स्वामी ! तुज दयाकरा !

तापापासूनि हा दीन मुक्त होय असें करा. २


सेवा करावया लावा देवा ! हा योग्य चाकर

या तप्ताच्या शिरीं आतपत्र हो तुमचा कर. ३


शरणागतसंत्राणीं रामा ! तूं बहु सादर

ऐसें असोनियां, दीन पावतो हा कसा दर ? ४


मायानदींत श्रीरामा ! तुजे चरण सांगडी

बहु आवडले हेचि साधूंच्या मानसां गडी. ५


मीनाचें जीवन जळ, दीनाचें तूंचि केवळ

मी नाथा ! तापलों. यत्नहीनाचें मुख्य तूं बळ. ६


आलों शरण्या ! तुजला शरणागत पातकी

न होसि तूं दीनबंधो ! शरणागतघातकी. ७


विश्वास विश्वास तुझा कीं तूं दीनासि रक्षिसी

कशाही संकटीं ‘ धांव ’ म्हणतां न उपेक्षिसी. ८


तुज्या प्रतापें आम्हांतें या काळीं जरि पाळिलें,

तरि सांभाळिलें सर्व; यश नातरि वाळिलें. ९


तरि पंकांत रुतली राय तो तीस उद्धरी

पाय दीनासि रक्षीना काय श्रेष्ठत्व तें तरी ? १०


राम रघूत्तम कामरिपुप्रिय लोकशोकहर यापरि भावें

दाशरथे ! तुज होउनियां पदिं लीन दीनजनबंधुसि गावें;

आमरण स्मृति हेच असो, वय या च साच सुपथांत सरावें,

दे वरदा ! वर या शरणाप्रति पापतापजलधीस तरावें. ११PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg