मानसपूजा

विकिस्रोत कडून

<poem> जय जय स्वामी समर्थ |

नमो स्वामीराज दत्तावतारम् | श्री विष्णू ब्रह्म शिवशक्तीरुपम् | ब्रह्मस्वरुपाय करुणाकराय | स्वामी समर्थाय नमोस्तुते |

स्वामी दत्तात्रय हे कृपाळा | मला ध्यानमुर्ती दिसू येई डोळा | कुठे माय माझी म्हणे बाल जैसा | समर्था तुम्हाविण हो जीव कैसा |

स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी | हृदयासनी बसा प्रार्थितो मी | पूजेचे यथासांग साहित्य केले | मखरात स्वामी गुरु बैसविले |

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती | जिथे सर्व सिध्दी पदी लोळताती | असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ | परब्रम्ह्य साक्षात गुरुदेव दत्त |

सुवर्णताटी महारत्न ज्योती | ओवाळूनी अक्षता लाऊ मोती | शुभारंभ ऐसा करुनी पुजेला | चरणावरी ठेऊ या मस्तकाला |

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा | तुझी पाद्यपुजा करी बाळ तुझा | प्रणिपात साष्टांग शरणागताचा | तुम्हा वाहिला भार या जीवनाचा |

ही ब्रह्मपुजा महाविष्णू पूजा | शिवशंकराची असे शक्तीपूजा | दही दूध शुध्दोदकाने तयाला | पंचामृत स्नान घालू प्रभूला |

वीणा तुतार्‍या किती वाजताती | शंखादी वाद्ये पहा गर्जताती | म्हणती नगारे गुरुदेव दत्ता | श्रीदत्त जय दत्त स्वामी समर्था |

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली | श्री दत्त स्वामीसिया स्नान घाली | महासिध्द पदतीर्थ घ्यावा | महिमा तयाचा कळे ना जगा या |

मी धन्य झालो हे तीर्थ घेता | घडू दे पूजा ही यथासांग आता | अजानूबाहू भव्य कांती सतेज | नसे मानवी देह हा स्वामीराज |

प्रत्यक्ष श्री सदगुरु दत्तराज | तया घालुया रेशमी वस्त्रसाज | सुगंधित भाळी टिळा रेखियेला | शिरी हा जरी टोप शोभे तयाला |

वक्षःस्थळी लाविल्या चंदनाचा | सुवास तो वाढवी भाव साचा | शिरी वाहुया बिल्व तुलसीदलाचे | गुलाब जाईजुई अत्तराते |

गंधाक्षता वाहूनी या पदाला | ही अर्पूया जीवन पुष्पमाला | चरणीं करांनी मिठी मारु देई | म्हणे "लेकरासी सांभाळ आई " |

इथे लावुया केशर कस्तुरीचा | सुगंधता हा धूप नाना प्रतीचा | पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली | गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली |

करुणावतारी अवधूत किर्ती | दयेची कृपेचीच जी शुध्द मूर्ती | प्रभा फाकली शक्तीच्या मंडलाची | अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची |

ह्रदयमंदिराची ही स्नेह ज्योती | मला दाखवी स्वामींची योगमूर्ती | करु आरती आर्तभावे प्रभूची | गुरुदेव ही स्वामी दत्तात्रयाची |

पंचारती ही असे पंचप्राण | ओवाळूनि ठेऊ चरणावरुन | निघेना पुढे शब्द बोलु मी तो ही | मनीचे तुम्ही जाणता सर्व काही |

हे स्वामी राजा बसा भोजनाला | हा पंचपक्वान्न नैवेद्य केला | पुरणाची पोळी तुम्हा आवडीची | लाडू करंजी असे ही खव्याची |

डाळींब द्राक्षे फळे आणि मेवा | केशरी दूध घ्या स्वामीदेवा | पुढे हात केला या लेकराने | प्रसाद द्यावा आपुल्या कराने |

तांबुल घ्यावा स्वामी समर्था | चरणाची सेवा करु द्यावी आता | प्रसन्नेतुन मागू मी काय | हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय |

सर्वस्व हा जीव चरणीच ठेऊ | दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ | नका दूर लोटू आपल्या मुलासी | कृपाछत्र तुमचेच या बालकासी |

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला | पदी ठेऊ दे शीर शरणागताला | हृदयी भाव यावे असे तळमळीचे | करी पूर्ण कल्याण हे या जीवाचे |

तुझे बाळ पाही तुझी वाट देवा | नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा | मनी पुजनाची असे दिव्य ठेव | वसो माझिया अंतरी स्वामी ठेव |

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.