मामा परमानंद यांस पत्र

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
मुक्काम पुणें त॥ २ माहे जून १८८६ ई ॥

राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु॥ आंबेर

साष्टांग नमस्कार वि. वि. आपलें त॥ ३० माहे गुदस्ताचे कृपापत्र पावलें. त्याचप्रे॥ पुण्याचे हायस्कुलांतील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेलें पवाड्याचे पुस्तकांतील कांहीं शाहीरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळीं कळविलें कीं, सदरचे पवाड्याची प्रत मजजवळ नाहीं आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयी कांही कळवितां येत नाहीं. नंतर त्यांनी तें पुस्तक मला आणून देण्याचें कबूल केलें. परंतु त्यांनी कबूल केल्याप्रे॥ पवाड्याचे पुस्तक आणून दिलें नाहीं. सबब त्याविषयीं मला कांही आपल्यास लिहून कळवितां आलें नाहीं.

फितुरी गोपीनाथपंताचे साह्यानें शिवाजीनें दगा करून अफझुलखानाचा [वध?] केला. तान्हाजी मालुसर्‍यानें घोरपडीचे साह्यानें सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीनें पुण्यात दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढलें. या सर्वांच्या कच्च्या हकीकतीचे खरे पवाडे माझे पहाण्यांत आले नाहींत. आज दिनपावेतों युरोपियन लोकांनी जे काहीं इतिहास तयार केले आहेत, ते सर्व शुद्र आणि अतिशूद्रांची वास्तविक स्थिति ताडून न पहातां ++++ झांकून आर्य भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरंवसा ठेवून इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेंसोरें नवीन पवाडे करून हळूच मैदानांत आणीत आहेत. त्यापैकीं माझे पहाण्यांतही बरेच आले आहेत आणि त्यांतील शूद्रांनी कमविलेल्या मोत्यापोंवळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मणासह दादोजी कोंडदेवास फाजील आगांतुकी करावयास लावल्यामुळें तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाहीं.

आठ वर्षांपूर्वी जेव्हां मी मुंबईत आपले घरीं भेटावयास आलों होतों, तेव्हां पांचगणीचे पाटील रामपासमक्ष आपल्यास शुद्र शेतकर्‍याचे दैण्यावाण्या स्थितीचा कांहीं देखावा जगापुढे आणणार, म्हणून कबूल केलें होतें. तें त्या देखाव्याचें असूड या नावाचे तीन वर्षांपूर्वी येक पुस्तक तयार केले व त्याचे येकेक प्रत आपले कलकत्त्याचे हरभास व अष्टपैलू गवरनर जनरल [साहेब व?] श्रीमान महाराज बडोद्याचे गायकवाड सरकारास पाठविल्या आहेत. आमच्या शुद्रांत भेकडबाहुले छापखानेवाले असल्यामुळें तें पुस्तक छापून काढण्याचें काम तूर्त येके बाजूला ठेविलें आहे. असूडाची प्रत आपल्यास पहाण्याकरितां पाहिजे असल्यास त्याप्रामाणें लिहून आल्याबरोबर त्याची नकल करण्यास लेखक बसवितो. नकल होण्यास सुमारें एकदोन महिने लागतील असा अदमास आहे. कळावें लोभ असावा ही विनंती.

आपला

जोतीराव गोविंदराव फुले


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg