मृच्छकटिक

विकिस्रोत कडून 

 
सं स्कृ त   

सा हि त्य   

स री ता   

: ४   शू द्र क - कृ त   

मृच्छकटिक 

कथासार   

अमरेन्द्र   

वो रा अँ न्ड कं प नी, प ब्लि श र्स (प्रा य व्हे ट) लि०   
 

 

प्रकाशक :

एम्. के. वोरा
वो रा अ‍ॅण्ड कं प नी,
पब्लिशर्स (प्रायव्हेट) लि०
३ रा उं ड बि ल्डि ग,
काळबादेवी रस्ता,मुंबई २

किं म त स हा आ णे
पहिली आवृत्ती : १९५६
सर्वाधिकार प्रकाशकाधीन
मुद्रक :
अनंत चितामण रायरीकर
'स्वस्तिक मुद्रणालय'
४३९ शनवार पेठ, पुणे २

 

 
संस्कृत-साहित्य-सरिता

 विशाल महासागराला असंख्य नद्या येऊन मिळत असतात. अशा अगणित नद्यांनीच अमर्याद सागर बनलेला असतो. संस्कृत साहित्याचा महासागरहि असाच अनेक सरितांनी समृद्ध झालेला आहे. 'संस्कृत-साहित्यसरिता' असे नाव दिलेल्या या वाङ्मयमालेतून आपली आदिभाषा जी संस्कृत तिच्यांतील उत्तम उत्तम वाङ्मयाचा कथारूपानें थोडक्यांत परिचय करून देण्याचे आम्ही योजिले आहे. संस्कृत वाचणारे थोडे आणि समजणारे तर त्याहून कमी. तेव्हां आजच्या सर्वसामान्य माणसाला, लिहिता-वाचतां येऊ लागलेल्या नवशिक्षितालाहि या संस्कृत-वाणीचा आस्वाद कसा घेता येणार? परंतु त्यांना तो मिळणें तर आवश्यक आहे; कारण संस्कृत भाषेतील वाङ्मय हा आपला फार थोर वारसा आहे. तो गमावणे म्हणजे सर्वस्वच गमावून बसणे. यासाठीच संस्कृत भाषेतील थोर, प्रसिद्ध अशा वाङ्मयकृतींचे, नाटकांचे आणि काव्यांचे, कथासार आम्ही वाचकांपुढे सादर करीत आहोत.

 आम्ही असे समजतों कीं, देवभाषेतील या वाङमयीन कलाकृतींचा परिचय करून देण्याची आमची ही योजना एक चांगली योजना आहे-एक सत्संकल्प आहे. आणि असे सत्संकल्प उत्तम रीतीने तडीला नेण्याचे काम जनताजनार्दनाचेच आहे. ते तसे घडो, हीच इच्छा.

—प्रकाशक
 

 
प रि च य

 'मृच्छकटिक' हे नाटक शूद्रक नांवाच्या एका रसिक राजाने लिहिलें. अर्थात् संस्कृत वाङ्मयांतील इतर अनेक नाटकांप्रमाणे व नाटककारांप्रमाणे याहि नाट- काचा लेखन-काल व कर्ता याविषयी खूप मतभेद आहेत. परंतु अनेक दृष्टींनी हे नाटक असामान्य आहे, यांत कांही शंका नाही. आजहि वाचणाराला त्यांत अगदीं ताजे- पणा व जिवंतपणा वाटतो. याचे मुख्य कारण, शूद्रकाने नाटकांतील वातावरण अगदी खरेखुरे रंगविलेलें आहे.

 वास्तविक, तसे पाहिले तर चारुदत्त या एका उदात्त स्वभावाच्या ब्राह्मणाची आणि वसन्तसेना नांवाच्या गणि- केची ही एक प्रेमकथा आहे. परंतु तींत शूद्रकाने इतक्या विविध गोष्टी आणलेल्या आहेत. शर्वीलक व मदनिका यांच्या प्रणयाचे उपकथानक, राज्यक्रांति, जुगार, परोपकारी निःस्वार्थ पराक्रम, कौशल्यपूर्ण चोरी इ. आणि या सर्व गोष्टी नाटकांत कशा अगदी चपखल बसून गेलेल्या आहेत.

 उदात्त मानवी स्वभावाचे सुंदर नमुने आणि विचित्र दैवगतीचा विलक्षण खेळ या नाटकांत भरपूर पाहावयास सांपडेल, तत्कालीन समाजाचे यथातथ्य व जिवंत चित्र 'मृच्छकटिकां'त दिसेल. 'मृच्छकटिका' म्हणजे मातीची खेळांतली लहान गाडी. या नांवांतच नाटकांतील पात्रां- च्या परिस्थितीचे व स्वभावाचे प्रतिबिंब उत्तमरीतीने उमटलेले आहे.

लेखक
 

 
मृच्छकटिक

 शेठ-सावकारांच्या वस्तीत राहणारा चारुदत्त निर्धन झाला होता; पण त्याच्या मनाची श्रीमंती कायम होती. आणि खरे म्हणजे त्याच्या निर्धनपणामुळे ती अधिक खुलून दिसत होती. चारुदत्त नुसता मनानेच श्रीमंत नव्हता, तर दिसायलाहि मोठा देखणा होता, रूपवान होता. आणि तो अत्यंत रसिकहि होता.

 याच नगरांत एक गणिका राहात असे. रूप आणि धन या दोन्ही गोष्टी परमेश्वराने तिला मुक्त हस्ताने दिलेल्या होत्या. आणि त्याबरोबरच तिचे हृदयहि सदगुणांनीं संपन्न करायला तो विसरला नव्हता. या गणिकेचे नांव वसंतसेना. हिची आई धंद्याने वेश्या असल्यामुळे साहजिकच हिचे राहाणें वेश्यावस्तीत होते.

 तो काळ खूप जुना-म्हणजे जेव्हां क्षिप्रा नदीच्या तीरावर भारतीय संस्कृति समृद्धपणे नांदत होती तेव्हांचा होता. क्षिप्रेच्या तीरावरील महाकालाचे उज्जयिनी म्हणून जें सुप्रसिद्ध शहर तीच चारुदत्त आणि वसन्तसेना यांची वास्तव्य-नगरी.

 उज्जयिनीवर त्या काळीं सत्ता होती पालक राजाची. अत्यंत जुलमी असलेला हा राजा दुष्ट आणि दुराचरणीहि होता. अर्थातच प्रजा त्याच्या जुलमाखाली चिरडून भरडून जात असल्यामुळे अत्यंत असंतुष्ट होती; पालकाचे जुलमी जोखड मानेवरून फेकून देण्यासाठी उत्सुक होती. अर्थातच त्यासाठी तिने चळवळ चालविली होती.त्यामुळे त्या चळवळीचा नेता आर्यक याला पालक राजानें कैदेत डांबून टाकले.

 या उज्जयिनी नगरींत आणखी एक व्यक्ति होती. तिचे नांव संस्थानक. पण तो श-ष-स हीं अक्षरें सारखीच उच्चारीत असल्यामुळे त्याला ‘शकार' असे नांव लोकांनी दिले होते. ही शकाराची स्वारी होती अर्धवट. पण तो राजाचा मेहुणा असल्यामुळे त्याला भिऊन वागावे लागे. शिवाय त्याच्याकडे नगर-कोतवालाचे काम राजाने दिलेले होते, त्यामुळे त्याच्या हातांत अधिकारहि मोठा आलेला होता.

 उज्जयिनींत वसंत ऋतूंत कामदेवाचा उत्सव साजरा होत असे. मोठमोठे कलावन्त त्यांत भाग घेत. नाणावलेले नर्तक, गवई आणि नाट्यविशारद त्या उत्सवासाठी जमत. ज्याच्या त्याच्या नैपुण्याप्रमाणे त्यांना राजाकडून बिदागी मिळे. श्रीमंत शेठ-सावकारहि या प्रसंगी आपली पैशाची थैली थोडी ढिली करून आपला रसिकपणा प्रकट करीत. परंतु त्यांतहि चारुदत्ताचे वागणें जातिवंत रसिकाला शोभून दिसण्यासारखे असे. एखादी उत्तम चीज ऐकली, एखादे उत्कृष्ट नृत्य पाहिलें कीं या सावकार ब्राह्मणाची रसिकता इतकीं बेभान होऊन जायची की अंगावर असेल तो दागिना सहज उतरला जाऊन त्या कलावन्ताच्या हाती पडायचा ! पण ही चारुदत्ताची रसिकता व्यवहारांत खपण्यासारखी नव्हती. त्या रसिकतेनेच त्याला दरिद्री बनवले. परंतु त्या रसिकतेनेच त्याला आणखी एक लाभ करून दिला!

 कामदेवाच्या मंदिरांतील बागेत वसंत पौणिमेला मेळा भरला होता. वसन्तसेना गणिका खरी; पण तिला शरीरसौंदर्याबरोबरच कंठमाधुरीहि अप्रतिम लाभलेली होती. कामदेवाच्या उत्सवांत चारुदत्त अर्थातच हजर होता. आणि वसन्तसेना गात होती. वसन्तसेनेच्या गोड गळ्यावर चारुदत्त अगदी खुष झाला. वसन्तसेनेने या रसिकश्रेष्ठाला पाहिले तेव्हां ती नुसती प्रसन्नच झाली नाहीं तर तिचे हृदय त्याच्याविषयींच्या प्रेमपाशांतहि जखडून गेले. परंतु हे प्रेम सफळ कसे होणार? वसन्तसेना पडली जन्मानें वेश्या आणि चारुदत्त उच्च कुळांतला प्रतिष्ठित ब्राह्मण.

 वेश्या म्हणजे ती कोणाच्याहि मालकीची. त्यांतल्या त्यांत जे श्रीमंत आणि राज्यांतील अधिकार हाती असलेले त्यांचा तिच्यावर हक्क अधिक. असे असतांना वसन्तसेना या वेश्येनें चारुदत्ताला आपले हृदयसर्वस्व देऊन टाकावे हे शकाराला मुळींच रुचलें नाहीं.

 वसन्तसेना आपल्या वेश्यावृत्तीला उबगली होती. तिला कोठे तरी शुद्ध प्रेमाचा आसरा हवा होता. चारुदत्ताच्या ठिकाणी तिला तो मिळेल असा तिचा विश्वास होता.

 वसन्तसेना एका रात्रीं नटूनथटून रस्त्याने चालली होती. बरोबर तिच्या दासी होत्या. अंधार चांगलाच पडलेला होता. वसन्तसेना ज्या रस्त्याने चालली होती त्याच रस्त्यावरून शकाराची स्वारी पण येत होती. शकाराने वसन्तसेनेला पाहिले आणि तो तिच्या मागे लागला. अंधार आणि गोंधळ यांच्या गडबडीत वसन्तसेना पळतां पळतां आपल्या दासींपासून एकटी पडली. तिच्या पायांतल्या नूपुरांचा आवाज आणि वेणींतल्या फुलांचा सुगंध यांच्या अंदाजाने त्या दाट अंधारांतहि शकार तिचा पाठलाग करीत तिच्या मागोमाग येत होता. आता कोठे आसरा घ्यावा या काळजीत वसन्तसेना होती. इतक्यांत शकार बावळटपणाने ओरडला ‘अरे, ही इकडे चारुदत्ताच्या घराकडे कुठे निघाली !'

 वसन्तसेनेला थोडा धीर आला. तिने पायांतले नपुर काढले, वेणींतली फुलें फेकून दिली. आणि काय योगायोग! नेमके त्याचवेळी चारुदत्ताच्या घराचे दार उघडले. चारुदत्ताचा मित्र मैत्रेय आणि त्याची दासी रदनिका बळी टाकण्यासाठी म्हणून रस्त्यावर आलेली होती. रदनिकेच्या एका हातांत दिवा होता. वसन्तसेना चटकन पुढे झाली आणि आपल्या पदराने दिवा विझवून टाकून उघड्या दारांतून झटकन आंत शिरली.

 बाहेर आतां सर्वत्र काळोखच होता. शकाराबरोबर त्याचे मित्र विट आणि चेट हे दोघे होते. ते एकमेकांनाच पकडून अंधारांत “ सांपडली रे सांपडली' म्हणून ओरडत होते. असे चाचपडत असतांनाच शकाराच्या हातीं स्त्रीची वेणी लागली. मग काय ! तो जोरजोराने ती वेणी ओढीत म्हणू लागला, "आतां कुठे जाईल वसन्तसेना ! " परंतु अंधारांत शकाराच्या हातीं जिची वेणी लागली ती वसन्तसेना नव्हतीच. ती होती बळी टाकण्यासाठी बाहेर आलेली रदनिका. विझलेला दिवा लावून आणण्याकरिता मैत्रेय घरांत गेला होता. तो दिवा घेऊन बाहेर येतों तों रदनिका मदतीसाठीं ओरडत असलेली त्याने ऐकले. कारण अंधारांत आपली वेणी कोण आणि कां ओढीत आहे हे तिला कांहीं समजतच नव्हते. उजेडांत पाहिले तेव्हां मैत्रेयाच्या लक्षांत खरा प्रकार आला. लगेच तो आपल्या हातांतील सोटा सरसावून शकारावर धांवला. “चारुदत्त पैशानें गरीब झाला म्हणून त्याच्या माणसांचा असा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाहीं," तो उसळून म्हणाला.

 परंतु एवढ्यांत विट मध्ये पडला आणि त्याने मैत्रेयाकडे क्षमायाचना केली. शकाराला मात्र वाटत होते की, वसन्तसेना अशी अकस्मात चारुदत्ताकडे निसटू शकली याला कारण हा मैत्रेय असला पाहिजे. म्हणून त्याने तेथून निघून जाण्यापूर्वी मैत्रेयाकडे पाहात धमकी दिली की, वसन्तसेना आपल्याला परत मिळेपर्यंत आपण चारुदत्ताला शत्रु समजू.

 वसन्तसेना चारुदत्ताच्या घरांत आली आणि एका भितीच्या आडोशाला झाली. रदनिकेची वेणी अंधारांत शकाराने ओढल्यामुळे चारुदत्ताच्या घरापुढे जो गलबला माजला त्यामुळे चारुदत्त काय झाले म्हणून पाहाण्यासाठी दाराकडे आला. हवेत फार गारठा होता आणि वारा जोराने वाहात होता. चारुदत्ताचा मुलगा रोहसेन सोप्या- वर झोपला होता. रोहसेनाला गार वारा बाधेल म्हणून त्याला आंत नेऊन झोंपविण्यासाठी चारुदत्ताने आपल्या अंगावरची शाल त्या अंधारांत रदनिका समजून वसन्त- सेनेच्या अंगावर फेकली. आपल्या प्रियकराच्या अंगावरील वस्त्र अशारीतीने आकस्मिकपणे आपल्या हाती आल्याने तिला केवढा आनंद झाला ! तिने चारुदत्ताची गैरसमजूत दूर करण्याचा प्रयत्न न करतां पहिल्याने ती शाल स्वतः- च्या अंगाभोंवतीं लपेटून एक प्रकारचे सुख अनुभवले. आणि मग तिने रोहसेनाच्या अंगावर ती घातली.

 थोड्या वेळानें रदनिका व मैत्रेय बळी टाकून घरांत परत आली तेव्हा मात्र चारुदत्त बुचकळयांत पडला. मग मगाशीं रदनिका समजून आपण शाल अंगावर फेकली ती कोणा स्त्रीच्या ?' पण त्याच्या या प्रश्नाचे उत्तर स्वतः वसन्तसेनेनेच पुढे होऊन दिले. अर्थातच दासी समजून आपण वसन्तसेनेसारख्या एक गुणवती परस्त्रीला काम सांगितलें याबद्दल चारुदत्ताला वाईट वाटले. त्याने लगेच तिची क्षमा मागितली. परंतु आपण सांगितलेले इतकें क्षुल्लक काम तिनेंं केलेंं हे पाहून त्याला तिच्या प्रेमाचेंंहि कौतुक वाटले.

 चारुदत्तानें क्षमायाचना केली, पण उलट वसन्तसेनाच त्याला म्हणू लागली की, मी आपली परवानगी न घेतांच आपल्या घरांत आलेंं तेव्हा आपणच मला क्षमा करा- यला हवी. मैत्रेयाने त्याच्या दारासमोर घडलेला प्रसंग चारुदत्ताला अगोदरच सांगितलेला होता.त्यावरून वसन्तसेना आपल्या- वर प्रेम करीत असल्याचे चारुदत्ताला समजून आलेंच होते. आता तिच्या या शालीन वागणुकीने तर ती चारु- दत्ताला अधिकच प्रिय वाटू लागली. परंतु याचा अर्थ चारुदत्ताने तिच्या प्रीतीचा स्वीकार केला असा मात्र नव्हता.

 वसन्तसेनेने आपल्या घरी परत जावयास निघण्यापूर्वी आणखी एक गोष्ट केली. ती म्हणाली, “सध्यां चोरा- चिलटांची फार भीति आहे. तेव्हां एवढे माझे दागिने आपल्याकडे राहू द्यात. चारुदत्ताने पुष्कळ आढेवेढे घेऊन मग त्या गोष्टीला संमति दिली. इतकेच नव्हे तर तो तिला तिच्या घरापर्यंत स्वतः पोहोंचवायलाहि गेला.

**

 दुसरे दिवशीं वसन्तसेना आपल्या महालांत बसली असतांना संवाहक नांवाचा एक माणूस धापा टाकीत तिच्याकडे येऊन पोहोचला. हा होता एक अट्टल जुगारी. जुगार खेळता खेळतां हे राजेश्री दहा मोहरा हरले होते. आणि त्या देण्यासाठी जवळ कांहींच नसल्यामुळे शेवटी त्याने उदार वसन्तसेनेकडे धाव घेतली होती.

 त्याने थोडक्यांत आपली कर्मकहाणी सांगितली. संवा- हक हा मूळ एका मोठ्या कुलीन घराण्यांतला. परंतु पुढे कुसंगतीने जुगारी बनला आणि भणंग झाला. त्याचा पोटाचा उद्योग मालीश करण्याचा. याच कामासाठीं तो हीं दिवस चारुदत्ताकडेहि होता. आणि चारुदत्ताकडची नोकरी सोडूनच तो या जुगारीच्या व्यसनांत फसला होता.

 संवाहक एकाकाळचा का होईना, पण चारुदत्ताचा नोकर आहे हे समजतांच वसन्तसेनेला त्याच्याबद्दल विशेष सहानुभूति वाटली. त्याच्या तोंडून चारुदत्ताची स्तुति ऐकून तर तिला इतकें बरे वाटलें कीं, तिने आपल्या हातांतली सोन्याची बांगडी काढून देऊन जुगारी संवाह- काचे देणे पुरे करून टाकले. वसन्तसेनेच्या अंत:करणाचा तो थोरपणा पाहून संवाहक शरमला आणि त्याने तत्काळ बौद्धभिक्षुची दीक्षा घेतली.

 संवाहक निघून गेल्यानंतर कांहीं वेळांतच वसन्तसेनेचा नोकर कर्णपूरक तिच्याकडे धांवत आला. त्याने नुकत्याच केलेल्या पराक्रमाचे समाधान त्याच्या चेह-यावर दिसत होते. “ बाईसाहेब, चारुदत्त खरोखरीच उदार ! हे पाहा त्याने माझ्या धाडसाबद्दल मला दिलेले बक्षीस! " हातां- तली सुळसुळीत सुगंधी शाल वसन्तसेनेपुढे करीत कर्ण पूरक म्हणाला. त्याने खरोखरीच मोठे विलक्षण धाडस केलेले होते.

 संवाहक पश्चात्ताप पावून भिक्षु बनला, तो रस्त्याने चालला होता. इतक्यांत वसन्तसेनेचा एक पिसाळलेला हत्ती समोरून येत होता. त्याने त्याला सोडेंत धरून वर उचलले. त्या बिचाऱ्या भिक्षुला तेथेच निर्वाण मिळण्याची पाळी आली ! कोणी त्या हत्तीला आवरण्यासाठी पुढे होण्याचे साहस करीना. याचवेळी कर्णपूरक तेथे आला. त्याने एकंदर सर्व परिस्थिति लक्षात येतांच तडक हत्ती- वरच चाल केली. त्याच्या हातांत जे हत्यार होते त्याचा तडाखा बसतांच हत्तीने भिक्षुला सोडून दिलेंं व तो कर्ण- पूरकाकडे वळला. कर्णपूरकानें लगेच त्याला साखळदंडांनी जखडून टाकला.

 कर्णपूरकाच्या हातून हा पराक्रम घडत असतांना चारु- दत्तानें तो पाहिला. त्या परोपकारी पराक्रमाचे कौतुक करावे असे रसिक चारुदत्ताच्या साहजिकच मनांत आलेंं. पण त्याला बक्षीस देण्यासाठी त्याच्याजवळ होते कुठे काय ? आपले मनगट, कान, त्याने चांचपून पाहिले, पण त्यावरचे अलंकार तो केव्हांच देऊन चुकला होता. अखेर अंगावर पांघरलेली उंची शालच त्याने त्या पराक्रमी कर्णपूरकाच्या हाती दिली.

 कर्णपूरक ही सारी हकीकत वसन्तसेनेला स्वतःच सांगत होता. चारुदत्ताच्या औदार्याने तो खरोखरीच आश्चर्यचकित झाला होता. परंतु वसन्तसेना तर नुसते त्याचे नांव ऐकू- नच आनंदांत रंगली होती. तिने कर्णपूरकाच्या हातून ती आपल्या प्रियकराची शाल स्वत:कडे घेतली आणि कर्ण- पूरकाला तिच्या मोबदल्यांत एक सोन्याचा दागिना देऊन त्याची रवानगी केली. त्या रात्रीं चुकून अंगावर पडलेली ती भाग्यशाली शाल अशारीतीनेंं अगदी अकल्पितपणे कायमची आपल्यापाशीं आली याचे तिला कोण कौतुक

नि केवढा हर्ष !
**

 उत्तम गाणे म्हणजे चारुदत्ताला मेजवानी. त्या रात्री रेभिलच्या गाण्यांत तो इतका गुंगून गेला कीं रात्र फार झाली आहे याचे त्याला भानहि उरलेंं नाहीं. तो जागरणाने अगदी थकला होता. तरी घरी येऊन अंथरुणावर अंग टाकण्यापूर्वी त्याने आपला मित्र मैत्रेय याच्यापाशीं एका गोष्टीची काळजीपूर्वक चौकशी केलीच. “ वसन्तसेनेचे दागिने नीट सुरक्षित ठेवले आहेस ना?"

 “ त्याची काळजी नको; उशाला घेऊनच निजतोंं म्हणजे चोरीची भीतीच नको.” मैत्रेयाने बेफिकीरपणाने त्यावर उत्तर दिले.

 लवकरच दोघेहि गाढ झोंपी गेले. परंतु नगरांतले चोर मात्र आतां जागे झाले होते. शर्वीलक हा वास्तविक वेदपारंगत ब्राह्मणाचा मुलगा; परंतु चोरी-जुगारीच्या नादाला लागला होता. चोरीच्या कामांत त्याचा मोठा हातखंडा. त्याचे प्रेम बसले होते मदनिका नांवाच्या एका दासीवर. मदनिका ही वसन्तसेनेची दासी. दासी पण आपल्या मालकिणीप्रमाणेच मनानेंं मोठी होती. तिचेंंहि हृदय शर्वीलकाच्या प्रेमपाशांत गुंतले होते. परंतु ती पडली दासीगुलाम. पुरेसे पैसे भरून तिची कोणी सुटका करणार तेव्हां ती स्वतंत्र होणार आणि मग लग्न करणार. त्यासाठी शर्वीलक पैशाच्या फिकीरीत होता. त्यानेंं ठरविलें कींं, कोठेतरी डल्ला मारायचा. आणि त्या रात्रीं तो डल्ला मारायला आला तो नेमका चारुदत्ताच्या वाड्यांत.

 एक सुंदरसे भोंक पाडून शर्वीलक आंत शिरला. पण पुस्तके, वीणा, मृदंग याशिवाय त्याच्या दृष्टीला मौल्यवान असें कांहींच पडेना. निराश होऊन परतायच्या विचारांतच होता इतक्यांत त्याचेंं भाग्य उघडलें. " मित्रा, चारुदत्ता हे दागिन्यांचे गाठोडेंं घे बाबा आपल्याकडे. एरवीं मला नाहीं शांतपणाने झोंप येत." मैत्रेय झोपेत बरळत होता. आणि झोपेतच त्याने ते गांठोडेंं पुढे केले. शर्वीलक अशी संधी थोडीच दवडणार !

 शर्वीलकाने तेंं सोन्याच्या दागिन्यांचे गांठोडेंं घेऊन पळ काढला तेव्हां रदनिकेनें कोणीतरी पळाल्याचे पाहिलेंं. तिने आरडाओरड केली. मैत्रेय व चारुदत्त जागे झाले. पण इतका वेळ चोर थोडाच तिथे थांबतो ! चारुदत्ताचे लक्ष चोराने पाडलेल्या भिंतींतील भोंकाकडे गेलेंं. ‘वा ! किती सुंदर कलाकृति आहे !' म्हणून त्याचे त्याने कौतुक केले॰ चोराला एका (एकेकाळच्या ) मोठ्या सावकाराच्या घरां- तून हात हालवीत परत जावे लागले नाहीं याविषयी मात्र त्याला समाधान वाटलें.–पण दागिने गेले होते ते दुसऱ्याचे! निर्धन चारुदत्ताचे घर चोरट्यांनी फोडले असे सांगूनसुद्धां कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. वसन्तसेनेनेंं एवढ्या विश्वासाने ठेवलेले दागिने गडप करण्यासाठी चारुदत्ताची ही हूल आहे, असेच कोणीहि म्हणालें असतें.

मोठा चमत्कारिक प्रसंग होता त्या मानधन व प्रामाणिक पुरुषावर !

 चारुदत्ताच्या पत्नीला हे समजलेंं. अर्थात तिला वाईट तर वाटलेंंच पण आपल्या पतीची अब्रू वाचविण्याची हीच वेळ आहे हेंहि तिनेंं लक्षात घेतलेंं. आपल्या अंगावरच्या मौल्यवान रत्नहाराची तिला आठवण झाली. पण मानी पति ह्या मदतीचा स्वीकार सरळपणे करणार नाहींं, ही तिची खात्री होती. म्हणून तिने कांहीं व्रताच्या सांगतेची दक्षिणा म्हणन तो रत्नहार मैत्रेय ब्राह्मणाच्या हातावर ठेवून त्यावर पाणी सोडले. चारुदत्त यांतील इंगीत न समजण्याइतका सामान्य बुद्धीचा नव्हता. तरीपण नाइला- जाने त्याने सांगितले की, 'मैत्रेया, द्युतांत दागिने हरलों म्हणून त्याच्या मोबदल्यांत ही रत्नमाला पाठविली आहे, असेंं वसन्तसेनेला सांग. रत्नमाला तिला देऊन ये.'

 मैत्रेय आपल्या उदार मित्राच्या सांगण्याप्रमाणे निघाला. त्याच्या मनांत नव्हते, पण दुसरा इलाजहि नव्हता. एवढ्याशा दागिन्यासाठींं त्याच्या कितीतरीपट किंमतीची रत्नमाला वसन्तसेनेने घ्यावी, हे त्याला पसंत नव्हतेंं. तरी- पण तो तिच्याकडे जावयाला निघाला. परंतु तो तिथे जाऊन पोहोचण्यापूर्वीच वसन्तसेनेचे दागिने तिच्या घराची वाट चालूंं लागले होतेंं.

**

 चारुदत्ताच्या घरून दागिन्यांचे डबोलें घेऊन पळालेला शर्वीलक खुषीत होता. त्याने दुसरे दिवशीं प्रथम मदनिके- च्या भेटीसाठीं वसन्तसेनेचे घर गांठलें.

 परंतु शर्वीलक तेथे येऊन पोहोचण्यापूर्वीच आणखी भारी किंमतीचे दागिने वसन्तसेनेच्या घरी येऊन परत गेले होते. म्हणजे त्याचेंं असेंं झालेंं होतेंं. श्रीमंत शकाराकडून वसन्तसेनेसाठी त्याचा रथ आणि मौल्यवान अलंकार आले होते. ‘या अलंकारांचा स्वीकार करून या रथांत बसूनच तिनेंं शकाराच्या घरीं जावे' असा निरोप तिला तिच्या आईकडून आला होता.परंतु तो निरोप ऐकतांच वसन्तसेना भयंकर संतापली. तिने आपल्या आईला स्वच्छ सांगून टाकलें कीं, ‘मी जिवंत राहायला हवी असेन तर असले निरोप पुन्हा मजकडे पाठवीत जाऊ नकोस.'

 त्या संतापलेल्या मनःस्थितींतच ती आपल्या दालनांत बसली होती. एवढयांत त्याच्या बाहेरच्या बाजूला शर्वीलकानें मदनिकेला गांठलेंं.

 मदनिके, आजपासून तू आपल्या गुलामींतून मुक्त झालीस. हे किंमती दागिने घे आणि ते आपल्या माल- किणीला देऊन चल माझ्याबरोबर." शर्वीलकानेंं हातांतलें जड गांठोडे पुढे केले. मदनिकेने ते हाती घेऊन उलगडलेंं. आंतले दागिने पाहिल्यावर मात्र ती एकदम चपापली. तिचा आनंद ओसरला आणि तिनेंं अधीर होऊन विचारलेंं," कुठून, कुठून आणलेत हे दागिने ?"

 अर्थातच शर्वीलकानेंं सर्व खरी हकीकत सांगितली

मदनिकेची शंका बरोबर ठरली. आपल्या मालकिणीचेच हे दागिने आहेत याविषयी तिची खात्री पटली. हे दागिने मालकिणीला देणेंं म्हणजे चोरी कबूल करण्यासारखेंंच होते. परंतु हे दागिने नाहींंत म्हणजे आपली सुटका नाहीं आणि आपली सुटका नाही म्हणजे शर्वीलकाच्या प्रेमाची पूर्तता नाहीं, हे मदनिका ओळखून होती. ती उदास झाली. तिने क्षणभर विचार केला आणि वसन्तसेनेच्या दासीला शोभेसेंच बोलली, "आर्य, आतां असे करा. हे दागिने घ्या आणि वसन्तसेनेपुढे जाऊन म्हणा, 'चारुदत्तांनींं हे आपले दागिने माझ्या हातीं परत पाठविले आहेत.' आपण चारुदत्ताचे नोकर असल्याची बतावणी करा म्हणजे झालें."

 शर्वीलकाचाहि नाइलाज होता. त्याने मदनिकेचे म्हणणेंं मान्य केलेंं. 'निदान चोरीच्या आरोपांतून सुटलों,' तो मनाशी म्हणाला. परंतु त्याला काय माहीत की आपले संभाषण पलीकडच्याच दालनांत बसलेल्या वसन्तसेनेने सारेंं सारेंं ऐकलेलेंं होतेंं !

 दागिने पुढे ठेवून शर्वीलकाने ठरल्याप्रमाणे गंभीरपणाने म्हटले, “ बाईसाहेब, हे आपले दागिने घारुदत्तांनी पाठविले आहेत."

 वसन्तसेनाहि तितक्याच गंभीरपणानेंं म्हणाली, “आर्य, चारुदत्तांकडून मला पूर्वीच निरोप आला आहे. द्या ते दागिने इकडे आणि मदनिकेला आपल्याबरोबर घेऊन चला. कारण जो दागिने आणून देईल त्याला मदनिका द्यावी असा चारुदत्तांचा निरोप आहे.

 जवळच उभी असलेली मदनिका सारे समजली. तिचे डोळे आंसवांनीं भरून आले आणि अंत:करण मालकिणीच्या थोर औदार्यानेंं आनंदून पाझरू लागले. मदनिकेचा हात पत्नी म्हणून शर्वीलकाच्या हातीं देतांना वसन्तसेनेला केवढेंं समाधान वाटत होते ! वेश्येची दासी आणि एक ब्राह्मणपुत्र यांचा प्रेमविवाह घडून येत होता. परंतु या प्रसंगानेंं शर्वीलकाची मती सर्वस्वीं पालटली. आर्यक त्याचा मित्र होता. त्याची सुटका करून राज्यक्रांति यशस्वी करण्याच्या उद्योगाला तो लागला.

 मदनिका आणि शर्वीलक वसन्तसेनेनेच आणविलेल्या रथांतून निघून गेली आणि मैत्रेय आल्याची वर्दी वसन्तसेनेकडे पोहोंचली.

 मैत्रेयाला वाटत नव्हतेंं कीं, वसन्तसेना एवढ्या मोठ्या किंमतीचा हा रत्नहार थोड्याशा दागिन्याच्या मोबदल्यांत ठेवून घेईल म्हणून. परंतु त्या सरळ वृत्तीच्या ब्राह्मणाची ती अपेक्षा चुकीची ठरली.

 वसन्तसेनेनेंं मैत्रेयाचे स्वागत करून त्याचा आदरसत्कार करतांच मैत्रेय हातांतील ती मौल्यवान रत्नमाला पुढे करीत म्हणाला, " मित्र चारुदत्तानेंं द्यूतांत आपले दागिने चुकून घालविले. तेव्हां त्यांच्या मोबदल्यांत ही रत्नमाला त्याने आपल्याकडे पाठविली आहे. तिचा स्वीकार करावा."

आणि वसन्तसेनेनेंं लगेच तिचा स्वीकार केलाहि. नंतर तिनेंं इतकेंंच सांगितले कींं, 'मी आर्य चारुदत्तांच्या भेटीला येत आहे एवढे त्यांना कळवा.'

 मैत्रेय मनांतल्या मनांत थोडा रुष्ट होऊनच निघून गेला. वसन्तसेनेच्या लोभीपणाचेंं त्याला आश्चर्य वाटत होते आणि रागहि आला होता.

 मैत्रेयाबरोबर दिलेल्या निरोपाप्रमाणे तिला लगेच आपल्या प्रियकराच्या भेटीसाठींं निघावयाचे होते. परंतु अकस्मात मुसळधार पाऊस सुरू झाला. विजा चमकत होत्या. मेघ गर्जत होते. परंतु वसन्तसेनेला आतां धीर धरवत नव्हता. तिने शर्वीलकाच्या हातून परत आलेले दागिने आणि मैत्रेयानेंं दिलेली रत्नमाला दोन्ही बरोबर घेतली आणि ती चारुदत्ताच्या घराची वाट चालूंं लागली. वाऱ्यावादळाला तोंड देत भिजून ओलीचिंब झालेली ती चारुदत्ताच्या घरी येऊन पोहोंचली, तेव्हां चारुदत्त तिच्या स्वागताला दारांतच उभा होता.

 ‘जुगारांत चुकून हरलेले दागिने' आणि 'त्यांच्या मोबदल्यांत पाठविलेला' रत्नहार या दोन्ही गोष्टी वसन्तसेनेजवळ पाहून चारुदत्त आश्चर्यचकित झाला. परंतु त्या दागिन्यांची एकंदर हकीकत वसन्तसेनेच्या दासीच्या तोंडून ऐकून तर त्याला वसन्तसेनेच्या थोर अंतःकरणाची खात्री पटली.

 चारुदत्ताची पत्नी धूता आणि त्याचा लहान मुलगा रोहसेन यांची वसन्तसेनेशी ओळख झाली. घरांतली सर्वच माणसे तिच्याशी प्रेमादराने वागलीं. वसन्तसेनेच्या मनावर त्याचा मोठा परिणाम झाला. तिला तें घर सोडून जावेसे वाटेना. बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊसहि थांबण्याचींं चिन्हें दिसत नव्हती. त्यामुळे अखेर वसन्तसेना त्या रात्री चारुदत्ताच्या घरीच राहिली. दोन प्रेमी जीवांचे मीलन झालेंं.

 सकाळ उजाडली आणि चारुदत्त आदल्या रात्रींं ठरल्याप्रमाणे जीर्णोद्यानाकडे निघून गेला. वसन्तसेना साजशृंगार करून संकेताप्रमाणे त्याच्या भेटीसाठी त्याच्याच गाडीतून जाणार होती. चारुदत्ताने आपला नोकर वर्द्धमानक याला तशी सूचना देऊन ठेवली होती.

 वसन्तसेना मोठ्या उल्हसित मनाने दाराशींं आली आणि दारासमोर दिसली त्या गाडींत सरळ जाऊन बसली. गाडी चालू झाली. आता लवकरच प्रिय चारुदत्ताची मनमुराद भेट होईल, या आनंदांत वसन्तसेना जीर्णोद्यान येण्याची वाट पाहात राहिली. परंतु ती बसली होती ती गाडी चारुदत्ताची कुठे होती ! ती होती शकाराची. आणि वसन्तसेना चुकून तींत जाऊन बसली होती.

 म्हणजे तो एक मोठाच घोटाळा झाला होता. चारु- दत्ताचा सारथी गाडी जोडून दारापुढे येऊन उभा राहिला, परंतु नंतर त्याच्या ध्यानात आले की गाडींत लोड-तक्के ठेवण्याचेंं राहून गेले आहे. म्हणून तो गाडी घेऊन तसाच परत गेला.

 एवढ्यांत शकाराची गाडी त्याच रस्त्यानेंं चालली होती, ती नेमकी चारुदत्ताच्या घरासमोर अडून राहिली. बाजाराचा दिवस असल्यानेंं पुढला रस्ता तुडुंब भरून गेला होता. आणि शकाराच्या गाडीला पुढेंं रस्ता मिळत नव्हता. शकाराने आपला सारथी स्थावरक चेट याला गाडी जीर्णो- द्यानांत घेऊन येण्यास सांगितलेलेंं होतेंं. त्याप्रमाणेच चेट निघाला होता.

 आणखी एक भानगड नेमकी याच वेळींं झाली होती. पालक राजाविरुद्ध बंड करणारा आर्यक बंदीखान्यांत पडला होता. तेथून त्यानेंं आपली सुटका करूत घेतली होती. आर्यक तुरुंगांतून पळाल्यामुळे जिकडे तिकडे गडबड उडून गेली होती. सर्वत्र धांवाधांव नि शोधाशोध चालू होती. प्रत्येक वाहन तपासण्याचे हुकूम सुटले होते. सारे सरकारी अधिकारी गडबडून गेले होते.

 आणि तुरुंगांतून निसटलेला आर्यक आला तोहि नेमका चारुदत्ताच्या घरापुढील रस्त्याने. यावेळपर्यंत वर्द्धमानकानें तक्के-लोडांसह गाडी आणून दारापुढे उभी केली होती. चारुदत्ताच्या ह्या गाडीचे पडदे वर सारलेले होते. आर्य- काला योग्य संधी सांपडली. तो पटकन त्या गाडींत जाऊन बसला आणि त्यानेंं पडदे बंद करून घेतले. कोणीतरी आंत बसलें याची जाणीव होतांच वर्द्धमानकानें ती वसन्त- सेनाच समजून गाडी जोराने पिटाळली.

 परंतु वाहनांची तपासणीं सुरू होती. पळालेल्या आर्य- काला पकडण्यासाठी रस्ते रोखले गेले होते. चारुदत्ताची गाडी पुढे येतांच चंदनक नांवाच्या एका अधिकाऱ्यानेंं तिच्या तपासणीसाठी गाडीचा पडदा बाजला केला. तों आत आर्यक बसलेला. चंदनक घडू पाहात असलल्या राज्य- क्रान्तीविषयी सहानुभूति बाळगणारा होता. त्याने पाहिलेंं कीं, गाडी अशीच पुढे जाऊ दिली तर आर्यकाला वांच- विल्याचे श्रेय लाभेल आणि राज्यक्रान्तीला सहाय्य होईल. तेव्हां त्याने गाडी तशीच पुढे जाऊं दिली. परंतु दरम्यान जवळच असलेल्या वीरक नावाच्या दुसऱ्या एका अधि- काऱ्याला चंदनकाबद्दल संशय आला. त्याने त्याला उलट- सुलट प्रश्न विचारावयास सुरुवात केली. परंतु चंदनकानें त्याला उडवून लावलेंं. त्यामुळे वीरक संतापला आणि न्यायालयांत फिर्याद देण्यासाठी निघून गेला.

 चंदनकानेंं जाऊ दिलेली चारुदत्ताची गाडी उद्यानांत येऊन पोहोंचली. चारुदत्ताने उत्सुकतेने दार उघडलेंं; पण तेथे वसन्तसेनेऐवजी तुरुंगांतून पळालेला ‘राजद्रोही' आर्यंक त्याला दिसला. चारुदत्ताला त्या बिकट परिस्थिती- ची आणि तिच्या संभाव्य भयंकर परिणामाचीहि कल्पना आली. त्यानेंं आर्यकाच्या बेड्या तोडविल्या आणि आपल्या गाडींतून तसेच सुरक्षित स्थळी जाऊंं दिले; परंतु आपण मात्र तेथून लगेच काढता पाय घेतला.

 शकाराची गाडी उद्यानांत ठरल्या ठिकाणींं म्हणजे जेथे शकार गाडीची वाट पाहात थांबला होता तेथे सरळ निघून आली. गाडी आली म्हणून शकाराला हायसेंं वाटलेंं. विटानेंं गाडीचा पडदा बाजूला केला, तों आंत प्रत्यक्ष वसन्तसेना. म्हणजे शकार जिच्या भेटीसाठींं अगदीं भुकेला होता ती अकस्मात तिथे जीर्णोद्यानांत येऊन हजर झालेली.

 मग शकाराच्या प्रेमलीलांना ऊत येणारच ! परंतु वसन्तसेना अशाने बधणारी नव्हती. तिनेंं शकाराची खूप निर्भर्त्सना केली. त्याला झिडकारून टाकलेंं. एवढेच नव्हे तर तिने त्याला लाथेने ठोकरून दिलेंं. आतांं मात्र शकार भडकला. त्याने निराशा आणि संताप यांच्या भरांत वसन्तसेनेचा गळा दाबला. ती मेली असे समजून त्या दुष्टाने तिला जमिनीवर टाकलेंं आणि तिच्या अंगावर पालापाचोळा रचून तो मोकळा झाला. पण त्याला एक भीति वाटत होती-'या पापाला वाचा फुटेल !' चेटानेंं तर तो खून प्रत्यक्षच पाहिलेला. तेव्हा त्याचा बंदोबस्त आगाऊच करावा म्हणून त्याने चेटाला बांधून अंधार- कोठडींंत फेकून दिले. दुसरा मित्र विटहि बरोबर होता. परंतु त्यानेंं तरवारीचा धाक दाखवितांच शेळपट शकाराने त्याच्या वाटेला जाण्याचे सोडून दिलेंं.

 'मग आतां हें खुनाचेंं पाप कोणाच्या डोक्यावर लादावे ?' विचार करता करता एकदम एक कुटिल कल्पना शकाराच्या मेंदूत चमकली. शकार हा स्वतः नगरकोतवाल होता. तेव्हा एखाद्याविरुद्ध खुनाची फिर्याद त्यानेंं दाखल करणे हे अगदीच साहजिक वाटण्यासारखेंं होते. त्याचा फायदा घेण्याचे ठरवून त्यानेंं न्यायालयांत फिर्याद गुदरली कीं, चारुदत्ताने पैशाच्या लोभानेंं उद्या- नांत वसन्तसेनेचा खून केला आहे.

 परंतु न्यायाधीशाला शकाराच्या दुष्ट कारवायांची चांगली माहिती होती. आतांपर्यंत त्यानेंं अशा कितीतरी निरपराध्यांचे जीव घेवविले होते. त्यामुळेंं चारुदत्ता- सारख्या उदारचरितावर केलेल्या या आरोपाकडे त्यानेंं प्रथम दुर्लक्षच केलेंं. परंतु फिर्यादी पडला राजाचा मेहुणा. त्याने सरळ न्यायाधीशालाच धमकी दिली कींं, जर या फिर्यादीची सुनावणी झाली नाहींं तर राजाला सांगून तुमची न्यायाधीशाच्या जागेवरूनच उचलबांगडी करवीन. तेव्हां न्यायाधीशाला त्याच्यापुढे नमणेंं भाग पडले.

 फिर्याद दाखल झाली. पहिली साक्षीदार म्हणून वसन्त- सेनेच्या आईचा पुकारा झाला. तिने येऊन सांगितले कींं, "काल वसन्तसेना चारुदत्त शेठकडे गेली होती." त्या- नंतर चारुदत्ताला बोलावणे गेलेंं. तो येऊन पोहोंचला. चारुदत्ताला न्यायाधीशाने प्रश्न केला कींं, “ वसन्तसेना कोठे आहे ?" त्याने सरळपणे उत्तर दिले कींं," ती काल माझ्या घरींं आली होती पण आज सकाळी परत गेली."

 परंतु शकार चारुदत्ताकडे पाहून बडबड करायला

लागला, " यानेंच, यानेंंच केला वसन्तसेनेचा खून !" तेव्हा मात्र चारुदत्त भानावर आला आणि संतापाने थर- थरत उत्तरला, “ हें नीच कृत्य तुझ्याच हातून घडलेलेंं आहे. याची साक्ष तुझे कांपरे बोलणे, काळे ठिक्कर पड- लेले ओठ आणि भेदरलेला चेहरा हींंच देत आहेत."

 परंतु प्रत्यक्ष पुरावा चारुदत्ताच्या विरुद्ध जात होता. बरेंं, आपल्या गाडीतून वसन्तसेना यावयाची होती ती आलींं नाहीं, तिच्या ऐवजी आर्यक त्या गाडीत होता हे सांगण्याची चारुदत्ताला सोय नव्हती; म्हणजे त्याची मान आयतीच राजद्रोहाच्या फांसांत अडकली असती. याशिवाय आणखी एक बळकट पुरावा प्रत्यक्ष न्यायालयांत आपल्या पायांनीं येऊन त्याच्याविरुद्ध उभा राहिला !

 तोहि एका मोठा क्रूर योगायोगच होता. त्याच दिवशीं सकाळीं चारुदत्ताच्या घरून उद्यानांत जाण्याच्या तयारींंत वसन्तसेना होती. रोहसेनाने रडून रडून आकांत मांडला होता. अर्थातच वसन्तसेनेनेंं दासी रदनिकेला विचारले कींं, ‘ बाळ कां रडतो आहे?' बिचारी रदनिका! तिनेंं डोळ्यांत पाणी आणून सांगितले की, शेजारच्या घरची सोन्याची गाडी पाहून यानेंहि सोन्याच्या गाडीसाठी हट्ट धरला आहे. त्याची मातीची गाडी त्याला नकोशी झाली आहे.

 वसन्तसेनेनें क्षणभर विचार केला आणि आपल्या अंगावरील बहुमोलाचे अलंकार उतरून ते रोहसेनाच्या मातीच्या गाडीत ठेवीत म्हटलेंं, “ याची सोन्याची गाडी बनवून द्या त्याला." परंतु एकदां दिलेला अति मौल्यवान रत्नहारहि परत न घेणारी चारुदत्ताची पत्नी धूता ज्या घराची स्वामिनी होती तिथे हे दान कसे स्वीकारलेंं जाणार ? वसन्तसेना निघून गेल्यानंतर तिची भेट न होतांच चारुदत्त व मैत्रेय घरी परत आले होते. चारुदत्ताला त्या दागिन्यांची हकीकत समजताच त्यानेंं ते दागिने मैत्रेयाच्या हातीं वसन्तसेनेकडे परत पाठवून दिले. परंतु मैत्रेय वसन्तसेनेच्या घरी जाऊन पोहोचण्याच्या पूर्वीच चारुदत्ताला न्यायालयांत बोलावणे आलेंं आणि मैत्रेयाला ती हकीकत रस्त्यांतच समजून त्याने तिकडे धाव घेतली.

 मैत्रेय न्यायालयांत आला तेव्हां समोरच फिर्यादी शकार दिसला. त्याबरोबर मैत्रेयाचा सात्त्विक संताप इतका भडकून उठला कीं तो त्याच्या अंगावर धावूनच गेला. परंतु त्या झटापटींत त्याच्या खाकेंंत असलेले दागिन्यांचेंं गांठोडे एकदम खाली पडले. ' हे तर वसन्तसेनेचे दागिने!' शकाराच्या ते लक्षात येतांच त्यानेंं एकदम त्याच्यावर झडप घालून ते न्यायाधीशासमोर ठेवले. “ हा घ्या पुरावा !" शकार ओरडला. " चारुदत्ताचा मित्र मैत्रेय याच्यापाशीं निघालेले हे दागिने सिद्धच करीत आहेत कीं चारुदत्तानेंंच या द्रव्याच्या लोभाने वसन्तसेनेचा खून केलेला आहे. आतां न्यायाला उशीर नको."

 आतां मात्र न्यायाधीशाचा नाइलाज झाला. त्यानेंं चारुदत्ताला पकडण्याचा हुकूम देऊन त्याच्याविरुद्ध  खुनाचा आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर केलेंं. मात्र त्याला सुळावर न देतां देशांतून हद्दपार करावेंं अशी शिफारस त्याने पालक राजाकडे करून पाहिली. परंतु राजाने त्याला नकार दिला. अर्थातच चारुदत्ताला सुळावर चढविण्याचेंं ठरलें व त्याची रवानगी दक्षिण स्मशानाकडे झाली.

 चारुदत्त बिचारा या सर्व विरुद्ध परिस्थितींंत काय बोलणार ? त्याने इतकेंंच सांगितले की आपण निर्दोष आहोंंत; तेव्हां अग्निप्रवेश, विषपान किंवा जलसमाधि यांपैकी कोणतेंहि दिव्य आपण करण्यास तयार आहोंंत. परंतु त्याचे म्हणणे ऐकलें गेलें नाहीं.

 चारुदत्ताची वधयात्रा सुरू झाली. तथापि दक्षिण स्मशानांत पुरलेला तो सूळ चारुदत्तासाठींं नव्हता !

**

 सारी उज्जयिनी रडत होती. सज्जन आणि उदारधी चारुदत्ताच्या हातून असलें नीच कृत्य कधींहि घडणार नाहीं अशी प्रत्येक नागरिकाला खात्री वाटत होती. पण कायद्याच्या बंधनापुढेंं आणि जुलमी राजसत्तेच्या बळापुढेंं त्यांचे कांहींं चालण्यासारखे नव्हते.

 ‘द्रव्यलोभाने वसन्तसेनेचा खून केल्यामुळेंं चारुदत्ताला सुळावर चढविलेंं जात आहे हो ' अशी दवंडी त्याला सुळावर चढविण्यासाठींं घेऊन चाललेले चांडाळ पिटीत

होते. ऐकणारांच्या हृदयाला पीळ पडत होता. शकारानेंं बांधून अंधारकोठडीत टाकलेला स्थावरक चेट- त्याच्याहि कानावर ही दवंडी पडली. त्यानेंं मोठ्या प्रयासानेंं आपली सुटका करून घेऊन तो रस्त्यावर आला आणि ओरडूंं लागला की, “ चारुदत्त निर्दोष आहे. मी त्याबद्दल पुरावा देतो. " पण त्या कोलाहलांत त्याचेंं ऐकतो कोण !

 दुर्दैवी चारुदत्ताचा मुलगा रोहसेन रडत रडत येऊन त्याला बिलगला. चारुदत्ताची साध्वी पत्नी धूता सती जावयाला निघाली. अखेर चारुदत्ताला सुळाच्या चबु- तऱ्यावर नेण्यांत आलेंं.

 आतां त्याच्या मृत्यूला उशीर नव्हता. पण इतक्यांत एक तरुण स्त्री व एक बौद्ध भिक्षु दुरून वधस्तंभाकडे धांवत येतांना दिसलींं. ही तर जिचा खून झाला म्हणून ठरलें होते ती स्वतः वसन्तसेना आणि हा बौद्ध भिक्षु बनलेला संवाहक जुगारी !

 वसन्तसेना मेली असे समजून शकारानेंं तिच्या शरिरा- वर पालापाचोळा टाकून तेथून पोबारा केला. त्या जागेपासून कांहीं अंतरावर एक बौद्ध विहार होता. त्या विहारांतच संवाहक जुगारी बौद्ध भिक्षु बनून राहिला होता. तो नित्याप्रमाणे त्या उद्यानांतील तळ्यावर स्नानासाठी येऊ लागला तेव्हां त्याला रस्त्याच्या कडेचा पालापाचोळा हालतांना आढळला. हळूच त्या ढिगांतून एक

सुंदर अलंकारयुक्त हात बाहेर आलेला त्याला दिसला अर्थातच लगेच पुढेंं होऊन त्याने पालापाचोळा दूर करून पाहिलेंं. बेशुद्ध स्थितीत तेथेंं पडलेल्या वसन्तसेनेला ओळखायला त्याला वेळ लागला नाही. त्यानेंं तिला विहारांत नेले आणि तेथेंं तिची शुश्रूषा करून तिला शुद्धीवर आणली.

 निरपराध चारुदत्ताच्या सुळावर जाण्याची हकीकत त्यांच्या कानावर पडतांच तींं दोघंहि वधस्थानाकडे ताबडतोब यावयास निघाली होती. ती तेथे अगदी वेळेवर येऊन पोहोंचलीं. चांडाळांना मोठा पेच पडला. त्यांनींं पुढे काय करावे म्हणून विचारण्यासाठी पालक राजाकडे जाण्याचा विचार केला. परंतु तेवढेहि कष्ट त्यांना घ्यावे लागले नाहींत. पालक राजाचा केव्हांच निकाल लागला होता. शर्वीलकाच्या सहाय्याने आर्यकाने राज्यक्रांति यशस्वी केली होती. आतांं लोकांचा आवडता पुढारी आर्यक उज्जयिनीचा राजा झाला होता. आणि आपल्या उपकार- कर्त्याचेंं ऋण फेडण्यासाठी त्याने शर्वीलकाला तातडीने स्मशानाकडे रवानाहि केलेंं होतेंं.

 वधस्तंभावरून खाली येत असलेल्या चारुदत्ताला वंदन करून शर्वीलकाने आपली ओळख करून दिली. आतां राजा बनलेल्या आर्यकानेंं त्याला वेणा नदीच्या तीरावरील कुशावतीचेंं राज्य बहाल केल्याची राजाज्ञाहि वाचून

दाखविली. आणि हात जोडून विचारलेंं, “ महाराज, आपली आणखी काय इच्छा आहे ?" आतांं हा शर्वीलक जुगारी व चोर राहिलेला नव्हता तर यशस्वी राज्य- क्रान्तीचा नेता आणि उज्जयिनीचा मंत्री बनलेला होता. तेंं ओळखूनच चारुदत्ताने सांगितले कींं, या भिक्षुला सर्व मठांचा कुलपति करा, या चांडाळांना चांडाळांचा नायक नेमा.

 इतक्यांत शर्वीलकाच्या शिपायांनीं पळून चाललेल्या शकाराला पकडून तेथेंं आणलेंं. शर्वीलकानें चारुदत्ताकडे पाहात विचारलेंं, " या नीचाला कसली शिक्षा करूंं ? कीं याला आतां याच सुळावर चढवूंं ?" शकाराला शिपाई वधस्तंभाकडे ओढीत नेऊंं लागलेंं तेव्हां तो चारुदत्ताच्या पायाला स्पर्श करून केविलवाणेपणाने म्हणाला, " क्षमा असावी. " चारुदत्ताला त्याची दया आली. "याला नगर कोतवाल म्हणूनच राहूंं दे" असे चारुदत्ताने दया- बुद्धीने सांगितलें.

 चारुदत्त सुटला आणि पालकाची दुष्ट राजवट गेली हे पाहून उज्जयिनींतील नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाहीं.

 चारुदत्ताची पत्नी धूता सती जाण्यास निघाली होती. तिचा पाय आतां चितेवर पडणार इतक्यांत मैत्रेयाने येऊन सांगितले की, चारुदत्त सुटला; वसन्तसेना जिवंत आहे. थोडक्याच वेळांत चारुदत्त, वसन्तसेना, शर्वीलक अशी सर्वच मंडळी तेथे येऊन पोहोचली. वसन्तसेना आतां गणिका राहिलेली नव्हती; ती चारुदत्ताची पत्नी झालेली होती. धूतेने प्रेमानेंं तिच्या गळ्यांत मिठी घातली व आनंदाश्रूनींं एकमेकींनी एकमेकींना भिजवून काढले.

 

 


 

संस्कृत साहित्य सरितेची पुस्तकें

१. रघुवंश
२. शाकुन्तल
३. विक्रमोर्वशीय
४. मृच्छकटिक
६. प्रतिमा
६. महावीरचरित
७. उत्तररामचरित
८. मालतीमाधव
९. स्वप्नवासवदत्ता
१०. दशकुमारचरित : भाग १
११. दशकुमारचरित : भाग २
१२. वेणीसंहार
१३. कुमारसम्भव
१४, मालविकाग्निमित्र
१५. हर्षचरित
१६. नागानंद
१७, पंचरात्र
१८, रत्नावली
१९. कादम्बरी
२०. मेघदूत
२१, शिशुपालवध
२२. किरातार्जुनीय
२३. बुद्धचरित
२४, मुद्राराक्षस
२७. प्रतिज्ञायौगंधरायण
२६. अविमारक
२७. अभिषेक
२८, मध्यमव्यायोग
२६. कर्णकार
३०. उरुभङ्ग
३१. पार्वतीपरिणय
३२. नलोदय

 प्रत्येकी किंमत ६ आणे    ६ आणे
वोरा अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रायव्हेट लि०