Jump to content

माझे सांगाती

विकिस्रोत कडून





माझे सांगाती


सुनीलकुमार लवटे





 माझे सांगाती
(व्यक्तीलेखसंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in


दुसरी आवृत्ती २०१८


© डॉ. सुनीलकुमार लवटे


प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com


मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य ₹१७५१७५/- 






या सर्वांमुळे
माझे जगणे
अधिक समृद्ध झाले...

...तर हे शतक माणसांचे राहील


 ‘माझे सांगाती' हा व्यक्तिलेख संग्रह होय. मी ज्यांच्या कार्यसहवासात वाढलो, घडलो अशांच्या काही स्मृती, पैलूंबद्दल इथं लिहिलं गेलं आहे. हे लेख वेगवेगळ्या प्रसंगानी, औचित्याने लिहिले गेले आहेत. शताब्दी, स्मरण, गौरव, निवृत्ती, अमृतमहोत्सव, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा अशा प्रसंगानी केलेले हे लेखन होय. त्यामागे सहवास, संस्कार, साहाय्याप्रती कृतज्ञतेचा भाव आहे. काही लेखांत सामाजिक गौरवही आहे. यांत सान, थोर सारे आहेत; पण यांत वयापेक्षा सान्निध्य, सद्भाव मला मोलाचा वाटत आला आहे.
 माणसं, विशेषतः पूर्वसुरी मंडळी वर्तमान व्यक्तींच्या तुलनेने अधिक समर्पित, ध्येयवादी, निरपेक्ष कार्य करताना आढळतात. जी माणसं स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आली, जगली, झगडली अशांच्या जीवनात देश व समाजाप्रती विलक्षण ओढ असायची. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वराज्यात करण्याचा त्यांच्यात ध्यास होता. स्वातंत्र्य चळवळीतील एकेकाळचे हे तरुण कार्यकर्ते. त्यांनी महात्मा गांधी, साने गुरुजींना पाहिले, ऐकले असल्याने, शिवाय त्यांचा त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभल्याने ध्येयप्रभाव अधिक महत्त्वाचा. तद्वतच त्यांची मूल्यनिष्ठा व समर्पणही एकात्म, प्रतिबद्ध होते. 'साधी राहणी नि उच्च विचारसरणी हे अशा समाजसेवी व्यक्तींचे जीवन. या व्यक्ती मोठ्या पदांवर विराजमान झाल्या तरी या जबाबदारीचे आपण पाईक असल्याची जाणीव असल्याने त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांनी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी केला. ही मंडळी तशी मितभाषी. 'हम नहीं, हमारा काम बोलेगा, ‘बातें कम, काम ज्यादा' असाच त्यांचा व्यवहार रहात आल्याने आमच्या पिढीसाठी ही मंडळी अनुकरणीय व आदर्शच राहिली. हे सांगाती म्हणजे मित्र, सोबती नव्हेत तर ज्यांच्या प्रभावक्षेत्रा-छत्राखाली आम्ही वाढलो, अशी ही मंडळी. काही मित्र, स्नेहीही यांत आहेत; पण ती माझ्या वाटेवरून चालणारी म्हणून आत्मीय वाटली. उपचार, ओझे, उपकृतता अशा कारणांनी हे लेखन घडलेले नाही. केवळ लागेबांधे निभावायचे म्हणून कुणाची भलावण केलेली नाही. आत्मकेंद्रित, स्वार्थी, उपद्व्यापी माणसांबद्दल मला लिहायलाच होत नाही. अशांकडे दुर्लक्ष हाच त्यांना दिलेला सामाजिक विजनवास होय. लुडबुड म्हणजे सामाजिक काम नव्हे. त्यामागे खरी निरपेक्षता असते पदवैराग्याची! 'तुम भले, हम भले', ‘तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा' अशी माणसं समाजात अधिक.
 प्रसिद्धीकडे डोळा ठेवून, पदासाठी गळ टाकून काम करणारी मंडळी आव कितीही आणोत; त्यांची कसोटी येते ती निरपेक्ष निर्णयक्षणी. तिथं त्या मर्मावर ही मंडळी हारतात. अशा मंडळींचं पण एक अघोषित संगठन, कार्यक्रम ठरलेला असतो. समान रंगाचे पक्षी एकत्र येतात, तसे यांचे थवे तुम्हाला समाजात आढळतील. त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. येणकेण प्रकारेण आपली सद्दी चालू ठेवायची. यांचे सख्य कारणपरत्वे बदलू शकते. सरड्याचा रंग लेऊन जन्मलेली ही जमात गनिमी कावे, भूमिगत अपप्रचार, इत्यादीमार्गे समाजाच्या कानांत हॅम्लेट', 'ऑथेल्लो' नाटकांतील पात्रांप्रमाणे गरळ ओतायचे, ओकायचे काम न थकता करीत राहतात. अशी कारस्थाने करणा-या या मंडळींवर आगपाखड करीत राहण्यापेक्षा 'माझे सांगाती'मधील व्यक्तींच्या गुण नि वृत्तीचा सकारात्मक, अनुकरणीय पर्याय देण्यातच समाजहित सामावलेले असते, या विचारावरील विश्वासातून सदरचे लेखन घडले आहे.
 केशवराव जगदाळे हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत राहणारे विजार, सदच्यातील हे कार्यकर्ते, कोल्हापूरचे नगराध्यक्ष झाले तरी ना पोशाख बदलला, ना हातातली सायकल गेली. एवढी साधी गोष्ट पण आजच्या पिढीस बरेच काही सांगून जाईल. अॅड. के. ए. कापसे म्हणजे सार्वजनिक पैशाला स्पर्श न करता मोठे होता येते या विश्वासाचा वस्तुपाठ. शिवाय व्यवसायनिष्ठा तितकीच उच्च कोटीची. प्राचार्य अमरसिंह राणे माझे शिक्षकच. विद्यार्थ्यांबद्दल शिक्षक मनाच्या उदारतेचे प्रतीक म्हणून मला त्यांचे जीवन व कार्य महत्त्वाचे वाटते. मोहनराव लाटकर हॉटेल व्यावसायिक; पण सामाजिक कार्यात भूमिगत सहभाग. आयुष्यभर काही माणसं प्रसिद्धिपराङ्मुख राहतात, यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही. मोहनराव डकरे म्हणजे स्वामिनिष्ठेचा मेरूमणी. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी विकासाची गंगा घरोघरी वाहती केली. त्यांच्या वारशाचे जतन मोहनराव ज्या अविचल प्रेमाने करतात, त्याला तोड नाही. ही माणसं सार्वजनिक समाजपुरुष म्हणून जगत राहतात. आपलं समाजस्वास्थ्य जपणारी ही मंडळी व्यक्तिगत संसाराकडे दुर्लक्ष करून समाजाचा पसारा सावरत असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
 ‘माझे सांगाती'मधील प्रत्येक व्यक्तीत तुम्हास स्वत:पलीकडे पाहण्याची वृत्ती दिसेल. साहित्य, आरोग्य, शेती, उद्योग अशा जीवनातील विविध क्षेत्रांतील ही मंडळी. त्यांनी आपापल्या क्षेत्रात नवनवे प्रयोग केले. सेवेचे नवे पायंडे पाडले. एखादा विषय जिव्हाळ्याचा बनवून आयुष्यभर त्याची पाठराखण केली. या निरंतरतेतूनही परिवर्तन घडत गेले. शिवाय यांचे जीवन एकारलेले नव्हते. जीवनाच्या विविध गरजांमध्ये आपला खारीचा वाटा, इतक्या माफक सहभागाने त्यांनी जो समाजबदल घडवून आणला, त्यामागे मुंगीची क्षमता असली तरी हत्तीच्या रूपात कार्य बळ उभारले गेले. बाबूराव शिरसाट साधे आरोग्य खात्यातील पर्यवेक्षक; पण लिहिण्याच्या कलेने त्यांनी आपली नोकरी, तीही सरकारी असून तिला प्रबोधनाचे साधन बनविले. प्रतिबद्ध माणसेच असं करू शकतात. मी शहरात स्कूटरवरून फिरत असतो. अकारण भोंगा वाजवत दुचाकी दौडणारे स्वार आजूबाजूला गलका करीत असतात. मी भोंगा न वाजविता माझी दुचाकी हाकतो. आवाजाच्या प्रदूषणात भर न घालण्याचा माझा कृतसंकल्प समस्येस अबोल उत्तर नि रचनात्मक पर्यायच असतो. असा पावलापुरता प्रकाश घेऊन फिरलो तरी आसमंत हळूहळू उजळत राहतो. साहित्यिक वसंत केशव पाटील काया, वाचा, मने त्यांना जे पटते ते व्यक्त नि रूपांतरित करीत राहतात. अनिल मेहतांनी तर किती नवोदितांना लिहिता लेखक बनविले. डॉ. जयसिंगराव पवारांनी इतिहासपुरुषांना पुनर्मूल्यांकनाने न्याय मिळवून दिला.
 प्रा. मंदाकिनी खांडेकर या वि. स. खांडेकरांच्या ज्येष्ठ कन्या. आपल्या ज्येष्ठत्वाच्या जबाबदारीने प्रसंगी जोखीम स्वीकारून वडिलांचं अक्षर-अक्षर ‘अमर' केलं. वसंतराव घाटगे उद्योगपती; पण रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी रिमांड होमचा पाया घातला. आज बालकल्याण संकुलाच्या रूपात त्याचा वटवृक्ष होतो, हे त्यांच्या शताब्दीचे खरे सार्थक, गुरुवर्य दि. ग. गंगातीरकर हे आयुष्यभर एका शिक्षण संस्थेस ऊर्जित रूप यावं म्हणून चंदनाप्रमाणे झिजले. लक्ष्मीकांत देशमुख, प्रशासक हा संवेदनशील व समाजहितलक्ष्यी असू शकतो, हे त्यांनी कार्य करून दाखविले. आपल्या घरी अनाथ मुलीचं लग्न करणे याला मन मोठं लागतं. शिवाय परदुःख सहिष्णुताही माणसात असावी लागते. अधिकाराचा विधायक वापर करण्याचा द्रष्टेपणा तुमच्यात असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. मग ते बदलणे सोपे होऊन जाते.
 सदर संग्रहात काही अप्रकाशित लेख समाविष्ट केले आहेत. काही माणसे महोत्सव, सोहळे, गौरवग्रंथ इत्यादी उपक्रमांपासून दूर असतात. अलीकडच्या काळात स्वप्रकाशित साहित्य जसे वाढते आहे, तसे स्वप्रायोजित महोत्सव, सोहळेही. ज्याची त्याची आवड, वृत्ती म्हणून अशा उपक्रमांकडे पाहिले पाहिजे. काहींवर अभिनंदनाचा, प्रसिद्धीचा वर्षाव वा प्रकाश पडत नाही, म्हणून ती माणसं छोटी ठरत नाहीत. जैन ठिबक'चे भवरलाल जैन, बार्शीभूषण डॉ. बी. वाय. यादव, मुद्रक सतीश पाध्ये, दलितसेवी डॉ. विजय करंडे यांच्याप्रती मी लिहिता झालो ते केवळ सामाजिक कृतज्ञतेपोटी नसून त्यामागे कर्तव्यभावही आहे. मी शांताराम कृष्णाजीपंत वालावलकर नामक धनाढ्य परंतु दानशूर असलेल्या व्यक्तींच्या सहवासात होतो. कुबेर आणि कर्ण एकाच जागी नांदतात का? एकाच ठायी असतात का? असे मला जर कोणी विचारता होईल, तर माझे उत्तर 'होय' असेल. त्यांच्याप्रमाणेच भवरलाल जैन होते. डॉक्टर बिनपैशाची सेवा करतो हे पाहायला ‘आनंदवन'च का शोधायचे? आपल्या आसपासही डॉ. बी. वाय. यादव, डॉ. विजय करंडे असतातच ना! प्रसिद्ध न होता माणसं मोठी असू शकतात; किंबहुना प्रसिद्धिपराङ्मुखच खरे मोठे. समाजाने त्यांचे अनुसरण केले पाहिजे. गर्दी दिसली की उमाळा येणे, पाझर फुटणे यात अभिनय, अभिनिवेश मोठा असू शकतो. न प्रकटता तुमच्यात नित्य पाझरणारा सहज झरा आहे का? तिथे नदीची संभावना मोठी. पैसे नसले तरी मला जितका शक्य आहे तितका उपचार करून मी आजचे मरण उद्यावर ढकलू शकतो, हा दिलासा गरिबाला जीवनदानच असते. ‘जो देगा उसका भला, न देगा उसका भी' अशी फकिरी परोपकारी वृत्ती अपवाद सभ्य माणसात असते. मुद्रण व्यावसायिक सतीश पाध्ये म्हणजे मुलखाचे सोशिक सद्गृहस्थ. अशी माणसं या आत्मरत व स्वार्थी काळात असू शकतात, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही आणि ते स्वाभाविकच म्हणायला हवे. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील म्हणजे कार्यसंस्कृत गृहस्थ. नित्य गुणवत्ता ध्यासातून नव्या पिढीचं कोटकल्याण करण्याचा छंद ते जोपासतात व शिक्षण क्षेत्रात एक प्रतिदर्श उभा करतात. या सर्वांबद्दल सहज भरतं येऊन मी लिहिलं ते केवळ एकाच हेतूने की, अशी समाजाप्रती तळमळ वर्तमान पिढीत झरावी; तर एकविसावे शतक माणसांचे राहणार!
अनुक्रमणिका


१. आदर्श समाजशिक्षक : अनंतराव आजगावकर/११
२. मूल्याधारित निरपेक्ष कार्य : अॅड. के. ए. कापसे/१५
३. जगण्याचा उपदेशित आदर्श : प्राचार्य अमरसिंह राणे/२६
४. समाजशील कार्यकर्ते : मोहनराव लाटकर/३१
५. जनसामान्यांचे कैवारी : केशवराव जगदाळे/३४
६. नवसाक्षरांचा नंदादीप : बाबूराव शिरसाट/३९
७. यशवंत वारसासंवर्धक : मोहनराव डकरे/४३
८. सिद्ध संकल्पक : प्राचार्य मधुकर फरताडे/४७
९. बेलौस, बेधडक : वसंत केशव पाटील/५२
१०. सामाजिक प्रशासक : लक्ष्मीकांत देशमुख/५७
११. शाहूप्रेमी इतिहासकार : डॉ. जयसिंगराव पवार/६३
१२. अजब प्रकाशक : अनिल मेहता/७०
१३. हरहुन्नरी शिक्षक : वसंत पाठक/७५
१४. समर्थ चरित्र : दि. ग. गंगातीरकर/७८
१५. राजनैतिक विधिज्ञ : अॅड. महादेवराव अडगुळे/८२
१६. पब्लिक अंकल : मुक्तेश्वर मुनशेट्टीवार/८६
१७. सर्वाश्रयी दाता : बापूराव जोशी/९०
१८. संवेदनशील विद्यार्थी : सुनील धोपेश्वरकर/९३
१९. समाजसेवी उद्योगपती : वसंतराव घाटगे/९९
२०. व्रतस्थ वारस : प्रा. मंदाकिनी खांडेकर/१०३
२१. ऋजू पण कठोर प्राचार्य : डॉ. हिंदुराव पाटील/१०७
२२. सभ्यतेचा सत्त्वशील उपासक : सतीश पाध्ये/११२
२३. बार्शीभूषण : डॉ. बी. वाय. यादव/११७
२४. संवेदी धन्वंतरी : डॉ. विजय करंडे/१२३
२५. गांधीवादी उद्योजक : भवरलाल जैन/१२८

  • पूर्वप्रसिद्धी सूची/१३३
    आदर्श समाजशिक्षक : अनंतराव आजगावकर

 अनंतराव आजगावकरांना मी आठवीत शिकत असल्यापासून पाहत आलो आहे. काही माणसं आयुष्यभर आतून-बाहेरून आहे तशी कशी राहू शकतात, याचं आश्चर्यमिश्रित गूढ म्हणून मी सतत आजगावकर सरांना न्याहाळत आलो आहे. त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील जो आदर आहे, त्यामागचे गूढ अजूनही मला उमगले नसले तरी तो आदर रोज वाढतो आहे खरा! मी कोल्हापूरच्या आंतरभारती विद्यालयात शिकत होतो. सन १९६३ ची गोष्ट असावी. त्या वेळी आमच्या शाळेत राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष, सर्वोदय अशा विविध संघटनांचे कार्यकर्ते येत राहायचे. तो काळ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या तपाचा होता. गांधीवादी साधेपणा, ध्येयवाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा यांची विलक्षण मोहिनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या तत्कालीन तरुण पिढीवर असल्याचं जाणवायचं. ही पिढी आता प्रौढ होऊन आमच्यासमोर वावरत होती. त्यांचे खादीचे कपडे, वक्तशीरपणा, शिस्त, सभ्यता व ऋजुता या गोष्टींची विलक्षण मोहिनी आमच्यावर होती. आजगावकर सर याच पठडीतले. ते उत्तूरहून आमच्या शाळेत येत राहायचे. डोक्यावर बारीक केस, सडपातळ देहयष्टी, खादीचा झब्बा, विजार, खांद्यावर शबनम, पायी साध्या चपला अशी असलेली त्यांची बाह्य ओळख आजही तशीच आहे. सभा-समारंभात मागे, संकोचून बसलेले सर, ते नेहमी अबोल असायचे. सभेत लक्षपूर्वक ऐकण्याचा त्यांचा प्रघात. तशी त्यांची मूळ वृत्ती थट्टामस्करी करण्याची नसली तरी समवयस्कांत त्यांची खुललेली कळी मी अनेकदा अनुभवली आहे. आजगावकर सरांबद्दल मी शिक्षक होईपर्यंत जी माहिती होती ती एक कठोर, शिस्तप्रिय संस्थाचालक, ध्येयवादी शिक्षक म्हणून; पण मी शिक्षक व्हायचं ठरवलं नि अनपेक्षितपणे मला त्यांच्या शाळेतच नोकरी मिळाली. उत्तूरच्या आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे एक हायस्कूल चालविण्यास घेण्यात आलं होतं. त्यांना चांगल्या शिक्षकांची गरज होती म्हणून मला कोल्हापूरच्या आंतरभारतीतर्फे तिकडे पाठविण्यात आलं होतं. आजगावकर सर संस्थाचालक व मी शिक्षक असं औपचारिक नातं असलं तरी ते फार दिवस तसं राहिलं नाही. मला आठवतं त्याप्रमाणे पहिल्या दिवशीच ते गळून पडलं, एक शहरातला तरुण, भांबावलेला शिक्षक खेड्यात आल्यावर त्याला त्यांनी ज्या पद्धतीनं समजावलं, सावरलं ती होती त्यांच्यातील मातृमयी पित्याची खूण. मला त्यांच्या मेसमध्ये घेऊन गेले होते. रात्री शाळेची जबाबदारी त्यांनी समजावून सांगितली होती. त्यात काळजी भरलेली होती. बबन ठाकूरना माझ्या सोबतीला देऊन त्यांनी केलेलं मार्गदर्शन - ते नुसतं गावाची वाट दाखविणारं नव्हतं. त्या मार्गदर्शनानं माझं जीवन निश्चित केलं. माझी वाट निश्चित केली.
 पिंपळगाव, उत्तूरच्या निरंतर संपर्कातून मला जे आजगावकर सर समजले ते इतरांपेक्षा वेगळे होते. माझे अन्य सहकारी त्यांना घाबरायचे. मला त्यांची कधी भीती वाटली नाही. आपल्या सहका-यांनी आपल्याप्रमाणेच त्यागी, ध्येयवादी असावं अशी त्यांची अपेक्षा होती. सहकारी नोकरीस आलेले. ते प्रामाणिक होते; पण त्यांच्या मर्यादा होत्या. इतरजण सरांना घाबरायचे ते त्यांच्या नि सरांच्या ध्येयवादातील दरीमुळे. सर सहका-यांना सुनवायचे. अत्याधिक अपेक्षांच्या शिखरापुढे सुमार व्यवहारी कसे टिकणार? त्यामुळे सरांची एक अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती की त्यामुळे त्यांच्यापर्यंत, त्यांच्यापुढे सहसा कुणी जात नसे. त्यावेळी सर अविवाहित होते. घर होतं; पण ब-याचदा अंधारखोलीतील त्यांचं एकटं राहणं बरंच बोलकं असायचं. बाजारी दुनियेत ते वाट चुकलेले असायचे. सरांच्या विचारातील जग साने गुरुजी, महात्मा गांधी, एस. एम. जोशी यांनी भरलेलं असायचं. झोकून देऊन कार्य करायची झिंग असलेल्या या माणसापुढे नोकरदार शिक्षक त्यांना क्लेशकारी वाटायचे. असंवाद, असंपर्क ही त्यांची परिणती; पण हा तोकडेपणा लोकांचा. सर त्याचे प्रायश्चित्त मूक, स्थितप्रज्ञ होऊन भोगत राहायचे.
 उत्तूर, चिमणे, पिंपळगाव येथील शाळा, शिक्षक, विद्यार्थी असा मोठा शैक्षणिक पसारा सरांनी उभा केला. त्यामागे समाजातील तळागाळातील मुलांना शिकविण्याची तळमळ होती; पण गरजा व साधनांचं विषम गणित त्यांना नेहमी विषण्ण करीत राहायचं. आजगावकर सर हे सर्व सामावून घेणा-या समुद्रासारखे होते. एखाद्या योग्यासही लाजवेल असा त्यांच्यातील संयम, सहनशक्ती अशी की प्रत्येक कळ दाबून ठेवायची. त्यांच्या मौन व्यवहारात एक ठसठसणारा ज्वालामुखी सतत आतल्या आत खदखदत असायचा. “आपलं दु:ख आपल्यापाशी' अशी त्यांची अबोल वृत्ती. समाजाला घडवायचं, उभारायचं हा एकच ध्यास, ध्येयवाद. त्यांच्या शाळेत ते असले, नसले तरी फार फरक पडायचा नाही, असा ठरलेला परिपाठ.
 त्यांच्या सर्व शाळांत राष्ट्रीयत्वाचे संस्कार प्रकर्षाने दिसून यायचे. खेड्याला शोभेल अशी टोपी सर्व विद्यार्थी घालायचे. पांढरा शर्ट, खाकी पँट घालणारी मुलं भारताचे प्रतिनिधी होती. मुलीही तशाच. पांढरं पोलकं नि निळा परकर. पुढे तो स्कर्ट झाला; पण भारतीय मर्यादेचं भान त्यांच्या शाळांनी कधी सोडलं नाही. शिक्षक सारे निवासी असण्याचा कटाक्ष असायचा. रात्रीची अभ्यासिका चालायची. वीज गेली की अभ्यासिकेतील मुलं कविता म्हणायची- सामूहिकपणे. कृती छोटी असली तरी संस्कारांचं भान त्यात असायचं. साच्या शाळेत साधेपणाचा सरळ दरवळ त्यांच्या शाळांना राष्ट्रीय बनवून टाकायचा. या सर्वांमागे आजगावकर सरांची धडपड, ध्येयदृष्टी होती, हे वेगळे सांगायला नको.
 सरांनी शिक्षणप्रसाराचं भान नसलेल्या गावा-समाजात शाळा सुरू केल्या नि तो आसमंत शिक्षित, संस्कारित केला. त्यामुळे आज उत्तूर, आजरा, गडहिंग्लजच्या पंचक्रोशीत आजगावकर सर नुसते शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक असत नाहीत. ते जनतेच्या लेखी असतात एक आदर्श समाजशिक्षक.
 ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत आमुच्या आशा, किनारा तुला पामराला सारख्या गर्वगीताच्या ओळी सार्थ करणारं जीवन घेऊन आलेले आजगावकर सर विसाव्या शतकातील कोलंबसच होते. त्यांनी जी गावं शोधली ती । त्यांच्यापूर्वी शैक्षणिक नकाशावर नव्हती. जेव्हा ती नकाशावर आली तेव्हा लोकांना त्यांच्या शाळांसाठी नव्या खुणा शोधायला लागल्या त्या आजगावकर सरांनी खाल्लेल्या जगावेगळ्या खस्तांमुळेच. मुलींच्या शिक्षणाची गंगा उत्तूरच्या पंचक्रोशीत वाहू लागली याचं श्रेय आजगावकरांनाच दिलं पाहिजे. उत्तूरमध्ये सहकाराचा शुभारंभ सरांनीच केला. कामगारांच्या संघटनेचा गडहिंग्लजमध्ये केलेला सरांचा प्रयोग त्यांच्या दूरदृष्टीचाच परिचय. राजकारण हे समाजपरिवर्तनाचं साधन असतं, हे सरांनी आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलं. साधनशुचिता पाळणं हे न पेलणारं शिवधनुष्य; पण सरांनी ते सभापती होऊनही पेलून दाखवलं. माणसाचा विश्वास जेव्हा स्वत:च्या विवेकावर असतो तेव्हा अशक्य ते शक्य होतं. भ्रष्टाचारमुक्त राजकारण आज अशक्य मानलं जातं तसं ते त्या वेळीही मानलं जायचं. पण गृहीतं खोटी ठरविण्याचा ध्यास घेतलेला हा सामाजिक फकीर. त्यानं मूल्यनिष्ठांच्या शर्यतीत भल्या-भल्यांना मागे टाकलं ते केवळ आपल्या जाज्ज्वल्य जीवननिष्ठांच्या बळावर. मी पिंपळगाव विद्यालयात शिक्षक असतानाच्या वर्षभराच्या अल्पकाळात आजगावकर सरांचा संपर्क आला नि मला माझ्या मर्यादांची प्रकर्षाने जाणीव झाली. आयुष्यभर खेड्यात जेठा मारून उभं राहणं एका पायावर तपस्या करणाच्या हठयोग्यापेक्षा कमी श्रमाचं, संयमाचं, निष्ठेचं नसतं! हे सारं करताना केल्याचा अहंकार, प्रसिद्धी कधी नाही. सतत सर समाजाच्या रकान्यात राहिले. असं आजन्म रकान्यात राहणं केवळ अदम्य ध्येयवादामुळेच शक्य होतं.

मूल्याधारित धर्मनिरपेक्ष कार्य : अॅड. के. ए. कापसे

 प्रत्येक मनुष्य जन्मतो, तो एक सामान्य म्हणूनच. तो असामान्य होतो ते आपल्या जीवन, कार्य, कर्तृत्व, मूल्य, निष्ठा, जीवनशैली, वृत्ती, इत्यादींमुळे. अॅडव्होकेट के. ए. कापसे यांचंही तसंच आहे. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांनी आपला वकिली व्यवसाय व्रत, निष्ठा, तपस्या, मूल्य म्हणून सांभाळला नि त्याच्या जोरावर ते नामांकित, प्रतिष्ठित वकील, समाजहितसेवी बनले. मी त्यांना ओळखू लागलो ते सन १९८० नंतरच्या काळात. मी काहीबाही सामाजिक काम त्या वेळी करू लागलो होतो. कोल्हापूरच्या विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, ट्रस्टस्मध्ये माझी लुटुपुटुची लुडबुड असायची. त्या काळात प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकर, अॅड. मामासाहेब वर्धमाने, श्रेष्ठी वकील प्रभृती समाजजीवनात आपल्या कार्यकर्तृत्वाने घर करून होत्या. त्या काळात मामा वर्धमानेंचा अमृतमहोत्सव साजरा झाला होता. मी त्यांची स्मरणिका संपादित करीत होतो. त्या वेळी त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारताना मी अँड. मामासाहेब वर्धमाने यांना विचारलं होतं की, “तुम्ही निष्णात वकील, पट्टीचे वक्ते, बिनीचे कार्यकर्ते, नि:स्पृह समाजसेवक. ही परंपरा तुम्ही नव्या पिढीत कुणामध्ये पाहता?" तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, “समाजात (जैन) म्हणाल तर अॅड. के. ए. कापसे, व्यवसायात (वकील) म्हणाल तर पी. आर. मुंडरगी अन् राजकारण, समाजकारणात म्हणाल तर अॅड. गोविंद पानसरे.' पुढे या तिघांबरोबरही मला वेळोवेळी काम करण्याची संधी मिळाली नि लक्षात आलं की, मामांचं भाकीत खरं होतं.
 अॅड. के. ए. कापसेंना... त्यांना ‘साहेब' म्हटलेलं आवडतं नि दुस-यालाही... कनिष्ठासही ‘साहेब' म्हणून संबोधायची त्यांची उदारता मी कितीदा तरी अनुभवली आहे. ब्रिटिश प्रभावामुळे असेल, मला मात्र ते बिरुद लावायला अजिबात आवडत नाही; पण कापसेसाहेबांचं मात्र ते आवडतं बिरुद. त्या काळात संस्थापक कामाच्या निमित्ताने सतत कोर्टात जाणं व्हायचं. कज्जा, केसीससाठी नाही. मी त्या वेळी बालकल्याण संकुल विकसित करीत होतो. आमच्याकडे बाल न्यायालय भरायचं... दर शनिवारी. एक न्यायाधीश हे बाल न्यायाधीश म्हणून येत असायचे. शिवाय जिल्हा व सत्र न्यायाधीश आमचे विश्वस्त असायचे; त्यामुळे त्यांच्या अनेक बैठका, चर्चा, चर्चासत्रे यांतून कोर्टात माझ्या येरझाच्या असायच्या. तिथं अनेक न्यायालये होती. कोर्टात गेलो नि पट्टेवाल्यानं कापशे ऽऽ वकीऽऽल' असा पुकारा केला नाही, असा एक दिवसही आठवत नाही. विठूनामाच्या गजरासारखा पट्टेवाल्याचा होणारा नित्य पुकारा या वकिलांच्या सातत्यपूर्ण समर्पणाचा सन्मानच असायचा.
 मी ज्या श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाच्या महावीर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करायचो, तिथं १९९० च्या दरम्यान आंदोलनाचं वातावरण होतं. मी आमरण उपोषण आरंभलेलं. जुने पदाधिकारी समोर यायला धजावत नव्हते म्हणून श्री. तात्यासाहेब पाटणे व अॅड. के. ए. कापसे संस्थेतर्फे बोलणी करण्यास आले होते. त्या वेळी मला स्वप्रतिष्ठेपेक्षा समाजाची, संस्थेची प्रतिष्ठा मोठी मानण्याच्या त्यांच्या मनाच्या मोठेपणाची प्रचिती आली.
 पुढे तर कापसेसाहेब संस्थेचे चेअरमनच झाले. त्यांनी संस्थेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी केलेल्या विविध दिव्यांचा मी साक्षीदार आहे. 'साप तर मारायचा; पण काठी मोडायची नाही, अशा एखाद्या निष्णात समाजशल्यविशारदाच्या कौशल्याने त्यांनी संस्थेत अनेक बिनटाक्याच्या समाजशस्त्रक्रिया केल्या आणि आपली सचोटी, प्रशासनकौशल्य, योजकता सप्रमाण सिद्ध केली. प्राचार्य दिलीप कोण्णूर व अॅड. के. ए. कापसे नि महावीर भूपाल देसाई या त्रयींनी संस्था, महाविद्यालय अत्यंत संयमानं, अनेक मानापमान सहन करीत ऊर्जितावस्थेस आणली.
 प्राचार्य कोण्णूर सेवानिवृत्त झाले नि लोकाग्रहास्तव मला प्राचार्य व्हावे लागले. अॅड. के. ए. कापसे नि मी, आम्हा उभयतांचे जमेल की नाही, अशी शंका स्वत: आमच्यात होतीच. ती इतरांत असणेही स्वाभाविक होते; पण, अप्रत्यक्षपणे पाच वर्षांत संस्था व महाविद्यालयाच्या लौकिकात भरच पडली. अपवाद म्हणूनही आम्हा उभयतांत, संस्था-महाविद्यालयात, प्राचार्य-प्राध्यापककर्मचा-यांत मतभेदाचा प्रसंग आला नाही. संघर्षाचे प्रसंग आले तरी! याचं श्रेय अॅड. के. ए. कापसे यांच्या उदार मनोवृत्तीसच द्यावं लागेल.
 या काळात माझे स्नेही अॅड. गोविंद पानसरे यांच्यामुळे, प्रा. सौ. कांचनताई कापसे यांच्या कार्यसहवासामुळे आम्ही इतके जवळ आलो की, ते आमचे कुटुंबीय झाले, ते मात्र एका घरगुती न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे!
 या सर्वांतून अॅड. कापसे यांच्या जीवन, विचार, छंद, स्वभाव, पैलू, वृत्ती यांचं-माझं स्वत:चं, असं एक व्यक्तीविषयक आकलन तयार झालं आहे. ते मुलाखतीच्या अंगाने मांडायचे अनेक दिवस डोक्यात होते. आज ते आपल्या आयुष्यातील निरपेक्ष कार्याचा गौरव साजरा करीत असताना, ‘बोनस लाइफ जगत असताना मांडणं यात त्यांचा लाभ कमी व समाजाचा अधिक! म्हणून हा प्रकट संवाद! या हृदयीचे त्या हृदयी!!!
 तुम्ही आयुष्याचा 'सहस्त्रावा चंद्र' पाहात आहात, कसं वाटतं ?
 कृतकृत्य!
 तुमचं मनःपूर्वक अभिनंदन! तुम्हाला शतायुष्य लाभो!!
 तुमच्या सदिच्छांबद्दल आभार; पण, या पुष्पगुच्छाची आवश्यकता नव्हती. पुस्तके ठीक आहेत. वाचीन. मला ती आवडतातही.
 मी स्वाध्याय करून आलोय. काही प्रश्न काढून घेऊन आलोय. तुम्ही एक नजर फिरवाल, तर बरे होईल. उत्तरातही सुसंगती येईल.
 ठीक आहे. वाचतो; पण असं काही भव्यदिव्य मी केलेलं नाही.
 तुम्ही सर्वांना माहीत आहात, ते आजचे अॅड. के. ए. कापसे एक निष्णात वकील, विविध संस्थांचे अध्वर्यु म्हणून. पण तुमचा पूर्वेइतिहास, विशेषतः जन्म, बालपण, कुटुंब, शिक्षण असं लोकांना फारसं माहीत नाही; ते सांगाल थोडं विस्तारानं?
 माझं मूळ गाव हुन्नरगी. आज ते चिकोडी तालुक्यात, बेळगाव जिल्ह्यात नि कर्नाटक राज्यात असलं, तरी जन्मावेळी मात्र ते तत्कालीन मुंबई इलाख्यात होतं. माझा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांचे नाव अण्णासाहेब दादा कापसे. ते फार शिकलेले नव्हते; पण साक्षर होते. व्यवहारी शहाणपण होतं. त्यांचा व्यवहार सचोटीचा होता. अगदी डायरीसारखं नियमित लिहीत नसले, तरी महत्त्वाचं लिहून ठेवायची त्यांना सवय होती. आईचं नाव तानीबाई चराटे. माझी आई कोगनोळीची. घरी पारंपरिक व्यापार होता. आमची आठ एकर शेती होती. आईवडीलच ती कसत. घरात आम्ही दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार होता. माझा नंबर शेवटून दुसरा. दि. २३ मार्च, १९३४ रोजी माझा जन्म त्या वेळच्या परंपरेनुसार आईच्या घरी, आजोळी झाला.
 आपलं शिक्षण कुठं कुठं नि कसं झालं?
 माझं पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जन्मगावी हुन्नरगीला, इलाखा पंचायतीच्या शाळेत झालं. शिक्षक चांगले होते. मी शाळेत शिकाव, अभ्यास करावा म्हणून वडील दक्ष होते. मी चांगले गुण मिळवून पास व्हायचो; पण, सातवीला धक्का बसला. आमच्या लहानपणी सातवीला सरकारी परीक्षा असायची. केंद्र परीक्षा. त्यात मी नापास झालो. वडील हादरलेच!
 मग काय झालं?
 माझी मावशी त्या वेळी मांगूरला होती. ती मला त्यांच्या गावी घेऊन गेली. त्या वेळी त्या शाळेत शिक्षक चांगले होते. त्या भागात ती शाळा अभ्यास करून घेणारी म्हणून प्रसिद्ध होती अन् झालंही तसंच. वडिलांची समजावणी, मावशीचं लक्ष, शिक्षकांचे प्रयत्न या सर्वांतून मित्र इत्यादी नसल्याने मी अभ्यास करू लागलो व आश्चर्य म्हणजे पहिल्या नंबरने पास झालो.
 तेव्हा कसे वाटले?
 फारसं काही कळत नव्हतं; पण आईचं साखर वाटणं, वडिलांची फुशारकी, मावशीच कौतुक, शिक्षकांची शाबासकी या सर्वांमुळे मीही हुरळून गेलो होतो खरा!
 मग हायस्कूलला कुठे गेलात?
 नंबर आल्यामुळे नि मामांकडे मी चांगला राहतो, शिकतो म्हणून मला कोगनोळीलाच ठेवण्याचा निर्णय झाला नि माझं नाव कागलच्या शाहू हायस्कूलमध्ये घालण्यात आलं. पहिले दोन महिने तर मी कोगनोळी-कागल पायीच येऊन-जाऊन शिकायचो. मग कागलला खोली करून राह लागलो. कागलच्या शाहू हायस्कूलमधूनच मी १९५४ साली एस.एस.सी. झालो. माझे मामा बंडू आदाप्पा चराटे, शाहू हायस्कूलचे धर्माधिकारी सर यांच्यामुळे हायस्कूलच्या काळात मी एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला जायचो.
 शाळा, हायस्कूलच्या काळात मी लाजराबुजरा विद्यार्थी होतो. मागे, कोप-यात बसायचो. नापास झालो असल्याने एक प्रकारचा न्यूनगंड मनात असायचा. तालुक्यातील इतर मुलं शहरी वळणाची, धीट, चुणचुणीत. सुरुवातीला करमायचं नाही. घरची, गावची ओढ असायची. निराश वाटायचं, ओशाळायचो. मग मामांनी इंग्रजीची शिकवणी लावली. धर्माधिकारी सरांमुळे इंग्रजीची गोडी लागली. आत्मविश्वास आला. मरगळ गेली. तिमाही परीक्षेत इंग्रजीत तर मी पहिला आलो.
 अक्कोळकर सर आम्हांस इतिहास शिकवीत. सन १९४७ च्या भारतपाकिस्तान विभाजनाच्या काळात शौर्यपदकं प्रदान करण्यात आली होती. सरांनी त्याला अनुलक्षून विचारलेल्या प्रश्नाचं मी दिलेलं उत्तर बरोबर असल्याबद्दल सरांनी मला शाबासकी दिली व ‘असंच वाचत राहा', असं समजावलं. आजच्या माझ्या वाचनछंदाचं पहिलं बीज मला तिथं दिसतं. आज तर क्रम असा आहे की, जेवीन न जेवीन; पण वाचन अटळ!
 मग कॉलेज?
 अर्थातच राजाराम! त्या वेळी या भागात तेच एकमेव कॉलेज होतं. कॉलेजचं नाव होतं. मी चांगल्या मार्कोनी पासही झालो होतो. दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे शिकणं सोपं झालं. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषय घेऊन मी सन १९५८ ला बी.ए. झालो.
 कॉलेजच्या जीवनातील काही आठवणी आहेत?
 हो, आहोत ना. मला आठवतं त्याप्रमाणे कॉलेजची लायब्ररी चांगली होती. वाचनही भरपूर करीत असे. अर्थशास्त्र माझ्या आवडीचा विषय होता. त्यातही सहकाराकडे ओढ असायची. पदवीच्या वर्गात असताना एकदा अंतर्गत परीक्षेत ‘सहकारी शेती'वर प्रश्न विचारण्यात आला होता. मी इस्त्रायलचं उदाहरण, रशिया, अमेरिकेतील प्रयोग उद्धृत करून समर्पक उत्तर लिहिलं होतं. आमच्या प्रोफेसरसाहेबांना ते बेहद्द आवडलं होतं. त्यांनी उत्तर कसं असलं पाहिजे म्हणून ते वर्गात वाचूनही दाखवलं होतं. त्या घटनेचा माझ्या मनावर सकारात्मक प्रभाव पडला व मी करिअरिस्ट झालो.
 कॉलेजमध्ये खेळ, कला, वक्तृत्वात भाग घेतला होता?
 खेळ पाहायची आवड होती. वक्तृत्वाची; परंतु महाविद्यालयीन जीवनात भाषण केल्याचं नाही आठवत. नाही म्हणायला मला एन. सी. सी.ची आवड होती. चीनच्या युद्धात एन.सी.सी.च्या बळावर मला इमर्जन्सी कमिशनही मिळालं होतं. तो आनंद व अभिमानाचा भाग होता. कुस्तीचीही आवड होती.
 कॉलेजच्या जीवनात काही रोमँटिक घडलं वगैरे ?
 हो, माझ्या सुविद्य पत्नी प्रा. कांचन कापसे यांची नि माझी महाविद्यालयीन जीवनापासूनची ओळख. त्या बी. एस्सी. करीत होत्या नि मी बी.ए. बाईंचे घराणे उच्च. वडील नामांकित वकील. त्यांना शहरात मोठी प्रतिष्ठा होती. आम्हां उभयतांत प्रेम असले, तरी सन १९६०-६२ चा काळ रोटीबेटी या पारंपरिक व्यवहाराचा होता. आम्ही समाजात, समधर्मीय असूनही त्या काळातील चतुर्थ, पंचम भेदांत विवाह म्हणजे आंतरजातीय विवाह केल्यातच जमा असायचा. त्यामुळे मुलीकडील माणसं पुरोगामी असूनही आमच्या घरातून आमच्या लग्नाला विरोध होता; पण, कालौघात सारं काही अलबेल झालं!
 वकील होण्याच्या प्रेरणेची बीजे सास-यांच्या प्रतिष्ठेत तर नव्हती ना?
 नाही. मी पदवी शिक्षण घेत असतानाच माझ्या मनात वकील होण्याची सुप्त इच्छा घर करून होती. मी खेड्यातून आल्यामुळे असेल; पण गावी शिक्षक, डॉक्टर, वकील यांना देव मानण्याचा तो काळ होता. कूळकायद्याचं वातावरण होतं. वकिलांना असाधारण महत्त्व, प्रतिष्ठा होती. अशील वकिलांची हॅट, बॅग घेऊन अनवाणी चालायचा तो काळ होता. आज ते सरंजामी वाटलं, तरी त्या काळात त्या व्यवसायाचं समाजमनावर गारुड होतं; त्यामुळे मी वकील व्हायचं ठरवलं. सासरे नंतर माझ्या जीवनात आले; पण त्यांच्या परंपरा, प्रतिष्ठेनं माझं स्वप्न उंचावलं, हे मात्र मान्य करायलाच हवं!
 एलएल.बी.च्या दिवसांबद्दल काही सांगाल?
 त्या दिवसांबद्दल सांगण्यासारखं काही नसलं, तरी एक मात्र खरं की, माझ्यातील व्यावसायिक त्या दिवसांनी घडवला. आमचे शिक्षक व्यवसायाने वकीलच होते. सकाळी शिकवून ते कोर्टात जात. त्यांच्या शिकविण्यातील अनुभवसमृद्धीमुळे ते अकॅडेमिक कम प्रैक्टिकल असायचे. अॅड. दाभोळकर, प्रा. केळकर, अॅड. आपटे, अॅड. नांद्रेकर यांचं शिकवणं ऐकणं ही पर्वणी होती. शहाजी लॉ कॉलेज त्या वेळी आत्ताच्या कॉमर्स कॉलेजच्या जुन्या कौलारू इमारतीत भरत असे. त्या प्राध्यापकांपासून प्रेरणा घेऊन पुढे मी कॉमर्स कॉलेजात ‘मर्कंटाइल लॉ' आणि शहाजी लॉ कॉलेजमध्ये स्पेशल कॉन्ट्रॅक्टर्स'सारखे विषय शिकविले. यामुळेच मी शिवाजी विद्यापीठ सिनेट, अकॅडेमिक काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिलवर सुमारे सहा वर्षे कार्य करू शकलो.
 वकिलीची सनद मिळवून पहिल्यांदा प्रैक्टिस कुठे सुरू केलीत?
 सन १९६० ला बी. ए., एलएल. बी. होऊन मी भावाकडे हुन्नरगीला परतलो अन् प्रैक्टिस करायचा विचार करून चौकशी सुरू केली. तेव्हा आमच्या तालुक्याचं कोर्ट होतं चिकोडी. तिथं अॅड. एस. डी. कोठावळे यांची चांगली प्रैक्टिस होती. ते दिवाणी साइडचे कज्जे चालवत. तिथं बोली, लेखी सारं कन्नडमध्ये चालायचं. माझं खरं शिक्षण मराठीतून झाल्यानं बोलणं कळायचं; पण दरखास्त, अर्ज, अॅफिडेव्हिट या साध्या गोष्टी करणंही अवघड होऊन गेलं. मी कसातरी चार महिने प्रयत्न केला नि कोल्हापूरला प्रैक्टिस करायची ठरवून परत कोल्हापुरी आलो.
 कोल्हापूरला कुणाकडे प्रेक्टिस सुरू केली?
 कोल्हापूरला त्या वेळी अॅड. व्ही. पी. पाटील यांचं नाव, एक शिस्तीचा वकील म्हणून घेतलं जायचं. मी त्यांच्याकडे उमेदवारी सुरू केली. आज माझ्यात जी व्यावसायिकता तुम्हाला दिसते, त्याचे प्राथमिक धडे मी अॅड. व्ही. पी. पाटील यांच्याकडून घेतले.
 त्यांच्याकडून काय नि कसे शिकलात?
 १) कामाची बांधणी कशी करायची, कायद्याच्या चौकटीत केस कशी बसवायची याबद्दलचा अभ्यास अगोदर करावयाचा.
 २) प्रतिवादी असल्यास कोणता बचाव घ्यावयाचा व त्याला कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे?
 ३) उलटतपास कसा करायचा व आपल्याला अनुकूल बाबी कशा आणायच्या?
 ४) कामात चाललेल्या प्रगतीवर बारकाईने नजर ठेवणे.
 स्वतंत्र प्रैक्टिस केव्हा सुरू केली?
 विवाहानंतर. म्हणजे १९६४ च्या दरम्यान, सुरुवातीस दिवाणी दावे केले. नंतर मी सहकाराकडे लक्ष केंद्रित केले. यात माझे सासरे अॅड. नानासाहेब नांद्रेकर यांची मोलाची मदत, मार्गदर्शन मिळाले. ते सहकारातील नामांकित वकील होते. त्या वेळी पंचगंगा, बिद्री असे एक-दोनच सहकारी साखर कारखाने होते; पण, अनेक सहकारी संस्था, संघ होते. त्यांचे ते वकील होते. पूर्वी मी दिवाणी कज्जे करायचो. ते अधिक होते. नंतर सहकारी कज्जे अधिक झाले. मी दोन्ही बाजू चालू ठेवल्यामुळे सतत कामात व्यग्र राहिलो. दोन्ही बाजूचे कायदे माहीत असल्याचा फायदा झाला.
 तुमच्या व्यावसायिक यशाचे रहस्य काय?
 सर्वांत प्रथम म्हणजे अशिलाशी निष्ठा व बांधीलकी. अशील आला की, त्याचं डॉक्टरांच्या संयमानं सारं ऐकतो. त्याचं म्हणणं समजावून घेतो. त्याची गरज लक्षात घेतो. मग कागदपत्रे पाहतो. काम होणार असेल, नसेल ते स्पष्टपणे सांगतो. प्रयत्नांत कसूर करत नाही. तारखा वाढवून घेत नाही. लवकर न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. होमवर्क भरपूर करतो. व्यावसायिक कौशल्य, कायदा, कागदपत्रे हीच माझ्या व्यवसायाची साधने मानली. साधनशुचिता प्रमाण मानून काम केलं. विरोधी वकील मित्र असला, तरी न्यायालयात तो माझ्या लेखी प्रतिस्पर्धी, प्रतिपक्षच असायचा. त्यामुळे माझ्या पक्षकारांनी माझ्यावर कधी अविश्वास व्यक्त केला नाही. तेच माझ्या यशाचं श्रेयही आणि प्रेयही!
 तुम्ही मला नेहमी Workoholic वाटत आलाय.
 तो दोष नसून, व्यवसायाच्या संदर्भात म्हणाल तर गुणच. पक्षकार तुम्हाला मागेल तितके पैसे देत असेल, तर तो मागेल, अपेक्षित तो न्याय देण्यास तुम्ही बांधील असलं पाहिजे. मी सरासरी अठरा तास काम करत आलोय. त्यात वृत्तपत्रवाचन, साहित्य, अध्यात्म; पण कर्मकांड नसलेलं तत्त्वज्ञान वाचतो. लॉ जर्नल्स तर माझी बायबल्स होत. इकॉनॉमिक टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स इतकीच स्थानिक वृत्तपत्रे वाचतो. एकाच वेळी तुम्ही लोकल असलं पाहिजे नि ग्लोबलही, हे भान मी ग्लोबलायझेशनपूर्वीपासून जपलं. सभा, समारंभात अनिवार्य असेल तरच जातो. कार्यालयीन वेळ, कोर्टवेळ, व्यक्तिगत कौटुंबिक जीवन या तीन सत्रांत सारं आयुष्य घालवलं, ते व्यवसायनिष्ठा अंतिम मानून. ही नशा नव्हे. हा ध्यास आहे, ध्येय आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर पैशाचं वैयर्थ कळतं. व्यवसायाला वैयर्थ शिवत नसतं. आजही मी, माझे कितीही केस लॉ झाले तरी, उमेदवार समजूनच प्रत्येक कज्जाची तयारी करतो. माझ्याकडच्या उमेदवार वकिलांना मी संधी देतो; पण त्यांच्यावर सोपवून मी कधी सशाची झोप घेतली नाही. कोर्टाच्या वेळेत मी अपवाद म्हणूनही कधी घरी थांबल्याचं आठवत नाही.
 बारमधील तुमचे मित्र, सहयोगी कोण?
 न्यायालयात अॅड. पी. के. चौगुले, अॅड. गोविंद पानसरे, अॅड. अप्पासाहेब नाईक हे माझे स्नेही, सुहृद होत. बारमध्ये आम्ही कधी उखाळ्यापाखाळ्या काढत बसल्याचे आठवत नाही. विविध प्रश्न, समस्या, कायदा, बदलतं वर्तमान, राजकारणातील समाज हेच आमच्या चर्चाचं केंद्र असायचं. कोर्टाला सुट्टी लागली (दिवाळी, मे महिना) की, आमच्या सहली ठरलेल्या. देशपरदेशांत कधी मित्रांसह, कधी सहपरिवार खूप पर्यटन झालं. ती चैन नसायची. असायचा तो विरंगुळा. पुन्हा नव्या दमानं कामात लागतो आम्ही. 'कामात बदल हीच विश्रांती' हे ब्रीद आजअखेर पाळत आलोय. त्यामुळे आयुष्य वाया गेल्याचा विषाद कधी मनी शिवला नाही. न्यायमूर्तीना दैवत मानून विधिसेवा बजावली. माझे सारे मित्र तसेच. समानशील, समानछंदी!
 व्यवसायात व्यग्र राहिल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं, असं आज मागे वळून बघताना वाटतं का?
 नाही. पण एक आहे, माझ्या कौटुंबिक सुखासमाधानाचं सारं श्रेय माझ्या पत्नी प्रा. कांचनताई कापसे यांनाच द्यावे लागेल. एक तर मी व्यवसाय करीत राहिलो. त्यांनी नोकरी केली. त्या राजाराम महाविद्यालयातून एम. एस्सी. (बॉटनी) झाल्या अन् तिथेच नंतर प्राध्यापिका. अशीच मलाही संधी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करण्याची मिळाली. त्यांची नोकरी ११ ते ५ अन् माझ्या व्यवसायाचीही तीच वेळ. मुले शाळेतून लवकर घरी आल्यानंतर त्यांचा सांभाळ माझ्या सासूबाई कै. शशिकला नांद्रेकर यांनी केला व त्यांच्यावर चांगले संस्कार केले. पण, याशिवाय अगोदर नि नंतरही मला काम करायला लागायचं (सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८) कधी-कधी या वेळेपेक्षाही अधिक वेळ द्यावा लागायचा. त्यांच्या नोकरीत अगोदर नि नंतरची जी वेळेची सवलत मिळाली, त्यातून त्यांनी मुलं, कुटुंब, मुलांचे शिक्षण, संस्कार सर्व पाहिलं. खरं तर मीही त्यांच्या शिस्तीत शिस्तबद्ध राहिलो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
 आम्हा पतिपत्नीत शिक्षण, सहवास, संस्कार यांतून परस्परांविषयी सद्भाव, सामंजस्य पहिल्यापासूनच आहे. आज ‘सुखी परिवार' म्हणून कुणीही आमच्याकडे पाहावं. पत्नीनं कॉलेजात शिकविण्याव्यतिरिक्त एन. सी. सी. अधिकारी, विभागप्रमुख अशी पदं भूषविली. त्यांना बागकामाची आवड असून, गार्डन प्रदर्शनात त्यांची अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
 तुम्हा उभयतांत मी सतत एक समाजऋणभाव पाहत आलो आहे. तो कशातून आला?
  खर सांगायचं तर भारतीय कुटुंबात पूर्वापर जात, धर्म यांच्या शिकवणीतून एक समाजभान आहे. कर्मकांडात ते आपण विसर्जित करून टाकतो. आम्ही उभयतांनी समाजधर्म प्रमुख मानला. काही लोक आम्हांस धर्मनिरपेक्षा (Secular) मानतात. धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ विज्ञाननिष्ठ आहे. त्यातून आम्हास हे भान आलं. मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची कास धरली. पत्नीनं बाहुबलीला ‘श्री १०८ शांतिसागर वृद्धाश्रमाचे कार्य, निवृत्तीनंतरचं जीवनकार्य म्हणून स्वीकारलं. ते त्या सहजधर्म म्हणून करीत आहेत. त्यांच्या नि माझ्या कामाचा आम्ही ठरवून कधी गवगवा केला नाही. ती आम्ही समाज उतराई मानतो.
 तुमची मुलं, सुना, नातवंडे यांच्यासह कुटुंबजीवन उपभोगता का आणि त्यासाठी वेळ काढता का?
 आम्हाला दोन मुलं. दोन्हीही कर्तृत्ववान निघाली, याचा आनंद व अभिमान आम्हा उभयतांना आहे. आमचा मोठा मुलगा आशुतोष तो ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहे. तिथे सदर्न क्रॉस कॉम्प्युटर सिस्टीममध्ये तो व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. त्याची पत्नी नि आमची मोठी सून सौ. ऊर्मिला कायद्याची पदवीधर आहे. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. पुमोरी तिचं नाव. ती ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात असलेल्या मोनॅश विद्यापीठात सध्या पदवी शिक्षण घेत आहे. छोटा मुलगा अभिजित व्यवसायात आला आहे. मी उत्तराधिकारी म्हणणार नाही; तरी परंतु त्यानं स्वत:चं असं स्थान निर्माण केल्याचा आम्हाला आनंद आहे. तो सहकारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारचे दावे माझ्याप्रमाणेच चालवितो. धाकटी सून जैन तत्त्वज्ञानासारख्या अवघड विषयातील पदवीधर आहे. सौ. स्नेहलता तिचं नाव. त्यांना दोन मुले चि. ईशान व चि. पिनाक असून, दोघेही शिक्षण घेत आहेत. आमचं एकत्र कुटुंब आहे. सुखी, समाधानी कुटुंबात मुद्दाम वेळ काढावा लागत नाही. तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कुटुंबातच असता, जर तुम्ही ख-या अर्थाने संसारी असाल तर. मी तसा आहे खरा!
 तुम्ही एक ट्रस्ट स्थापन केल्याचं मी ऐकून आहे.
 होय. ‘अॅड. के. ए. कापसे ट्रस्ट'ची स्थापना आम्ही सन २००२ मध्ये केली. यातून आजवर होतकरू व गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक साहाय्य केले जाते. या संस्थेमार्फत वक्तृत्व स्पर्धा आणि ग्रंथदान, इत्यादी केले जात असून ते चिरंतन आणि निरंतर चालू राहील, अशी व्यवस्था ट्रस्टच्या घटनेत केली आहे.
 तुम्ही शिकविलेल्या आणि मान्यवर झालेल्या वकिलांचीही मोठी परंपरा आहे ना?
 अॅड. लुईस शहा, अॅड. बाबा नेले, अॅड. दिलीप मंगसुळे, अॅड. डी. ए. मादनाईक व अॅड. राम मुदगल यांसारखे प्रख्यात वकील योगायोगाने माझे ज्युनिअर्स. त्यांचा लौकिक हा माझ्या अभिमानाचा विषय आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील अमित बोरकर हेही माझेच विद्यार्थी. अशी अनेक नावे सांगता येणं शक्य आहे.
 तुम्ही शिवाजी विद्यापीठातही विविध स्तरांवर कार्य केलंय हे खरं का?
 अहो, खरं म्हणजे मी सिनेट. अकॅडमिक काउन्सिल इतकंच काय, सन १९८४ ते १९८७ व १९९० ते १९९३ या काळात विधी विद्याशाखेतून निवडून येऊन शिवाजी विद्यापीठाच्या विद्याशाखेचा डीन व मॅनेजिंग काउन्सिलचा सक्रिय सदस्य होतो. त्या काळात अनेक कसोटीच्या प्रसंगांत माझं विधिकौशल्य पणाला लावल्याचं आठवतं व त्याचे एक सार्थ समाधानही माझ्या मनात आहे. विधी महाविद्यालयात पाच वर्षांचा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यास माझा आग्रह होता व त्याप्रमाणे मी शिवाजी विद्यापीठात तो अभ्यासक्रमास सुरू करण्याची मंजुरी प्राप्त केली.
 आपण जे समाजकार्य करत आलात, त्यातलं कडू-गोड काही आठवतं?
 कडू फारसं नाहीच म्हणा ना. गोड असं नाही; पण समाधान देणारं भरपूर आहे. मी शैक्षणिक, सामाजिक कामं गेली तीन दशके करीत आलो. त्यात श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ, विक्रम एज्युकेशन सोसायटी, रुईकर धर्मशाळा, दिगंबर जैन बोर्डिंग, मराठी मुलांची शाळा, हुन्नरगी, श्रमिक प्रतिष्ठान, शिवाजी विद्यापीठ, भगवान महावीर अध्यासन अशी अनेक कामं सांगता येतील. सगळीकडे आपल्यामुळे काही हातभार लागला, याचं समाधान मोठं आहे. काही संस्थांच्या ऊर्जितावस्थेस आपण कारण ठरल्याचं समाधान मोठे आहे. विशेषत: श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांचा चहुमुखी विकास, लौकिक वृद्धी व प्राप्त प्रतिष्ठा यांत मी निमित्त झालो, हे खरं असलं तरी सहकारी संचालकांचं पाठबळ, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी यांचा सेवाभाव यामुळेच हे शक्य झालं. या संस्थेत मी सन १९८९ ला आलो. तेव्हाचं चित्र नि आजचं, यांत जमीन-अस्मानाचा फरक पाहून खरंच वाटत नाही की, तो भूतकाळ याच संस्थेचा होता.
  शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून झालेलं कार्यही असंच स्मरणीय. श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी दारूबंदीच्या लढ्यात काही योगदान देऊ शकलो. त्याचा आनंद केवळ अविस्मरणीय! आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावून मी संस्थेच्या वास्तुंमध्ये असलेल्या ११ कुळासंदर्भात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन तो परिसर कज्जामुक्त व संस्था कर्जमुक्त करू शकलो, यासारखं दुसरं समाधान गाठीशी असणं यात मी जीवनाची कृतार्थता मानतो.
 कुटुंब आणि समाज दोन्ही पातळ्यांवर सुखसमाधान हाच खरा सहस्त्रदर्शन योग नाही का?
 होय! पण तो आपोआप नाही येत. तुम्ही सतत निरपेक्ष, मूल्याधारित काम करीत राहा. तुम्हाला सुखाच्या मृगजळामागे धावावं लागणार नाही. उलटपक्षी, सुखच तुमचा पाठलाग करीत राहील. सुखासाठी जे पाठ लावत नसतात, तेच नवा विधायक बदल करण्यास कारणीभूत ठरतात. कारण हे कार्य नसतं, संचित नसतं, असतं ते एक निरपेक्ष निमित्त! जगण्याचा उपदेशित आदर्श : प्राचार्य अमरसिंह राणे

 विद्यार्थिजीवनात शिक्षणाचे महत्त्व असाधारण असतं. त्यातही जो विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिकत असतो, तेव्हा त्याला समजून घेणाच्या शिक्षकाची मोठी गरज असते. मला आठवतं की, मी इयत्ता नववीमध्ये आंतरभारती विद्यालय, कोल्हापूर येथे शिकत होतो. आमची सहल किर्लोस्करवाडी, ओगलेवाडी इथे जायची होती. सन १९६४-६५ ची गोष्ट. सहलीची फी होती. पाच रुपये. वरखर्च पाच रुपये. वर्गात शिक्षकांनी ‘कोण कोण येणार सहलीला' म्हटल्यावर सर्वांनी हात वर केले. वर्गात हात वर न करणारा मी एकटा. सर म्हणाले, 'अरे, तू का नाही?' मी म्हटलं, 'पैसे नाहीत. सर म्हणाले, “अरे, अशी संधी परत येणार नाही. मी फी भरतो. आपण सगळ्यांनी मिळून जायचं. आम्ही सहलीला जाऊन आलो. पुढे मी शिक्षक झालो. मला पावला-पावलाला मदत करणारे शिक्षक आयुष्यात लाभले. त्याची उतराई मी माझ्या विद्यार्थ्यांत करीत राहिलो. प्रा. विठ्ठल बन्ने, शेखर कासार, प्राचार्य अमरसिंह राणे, प्राचार्य बी. एम. चांडके असे काही शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य माझ्या जीवनात आले की, मी त्यांच्या पावलांवर पावले ठेवत मीही शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य झालो.
 मी एस. एस. सी. परीक्षा पास झालो. बरोबरची मुले कॉलेजला प्रवेश घेती झाली. मलाही कॉलेजला जायचं होतं; पण तशी परिस्थिती नव्हती. त्या वेळी आजच्याइतकं कॉलेज महाग नव्हतं. तरी जो काही खर्च यायचा तो देणंही मुश्किल होतं. म्हणून मी आय. टी. आय.ला प्रवेशाचा प्रयत्न केला. त्या वेळी आय. टी. आय.ला शारीरिक परीक्षा असायची. घण उचल, रोलर हलव, तरफ ढकल असं काहीबाही असायचं. मी काडी पैलवान असल्याने अर्थातच नापास झालो. एव्हाना ऑगस्ट उलटलेला. कॉलेज प्रवेश बंद झालेले. त्या वेळी मौनी विद्यापीठाची जाहिरात वाचनात आली. ग्रामीण विद्यापीठातील ग्रामभारतीची. मी अर्ज केला. प्रवेश मिळाला. सप्टेंबर महिना असेल, प्रवेशाचं पत्र मिळालं आणि मी रिमांड होमच्या आमच्या साहेबांबरोबर ट्रंक आणि वळकटी (बिछाना) घेऊन गारगोटीस गेलो. प्राचार्यांना भेटलो. प्राचार्य होते अमरसिंह राणे. ऑफिसच्या बाहेर पल्लेदार बोर्ड, गणवेशधारी शिपाई पाहन मी बुजलेला होतो. माझ्यासारखेच दोन विद्यार्थी बेळगावहून आलेले. आम्ही राणे सरांना भेटलो. ते दोन अन्य विद्यार्थी राणे सरांच्या परिचितांकडून आलेले. कॉलेज सुरू व्हायला वेळ असल्याचं कळलं. त्या वेळी गणपतीनंतर मौनी विद्यापीठातलं आमचं ग्रामभारती महाविद्यालय सुरू व्हायचं. सरांनी प्रवेश, हॉस्टेल, मेस असे सारे सोपस्कार मोठ्या आस्थेने पूर्ण करवून घेतले. अकरा वाजता आलेली आमची स्वारी. हे सारं व्हायला एक-दीड होऊन गेला. त्या वेळी हॉस्टेल, मेस सुरू व्हायची होती. गावात हॉटेल एखादं. तिथंही जेवणाची वेळ संपल्याचं कळलं. राणे सर आम्हा पाचजणांना (तीन विद्यार्थी आणि दोन पालक) घरी घेऊन गेले. त्या सर्वांमागे प्राचार्य अमरसिंह राणे यांचा जो माणुसकीचा गहिवर होता, तो आजही सुमारे पन्नास वर्षे उलटून गेली तरी माझा पिच्छा पुरवीत आहे. त्या दिवशी आम्ही इतके सारेजण अचानक जाऊनही त्यांच्या पत्नी माईंनी ज्या मायेनं आम्हा सर्वांना हसतमुखाने वरणभात, भाकरी, भाजी खिलवली त्यात जीव ओतलेला होता खरा!
 ऑक्टोबरच्या सुरुवातीस आमचं कॉलेज सुरू झालं. प्राचार्य राणे सर आम्हाला इंग्रजी शिकवीत. एच. जी. वेल्सची ‘इनव्हिजिबल मॅन' ही कादंबरी अभ्यासक्रमात लावलेली होती. आम्ही अधिकांश विद्यार्थी इंग्रजीत ‘३५ झिंदाबाद' वाले होतो. त्यांचे इंग्रजी कानांना ऐकायला बरं वाटलं तरी मेंदू काही स्वीकारायचा नाही. सर सोपं करून शिकवायचा आटापिटा करीत; पण आमच्या मर्यादा होत्या. इंग्रजीला ‘वाघिणीचे दूध' का म्हणतात, ते कॉलेजला गेल्यावर कळलं. पुढे तर मार्टिनचं व्याकरणाचं अख्खं पुस्तक १00 मार्काना आलं. सर आधी प्राचार्य, नंतर इंग्रजीचे प्राध्यापक व पुढे एफ. वाय.ला ते आमचे एन. सी. सी. ऑफिसर, कॅप्टन म्हणून आले.
 पाकिस्तान, चीनचं युद्ध नुकतंच होऊन गेलेलं होतं. एन.सी.सी.मध्ये जाण्याबद्दल सर्वच विद्यार्थी उत्सुक असत. त्या वेळी एक प्रकारची राष्ट्रीय भावना विद्यार्थ्यांत बलवत्तर होती. मी अर्ज केला; पण मेडिकलमध्ये नापास. कारण एकमेव. काडीपैलवान, पोटाला मिळायची मारामार. वजन कुठून भरणार? हॉस्टेलमधील माझ्या रूममधील अन्य तिघे सिलेक्ट. मी रिजेक्ट. ते माझ्या मनाला फार लागलं. मी रडतच सरांना भेटलो. रड्याच होतो. हळवापण तितकाच. सर मात्र कठोर. म्हणाले, रडणा-यांना आम्ही एन. सी. सी.त घेत नसतो. सेनेत रडणारे नाहीत चालत. लढणारे हवेत.' मी निराश होऊन परतायला लागलो तर थांबवून घेतलं. बेल वाजवली व शिपायाला एन. सी. सी. इन्स्ट्रक्टर गावडे यांना बोलावून घ्यायला सांगितलं. थोड्या वेळात ते आले. सरांनी त्यांना माझी सारी कहाणी कथन केली आणि म्हणाले, “याला एन. सी. सी. घेऊ या. बिस्किटं खायला घालू या. बघू या, तेवढ्यानं तरी त्याचं वजन वाढतं का?' या साच्यातून सरांचं विद्याथ्र्यांवरचं प्रेम आम्हा सर्वांच्याच लक्षात येत राहायचं.
 प्राचार्य राणे सर प्रेमळ असले तरी प्रशासनात कठोर होते. आमच्या हॉस्टेल्सवर अनेक गैरसोई असायच्या. शिक्षकांची वानवा असायची. विद्यार्थी अक्षरशः वैतागून जायचे. आम्ही दुस-या वर्षाला (एस. वाय.) गेलो तरी सुधारणेचं नाव नाही. काम संस्थेचं असलं तरी आमच्या लेखी ते संचालक, प्राचार्यांचं असायचं. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कंटाळून बेमुदत संप पुकारला. मोर्चा काढला. मौनी विद्यापीठाच्या इतिहासातील तो पहिला व पूर्ण यशस्वी संप. आम्हा विद्याथ्र्यांची मागणीच होती... ‘राणे, डोणे हटाव!' (प्राचार्य, संचालक) सरांना ते लागलं. ते राजीनामा देऊन तडकाफडकी निघून गेले. आम्हा विद्याथ्र्यांना वस्तुस्थिती नंतर कळली; पण बाण सुटलेला होता. जो बूंद से गई, वह हौज से नहीं आती?' यातूनही प्राचार्य राणे सरांचा करारीपणा माझ्या मनावर कोरला गेला आहे, याचा मला मोठा अभिमान आहे की मी सरांचा विद्यार्थी आहे.
 श्री मौनी विद्यापीठ प्राचार्य राणे सरांनी सोडलं आणि ते विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. दरम्यान बरीच वर्ष उलटून गेली होती. मी शिक्षक झालो. शिक्षक संघटनेचा कार्यकर्ता झालो. नंतर एम. ए, पीएच.डी. होऊन प्राध्यापक झालो. मधल्या काळात गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात रक्तरंजित संघर्ष झाला. माझा एक मित्र मुरलीधर देसाई... ह्याचा खून झाला. प्राचार्य डॉ. अंबादास माडगूळकरांना गारगोटी सोडावी लागली. आता शिक्षक कर्मचारीच रस्त्यावर उतरले होते. आमचे सर प्रा. श्रीपाद दाभोळकर लढ्याचं नेतृत्व करीत होते. लोकशाहीकरणाचा हा लढा यशस्वी झाला. त्याचा अभ्यास करून मी एक दीर्घ लेख लिहिला. 'शिक्षणसंस्थांचे लोकशाहीकरण तो ‘समाज प्रबोधन पत्रिका' या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झाला. प्राचार्य राणे सर चांगले वाचक असल्याने त्यांच्या तो वाचनात आला. तो यायचंही एक कारण होतं. सर्व शिक्षक संघटना, प्राध्यापक संघटनांनी आपल्या मुखपत्रांतून त्याचं धडाधड पुनर्मुद्रण केलं होतं. शिवाय मुंबई विद्यापीठात या विषयावर एक मोठं चर्चासत्र योजलं गेलं होतं. प्राचार्य राणे सरांनी माझा फोन शोधून काढून माझं मन भरून कौतुक केलं. पुढे पत्रही पाठवलं. तेव्हा ते म्हणाले होते की, 'विद्यार्थी म्हणून तुझा मला अभिमान आहे. एकदा त्यांनी याच विषयावर शिक्षकांशी मला बोलायला लावलं. ही उदारता प्राचार्य राणे सरच दाखवू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण अनाकलनीय होती. त्यांचे वडील ए. पी. राणे गारगोटीत काही काळ संचालक होते. पुढे ते शेतकरी सहकारी संघाचे संचालक सचिव झाल्याचं आठवतं. मी अप्पासाहेब जाधव यांच्याकडे जात असे. त्यांचा हिंदी व्यासंग होता. त्यातून राणे सरांच्या खानदानी घडणीची, एक प्रकारच्या सरंजामी बैठकीची कल्पना येत राहायची. त्या साच्या पार्श्वभूमीवर सरांचं करारीपण उठून दिसत असलं तरी लोकांना मानवायचं नाही हे खरं!
 सर प्राचार्य म्हणून निवृत्त झाले तरी अनेक संस्थात ते सक्रिय होते. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव वृत्तपत्र प्रशिक्षण केंद्र ते चालवत. के.आय.टी. कॉलेजचे ते चेअरमन होते. हिल रायडर्सची त्यांची भ्रमंती असायची. या दरम्यान मी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करू लागलो होतो. सर वृत्तपत्र विद्याथ्र्यांना दरवर्षी माझे एक मुक्त व्याख्यान मानव अधिकारावर योजत. ते आणि वसंतराव सप्रे मोठ्या आदराने मला बोलावत. सर माझी ओळख करून देत... पण विद्यार्थी म्हणून श्रेय घ्यायचे नाहीत. ही त्यांची ऋजुता खानदानी होती. मग मीच भाषणात सराबद्दल बोलत राहायचो.
 सरांचा मुलगा छोटू डॉक्टर झाला. त्या वेळी मी अनाथ मुलांच्या संगोपन क्षेत्रात कार्यरत होतो. अनाथ अर्भकांसाठी आम्ही 'वात्सल्य बालसदन' हे पाळणाघर सुरू केलेलं होतं. आम्हाला बालरोगतज्ज्ञांची गरज होती. छोटूला ते कुठून तरी कळालं. तो आमच्याकडे रूजू झाला आणि कोकणात जाईपर्यंत कितीतरी काळ त्यांनी मानसेवी डॉक्टर म्हणून आम्हाला साहाय्य केलं. हे असतात शिक्षक वडिलांचे संस्कार! प्राचार्य राणे सरांमध्ये उपजत सामाजिक भान होतं. आजोबा, वडील आणि नातू अशा सलग तीन पिढ्यांत समाजभान आढळणं अपवाद!
 प्राचार्य अमरसिंह राणे यांचे माझ्या जीवनावर पुरून उरणारे संस्कारण आहेत. त्यातून मी एकाच उपायाने उतराई होऊ शकतो. त्यांनी मला जे दिलं, ते मी पुढच्या पिढीस देत राहणं, दिव्याने दिवा पेटवत राहिलो तरच प्रकाशाचा अखंड झरा वाहत राहणार. काही शिक्षक जन्मजात मोठे असतात. ते उपदेश कधीच करीत नाहीत. मात्र त्यांचं जिणं, जगणं निरंतर उपदेशित असतं. प्राचार्य अमरसिंह राणे सरांचं तसं होत हे खचितच!





समाजशील कार्यकर्ते : मोहनराव लाटकर

 मोहनराव लाटकरना मी माझ्या विद्यार्थी दशेपासून पाहात आलो आहे. सन १९६३ ची गोष्ट असावी. कोल्हापुरातील राष्ट्र सेवादल, समाजवादी विचाराने प्रेरित झालेल्या काही ध्येयवादी मंडळींनी आंतरभारती शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. मी तिथे इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हा मी रिमांड होममध्ये होतो. आमचे तेथील सचिव प्रा. दादासाहेब चव्हाण यांचे स्नेही व सहकारी म्हणून सर्वप्रथम मी मोहनरावांना पाहिले.
 आंतरभारती विद्यालयास त्या वेळी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी भेट दिली होती. त्यांच्यासाठी शाळेने चहापान योजले होते. त्याची सर्व व्यवस्था मोहनरावांच्याकडे होती. चहापान आवरले नि मोहनराव आमच्याकडे आले. 'चला रे बाळांनो, तुम्हीपण खाऊन घ्या.' म्हणणाच्या मोहनरावांमध्ये मला त्या वेळी एका सालस, मातृहृदयी पालकाचे दर्शन झाले. मी आयुष्यात पहिल्यांदा वेफर्स खाल्ले ते मोहनरावांनी प्रेमाने दिलेल्या, खाऊ घातलेल्या त्या फराळाच्या वेळी. इतरही अनेक कार्यक्रमांत त्या काळात मी मोहनरावांना अनुभवलं. ते अबोल परंतु क्रियाशील कार्यकर्ता म्हणून मोठे होते. सतत पडद्यामागं राहायचं, चांगलं घडावं म्हणून आपलं नैतिक बळ सतत सकारात्मक वृत्तीनं देत राहायचं, ही यांची उपजत वृत्ती मी विद्यार्थिदशेपासून अनुभवत आलो आहे. पुढे योगायोगाने मी ‘आंतरभारती'मध्ये शिक्षक झालो. ते विश्वस्त, खजिनदार व मी शिक्षक. नंतर मी शिक्षक प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे त्यांच्याबरोबर मी एकत्र काम केलं. त्या काळात माझ्या लक्षात आलेले मोहनराव म्हणजे संस्थानिष्ठ कार्यकर्ता. मोहनराव एखाद्या संस्थेत काम करतात तेव्हा ते पूर्णपणे त्या संस्थेचे असतात. संस्थेचं सारं संयमानं सहन करण्याची पराकोटीची सहनशीलता हे मोहनरावांच्या जीवनाचं एक आगळं रसायन. त्यांच्या या स्वभावाचा लाभ अनेक कार्यकर्त्यांना ढालीसारखा, कवचकुंडलासारखा झाल्याचं मी पाहिलं आहे. मोहनरावांची ही संस्थानिष्ठा, व्यक्तिनिष्ठा नेहमीच अढळ नि अटळ राहिली आहे. त्यांच्या या निष्ठेचा फायदा अनेक संस्थांना स्थैर्य देऊन गेला. मोहनरावांसारख्या माणसात असलेली सचोटी, प्रामाणिकपणा, नैतिकता ही नेहमीच उच्च कोटीची राहिली आहे. त्यामुळे ज्या संस्थांत ते असतात, त्यांची भरभराट ठरलेली असते.
 मोहनराव म्हणजे एक अबोल, मितभाषी, ऋजू व्यक्तिमत्त्व. सभ्यता व समन्वय शिकावा मोहनरावांकडून. एकदा ते ज्या व्यक्तीला आपलं मानतात तेव्हा ते व्यक्तींच्या गुणदोषांसह तिला स्वीकारतात. आपलं मानलेल्या व्यक्ती संस्थेच्या जीवनात जेव्हा संकटं, वादळे, मतभेद निर्माण करतात तेव्हा मोहनराव खंबीर असतात. दुस-याबद्दल वाईट बोलताना मी मोहनरावांना कधी ऐकलं नाही.
 पुढे माझे स्नेही व सहकारी के. डी. कामत यांच्याबरोबर मी मोहनरावांना सारस्वत बोर्डिंगमध्ये काम करताना पाहिलं त्या वेळी हाच अनुभव. सारस्वत समाजाच्या उत्थानासाठी मोहनरावांच्या कुटुंबीयांनी परंपरेने एक मोठी त्यागाची, दानाची, वहिवाट निर्माण केली. आपली आई, ते स्वतः, त्यांच्या दिवंगत पत्नी, जावई, सारं कुटुंब नेहमी सारस्वत समाजकार्यात सक्रिय सहभागी असतं. मध्यंतरी सारस्वत बोर्डिंगच्या भाडेवाढीप्रसंगी उपोषणाचा प्रसंग आला तर मोहनरावांच्या पत्नी ज्या भीष्मप्रतिज्ञेने उपोषणात सहभागी झाल्या होत्या, ते पाहिलं की लक्षात येतं, त्या सर्वांमागे मोहनरावांचा संस्कार दडलेला होता.
 मोहनरावांचा अबोलपणा इतक्या टोकाचा की, ते स्वत:बद्दल कधीच कुणाशी काही बोलत नाहीत. कौटुंबिक पातळीवर मोहनरावांनी जे भोगलं, सोसलं त्याला तोड नाही. त्यांची स्थिती नेहमीच सँडवीचसारखी होत राहिली आहे. बाहेर आणि घरात सतत ते सोसत आले, राहिले; त्यामुळे त्यांच्या जीवनाला एखाद्या आधारवडासारखा वडीलपणा नेहमीच दिसत आला आहे. मोहनराव हे तसे दानी गृहस्थ, त्यांचं दान नेहमी सत्पात्री होत राहिलं आहे. राष्ट्रसेवा दल, साधना, आंतरभारती, सारस्वत समाज यांसाठी त्यांनी दिलेलं दान नेहमी झाकली मूठ राहिली आहे. या हाताचं दान त्या हाताला कळू न देण्याचा अप्रसिद्धपणा मोहनराव आजीवन जपत आहेत. हा दातृत्वाचा वसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. फार कमी माणसं असा वारसा नि वसा जपतात. मोहनराव त्यांतील एक होत.
 कुणाचं ऋण वागवायचं नाही, ही मोहनरावांची स्वाभाविक वृत्ती. कुणी आपणाला दहा दिले तर त्याला शतपटीन, हरत-हेनं परत करायचा रिवाज मोहनराव नेहमी पाळत आलेत. ते जे काही करतात ते भूमिगतपणे. प्रसिद्धी, पुढे-पुढे करणे यांत मोहनरावांनी कधीच स्वारस्य दाखवल्याचं आठवत नाही. त्यांना जीवनात जी पदं लाभली ती त्यांच्या सद्गुणांवर. पद मिरविण्याची त्यांची वृत्ती मला कधी दिसली नाही. अनेकदा पदांमुळे ओशाळलेले, संकोचलेले मोहनरावच मी अनुभवले. झाकलं माणिक' म्हणून राहण्याचा त्यांचा जीवनकल त्यांना सतत पद नि प्रतिष्ठा देत आला आहे.
 अशा मोहनरावांच्या नावे सारस्वत समाज वसतिगृहाच्या एका विभागाचे नामकरण होणं याला एक वेगळं सामाजिक मूल्य आहे. त्यामुळे समाजापुढे त्यांचे कार्य, कर्तृत्व, व्यक्तिमत्त्व सतत राहिलं. नव्या पिढीपुढे आज अनुकरणीय माणसं अपवादाने दिसतात. त्यात मोहनरावांचं कार्य ठळकपणे सत्शील आचरणाचा संस्कार देत राहील. कार्यकर्त्यांपुढे मोहनरावांचे नाव प्रेरणा म्हणून क्रियाशील असेल, असा विश्वास वाटतो.
 मोहनरावांना दीर्घायुष्य लाभावं ही माझी औपचारिक भावना, प्रार्थना नाही. त्यामागे समाजभल्याचा भाव आहे. अशी माणसं जितक्या अधिक संख्येने नि अधिक काळ समाजात राहतील समाज तितका वेळ निकोप राहील. आज समाजात सर्वत्र स्वार्थाचा रौरव माजला असताना मोहनराव लाटकरांचा होणारा गौरव एक नवा वस्तुपाठ कायम करील. मोहनराव लाटकर ‘सारस्वतभूषण' झाले ते त्यांच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे. ते माझ्या दृष्टीने खरे तर ‘भारतभूषण' होत. भारतीय संस्कृतीचा संयम, त्याग, क्षमा, कर्मशीलता व निष्ठा या सर्वांचा समागम, संगम म्हणजे मोहनराव लाटकर! जनसामान्यांचे कैवारी : केशवराव जगदाळे

 कोल्हापूरच्या स्वातंत्र्योत्तरकालीन राजकीय आणि सामाजिक चळवळीचा इतिहास शेतकरी कामगार पक्ष, प्रजा परिषद, राष्ट्रसेवा दल, तालीम संघ यांनी घडविला. सन १९५९ ला मी कोल्हापुरात आलो, त्या वेळी माझे वय अवघे दहा वर्षांचे होते. मी जाणता होईपर्यंत माझे वास्तव्य मंगळवार पेठेत असायचे. या काळात मी अनुभवले आहे की, कोल्हापूरच्या सन १९६० च्या घडामोडींचे केंद्र मंगळवार पेठ, शिवाजी पेठ हेच होते. कोल्हापूर गाव होतं. पेठेची संस्कृती हीच कोल्हापूरची ओळख होती. या पेठांतील अनेकांच्या शहरालगत जमिनी होत्या. घरपती गाई, म्हशी, कोंबड्या असत. टेंबलाई जत्रा, गणपती, जोतिबा यात्रा सार्वजनिक रूपात साजच्या होत. शहरावर शेतकरी कामगार पक्षाचा पगडा होता. कोल्हापूरकरांचं शेतकरी असणं हेच त्याचं प्रमुख कारण होतं. शिवाजी उद्यमनगरचा विकास झाला नि शेतकरी कामगार बनला. या शेतकरी कामगार पक्षाचे त्या वेळचे पुढारी भाई माधवराव बागल, केशवराव जगदाळे, एम. के. जाधव, आ. ग. मोहिते. तिकडे समाजवादी पक्षाचे रवींद्र सबनीस, काँग्रेसचे श्रीपतराव बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते मामासाहेब मिणचेकर, पी. बी. साळुखे, व्ही. टी. पाटील ही मंडळी विविध संस्थांचे नेतृत्व करायची. मी आर्य समाजाच्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत शिकत होतो. आमच्या शाळेचं मैदान श्रमदानातून आकार घेत होतं. त्या वेळी नगराध्यक्ष असलेले केशवराव जगदाळे आमच्याबरोबर घाम मुरेपर्यंत पहार, टिकाव, फावडे, पाटी घेऊन राबत असत. विजार, शर्ट असा साधा पोशाख, हातात पांढरा शुभ्र टर्किश नॅपकीन ही त्यांची ओळखीची खूण. ‘के. ब.' या नावानेच ते परिचित. नगराध्यक्षाची नुकतीच गाडी आलेली. ती असताना घरून नगरपालिकेत सायकलने जाणारे के. ब. जगदाळे. कोल्हापूरच्या सर्व सार्वजनिक उपक्रमांत राबणारा कार्यकर्ता म्हणून सर्वसंचारी असलेले. के. ब. जगदाळे यांना माझ्या बालपणापासून उमेदी नि उमेदवारीच्या काळापर्यंत मी जवळून पाहिलं आहे.
 त्यांचा मुलगा संभाजी आमच्याच शाळेत पण मागच्या वर्गात होता. आता तो कार्यकर्ता झाला आहे, ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच. केशवराव जगदाळे यांचा जन्म १० फेब्रुवारी, १९१६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. कळंबा, कात्यायनी परिसरात बहुधा त्यांची शेती होती. ते फारसे शिकले नाहीत. शेती करत जोडधंदा म्हणून ते घरी शिंपीकाम करीत. राजवाड्यातील दरबारी माणसांची शिवण ते करीत. राजाराम महाराजांचे पोशाख त्यांनी शिवले होते.
 तरुणपणात त्यांनी “भारत छोडो' आंदोलनात भाग घेतला. राष्ट्रसेवा दलाचे स्वयंसेवक, सैनिक म्हणून त्यांच्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाची घडण झाली. एम. एम. जोशी, ना. ग. गोरे यांचा आरंभी त्यांच्यावर पगडा होता. नंतर भाई केशवराव जेधे, तुळसीदास जाधव, उद्धवराव पाटील, भाऊसाहेब राऊत, बा. न. राजहंस प्रभृतींचा सहवास व साहसाने आकर्षित होऊन ते शेतकरी कामगार पक्षाकडे ओढले गेले. बेचाळीसाच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले तेव्हा ते १८ वर्षांचे तरुण होते. मोर्चे, सभा, धरणे, पिकेटिंगमध्ये ते नुसते सहभागीच नसत, तर आघाडीवर असायचे. १९४२ च्या लढ्यात भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली जी प्रजा परिषद झाली, त्यात दहा हजारांपेक्षा अधिक तरुण सहभागी झाले होते. गोळीबार, गिरफ्तारी, धरपकड यांच्यातून तावून-सुलाखून त्यांच्यातील कार्यकर्ता घडला. सन १९४४ साली तालीम संघाची स्थापना झाली, त्या वेळच्या संस्थापक-सदस्यंपैकी एक केशवराव जगदाळे होते. डी. एस. खांडेकर (वकील), अण्णाप्पा पाडळकर, हिंदुराव मोहिते इत्यादी मंडळींबरोबर केशवराव जगदाळे सक्रिय होते. तालीम संघाची स्थापनाच मुळात स्वातंत्र्यलढ्यात तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या इराद्याने झाली होती, हे फार कमी लोकांना माहीत असावं. लढ्यात स्त्रियांनी भाग घ्यावा म्हणून झालेल्या प्रयत्नांतून त्या वेळी विमलाबाई बागल, शकुंतलाबाई पाटील, ऊर्मिलाकाकी सबनीस, सुशीलाबाई पाटील, लीलाताई पाटील, लीलाबाई पवार, प्रभृती कार्यकर्त्या पुढे आल्या. त्या वेळी तालीम संघाने स्वयम् सेवादलाची स्थापना करून तरुण कार्यकत्र्यांची फौजच उभी केली होती. त्यात केशवराव जगदाळे यांचा पुढाकार होता. या संघात शहर व परिसरातील ६० तालमी सहभागी होत्या. या पायावर कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्ष सुरू झाला. सन १९४८ साली या पक्षाची कोल्हापुरात शाखा सुरू झाली. त्या वेळी पक्षाची स्वत:ची इमारत असलेला हा पहिला पक्ष ठरला. काँग्रेस भवनही त्या वेळी भाड्याच्या कार्यालयात होतं.
 स्वातंत्र्यानंतर आपण सन १९५0 ला प्रजासत्ताक भारताची स्थापना केली व सन १९५२ मध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे पहिले लोकप्रतिनिधी आपण निवडायचं ठरवलं. कोल्हापूर म्युनिसिपल कौन्सिल स्थापन होऊन सन १९५२ साली ज्या पहिल्या निवडणुका झाल्या, त्या केशवराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. पहिल्या तीनही निवडणुकांत शेतकरी कामगार पक्ष बहुमताने निवडून येत राहिला होता. दुस-या निवडणुकीत (१९५७५८) मध्ये तर शे. का. पक्षाने ४४ जागा जिंकून कोल्हापुरातील आपली हुकमत सिद्ध केली होती. याच काळात त्यांनी स्टैंडिंग, सुधारणा, अर्थ, इत्यादी समित्यांवर कार्य केले. सन १९६२ च्या निवडणुकीत ते सलग तिस-यांदा कौन्सिलर म्हणून निवडून आले व नगराध्यक्ष बनले.
 त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाला जमिनीची गरज होती. नगराध्यक्षपदाच्या जबाबदारीचे भान ठेवून केशवराव जगदाळे यांनी सागरमाळावरील आपली एक-दोन नव्हे तर तीस एकर जमीन दान देऊन एक अनुकरणीय आदर्श घालून दिला. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर नगरपालिकेतर्फे त्यांनी पाच लाख पंचावन्न हजारांची ग्रँट मंजूर केली. तो चेक त्यांच्याच नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांच्याच हस्ते डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. २८ सप्टेंबर, १९६३ रोजी महागावकर बंगल्यात (सध्याचे ओपल हॉटेल, शिवाजी विद्यापीठ तिथे सुरू झाले) शिवाजी विद्यापीठाचा पहिला वर्धापनदिन साजरा झाला. तेव्हा केशवराव जगदाळे ‘प्रथम नागरिक' म्हणून सन्मानाने उपस्थित होते. केशवराव जगदाळे यांच्या पुढाकारातूनच सागरमाळावर विद्यापीठाच्या उभारणीस सुरुवात झाली, ती रस्ते तयार करण्याने. शाळा-शाळांतून मुले नगरपालिकेच्या ट्रकमधून माळावर श्रमदानासाठी नेली जात. त्यात मी श्रमदान केल्याचे आठवते. शिवाजी विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभही महागावकर बंगल्यातच झाला होता. केशवराव जगदाळे स्वतः अल्पशिक्षित होते; पण शिक्षणाबद्दल त्यांना प्रचंड आस्था होती. बहुजन वर्गात शिक्षणप्रसार व्हावा म्हणून त्यांनी स्कूल बोर्डमार्फत शहरात अनेक शाळा सुरू केल्या. त्यात सिद्धार्थनगरसारख्या मागासवर्गीय वसाहतीत त्यांनी शाळा सुरू करून आपलं पुरोगामीपण सिद्ध केलं. कोल्हापुरात ब्रॉडगेज सुरू करणे, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे पहिले प्रयत्न, मागण्यांमध्ये केशवराव जगदाळे यांचा पुढाकार होता. कोल्हापूरच्या विकासाच्या पहिल्या मास्टर प्लॅन (कपूर प्लॅन) च्या राबवणुकीत जन विरोध शमवत रस्ते रुंदीकरण होताना जनसामान्यांना भरपाईची घसघशीत किंमत मिळावी म्हणून आग्रह धरण्यात केशवराव जगदाळे आघाडीवर असायचे. अंबाबाईच्या देवळाभोवतीचा रस्ता (जोतिबा रोड) बोळ होता, तो रुंद केला, मोटारीतूनही अंबाबाईला प्रदक्षिणा घालता यावी म्हणून. या सरंजामी विकासाच्या ते विरोधी होते. श्रीमंतांना सोई करण्यापेक्षा गरिबांना विकासाचा वाटा मिळावा म्हणून ते शेवटपर्यंत जनसामान्यांचे सामाजिक वकील म्हणून पुढाकार घेत राहिले.
 केशवराव जगदाळे यांनी भारत छोडो आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ती संग्राम अशा अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने कधी लाठीमाराचा प्रसाद, कधी अटक, कधी तुरुंगवास अशा दिव्यातून आपल्यातील कार्यकर्ता घडविला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर व स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यांनी स्वत:ला विकासकार्यात झोकून दिलं. शहरातील शिक्षण, आरोग्य, रस्ते, दवाखाने अशा मूलभूत सोयी करण्यात त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. सार्वजनिक संडासबांधणी, (त्या वेळी घरोघरी संडास नसत.) सार्वजनिक नळांची गल्लोगल्ली निर्मिती, प्रत्येक पेठेत पाण्याचे हौद सार्वजनिक बांधणे, शाळांच्या इमारती, दवाखाने उभारणे, मैदाने करणे अशी अनेक कामे त्यांच्या पुढाकारातून उभारली. कोंबड्यांच्या झुंजी, रेड्यांच्या टकरी, बैलगाडी शर्यती, कुस्त्यांची मैदाने (फड), तमाशा, लोकनाट्य, शाहिरी कार्यक्रम, रणजी ट्रॉफीचे क्रिकेट सामने भरविण्यातून त्यांनी लोकनिधी उभारला. त्यातून अनाथ महिलाश्रम, रिमांड होम, विद्यापीठ, इत्यादी संस्थांना त्यांनी अर्थसाहाय्य मिळवून दिल्याचा मी साक्षीदार आहे. सन १९६५ च्या दरम्यान स्वातंत्र्य मिळूनही लोक उपाशी राहतात. माणशी १२ किलो धान्य मिळालं पाहिजे, चहा स्वस्त झाला पाहिजे आणि (मटणाचे दर उतरले पाहिजेत म्हणून) जी आंदोलने झाली त्यात गोळीबार, अटकसत्र झाले. जनसामान्यांचा आक्रोश बुलंद आवाजात शासनाच्या कानांपर्यंत पोहोचविणारा हा झुंजार कार्यकर्ता. त्यांनी आयुष्यात कधी कच खाल्ली नाही. पुढे वयपरत्वे दृष्टी अधू झाली, तेव्हा गॉगल ही त्यांची ओळख झाली. तरी उन्हातान्हातून भटकत त्यांनी आपली जनसामान्यांचे कैवारी, वकील, समर्थक म्हणून आपली भूमिका लावून धरली, ती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत! त्यांची आज जन्मशताब्दी सुरू होत आहे. एका सामान्य सचोटीच्या, कार्यकर्त्यांचे स्मरण हाच आजच्या आत्मरत समाजाचे डोळे उघडण्याचा मला नामी उपाय व उतारा वाटतो. नवसाक्षरांचा नंदादीप : बाबूराव शिरसाट

 बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांचा आणि माझा परिचय झाला, त्याचा दुवा साहित्यच होता, असं मला आठवत असताना लक्षात येतं. 'बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूरच्या स्थापनेपासूनच मी त्या संस्थेशी जोडलेला आहे. रा. वा. शेवडे गुरुजी यांच्या धडपड़ी व पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली. तिला बाळसं देण्यात ज्या अनेक बाल साहित्यकारांचं योगदान आहे, त्यांत सर्वश्री. वसंतराव निगवेकर, त्यांचे बंधू मुकुंदराव निगवेकर, माझे शिक्षक शशिकांत महाडेश्वर, मित्र श्याम कुरळे, गोविंद गोडबोले, श्रीमती रजनी हिरळीकर, विद्यार्थीनी नीलम माणगावे अशी अनेक नावे सांगता येतील. बाबूराव शिरसाट यांचे नाव याच पंक्तीत घ्यावे लागेल. त्यांचा नि माझा विशेष परिचय झाला तो गोविंद गोडबोले यांच्यामुळे; पण मैत्रीस दृढता लाभली, तिचा पैस विस्तारत गेला याचं श्रेय मात्र बाबूराव शिरसाट यांच्या उपजत मनुष्यसंग्रही वृत्तीस आणि त्यांच्या समाजहितैषी कळवळ्या अवलियास द्यावे लागेल.

 जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यास विविध पदांवर बाबूराव कार्य करीत राहिले खरे; पण त्यांचा पिंड म्हणाल तर सामाजिक कार्यकर्त्यांचा. त्यांचं शिक्षण हे खरं तर त्यांना शिक्षक करू इच्छिणारं. म्हणजे ते हिंदीत एम. ए. असल्याने भाषा व साहित्याची त्यांची अभिरुची लेखन-वाचनास पूरक ठरली. ते बी. एड्. झाल्याने त्यांना शिकवायचा ओनामा माहीत होता. त्यांनी आरोग्यशिक्षणाची पदविका कलकत्त्यातून (आत्ताचे कोलकत्ता) संपादन केली. त्याचा उपयोग त्यांना रोजच्या नोकरीत झाला. नोकरी! तीपण शासकीय. सरकारी नोकरी म्हणजे पाट्या टाकायचा उद्योग, असा सर्वसाधारण समज; पण बाबूरावांनी तो आपल्या समर्पित सेवेने चुकीचा ठरविला. आपल्यातील लेखनकौशल्याचा वापर करून त्यांनी आरोग्यशिक्षण समृद्ध करणारं लेखन केलं. ‘आरोग्याच्या नव्या घोषणा’, ‘एक कळी उमलताना', ‘गोष्टीतून आरोग्य शिक्षण'सारखी पुस्तके त्यांनी मला मागे कधीतरी मोठ्या प्रेमानं भेट म्हणून दिली होती. ती वाचताना या माणसाची आरोग्याची जाण आणि जाणीव प्रकर्षाने लक्षात आली होती. त्यांचे ‘गोष्टीतून आरोग्यशिक्षण' पुस्तक आरोग्य साक्षरता वाढविणारे ठरले. बाबूराव शिरसाट यांचं लेखन विविध वय नि स्तरांत विभागलेल्या नवसाक्षरांसाठी होत राहिलं आहे. बालक व प्रौढ साक्षर हे त्यांच्या लेखनाचे लक्ष्यगट होत.
 बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या लेखनाचा प्रारंभ वृत्तपत्रीय लेखनाने झाला. दैनिक पुढारी, सकाळच्या ‘बाल जगत' सदरात त्यांच्या कथा, कविता, बडबडगीते प्रकाशित होत राहिली. पुढे त्यांचीच व अन्य लेखनाची पुस्तके झाली. ‘संस्कार कथा', 'संस्कार गाणी' अशा शीर्षकांतूनच त्यांच्या लेखनाचे प्रयोजन स्पष्ट होते. मध्ये ‘बडबडगीते' नावाचं बालकवितांचं पुस्तक माझ्या हाती आलं होतं. बालगीतांचा मी लेखनासाठी म्हणून धांडोळा घेत होतो, तर त्या प्रातिनिधिक कवितासंग्रहात बाबूराव शिरसाटांच्या एक-दोन नव्हे तर चक्क पन्नास कविता आढळल्याचे मला आठवते. त्यांच्या बालकविता मी अधे-मधे केव्हातरी शिळोपा म्हणून वाचल्या होत्या, तेव्हा असं लक्षात आलं की बाबूरावांचं ‘इसापनीती', 'पंचतंत्र' चक्क काव्यातून प्रकटलं होतं. ही त्यांची शैली त्यांना प्रतिभावान कवी ठरविण्यास पुरेशी आहे. सह्याद्री' या दूरदर्शन वाहिनीच्या सुरुवातीच्या दिवसांत आयोजित कविसंमेलनात बाबूराव शिरसाटांची छबी व आवाज पाहिल्या-ऐकल्याचेही आठवते. दरदर्शनप्रमाणेच बाबूराव आकाशवाणीवरही आधे-मधे हजेरी लावत असतात. आकाशवाणीवरून ‘अवतीभोवती' असा एक कार्यक्रम सादर व्हायचा; त्यात बाबूराव शिरसाटांचं संवादलेखन असायचं. ते ऐकताना या माणसाचं समाजनिरीक्षण सुक्ष्म असल्याचं जाणवायचं. शहाणा गाव' हे त्यांचं प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेलं पुस्तक त्यांना समाजशिक्षक सिद्ध करतं. ‘बिचारे झाड' लिहन बाबूरावांनी पर्यावरणीय साक्षरता विस्तारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते.
 या नि अशा अनेक धडपडींतून लक्षात येतं की, बाबूराव शिरसाट यांच्यामध्ये एक चळवळ्या, कळकळ्या कार्यकत्र्यांचं अस्वस्थपण सतत बेचैन असतं. त्यातून ते कधी साहित्य रचतात, तर कधी समाजोपयोगी उपक्रम राबवितात. बाबूराव शिरसाट हे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेचे रहिवासी. मी त्या भागात शिकलो असल्याने माझे अनेक मित्र त्या भागात आहेत. माझी भ्रमंतीही राधानगरी परिसरात असते. राधानगरी पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यामार्फत त्यांनी पंचायत समितीच्या कर्मचा-यांना आर्थिक साहाय्याचं छत्र उभारलं. आपल्या जन्मगावी त्यांनी ‘ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ' स्थापन करून ग्रामीण भागातील शिक्षणवंचित बालक, बालिकांसाठी शाळा सुरू केल्या. राधानगरी तालुक्यात साहित्यजागर घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘मायबोली साहित्य प्रतिष्ठान'ची स्थापना केली. तिच्यामार्फत साहित्य पुरस्कार, साहित्य संमेलन, साहित्य प्रकाशन समारंभ घडवून आणतात. या सर्वांतून त्यांच्यातील कुशल संघटक डोकावतो. ते अनेक सांस्कृतिक संस्थांचे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्याचा डिंमडिम दूर कोकणापर्यंत पसरलेला आहे.
 मध्यंतरी मी एका ग्रंथालयाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. त्या संस्थेच्या एका प्रकल्पासाठी आम्हाला आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. त्यांच्या कार्यालयातूनच ते आम्हाला मिळायचे होते. मी पाठपुराव्यासाठी एकदा जिल्हा परिषदेत गेलो असता बाबूरावांची गाठ पडली. त्यांनी काम समजावून घेतले. ते केले, इतकेच नव्हे तर घरपोहोच केले. या सर्वातूनही त्यांच्यातील कळवळा कार्यकर्ता मी अनुभवला आहे. आपल्या हाती असलेला अधिकार अथवा सत्ता जी माणसं सेवेचे साधन वा माध्यम मानून, बनवून वापरतात; ती खरी समाजशील माणसं! बाबूराव अशा पंक्तीतील गृहस्थ होत!
 बाबूराव शिरसाट यांना माणसं जोडण्याचा नि माणसांचा गोफ विणण्याचा छंद आहे. त्यांचं नि संवेदनशील माणसांचं सूत जमतं. आपला मानलेला माणूस, त्याच्या गुणांचा वापर समाजास व्हावा म्हणून ते पदरमोड करून लष्कराच्या भाकच्या थापत असतात. यातून त्यांनी माणसांचे मोहोळ जपलंजोपासलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कन्येचं लग्न होतं. त्याची गर्दी बाबूरावांच्या दर्दी माणूसछंदाची नांदी होती.
 बाबूराव शिरसाट हे समाजसंवेदी तसेच व्यक्तिलक्षी गृहस्थ! एकदा त्यांनी एखाद्यास आपलं मानलं की ते त्या माणसाभोवती अक्षरशः पिंगा घालत राहतात. हे त्यांचं प्रेम निरपेक्ष असतं. कधी-कधी त्यांना माणसं आपणास वापरतात नि विसरतात, याचं शल्य डाचत राहतं. बाबूरावांच्या लेखी ती अक्षम्य प्रतारणा असते. मग ते मूग गिळून गप्प राहतात. गरळ ओकायचा त्यांचा स्वभाव नाही; पण मग ते गोंडा घोळत राहात नाहीत. अबोल एकांतातून ते आपली मूक नाराजी व्यक्त करीत राहतात. ती त्यांची खानदानी अदाकारी त्यांच्या सुसंस्कृत व्यवहाराची नजाकत असते. असे आमचे मित्र, साहित्यिक, समाजसेवक बाबूराव शिरसाट! निवृत्तीच्या निमित्ताने म्हणून त्यांचा होणारा गौरव म्हणजे त्यांच्या जीवन व कार्याचे समाजाने केलेले कृतज्ञ स्मरण! त्यांच्या समाजोपकारी ऋणातून मुक्त होण्याचा तो मुक्ती सोहळा! त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा! बाबूरावांना दीर्घायुष्य लाभो असं शुभचिंतन करण्यात माझा सामाजिक स्वार्थ दडला आहे. त्यामुळे समाजाची दीर्घकाळ सेवा त्यांच्या हातून घडत राहावी, अशी अपेक्षा त्यामागे आहे.

जीवेत शरदः शतम्।

यशवंत वारसासंवर्धक : मोहनराव डकरे

 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण साहेब नेता, संघटक, राजकारणी म्हणून सर्वपरिचित आहेत; पण त्यांची खरी ओळख समाजशील, मनुष्यसंग्रही व सुसंस्कृत माणूस म्हणून अधिक गडद आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वक्ता, वाचक, साहित्यिक, आस्वादक म्हणून लाभलेली किनार, झालर त्यांच्या जीवन, कार्य, विचारांना अशा उंचीवर नेऊन ठेवते की, मग अन्यांना ती आपला पाईक, चाहता, भक्त, कार्यकर्ता, अनुयायी बनवून त्यांचंही जीवन आपणासारखं करून टाकते. ‘आपणा सारिखे करूनि सोडावे सकळजन' ही संतोक्ती ज्याच्या जीवनावर सावली म्हणून राहिली, असे मोहनराव डकरे मला पहिल्यांदा भेटले ते कराड नगर परिषदेच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने. ते कराडच्या यशवंतराव प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे सचिव व सौ. वेणूताई स्मारकाचे व्यवस्थापक म्हणून त्यांची झालेली माझी पहिली ओळख मला बरंच सांगून गेली.
 यशवंतराव चव्हाण यांना आराध्य मानणाच्या लोकांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही; पण निरपेक्ष भक्ती, लाभाविण प्रीती करणारी माणसं विरळ अशा विरळ नि अपवाद असणाच्या माणसांत वरच्या क्रमांकावर नाव घ्यावं लागेल ते मोहनराव डकरे यांचं. मी असं का म्हणतो त्यामागे माझं स्वत:चं असं निरीक्षण आहे. त्यांनी विरंगुळा' नि सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहातील वारसा ज्या आत्मीयतेने जपला आहे, त्यास तोड नाही. हे कार्य ते नोकरी न मानता चाकरी म्हणून करतात. चाकरी केवळ स्वामिनिष्ठेनेच शक्य असते. ते


भेटणाच्या प्रत्येक व्यक्तीस आपल्याला यशवंतरावमय बनण्याचीच त्यांची किमया नि प्रचिती दिसते. ज्या अकृत्रिमपणे नि भक्तिभावाने ते सारं दाखवतात, देतात नि सांगत असतात, त्यातून त्यांनी संगतीत कमावलेलं पाथेय मूठमूठभर वाहत असल्याची प्रचिती येते. ही भिक्षा न आटणा-या झप्याप्रमाणे अखंड अन्नछत्र म्हणून सर्वांना मिळत राहते, तरी पुरून उरतेच.
 यशवंतराव चव्हाण यांना बाळनाथ बुवांच्या मठात कळंबे गुरुजींचं सान्निध्य लाभलं आणि सत्शीलतेची पायाभरणी झाली. हा सहवास यशवंतरावांचे बंधू गणपतराव चव्हाण यांनाही लाभल्याचं सांगितलं जातं. आदरणीय यशवंतराव चव्हाण कराडच्या ज्या शुक्रवार पेठेत संस्कारित होत वाढले, त्याच वातावरणात आणि परिसरामध्ये मोहनराव डकरे लहानाचे मोठे झाले. परिसासंगे सोने म्हणा अथवा मातीसंगे सुगंध; मोहनरावांचं कळतं वय सेवादलाच्या संस्कारांनी ध्येयवादी झालं. राष्ट्रीय विचारांचं बाळकडू त्यांना इथंच लाभलं नि आयुष्य उज्ज्वल झालं. त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सन १९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन दाखविली होती. या निमित्ताने त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या प्रथम सदिच्छा लाभल्या. सदिच्छांचं हे छत्र त्यांना आयुष्यभर लाभलं.
 मोहनराव डकरे सन १९५१ मध्ये सातवी परीक्षा उत्तीर्ण झाले. सन १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुका यशवंतराव चव्हाण यांनी जिंकल्या होत्या; पण भारताच्या स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक म्हणून तिचं महत्त्व होतं. पोरवयातील मोहनराव स्वकीय बांधवांच्या विरुद्ध भूमिका घेऊन यशवंतरावांच्या पाठीशी उभे राहिले. या निवडणुकीत यशवंतराव अल्पमताने निवडून आले; पण त्या अल्पमतीतील सिंहाचा वाटा मोहनरावांच्या निष्ठापूर्ण प्रचाराचा होता. त्यांची ओळख ती काय एका कार्यकर्त्यांची... अनेकांतला एक इतकीच; पण व्यवच्छेदकता होती ती निष्ठा आणि भक्तीची! त्या कसोटीवर मोहनराव ‘एकमेवादित्य'च होते. शाळकरी वयात वृत्तपत्रे टाकून त्यांनी आपल्या शिक्षणाची पायवाट मळली. या वाटेवर वि. स. खांडेकर, ह. ना. आपटे, नाथ माधव, प्रभृतींचं साहित्य भेटलं. त्यांच्या मनाची सामाजिक मशागत झाली. ते सन १९५५ ला मॅट्रिक झाले. एक हशार विद्यार्थी म्हणून महाविद्यालयीन शिक्षणाचा ध्यास लागणं स्वाभाविकच म्हणावं लागेल.
 पण घरची बिकट आर्थिक परिस्थिती अशी होती की, शिक्षणाच्या स्वप्नाऐवजी त्यांना रोजंदारीवर खपायचं सत्य सहन करावं लागलं. प्रतिकूल परिस्थिती माणसास जिद्द देते, हे मोहनरावांना एव्हाना कळून चुकलं होतं. त्यांनी हिंमत न हरता संघर्ष सुरू ठेवला. ते शिक्षक झाले; पण शिक्षणाची महत्त्वाकांक्षा काही त्यांनी सोडलेली नव्हती. सन १९६० मध्ये भिवंडी येथे त्यांची यशवंतराव चव्हाणांशी गाठभेट झाली नि मोहनरावांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ते कराडमध्ये सन १९६१ मध्ये एस.टी.सी. झाले. त्या पदवीमुळे प्राथमिक शाळेपेक्षा वरच्या पातळीवर म्हणजे माध्यमिक शाळेत ते शिक्षक झाले. माध्यमिक शाळा शिक्षक म्हणून त्यांनी ओगलेवाडीजवळील सदाशिवगडमध्ये सन १९६१ ते १९६४ पर्यंत नोकरी केली. नंतर ते दोन वर्षे वहागावाला होते. सन १९६६ पासून ते आटकेच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक झाले. नोकरीतही त्यांचा आलेख सतत चढताच राहिला.
 त्या काळात लोकवर्गणीतून शाळेसाठी तीन मजली इमारत उभारून त्यांनी आपला वेगळा ठसा जनमानसात उमटविला. मा. नामदार शरद पवार यांच्या हस्ते त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा १९९० मध्ये मोठ्या जनसहभागाने व जनता जनार्दनाच्या साक्षीने मोठ्या उत्साहात, दिमाखाने संपन्न झाला. त्यातून ग्रामीण शिक्षण निरंतर होण्यास मोठे साहाय्य झाले. ते कायमस्वरूपी पुढे ते बहि:स्थ परीक्षा देत, बी. ए. झाले. शिक्षक म्हणून स्वतः ते विकसित होत राहिले. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मोहनराव स्वत:स गुणवत्तेच्या कसोटीवर खरे उतरवीत राहिले. त्यातून शिक्षक म्हणून जनमानसात असलेली त्यांची प्रतिमा सतत उंचावत नि विकसित होत राहिली.
 मोहनराव डकरे यांचे शैक्षणिक योगदान लक्षात घेऊन सन १९९० ला त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन महाराष्ट्र शासनाने गौरविलेच; शिवाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करून त्यांचा बहमानही केला. सन १९९५ ला ते सेवेतून निवृत्त झाले; पण तत्पूर्वी विविध संस्था, संघटना, विद्यार्थी यांनी त्यांचा गौरव करून त्यांच्या कार्य व समर्पणाप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केला.
 त्यांच्या सेवाकाळात मोहनराव डकरे यांना यशवंतराव चव्हाण यांचा वेळोवेळी सहवास लाभत गेला. कधी सहल, कधी निवास यांतून आतिथ्यही लाभलं. ही जवळीक, आत्मीयता मोहनरावांना वेळोवेळी सुखावत तर राहिलीच पण त्यातून मोहनरावांच्या मनातील यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित व दृढमूल होत राहिला. या सर्वांतून जगण्याचा आनंद कलेकलेने वाढत असतानाच त्यांच्या धर्मपत्नीस कॅन्सर झाला नि त्यात ती दगावली. मोहनरावांना कोडाचा विकार जडला. हृदयविकाराचा झटका खावा लागला; पण मोहनराव डकरे हे जीवनाच्या प्रत्येक सत्त्वपरीक्षेत पुरून उरले. त्यात त्यांची विजिगीषू वृत्ती दिसून येते. आज ते सान्याला मागे सारत मुले, सुना, नातवंडे यांत वानप्रस्थ सुख अनुभवत आहेत. परंतु मोहनराव डकरे कधी समाजसंन्यास घेऊन टाळकुटं आयुष्य जगतील, असं मला वाटत नाही. आजघडीला त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला देऊ केलं आहे. आपण ज्या वटवृक्षाच्या सावलीत वाढलो, तो कल्पवृक्ष होऊन नव्या पिढीचा दीपस्तंभ व्हावा म्हणून ते कराडच्या ‘विरंगुळा'मध्ये अविश्रांतपणे यशवंतराव चव्हाण तथा त्यांच्या सुविद्य पत्नी वेणूताई चव्हाण यांचं जीवनसंचित जपत एखाद्या दक्ष नागाच्या जागरूकतेने नागमणी जपत डोलत, झुलत उत्तरायुष्य सत्कारणी लावीत आहेत. तीच त्यांच्या जीवनाची कृतार्थता बनली आहे.
 मोहनराव डकरे आज ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना लाभलेल्या सहस्त्रचंद्रदर्शन योगाचा आनंद माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना होणे स्वाभाविक आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावेच; पण त्यापेक्षा ते यशवंतराव चव्हाण यांच्या ऋणातून उतराईचा जो यज्ञ करीत आहेत, ज्या समाजसमीधा ते वाहत आहेत, त्या अनवरत चालू राहण्यासाठी त्यांचं दीर्घायुष्य ही समाजाची गरज आहे.
 आज आपण सर्वजण ज्या एकविसाव्या शतकात जगत आहोत, ते जग भौतिकाकडून अभिभौतिकाकडे वाटचाल करीत आहे. भौतिक म्हणजे सर्वस्व वाटू लागले. त्या काळाची स्वत:ची अशी एक अभिभौतिक गरज आहे, ती म्हणजे माणसाचं जीवनमूल्य! वस्तूला किंमत असते. जीवनाचं मोल नि मूल्य असतं. ते परहिताय जगण्यातून श्रीवर्धित होत राहतं. सामूहिक जीवनविकासाचा ध्यास हा आपल्या पूर्वपिढ्यांनी जपला, जोपासला होता. यशवंतराव चव्हाण अशा पिढीचे शिलेदार होते, ज्यांना सामाजिक बांधीलकीत स्वारस्य होतं. त्यांचे ग्रंथ, पत्रव्यवहार, लेखन, आदी वारशातून काय मिळतं? असं विचाराल तर त्याचं उत्तर समाजशील जीवनसंस्कृती असंच द्यावं लागेल. मोहनराव डकरे तो ठेवा जपत असल्यानं त्यांचं जगणं महत्त्वाचं वाटतं. वि. स. खांडेकरांचं साहित्य वाचत यशवंतराव चव्हाण त्यांची पिढी समाजास जबाबदार घडली. त्या पिढीनं समाजऋण सर्वतोपरी मानत जीवन कंठलं. त्याला विचारमूल्य, आचरणाची जोड होती. आज त्याचा सर्वत्र दुष्काळ दिसतो आहे. अशा अवकाळी युगात विचार, वसा नि वारसा सुरक्षित राहण्यासाठी वर्तमान पिढीवर जतन साक्षरतेचा संस्कार आवश्यकच नाही, तर अनिवार्य झाला आहे. अशा काळात मोहनराव डकरे पूर्वपिढीचं संचित अमृतकुंभ मानून जपत आहेत.
 सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याप्रीत्यर्थ शुभचिंतन!



सिद्ध संकल्पक : प्राचार्य मधुकर फरताडे

 प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांचं नि माझं शेवटचं संभाषण त्यांच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी झाल्याचं चांगलं आठवतं. ती त्यांची नि माझी शेवटची मौखिक भेट. मी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयाच्या उभारणीच्या कामासाठी म्हणून बार्शीला येत होतो. माझं सकाळी १० वाजता येणं अपेक्षित होतं. ड्रायव्हर उशिरा आल्यामुळे प्रवास उशिरा सुरू झाला. येणंही लांबलं. माझी वाट पाहत तिष्ठत राहिलेल्या फरताडे सरांचा फोन वाजला. त्या वेळी मी शेटफळ-कुडूवाडीजवळ होतो. ‘सर, तुमची तासभर वाट पाहिली. मला प्रवासाला निघायचं आहे. परवानगी द्या. पुढच्या वेळी भेटू. तुमची कामं लक्षात आहेत. झाली म्हणून समजा.' पुढची भेट त्यांच्या अनपेक्षित अपघाती निधनाने जिवंतपणी काही होऊ शकली नाही. मृत्यूनंतरही त्यांचं शव मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासभर माझ्यासाठी तिष्ठत होतं. असं का व्हावं? माणसं जिवंतपणी असो वा मृत्यूनंतरही एकमेकांशी तिष्ठत वाट का पाहतात? त्यांचं एकच कारण असतं, परस्परांत निर्माण झालेले ऋणानुबंध! एकमेकांचे निर्माण झालेलं सुहृद नि अकृत्रिम मित्रत्व!!!
{{gap}]प्राचार्य फरताडे सरांचे नि माझे संबंध कामातून निर्माण झालेले. ती सभा मला चांगली आठवते. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने मला सन २०१२ साली 'कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे सामाजिक कार्य पुरस्कार' दिल्यानंतर ती रक्कम व माझे काही पैसे घालून संस्थेस परत करीत मी इच्छा व्यक्त केली होती की, ‘इथं मामांच्या कार्याचं प्रेरक स्मारक व्हावं. त्याप्रमाणे



संस्थेने स्मारक योजना करून ती माझ्यापुढे सादर करायची म्हणून मला चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. सन २०१३-१४ मध्ये केव्हातरी संस्थेनं एका कलाकाराकडून काही चित्रं काढून घेतली होती. त्यांची उठावचित्रे (म्युरल्स) तयार केली जायची होती. त्यांचं प्रदर्शन म्हणजे स्मारक अशी ती योजना होती. ती समजून घेऊन मी संस्थेस स्मारकाची कल्पना विशद केली. ती सर्वांना आवडली. खर्चिक असून, संस्थेची आर्थिक स्थिती नसतानाही संस्थेने वस्तुसंग्रहालयाचा संकल्प जाहीर केला. त्यात सकारात्मक भूमिका निभावण्यात डॉ. बी. वाय. यादव यांच्याबरोबर नंदन जगदाळे नि प्राचार्य डॉ. फरताडे आघाडीवर होते. सभा संपताच सर माझ्याजवळ आले नि म्हणाले, “तुमच्या कल्पनेतलंच स्मारक करायचं.' ती त्यांची नि माझी पहिली गळाभेट, इतर सर्व सर्वश्री प्राचार्य व. न. इंगळे, प्राचार्य चंद्रकांत मोरे, बाबा जगदाळे, प्रभृती होतेच; पण ज्याला सक्रिय पुढाकार म्हणता येईल, तो संस्थेइतकाच प्राचार्य फरताडे सरांचा होता.
 सभा संपताच प्राचार्य मधुकर फरताडे मला सर्वांसह आज ग्रंथालयाच्या ज्या इमारतीत वस्तुसंग्रहालय साकारले आहे, तिथे घेऊन गेले. संस्थेच्या नि सरांच्या योजनेनुसार एका छोट्या खोलीत स्मारक करायची कल्पना होती. त्यासाठी संस्थेने नि सरांनी ग्रंथालयाच्या पहिल्या मजल्यावर छोटी जागा मुक्रर केलेली होती. ती दाखविली. मला तर त्याच्या चौपट-पाचपट जागा अपेक्षित होती. ती होती, पण तिथे मूळ योजनेबरहुकूम यु.जी.सी. मान्यतेनं कॉम्प्युटर लॅब, ई-रीडिंग, टीचर्स स्टडी रूम असं काहीतरी नियोजन होतं. ते असताना प्राचार्य फरताडे सरांनी मागेल तितकी जागा देण्याची उदारता दाखविली. "Well beginning is half done' असं इंग्रजी सुभाषित आहे. त्याची प्रचिती देणारी ही उदारता मी कधीच विसरू शकणार नाही.
 आज त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मी त्या उदारतेचा मागोवा घेतो आहे आणि एकेक गोष्टीचा मला उलगडा होतो आहे. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयासाठी प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांचा सततचा कोरा चेक का मिळत गेला? याचा शोध घेताना लक्षात आलं की, त्यांची घडण ही कर्मवीर मामांच्या संस्कार-सावलीत झाली आहे. मधुकर फरताडे बी. एस्सी. (प्राणिशास्त्र) पदवी घेऊन उत्तीर्ण झाले, ते श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीमधूनच. सन १९७५ मध्ये बी.एस.सी. होऊन एम.एस्सी. करण्यासाठी म्हणून ते शिवाजी विद्यापीठात कोल्हापुरला गेले. सन १९७७ ला ते एम.एससी. झाले नि परत बार्शीला बी. एड्. करण्यासाठी म्हणून आले. सन १९७८ मध्ये ते बी. एड्. झाले हा काळ त्यांच्या जीवनातील अत्यंत संघर्षाचा नि हलाखीचा होता. ते तसे मूळचे सटवाईवाडीसारख्या छोट्या गावातील हे गाव तेरखेडा पोस्टाच्या पंचक्रोशीतील. वाशी तालुका, जिल्हा उस्मानाबादमधलं हे खेडं. घरची गरिबी. शिक्षण घेणं दिव्यच होतं. तशातून ते केवळ परिस्थितीची जाण म्हणून शिकत राहिले. सन १९७० च्या दरम्यान ते औरंगाबाद बोर्डातून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना ५०टक्के गुण मिळवणं मोठं कष्टाचं गेलं होतं; पण परिस्थितीशी मुकाबला करायचा, शिकलो तरच जगता येईल असं भान आलेल्या या तरुणानं मग मागे वळून पाहिलंच नाही. पदवी परीक्षेत प्रथम वर्ग मिळविला नि पुढे तो कायम टिकविला. जे करायचं ते ‘फर्स्ट क्लास' असं त्यानं बहधा मनाशी ठाणलं होतं; म्हणून पुढील सर्व परीक्षांत ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत गेले. लौकिक अर्थाने ते कुशाग्र बुद्धीचे नव्हते; पण कष्टसाध्य यशावर त्यांचा विश्वास होता. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्कारांचं बाळकडू प्यायलेला हा तरुण त्यांच्याच संस्थेत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून रुजू झाला. एम. एस्सी. बी.एड. अशी पात्रता पदरी होती. तसे ते वरिष्ठ महाविद्यालयास शिकविण्यास पात्र होते; पण त्या वेळी त्यांच्या विषयाची जागा नजीकच्या भविष्यात निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती.
 विकासाचं वारू कानांत भरलेला तरुण प्रा. मधुकर फरताडे; त्यांनी रयत शिक्षण संस्थेत अर्ज केला. केवळ स्वत:च्या शैक्षणिक पात्रतेवर ते 'रयत'मध्ये दाखल झाले. पंढरपूर, मंचर, कोपरगाव अशा ठिकाणी बदल्या होत राहिल्या. या त्रिविध ठिकाणी काम करीत, कार्यानुभव घेत, त्यांनी स्वत:ला कुशल प्रशासक सिद्ध केला. ते ज्या महाविद्यालयात गेले, तिथे विद्यार्थी वर्गात त्यांनी आपल्या कार्य, कर्तृत्व व अध्यापनाने दरारा निर्माण केला. मी मध्यंतरी कोपरगावला व्याख्यानासाठी गेलो होतो. काही प्राध्यापक भेटले. ते डॉ. फरताडे सरांचे विद्यार्थी निघाले. गप्पांच्या ओघात विद्यार्थ्यांकडून त्यांचं व्यक्तिमत्त्व समजलं. तो विद्यार्थी म्हणाला, “सर म्हणजे टेरर होते; पण तितकेच प्रेमळ, फणसासारखे होते. बाहेरून ओबडधोबड. प्रसंगी काटेरी बोलणार; पण वेळ आली तर जीवपण देणार. त्यांचा गर ज्याला सापडला तो त्यांचा जिगर होणार.' मला त्यांचा हा गर सापडला तो स्मृतिसंग्रहालयाच्या कामात नि ते माझे जिगर झाले.
 ते माझे जिगर व्हायचं आणखी एक गुपित होतं. मी प्राचार्य म्हणून काम करून निवृत्त झालो होतो. प्राचार्यांचं सुखदु:ख प्राचार्यालाच माहीत. प्राचार्यांची स्थिती ब-याचदा मृदंगासारखी असते. प्राध्यापक व संस्था दोन्हीकडून त्याला थपडा बसत असतात. तरी त्याला कॉलेजचा नाद, नूर टिकवायचा असतो. इथं संग्रहालयाची उभारणी करताना मला संस्था व प्राचार्य दोघांना घेऊन मार्ग काढायला लागत होता; पण उभय पक्षांची भूमिका सकारात्मक असायची. प्राचार्य फरताडे यांची गाडी कायमटॉप गिअरवर तर डॉ. यादवांची थर्ड गिअरवर. उलटं असायला हवं होतं; पण सुलट पट होता. संस्था कासरा ताणत असायची. प्राचार्य फरताडे यांना कासच्याला ढील हवी असायची. ते 'डिल' मी करीत राहायचो.
 प्राचार्य फरताडे सरांच्या कॉलेजचा विकासरथ त्यांना ऐंशीने पळवायचा होता. त्यांना गाडी चाळीसनेच चालवावी लागायची. त्यांची मोठी तगमग असायची. आतल्या आत ते चडफडत राहायचे; पण विकासावरची आपली ठोकलेली मांड त्यांनी कधी ढिली पडू दिली नाही. ते कुशल प्रशासक होते. टास्क मास्टर होते. योजलं की झालं पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो, आपले सहकारी कुरकुरत असतील, तर आपण आपलं कार्य करतो असं समजायचं. प्राचार्य फरताडे सरांचे सहकारी नाराज नव्हते; पण तक्रारीचा सूर असायचा. कामाची पण सवय, ध्यास असावा लागतो. प्राचार्य फरताडे सरांना आपलं 'ए' ग्रेड कॉलेज ‘इन्स्टिट्यूट ऑफ पोटेंशियल' व्हावंसं वाटायचं. ते सतत धडपडत असायचे. एकदा मी कोणत्या तरी क्षणी म्हटलं की हे विद्यापीठ व्हायला हवं. झालं, त्यांचं स्वप्न सुरू. असा हा स्वप्नामागे धावणारा शिक्षणप्रेमी होता. त्याला अपयश माहीत नव्हतं. खरं तर अपयशाशी वैर घेऊनच ते जन्मले होते. हे शक्य असतं त्याच माणसाला. ज्याच्या आत खोलवर काही करावं, घडावं अशी ऊर्जा असते नि ध्यासही! प्राचार्य मधुकर फरताडे असे ध्यासमग्न नि कार्यतत्पर प्राचार्य होते. रडणारे, रडगाणे गाणारे त्यांच्या आसपासही फिरकायचे नाहीत. भारदस्त छातीवर त्यांनी ल्यालेलं जाकीट त्यांना शोभायचं, ते त्यांच्या निधड्या कार्य-कर्तृत्वामुळे!
 करवंदीचे काटे, खडकाचा राकटपणा, आवाजातील खर्ज घेऊन आलेले प्राचार्य फरताडे यांना संगीत, गीत-गायन, भजन, शास्त्रोक्त रागदारी यांची जाण होती. त्यात त्यांना गती होती असं सांगितलं तर प्रथमदर्शनी कुणाचा विश्वास बसणार नाही; पण सुगम संगीत, भजन, रागदारीमध्ये सर्वांत ज्यांनी त्यांचा लागलेला ‘सा' ऐकला त्यांनाच त्यांच्या संगीताची हुकमत समजणार. मराठमोळ्या माणसाच्या गळ्यात न शोभणारा त्यांचा पंचम मी ऐकला आहे. हे संगीत त्यांनी कुठल्या क्लास, क्लबात मिळवलं नव्हतं. ते आलं होतं गावकुसाच्या द-याखो-यांत ऐकलेल्या धनगरी ओव्या, भारुडे, गावच्या देवळातील मनमुराद गाणाच्या भक्तांच्या अनवट मैफिली-फडांतून उमललेला तो एक सहज प्रतिध्वनी होता. त्यांच्या कॉलेजातील संगीत विभाग त्यांच्या रोजीरोटीच्या प्राणिशास्त्रापेक्षा त्यांना प्राणप्रिय होता असे मी ऐकून आहे.
 प्राचार्य डॉ. मधुकर फरताडेंच्या मनात कॉलेज, संस्था, समाज, विद्यार्थी यांच्याबद्दल अनेक स्वप्नं होती. ती स्वप्न उराशी कवटाळून ते माणसांचा गोफ गुंफत होते. माणसांची माळ, त्यात मणी ओवत असतानाच ती तुटली. त्या स्वप्नभंगाचं शल्य समाजव्याप्त होतं. म्हणून त्यांना निरोप द्यायला अख्खी बार्शी लोटली होती. बार्शीत अशी गर्दी मामांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यानी जमवली. 'सा' रंगात येण्यापूर्वी भंगला. माळ पूर्ण होण्यापूर्वी तुटली याची चुटपुट जाणा-या फरताडे सरांना जितकी लागून राहिली नसेल, त्यांच्या कुटुंबीयांना जितका धक्का बसला नसेल, त्यापेक्षा समाजमनाला पडलेला पिळा मोठा आघात होता. ती भरून न निघणारी हानी होती. ती नाटकातील तरबेज नटाची रुखरुख लावणारी एक्झिट होती. या मित्रवर्याला पहिली श्रद्धांजली वाहताना ते कर्मकांडी श्राद्ध होणार नाही, याची काळजी नि खबरदारी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घेणाच्या सर्वांची आहे. त्यांच्या जिद्दीने नि जोमाने कार्य करीत राहणं त्यांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

नसते गरज नवे दीप उजाळण्याची,

जळता दिवा जपणंही जोखीम असते
 मृताप्रत प्रतिबद्धता जपण्याची !






‘बेलौस, बेधडक : वसंत केशव पाटील

 प्रा. वसंत केशव पाटील मराठी कथाकार, कवी, भाषांतरकार, संपादक असले तरी त्यांना मी ओळखू लागलो ते हिंदीचे प्राध्यापक म्हणूनच. तेव्हा ते रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराडमध्ये होते. हिंदी प्राध्यापक म्हणून मी हिंदी प्राध्यापक परिषदेचा संयोजक म्हणून कार्य करीत होतो, तेव्हा । कोणत्या तरी सभा-परिषदेत ते मला पहिल्यांदा भेटले होते; पण त्यांचा-माझा घनिष्ठ परिचय झाला तो त्यांनी आणि मी मिळून शिवाजी विद्यापीठात केलेल्या पुन:श्चर्या पाठ्यक्रम (रिफ्रेशर कोर्स) मुळे. आम्हा दोघांतील दुवा होता प्रा. पट्टेकरी. ते इस्लामपूरचे. आम्हा तिघांत समान मैत्रीचा धागा निर्माण व्हायचं कारण लेखन, वाचन, भाषांतरात रुची, गती असणं होतं. कोर्समध्ये मार्गदर्शक व्याख्यानं देत. सुट्टीत डबा खात आम्ही झालेल्या व्याख्यानांवर चर्चा करीत असू, त्या वेळी वसंतराव मोठी मार्मिक टीका-टिप्पणी करीत असायचं. त्यातून त्यांचा व्यासंग, वाचन, चिंतन स्पष्ट होत राहायचं.
 वसंत केशव (खरं पठडीतलं नाव) हे साहित्यात ललित असले तरी व्यवहारात मात्र कठोर. त्यांचं वक्तव्य म्हणजे एक घाव, दोन तुकडे ते मोठे स्पष्टवक्ते. त्यांच्या शब्दकोशात भीड हा शब्द मला कधी आढळला नाही. समोरचा कितीही मोठ्ठा, प्रतिष्ठित साहित्यिक, समीक्षक असू दे; त्याच्याबद्दल त्यांच्या मनात जे येईल ते आडपडदा न ठेवता पुढे आणि मागे बोलण्यास ते कधी कचरत नसत. बौद्धिक कुस्ती खेळण्याचा त्यांचा उपजत छंद, ग्रामीण

भागात जन्म, शिक्षण व व्यवसायाची हयात गेल्याने गावपंढरीचे सारे गुणअवगुण कसे मातीतून आलेले... अस्सल, रांगडे. नावातच पाटीलकी असल्याने वसंतरावांचं एकूणच व्यक्तिमत्त्व म्हणजे 'शिवबा ताठ!' आम्ही दोघेही उंच, शिडशिडीत; पण जमीन-अस्मानाचं अंतर! या शिडात कायम वारं भरलेलं; त्यामुळे हे तारू कायमच भरकटलेलं मी अनुभवलं. ते प्रत्यक्षात नॉर्मल असले तरी अंतर्मनात कोणत्या तरी वाचलेल्या साहित्यकृतीचा पिंगा फेर धरून असायचा अन् अंतर्मनात किंकर्तव्यविमूढ असा धिंगाणा. ते गावाकडचे पाटील असले तरी भाषा मात्र कुलकण्र्यांची. शुद्ध, घरंदाज; पण अभिव्यक्तीत एक प्रकारचा रासवटपणा, कटुता आपसूक यायची.
 त्यांचं हे असं का व्हायचं याचा मी जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा लक्षात यायचं त्यांचं उद्ध्वस्तपण. ऐन उमेदीतील त्यांचा मुलगा... घास हातीतोंडी आलेला असताना हिरावला गेला होता. तेव्हा कठोर वसंतरावांतील हळवा कवी, संवेदनशील बाप, करुण शिक्षक मी जवळून अनुभवला आहे.
 वसंतराव नेहमी भेटतात सांगलीत. तेही कोणत्या ना कोणत्या साहित्यिक कार्यक्रमातच. कोल्हापुरातील त्यांच्या भेटी पण अशाच साहित्यिक उपक्रमातच होत आल्या आहेत. हे साहित्यिक गोतावळ्यात सर्वत्र दिसले तरी ते कुणाचेच नसायचे. त्यांचा स्वतंत्र बाणा हा त्यांचा उपजत स्वभाव. वसंतरावांनी कुणाची प्रशंसा, प्रशस्ती करणं हा कपिलाषष्ठीचा योग समजायचा; पण हे गौरवपत्र लाभणारं पात्र सापडणं महाकठीण गोष्ट. त्यामुळे वसंतरावांचं भाषण म्हणजे जाहीर खांडोळी हे ठरलेलंच. त्यामुळे भलेभले त्यांना दचकून असत. कोणी त्यांच्याशी पंगा घेतल्याचे मला आठवत नाही. भाषणातील वसंतरावांचे तर्क मात्र बिनतोड असत. मांडणीत पूर्वचिंतन असायचं. सतत तिरका विचार करणारे वसंतराव मनाने व व्यवहाराने सरळ. त्यांच्या बोलण्यात असहमतीचा थेटपणा असला तरी त्यास मी गरळ कधीच म्हणणार नाही; कारण त्यात व्यक्तिद्वेष नसायचा. तर्काच्या कसोटीवर, स्वविवेकाच्या लिटमस पेपरची टेस्ट त्यांच्या लेखी फायनल असायची.
 पेयपान, रसपानाचा त्यांना छंद असला तरी त्याला मी व्यसन म्हणणार नाही. तो त्यांच्या आस्वादक जीवनशैलीचा एक नाजूक अध्याय, जयशंकर प्रसाद यांची एक कथा आहे. बहुधा ‘मधुआ' असावी. त्यात एक शराबी चित्रित केलाय प्रसादांनी. तो दारू का पितो असं त्यातलं सरदारजी पात्र त्याला विचारतं, तो उत्तर देतो की, ‘इतिहासकाळातले राजे आपल्या शहजादींना (राजकुमारींना) आश्वासन देऊन युद्धावर जात; पण परतत नसतं. त्या अख्खं आयुष्य झुरत काढायच्या. त्यांचं झुरणं विसरावं म्हणून तो शराबी दारू प्यायचा... वसंतरावांच्या व्यक्तिगत जीवनात अनेक घात, प्रतिघात, अपघात झाले. ते उसवले, पण उद्ध्वस्त नाही झाले; कारण जगण्यावर, वाचनावर, विचारांवर त्यांची अतूट, अढळ, श्रद्धा आहे. त्यांचं हे नशेतलं जगणं आत्मिक असतं. अंतरिक असतं... द्रवरूप नशा प्रासंगिक बहाणा! नशेत जगणा-याला अशा नशा केवळ विरंगुळा असतो.
 वसंत केशव पाटील यांचं स्फुटलेखन मी वृत्तपत्र, नियतकालिकांतून वाचायचो. कथा, कविता, ललितबंध असं ते लेखन असायचं. त्यात लेखकाचं निरीक्षण व ते व्यक्त करण्याची नजाकत यांत एक खोच असायची. या पाटलातलं टगेपण त्यातून व्यक्त होत राहायचं. 'सकाळ'च्या अंकात त्यांची वाचलेली कुस्ती माझ्या अजून स्मरणात आहे. कारण त्यातील ग्रामीण बाज, कुस्तीतील बारकावे व लेखकाची शाब्दिक कलाबाजी. ती विषयाशी समाधी साधणारी असायची. त्यांच्या कविता दुखया कोप-याची कळ व्यक्त करणा-या पण ललित-मधुर असायच्या. साठोत्तरी मराठी लेखनात त्यांचं नाव एक उमदा लेखक म्हणून घेतलं जायचं. त्यांचं समग्र व अखंड वाचलेलं पहिलं पुस्तक ‘छप्पर' कथासंग्रह तो. वसंतरावांनी मोठ्या प्रेमानं बक्षीस दिलेला व मैत्रीच्या नात्यानं त्यांनी मला त्याचं परीक्षण, समीक्षा करण्याचा आदेश दिलेला; पण त्या काळात तो वाचून, आवडूनही मला उसंत नसल्यानं वसंत रुसलेला होता असं आठवतं. 'खुलता कळी खुलेना' असं होऊन गेलं होतं; पण तो राग लटका होता हे मी ओळखून होतो.
 वसंत केशव पाटील यांनी हिंदी कवी बच्चनांच्या आत्मकथेच्या चौथ्या खंडाचा ‘दशद्वार से सोपान'चा अनुवाद मधे मी वाचला! तो बच्चन यांच्यावर काही लिहिण्याच्या निमित्ताने; आणि लक्षात आलं की, हा गृहस्थ लेखनकामाठीतही कुशल आहे. सुमारे पाचशे पानी पुस्तकाचा अनुवाद करणं काही खायचं काम नाही. मी अनेक अनुवाद केले असल्याने अनुवाद कष्ट आणि अनुवादाचा ताण मला माहीत आहे. बच्चन यांच्या समग्र आत्मकथांबद्दलही मी लिहिलं तेव्हा वसंतरावांचा हा अनुवाद परत अभ्यासला होता. अनुवादक म्हणून वसंतरावांनी घेतलेले कष्ट व अनुवादाचे उजवेपण त्यातील कवितांच्या अनुवादावरून स्पष्ट होत होतं. वसंतरावांनी अनुवादासाठी बच्चन यांची आत्मकथा निवडावी यामागंही त्यांचं काव्य, कवी आणि कारुण्य हेच कारण! त्याला श्रेष्ठ अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार, हा पुरस्कार सुरू झाल्याच्या प्रारंभिक काळात मिळाल्यानेही वसंतरावांच्या अनुवादश्रेष्ठतेवर मोहर उठली होती. तेव्हा मोहरलेले, गहिवरलेले वसंतराव हत्तीसारखे झुलतानाही मी पाहिलेत. हिंदीबरोबरीने वसंतरावांनी केलेले तेलुगू अनुवाद हा अजून माझ्यासाठी तरी आश्चर्याचा विषय बनून राहिला आहे. बहुधा ते तमिळ, तेलगू संगमाजवळ राहणं हे त्याचं कारण असावं; ‘त्याने जग जिंकले’, ‘अखेरचे झोपडे’, ‘मातीमाय' या त्यांच्या तीनही अनुवादित कादंब-या. कथेचा अनुवाद हा खुष्कीचा मार्ग असतो; तर कादंबरी अनुवाद म्हणजे वाईवरून साताव्याला जाणं असतं. वसंतरावांचा आवाका, आवेश नेहमीच शड्डू ठोकायचा राहिल्याने ते सतत लेखन, अनुवादात शिवधनुष्य उचलण्याचा पराक्रम करीत आले. त्यातूनही त्यांची फुशारकी व वेगळेपण लक्षात येतं.
 संपादन, सहलेखन, निबंधलेखनातूनही वसंतरावांचा साहित्यिक व्यासंग स्पष्ट होतो. यशवंतराव चव्हाणांवरचं त्यांचं संपादन, ‘यशवंतराव : विचार आणि व्यवहार त्यांच्या बहुजनप्रेमाची साक्ष व अभिमानाचं प्रतीक! मनोहारी ललित गद्य हा वसंतरावांच्या लेखणीचा खरा दागिना। ‘कंदिलाचा उजेड' ज्यांनी पाहिला, अनुभवला, वाचला असेल त्यांना मी असे का म्हणतो ते कळेल, त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार' लाभल्याचं आठवतं.
 हिंदीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांचा विद्याथ्र्यांत लौकिक होता. ‘रयत' मधल्या बदलीच्या त्रासाचा त्रागा असला तरी तो रोजच्या शिकविण्यात त्यांना कधी उतरू दिला नाही. त्यांचं शिकवणं अभ्यासपूर्ण असायचं. शिकविण्यात वाचनाचे दृष्टान्त देत ते अध्यापन उंचवायचे, असे त्यांचे विद्यार्थी सांगताना मी ऐकलं आहे. वर्गात विद्याथ्र्यांशी वागणं ‘शठं प्रति शाठ्यम्' असायचं. कोणी टर उडवायचा प्रयत्न केला तर ते त्यांची टोपी उडवायला कमी करत नसत. शिकविताना येणा-या विवेचनात एक बेरकीपणा असायचा. ती त्यांच्या चिंतनाची खरं तर इतिश्री असायची. मराठी-हिंदी अशा उभयभाषी वाचनलेखनामुळे ते मराठी, हिंदी जगतात समानपणे प्रसिद्ध आहेत. रयत संस्कृती त्यांना मानवणारी नव्हती; पण समझोता म्हणून ती त्यांनी स्वीकारली होती. त्यात रोज होणारी घालमेल, तगमगीने ते कातावून जायचे; पण आडनाव पाटील असले तरी हा गडी मनानं, वृत्तीनं, टिपिकल मध्यमवर्गीयच! ‘तुका म्हणे उगी रहावे' असं म्हणत जगणारे वसंतराव आतून मात्र सतत खदखदत, खेकसत असायचे.
 वसंतराव नि माझ्या मैत्रीतील समान दुवा म्हणजे हरिवंशराय बच्चन. बच्चन यांच्याबद्दल मी अनेकदा लिहिलंय. 'मधुशाला'ला पन्नास वर्षे झाल्यावर मी लिहिलं. “दशद्वार से सोपान'ला ‘सरस्वती पुरस्कार मिळाल्यावर मी लिहिलं. परत एकदा त्यांच्या चारही आत्मकथांबद्दल प्राध्यापक मित्रांसमोर बोलून दीर्घ लेख संशोधनपर लिहिल्याचं, प्रकाशित झाल्याचं आठवतं. वसंतराव वाचून दाद द्यायचे. त्यांची टीकाटिप्पणी मार्मिक असायची. 'मधुशाला'वर लिहिल्यावर त्यांचा फोन आल्याचं आठवतं. “आत्ता समजलं तुमचं नाव सुनील का आहे? ते मुळात कृष्णाचं नाव; पण तुमच्या नुसत्या नावात कृष्ण नाही... मना, तनातही भरलेला कृष्ण ‘मधुशाला'च्या निमित्तानं बाहेर आला... यालाच इंग्रजीत ‘कॅथारसिस' की काय म्हणतात ना हो? आम्ही काही डॉक्टर नाही; पण मास्तर मात्र आहोत... या बोलण्यात तुम्ही असाल डॉक्टर, मी ‘मास्टर' असल्याचा अभिनिवेश म्हणजे अस्सल वसंतीय तानेची फेक! असे रसिक वसंतराव म्हणजे हाती न लागणारं व्यक्तिमत्त्व!
 मी कधी कधी विचार करायचो... वसंतराव आपल्याबद्दल माघारी काय म्हणत असतील? अशी जिज्ञासा असायचं एकमेव कारण म्हणजे माणसाचं नीरक्षीर व न्यायविवेकी मूल्यांकन करण्याची वसंतरावांची हातोटी! ती नेहमी न्यायाच्या तराजूसारखी समतोल असायची. त्यांच्या बोलण्यात कधी दीड दांडीचा तराजू मी अनुभवला नाही. याचं कारण या माणसाचं आतून-बाहेरून एक असणं! वसंतराव आत्ममग्न, आत्मरत तसेच आत्मदंग जीवन जगत आले. त्यांना आपल्या साहित्याबद्दल कुणी लिहावं, बोलावं असं नित्य वाटत राहतं, याचं कारण त्यांचं जगणं, लिहिणं मनस्वी जगावेगळं म्हणून उठून दिसणारं! आपणाला जग काय म्हणतं याचा कानोसा घेत त्यांचा महाराष्ट्रभर संचार, पत्रमैत्री, भेटीलागी जीव, सारं सारं माणूस मोहोळ! पण ही गांधीलमाशी ज्याला डसायची त्याची पत्रास नाही उरायची. पण त्यात पाप नसायचे. हिंदीत ज्याला ‘बेलौस’ अभिव्यक्ती म्हणतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसंतराव! माझ्या या मित्राचा साहित्यिक सुवर्णमहोत्सव म्हणजे शब्दसोन्याचा पिंपळ व्हायचा योग! माझ्या या मित्राकडून भविष्यात अधिक उमदं लेखन, जगणं घडावं अशी अपेक्षा! त्यासह शुभेच्छा! सामाजिक प्रशासक : लक्ष्मीकांत देशमुख

 तो सन २००९ चा प्रारंभकाळ असावा. तो दिवस लक्ष्मीकांत देशमुख यांचा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदग्रहणाचा पहिला दिवस होता. सकाळी स्थानिक वृत्तपत्रांतून त्यांच्या सविस्तर मुलाखती छापून आल्या होत्या. मी सकाळी त्या लक्षपूर्वक वाचल्या होत्या. त्या वाचीत असताना एक गोष्ट लक्षात आली होती की, कोल्हापूरला यायचे ठरल्यावर त्यांनी भरपूर होमवर्क केलं होतं. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती होती. मोठ्ठी उमेद व उत्साह घेऊन ते येत असल्याचं मुलाखतीत प्रतिबिंबित झालं होतं. त्या दिवशी श्रमिक प्रतिष्ठानचा एक साहित्यिक सत्काराचा कार्यक्रम आम्ही आमच्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनात योजला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळेतच लक्ष्मीकांत देशमुख प्रेक्षकांत येऊन बसल्याचे कुणीतरी कार्यकत्र्यांनी येऊन सांगितले. आम्ही व्यासपीठावर त्यांना आमंत्रित केल्यावर मी ‘श्रोता' म्हणून आल्याचं ठामपणे सांगून मोठ्या नम्रतेनं, विनयानं स्टेजवर यायचं त्यांनी नाकारलं होतं. इतकंच नव्हे तर समारंभ संपल्यावर स्टेजवर येऊन आम्हा सर्व साहित्यिकांचे अभिनंदन केलं होतं. त्या वेळी त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे साहित्यप्रेम, जाण, अभ्यास लक्षात आला. एक रुजू, विनयशील व्यक्ती म्हणून माझ्या मनी झालेली त्या वेळेची नोंद रोज दृढमूल होते आहे.

 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना व समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अनेक सनदी अधिकारी या जबाबदारीकडे

औपचारिकपणे पाहत असतात. लक्ष्मीकांत देशमुख यांनी या साच्या जबाबदाच्या येथील कार्यकालात कर्तव्य म्हणून स्वीकारल्या. 'बालकल्याण संकुल' ही अनाथ मुले, मुली व महिलांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, पुनर्वसन कार्य करणारी संस्था. त्या संस्थेला ते पदभार स्वीकारताना कर्ज होतं. ते तर त्यांनी फेडलंच; शिवाय एक कोटी रुपयांचा निधीही जमा करून दिला. त्या निधी संकलनाचंही मोठं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यांनी निधी संकलनार्थ दैनिक 'पुढारी'चे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. निधी संकलनाच्या शुभारंभाची बैठक योजली. बैठकीस उद्योगपती, व्यापारी, साखर कारखान्यांचे चेअरमन, आदींना व्यक्तिगत पत्र लिहून सादर निमंत्रित केलं. सभेचे निमंत्रक म्हणून स्वागतपर भाषण करून संस्थेची अडचण विशद केली. स्वत:चा एकावन्न हजार रुपये देणगीचा चेक अध्यक्षांकडे सुपूर्द केला. ‘आधी केले नि मग सांगितले' असा शिरस्ता त्यांनी ठेवल्याने सभेतच लक्ष्यपूर्ती झाली. ते नावाचे लक्ष्मीकांत नव्हेत, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं होतं.
 बालकल्याण संकुलात लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींची संस्था लग्न करून देते. एका लग्नासाठी संस्थेनं त्यांना कन्यादानासाठी सपत्निक आमंत्रित केलं. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘मला मुलगी नाही. ही माझी मुलगी समजून मी माझ्या घरी तिचं लग्न करून देणार. लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुलीचा पिता म्हणून घरोघरी पत्रिका वाटल्या. सर्वांना कोल्हापुरी फेटे बांधले. पोलीस बँड, हळद, वरात, मांडव, बुंदीचं जेवण, फटाके अन् हे सर्व पदरमोड करून. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी निवासाच्या इतिहासातील हे पहिलं शाही लग्न एका वंचित बालिकेचं! असं करायला तुमची जात कळवळ्याचीच असायला लागते. हे येरागबाळ्याचं काम नव्हतं.
 नसीमा हुरजूक, प्रा. साधना झाडबुके, पी. डी. देशपांडे, अशोक रोकडे, शिवाजी पाटोळे, कांचनताई परुळेकर, स्मिता कुलकर्णी, पवन खेबुडकर, साताप्पा कांबळे, अनुराधा भोसले, प्रमिला जरग, इत्यादी मंडळी कोल्हापूर जिल्ह्यात वंचितांची विविध प्रकारची समाजकल्याण कार्ये करतात. तशा अर्थांनी राजर्षी शाहूंनी निर्माण केलेल्या परंपरेमुळे कोल्हापूर जिल्हाभर वंचितांच्या संस्थाश्रयी व संस्थाबाह्य समाजकार्याचं जाळं आहे. या सर्व संस्थापैकी हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, अवनि, स्वयंसिद्धा, जीवनमुक्ती, रेडक्रॉस सोसायटी, जिज्ञासा, चेतना, चैतन्य, अंधशाळा, देवदासी वसतिगृह, मूकबधिर विद्यालये, आश्रमशाळा, साखरशाळा, बालमजूर शाळा, महिला आधारगृह, श्रमिक महिला वसतिगृहे यांचे कोणतेही प्रश्न असोत; लक्ष्मीकांत देशमुख यांनी आश्वासन देऊन बोळवण केली असं अपवादानंही घडलं नाही. दलित, वंचितांप्रती त्यांची संवेदना अतिदक्षतेची व प्राधान्याची असायची, हे मी नेहमी जवळून तीन वर्षे नित्य अनुभवलं आहे.
 जी गोष्ट सामाजिक कार्य नि कार्यकर्त्यांची तीच साहित्य, साहित्यिक व साहित्यिक उपक्रमांचीही. लक्ष्मीकांत देशमुख स्वतः मराठातील ख्यातनाम साहित्यिक होत. महाराष्ट्रात सनदी अधिकारी साहित्यिक असण्याची मोठी परंपरा आहे. पानिपत'कार विश्वास पाटील, कथाकार भारत सासने, पुरातत्व संचालक व कवी संजय कृष्णा पाटील अशी नावं सहज लक्षात येतात. लक्ष्मीकांत देशमुख यांचं साहित्यलेखन चतुरस्त्र आहे. कथासंग्रह, कादंबरी, वैचारिक, नाटक, संपादन असे विविधांगी लेखन केलेल्या या लेखकास त्यांच्या ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार लाभला; तसाच अलीकडे साप्ताहिकात चालवलेल्या ‘प्रशासननामा' सदराचं रूपांतर प्रशासनाची बरवर'ला अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार लाभला. या दोन्ही पुरस्कारांनी लक्ष्मीकांत देशमुख यांना मराठी सारस्वतःच्या पहिल्या पंक्तीत आणून बसवलं आहे. त्यांच्या लेखनाचं स्वतःच असं एक अंगभूत वैशिष्ट्य आहे. त्यांचं सारं लेखन अनुभव व अभ्यासावर आधारित असतं. कल्पना त्यांच्या लेखणीस वर्थ्य असते. निव्वळ फिक्शन या काल्पनिक लिहिण्याचा त्यांचा पिंड नाही. त्यांच्या लिखाणाला स्वाध्याय, चिंतन, मनन, अनुभव, संशोधन इ. ची बैठक असते. कथांजली', ‘अंतरीच्या गूढ गर्मी’, ‘पाणी पाणी', 'नंबर वन'सारखे कथासंग्रह; ‘सलोमी', ‘अंधेरे नगर', 'होते कुरुप वेडे'सारख्या कांदबया आणि ‘दूरदर्शन हाजिर हो'सारखं बालनाट्य (ते आम्ही ग्रंथमहोत्सवात अभिनित केलं होतं.) सर्वांत हे वैशिष्ट्य चपखलपणे लक्षात येतं.
 पुस्तकं हा लक्ष्मीकांत देशमुख यांचा नर्मबिंदु (विक पॉइंट). प्रशासनाच्या धबडग्यातून त्यांना वाचन, लेखणाची ऊर्मी शिचकच कशी राहते हा माझ्या औत्सुक्याचा, जिज्ञासेचा व खरं तर संशोधनाचा विषय बनून राहिला आहे. ते जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूरला कार्य करतानाच्या काळात मी अनेकदा त्यांच्या कार्यालयात तासनतास निरीक्षण केलं आहे. हा माणूस सनदी कार्यातही तितकाच तज्ज्ञ व दक्ष! आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, महसूल, नियोजन, राजकारण इ. गव्हर्नन्स, निवडणूक, मंत्रालय कार्यपद्धती सर्वाचा त्यांचा आवाका आश्चर्यचकित करून सोडणारा. ते अष्टावधानी व अष्टपैलू प्रशासक होत. अधिकारी घेऊन आलेलं फोल्डर त्या अधिका-याला पाहताच लक्षात कसं येतं हे अजून मला न उलगडलेले कोडं आहे. आलेल्या प्रत्येकाशी म्हणजे चपराश्यापासून ते चेअरमन, आमदार, खासदार सर्वांशी त्यांचं वागणं माणूसपणाचं व समोरच्याचा आदर, सन्मान करणारं असायचं. ड्रायव्हरनं घर बांधलं तर त्याच्या वास्तुशांतीला हजर! मित्रांनी चहाला बोलावलं तर मिठाईचा पुडा घेऊन स्वारी दत्त! असं लाघवी व्यक्तिमत्त्व! पण त्यांनी आपला प्रशासक कधी मरू दिला नाही. आसामी कितीही राजकारणी, पोहोचलेला असू दे गैर करणं त्यांनी निक्षून टाळलं. प्रसंगी कटुता घेऊन सामान्यांसाठी त्यांच्या न्यायाचा तराजू सतत झुकलेलाच मी पाहिला. तीन वर्षांच्या त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यकालात जिल्ह्यात एकदाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला असं झालं नाही. ते उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, (जि. प.), संचालक (क्रीडा) आयुक्त, महानगरपालिका, वखार महामंडळ, चित्रपटनगरी अशी बहुविध पदं त्यांनी भूषविली असल्याने व अमेरिकेत जाऊन व्यवस्थापनाचे धडे घेतले असल्याने प्रश्न निर्माण होण्यापूर्वी सोडवायचं त्यांचं कौशल्य अनुकरणीय होतं.
 त्यांचा स्वत:चा मोठा ग्रंथसंग्रह होता. गावात ग्रंथप्रदर्शन असो, त्यांची चक्कर व खरेदी ठरलेली. त्यांच्या कार्यकाळात आम्ही कोल्हापुरात ‘राजर्षी शाहू ग्रंथमहोत्सव' सुरू केला. ते उद्घाटक म्हणून आले आणि त्यांनी राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टच्या ग्रंथालयासाठी एक लक्ष रुपयांची पुस्तकखरेदी केली. तीपण स्वतः सर्व स्टॉल्सवर फिरून, निवडून. या ग्रंथमहोत्सवासाठी त्यांनी ‘महोत्सव गीत' उत्स्फूर्तपणे लिहून दिलं. अनेक कार्यक्रमांना त्यांना प्रेक्षकात बसून मनमुराद आनंद लुटताना पाहणं. कोल्हापूरकरांच्या अंगवळणी पडून गेलं होतं. कुणीही जावं, विनंती करावी व त्यांनी कार्यक्रमाला यावं असे ते खरे ‘जनप्रिय जिल्हाधिकारी' बनले होते. आम्ही एक व्याख्यानमाला चालवायचो. त्याचे उद्घाटक म्हणून यावं म्हणून आम्ही विनंती करायला गेलो, ते तयार झाले; पण एका अटीवर... 'मी उद्घाटन करणार; पण एका विषयावर व्याख्यान देणार...' अशी त्यांची मनस्विता असायची.
 कोल्हापूरचा 'राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट' म्हणजे जिल्ह्याचं सांस्कृतिक केंद्र. जिल्हाधिकारी त्याचे पदसिद्ध अध्यक्ष. त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकालात या स्मारकाचा लक्ष्मीकांत देशमुख यांनी अक्षरशः कायापालट केला. सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उभारून स्मारकभवनाचा विस्तार केला. कलादालन सभागृह विस्तार, मिनी थिएटर, वातानुकूलन अतिथिगृह विस्तार व सुविधा संपन्न करणे, ग्रंथालय सक्रिय करणे, स्मृतिचित्र निर्मिती, वेशभूषा कक्ष, प्रसाधनगृह, इत्यादी सोई केल्या. उपक्रमांची रेलचेल केली. ट्रस्टतर्फे ‘युवा गौरव' पुरस्कार, विविध मंच स्थापना, जिल्हा साहित्य संमेलन, व्याख्याने, नवलेखक शिबिर, साधना कथा संमेलन, रवींद्रनाथ जन्मशताब्दी, साहित्यिक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महोत्सव, विविध चित्रपट महोत्सव, इत्यादींचे आयोजन करून हे स्मारक त्यांनी चैतन्यशील बनविले. येथील कलादालन व पुस्तक दालन सुरू झाल्यापासून कोल्हापुरात रोज चित्रप्रदर्शन व ग्रंथप्रदर्शन असतेच असते. हे स्मारक भवन आता शहरवासीयांचे भेट केंद्र (मिटिंग पॉइंट) बनले आहे. ट्रस्टचा सांद्यत इतिहास स्मरणिकेच्या रूपात प्रकाशित करून इतिहासलेखनाचे मोठे काम त्यांनी तडीस नेले आहे.
 कोल्हापूर हे पूर्वीपासून ऐतिहासिक सांस्कृतिक शहर. या शहर व जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी अंबाबाई मंदिरासाठी दर्शन मंडप योजना तयार केली. जोतिबा, पन्हाळा, वारणा रोप वेला गती दिली. “करिश्मॅटिक कोल्हापूर' नावाचे पर्यटन केंद्र, कॉफी टेबल बुक, कॅलेंडर, प्रवासवर्णन लिहून तयार करून प्रकाशित केले व कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळवून दिले. राजर्षी शाह जन्मस्थळ विकासाला त्यांनी निधी मिळवून दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथविक्री केंद्राची पायाभरणी केली. पर्यटनाचे आकर्षण वाढावे म्हणून संदेश भंडारी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रकाराकडून संपर्ण जिल्ह्याचे छायाचित्रण करवून घेतले. अशी दूरदृष्टी असलेले प्रशासक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांची वेगळी ओळख नजरेत भरल्याशिवाय राहत नाही.
 लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना दोन क्रांतिकारी कार्ये केली. ते नेटसॅव्ही प्रशासक होते. त्यांनी पाहिलं की कोल्हापूर हा एकेकाळी पुरोगामी विचार, व्यवहारांचा बालेकिल्ला; पण अतिरिक्त कृषी समृद्धीमुळे स्त्रीभ्रूण हत्येवर तो आघाडीवर! येथील स्त्री प्रमाण राज्यात सर्वांत कमी. त्यांनी यात बदल घडवून आणण्याचं ठरवलं. लिंगनिदानास राज्यात बंदी आहे; पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी त्यांनी कायदा, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्यात समन्वय निर्माण केला. डॉक्टरांचे प्रबोधन केलं. जनतेत जागृती घडवून आणली. याचं मूळ सोनोग्राफी मशीनमध्ये आहे हे लक्षात आल्यावर संशोधन करून ‘सायलेंट ऑब्झर्व्हर' सॉफ्टवेअर विकसित केलं. ते सोनोग्राफी केंद्रांना सक्तीचे केलं. दोन वर्षांनंतर मुलींचं प्रमाण वाढवून दाखविलं. त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला. हरियाणा, पंजाबसारख्या राज्यांनी त्यांचा प्रकल्प आपल्या राज्यात राबवून महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घातलं, मग महाराष्ट्र शासनानेही 'स्त्रीभ्रूण हत्या' आपला प्रधान कृती कार्यक्रम बनविला. याचं सारं श्रेय या प्रश्नी दिवसरात्र एक करणारे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनाच द्यावं लागतं.
 अशीच आणखी एक प्रशासकीय क्रांती त्यांनी केली. सोनोग्राफी ट्रैकिंग सिस्टीम त्यांनी रॉकेलचे वितरण करणा-या बँकरसाठीही विकसित केली. त्यामुळे रॉकेल, पेट्रोल, डिझेल यांची वाहतूक, भेसळ, इत्यादींस मोठा प्रतिबंध निर्माण झाला. 'गोकुळ'सारख्या संस्थांनी हा प्रयोग दूध वाहतुकीसाठी केला तर ते उपकारक ठरेल.
 त्यांनी जिल्ह्यात ‘ई-चावडी'चा केलेला यशस्वी प्रयोग... त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने सन २०१२ चा ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार' देऊन महाराष्ट्र शासनाने नागपूर अधिवेशनात त्यांचा गौरव केला. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तलाठ्यास संगणक प्रशिक्षण दिले. प्रत्येकास लॅपटॉप दिला. जिल्ह्याचे सगळे सात बारा, डायरी, उतारे, डाटाबेस पद्धतीने संग्रहित केले. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोणासही जमिनीचा सातबारा मिळण्याची सोय करून भ्रष्टाचार व लाचलुचपतीचे मूळच त्यांनी उखडून टाकले. कोल्हापुरातील कोणताही उतारा कोणासही मिळण्याची किमया ही महसूल विभागाच्या साचेबंद प्रशासनास छेद देणारी घटना ठरली. संगणक साक्षरतेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात मोठी आघाडी घेतली. त्याचे शिल्पकार म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख!
 या नि अशा कितीतरी छोट्यामोठ्या प्रयत्नांतून लक्ष्मीकांत देशमुख यांनी सन २00९-२०१२ या तीन वर्षांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांना पालकमंत्री, मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वांत म्हणजे सर्वसाधारण जनतेचं जे समर्थन, बळ लाभलं त्यामुळे ते हे परिवर्तन करू शकले. त्यांच्या कार्याची पोहोच पावती कोल्हापूरकरांनी त्यांना जाहीर सत्कार समारंभ करून दिली. असा सन्मान लाभलेले लक्ष्मीकांत देशमुख हे अपवादात्मक जिल्हाधिकारी होते. कोल्हापूरची कलेक्टरी' त्यांच्या साहित्यिकांनी शब्दबद्ध केली तर प्रशासकीय कारकिर्दीचा तो एक विधायक दस्तऐवज ठरेल. तो त्यांनी आवर्जून लिहावा, असे आवाहन व विनंती. त्यांच्या भविष्यास शुभेच्छा! शाहूप्रेमी इतिहासकार : डॉ. जयसिंगराव पवार

 मला ‘सुनीलकुमार' म्हणून हाक मारणारी जी अपवाद म्हणून वडील माणसं आहेत, त्यांपैकी डॉ. जयसिंगराव पवार एक होत. मला आठवते त्याप्रमाणे त्यांचा नि माझा परिचय आम्हा दोघांचे समान मित्र असलेल्या प्रा. डॉ. ए. एन. मुतालिक यांच्यामुळे घडून आला. डॉ. मुतालिक व डॉ. पवार दोघे शहाजी महाविद्यालयात होते. मी शेजारच्या महावीर महाविद्यालयात होतो. काही कामानिमित्ताने शहाजी कॉलेजमध्ये गेलो असताना त्यांचा परिचय डॉ. मुतालिक यांनी करून दिला, तरी सरांना मी इतिहासाचे ख्यातनाम प्राध्यापक म्हणून ओळखत होतो. नंतरच्या काळात पीएच.डी. झाल्यावर मला लेखक होण्याची स्वप्ने पडू लागली. त्या काळात शैक्षणिक विश्वात डॉ. विलास संगवे, डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. कांती भाई ठक्कर, प्रा. मोहन सराफ, प्रा. एम. जी. पातकर, प्रभृती प्राध्यापक क्रमिक पुस्तके लिहिणारे स्थानिक लेखक म्हणून त्यांचा दबदबा होता. जयसिंगरावांना पण मी त्या दबदब्यापोटी दुरूनच पाहत राहायचो. पुढे मी अजब प्रकाशनाचा लेखक झालो. तेही त्या प्रकाशनाचे लेखक असल्याने अनिल मेहतांकडे माझे जाणेयेणे होऊ लागले नि परिचय दृढ झाला.
 पण ते माझे मित्र होण्याचा, सुहृद होण्याचा काळ मात्र अलीकडचा नि त्याचे कारण होते कॉम्रेड गोविंदराव पानसरे, कॉ. पानसरेंबरोबर वेगवेगळ्या कारणांनी जयसिंगरावांच्या घरी जाणे-येणे घडू लागले. मी शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाचे कार्य सन २००२ पासून पाहू लागलो. पुढे संचालक झालो. त्याच काळात डॉ. जयसिंगराव पवार शाह संशोधन केंद्राचे संचालक म्हणून डॉ. विलास संगवेयांच्या निवृत्तीनंतर रुजू झाले. डॉ. माणिकराव साळुखे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असण्याच्या काळात वस्तुसंग्रहालय संकुल उभारण्याची कल्पना चर्चेत आली. त्या वेळी मराठा वस्तुसंग्रहालय, शाह संग्रहालय व खांडेकर संग्रहालयाच्या संचालकांच्या संयुक्त बैठका होत. त्यातूनही विचारांची देवघेव होत राहिली व ऋजू व्यक्ती म्हणून मी त्यांना ओळखू लागलो. संयमित संवाद, अनाग्रही मांडणी, निर्वैर मैत्री, तटस्थ पण त्रयस्थ नव्हे असे संबंध ठेवण्याची नजाकत, शाहू प्रभावामुळे खानदानी जीवनव्यवहार आणि शैली या सर्वांची भुरळ मला पडत गेली खरी; पण त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व हे माझ्या त्यांच्याप्रती आकर्षणाचे केंद्र होऊन गेले होते. त्या काळात ते सराफी सूट वापरत. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वास तो शोभून दिसत असे. अलीकडे ते बुशशर्ट, पँट वापरतात. पूर्वी कोट, टायही वापरत म्हणे; पण तो त्यांचा पोशाख मी फोटोतच पाहत आलो आहे.
 त्यांचे नि माझे घरोब्याचे, निकटचे संबंध निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जयसिंगरावांची कन्या मंजूश्री व कॉ. पानसरेंची सून मेघा. जयसिंगराव व वहिनींना मंजूच्या दोन गोष्टींची चिंता असायची. एक, ती लग्न करीत नाही व दुसरी, पीएच. डी. मनावर घेत नाही. तिकडे कॉ. पानसरेंना मेघाची नोकरी कायम व्हावी म्हणून पालक म्हणून चिंता असायची. या दोघी श्रमिक प्रतिष्ठानच्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह मंडळाच्या कामामुळे माझ्या निकट संपर्कात आल्या. नंतर अनेक उपक्रमांत आम्ही एकत्र काम करीत राहिलो. त्यातूनही एक प्रकारचा आपलेपणा आलेला. मंजूच्या कामात मला पन्नास टक्के यश आले नि ती पीएच. डी. झाली. मेघाच्या कामात १00 टक्के यश आले. ती नोकरीत कायम झाली. त्यामुळे डॉ. जयसिंगराव पवार व कॉ. पानसरे यांच्या कुटुंबातील मी दुवा बनून गेलो.
 पुढे कॉ. पानसरेंचा अमृतमहोत्सव साजरा व्हावा असे डॉ. मंजूश्री व डॉ. मेघाला वाटत होते. त्या दोघींनी पानसरेंना भरपूर गळ घातली; पण ते दाद देईनात. मग मी नि डॉ. जयसिंगराव यांनी मिळून त्यात लक्ष घालायचं ठरवलं. प्रत्यक्ष अमृतमहोत्सव झाला त्याच्या अगोदर सुमारे वर्षभर आम्ही त्यांना काही बोलायचे म्हणून हॉटेल पर्लला संध्याकाळी आमंत्रित केले. डॉ. मंजू व डॉ. मेघाही होत्या. एक खोली बुक करून त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार केला नि समारंभाचे महत्त्व व गांभीर्य पटवून दिले. ते त्यांनी सशर्त मान्य केले. 'आधी लगीन कोंढाण्याचे' या न्यायाने पक्ष कार्यकर्त्यांची चरित्रे प्रकाशित केल्यानंतर महोत्सव करण्याचे ठरले. त्या अमृतमहोत्सवाची वात डॉ. मंजू नि डॉ. मंजू नि डॉ. मेघानी लावली असली तरी त्याला उदबत्ती लावण्याचे काम डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले होते, हे फार कमी लोकांना माहीत असावे. डॉ. जयसिंगरावांच्या मितभाषीपणातही एक कणखर, प्रतिबद्ध स्वर दडलेला असतो, तो कामी आला.
 डॉ. जयसिंगराव पवार वृत्तीने प्रसिद्धिपराङ्मुख तसेच पदनिरपेक्ष व्यक्तिमश्रत्त्व. कुठलंही पद, जबाबदारी ते सहसा घेत नाहीत. त्यामागे त्यांचा कर्तव्यपरायण विवेक कार्यरत असतो. पद घ्यायचे तर त्याची जबाबदारी आपणाला निभावता आली पाहिजे, अशी त्यांची धारणा. मिरविण्यासाठी, प्रसिद्धी व प्रतिष्ठेसाठी पदामागे ते कधी लागल्याचे मला आढळले नाही. वृत्ती म्हणून ते पदनिरपेक्षच राहिले. मला या अनुषंगाने दोन प्रसंग आठवतात. शिवाजी विद्यापीठात डॉ. विलास संगवे शाहू संशोधन केंद्राच्या संचालक पदातून मुक्त झाल्यावर डॉ. माणिकराव साळुखे यांची फार इच्छा होती की डॉ. जयसिंगराव पवार यांनी ती धुरा सांभाळावी. ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ'मुळे त्यांची या क्षेत्रातील हकमत सिद्ध झालेली होती. मी वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाचा संचालक म्हणून विद्यापीठात सक्रिय होतो. त्या वेळी त्यांनी हे पद स्वीकारावे म्हणून त्यांना गळ घालणान्यांमध्ये मीपण होतो, असे आठवते. त्या वेळी त्यांनी एक रुपये, नाममात्र मानधनावर ते पद स्वीकारल्याचे आठवते. पुढे त्यांनी उर्वरित कागदपत्रे संपादून, प्रकाशित करून आपली योग्यता सिद्ध केली, हे वेगळे सांगायला नको.
 तीच गोष्ट राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त पदाबाबत. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कार्यकाळातील ती गोष्ट. सन २००९-१० चा काळ असावा. तत्कालीन विश्वस्त सर्वश्री. बाबूरावजी धारवाडे व माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर यांना निवृत्तीचे वेध लागलेले होते. पर्यायी विश्वस्त निवडीच्या हालचाली सुरू होत्या. माझ्या मनी-मानसी नसताना जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचा मला फोन आला व त्यांनी प्रस्ताव मांडला की, तुम्ही व डॉ. जयसिंगराव पवार यांनी विश्वस्त पदाची जबाबदारी स्वीकारावी. मी कॉम्रेड गोविंद पानसरे, बाबूरावजी धारवाडे, कुलगुरू रा. कृ. कणबरकर यांच्याशी विचारविनिमय करून संमती कळविली; पण डॉ. जयसिंगराव पवार काही जिल्हाधिका-यांना दाद देत नव्हते. त्यांचा फोन आला, ‘काही करा; पण डॉ. जयसिंगराव पवारांना राजी करा.' मग एक दिवस मी नि कॉम्रेड पानसरे वेळ घेऊन डॉ. पवार यांच्या घरी गेलो. त्यांचा विचार करतो, कळवतो असा देंगे, दिलायेंगे मूड होता. ते पदापेक्षा जबाबदारी घेण्यास उत्सुक नव्हते. व्यस्तता हे त्यांचं कारण होतं. डॉ. जयसिंगराव पवार हे तसे अत्यंत शिस्तीचे गृहस्थ होत. घरी त्यांचा दरारा असला तरी घरातील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा शिरस्ता ते पाळत आलेत. त्यांचा हा शिरस्ता पाहून मला नेहमी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयझेन हॉवर यांची आठवण होते. ते रविवारी दुपारच्या वेळी सर्व कुटुंबीयांसह भोजन घेत. एक कागदी टोपी सर्वांच्या डोक्यावर असे. सर्व समान असल्याचे ते प्रतीक. त्यांचा नातू पण मग मिस्टर हॉवर म्हणत त्यांना प्रश्न करायचा. तीच खानदानी समानता डॉ. जयसिंगराव पवार घरी पाळत आलेत. मी व विशेषतः कॉम्रेड पानसरे यांनी आम्हास आत्ताच तुमचा होकार हवा आहे' म्हटल्यावर ते घरच्यांशी बोलले. कन्या डॉ. अरूंधतीशी फोनवर बोलले. मग होकार दिला... तो पण अनिच्छेने व आमच्या आग्रहापोटी. मला ते सतत पुटपुटत, सांगत होते, ‘मला भाषण करायला जमणार नाही, दगदग जमणार नाही, तुम्ही काय ते सारं पाहायचं?' या साच्यात मर्यादा, जाणिवेपेक्षा जो आपला प्रांत नाही तिथे जा कशाला अशी निरीच्छता होती. ती मला अधिक महत्त्वाची वाटते. सामाजिक जीवनात हे भान महत्त्वाचं असतं, ते डॉ. जयसिंगराव पवार सतत जपत आलेत. त्या दिवशी कॉम्रेड पानसरे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांना जिल्हाधिका-यांना फोन करायला लावून या प्रश्नावर पडदा टाकला. त्या वेळची डॉ. जयसिंगराव पवार यांची तगमग आजही जशीच्या तशी माझ्या लक्षात आहे.
 मग आम्ही उभयतांनी मिळून दोन वर्षे तरी एकदिलाने कार्य केले. त्या कार्यातही मी अनुभवले की, आपल्या मोठेपणाचा बडेजाव नाही. पुढे करणे नाही. सामर्थ्य व क्षमता असून माणसाचं तटस्थ, त्रयस्थ राहणं यात एक प्रकारची उपजत सुसंस्कृतता असते. ती जयसिंगरावांमध्ये मी कितीतरी प्रसंगांत जवळून अनुभवली आहे. मोठमोठ्या समारंभांत सामान्य म्हणून मिळेल तिथे, कुणाच्याही बरोबर बसणारे डॉ. जयसिंगराव पवार मी अनुभवले आहेत. पहिल्या पंक्तीचा सरंजामी आग्रह त्यांनी कधी धरला नाही व अपेक्षिलाही नाही, हे त्यांचं मोठेपण त्यांना अजातशत्रूपण बहाल करीत आलं आहे. ते त्यांनी आपल्या वृत्तीने जपले, जोपासले आहे. आपल्या मस्तीत ते आनंदी व समाधानी असतात.
 मी बालकल्याण संकुलाचे काम सन २००० च्या दरम्यान सोडायचे ठरविले त्या वेळी अस्वस्थ होणा-यांत डॉ. जयसिंगराव पवार एक होते. याचं कारण आमचे एक समान मित्र असतानाही सामाजिक कामातून चांगली माणसं जाऊ नयेत अशी त्यांची व्यक्त होणारी तळमळ त्यांना ते कळवळ्याच्या जातकुळीचे असल्याचे सिद्ध करीत होती. त्यांच्या पत्नीचा स्वभावही असाच लाघवी व समाजशील असल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे. आतिथ्यआग्रह शिकावा या उभयतांकडून. मंजूश्री डॉक्टरेट झाल्यावर त्यांनी घरी पारिवारिक स्नेहभोजन योजिले होते, ते मी कधीच विसरू शकणार नाही. पारिवारिक अनेक प्रश्नांत त्यांचा माझ्याशी होणारा संवाद हा नेहमीच आत्मीयता व्यक्त नि वृद्धिंगत करणारा राहिला आहे.
 राजर्षी शाहूकार्य म्हणजे त्यांचे जीवनसंचित. हिंदीतील प्रख्यात कथाकार संजीव एक-दोनदा काही कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला आले होते. पैकी एकदोनदा तर मीच त्यांना आग्रहाने आमंत्रित केले होते. या सहवासात संपर्कात राजर्षी शाहंवर हिंदीत कादंबरी लिहिण्याचे घोळू लागले. त्यानिमित्तानेही ते परत कोल्हापुरात आले होते. त्या वेळी संजीव जिज्ञासू असल्याने अनेक नाजूक प्रश्न विचारीत असत. डॉ. जयसिंगराव पवार शाहुभक्त असल्याने त्यांचे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. राजर्षीच्या प्रतिमेला, चरित्राला धक्का लागू नये म्हणून डॉ. पवार सचिंत असायचे. मीही असायचो. जेम्स लेन प्रकरणाचा धडा आमच्यासमोर होताच. आम्ही त्यांना परोपरीने समजावत राहायचो. त्यांच्या शंकांचं समाधान करीत प्रतिमाभंग होऊ नये अशी काळजी घ्या म्हणून सांगत राहायचो. यातूनही डॉ. जयसिंगराव पवार इतिहासातील सत्याचा अपलाप होऊ नये म्हणून घेत असलेली काळजी लक्षात घेण्यासारखी असायची.
 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन, कार्य आणि विचार यांना समर्पित व्यक्तिमहत्त्व म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांचे कार्य मी सांगावे अशातला भाग नाही. त्या कार्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता लाभली आहे. ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' हा त्याचा ढळढळीत पुरावा. सरांची ‘संशोधक म्हणून जी मूस तयार झाली तिचे शिल्पकार प्रसिद्ध इतिहासप्रेमी व तज्ज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार होत. ते कुलगुरू असण्याच्या काळातच त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या इतिहासकालीन कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली होती. शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्याच्या काळात जयसिंगराव राजाराम महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होते. डॉ. अप्पासाहेब पवारांचे कुलगुरू असूनही ‘राजाराम कॉलेजच्या इतिहास विभागात जाणे-येणे राहायचे. त्या काळात त्यांनी जयसिंगरावांमधील सव्यसाची इतिहासकार न्याहाळला, जोखला. ते एम. ए. होताच त्यांनी जयसिंगराव पवार यांना आपल्या इतिहास विभागातील मराठा इतिहास संशोधन प्रकल्प'मध्ये संशोधन सहाय्यक म्हणून आमंत्रित केले. त्यामुळे एका इतिहासकाराच्या पठडीत ऐन उमेदीत त्यांना इतिहासाचे शास्त्रोक्त धडे व शिस्त मिळाली. ती त्यांनी पुढे आयुष्यभर जोपासली. ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास, जतन, तर्कसंगती लावण्याचे प्रारंभिक धडे व संस्कार जयसिंगरावांनी इथेच गिरविले.
 नंतर सन १९६९ मध्ये ते महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सन १९७५ मध्ये त्यांनी आपल्या मूलभूत संशोधनाच्या आधारे ‘महाराणी ताराबाई' हा चरित्रग्रंथ सिद्ध केला. ते महाराणी ताराबाईंचे पहिले इतिहासाधारित चरित्र ठरले. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापुढे डॉ. धनंजय कीर, सेतुमाधवराव पगडी यांचा इतिहास वा चहिरत्र लेखणाचा आदर्श होता. सन १९७०-७५च्या दरम्यान सेतुमाधवराव पगडी यांची व्याख्यानसत्रे कोल्हापूरला होत. त्याना डॉ. जयसिंगराव पवार आवर्जून उपस्थित असत. त्याकाळात शिवाजी विद्यापीठात इतिहासकार न. र. फाटक, धनंजय कीर यांची ‘श्री शाहू स्मारक व्याख्यानमालेत' अशीच व्याख्याने होत. मार्च महिन्यात होणारी ही व्याख्याने मी गारगोटीहून येऊन ऐकल्याचे आठवते. त्यांनाही डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित असायचे असे आठवते. या सर्वांचा परिणाम त्यांच्या लेखनावर दिसून येतो.
 डॉ. जयसिंगराव पवार स्वत:ला वक्ते म्हणवून घेत नसले तरी ते व्यासंगी व विचारी वक्ते होत. मी सन २००५ मध्ये महावीर महाविद्यालयाचा प्राचार्य होण्याच्या काळात पानिपत'कार विश्वास पाटील यांची ‘संभाजी' कादंबरी प्रकाशित झाली होती. तिला मराठीतलं आजवरचं सर्वाधिक मोठं मानधन मिळाल्याने ती चर्चेत होती. आम्ही महाविद्यालयात त्या कादंबरीवर भव्य असं चर्चासत्र योजलं होतं. डॉ. जयसिंगराव पवार त्याचे अध्यक्ष होते. पानिपत'कार विश्वास पाटील स्वतः उपस्थित होते. त्यांनी कादंबरी लेखनाबद्दलची भूमिका मांडली. नंतर अनेक नामांकित समीक्षक बोलले. अध्यक्षीय समारोप डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला. त्यात त्यांनी ‘इतिहास आणि सत्य' विषयावर जे विचार मांडले, ते बिनतोड तर होतेच; शिवाय इतिहास, साहित्य, सत्य, कल्पना यांचा गोफ गुंफत त्यांनी सत्याची वलयं विशद केली होती. कादंबरी व संभाव्य सत्याचा त्यांनी मांडलेला परीघ त्यांची साहित्यिक जाण अधोरेखित करणारा होता. इतरही दोन-चार वेळी मी त्यांची भाषणे ऐकली. मुद्देसूद, माफक परंतु विषयकेंद्री वक्तव्य ही त्यांच्या भाषणाची व्यवच्छेदक वैशिष्ट्ये असतात.
 विद्यमान शाह छत्रपती महाराज डॉ. जयसिंगराव पवार यांना किती। मानतात, त्यावरूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण रेखांकित होतं. मला

आठवतं, काही वर्षांपूर्वी काही मंडळीनी कोल्हापुरात महायज्ञाचा घाट घातला होता. त्याला येथील सर्व पुरोगामी विचारांच्या व्यक्ती, संस्था व संघटनांनी विरोध करायचा ठरविले. त्याची एक जाहीर सभा बिंदू चौकात योजली होती. त्यांचे अध्यक्षपद छत्रपती शाहू महाराजांनी स्वीकारावे म्हणून आम्ही विनंती करण्यासाठी वाड्यावर जायचे ठरविले. जातानाच रिकाम्या हातांनी व नकारानि परतायचं नाही ठरवून मी कॉम्रेड पानसरे व डॉ. जयसिंगराव पवार यांना घेऊन गेलो. प्रस्ताव ठेवला. छत्रपती शाहू महाराज एकच वाक्य बोलले. डॉ. जयसिंगराव पवार आलेत. चर्चेचा प्रश्नच नाही. तसे ते सभेत आले. सभा रात्री उशिरापर्यंत चालली; पण छत्रपती चुळबूळ न करता बसून होते. अध्यक्षीय भाषणही त्यांनी केले व आमचे आंदोलन यशस्वी झाले.
 क्रमिक पुस्तकांचे लेखक म्हणून ते विद्यार्थ्यांत प्रिय आहेत. त्यांच्या सर्वच ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित होणं हे त्यांच्या लेखकाचं लौकिक यश होय. त्यांच्या पीएच. डी.च्या प्रबंधावर आधारित ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम' ग्रंथ मी पाहिला नाही. पण मूळ प्रबंध एकदा विद्यापीठात काही संदर्भाच्या अनुषंगाने पाहिल्याचे आठवते. The Maratha State Under Chatrapati Rajaram असं काहीसं नाव होतं; पण छत्रपती राजाराम महाराजांचे जीवन, चरित्र, कार्य यांचा त्यातील समन्वय शास्त्रीय होताच; पण त्याला भक्कम पुरावे देत ते मांडल्याने त्या संशोधन कार्याचा पाया मजबूत असल्याचे त्या वेळी जाणवले होते. त्यांच्या ग्रंथांना मिळालेले पुरस्कार तर अनेक, पण ‘अखिल भारतीय इतिहास परिषद'च्या वतीने त्यांनी योजलेली अधिवेशने चर्चेच्या अंगाने उजवी असत. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' त्यांनी कन्नड, तेलुगू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, आदी भाषांत भाषांतरित करून घेण्यात जी चिकाटी दाखविली, त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. संयमित सातत्य शिकावे ते डॉ. जयसिंगराव पवार यांच्याकडून हा त्यांचा वसा प्रा. डॉ. मंजूश्री पवार चालवित आहेत. याचाही मला विशेष आनंद व अभिमान आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सव प्रसंगी त्यांचे शुभचिंतन करण्यात सुहृद म्हणून हर्ष आहेच; पण त्यांनी व्यक्तिगत जीवनात जी मूल्ये जपली त्यांचा अभिमान अधिक आहे. अगदी अलीकडेच त्यांनी आपले गुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने मोठा पुरस्कार सुरू केला. तो उपक्रम गुरूविषयीची कृतज्ञता म्हणून त्यांनी सुसंस्कृतता व्यक्त करणारा ठरतो. अजब प्रकाशक : अनिल मेहता

 ‘आजमितीचे मराठी साहित्याचे अव्वल प्रकाशक कोण?' असं जर महाराष्ट्राचं सार्वमत घेतलं तर तो कौल मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेचे संस्थापक अनिल मेहतांच्या नावाकडे झुकेल, हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्याची कारणंही अनेक आहेत. एक तर अनिल मेहता महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात ‘टेंड सेटर' म्हणून ओळखले जातात. दुसरे असे की, आजचे सर्वाधिक ‘बेस्ट सेलर्स' त्यांचे लेखक होत. वि. स. खांडेकर, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, आनंद यादव अख्खे वाचायचे तर अनिल मेहतांना पर्याय नाही. अरुण शौरी, तस्लिमा नसरीन, सुधा मूर्ती, किरण बेदींची मराठी वाचकांना जर कोणी ओळख करून दिली असेल तर ती अनिल मेहतांनी. आज तद्दन मराठी प्रकाशक मूळ मराठीपेक्षा भाषांतरित साहित्य प्रकाशनात अधिक रस घेताना दिसतात. ही पायवाट मळली कोणी तर ती अनिल मेहतांनी. डॉ. राजन गवस, इंद्रजित भालेराव, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. रवींद्र शोभणे, उत्तम बंडू तुपे, बाबाराव मुसळे यांना त्यांच्या पहिल्या साहित्यिक रचना प्रकाशित करून लौकिकार्थाने लेखक जर कुणी बनवलं असेल तर ते अनिल मेहतांनी. वि. स. खांडेकरांसारख्या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या वारसांना तुटपुंजी रॉयल्टी मिळायची. सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडक देऊन लेखकाचे मानधन लेखकाला त्याच्या हयातीतच मिळावे म्हणून 'केस लॉ घडवून आणणारा प्रकाशक अनिल मेहता. मराठी पुस्तकविक्री म्हणजे उधार बाजार नि वायदे. कितीही खेटे घाला, ‘देंगे दिलायेंगे'ची भाषा. ही बिकट वाट रोखीचा धंदा सुरू करून सुखकर केली ती अनिल मेहतांनी. 'वेटलेस प्रिंटिंग सुरू करून मराठी पुस्तकांचं दर्जेदार उत्पादन सुरू करणारा प्रकाशक तो हाच. किती गोष्टी सांगू? सन १९६४ ला नुकतंच मिसरूड फुटलेला एक तरुण निपाणीचे वडिलार्जित कटलरीचं दुकान सोडून कोल्हापूरला ‘अजब पुस्तकालय सुरू करतो. पन्नास वर्षांत जागतिक कीर्तीचा प्रकाशक बनतो, हे मराठीचे अजब वैभवच नव्हे का?
 असं अजब कर्तृत्व सिद्ध करणारे मराठीतील प्रथितयश प्रकाशक अनिल मेहतांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस. ते आपल्या आयुष्याचा ‘अमृत महोत्सव साजरा करीत असताना योगायोगाने त्यांच्या प्रकाशनास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या प्रकाशनाच्या स्थापनेचा ‘सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. या दुग्धशर्करा योगाचं कौतुक कुणा मराठी वाचक, लेखक, विक्रेते, भाषांतरकार, मुद्रक, संपादकांना वाटणार नाही? त्यांना जीवेत शरदः शतम्' म्हणून शुभचिंतन करणं हा रिवाज झाला. खरं तर हा त्यांच्या कर्तृत्वाच्या कौतुकाचा दिवस व त्यांनी दिलेल्या मराठी साहित्यिक योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण!
 शहा, व्होरा, गांधी, मेहता, जैन ही नावं मराठी जनतेस सराफ कट्टयावर वाचायची सवय. मेहता नावाचा माणूस तोही निपाणीसारख्या तंबाखूच्या राष्ट्रीय पेठेत स्टेशनरी दुकान चालवितो ही स्वातंत्र्यपूर्व काळात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट. तशी ही घटना अजबच होती की धोंडीलाल वालचंद मेहतांनी अनेक व्यवसाय करीत शेवटी ते पुस्तक विक्रीवर स्थिरावले. तत्पूर्वी पूर्वजांचा सावकारीचा व्यवसाय. तो कालौघात बंद पडणं स्वाभाविक होतं. मग ते कापड विक्री, कागद विक्री, कटलरी विक्री, स्टेशनर्स होत ते पुस्तकं विकू लागले; कारण त्यांना वाचनाची आवड होती. दुस-या महायुद्धाच्या काळात धंद्यास मंदी आल्यावर या गृहस्थांनी आपल्या घरातली अख्खी लायब्ररी वाचून फस्त केली. घरचा वाचनसंस्कार ३ मार्च, १९४१ रोजी जन्मलेल्या अनिलला वारसा म्हणून मिळाला. लहानपणापासून कागद जमवायचा छंद जडला. रंगीबेरंगी कागदाचं बालपणी विलक्षण आकर्षण. मोठेपणी तरुण वयात त्याचे रूपांतर वाचनात झालं. मारवाड्याचा मुलगा पुण्यात कॉलेज शिकतो हे निपाणीकरांच्या दृष्टीने अजब गोष्ट होती; पण ‘अजब स्टोअर्स'चा तो मालक ‘अजब'च व्हायला हवा, असं शेठ धोंडीलाल मेहतांना वाटायचं. नाव शेठ असलं तरी घरी खायची भ्रांत होती; पण पोरगं शिकलं तरच दिवस बदलतील म्हणून त्यांनी अनिलला पुण्याला शिकायला ठेवलं. ‘सायन्स'साठी म्हणून फर्गुसन कॉलेजला घातलं. तिथं याचं मन रमेना ते वाचनवेडामुळे. मग ते बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दाखल झाले नि बी. कॉम. झाले. निपाणीत व्यापार चालणार नाही, हे ओळखून अनिल मेहता यांनी कोल्हापूरला कूच केली. देवचंद शहांचं साहाय्य नि आशीर्वाद लाभले नि ते कोल्हापूरला स्थिरावले. भवानी मंडप, अंबाबाईचे देऊळ, शिवाजी पुतळा, गुजरी, जुन्या राजाराम कॉलेजचा परिसर म्हणजे कोल्हापूरचं हृदय. तिथे ‘अजब पुस्तकालय' सुरू झालं ते वर्ष होतं १९६४-६५.
 पहिली पाच वर्षे त्यांनी पुस्तक विक्रेता म्हणून मोठी मेहनत घेतली. आलेल्या वाचकाला मागेल ते पुस्तक मिळवून द्यायचा रिवाज त्यांनी पाळला. त्यातून वाचकांचं मोहोळ त्यांच्या दुकानात सतत घोंघावत राहायचं. सन १९७० ला त्यांना प्रकाशक होण्याचे वेध लागले. याचंही एक कारण होतं. तोवर अजब पुस्तकालय म्हणजे साहित्यिकांचे ‘अजायब घर' झालेलं होतं. मला आठवतं, मी पदवीधर होत होतो. तरुणपणी प्राध्यापक लेखकांचं मोठं आकर्षण असायचं. आनंद यादव, बॅरिस्टर पी. जी. पाटील, प्राचार्य भा. शं. भणगे, शंकर पाटील, रणजित देसाई यांना मी पहिल्यांदा पाहिलं ते अजब पुस्तकालयातच. हे दुकान एव्हाना वाचक, साहित्यिकांचा अड्डा होऊन गेला होता.
 अशा दिवसांत बापू गावडे नामक पट्टीच्या वाचकांनी अनिलभाईंना गप्पांच्या ओघात एक किस्सा ऐकविला. अनिलभाईंनी त्याला तो लिहायला लावला. त्याची कादंबरी झाली. दस-याचं सोनं' म्हणून ती प्रसिद्ध झाली. साधा हॉटेल चालविणारा हा पैलवान गडी गल्ल्यावर बसून नित्य पुस्तकात गढलेला असायचा. 'दस-याचं सोनं' जिल्हा परिषदेनं लुटलं. अख्खी आवृत्ती खरेदी केली. अनिलभाईंना फंडा मिळाला. त्यांनी डॉ. आनंद यादव, प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. शरद वराडकर, अनंत तिबिले, बाबा कदम, शंकर पाटील यांना हाताशी धरून वाचकप्रिय पुस्तके प्रकाशित करण्याचा धडाका लावला. स्वतः चोखंदळ वाचक असल्याने मासिकांत पाळत ठेवून लेखक पकडायचे. पुढे मग इंग्रजी भाषांतराला हात घातला. 'फ्रीडम अॅट मिडनाइट मराठीत आणलं. त्यानं चांगलाच हात दिला. अनिल मेहतांनी मग मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना कोल्हापूरचं मार्केट महत्त्वाकांक्षेपुढे ठेंगणं वाटू लागलं. आनंद यादव यांचे मित्र, त्यांना अनिलभाईंनी पुस्तकाची गळ घातली. आनंद यादवांनी अट घातली, 'तुम्ही पुण्यात प्रकाशन सुरू कराल तर मी पुस्तक देईन.' कारण त्या वेळी पुणे ही मराठी प्रकाशनाची राजधानी होती. त्यांचं ‘गोतावळा' गाजत होतं. आनंद यादवांनी 'माळावरची मैना' कादंबरी अनिलभाईंना दिली आणि अजब प्रकाशनाचं रूपांतर होऊन ‘मेहता पब्लिशिंग हाऊस'ची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १९९० चं साहित्य अकादमीचे पारितोषिक डॉ. यादवांच्या 'झोंबी' ला मिळालं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसला राष्ट्रीय प्रतिष्ठा लाभली.
 तो काळ मराठी साहित्यिकांच्या दृष्टीने प्रकाशकांच्या मर्जीनुसार हप्त्याहप्त्याने रॉयल्टी घेण्याचा होता. ती हजारात मिळणं मोठी गोष्ट होती. अशा काळात सन १९९८ मध्ये विश्वास पाटील यांना त्यांच्या ‘महानायक कादंबरीसाठी १० लाख रुपये देऊन डोळे आणि उखळ एकाच वेळी पांढरे करणारे अजब प्रकाशकही अनिल मेहताच; अगदी अलीकडे त्यांनी द. मा. मिरासदारांची सर्व पुस्तके प्रकाशित केली. संचरूपात त्याची रॉयल्टी पोहोचल्यावर ‘द. मां.'चा अनिलभाईंना फोन, ‘तुमचा रॉयल्टीचा हिशेब चुकलाय का ते परत एकदा तपासून पहा. इतकी मोठी रॉयल्टीची रक्कम मी स्वप्नातही पाहिली नाही. खर्च केली तर ऋण काढूनही परत करू शकणार नाही!' असा अनुकरणीय वस्तुपाठ निर्माण करणारे अनिल मेहता.
 मराठी साहित्यविश्वात त्यांनी अनेक छोट्या-छोट्या गोष्टी रुजवत आपली अजब प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांनी पुस्तक प्रकाशनाचे देखणे कार्यक्रम सुरू केले. या कार्यक्रमांना प्रवेशपत्रिका असत. कार्यक्रम वेळेत सुरू होतं व वेळेत संपत. श्रोत्यांची वानवा असलेल्या वर्तमानात त्यांचे कार्यक्रम कायम हाऊसफुल्ल राहिलेत. त्यांनी रणजित देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू केला. त्यात अन्य प्रकाशकांच्या पुस्तकांचा, साहित्यिकांचा गौरव करण्याची उदारवादी परंपरा निर्माण केली. 'मेहता ग्रंथ जगत'सारखे ‘हाऊस मॅगेझीन घरोघरी पोहोचविले. ‘टी बुक क्लब' सुरू करून वाचनालयावर जगणाच्या मराठी वाचकांना पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय लावली, संस्कारित केले. जागतिक कीर्तीची पुस्तके, त्यांचे मराठी भाषांतराचे हक्क विकत घेऊन भाषांतरित पुस्तक वाचन संस्कृती निर्माण केली. मराठी वाचकांचे वाचन प्रगल्भ व अभिजात झाले. फ्रेंकफुर्टमध्ये (जर्मनी) संपन्न होणा-या जागतिक पुस्तक मेळ्यात न चुकता हजेरी लावणारा भारतीय प्रकाशक म्हणून मेहता पब्लिशिंग हाऊसचा आज असलेला लौकिक. त्याचं स्वप्न पाहिलं होतं अनिलभाईंनीच. 'बाप से बेटा सवाई' बनवत त्यांनी मुलाला आपल्या सुनीलला जागतिक दर्जाचा प्रकाशक बनवलं. मराठीत ई-बुक परंपरा त्यांनी सुरू केली. ‘कॉर्पोरेट शो रूम'चं स्वप्न मराठी पुस्तकांनी पाहिलं ते मेहतांमुळेच. मध्यंतरी नोबेलची राजधानी आस्लोमध्ये जागतिक मान्यवर प्रकाशकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सारे प्रकाशक जागतिक भाषांचे (इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, इत्यादी) प्रादेशिक भाषांचे एकमेव अपवाद प्रकाशक होते मेहता. अखिल भारतीय प्रकाशक संघांचे वर्षानुवर्षे पदाधिकारी असलेले अनिलभाई. त्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय अनेक पुरस्कार लाभले. मुद्रण, वितरण, उत्पादन, उत्कृष्ट साहित्य, भाषांतर, दिवाळी अंक, शासकीय सूची... कशात मेहता नाहीत हा संशोधनाचा विषय व्हावा असं असामान्य, अजब कर्तृत्व सिद्ध करणारे अनिलभाई! त्यांना दीर्घायुष्य लाभो! त्यांच्या हातून मराठी सारस्वताची सेवा अखंड होत राहो, हीच शुभेच्छा नि शुभकामना!
हरहुन्नरी शिक्षक : वसंत पाठक

 मला नापास करणारे एकच शिक्षक भेटले, ते म्हणजे पाठक सर. त्याचं असं झालं... मी नववीत होतो. आंतरभारती विद्यालयात. नेहमी पहिल्या दोनतीन नंबरात पास होणारा मी विद्यार्थी. नववीच्या सहामाही परीक्षेत नंबरात येऊनही नापासाची नामुष्की माझ्या पदरी आलेली. हिरमुसून मी आमच्या मुख्याध्यापकांकडे गेलो. मुख्याध्यापक गोंधळी सरांना मी माझं मार्कलिस्ट दाखवलं व म्हटलं, 'वर्गात तिसरा नंबर येऊनही पाठक सरांनी मला चित्रकलेत नापास केलंय!' गोंधळी सरांनी पाठक सरांना बोलावून घेतलं, विचारणा केली व पेपर आणायला सांगितला. पेपरमध्ये तीस गुण होते. मी ग्रेस पास होतो; पण नंबर येणार नव्हता. गोंधळी सरांनी पेपर उलटून पाहिला. एका चित्रावर ते थांबले नि त्यांनी पाठक सरांना विचारले, “अहो, या मुलाने चित्र काढले आहे आणि त्याला शून्य मार्क कसे?' चित्र होतं कुलपाचं. त्याचा वरचा कोयंडा काढायला मी विसरलो होतो. कोयंड्याशिवाय कुलूप ते कसले? म्हणून पाठक सरांनी त्याला शून्य मार्क दिले होते. गोंधळी सर म्हणाले, “अहो, कोयंड्याचे मार्क कमी करा हवं तर; पण काढलेल्या कुलपाला पाच मार्क तरी द्याल की नाही? नाही! असेही तरी आपण सुवाच्च लेखनाला पाच मार्क देतोच की,' पाठक सरांनी थोड्याशा नाराजीनेच केवळ मुख्याध्यापकांचा आदर म्हणून मला कुलपापोटी पाच मार्क दिले व पास झालो नि तोही नंबरात!
 पाठक सर आज निवृत्त होताना गेल्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ सहवासातील किती आठवणी आपसूकच दाटून येताहेत... त्यांचे पूर्ण नाव वसंत गोपाळ पाठक. ब्राह्मण कुटुंबात सरांचा जन्म झाला. वडिलांकडून सरांना कष्ट, प्रामाणिकपणा, प्रसिद्धीपराङ्मुखता, आदींचे संस्कार मिळाले. सरांनी ते आयुष्यभर जपले. ते मूळचे जोतिबाचे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने नरसोबाच्या वाडीस असताना तिथे त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे झाले. पुढे कुरुंदवाडच्या एस. पी. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण, सर एस. एस. सी. नापास झाले नि त्यांनी स्वावलंबनाने शिक्षण घ्यायचं ठरवून स्वबळावर पास झाले. चार आणेवारीनं पोहण्याचे वर्ग ते चालवायचे नि शिकायचे. पुढे त्यांनी खाणावळीत दहा रुपये माहवारावर वाढप्याचे काम केले. लुकतुकेंच्याकडे पेपर टाकायचे काम केले. विकास सोप फॅक्टरीतही उमेदवारी केली. लहानपणापासूनच चित्रकला, पोहणे, बासरीवादन, शरीरसंपदा कमावणे अशा विविध छंदांनी विकसित होत गेलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व. त्याला विकासाची खरी दिशा मिळाली. ते नूतन मराठी विद्यालयमध्ये चित्रकला शिक्षक झाल्याने. जुन्या हरिहर विद्यालयात मेहंदळे सरांच्या कडक शिस्तीतही त्यांनी चित्रकला शिक्षक म्हणून काही धडे गिरविले. ए. टी. डी., एस. टी. सी., सी. पी. एड. अशा पदवीपूर्ण अध्यापन पदविका नि प्रमाणपत्रे मिळवून त्यांनी आपल्यातील शिक्षक प्रशिक्षित केला व १९६३ मध्ये ध्येयवादाने सुरू झालेल्या आंतरभारती विद्यालयात ते शिक्षक म्हणून दाखल झाले. मीही त्याच वर्षी त्या शाळेत गेलो. त्यानंतर गेल्या ३५ वर्षांत शिक्षक, सहकारी, मित्र, हितचिंतक अशा विविध रूपांत त्यांचे जे दर्शन झाले, ते मनावर ठसा उमटवून गेले. सर आम्हाला भूगोल, शारीरिक शिक्षण, चित्रकला असे विविध विषय शिकवायचे. त्यांचा भूगोल धड्यातला कधीच असायचा नाही. आम्ही आठवीनववीत असताना केनिया, झांबियासारखे आफ्रिकी देश स्वतंत्र होत होते. सर । त्यांचं रसभरीत वर्णन करायचे. कधी कात्रणं, कधी तिकिटं, नाणी यांतून त्यांचा भूगोल साकारायचा. सर त्या वेळी ‘धडपड' नावाचे भित्तिपत्रक चालवायचे. मी लेखक झालो त्यांच्या या भित्तिपत्रकातून. माझी पहिली कविता ‘धडपड'मध्ये प्रकाशित झाली होती.
 सरांच्या हातात मोठी कला असायची. शोकेस सजवणं, रोजचं आकर्षक फलकलेखन, प्रदर्शनाची मांडणी, रांगोळी, रेखाटन, बँडवादन, बासरीवादन, बहुभाषी गाणी शिकविणं यातून सरांच्यातील हरहुन्नरी शिक्षक सतत झरत असायचा सर कधी कोणावर चिडलेले आठवत नाही.
 मी त्या वेळी रिमांड होममध्ये होतो. सर प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पालकांना भेटून प्रगतिपुस्तक देऊन प्रगती/अधोगतीची चर्चा करायचे. रिमांड होममध्ये आवर्जून येणारे तेच एकटे शिक्षक होते.

पाठक सरांना डायरी लिहायचा विलक्षण छंद. कोणाचा वाढदिवस म्हटलं की सर न चुकता नारळ घेऊन दारात उभे! सरांनी गेल्या ३५ वर्षांत अनेक शिक्षक सहका-यांचेच काय, पण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस व्रतस्थपणे साजरे केले! पण सरांचा वाढदिवस कोणी साजरा केल्याचे आठवत नाही.
 पाठक सर म्हणजे एक प्रयोगशील शिक्षक, सतत नवनवे प्रकल्प, छंद त्यांनी जोपासले नि रुजवले. भारतीय भाषांतील विविध गाणी सामूहिकपणे बसविण्याचे त्यांचे कसब आज ‘भारतीयम्' रूपात अवतरलेय! कबड्डी, खो-खो, लेझीम, डम्बेल्स, चुंगरू, काठी, झेंडा ड्रिल असे किती तरी प्रकार सर बंगालमध्ये शिकून आले नि सतत शिकवित राहिले.
 पाठक सर आज निवृत्त होत आहेत; पण ते माझ्यापेक्षा तरुण दिसताहेत. शरीर नि मनाची प्रच्छन्न प्रसन्नता लाभलेलं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व ‘आंतरभारती'त मात्र उपेक्षित राहिलं. पिकतं तिथं विकत नसतं हेच खरं! सरांनी पुढे मराठीचे शिक्षक म्हणून आपला असा ठसा उमटविला. बोडत श्रेणीत प्राधान्यक्रमाने उत्तीर्ण होणारे अनेक विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय पाठक सरांना देताना दिसतात. पूर्वीची ‘आंतरभारती' एक ध्येयवादी संस्था होती. व्यापार पेठेत वाढलेल्या या शाळेस देवाण-घेवाण करणाच्या पेढीचं रूप आलं ही शोकांतिकाच नव्हे का? घेण्याची सवय लागलेल्या आंतरभारती'ने शिक्षण संस्था म्हणून आपल्या पहिल्या शिक्षकास निरोप दिला नाही, हे त्याचं ठळक उदाहरण! शिक्षकाचं अढळपद विद्याथ्र्यांच्या हृदयात कोरलेलं असतं. मला खात्री आहे की, आज सरांचा सन्मान शेकडो विद्यार्थी त्यांना घरी जाऊन शुभेच्छा देऊन करतील.
 पाठक सर एक प्रवृत्त रसायन होय. निवृत्ती त्यांच्या प्रकृतीस मानवणारी नाही. त्यांनी बोर्डातील मुलांना मराठी शिकवित राहायचा संकल्प केला आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ते बालकल्याण संकुलातील मुलांना आजन्म मोफत शिकवित राहणार आहेत. त्यांच्या निवृत्तीचा हा विधायक नि उन्नायक संकल्प त्यांच्याविषयीचा आदर वर्धिष्णू करणारा आहे. पाठक सरांच्या निवृत्तीने मला एका गोष्टीची खंत वाटते आहे... ती खरं तर साच्या समाजाची खंत ठरावी... सरांच्या निवृत्तीने एका ध्येयवादी परंपरेचा अंत होतोय... माझ्यासारख्या शिक्षक झालेल्या विद्याथ्र्यांची जबाबदारी वाढली आहे... ध्येयवाद जोपासण्याची टिकविण्याची...

समर्थ चरित्र : दि. ग. गंगातीरकर

 मला काही माणसांच्या जीवनाचा मोठा अचंबा वाटत आला आहे. असं असतंच कसं मुळी सारं एकत्र? नावात पूर्ण पावित्र्य भरलेलं - दिगंबर गणेश गंगातीरकर, सारं ऐश्वर्य लोळण घालण्याची शक्यता असताना हा लक्ष्मीपुत्र सावकारीचा पिढीजात धंदा सोडून गणेश प्रासादिक सरस्वतीचा आजन्म उपासक होतो. गंगातीरीच्या ध्यानस्थ योग्याप्रमाणे सदैव कर्मशील राहतो. याचं सारं जीवन व कार्य म्हणजे समर्थ चरित्राचा उत्तम नमुना. दासबोधात समर्थ रामदासांनी आत्मप्रकाशी काही श्लोक लिहिलेत. त्यांत एके ठिकाणी ते म्हणतात, “जितुके काही उत्तम गुण। ते समर्थाचे लक्षण।।'
{{gap}]गंगातीरकर काका मला नेहमी ‘समर्थ चरित्र' वाटत आले आहेत. त्यांना मी गेली तीस वर्षे ओळखतो. पण शेजारी, आत्मीय, आप्त म्हणून गेली वीस वर्षे अगदी जवळून त्यांना पाहण्या-अनुभवण्याचा योग आला. 'वयो ज्येष्ठा, मनो युवा' म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडे एक गूढ' म्हणून पाहत आलो आहे. कुणाला सुखी माणसाचा सदरा (सॉरी- टी शर्ट) हवा असेल तर त्यांनी काकांचा घ्यावा! असं नाही की दु:ख नव्हतंच त्यांच्या जीवनात; पण या माणसाला मी कधी कुरकुरताना ऐकलंच नाही. भौतिक सार्थक्य लाभून हा माणूस कधी मातला नाही. काय अजब रसायन घेऊन आलाय हा माणूस! गृहस्थ असून योगी, संपन्न असून साधा, बुद्धिमान असून निरहंकारी, समर्थ असून नम्र, ‘कॉलनी कल्चर'मध्येही समाजशील - म्हणून तर ‘समर्थ ।।

{{gap}]काकांना मी शिक्षक झाल्यापासून ऐकून होतो. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जात असताना मी त्यांच्यातील प्रशासक अनुभवला होता. पुढे आणीबाणीच्या काळात मी शिक्षक संघटनेत सक्रिय होतो. तत्कालीन जनसंघ, लाल निशाण, समाजवादी नि काँग्रेसमधील आम्ही काही तरुण शिक्षकांनी एकत्र येऊन एक ‘फ्रंट' तयार करून सत्ताधारी (अनेक वर्षे संस्थाचालकांचे मांडलिक बनून संघटना चालविणा-या) नेतृत्वाविरुद्ध बंड केलं होतं. त्या वेळी आम्हाला बैठकांना जागा मिळणं मुश्किल होतं! काका ते द्यायचा उदारपणा दाखवायचे असं आठवतं! पुढे मी अनेक संस्थांच्या कायद्याच्या निमित्तानं त्यांचा हा देकार अनुभवलेला! १९८0 ला अनपेक्षितपणे त्यांच्या सन्मित्र वसाहतीतील घरासमोर भाड्याने राहू लागलो.
 काकांचे चिरंजीव प्रा. बाळासाहेब गंगातीरकर हे माझे महाविद्यालयातील प्राध्यापक, काकांचीच सोज्ज्वळता घेऊन आलेले आमचे सर काकांचे खरे ‘वारसपुत्र.' काकांच्या सूनबाई व आमच्या सरांच्या पत्नी प्रा. हेमा गंगातीरकर (पूर्वाश्रमीच्या मुंगळे) आमच्या महाविद्यालयातील वरिष्ठ सहाध्यायी. यांची नि माझी मुलं एक वारगीची. असा तीन पिढ्यांचा ऋणानुबंध असा जमून आला की ते केवळ शेजारी न राहता आप्त, स्वकीय, साथी, संगी, सल्लागार, मार्गदर्शक केव्हा बनले समजलेच नाही. या निकट सहवासात त्यांच्या चारित्र्याच्या समर्थ गाठी आपसूक उकलत गेल्या...
{{gap}]काका उपजत बुद्धिमान. लहानपणी ‘शिष्यवृत्ती मिळालेल्या काकांनी जाणतेपणी उत्तम ‘शिष्य संस्कृती निर्माण केली. संस्कृत, इंग्रजीसारख्या कठीण विषयांचं त्यांनी केलेलं समर्थ अध्यापन म्हणजे ‘सारस्वत साधना'. शिक्षकाबरोबरच काकांच्यात कार्यकर्त्यांचा पिंड बलवत्तर. कळत्या वयात ते संघाचे कार्यकर्ते होते; पण संघीय कर्मठता त्यांच्यात कधी दिसली नाही. ब्राह्मणी अलिप्तताही त्यांना कधी शिवली नाही. त्यामुळेच ते समाजशील राहिले व संघटकही. सचिव म्हणून प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीची धुरा सांभाळताना त्या संस्थेने आपले वैभवाचे - परम वैभवाचे दिवस पाहिले. मुख्याध्यापक असताना तर त्यांना आपल्या हायस्कूलचा ‘अमृतमहोत्सव अनुभवता आला. काकांचं समग्र आयुष्य हे अनेक वरदान घेऊन आलेलं आयुष्य! व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील सारे रौप्य, सुवर्ण, अमृत, सहस्रचंद्रदर्शन नि आता ‘नाबाद नव्वदी' उत्सव त्यांनी 'याचि देही, याची डोळा' डोळे भरून अनुभवले. ते शतायुषी झाले व त्यांच्या जिवंतपणी त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही ते अशाकरिता की हा माणूस आतून-बाहेरून समाधानी, सात्त्विक नि म्हणून समर्थ। ‘चित्ते, वाचि, क्रियायां च साधूनान एकरूपता' या उक्तीप्रमाणे यांचे चरित्र साधू नि माणसाच्या समर्थ अद्वैततेचं अपवाद उदाहरण! सारे योग एकाच जन्मी, एकाच कुंडलीत जमून येतात कसे, याचं मला म्हणूनच आश्चर्य!
 माणसं प्रवृत्त वयात क्रियाशील असतात; पण निवृत्त झाली की मात्र निष्क्रिय होतात, आळसावतात हे मी सर्वत्र अनुभवलंय! काकांचं तसं नाही. निवृत्तीनंतरही सर्ववेळ सक्रीय, समाजशील राहिलेलं हे ख-या अर्थाने स्वयंभू, समर्थ चरित्र! उमेदीच्या वयात मेहनतीनं बलदंड केलेलं शरीर उतारवयात त्यांनी आपलं मन निर्विकार ठेवून जपलं. घरात बराचसा स्वावलंबी व्यवहार. सकाळी स्वत:चा चहा, अंघोळ, कपडे धुणं - उतारवयात एकाकी असतानाही स्वतंत्र राहणं. एक कळता मुलगा दगावल्याचे निमित्त होऊन मनोदुर्बल व परावलंबी झालेल्या पत्नीचं सर्वकाही व्रतस्थ वृत्तीने करणारा हा समर्थ सत्यवान! सकाळचं प्राथमिक उरकलं की काकांचा नित्यनियमाचा ‘प्रभात संचार' सुरू होतो. गेली साठ वर्षे त्यांचे सकाळचं फिरणं म्हणजे सैनिकांचे यांत्रिक संचलन नसतं. त्यातही ते गोतावळा जमवतात व ‘प्रभात संचार मंडळ' चालवितात. संध्याकाळी ज्येष्ठांची मांदियाळी जमवितात. वसाहतीचे कार्यकारी मंडळ पूर्ण होतं ते काकांना घेऊनच. तिथे मुख्याध्यापक संघाच्या जेवणावळीची परंपरा चालवून एकोपा ठेवतात. ब्राह्मणो भोजनप्रियः' असं ते नुसतं म्हणत नाही बसत. प्राचीन वचनं ही त्यांचे आचारधर्म बनतात म्हणून ते समर्थ, ‘बहुत जनासी चालवी। नाना मंडळे हालवी।। ऐसी हे समर्थ पदवी' - असा 'दासबोधा'चा प्रत्यय देणारी त्यांची क्रियाशीलता - अनुकरणीय नि म्हणून समर्थ!
 सन्मित्र वसाहतीच्या ‘ज्येष्ठ नागरिक मंडळात सध्या पिता-पुत्र उभय ज्येष्ठ नागरिक म्हणून एकत्र बसतात तेव्हा त्यांच्या आरोग्यसंपन्न जीवनाचा हेवा तर वाटतोच; पण अचंबाही तितकाच. अजूनही सकळ इंद्रियांच्या समर्थ साथीचं जीवन!
 काकांनी प्रपंच सांडून (सोडून) परमार्थ नाही केला. नेटका संसार केला. इतका नेटका की त्यांची नात रूपा ही एकटी अमेरिकेत गेली नि स्थायिक झाली. संसारत्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता काकांनी जनामानसातील सार्थकता शोधली. नैराश्यातून येणारं वैराग्य त्यांना कधी शिवलं नाही. ते नित्य मनुष्यमात्रात गुंतून राहतात. 'हेचि माझे पंढरपूर' असा असतो त्यांचा वानप्रस्थ नाना पुराणं वाचतात ते! नाना तीर्थाटणंही केली. चक्क विश्वपर्यटन केलं; पण त्यांच्या काठीच्या टोकालाही पाश्चात्य संस्कृतीचा अहंगंध' (गंड?) लागला नाही. जनाजना लाजवी वृत्ति' असा हा ‘योगेश्वर' समर्थ। ‘आधी कष्ट, मग फळ। कष्ट चि नाही ते निष्फळ।।' हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान, त्यांची उरफोड ते कधी करीत नाहीत. केल्याची छाती फोडण्याचा अविवेकही ते नाही कधी करीत. ‘क्रिया करुनी करवावी। बहुतांकरवी।।' अशी त्यांची कार्यसंस्कृती. ‘आधी केले, मग सांगितले' असंपण नाही. ते करीत राहतात. ‘समझनेवाले को इशारा काफी' असं त्यांचं अव्यक्त सांगणं, शिकवणं असतं. त्यांचे जीवन म्हणजे मौन शिकवणी! वर्तल्याविण बोलावे। ते शब्द मिथ्या।। हे उमजलेलं समर्थ जीवन!
 काकांनी कधी कुणाचा शब्दमत्सर केला नाही की दु:स्वास! अवघेचि सुखी असावे। ऐसी वासना।।' असं मानून जगणारे काका. काकांच्या मनात हे औंदार्य कुठून यावं? मला वाटतं नित्य, नूतन हिंडण्यातून, उदंड देशाटनातून त्यांचं मन असं निष्कपट झालं असावं। विपश्यना, योग, ध्यानधारणा, मनन, चिंतन यांचा तर त्यांनी रियाज केलाच; पण 'मन चंगा तो कठौती में गंगा' हे ओळखणारा हा गंगातीरकर खरा गंगावासी वाटावा असं साधुचरित्र नि म्हणून समर्थ!
 घर बांधल्यानंतर वास्तूला पत्नीचे नाव देणारे काका मला ऊरबडवे समतावादी किंवा भोंगळ समाजवादी कार्यकर्त्यांपेक्षा अबोल आचारधर्म जपणारे समर्थ सज्जनगृहस्थ म्हणून नेहमीच अनुकरणीय वाटत आलेत. मी त्यांच्याशी फार बोललोय, त्यांची माझी फार जवळीक आहे, अशातला भाग नाही. त्यांच्या माझ्यात पिढीचं अंतर असल्यानं ते शक्यही नाही. तरीपण त्यांच्या माझ्यात एक अव्यक्त जवळीक मी नेहमी अनुभवत आलोय! हे सारं होत राहतं रोज क्षण-क्षण जपणाच्या दिव्यामुळं. अशी माणसं फार कमी असतात. भावलेलं जपणारी, जोपासणारी. काका मला आप्त वाटतात ते या भावऋणामुळे. रक्ताच्या नात्यापेक्षा जुळून आलेली - जाणीवेनी जुळलेली नाती, त्यांच्या गाठी पक्क्या असतात म्हणे. देण्याघेण्यापलीकडची नाती खरी. नाही, मी काकांचा कोणीच नाही. तरी मला त्यांच्याबद्दल असं का वाटावं? अचंबाच ना? ही सारी असते समर्थ चरित्राची किमया! राजनैतिक विधिज्ञ : अॅड. महादेवराव आडगुळे

 व्यापार, व्यवहारामध्ये सर्वाधिक महत्त्व जर कशाचे असेल तर दिलेला शब्द पाळण्याचे. आपल्या दैनंदिन व्यवहाराची सारी मदार असते शब्दांवर. रोजच्या व्यवहारात आपण सारे काही पोहोचपावती घेऊन करीत नसतो. विश्वास हीच आपल्या साच्या सामाजिक व्यवहाराची कसोटी आहे. सामाजिक नि राजकीय जीवन सतत अविश्वासाच्या ढगांनी झाकल्याचा पदोपदी येणारा अनुभव हेच सांगतो. अशा परिस्थितीत दिलेला शब्द पाळणारा, दिलेल्या वचनाला जागणारा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून अॅड. आडगुळे यांचे कार्य व कर्तृत्व अधिक मोलाचे वाटते. शब्दप्रामाण्यवादी, तळमळीचा एक निगर्वी कार्यकर्ता म्हणून मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटत आलेला आहे.
 सन १९८५ च्या सुमाराची गोष्ट. ते कोल्हापूर महापालिकेत दुस-यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे महापौरही झाले. याच काळात त्यांचा नि माझा कार्यकर्ता म्हणून संबंध आला. मी ‘रिमांड होम'चे ‘बालकुमार संकुल करण्याचा ध्यास घेतला होता. सतत नवनव्या योजना आम्ही आखीत होतो. कोल्हापूर महापालिकेने नगरपालिका असताना वार्षिक एक हजार रुपयांचे अनुदान वार्षिक पंचवीस हजार केले तरी आमच्या गरजा भागत नव्हत्या. अॅड. आडगूळे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महापालिकेने संस्थेस एक लाख रुपयांचे वार्षिक सहाय्य करण्याचे ठरविले; पण नियमानुसार एका संस्थेस पंचवीस हजार रुपयेच देता यायचे. शासन निर्णय बदलायची गरज होती.
शासनाच्या दृष्टीने हा धोरणात्मक निर्णयाचा भाग होता व त्याचा फायदा राज्यभरच्या नगरपरिषदांना होणार होता. त्या वेळी जिल्हाधिकारी अ. कृ. नंदकुमार व महापौर अॅड. आडगुळे होते. श्री. नंदकुमार काही काळ प्रभारी आयुक्तही होते. दोघांनी मनावर घेतले. त्यात मन:पूर्वक पाठपुरावा अॅड. आडगुळे यांनी केला.
 राज्याच्या नगरविकास सचिवांना या निर्णयामागील हेतू अॅड. आडगुळे यांनी समजावून सांगितला व शासनास निर्णय घेण्यास भाग पाडले. आपल्या महापौरपदाच्या कार्यकालात आमच्या संस्थेस वाढीव अर्थसाहाय्य देता यावे म्हणून त्यांनी केलेली धडपड आजही माझ्या चांगली लक्षात आहे. १९८६ च्या नोव्हेंबरमध्ये ‘बालदिनाचे औचित्य साधून आम्ही 'वात्सल्य बालसदन' सुरू केले. तत्कालीन जिल्हाधिकारी अ. कृ. नंदकुमार समारंभाचे प्रमुख पाहुणे, तर अॅड. आडगुळे अध्यक्ष असा तो कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आडगुळे यांनी महापालिकेचे एक लाखाचे अनुदान तर दिलेच; पण त्यात आणखी आपल्या नगरसेवक निधीतून एक हजाराची भर घातली. असा हा शब्दप्रामाण्यवादी कार्यकर्ता. या साच्या प्रयत्नात ‘हे मी केलं!' असा कुठे अहंभाव नाही की आविर्भाव. त्यांच्या या निष्काम कर्मवादी वृत्तीमुळे मला त्यांच्याबद्दल नेहमीच आपुलकी वाटत आली आहे.
 मध्यंतरी मी न्यायालयात गेलेलो. संस्था अनाथ मुलांचं दत्तकीकरणाद्वारे पुनर्वसन कार्य करते. त्या संदर्भात मला एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं होतं. मी न्यायालयाच्या आवारात नोटरीच्या शोधात भिरभिरत असल्याचं अॅड. आडगुळे यांनी पाहिलं नि बोलावलं. 'मी आहे की नोटरी!' म्हणत काम विचारलं. वाचून सही-शिक्का तर केलाच; पण त्यासाठी लागणारी तिकिटंही लावली. मी पैसे द्यायला लागल्यावर ते त्यांनी नम्रपणे नाकारले. “आपलंच काम आहे' म्हणणाच्या अॅड. आडगुळेना कार्यकर्त्यांच्या कामाचं मोलही असतं हे समजलं. पुढे असेच एकदा संस्थेच्या मुलास आम्ही घर मिळवून दिलं. त्यांचे कायदेशीर सोपस्कार त्यांनी सहजपणे करून दिले. फी विचारली तर सांगायला तयार नाहीत. आमच्या मुलास मी बळेने फी द्यायला लावली तर ती घेतानाची त्यांची नाराजी आजही माझ्या चांगली लक्षात आहे. गेल्या वीस वर्षांच्या बालकल्याण संकुलाच्या कामात आम्हाला अनेक वकील मित्रांनी मोलाची साथ दिली. व्यक्तिगत जीवनात पावतीच्या तिकिटाची वसुली करणारे वकील जेव्हा मी पाहतो, तेव्हा अॅड. आडगुळे यांच्यासारखं आभाळाएवढं मोठं मन असणाच्या या साहाय्यकर्त्यांचे वेगळेपण लक्षात येतं!  सन १९९६ मध्ये आमच्या 'वात्सल्य बालसदन'ला दहा वर्षे पूर्ण झाली. दशकपूर्तीचा आम्ही एक छोटेखानी कार्यक्रम केला. हे सदन सुरू करायला साहाय्य करणा-यांना आम्ही आवर्जून बोलावलं होतं. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुसुमताई वाळंजकर, डॉ. विजय करंडे, अॅड. आडगुळे अशी घरचीच मंडळी पाहणे होती. अॅड. आडगुळे संस्थेत कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी येतात. छोटे-मोठे साहाय्य करतात. त्यांच्या साच्या कृतीतून सहजतेत व्यक्त होणारा सद्भावाचा दरवळ मी नेहमी हुंगत आलो आहे.
 माझे एक विद्यार्थी प्रा. बाबासाहेब पोवार त्या वेळी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कनिष्ठ शाखेकडे काम करायचे. वरिष्ठ शाखेत हिंदी अधिव्याख्यातापद रिक्त झालेले. नियमानुसार झालेली निवड काही मंडळी मानेनात. अॅड. आडगुळेचे प्रा.पोवार निकटचे मित्र. केवळ साप म्हणून भुई धोपटायला निघालेल्या मंडळींना अॅड. आडगुळे यांनी जनमतांच्या रेट्याने दिलेले उत्तर हे त्यांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण म्हणून सांगता येईल.
 माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड, ‘सत्यवादी'कार बाळासाहेब पाटील यांच्या राजकीय व सामाजिक संस्कारांत त्यांचा पिंड पोसला. ते सतत एक कार्यकर्ता हिंतचिंतक म्हणून या दोघांच्या मागे उभे राहिले. 'सत्यवादी'कारांनी आपल्या उभारीच्या काळात कोल्हापूरचं समाजमन बदललं नि घडवलं. त्यांचं स्मारक कोल्हापुरात व्हावं म्हणून महावीर उद्यानात उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे अॅड. आडगुळे यांनी आपल्या सामाजिक संस्काराच्या नंदादीपाचं केलेलं अक्षय पूजनच! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं मोठं रामायण घडलं. मुळात हा पुतळा रंकाळा चौपाटीवर उभारण्यात यावयाचा होता. त्याला विरोध झाल्यावर त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभारून विरोधकांना दिलेली विधायक चपराक करवीरवासीय जनता कधीच विसरू शकणार नाही. छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास व्हीनस चौकासारखी जागा मिळवून देण्यात अॅड. आडगुळे यांनी मोठी धडपड केली. नगरसेवक' या पदाची प्रतिष्ठा रोज लोप पावत असताना त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेली आपली प्रतिमा ही अनेकांना प्रेरक वाटत आली आहे.
 अॅड. आडगुळे म्हणजे माणसांचं मोहळ मागे लागलेलं एक कुशल व्यक्तिमत्त्व. आपल्या अवघ्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात ते महाराष्ट्र नि गोव्याच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष झाले. यामागे कार्याची परंपरा जशी आहे तशी त्यांची अजातशत्रू मैत्रीवृत्तीही कारणीभूत आहे. ते एक कुशल नियोजक व संघटक म्हणूनही सर्व परिचित आहेत. एकदा एखाद्या व्यक्ती, संस्था, संघटनेबद्दल त्यांच्या मनात निष्ठा निर्माण झाली की ती अढळ असते. ते संघर्षात ज्या पक्षात असतात तो पक्ष विजयी समजायला हरकत नाही; कारण ते वातकुक्कुटासारखे भरकटणारे कार्यकर्ते नाही. विचारपूर्वक कृती, उक्ती नि कृतीतील अद्वैत हे त्यांच्या यशाचं खरं गमक होय. बार कौन्सिलचे अध्यक्षपद ही त्यांच्या कायकिर्दीची सुरुवात होय. भविष्यात त्यांना याहूनही अधिक धवल यश मिळावं. अशी एक हितचिंतक म्हणून शुभेच्छा! शुभास्ते पंथान: सन्तु!



पब्लिक अंकल : मुक्तेश्वर मुनशेट्टीवार

 मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांचा आणि माझा परिचय गेल्या पंधराएक वर्षांचा. महाराष्ट्रातील अनाथ, निराधार, बालगुन्हेगारांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था चालविल्या जातात. या संस्थांची एक मध्यवर्ती संस्था आहे. महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटना तिचे नाव. या संस्थेवर प्रत्येक जिल्हा संस्थेचा प्रतिनिधी येत असतो. मी कोल्हापूरहून यायचो. मुक्तेश्वर नाशिकहून. इतर प्रतिनिधींपेक्षा मुक्तेश्वरांमध्ये असलेल्या संवेदनेच्या अधिकच्या डिग्रीमुळे मी त्यांच्याकडे आकर्षिला गेलो. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतर प्रतिनिधींपेक्षा वेगळे होते. त्यांच्याकडे लक्ष जाण्याचे ते एक कारण होतेच. दाढी, खादीचा झब्बा, विजार, खांद्यावर शबनम नि भरलेलं अंग. वृत्तीनं शांत, समंजस. इतर प्रतिनिधी सभेत गळा काढून आपण अनाथांचे खरे कैवारी म्हणून आपलं धादांत खोटं रूप खरं करून दाखवत असताना मुक्तेश्वर निमूटपणे निरखत राहायचे. बहुधा त्यांच्या मनात मंडळींच्या छद्मीपणाचा पंचनामा चालत असायचा, हे त्यांच्या बोलक्या चेह-यावरून व चेह-यावरील दाढी सारणाच्या त्यांच्या अंगविक्षेपानी लक्षात येत राहायचं. मी त्या काळात संस्थेचा उपाध्यक्ष, समाजसेवा त्रैमासिकाचा संपादक म्हणून कार्यरत होतो. उपाध्यक्ष असलो तरी सक्रिय कार्यकर्ता म्हणून सर्व प्रतिनिधींशी माझा निकटचा संवाद असायचा, तसा तो मुक्तेश्वरांचाही.


 मुक्तेश्वर सभागृहात, सभेत औपचारिक फार कमी बोलायचे. त्यांचं सारं व्यक्तिमत्त्व नि कार्य याला घट्ट अशी अनौपचारिक बैठक, अधिष्ठान आहे नि असायचं. सभा संपली की यायचे. मोकळेपणानं बोलायचे. अनाथ, निराधार, मुलांचे प्रश्न मांडायचे. त्यात मूलभूत विचार असायचे. मुलांबद्दल अकृत्रिम आस्था असायची. माझा पवित्रा शासनाच्या कोडगेपणाविरुद्ध नेहमी आक्रमक असायचा. सभेस राज्यस्तरीय उच्चाधिकारी असायचे. मी प्रस्ताव, ठराव मांडले की मुक्तेश्वर उठायचे. समर्थन, अनुमोदनात्मक बोलायचे. त्यांच्या बोलण्यात तुला निर्णायक करायची तुळशीपत्राची शक्ती असायची. ती शक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपसूक यायची. ती सहज असायची. तिच्यात आत्मबल असायचं; कारण ती अनाथ, निराधार बालकांबद्दल असलेल्या असाधारण, अकृत्रिम लोभातून आलेली असायची.
 मुक्तेश्वर बैठकी, सभा, कधी-कधी संघटनांच्या कामानिमित्त कोल्हापूरला आले की अवश्य यायचे, भेटायचे, बोलायचे. विविध संस्थांना भेटी द्यायचा त्यांचा उपक्रम असायचा. यात एक गुणग्राहकता असायची. सर्व संस्थांतील चांगलं हेरायचं नि आपल्या संस्थेत ते रुजवायचं. त्यांचा हा स्वभाव मला माझ्या नाशिक दौ-यात लक्षात आला. नाशिकच्या माझ्या अनेक दौ-यांत मी त्यांचे कार्य, साम्राज्य आणि मनुष्यसंग्रह अनुभवला.
 त्यांचं रिमांड होम पाहिलं. त्या वेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ते रिमांड होममध्ये ग्रंथालय सुरू करायच्या धडपडीत होते. रिमांड होमचं बंदिस्तपण त्यांना अस्वस्थ करीत रहायचं. रिमांड होम ‘मुक्तांगण' व्हावं असा त्यांचा प्रयत्न असायचा. महाराष्ट्रातील ज्या निवडक संस्थांनी मुलींचे रिमांड होम सुरू करण्याचा, व्यावसायिक उपक्रम चालविण्याचा दूरदर्शीपणा दाखविला होता, त्यांत मुक्तेश्वरांचं नाशिकचं रिमांड होम होतं. मध्यंतरी अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे, सीमा, प्रभृतींनी महाराष्ट्रातील तेरा बालकांची हत्या केल्याचं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीला आलं. आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची मुलं नाशिकच्या रिमांड होममध्ये होती. आरोपी आता कोल्हापूरच्या कारागृहात आल्या नि त्यांनी आपली मुलं आपणाकडे असावीत, अशी मागणी केली. त्या वेळी मुक्तेश्वरांनी प्रयत्न करून ती मुलं आमच्या ताब्यात दिली. बंदी असो की बालगुन्हेगार; त्यांचे जीवन परंपरेच्या जोखडातून मुक्त व्हावं असं वाटणारे मुनशेट्टीवार हे केवळ नावाचे मुक्तेश्वर नव्हेत. हे नाव त्यांनी आपल्या कार्य नि संवेदनशीलतेतून सार्थ केलं होतं.



 नाशिकच्या माझ्या आकर्षण असण्याच्या अनेक कारणांत मुक्तेश्वर हे एक नाव होते. त्यांचं संघटनकौशल्य, सर्व संस्थांतील संसार, सारं करायचं नि नामानिराळे राहायचं. त्यांच्या या ‘लो प्रोफाईल' जगण्याची माझ्यावर विलक्षण । मोहिनी. नाशिकच्या मातीचा तो महिमा असावा. माझे नाशिकमधील कितीतरी सहकारी मित्र असेच. ‘आधाराश्रमा'चे नाना उपाध्ये, ‘सकाळ'चे उत्तम कांबळे, कवी राम पाठक, आमचे आयुक्त राहुल अस्थाना या सा-यांवर कुसुमाग्रजांच्या ‘लो प्रोफाईल'ची विलक्षण मोहिनी. विलक्षण प्रभाव! मुक्तेश्वर मला जवळचे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे सेवादल, ‘आंतरभारती'चे संस्कार. मी याच मुशीत घडलेला. मी त्यांच्यात एक खास ‘संस्कारबंधुत्व' अनुभवत आलोय.
 कुणी काही विधायक, अनुकरणीय करीत असेल तर मुक्तेश्वर मुक्त हस्ते त्याला साहाय्य करतात. समाजकार्यात हातचं ठेवून कार्य करणं त्यांना कधी जमलंच नाही, किंबहुना ती त्यांची वृत्ती नाही. मध्यंतरी उत्तम कांबळे यांनी कुसुमाग्रजांच्या इच्छेवरून कारागृहातील बंदीजनांच्या कविता संकलित करायचे ठरविले. मुक्तेश्वर त्यांच्यामागे उभे. मुक्तेश्वर हे पडद्याआडचे कलाकार. मिरवणं त्यांना जमत नाही. अन्यथा ते मोठे पुढारी व्हायला हरकत नव्हती; पण त्यांचा पिंड कार्यकत्र्याचा. पुढा-यांचं पेंढारपण हा त्यांना न शोभणारा, भावणारा भाव. त्यामुळेच ते मितभाषी पण मुक्त संचारी मुक्तेश्वर!
 मुक्तेश्वर पोटासाठी सरकारी चाकरीत; पण भाकरीशी प्रतारणा करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. शासकीय सेवेत नेहमी ते चुकलेल्या कोकरागत वावरत असतात. शासकीय सेवेत आपलेपणाचा अपवाद मुक्तेश्वरांमुळे नेहमीच उठून दिसतो. लोकांना ब-याचदा चुकल्यासारखंही वाटतं. ते ज्या पाटबंधारे विभागात कार्य करतात, तेथील एका वरिष्ठांकडे जाण्याचा प्रसंग नाशिकमधील एका मुक्कामात आलेला. त्या वरिष्ठ अधिका-यांनी मुक्तेश्वरांची मुक्तकंठाने केलेली प्रशंसा म्हणजे एक दुर्मीळ योगायोग.
 मुक्तेश्वर मुनशेट्टीवार मला नेहमीच विचारधारेचं वावडं सोडून जे जे समाजहितैषी असेल ते करणारे सर्ववेळ समाजसेवक, कार्यकर्ते वाटत आलेत. माझ्या लहानपणी ‘सार्वजनिक काका' नावाचं व्यक्तिमत्त्व अभ्यासाला होतं; पण कळत्या वयात मुक्तेश्वरांमुळे ते अभ्यासायला मिळालं. मोठ्यात मोठे व लहानात लहान होणारे मुक्तेश्वर मला नेहमी 'फ्री लान्स पब्लिक अंकल' वाटत आलेत. मुक्तेश्वर कुसुमाग्रजांचे मित्र होते हे पाहिल्यावर, अनुभवल्यावर त्यांचा मनोमन वाटलेला हेवा- मुक्तेश्वरांच्या मोठेपणाचीच पावती नव्हे का ? संस्कृत भाषा असो, अनुसूचितांचे मंडळ असो की एखादं प्रतिष्ठित प्रतिष्ठानमुक्तेश्वरांची प्रतिष्ठा सर्वत्र समभावी असते. ज्यांचं कोणी नाही त्यांचे होणारे मुक्तेश्वर म्हणून मला निराधारांचे मुक्तेश्वर वाटत आलेत. त्यांच्या कार्याचा गौरव भविष्यकाळातील नव्या पिढीत समाजशीलतेचा नंदादीप सतत तेवत ठेवील. चळवळ्या माणसाचा गौरव म्हणजे समाजातील संवेदनशीलता जपण्याची धडपड होय. मुक्तेश्वरांच्या जीवन व कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

सर्वाश्रयी दाता : बापूराव जोशी

 माणसाच्या एकमेकांच्या परिचयाच्या अनेक छटा असतात. उभं आयुष्य एकत्र घालवूनही एकमेकांना न ओळखू शकलेली माणसं जशी असतात तशी एकमेकांना फारसं न भेटता चांगलं ओळखणारीसुद्धा असतात. मी बापूसाहेब जोशींना फारसं भेटलो नाही. त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय अगदी अलीकडचा. वर्षा दोन वर्षांचा; पण मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. प्रत्यक्ष परिचयात ऐकल्यापेक्षा अधिक उजवे दिसले मला बापूसाहेब. मध्यंतरी आम्ही 'महाराष्ट्र राज्य वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केलं होतं. राज्यभरातील सुमारे शंभर अनाथाश्रम, निरीक्षणगृहांतील सुमारे २०० 0 अनाथ, निराधार मुलांना घरचा आनंद, आतिथ्य देण्याच्या उद्देशाने योजलेल्या या सोहळ्यात आम्ही ‘अन्नपूर्णेचा शोध घेत होतो नि या शोधात आम्हाला बापूसाहेब हाती लागले.
 माणसं पोट भरायला येतात आणि नशीब काढतात. बापूसाहेबांच्या बाबतीत हे तंतोतंत पटतं. गांधीहत्येनंतर ज्या अनेक ब्राह्मण कुटुंबांची वाताहत झाली, त्यांपैकी एक कुटुंब बापूसाहेबांचंही होतं. ब्राह्मण कुटुंबात बापूसाहेब जन्मले तरी भिक्षुकीची लाचारी त्यांना कधी शिवली नाही. कष्टाने त्यांनी आपली मीठ-भाकरी कमावली ती दुस-याला श्रीखंड पुरी खिलवून. दुस-यांना भरविणाच्या बापूसाहेबांनी भरपूर कमावलं ते इमाने इतबारे. त्यांच्याशी बोलण्यात,

त्यांच्या बोलण्यातूनही ही निखळता स्पष्ट होते. ते व्यवहार ठरविताना चक्क सांगतात की, मला यातून इतके मिळणार आहेत. ही सचोटी, स्पष्टता, पारदर्शिता व्यवहारात फारच कमी व्यावसायिकांत दिसते.
 बापूसाहेबांकडे जेवणाचा बेत सोपविण्यात गि-हाइकाचा फार मोठा फायदाच असतो. कोणताही बेत त्यांच्यावर सोपवावा आणि माणसांनी निश्चिंत राहावं. (खरं तर झोपावं) हरघडी धक्के देणाच्या या युगात एखादा व्यावसायिक भरवशाचा सापडणं ही काही कमी भाग्याची गोष्ट नाही. मी अनेक कुटुंबं अशी पाहिलीत की, आजोबांच्या श्राद्धापासून ते नातवाच्या बारशापर्यंतच घरात कुठलंही कार्य असो; त्यात बापूसाहेब हे गृहीत असतात. लग्न, मुंज, बारसं, डोहाळे, ओटीभरणं, साखरपुडा, एकसष्ठी, अमृतमहोत्सव... समारंभ कोणताही असो; लोक बापूसाहेबांना गृहीत धरून आखतात. त्यातच त्यांच्या व्यावसायिक तत्परतेची, विश्वासार्हतेची पोहोचपावती असते.
 कोल्हापूर क्षत्रिय पीठ, इथे एखाद्या ब्राह्मणाने पाय रोवणे सहज शक्य होते असे मी म्हणणार नाही. बापूसाहेब इथे स्थिरावले त्यामागे त्यांचे कष्टसातत्यच लक्षात येते. येथील क्षत्रिय (मी मराठे मुद्दामच म्हणत नाही!) मंडळींना मांसाहाराची चटक ज्या अनेक बल्लवांनी लावली, त्यांत बापूसाहेबांचा सिंहाचा वाटा लक्षात येतो. लहानपणी ब्राह्मणांना बाटविल्याच्या अनेक सुरस कथा ऐकल्या-वाचल्या होत्या. या ब्राह्मणाने मात्र अनेक क्षत्रियांना नुसते बाटवलेच नाही, तर मांसाहाराच्या नादी लावले असे म्हटले तर ते अतिशयोक्त न व्हावे! अनेक क्षत्रिय, सरंजामी, शहाण्णव कुळी मराठमोळ्या मावळ्यांना बापूसाहेब नामक ब्राह्मणाच्या हातातंच मटण का लागतं ते एकदा खाल्ल्याशिवाय कळणार नाही. जन्माला यावे परि कोल्हापुरी एकदा मटण खावे, अशी मनीषा बाळगून शिवशाहीतील अनेक वतनदार करवीरनिवासिनी आई जगदंबेच्या आशीर्वादास येतात, त्यामागे एक प्रेरणा बापूसाहेबांच्या हातचं खाण्याचीपण असते हे मी ऐकून आहे. बापूसाहेब ओल्या पाट्र्या करतात की नाही ते मला माहीत नाही. त्यांचे मटणही मला माहीत नाही. (आपला पंथ चुकल्याचं दुःख झोकांड्या खात हात मारणा-यांना, बापूसाहेबांच्या मांडवात पाहताना मला नेहमी होत असतं!)
 बापूसाहेब हे लोकसंग्रही गृहस्थ, त्यांच्या लोकसंग्रहात गोळवलकर ते गोबेल्स सर्व विचारवर्गाचे अनुयायी तुम्हास भेटतील. एकाच पक्षातील परस्परविरुद्ध शड्डू ठोकणारे, दोन भिन्न दिशांना तोंड असणारे प्रतिस्पर्धी एकत्र येऊन गळ्यात गळा घालतानाचे मनोरम दृश्य तुम्हास पाहायचे असेल तर मांडव मात्र बापूसाहेबांचा असेल तरच ते शक्य होईल. बापूसाहेब संघ परिवाराचे हितचिंतक म्हणून सर्वश्रुत असले तरी शेतकरी संघ, मुख्याध्यापक संघ सारखे अनेक संघ एकत्रित आणण्याचे त्यांचे कसब लक्षात घेऊनच त्यांचा ‘तो’ लौकिक पसरलेला दिसतो. एकेकाळी मुख्याध्यापक संघात ब्राह्मण मुख्याध्यापक बरेच असायचे. त्याच काळात तो संघ एकसंध होता. त्यांच्या एकसंधतेचे रहस्य बापूसाहेबांच्या सायंकाळच्या आश्रयासच दिले जायचे. बापूसाहेबांनी सिद्धिविनायक, राधेश्याम प्रभृतींच्या साक्षीने ही सारी लीला घडवून आणल्याचे आम्ही ऐकून आहोत.
 बापूसाहेब अनेक संस्थांचेही आश्रयदाते आहेत. त्यांनी कमावले भरपूर व भरभरून संस्थांना दिले. ते अनेक संस्थांच्या भोजनावळीचा ठेका घेतात. त्यात ब-याचदा पदरमोडही होत असते; पण ती पदरमोड हा त्यांच्या आनंदाचा भाग असतो. आमच्या बालकल्याण संकुलात होणा-या प्रत्येक अनाथ मुलामुलीच्या लग्नादिवशी येतील तेवढ्यांना मिष्टान्न देणारे बापूसाहेब, इतकं सारं करून नामानिराळे राहतात. स्थितप्रज्ञता, निरीच्छता त्यांच्याकडून शिकावी. परवा आमच्या मुलीचं लग्न होतं. संस्थेतील कर्मचा-यांनी कामाला हात लावला तर दोनशे रुपये काढून देणारे बापूसाहेब प्रत्येकाच्या कष्टांचे देणे देणारे तत्पर व्यावसायिकच सिद्ध होत नाही, तर आपण ज्या कष्टातून आलो त्याची जाणीव या सा-यांतून आपल्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. ते गांधी, मार्क्स कधी नमूद करीत नाहीत; तर काटेकोरपणे अमलात आणतात. बापूसाहेब अनेक संस्थांचे आश्रयदाते तसेच व्यक्तींचेही, माणसाच्या पडत्या काळात हात देणाच्या बापूसाहेबांचा हात कुणाला दिसून येणार नाही. स्वातंत्र्यानंतर ज्या काही व्यक्तींनी भूमिगत कार्य केलं त्यांत बापूसाहेब अग्रणी ठरावेत. अनेक राजकीय नेत्यांच्या निवडणुकांच्या भोजनावळी बापूसाहेबांनी घातल्या. ब-याचदा माणसं निवडून इतकी मोठी झाली की, इतक्या मोठ्या माणसाकडे पैसे मागायचे कसे म्हणून बुडीत व पडला-हरला तर जाऊ दे म्हणून सोडलेलेही बुडीत. दुहेरी बूड सोसून तरणारा हा खवैय्या दुस-यांना तारत राहतो तेव्हा लक्षात येते की, या माणसात एक वेगळेच रसायन भरलेले आहे. त्यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नाही; पण अनौपचारिक शिक्षणाचे ते द्रोणाचार्यच. त्यांच्या तालमीत अनेक शिष्य तयार झाल्याचे मी ऐकून आहे; पण त्यांची परमार्थता मला फार कमी लोकांत दिसते. त्यांची पारमार्थिकता सतत वाढत राहो व त्यांचा वरदहस्त नित्य वंचितांच्या विकासास लाभो, हीच मंगलमहोत्सव प्रसंगी कामना. 'इदं न मम'च्या निरपेक्षतेने जी माणसे नित्य प्रतिदिन समाजासाठी सतत करीत राहतात, समाज खरं तर त्यांच्यामुळेच मंगलमय होत असतो. संवेदनशील विद्यार्थी : सुनील धोपेश्वरकर

 दिनांक २३ जून, सकाळ! सकाळ कधी-कधी काळरात्र बनून येते खरी. त्या दिवशी सुनील धोपेश्वरकरांसाठी तरी सकाळ काळरात्र म्हणून नांदत होती. दक्षिणायन सुरू झालं की रात्र मोठी होऊ लागते म्हणे. ती इतकी मोठी व्हावी की काळरात्र ठरली? जगाचा भूगोल नि मनाचा इतिहास यांचा कधी मेळच लागत नाही. पुण्यनगरीचा रस्ता सुनीलसाठी तरी । अपघाती सावज शोधणारा ठरला. सुनील संवेदनशील असल्यानं अशाच माणसांशी त्याचं पटायचं. मला राजेंद्र पारिजातांचा फोन. त्यानंतर जयसिंग पाटलांचा, विश्वास पाटील, डॉ. सुभाष देसाई, डॉ. सुनील पाटील, माधव पंडित... एकापेक्षा एक संवेदनशील माणसं एकमेकाला सुनील गेल्याचा शोक समाचार कळवित राहिली. त्या सर्वांमागे सुनील जाण्याचा अनपेक्षित धक्का होता. सुनीलला बसलेल्या अपघाती धक्क्याइतकाच तो साच्या जिवंत माणसांनीही अनुभवला.
 दुपारी सुनीलच्या 'पैस' या राहत्या घरावर अपार गर्दी. मी हार घेऊन पोहोचतो; पण हार घालण्याचे धाडस काही झालं नाही. त्याचं मरण मी अद्याप कबूल केलेलं नाही. गर्दीत सर्व क्षेत्रांतील निवडक संवेदनशीलच उपस्थित होते. कोल्हापुरातील संवेदनशील माणसांचा माझा सव्र्हे त्या दिवशीच पूर्ण झाला. जाहिरातदार, पत्रकार, व्यावसायिक बांधीलकी म्हणून उपस्थित नसल्याचं त्यादिवशी प्रकर्षाने जाणवलं! सर्वांची उपस्थिती माणुसकीची प्रचिती देणारी होती असं फार कमी वेळा घडतं.  यात सुनीलचं जगणंच प्रतिबिंबित झालेलं. सुनील कोण नव्हता? मित्र, लेखक, कवी, कलाकार, जाहिरातदार, भूमिगत समाजसेवी, अभिनेता, संघटक, योजक, कॉपी रायटर, संगीताचा दर्दी, समाजनिरीक्षक, गैरतेचा विरोधक, सगुण उपासक, सुंदर पत्रलेखक, व्याख्याता, प्रशिक्षक, कुटुंबवत्सल, सहनशील व्यावसायिक, गुणग्राहक, समाजहितैषी... कोण नव्हता तो! म्हणून त्याच्या जाण्यानं सर्वक्षेत्री, सर्वथरी हळहळ होती. तसा तो कोणी पदाधिकारी, पुढारी नव्हता; पण त्याच्यातलं माणूसपण मात्र पक्क होतं. कोल्हापूरशी त्याचं अद्वैत होतं. इथल्या मातीशी त्यानं आपली नाळ जोडली होती. क्लब, संस्था, संघटना, पत्रे, पुढारी, साच्यांशी त्याचं जमायचं नि खटकायचं; पण खटका त्यानं कधी उडू दिला नाही. असा तो समंजस होता खरा!
 कोल्हापूर संवेदनशीलांचं सरोवर. सुनील या सरोवरातील कमळ शोभावा असा. त्याच्या गुलाबी मनाच्या पाकळ्या, गुणग्राहकतेचा पराग, सर्वांना कवटाळणारी त्याची लांब देठं... न दिसणाच्या परंतु सतत वळवळत राहणा-या संवेदनशीलतेच्या मुळ्या या सरोवरात सर्वत्र पसरलेल्या होत्या. म्हणूनच की काय तो कोणीही नसताना त्याच्या अपघाती निधनानंतर माणसांचं मोहोळ सुरू होतं. स्वत:ला विसर्जित करू शकणारा माणूसच सर्वांचा होऊ शकतो ना? असं होणं मात्र दुर्मीळ असतं खरं!
 सुनीलची नि माझी पहिली भेट ‘आंतरभारती'तील. मी त्या काळात वरच्या वर्गात शिकवायचो. एकदा ऑफ तासाला म्हणून आरवाडेंच्या बिल्डिंगमध्ये भरणाच्या पाचवीच्या वर्गावर गेलो असता तो मला पहिल्यांदा भेटला. पहिल्या बाकावर उभारून मुलांना गप्प करणारा सुनील. हातात फूटपट्टी पट्टी की तो मोठा असा भ्रम व्हावा इतकाच निष्पाप, निरागस सुनील!
 परत त्याची भेट झाली ती बहुधा कोरगावकर हायस्कूलला. तेव्हा शाहूपुरीतून आठवीच्या मुलांची आयात केली होती. त्यातून तो आला असावा. पण मला तो आठवतो तो एस. एस. सी.तला सुनील, सुंदर अक्षरांत गृहपाठ लिहिणारा. नियमित प्रश्नोत्तरांत पटाईत. निबंधातील त्याचं लालित्य मला त्या वेळीही हरवायचं नि आजही.
 मग मी सुनीलला आठवतो तो डॉ. आठल्यांच्या हॉस्पिटलमधला. ऐन एस. एस. सी. परीक्षेत त्याचं ऑपरेशन झालेलं. परीक्षेला बसणारच म्हणून त्यानं हट्ट धरलेला. मी वर्गशिक्षक होतो त्याचा. वडील उजडायच्या आधी घरी काळजीत डुंबलेले. सुनीलला समजावा म्हणून माझ्याकडे आलेले. तसाच गेलो मी... समजावलं. त्यानं ऐकलं. वडिलांचा जीव भांड्यात पडला. बाहेर येऊन पायरीवर बसून ओक्साबोक्शी रडलेले त्याचे वडील, पित्याचं ते अपयशी आक्रंदन, पिळवटणारं होतं.
 पुढं सुनील ऑक्टोबरला बसला नि बोर्डात आला. बोर्डात येणारा तो ‘आंतरभारती'चा पहिलाच विद्यार्थी. तो डॉक्टर, इंजिनिअर होणार हे गृहीत. नंतर एकदा मी त्याला विनायक स्टॉपवर पाहिलं. 'कुठं? विचारताना राजाराम कॉलेजवर अॅडमिशन घेतलं म्हणाला. “काय करतोस? ‘बी. ए.' त्याचं उत्तर सहज होतं; पण त्यात सहजता नव्हती. घरचे प्रश्न होते. त्यामागे सुनीलला प्रश्न पचवायची, पेलायची नि लपवायचीही सवय जुनीच म्हणावी लागेल. खरा सुनील त्या दिवसापासून मला समजू लागला.
 काही दिवसांनी तो चक्क काळा डगला घालून कोर्टात जाताना दिसला. 'हे रे काय?' म्हणताना, ‘वकिली जमते का बघू' म्हणाला. ती जमणारं रसायन त्याच्यात नव्हतंच मुळी! पुढं तेच झालं. त्यानं काळा कोट उतरवला.
 चकवा नि सुनीलची घट्ट मैत्री, मी त्याच्या लहानपणापासून अनुभवत आलोय. सुनीलबद्दलच्या माझ्या गृहितांना तो नेहमी चकवतच आलाय! चकवा त्याची वृत्ती नाही. परिस्थितीनं प्रत्येक वेळी त्याला चकवलं, दुखवलं, साठमारी केली. परिस्थितीनं त्याची हरघडी, हरक्षणी, शेवटच्या क्षणी तर चक्क तो वाटमारीचाच बळी ठरला...
 प्रसिद्धीच्या झोतात सुनील मला कधीच दिसला नाही. आंधारवेड होतं त्याच्यात. भूमिगत होऊन पुरुषार्थ एंजॉय करणारा सुनील खुललेल्या कळीसारखा आनंदी असायचा. दडलेलं रत्न असलेला सुनील नंतर ‘जयेंद्र'मध्ये बसू लागला. वडील रिटायर्ड मूडमध्ये जे कृष्णमूर्ती झालेले नि सुनील बाबांचं सारं उपसत होता. मोठी दमछाक व्हायची त्याची त्या काळात, घुसमटही मोठी असायची. व्यक्तिगत आयुष्याबद्दल मितभाषी असलेला सुनील सामाजिक जीवनाबद्दल मात्र परखड होता.
 जयेंद्र पब्लिसिटीची कल्पक जाहिरातदार म्हणून ख्याती होती. माधवराव धोपेश्वरकरांनी ती ख्याती रुजवली, जोपासली. सुनीलला ही परंपरा जपायचं आवाहन, आव्हान देत राहायची.
 व्यवसायातील अवैध स्पर्धेबद्दल सुनील नाराज असायचा. आपले वैध मार्ग कुचकामी ठरतात म्हणून तो अस्तित्वाची लढाई रोज नव्या मार्गांनी, नव्या शस्त्रांनी करीत राहायचा. या लढाईनं त्याला कधी नेत्रदीपक यश जरी दिलं नाही तरी तो लढाईत अस्तित्व टिकवून राहिला. मनुष्यसंग्रह हे त्याचं बळ होतं. सौजन्य हा त्याचा शिष्टाचार होता. 'ग्राहक देवो भव' नावाखाली त्यांनी
ग्राहकांना भरपूर सहन केलं. ग्राहक, वृत्तपत्रे इत्यादींबद्दल तो खासगीत बरंच नि खरं बोलत राहायचा. त्याचं प्रत्येकाशी भांडण असायचं. या भांडणाच्या मुळाशी एक भांडण मोठं होतं. त्यानं स्वत:च स्वत:शी केलेलं. त्यामुळे तो सतत अस्वस्थ आत्म्यासारखा असायचा. बेचैनी हे त्याचं रक्त होतं, वृत्ती होती.
 जाहिरात हा त्याच्या पोटापाण्याचा व्यवसाय होता खरा; पण कविता, साहित्य, संगीत, नाटक, अभिनय ही त्याच्या स्वैर मुशाफिरीची क्षेत्रं होती. साहित्यातील कोणत्याच अंगणाचं त्याला वावडं नव्हतं. मराठी, इंग्रजी, विशेष वाचायचा. वाचन इतकं प्रगल्भ की त्याचा प्राध्यापकी, दिखाऊ खळाळ कधी कुणी ऐकला तर कळवावा. ललित लेखन त्यांची मिरासदारी होती. पाऊस, फुलं, रस्ते, इत्यादींवरचं त्याचं ललित लेखन मराठी सारस्वतातील नजराणे ठरावेत. तो स्वत:साठी लिहायचा. त्याचं सारं जीवन ‘स्वान्त सुखाय' होतं की नाही माहीत नाही; पण ते आत्मरत खचीतच होतं. खरा सुनील कुणालाच कळला नाही.
 तो लग्नाला टाळाटाळ करायचा. मानगुटीवर बसून त्याचे आप्तांनी लग्न केलं. मग लग्नच त्याच्या मानगुटीवर बसलं. परत ब्रह्मचाच्यासारखा काही काळ तो सरलष्कर पार्कमधल्या फ्लॅटमध्ये राहत होता. तेव्हाची एक संध्याकाळ मला आठवते. त्या संध्याकाळी भाऊ, आई, बाबा, आप्त, भागीदार, पत्नी अशी न लिहिलेली कितीतरी खाती त्यानं उलगडून दाखवली नि मग मला सुनील थोडा उमजला.
 त्याला संगीताची आवड नि जाण होती. अशा कार्यक्रमातील त्याची हटकून असणारी उपस्थिती दर्दी असायची. कार्यक्रम झाल्यावर एखाद्या शब्द, वाक्यातील त्याची दाद भावगंध असायची. नाटक, अभिनयाचं काय सांगावं? अभिनयाचं रौप्यपदक मिळविलेला सुनील, त्याचा रंगवलेला चेहरा मात्र मला चुकलाच. दोनदा आग्रही निमंत्रणांनंतरही!
 जयेंद्रच्या दारातील होर्डिंग अख्ख्या कोल्हापूरचं मनोगत असायचं. कोल्हापूरचं पाणी प्यायचं कोणी?' म्हणून केलेला प्रश्न महानगरपालिकेस चांगलाच झोंबला होता. त्या वेळी काही अधिकारी त्याला दटावते झाले. मग सारं निवळलं. पाणी मात्र अजून गढूळच. स्टेशन रोडवरील जीवघेणी वाहतूक पाहून एकदा त्यानं लिहिलं, 'स्टेशन रोड सुरक्षित ओलांडल्याबद्दल अभिनंदन! त्याचं हे होर्डिंग प्रत्येकाच्या मनातील गुपित असायचं. गणेशोत्सवातील धांगडधिंगा पाहून त्यानं लिहिलं होतं, ‘गणपतीला हळू आवाज आवडतो. जिल्हाधिकारी अरविंद सिंहना ते खूप आवडलं होतं. अगदी ताजं होर्डिंग ‘कोल्हापूर नगरी खास, इथं भरपूर डास!' स्थळ, काळ, वेळ यांचे सुनीलचं त्रैराशिक वाखाणण्यासारखं होतं.
 त्याने ‘आसमा' स्थापन केली. परस्पर' हा काव्यरसिकांचा ग्रुप चालविला... हेल्पर्स, बालकल्याण संकुलाची नेहमीची कल्पक, समाजहितवर्धक निमंत्रणं... हा त्यांचाच आविष्कार नि निर्मिती असायची. सामाजिक संस्थांबद्दल त्याच्या मनात एक उमदी उदारता असायची. या संस्थांची कामं तो तत्परतेनं, आत्मीयतेनं करायचा. बिलं मागायला मात्र कधी तो गेला नाही. अगदी निकडीच्या काळातही त्याचा मोकळा हात असायचा. तसं त्याचं मनही!
 सुनील हळवा असायचा. केवळ मनसोक्त, दाबलेलं रडं ओकण्यासाठी तो अनेकदा हक्कानं माझ्याकडे यायचा. काही बोलायचा नाही, सांगायचा नाही, हमसून रडायचा नि उठून जायचा. मला विचारायचं धाडस व्हायचं नाही; कारण रडण्यामागील सारी अरिष्टं मला अगोदरच माहीत असायची.
 मी बालकल्याण संकुल सोडलं तेव्हा तोच माझ्यापेक्षा अस्वस्थ, बैचेन होता. विश्वस्तांकडे जाऊन भांडला, माझ्याकडे आला, 'तुम्ही काही करणार असाल तर मला गृहीत धरा' म्हणाला. आपणाला गृहीत धरता यावीत अशी किती माणसं जीवनाच्या प्रवासात भेटतात? गृहीतं खोटी ठरणारीच अधिक नां!
 नित्य-नव्या कल्पना, मुशाफिरीत रमणारा सुनील, व्यवसायात रोज नवीन प्रयोग करीत राहायचा. आसमा, इव्हेंटनंतर त्याला ई मीडिया खुणवत होता. काही वर्षांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया'त त्याची जाहिरात झळकल्यानंतर हरकून गेलेला सुनील मी विसरू शकत नाही.
 अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांत तो व्याख्याने द्यायचा. दोन वर्षांपूर्वी प्राध्यापकांच्या प्रशिक्षण वर्गात त्यानं ‘मीडियावर केलेलं व्याख्यान मोठं आश्वासक होतं नि आत्मविश्वासपूर्णही! व्याख्यानात चिमटेही असायचे. जयेंद्रचा त्यानं साजरा केलेला सुवर्णमहोत्सव त्याच्या परिश्रमी योजकतेचा आरसाच होता. घाटगे-पाटील, पेरिना, वारणाच्या त्याच्या जाहिराती लक्षवेधी ठरल्या. जाहिरातींची त्याची कॉपी (मजकूर) त्याच्या सर्जनशील मनाचा कवडसा असायची. मोठा संयमी होता तो. दस-याला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षणाचा पर्याय स्वीकारणारा तो मनानं खरा पोक्त, प्रौढ होता.
 रवींद्र उबेरॉयनी मध्यंतरी ज्ञानेश सोनारांचा कार्यक्रम योजलेला. सुनीलला भावला. त्यानं मन:पूर्वक अभिनंदन पत्र लिहिलं. त्याच्या पत्रात मतलब (अर्थ) असायचा; पण मतलबीपणा मात्र कधी त्याला शिवला नाही. अरुण नरकेंसारखी सभ्य, सुसंस्कृत माणसं राजकारणात कशी? अशी विचारणा करणारा सुनील साच्या कोल्हापूरकरांचं प्रतिनिधित्व करून जायचा. कोल्हापूर आकाशवाणीच्या नीता गद्रेचा ‘अथांग' कथासंग्रह वाचून त्यांना पत्र लिहिणारा सुनील मराठी साहित्याचा चोखंदळ वाचक होता, हे कळायला वेळ लागत नाही. अलीकडेच सुनीलनं मला लिहिलेलं पत्र बहुधा ते त्याचं शेवटचं पत्र असावं. ‘खाली जमीन, वर आकाश'च्या एका भागात मी त्याचा उल्लेख केलेला. वाचकांचे अनेक फोन त्याला जातात. खुलून आलेला तो सुनील पत्रात प्रतिबिंबित होता. अध्र्या हळकुंडानं पिवळा व्हावा असा तो चिल्लर नव्हताच मुळी. त्याला आत्मभान होतं, हे पत्रातून जाणवत राहिलेलं. तो कुशल पत्रलेखक होता. त्या पत्रावर चुकून त्याची सही राहिलेली. मी वेड्यासारखा त्याच्याकडे जाऊन करून घेतली. ऑटोग्राफ घ्यावा तशी. तो माझा विद्यार्थी होता. लौकिक अर्थांनी आता तोच माझा अलौकिक शिक्षक झाला आहे. मी सही घेतली एका अर्थानं बरं झालं, अन्यथा त्या संग्राह्य पत्राची काय पत्रास राहणार होती? ते पत्र त्यानं माझ्याशी केलेला शेवटचा आत्मसंवाद. आता तोच माझा अमोल ठेवा झालाय. तो गेल्यापासूनच्या गेल्या तीन दिवसांत तीसेकदा तरी मी ते पत्र वाचलं. ते त्यानं आपल्या मित्रमंडळात सामूहिक वाचलं होतं, असं स्मशानभूमीत मला कळलं तेव्हा त्याच्या संवेदनशीलपणाची नवी जाण आली.
 सुनीलची नि माझी शेवटची भेट कोल्हापूर आकाशवाणीमधली. तो सपत्निक नटून रेकॉर्डिंगला आलेला. ग्रीष्मातली फुलं त्यानं मला नि श्रोत्यांना रणरणत्या उन्हात फुलवून दाखविली. त्याचं ते शेवटचं भाषण फुलून आलेलं ऐकलं. ते परत ऐकायला हवं. सुनीलच्या व्यक्तिमत्त्वात गगनजाईची शुभ्रता, उच्चभ्रूपणा, सुगंध, हिरवाई सारी उत्तुंगता सामावलेली होती. अशी निष्कपट ऋजुता या मातीत परत रुजणे नाही. सुनीलच्या जाण्यानं मला दु:ख वाटण्याचं कारण इतकंच! त्याचं जीवन एक करुण गाणं होतं! समाजसेवी उद्योगपती : वसंतराव घाटगे

 भारत १५ ऑगस्ट, १९४७ रोजी ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र बनले. स्वतंत्र राष्ट्रासाठी त्या देशाची घटना, कायदेमंडळ व मंत्रिमंडळ लागतं. त्याची तयारी लगेचच सुरू झाली. देश स्वतंत्र झाला तेव्हा मुंबई इलाख्यासाठी मुंबई मुलांचा कायदा १९२७' अस्तित्वात होता. देश स्वतंत्र झाल्यावर जुना कायदा या देशाच्या गरजा व स्वातंत्र्यानंतर बदललेली राजकीय, सामाजिक, स्थिती लक्षात घेऊन बदलण्यात आला. सामाजिक कायदे बदलण्यात येऊन त्यात प्रशासनाबरोबरच लोकसहभाग, समाजाच्या भागीदारीस महत्त्व देण्यात आले. कायद्यात होणारे हे बदल हा देश लोकशाहीचा, प्रजासत्ताक होणार याची ती नांदीच होती. सन १९४८ मध्ये सन १९२७ चा मुंबई मुलांचा कायदा दुरुस्त करण्यात येऊन उनाड, भटक्या, बालगुन्हेगार बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रिमांड होम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रिमांड होम्स चालविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तेथील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायाधीश यांच्या पुढाकारासह स्थानिक स्वराज्य संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, महिला मंडळ, रेसिडेन्सी क्लब, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन 'डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन' ही संस्था स्थापन करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी तत्कालीन बॅकवर्ड क्लास वेल्फेअर डिपार्टमेंटकडे सोपविण्यात आली. त्या वेळी या डिपार्टमेंटमध्ये 'करेक्शनल अॅडमिनिस्ट्रेशन' असा भाग होता. तो तुरुंग व बोर्टल स्कूल्स पाहत असे.
 देश स्वतंत्र झाला तरी कोल्हापूरचा कारभार संस्थानामार्फत चालायचा. ‘गव्हर्मेंट ऑफ कोल्हापूर' याच नावाने स्थानिक कारभार हाकला जाई. व्यंकट सुब्रह्मण्य अय्यर नंजाप्पा हे आय. सी. एस. अधिकारी कोल्हापूरचे मुख्य प्रशासक होते. ते गरजेनुसार ब्रिटिश व संस्थानी पोशाख धारण करीत. संस्थान दरबारात चक्क फेटा, तुमान, तलवार लेवून ते उपस्थित असत; तर आपल्या कार्यालयात सुटाबुटात असत. प्रसंगी टाय, हँट परिधान करीत. स्वारी कधी मोटारीतून फेरफटका मारायची, तर कधी चक्क घोड्यावरून रपेट करायची. पुढे-मागे कॅनव्हाय तर कधी लवाजामा असायचा. थाट राजापेक्षा कमी नसायचा. कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक होता. ते सेनेत असताना कॅप्टन होते.
 कॅप्टन व्ही. नंजाप्पांनी चीफ अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून आपल्या होम डिपार्टमेंटच्या वतीने ३१ डिसेंबर, १९४८ रोजी एका पत्रान्वये रिमांड होम स्थापण्यासाठी म्हणून सात सदस्यीय अस्थायी समिती नेमली. रावसाहेब व्ही. जी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीत प्रिं. अॅड. शं. गो. दाभोळकर, श्रीमती इंदिराबाई देशपांडे, श्री. वसंतराव घाटगे, श्री. एल. पी. वालावलकर, श्री. डी. जे. जाधव (आय. जी. प्रिझन), प्रा. एन. जी. शिंदे यांचा समावेश होता. या समितीने सहा महिने अभ्यास, दौरा, पाहणी करून रिमांड होम स्थापनेचा अहवाल कोल्हापूर सरकारला सादर केला.
 सदर अहवाल मान्य करून कॅप्टन व्ही. नंजाप्पा यांनी कलेक्टर ऑफिसच्या मेन हॉलमध्ये दि. १३ जुलै, १९४९ रोजी बैठक बोलावली. त्या सभेला मुंबई सरकारचे रिमांड होम इन्स्पेक्टर श्री. वझे उपस्थित होते. कोल्हापूरला येण्यापूर्वी कॅप्टन व्ही. नंजाप्पा हे नाशिक व कारवार इथे चीफ अॅडमिनिस्ट्रेटर होते. तिथे त्यांनी रिमांड होम्स सुरू केली होती. ती चांगली चाललेली होती. त्याचा फायदा इथली संस्था स्थापन करण्यात झाला. त्यांच्या पत्नी ललितादेवीपण या कार्यात रस घेत असत. या सभेला सुमारे ४0 लोक उपस्थित होते. त्यात नगराध्यक्ष मामासाहेब मिणचेकर, डी. एस. पी. रोच, सिव्हिल सर्जन डॉ. खानोलकर, जिल्हा न्यायाधीश एस. एच. नाईक, रेव्हरंड नॅप, मदनमोहन लोहिया, रावसाहेब व्ही. टी. पाटील, शिक्षणाधिकारी श्री. कोल्हटकर, शेठ रामभाई सामाणी, प्रिं. दाभोळकर, वसंतराव घाटगे, इंदिराबाई देशपांडे, अहिल्याबाई दाभोळकर, शां. कृ. पंत वालावलकर, प्रभृती मान्यवर उपस्थित होते.
 सभेत ‘डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन'ची स्थापना करण्यात येऊन कार्यकारी मंडळ निवडले गेले. कॅ. व्ही. नंजाप्पा (अध्यक्ष) प्रिं. शं. गो. दाभोळकर (उपाध्यक्ष), केशवलाल व्होरा (खजिनदार), व्ही. एम. घाटगे (ऑनररी सेक्रेटरी) मुक्रर करण्यात आले. पद्माळा रेसकोर्सचा सारा परिसर रिमांड होमला देण्यात आला. कार्यकारी मंडळाची निवड होताच तिची स्वतंत्र बैठक सभेनंतर घेण्यात आली. विविध समित्या नेमल्या गेल्या. बँक ऑफ कोल्हापूरमध्ये बचत खाते उघडायचे निश्चित करण्यात आले. स्थापनेसाठीची सारी तयारी वसंतराव घाटगे यांच्यावर सोपविण्यात आली. पूर्वतयारी करून महिनाभरातच रिमांड होम प्रत्यक्ष सुरू झाले.
 रिमांड होमचे उद्घाटन ३० ऑगस्ट, १९४९ रोजी ललितादेवी नंजाप्पा यांच्या शुभहस्ते सायंकाळी चार वाजता ग्राउंड स्टैंड, पद्माळा रेसकोर्स येथे झाले. रिमांड होमचे शासननियुक्त सुपीरिटेंडेंट म्हणून श्री. मुद्देबिहाळकर रुजू झाले. अवघ्या चार मुलांनिशी त्यांनी ही संस्था सुरू झाली. हे राज्यातील २४ वे रिमांड होम होते. पहिल्या वर्षी संस्थेने ४५ मुले व ४ मुलींचा सांभाळ केला. मुली अनाथ हिंदू महिलाश्रमात ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या वर्षी संस्थेने ९२२५/- रुपये जमा केले. पहिली देणगी रु. १000/- रामभाई सामाणी यांनी दिली. सभासदांनी प्रत्येकी ४0/- रुपये दिले. वर्षाचा खर्च रुपये ७९५१/- इतका झाला. ९ नोव्हेंबर, १९४९ रोजी कोल्हापूरला 'बॉम्बे चिल्ड्रेन अॅक्ट १९४८' लागू झाला. त्यानुसार १ ऑगस्ट, १९५० रोजी ‘ज्युव्हेनाईल कोर्ट स्थापन झाले. श्री. राजे हे पहिले न्यायाधीश होते. लेडी ऑनरररी मॅजिस्ट्रेट म्हणून डॉ. अहिल्याबाई दाभोळकर, इंदिराबाई देशपांडे व रमाबाई शिरगावकर नेमल्या गेल्या.
 संस्थेत शेती, कुक्कुटपालन, लेझीम, बँडपथक, स्काउट पथक सुरू करण्यात आले. शासन त्या वेळी प्रत्येक मुलामागे मासिक १८ रुपये आँट देई. कलेक्टरांसह सर्व अधिकारी व सभासद दरमहा ५ रु. वर्गणी देत असत.
 रिमांड होमच्या स्थापनेत संस्थापक-सचिव श्री. वसंतराव घाटगे यांचा सिंहाचा वाटा होता. कॅप्टन व्ही. नंजाप्पा यांनी नेमलेल्या अस्थायी समितीत ते सक्रिय होते. नंतर जे स्थायी कार्यकारी मंडळ नेमले गेले त्यात ते सचिव
झाल्यावर सर्व बैठका योजणे, इतिवृत्त नोंद, दैनंदिन संस्था भेट, देणगी जमा करणे ही कामे ते हिरिरीने करीत. सलग दोन वर्षे ते रिमांड होमचे सचिव होते. स्थापना सभेत रिमांड होम स्थापन करण्याचा ठराव प्रिं. दाभोळकर यांनी मांडला होता. वसंतराव घाटगे यांनी त्या ठरावास अनुमोदन दिले होते. स्थापनेनंतर सुमारे ५० मुलांची सोय करण्यासाठी आवश्यक ती खरेदी, जुळवाजुळव, देखभाल करण्याचे प्रत्यक्ष काम वसंतराव घाटगे यांनी केले होते. श्री. वसंतराव घाटगे रिमांड होम राज्य संघटनेचे सदस्यही होते. आजचे बालकल्याण संकुल म्हणजेच पूर्वीचे रिमांड होम, हे फार कमी लोकांना माहीत असेल. यावरून वसंतराव घाटगे यांच्या कार्याची दृष्टी व योगदान लक्षात येईल. व्रतस्थ वारस : प्रा. मंदाकिनी खांडेकर

 मंदाकिनी खांडेकर त्यांनी माझ्यावर दोन जबाबदा-या सोपविल्या होत्या. एक म्हणजे वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची उभारणी आणि दुसरी वि. स. खांडेकरांच्या समग्र अप्रकाशित नि असंकलित साहित्याचे संपादन. पैकी पहिली मी सन २०१२ ला पूर्ण करून संग्रहालयातून । स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. दुस-या प्रकल्पात २५ पुस्तक संपादित करायची होती. योगायोग कसा असतो पहा. मी नुकतंच शेवटचं पुस्तक ‘वैनतेय' हातावेगळं केलं नि माझे फोन घणघणू लागले. बिपीन देशमुख, सतीश पाध्ये, प्राचार्य डी. आर. कोण्णूर, प्रभाकर वर्तक, द्रौपदी उगळे, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत... सगळे विचारत होते, मंदाताई गेल्या, कळलं का?... कुणाला मंदाताईंची सविस्तर माहिती हवी होती. माझं मन सांगत होतं... हे शेवटचं पुस्तक व्हावं म्हणूनच त्या आपले प्राण कुडीत साठवून होत्या. मंदाताई गेल्याचं कळलं नि मी कोसळलो. तरी श्रद्धांजलीला माझे पाय वळले नाहीत. लोकरहाटीला शह देत मी निमूट राहिलो. ज्या प्रियजनांनी आपल्याशी तात्त्विक अबोला धरला त्याना आपली श्रद्धांजलीही अबोलच असायला हवी. तिकडे मंदाताईंवर अग्निसंस्कार सुरू आहेत अन् इकडे ही मी शब्दकुसुमावली गुंफतो आहे...
 मंदाताईंना मी सर्वप्रथम पाहिलं ते बी. टी. कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणून. त्या आंतरभारती विद्यालयात बी. टी. कॉलेजचे विद्यार्थी पाठासाठी, पाठनिरीक्षणासाठी यायच्या. साडीवर कोट घालून लुनावरून फिरणाच्या त्या कोल्हापुरातील पहिल्या आधुनिक महिला म्हणून त्यांचं आकर्षण, जिज्ञासा,
कुतूहल माझ्या पिढीस असायचं. देशात आणीबाणी असतानाच्या काळात आमच्या 'आंतरभारती'मध्येही आणीबाणीसदृश परिस्थिती होती. आम्हा शिक्षकांचं आंदोलन सुरू होतं. वि. स. खांडेकर संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी संपर्काचा दुवा होत्या मंदाताई. मंदाताईंना गैर खपायचं नाही. त्या शिस्तीच्या मोठ्या भोक्त्या. पत्नीचं निधन झाल्यावर भाऊंनी (वि. स. खांडेकरांनी) सन १९५८ नंतर पाच मुला-मुलींचं घर ज्या धैर्यानं सांभाळलं, मंदाताईंनी आपला भाऊ अविनाश लग्न होऊन स्वतंत्र राहू लागल्यावर तितक्याच समर्थपणे भाऊंना आणि अन्य भावंडांना आधार दिला. केवळ भाऊंना सांभाळायचं म्हणून त्यांनी अनेकांचे रोष पत्करले. भाऊंना दीर्घायुष्य लाभलं ते मंदाताईंच्या डोळ्यांत तेल घालून घेतलेल्या काळजी व सांभाळामुळे. मंदाताईंनी लग्नही उशिरा केलं होतं, ते भाऊंच्या काळजीतूनच.
 मंदाताईंनी वि. स. खांडेकरांच्या साहित्यास प्रकाशकीय न्याय मिळावा म्हणून पूर्वप्रकाशकांशी केलेली न्यायालयीन लढाई मराठी साहित्यिकांना आणि त्यांच्या वारसांना आर्थिक वरदान देणारी ठरली. ही लढाई न्याय क्षेत्रात मैलाचा दगड ठरली. अलीकडे भारत सरकारने इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट' दुरुस्त केला. त्याचा ही लढाई आधार ठरली होती, हे फार कमी लोकांना माहीत असावं. या लढाईच्या काळात भाऊंच्या साहित्याला न्याय मिळावा म्हणून मंदाताईंनी ‘विष्णू प्रकाशन' सुरू करून ‘सूर्यास्त', 'मध्यरात्र', ‘घरटे’, ‘अस्थी', “यज्ञकुंड' सारखे कथासंग्रह प्रकाशित केले होते. पुण्याच्या ‘अनमोल प्रकाशन'मार्फत मृगजळातले कमल व इतर कथा' सारखी दुर्मीळ पुस्तकं प्रकाशित केली होती. त्यातील ‘सौ. मं. व. निवसरकर', 'मंदाकिनी खांडेकर अशा पल्लेदार स्वाक्षरीसह मला भेट दिलेली कितीतरी पुस्तके माझ्या संग्रही। आहेत. आता मंदाकिनी (आकाशगंगा) मंद झाल्यावर मात्र तो स्नेह मला अधिक प्रज्वलित झाल्यासारखा वाटतो आहे. मंदाताईंनी ‘अमृतवेल' कादंबरीवर दरदर्शन मालिका बनविली होती. भास्कर जाधव यांनी मोठ्या आत्मीयतेनं त्या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. महावीर महाविद्यालयाच्या स्टाफरूममध्ये मंदाताई, प्रा. घोडके, मी-आम्ही दीर्घकाळ संहितेबद्दल बोलत राहायचो असं आठवतं. शिवाजी विद्यापीठात आज भारतातील लेखकांचं पहिलं शास्त्रीय वस्तुसंग्रहालय उभारलं आहे. त्याची सुरुवातही मंदाताईंच्या पत्राने झाली होती. मंदाताई नुसतं पत्र लिहून थांबल्या नाहीत तर त्यांनी 'अश्रू' कादंबरीची हस्तलिखित प्रत आणि पद्मभूषण पदवी प्रशस्तीपत्र प्रदान करून वस्तुसंग्रहालयाच्या साधन संग्रहाचा प्रारंभ केला होता. नंतर तर त्यांनी खांडेकरांचे सर्व पुरस्कार, मानपत्रे, दैनिक वापरातील सर्व वस्तू उदार हस्ते प्रदान करून त्या संग्रहालयास पूर्णत्व आणून दिलं होतं.
 भाऊंचा मंदाताईंवर जन्मापासून जीव होता. मंदाताईंचा जन्म दिनांक ६ ऑगस्ट, १९३७ चा. या जन्मापूर्वीच महिना दोन महिने भाऊंना त्यांच्या ‘छाया' चित्रपटाच्या पटकथेसाठी ‘कलकत्ता फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन'चं ‘गोहर गोल्ड मेडल' मिळालेलं होतं. आपल्या पहिल्या कन्यारत्नाला बाळलेणं (सोन्याच्या मुद्दया) घालता यावं म्हणून भाऊंनी पत्नी उषाताईंकडे ते मेडल दिलं. ते मोडून बाळलेणं केलं होतं. ते भारतीय चित्रपटसृष्टीचं पहिलं पदक होतं. नंतर 'फिल्मफेअर', इत्यादी पुरस्कार सुरू झाले. मंदाताईंचं शिक्षण म. ल. ग. हायस्कूल, राजाराम महाविद्यालयातून झालं. मंदाताईंच्या घडणीवर भाऊंचा मोठा प्रभाव होता. भाऊ गरीब विद्याथ्र्यांना हटकून मदत करीत. मंदाताईपण, मला आठवतं, मध्यंतरी १९९९-२000 च्या सुमारास मंदाताई। आजारी होत्या. त्यांना पूर्णवेळ काळजीवाहिकेची गरज होती. आमच्या बालकल्याण संकुलातील द्रौपदी त्या वेळी कमवत शिकू इच्छित होती. द्रौपदीला आम्ही मंदाताईंना जोडून दिलं. द्रौपदी चारएक वर्षे मंदाताईंकडे जायची. द्रौपदी मला सांगत राहायची, ‘मंदाताई स्ट्रिक्ट आहेत, पण तितक्याच प्रेमळ, काम झालं की तिनं अभ्यास करावा म्हणून त्या आग्रही असायच्या. द्रौपदी पुढे गरोदर राहिली. मंदाताईंचं काम सुटलं; पण येणंजाणं राहिलं. मंदाताई द्रौपदीला पुस्तकं, फीची मदत करत राहिल्या. द्रौपदी काळजीवाहिकेची अधीक्षिका झाली. कधी काळी नॉनमॅट्रिक असलेली द्रौपदी आज एम. ए. एम. एस. डब्ल्यू. आहे. तिचा आधार व प्रेरणा होत्या मंदाताई. अशी अनेक उदाहरणं मंदाताईंची उदारता अधोरेखित करतात. लोकांनी मंदाताईंचा कठोरपणा पाहिला. त्यांची उदारता ज्यांना अनुभवता आली, ते त्यांचे आत्मीय श्रोते झाले.
 वि. स. खांडेकरांचे चित्रपटसृष्टीतील लेखनिक कवी ग. दि. माडगूळकर होते; तर साहित्यिक लेखनिक म्हणून रा. अ. कुंभोजकर, डॉ. एस. एस. भोसले, बालसाहित्यकार रा. वा. शेवडे गुरुजी होते खरे; पण त्यानंतरच्या काळात मंदाताई भाऊंच्या लेखनिक बनल्या. त्या काळात मला लेखनिक कुणीही मिळेल; पण तू वेळेवर लग्न कर' म्हणून लकडा लावणा-या भाऊंना न जुमानता त्यांच्यातील लेखक मंदाताईंनी महत्प्रयासाने जिवंत ठेवला. मंदाताईंमधला शिक्षक भाऊंनी घडविला. मंदाताईंनी त्याची उतराई अनेक शिक्षक, प्राध्यापक घडवून केली. मंदाताईंचं सारं आयुष्य आपल्या वडिलांप्रमाणे शिक्षणव्रतात गेलं. प्रारंभी त्या शासकीय सेवेत शिक्षणशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. शासकीय सेवेत बदली अटळ असते. इकडे वडिलांचं वृद्धत्व, दृष्टीची पराधीनता, त्यांनी पैत्रुक जबाबदारी महत्त्वाची मानली. सुरक्षित शासकीय सेवा सोडून त्या असुरक्षित खासगी सेवेत आल्या. न्यू कॉलेजमध्ये काही काळ शिक्षणशास्त्र शिकवून त्या ‘आंतरभारती'त मराठी शिकवू लागल्या. मग आमच्या महावीर महाविद्यालयात त्या ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी शिकवू लागल्या. मंदाताईंची योग्यता सीनिअर प्राध्यापकाची ; पण केवळ कौटुंबिक जबाबदारी... भाऊंचा सांभाळ महत्त्वाचा मानून त्यांनी आपल्या वैयक्तिक आशा-आकांक्षांवर पाणी सोडलं. करिअर करता यावं म्हणून आपल्या वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाच्या मुली आज जेव्हा मी पाहतो, तेव्हा मंदाताईंचं ‘श्रावणबाळ' होणं मला अस्वस्थ करीत राहतं. हा असतो संस्कारांचा न विझणारा नंदादीप!
 मंदाताई गेले तपभर तरी शयनमुद्रेत होत्या. त्या काळातही त्यांचा करारीपणा, शिस्त, संयम सारं चकित करणारं; पण अनुकरणीय! त्यांचा माझ्यावर किती विश्वास होता म्हणून सांगू! भाऊंचं सारं उर्वरित पाथेय त्यांनी माझ्या हवाली केलं होतं. त्याचं मी सोनं करू शकलो हीच त्यांना माझी सक्रिय श्रद्धांजली! मंदाताईंना ७७ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं, त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांच्या केलेल्या ऋणमुक्तीचा जितका वाटा आहे, तितकाच खांडेकर कुटुंबीयांनी दिलेला आधार आणि त्याची जीवश्चकंठश्च मैत्रीण असलेल्या श्रीमती आशा ताम्हणकर-भागवत यांच्या समर्पित सेवेचा वाटा तर लाख मोलाचा. मैत्र खरं तर तारुण्याची संगत असते म्हणे! आशाताईंनी हे खोटं ठरवत आयुष्यभर मंदाताईंची शुश्रूषा, संगत निभावत जो आत्मीय भाव निभावला, त्याला तोड नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेले धागे जास्त बळकट ठरतात असा माझा बनलेला दृढविश्वास. त्यात आशाताई, सुलभाताईंचं योगदान अविस्मरणीय!
 मंदाताई आज आपल्यात नसणं म्हणजे पितृसेवेचा नंदादीप विझणं! तो प्रज्वलित ठेवायचा तर प्रत्येकानं घरोघरी मातृ-पितृसेवेचा नंदादीप उजळत राहील अशी काळजी घ्यायला हवी. द्रौपदीची ही सेवाथाळी म्हणजे गरजवंताला दिलेला हात! मंदाकिनी आकाशात विझत असताना एक समाज मंगल, अविनाश, सुलभ, कल्पलता जिवंत ठेवणं यातच आपल्या सा-यांचे चिरंतन कल्याण, हित सामावलेलं. ते जपू, जोपासू तर श्रद्धांजली सक्रिय, सहवेदनेचा व्रतोत्सव बनेल. ऋजू पण कठोर प्राचार्य : डॉ. हिंदुराव पाटील

 आजच्या प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांची नि माझी पहिली ओळख झाली तेव्हा ते प्रा. एच. बी. पाटील या नावाने सर्वपरिचित होते. हा काळ सर्वसाधारण २००४ चा असावा. तेव्हा मी शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाचा मानद संचालक म्हणून कार्यरत होतो. माझे कार्यालय मराठी विभागाशेजारी होते. प्रा. एच. बी. पाटील यांची पीएच. डी.ची तोंडी परीक्षा झाली, त्या दिवशी त्यांचा माझा पहिला परिचय झाल्याचे आठवते. त्यांचे संशोधक, मार्गदर्शक, परीक्षक, मराठी विभागातील अन्य सहकारी प्राध्यापक सर्व मिळून तोंडी परीक्षेनंतरच्या स्नेहभोजनास निघाले होते. माझ्या कार्यालयातून मी बाहेर पडताना ही सर्व मंडळी दत्त. ती सर्व परिचित होती, अनोळखी होते, ते प्रा. एच. बी. पाटील, उभ्या-उभ्या गप्पा झाल्या. मी प्रा. एच. बी. पाटील यांचे औपचारिक अभिनंदन केले; पण ते त्यांनी अत्यंत स्वाभाविक ऋजुतेने स्वीकारले, हे त्यांच्या देहबोलीवरून जाणवलेले. ऋजू, मितभाषी, स्नेही गृहस्थ अशी त्यांची पहिली प्रतिमा माझ्या मनावर त्या वेळी कोरली गेल्याचे आठवते.
 माझे स्मरण बरोबर असेल तर नंतर मला ते भेटले प्राचार्यपदाचे उमेदवार म्हणून. मी निवड समितीचा सदस्य होतो. त्यांच्या मराठी भाषा, साहित्यप्रभावाने मी माझ्या मताचा पासंग त्यांच्या ताजव्यात टाकल्याचे आठवते. मी निमित्त होतो इतकेच; कारण संस्थेचे ते पसंत उमेदवार होतेच. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात ही मुलाखत संपन्न झाल्याचेही आठवते. आमचे मित्र प्राचार्य डॉ. अशोक जगताप समन्वयक होते.
 निवडीनंतर ते तळमावले, इचलकरंजी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याचे वृत्तपत्रारतील बातम्यांमधून लक्षात यायचे. शिवाजी विद्यापीठातील प्राचार्यांच्या बैठकांना ते उपस्थित असत; पण दुरूनच त्यांचा माझा स्मितहास्य संवाद होत राहायचा. यातही स्नेह, आदर व्यक्त व्हायचा. तो त्यांच्या देहबोलीतून. ते माझ्यापासून दोन हात दूरच राहत असत. त्यात टाळण्यापेक्षा सदभावपूर्वक अंतर ठेवण्याची नजाकत असायची. फळांनी लगडलेलं झाड झुकत राहतं, तसा तो नम्रभाव असायचा नि त्याने मी आनंदून जायचो. स्वरंजनाबरोबर परभावसहिष्णुता म्हणून मीही तुम्ही ठीक, मी ठीक' अशा अंतराने थोडा दूर नाही, पण तटस्थ राहत असे.
 माझे मित्र प्राचार्य डॉ. अशोक जगताप प्राचार्यपदावरून पायउतार झाले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रा. एच. बी. पाटील हे प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील होऊन रुजू झाले. आता आम्हा उभयतांचे नाते शेजा-याचे व विधायक अंगाने प्रतिस्पध्र्याचे झाले. निरोप व स्वागत संयुक्त समारंभातून ते अधिक स्पष्ट झाले. त्यांच्या नि माझ्यात खरा हार्दिक सद्भाव निर्माण होण्यास एक कारण घडले. त्या वेळी शासनाने इयत्ता अकरावीचा प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचे समन्वयक यजमानपद माझ्याकडे सुपूर्द केले. शैक्षणिक व्यासपीठाने या पद्धतीचे समर्थन केल्याने काम सोपे झाले; कारण बहसंख्य महाविद्यालयांनी केंद्रीय प्रवेश पद्धती स्वीकारली. दोन महाविद्यालये अपवाद होती. एक होते शहाजी महाविद्यालय व दुसरे होते विवेकानंद महाविद्यालय, माझ्या महाविद्यालयात संपन्न केंद्रीय प्रवेश समिती बैठकीस प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील एकदा उपस्थित झाले. त्यांना या प्रवेशाचे महत्त्व पटले; पण निर्णय संस्था घेणार होती. त्यांनी आपले मत सांगून संस्थेस राजी केले. यात मला पहिल्यांदा प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांच्या स्वतंत्र मत, गुणवत्ताप्रधान प्रशासकीय निर्णयक्षमतेची चुणूक अनुभवण्यास मिळाली. हा निर्णय तसा साधा, सोपा नव्हता. होकाराने विवेकानंद महाविद्यालयाची गुणवत्ता महाविद्यालय प्रथम पसंतीची जात असली तरी प्रवेशाच्या वेळी होणारी डोकेदखी कायमची थांबणार होती, हे त्यांनी हेरले. शिवाय विनाअनुदान तुकड्यांची सारी फी प्रवेश पूर्व महाविद्यालयाकडे जमा होण्याची हुकमी हमीही त्यांनी हेरली होती. पहिल्या वर्षी पालकांचा प्रचंड विरोध होता. पहिल्या पालक सभेत तर पाच हजार पालक माझ्या अंगावर आल्याचे आठवते. दमदाटी, राजकीय निदर्शने, इ. पाहून प्राचार्य पाटील हबकून गेले होते. दुस-या दिवशी त्यांचा आलेला एक आश्वासक व सहानुभूतीचा फोन मी कधीच विसरू शकणार नाही. ते म्हणाले होते, हे फक्त तुम्हीच करू शकता. यात स्वदोष स्वीकृतीबरोबर परगुणग्राहकतेचा भाव होता. ते प्रशासन कौशल्य टिपत, हेरत, आत्मपरीक्षण करीत स्वत:ला घडवत होते नि आपणच आपला शिल्पकार होण्याचा तो एकलव्यी तपश्चर्येचा काळ होता. त्यातून आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी न राहता मित्र झालो.
 पुढे वर्षभरातच मी माझ्या महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू केली. ती घटना आमच्या महाविद्यालयाच्या पारंपरिक प्रतिमेस छेद देणारी होती. प्राचार्य डॉ. पाटील यांनी या घटनेस गंभीरपणे घेतल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा आम्ही महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अनेक विषयांचे एम. फिल. कोर्स सुरू केले होते. त्यांच्या महाविद्यालयांतील व माझ्या महाविद्यालयातील सहका-यांचे एकमेकांच्या महाविद्यालयांतील आदानप्रदान वाढून संस्था म्हणूनही आम्ही एकत्र भावाने काम करू लागलो होतो. यातून एकमेकांच्या गुणदोषांची, उपक्रमांची उजळणी सुरू झाली आणि देवाणघेवाणीतून आत्मीयतापूर्ण नाते विकसित झाले.
 मी निवृत्त झाल्यानंतर प्राचार्य डॉ. पाटील नि माझ्यात गुणवत्ता केंद्री मैत्री झाली नि ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहिली आहे, याचे श्रेय मात्र प्राचार्य डॉ. पाटील यांच्या गुणग्राहक सद्भावासच द्यावे लागेल. प्राचार्य म्हणून त्यांनी केलेले कार्य हे त्यांची कार्यक्षमता सिद्ध करणारे खरेच. त्यांच्या कार्यकालात विवेकानंद महाविद्यालय उच्च शिक्षण क्षेत्रातील विकासाचा मानदंड बनले. आज हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वाधिक शिष्यवृत्ती, पुरस्कार पटकावणारे महाविद्यालय म्हणून विद्यार्थ्यांची प्रथम पसंती' जसे आहे, तसेच ते उपक्रमशील महाविद्यालय म्हणून लोकदरास पात्र ठरले आहे. नियतकालिक स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विवेकवाहिनी, पर्यावरण जागृती हे सारे करीत शैक्षणिक गुणवत्तेत आपले महाविद्यालय अग्रेसर व अग्रणी ठेवणे यासाठी प्रशासकास रात्रीचा दिवस करावा लागतो. प्रसंगी स्वत:कडे, कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करून, कर्तव्यदक्षता प्रमाण म्हणून कार्य केल्याशिवाय बँक मानांकनात वाढ, कॉलेज ऑफ पोटेन्शिअल एक्सलन्स, शासनाचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार, संशोधन प्रकल्प अनुदान या गोष्टी लाभत नसतात. त्यांना मिळालेली मुदतवाढ ही संस्थेची शाबासकी आहे. तशी ती डॉ. पाटील यांची कार्यसिद्धीपण, माणूस कार्यपरायण झाल्याशिवाय हे घडत नसते. 'Things get done by the colleagues.' हे प्रशासक कौशल्य जसे आहे, तसे तुमच्या जीवनव्यवहाराची ती प्रचितीही असते. ती प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांनी सायास संपादली आहे. त्याबद्दल ते अनुकरणीय अभिनंदनास पात्र आहेत.
 जो मनुष्य हरघडी शिकत राहतो, त्याच्या विकासाला क्षितीज नसते, असे म्हटले जाते; ते प्राचार्य डॉ. पाटील यांच्या जीवनाकडे पाहिले की उमजते. पूर्वी ते प्रक्षिप्त असत. राग अनावर असायचा. बोलणे थोडे ओरखडे ओढणारे असायचे. ते उपजत होते. ते बहुधा पारंपरिक गावपाटीलकीतून पाझरलेले असावे; परंतु नंतर ते त्यांनी प्रयत्नपूर्वक सुधारले. दोषांचा व्हास, निरास नि गुणांचा भूमितीपटाने विकास हे सारे आपसूक नाही घडत. माणसास स्वविकासाचा छंद जडावावा लागतो. मग प्रत्येकाकडून शिकण्याचे वेड माणसास लागते. ते वेड त्यांनी लावून घेतले नि त्यातून त्यांची एक नवी प्रतिमा आज आपण सर्व पाहात आहोत. आज डॉ. पाटील मनुष्यसंग्रही, समाजशील, विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून सर्वश्रुत आहेत. सहज लक्षात आणून दिलेली गोष्ट ते गंभीरपणे स्वीकारतात. हे मी अनेक प्रसंगांत अनुभवले आहे.
 ते ज्या कार्यालयात बसतात, तिथे पूर्वी फलक होता, ‘पादत्राणे बाहेर काढावीत.' मी त्यांना एकदा प्रसंगाने त्या फलकाच्या अनुषंगाने ओशो नि हरिवंशराय बच्चन यांचा किस्सा ऐकविला. त्यांनी फलक काढून टाकला. मी त्यांना 'वेब साहित्य' हे माझे नवसंशोधित पुस्तक भेट दिले. त्यांनी मराठीत वेब साहित्य संशोधन करून आपण नवे शिक्षक होण्यास उत्सुक असल्याचे दाखवून दिले. मध्यंतरी त्यांचे वडील निवर्तले. त्यांना श्राद्ध, आदी कर्मकांड न करता अनाथांचे संगोपनकार्य करणा-या बालकल्याण संकुलास साहाय्य केले. मध्यंतरी आम्ही बालकुमारांमध्ये वाचन आवड निर्माण व्हावी म्हणून अभियान सुरू केले; तर त्यात ते स्वेच्छे सामिल झाले. अशा अनेक प्रसंगांतून माझ्या लक्षात आले की वरवर मितभाषी वाटणारा हा मित्र आतून संवेदनशील व संवादी आहे. सतत नव्याचा, अंगिकारण्याचा त्यांचा ध्यास ‘अत्त दीप भव'चे अनुगमनच! दुस-याचे मोठेपण स्वीकारण्याचा त्यांचा उमदेपणा त्यांना मोठा बनवत निघाला आहे. देश, विदेश भ्रमण, भेटीतून ते आधुनिक होत आज पुरोगामी झालेत. मराठी प्राध्यापक म्हणून ते स्वत:स अद्यतन ठेवतात. नवे, निवडक वाचण्यातून त्यांची अभिरुची कळते, तसाच चिकित्सक चोखंदळपणाही लक्षात येतो. ग्रंथालयावर प्रेम करणारा प्राचार्य ही ख-या शैक्षणिक प्रशासकाची कसोटी. ती त्यांनी ग्रंथसंख्या वाढ, ग्रंथालय सुविधा विकासातून सप्रमाण सिद्ध केली आहे.
 महाविद्यालयाच्या परिसरातील प्राचार्य हा समाजपरिघात कसा असतो, वावरतो यावरून त्याचे खरे मित्र, चारित्र्य व चरित्र उलगडत असते. ते अनेक व्याख्यानांना सश्रद्ध श्रोते बनून उपस्थित राहत असतात. चर्चासत्र, परिसंवाद आयोजनात जितके सक्रिय तितकेच अन्यत्र जाऊन शोधनिबंध वाचनातही आघाडीवर. त्यांनी अनेक पुस्तके, स्मरणिका, चरित्रग्रंथांची संपादने केली आहेत. त्यांच्या कार्यकालात डॉ. प्राचार्य पाटील यांनी ‘विवेक रिसर्च जर्नल' सुरू करून अभिनव उपक्रम अनुकरणीय असतो हे दाखवून दिले आहे. अनेक विद्यापीठांत जाऊन त्यांनी उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह समजून घेऊन त्यानुसार आपल्या महाविद्यालयात अनेक योजना, प्रकल्प व अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इमारती उभ्या करण्याच्या भौतिक, भडक विकासापेक्षा मानवी आत्मिक विकासाची कास धरत त्यांनी जो मनुष्यविकासाचा आलेख उंचावला, तो मला अधिक महत्त्वाचा नि लोभस वाटत आला आहे.
 प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील हे शैक्षणिक सेवेतून उच्चपदस्थ म्हणून निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर ते शिक्षणकार्याशी संलग्न राहातील असा माझा होरा आहे. संस्थेने त्यांच्या कार्य, कौशल्य, शैलीचा वापर करून घ्यायचे ठरविले तर तो संस्थेचाच प्रगल्भपणा नि दूरदृष्टी ठरेल. त्यांनी स्वत:स अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याची मनोरथे रचली आहेत. त्यातून त्यांची समाजाप्रती असलेली प्रतिबद्धता, बांधीलकी स्पष्ट होते. त्यासाठी मित्र, स्नेही म्हणून माझ्या शुभेच्छा. सहकार्य राहीलच. उर्वरित आयुष्यात त्यांनी लेखन करावे अशी मी अपेक्षा करीन; कारण त्यांच्यातील ती ऊर्जा नि ऊर्मी अद्याप सुप्तच राहिली आहे. राजापूरच्या गंगेला केव्हातरी प्रगट व्हावेच लागते. निवृत्तीचा काळ त्यासाठी उपकारक ठरावा. त्यांच्याकडे संयत वक्तृत्वाचे कौशल्य आहे. संस्था व अन्य महाविद्यालयांना त्याचा त्यांनी लाभ द्यावा. 'दिल्याने वाढतेचा रिवाज ते जपतील, जोपासतील. त्यातून ‘मीच नाही, माझ्यासह अनेक'ची वर्धिष्णू परंपरा समृद्ध होईल. त्यांचे महाविद्यालय, स्वकीय सहकारी सर्व मिळून त्यांचा गौरव करताहेत. उगवत्या सूर्यास सर्वजण अर्थ्य अर्पण करीत असतात नमन हा कृतज्ञतेचा उद्गार खरा! तो समाज जपतो ही प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांची मुंगी बनून केलेली बेगमी मानतो. उत्तरायुष्यार्थ शुभेच्छा! आरोग्यवर्धक भविष्याच्या सद्भावना!! सभ्यतेचा सत्त्वशील उपासक : सतीश पाध्ये

 सतीश पाध्ये यांना मी ओळखू लागलो, तो काळ १९९५-९६ चा असेल, तेव्हा मी बालकल्याण संकुलाच्या विकासकार्यात सक्रिय होतो. संकुलाची मातृसंस्था असलेल्या जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेची स्थापना १९४८-४९ मध्ये झाली होती. त्या संस्थेचा सुवर्णमहोत्सव करायचे घाटत होते. संस्थेचा दप्तरी अहवाल वगळता इतिहास म्हणून तिच्याजवळ काही नव्हते. म्हणून मी तत्कालीन वृत्तपत्रांच्या जुन्या अंकांच्या फाईल्सचा शोध घेत होतो. पुराभिलेखागार पालथे घालून झाले होते. दैनिक पुढारी, सत्यवादीच्या जुन्या फाईल्स शोधून झाल्या होत्या; पण स्थापनाकाळात ‘विद्याविलास', 'गर्जना' साप्ताहिक प्रकाशित होत होते, अशी माहिती करवीर नगर वाचन मंदिराच्या शोधात हाती आली. ‘विद्याविलास'च्या प्रकाश गोखले यांना गाठले तर विद्याविलास'च्या फाईल्स पुरात वाहून गेल्याचे लक्षात आले. राहता राहिला आधार ‘गर्जना' साप्ताहिकाचा. शोध काढत मी उभा मारुतीजवळ गर्जना प्रेसमध्ये धडकलो. सतीश पाध्ये गडबडीत होते. 'गर्जना' फाईल्स आहेत; पण अडगळीतून शोधून काढाव्या लागतील पण मी त्या काढून ठेवतो; ‘मला थोडा वेळ द्या', म्हणत त्यांचं आर्जव एका नम्र, सभ्य माणसाचं होतं. ते मला कामामुळे व कामाला ओळखत होते. कामाविषयीची आस्थाही मला त्यांच्या बोलण्यातून, देहबोलीतूनही व्यक्त होत होती. प्रथमदर्शनी आपण अपवाद सभ्य माणसाच्या सहवासात आल्याची जाणीव झाली. मी सुखावलो. तद्वत अस्वस्थही झालो.

आवड्याभराने मी परत ‘गर्जना'मध्ये दत्त. सतीश पाध्ये नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते. हात धुळीने माखलेले. अंगठ्याच्या टोकाने कानावर ओघळलेला चष्मा वर करीत म्हटले, ‘बसा, हे माझं कायम असंच चालणार'. माझ्या लक्षात आलं की हा कायम घाण्याला जुंपलेला बैल आहे. याला उसंत अशी कधी मिळणारच नाही. त्या वेळी मुद्रणालयाच्या माडीवर त्यांचे बंधू बिहारींचे स्क्रीन प्रिंटिंगचे युनिट चालायचे. आज तिथे सतीश पाध्येंचे बाइंडिंग युनिट कार्यरत आहे. सतीश, बिहारी व मी अशा संयुक्त श्रमदानाने ‘त्या’ फाईल्स जमवल्या, लावल्या. मुद्रणालयाच्या पसाच्यात मला त्या फाईल्स स्वास्थ्याने पाहता येणार नाहीत म्हणून सतीश पाध्ये मला शेजारच्या आपल्या वाड्यात घेऊन गेले नि चक्क माजघरात एक चौरंग, पाण्याचा तांब्या आणि पत्नीला चहाचा हुकूम अशी सरबराई करते झाले. पत्नीही त्याच आदबीने सारे करीत होती. या सर्वांतून समस्त पाध्ये कुटुंबीय आतिथ्यशील, संस्कारी, सुसंस्कृत असल्याचे लक्षात आले. हा सन्मान माझा नसून कार्याचा होता. त्यातून कुटुंबाची समाजशील ओळख माझ्या मनी-मानसी ठसत गेली, ती कायमची.
 गेल्या वीसएक वर्षांत आम्ही अनेक प्रसंग नि कारणांनी एकमेकांच्या जवळ येत गेलो नि माझ्यासाठी सतीश पाध्ये केवळ सतीश झाले. मला जुनी पुस्तके नेटकी करून जपायचा छंद आहे. कोणतेही संग्रहातील पुस्तक बांधायचे असले की माझे पाय सतीशकडे वळतात. सतीश ते तत्परतेने करून देतो. त्याच्यात एक दोष आहे. तो पट्टीचा व्यावसायिक आहे; पण व्यापारी नाही. व्यावसायिक काम निष्ठेने, चोख करण्याचा त्याचा रिवाज आहे. कार्यसंस्कृती हा त्याचा धर्म आहे. पूर्वी तो खिळे जुळविणे, गॅलीप्रफे काढणे, तपासणे, दुरुस्ती, मुद्रण, बांधणी अशी सारी कामे करीत असे. आताही तो करतो. काम करण्यास सदैव तत्पर असणारा सतीश पैसा, व्यवहार म्हटला की याची जीभ झाली जड. तो मालाबरोबर बिल देईल; पण ‘बिल द्या नि मग माल न्या' असा कसाई बाणा त्याने कधी अंगीकारला नाही. मला कधी-कधी प्रश्न पडतो की याचं चालतं कसं? तर त्याचा मला लागलेला शोध आहे. ते त्याचं न संपणारं, न आटणारं गुडविल होय. हे गुडविल सर्वत्र ‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी' म्हणजे पुरवठादार, ग्राहक, नोकर, घरीदारी सर्वत्र पसरलेले असते.
 तशा अर्थाने सतीश नको तेवढा सज्जन, अजातशत्रू मित्र! कुणाबद्दल वाईट बोलणं, वागणं त्याला माहीत नाही. कुणी वाईट वागला तर टोकाचा क्षमाशील, ‘फरगिव्ह ऍड फरगेट' हे त्याचं जीवन तत्त्वज्ञान असल्याने मला तो कधी चिंताग्रस्त, चिंताक्रांत दिसला नाही. एखादी जिव्हारी गोष्टही सहज स्वीकारतो नि हसत सांगतो. बरं, त्याला बोच नसते असे अजिबात नाही; पण तो व्यवहारिक पातळीवर जपानीच म्हणायचा. जपानी माणूस दुसन्यास दोष देत नाही. स्वत:स दोषी मानून हाराकिरी करतो. म्हणजे आत्मक्लेश करून घेतो. शिवाजी पेठेत जन्मून, राहून हा ‘सत्यं शिवं सुंदरम् कसा हे माझ्यासाठी तरी गूढच. दुस-या शब्दांत शिवाजी पेठेत राहून हा ‘सदाशिव पेठी' पण नाही झाला. याची पेठ सदा शिव, सुंदरच राहिली.
 पांढ-यावर काळे करणारा या अर्थाने तो सरस्वतीपुत्रच म्हणायचा. धंद्याच्या धबडग्यातूनही त्याचं वाचन चोखंदळ राहिलं आहे. पत्नी स्वातीताई यांना लिहायचं अंग, तर सतीशला वाचायचं अंग. त्याची गि-हाईके पाहिली की लक्ष्मीपुत्रांपेक्षा सरस्वतीपुत्रांचाच गराडा त्यांच्या छापखान्यात असतो. 'मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स' या उक्तीवरूनही सतीशची प्रतवारी करता येते. कौटुंबिक, भारतीय म्हणून तो दोन मुलींचा बाप; पण मुलीचा बाप म्हणून त्याला पैशाचा घोर लागलाय असं मी कधी अनुभवलं नाही. ‘जो देगा उसका भला, न देगा उसका भी भला.' मानणारा नि म्हणणारा सतीश. त्याचं दुकान सदैव तुकारामाचंच राहिलंय. गि-हाईक पैसे द्यायला मोठ्या नोटा काढतं. सतीशकडे सुट्टे पैसे अपवादानेच! (कारण संचय त्याला माहीतच नाही!) सतीश क्षणाचा विचार न करता ‘पुढच्या वेळी द्या' म्हणतो. चौकात जाऊन मोड करून भागवाभागवी त्याला जमत नाही. तो सदैव दुस-याच्या ऋणात. गि-हाईक सदैव सतीशच्या ऋणात. “आज उधार, उद्या रोख' या तत्त्वानेही त्याची उपजीविका कशी चालते विचाराल तर त्याचं सतीशचं उत्तर जीवनाचा आनंद केवळ रुपये, आणे, पैशात नसून तो प्रेम, संबंध, आपलेपणातही शोधता येतो. हे शिकावं सतीशकडूनच. सतीशकडे कधीही मागा, तो 'नाही' म्हणत नाही, ही त्याची श्रीमंती.
 मी महावीर महाविद्यालयाचा प्राचार्य असण्याच्या काळात सतीश आमचं मुद्रण सांभाळायचा. वेळेवर, नेटकं कामही त्याची खासियत असायची. कामात तो जीव ओतून सुधारणा करायचा. पाच वर्षे त्यानं आमचं नियतकालिक छापलं. चौथ्या वर्षी ते विद्यापीठात प्रथम आलं. त्या दर्जेदारपणात सतीशचा सिंहाचा वाटा. निर्दोष, शुद्ध, सुबक छपाई, मोत्याचे टंक, शुभ्र कागद... अगदी जाहिरात रचनाही ललित, मनोहर करावी ती सतीशनी. व्यवसाय प्रेमाने भागत नाही. तो कलात्मक नि मनस्वीपणा करता आला पाहिजे. तो करावा सतीशनेच. ते येरागबाळ्याचे काम नव्हे! | आपल्या व्यवसायात समाजशीलता जोपासायचा रिवाज सतीश जपत आला आहे. बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांनी 'चॉकलेट बुक'ची कल्पना काढली. म्हणजे चॉकलेटच्या पैशांत पुस्तक. रुपयात पुस्तक म्हणजे तुकाराम वाण्याचाच धंदा! तो सतीश तुकाराम महाराजांच्या तल्लीनतेने टाळ मृदंगाच्या गजरात करताना मी पाहिला आहे. व्यवसायातही समाधीयोग, अनहत नाद मी केवळ नि केवळ सतीशमध्येच अनुभवला आहे, सतीश केवळ मुद्रक नाही, तर प्रकाशकही आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल, त्याचं ‘शब्दवेल' नावाचे प्रकाशन आहे. त्याची शब्दमुद्रा पाहिली की त्याची कलात्मकता लक्षात येते. ‘माझे एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न' पुस्तक त्याने छापले. तो छापण्यात उत्साही व विकण्यात वैरागी गृहस्थ, छापतो नि त्याचे गठे उरावर घेऊन झोपतो. यासाठी त्याला केव्हातरी नोबेल मिळेलच! ज्या विक्रेत्यांना देतो, ते देतील तेव्हा पैसे घेणारा हा एकमेव मराठी प्रकाशक.
 सतीशकडे ‘अभिरुची' नावाच्या ख्यातनाम मासिकाचे हक्क आहेत. ते सुरू करण्याचा त्याचा इरादा आहे. वरचे गठ्ठ संपले की बहुधा तो हा नवा आतबट्याचा व्यवसाय सुरू करेल. शेखचिल्ली नि सतीशमध्ये मला बरेच साम्य आढळते. 'बुडत्याचा पाय खोलात' ही म्हण सतीशच्या चरित्रातूनच बहुधा आली असावी अशी मला दाट शंका आहे. नव्हे, खात्रीच म्हणा! हे सर्व कमी म्हणून की काय, परवा भेटल्यावर म्हणाला की, आता प्रेस कामगारांना चालवायला देणार आहे. एकाच जन्मात एकाच वेळी जे गांधी नि मार्क्स वाचतात त्यांची अशी गोची असते. ते एकाच वेळी विश्वस्त नि फकीर होऊ इच्छितात. विश्वस्त व्हायचं तर आश्वस्त संपत्ती असावी लागते. ते टाटा, बजाज, अंबानीच करू जाणे. फकीर व्हायचं तर निराला, कबीर, सुर्वे व्हावं लागतं. सतीश दोन्ही लायनीत मिसफिट! मुळात फकीर असलेला माणूस विश्वस्त कोणत्या संपत्तीचा होणार, असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी सांगेन त्याच्याकडे धान्याचे दामाजीचं गोदाम नसेल; पण माणूस नावाचं जगडलेलं मोहळ घेऊन झुलणारा सतीश नसलेल्यांची खंत न बाळगता असलेल्यांचा अभिमान मिरवणारा तो नम्र मुद्रक आहे खरा!
 सतीश पाध्ये त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येकावर आपली सभ्यतेची मुद्रा नुसती उठवत नाहीत, तर कोरतात हे मी अनुभवले आहे. त्यांच्या मुद्रणालयातील कामगार त्यांना मालक म्हणत नाहीत. भैय्या म्हणतात. त्यांनाही माहीत आहे की सतीश कधी ‘भाई' होऊ शकत नाहीत. भाई होण्यासाठी व्यवहारकुशलता लागते. उँगली टेढी करने की कला' त्याला कधीच जमणार नाही. त्याचं वानप्रस्थ आयुष्याचं स्वप्न आहे. उरलं सुरलं वाचायचं' अशी उसंत त्याला मिळावी असे मनस्वी वाटते. आराम करायला पण तशी वृत्ती लागते. ती सतीशमध्ये मला दिसली नाही. खरे तर तिचा मागमूसही त्याच्यात नाही. मग हे स्वप्न सत्य होणार कसं? असा प्रश्न आहे.
 माणसाची सभ्यता अशी टोकाची असावी की ती जगासमोर आणण्याची ऊर्मी इतरांना व्हावी. आज मी समाजातले ‘अमृत महोत्सव', 'गौरव समारंभ ‘गौरव ग्रंथ' पाहतो. आपणच आपली आरती ओवाळून घ्यायचा हा प्रकार. तोही पदरमोड करून. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मित्राला सतीशची टिमकी नगारा म्हणून वाजवावी असे वाटणे यात समान सभ्यता टिकून असल्याचा एक आश्वासक स्वर दिसून येतो. तो मला अनुकरणीय वाटतो. जग बिघडले आहे। खरे; पण बुडलेले नाही, ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या कमी महत्त्वाची नाही. रमेश पाटील यांच्यासारखा सत्शील मनुष्य. तो सतीशचं कॅलेंडर छापतो अन् आता तो गौरव अंक काढतोय. 'हेही नसे थोडके.' यात उभयपक्षी सद्भाव व सभ्यतेचे मला झालेले दर्शन जगण्याची उमेद वाढविणारे आहे. माणसांनी संत एकनाथांच्या टोकाच्या संयमाने सभ्यता जपावी. थुकणारा थकून जावा इतका संयम! त्या संयमी सभ्यतेचा सत्कार हा उद्याच्या सभ्य समाजनिर्मितीचा प्रारंभ ठरेल, असा मला विश्वास वाटतो. सतीशइतका संयम नि सभ्यता माझ्यात नसण्याची जाहीर कबुली देताना मला तिळमात्र शरम वाटत नाही. अशासाठी की, ती माझी मनस्वी अंतर्मुखी दाद आहे. आज या निमित्ताने माझ्या सभ्यतेचा प्रवास सुरू झाला. तो उद्या तुमच्यात पाझरेल, प्रतिबिंबित होईल. सारं जग सत् ईश म्हणजे सत्यशील होईल, ‘कारवाँ' बनणं काय असतं? “ज्योत से ज्योत जगाते चलो' म्हणजे मी घडलो, तुम्हीही घडाचा वस्तुपाठच ना?
बार्शीभूषण : डॉ. बी. वाय. यादव

 बार्शी, उस्मानाबाद परिसरातील सार्वजनिक डॉक्टर बार्शीच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेक वर्षे अध्यक्ष असलेले डॉ. बी. वाय. यादव यांना मी प्रथम पाहिले सन २००६ मध्ये, असे खोदून खोदून आठवल्यावर लक्षात येते. प्रसंग होता ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानच्या राजर्षी शाहू सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचा. त्या वर्षीचा तो पुरस्कार सोलापूरच्या या प्रतिष्ठानाने मला जाहीर केला होता. पुरस्कार वितरण सोहळा सोलापूरच्या हुतात्मा चौकातील भव्य सभागृहात होता. तो पुरस्कार त्या वर्षी मला देण्याचं प्रमुख कारण माझं खाली जमीन, वर आकाश' हे आत्मचरित्र प्रकाशित होणं असावं. समारंभाला बार्शीहून माझे मित्र प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्रा. राजेंद्र दास, प्राचार्य व. ना. इंगळे आणि बरीच मंडळी टॅक्स करून बार्शीहून आवर्जून आली होती. त्यात डॉ. बी. वाय. यादव होते. सर्वांनी त्यांचा आदबीने परिचय करून दिला. त्यांच्या पोशाख, बोलणे, देहबोलीत कुठेही चेअरमन'पणाचा लवलेशही नव्हता. अत्यंत साधे, मितभाषी, नम्र गृहस्थ अशीच त्यांची प्रथमदर्शनी रुजलेली प्रतिमा गेल्या दहा वर्षांत विकसित झालेल्या निकटवर्ती मित्रनात्यात अधिक खोल व दृढ होत गेली.
 दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी माझं बार्शीत जाणं, येणं घडत राहिलं होतं. चर्चासत्र, प्राध्यापक निवड अशी ती औपचारिक कारणं असल्यानं डॉक्टरांशी ओळखही औपचारिकच राहिली. पुढे सन २०१२ ला त्यांच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्यामार्फत देण्यात येणा-या 'कर्मवीर मामासाहेब जगदाळे सामाजिक पुरस्कारासाठी माझी निवड केली. त्या समारंभात मला संस्थेने दिलेली रु. २५,000 ची रक्कम त्यात पदरचे ५,000 रुपये घालून ती मामांचे स्मारक केले जावे, अशी इच्छा व्यक्त करून मी परत केल्याचे आश्चर्य सर्व बार्शीकरांना होते; पण डॉ. यादव यांचे मामांशी असलेले विशेष ममत्व लक्षात घेता, त्यांना त्याचे अप्रूप वाटणे स्वाभाविक होते. एक तर आजवर अशी रक्कम कुणी परत केली नव्हती. शिवाय भाषणात मी मामांच्या स्मारकाची जी कल्पना विशद केली होती ती सर्वांना नवी होती. समारंभानंतर वर्ष दीड वर्ष उलटलं असावं. संस्थेचा निरोप आला म्हणून मी बार्शीस गेलो. दरम्यान त्यांनी स्मारकाची त्यांच्या कल्पनेप्रमाणे योजना केली होती. सादरीकरण करून समजावण्यासाठी म्हणून मला बोलावलं होतं. मी दरम्यानच्या काळात एक-दोन वस्तुसंग्रहालये उभारली असल्याने स्मारकाची माझी कल्पना व संस्थेची कल्पना यांत मोठे अंतर होते. माझ्या कल्पनेने सर्व भारावले. त्यांनी केलेली उठावचित्रे त्या कल्पनेपुढे नगण्य होती. योगायोगाने त्या वेळी संस्थेच्या श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची इमारत पूर्ण होत आलेली. आमच्या चर्चेनंतर ती इमारत त्यांनी मला दाखविली. त्यातील एक प्रशस्त हॉल मिळाला तर मोठे वस्तुसंग्रहालय करणे शक्य आहे, असे सांगितल्यावर प्राचार्य मधुकर फडतरे यांनी उत्स्फूर्तपणे तो द्यायचे मान्य केले.
 वस्तुसंग्रहालयाचा संकल्प आणि सिद्धीमधील प्रवास खडतर होता; कारण त्यांच्याकडे साधने अशी हाती नव्हती. होती पण त्यांना त्याची जाणीव नव्हती. काखेत कळसा, गावाला वळसा' अशी स्थिती असल्याने शोधात लक्षात आले. माझे बार्शीला या संशोधन, साधन संकलनार्थ जाणे-येणे नित्याचे झाले व त्यातून डॉ. बी. वाय. यादव मला जे नि अशा प्रकारे समजत गेले ते कल्पनेच्या पलीकडचे सज्जन गृहस्थ निघाले. त्यातला एक प्रसंग मला आठवतो की कर्मवीर मामासाहेब जगदाळे स्मारकासाठी मी घेत असलेले कष्ट नि व्यक्त करीत असलेली आस्था, आदर पाहून चक्क एक दिवस ते उत्स्फूर्त माझ्या पाया पडते झाले. त्या क्षणाच्या शरम नि संकोचाने माझे जीवन अहंकारमुक्त झाले. या प्रसंगी जाहीरपणे मान्य केलेच पाहिजे, माणसं बदलतात यावर मामांचा असलेला विश्वास डॉ. बी. वाय. यादव यांनी स्वत:त उतरवला होता. आपणासारखे करुनी सोडावे सकळ जन हा एव्हाना त्यांचा सहजधर्म झालेला. हा माणूस आतून-बाहेरून वारकरी वृत्तीचा का? याचा जेव्हा मी शोध घेऊ लागलो, तेव्हा मला या वटवृक्षाची मुळे दूरवर त्यांच्या वाडी, वस्तीत, आईवडीलांत, पूर्वसंस्कारांत पसरलेली लक्षात येत राहिली. माणसाच्या नसण्यातच त्याचे असणे सामावलेले असते हे मला त्यांचे पूर्वचरित्र, घडण समजावून घेताना हळूहळू लक्षात येऊ लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञतेची जी झालर नि झळाळी होती, त्यामागे पूर्वायुष्याचं वंचितपणाचं ओरखडणारं संचित अविस्मरणीय तसंच खदखदत ठेवणारं होतं.
 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात या देशातील गरिबातील गरीब माणसाला जर कोणत्या जाणिवेने बेचैन केले असेल तर ती हीच की पोरं शिकली पाहिजेत. प्रजासत्ताक भारतानंतरच्या काळाने अशिक्षित माणसाला शिक्षणाबद्दल अधिक आस्था वाटू लागली ती वाडीवस्तीपर्यंत पोहोचलेल्या साक्षरता प्रसाराच्या लोणामुळे. यात आणखी एक गोष्ट होती की दुर्गम भागात ही जाणीव अधिक तीव्र असायची. त्यामुळे ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा' ही घोषवाक्ये सन १९५०-६० च्या दरम्यान सर्वत्र आढळत. शाळा प्रभातफेच्या काढून गल्लीबोळांतून ‘मुला-मुलींना शाळेत पाठवा' म्हणून घोषणा देत गावंच्या गावं जागी करीत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ‘मूर्तीचे वरकुटे' हे छोटं गाव. त्या गावाला गाव म्हणण्यापेक्षा यादव वस्ती' म्हणणं अधिक योग्य व्हावं. पाचपन्नास उंब-यांच्या गावाला त्या वेळी वाडी, वस्ती म्हणूनच ओळखलं जायचं. यशवंतराव यादव अशा वस्तीतील एक गरीब शेतकरी. पती-पत्नी दोघे अशिक्षित. पूर्वापर असा कोणताच शिक्षणाचा दिवा त्यांच्याच घरी नाही तर आख्ख्या वस्तीत पेटलेला नव्हता. पदरची मुले-मुली अशिक्षित असली तरी त्यांना शाळेला घालण्याचा शहाणपणा यशवंतराव यादव यांनी दाखविला आणि आपल्या आठ वर्षांच्या बबनला वस्तीतील लोकल बोर्डाच्या शाळेत घातलं. त्या वेळी या शाळा व्हॉलंटरी स्कूल, व्हर्नाक्यूलर स्कूल म्हणून ओळखल्या जायच्या. बबन स्वत:च्या जिद्द नि। प्रयत्नांनी इथं इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकत राहिला. हा काळ साधारण १९५४-५५ चा असावा.
 वरकुटे वस्तीतील शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचेच वर्ग होते. जवळ चार-पाच किलोमीटर अंतरावर नेरले नावाचे वरकुट्यापेक्षा मोठे गाव होते. शिवाय रहदारीच्या रस्त्यावर असल्याने तिथे सातवीपर्यंतची शाळा होती. कांबळे गुरुजी, पोतदार गुरुजी, माळी गुरुजी असा उत्साही शिक्षकांचा मेळा शाळेस लाभल्याने ते पंचक्रोशीतील मुले निवडून गोळा करीत व आदर्श शाळा चालवित. बबनचा शोध चौथीच्या केंद्र परीक्षेतून लागला. बबन येता-जाता रोज दहा किलोमीटरची पायपीट करीत इथे इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत शिकला. शिक्षकांचे व्यक्तिगत प्रेम, लक्ष, प्रोत्साहन यांमुळे बबन इथेही चांगल्या मार्कोनी उत्तीर्ण झाल्याने वरकुटे गावच्या शिक्षकांप्रमाणे इथल्या

शिक्षकांनी बबनला बार्शीला मामांच्या बोर्डिंगमध्ये पाठवायचे ठरविले. तो काळ अशिक्षित पालकांचा असल्याने शिक्षकच मुलांचे भवितव्य व पुढील शिक्षणाचे मार्गदर्शन व तजवीज करीत. सन १९५९-६० च्या शैक्षणिक वर्षात बबन मामांच्या बोर्डिंगमध्ये दाखल झाला. तो प्रवेश त्याच्या जीवनाचा कायाकल्प करणारा ठरला. कारण इथे शिकेल तेवढं नि पाहिजे त्या सर्व शिक्षणाची सोय होती. बोर्डिंगचा नियमित परिपाठ, मामांचे संस्कार, परिसरातील शैक्षणिक वातावरण, गुणवत्तेची स्पर्धा, ध्येयवादी शिक्षक या सर्वांचा परिणाम म्हणून बबन यादव नावाचा किशोरवयीन मुलगा चांगल्या मार्कोनी एस. एस. सी. होऊन नंतर दोन वर्षांनी इंटर सायन्सही मेरिटमध्ये उत्तीर्ण झाला. त्यामुळे परिस्थिती व परिसराचे वास्तव भान होऊन या ध्येयवादी तरुणाने डॉक्टर व्हायचं ठरवून मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सन १९६५ च्या दरम्यान सोलापूर, कोल्हापूर परिसरातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय होते. ग्रामीण भागातील डॉक्टर होऊ इच्छिणाच्या गरीब मुलांचे ते आकर्षण केंद्र होते. विद्यार्थी एकमेकांना मदत करीत. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत नसले तरी सवलतीत शिक्षण मिळे. इथे त्यांना वसंतराव गरड यांच्यासारखा जीवाला जीव देणारा मित्र मिळाला. ग्रामीण भागातील गरीब, गरजू, अज्ञानी जनतेची सेवाभावे शुश्रूषा करण्याचा वसा घेतलेले, ज्ञान व अनुभवसंपन्न, ध्येयवादी डॉ. फ्लेचर, डॉ. कौंडिण्य, डॉ. डोनल्हसन यांच्यासारखे शिक्षक भेटल्याने डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहत असतानाच्या काळातच योगायोगाने मामांना मिरजेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इथे बबनराव यादव एम. बी. बी. एस. पूर्ण करीत होते; पण पुढे त्यांना एम. एस. करायचं होतं. मामांनी त्यांना बार्शीत येऊन गरिबांसाठी दवाखाना सुरू करूया म्हणून निमंत्रण दिलं. शिक्षण पूर्ण होऊ दे, मग मी भेटतो म्हणून डॉ. बी. वाय. यादव यांनी मामांना बार्शीत पोहोचवले व आश्वस्त केले. या सेवेतही त्यांना जीवन कळून पुढील आयुष्य कसे कंठावे याचा विचार सुरू झला. त्यांनी एकमात्र निश्चित केले की, आपण सेवाधर्म म्हणून डॉक्टरकी करायची.
 एम. बी. बी. एस.नंतर डॉ. बी. वाय. यादव यांनी एम. एस. परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली. ते शिवाजी विद्यापीठाची एम. एस. परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. या अभ्यासक्रमात त्यांना अमेरिकन डॉक्टरांच्या हाताखाली शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण लाभल्याने ते कुशल शल्यचिकित्सक बनले. प्रथम प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होता आली याचे श्रेय डॉ. यादव आपल्या अनुभवसंपन्न शिक्षकांना देतात. यातून त्यांची नम्रता व कृतज्ञताच सिद्ध होते. एस. एस. झाले खरे; पण डॉ. बी. वाय. यादव यांच्यापुढे सन १९७४ साली विविध पर्याय होते. त्या काळात एम. एस. झालेले डॉक्टर अपवाद होते. त्यांना विदेशात जाणे शक्य होते. असे असताना कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची धडपड व गुरू डॉ. फ्लेचर यांचा वारसा व आदर्श जपायचा म्हणून डॉ. बी. वाय. यादव यांनी सर्व आमिषे, प्रलोभने, स्वार्थ लाथाडून अनवाणी डॉक्टर व्हायचे ठरविले. ४ फेब्रुवारी, १९७५ रोजी त्यांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची इच्छा प्रमाण मानून एम. एस. असतानाही अवघ्या सहा खाटांचे छोटे रुग्णालय ‘आरोग्य मंदिर' या नावाने सुरू केले. आज बार्शी व उस्मानाबाद परिसरातील जनतेची जीवनवाहिनी बनलेले ‘कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल सुमारे ३५० खाटांचे रुग्णालय बनून अहर्निश गोरगरीब रुग्णांवर उपचार करीत मानवतावादी सेवाकार्य करीत आहे. लवकरच ‘ट्रॉमा सेंटर' सुरू होत असून हे केंद्र स्वप्नापलीकडचे सत्य बनत आहे. त्यामागे डॉ. बी. वाय. यादव यांची गेल्या ४० वर्षांची अविरत सेवा कारणीभूत आहे. तळागाळातील शेतमजूर, दलित, गोरगरीब जनतेस हे रुग्णालय जीवनदान ठरले आहे. डॉ. बी. वाय. यादव हे सर्व निरपेक्षतेनं करतात त्यामागे एक वैयक्तिक शल्यही कारण बनून आहे. त्यांचे जन्मदाते वडील लहानपणीच वारले. आपल्या वडिलांना ते प्रतिकूल परिस्थितीमुळे वाचवू शकले नाहीत. आईने त्यांचा कष्टाने सांभाळ केला. मामांनी आधार दिल्यामुळे त्यांचे शिक्षण होऊ शकले. त्याची उतराई म्हणून डॉ. बी. वाय. यादव यांनी आजीवन संस्थेसाठी वाहन घ्यायचे ठरवून गेली ४०-४२ वर्षे निरंतर पूर्णवेळ सेवक बनून समर्पित समाजसेवक ते म्हणून कार्यरत आहेत.
 मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर डॉक्टरांनी मामासाहेब जगदाळे यांची मृत्यूपर्यंत १७ वर्षे शुश्रूषा केली. आपल्या आईचा तिच्या ९२ व्या वर्षांपर्यंत सांभाळ करून ऋणमुक्ती यज्ञ चालविला. या कृतज्ञतापूर्ण सेवेस शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य!
 आज डॉ. बी. वाय. यादव केवळ मामांच्या संस्थेचे राहिले नाहीत. बार्शी पंचक्रोशीतील सर्व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी विश्वस्त म्हणून ते ‘सार्वजनिक चरित्र' बनले आहेत. हरिजन सेवक संघ, कॅन्सर हॉस्पिटल, रेडक्रॉस सोसायटी, रामभाऊ शहा रक्तपेढी, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल, भगवंत मंदिर, श्रीराम मंदिर (परांडा), पोफळे ट्रस्ट, रोटरी क्लब अशा सर्वांचे ते आधारवड बनले आहेत. आजवर त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘बार्शीभूषण' सह अनेक मान्यवर, प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलितमित्र पुरस्कार' देऊन सन्मानित केले आहे. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयाच्या निमित्ताने डॉ. बी. वाय. यादव यांचे कार्य, जीवन, विचार, व्यक्तिमत्त्व जवळून पाहता, अभ्यासता आले. आतून-बाहेरून सज्जन, पापभिरू माणसं मिळणं दुर्मीळ होत चाललेल्या आजच्या काळात असा एक समाजपुरुष समकालात आपल्या आजूबाजूस आहे, हा दिलासा, आश्वासनही कडेलोट होणा-या समाजमनास दिलासा देत राहते. पणती जपून ठेवा’ ‘अंधार फार झाला, न म्हणता जी माणसं आपल्या सदाचरण नि सदाशयतेचा सडा सर्वदूर शिंपडत राहतात, त्यामुळे नैतिक अध:पतनाचे निसटते चिरे, बुरूज ढासळणे थांबते. चांगले वागू इच्छिणाच्यातला विझू पाहणारा नंदादीप सुरक्षित राखण्याचे कार्य अशा साधुपुरुषांकडून परोक्षपणे होत राहते. हीच या माणसांची खरी दौलत व वर्तमानास लाभलेले वरदान, योगदान होय. येणारी आदर्श होऊ पाहणारी जी पिढी आहे, त्यांना डॉ. यादव यांचे जीवन दीपस्तंभ बनून दिशा दाखविते. मार्गदर्शन करते. एक नवी आशा, पालवी, किरण निर्माण होण्याच्या लक्ष-लक्ष शक्यता निर्माण होतात त्या अशा विभूतींमुळे ज्यांच्यापुढे नतमस्तक होऊन हात जोडून ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' म्हटले तरी स्वत:ला धन्य वाटावे.

संवेदी धन्वंतरी : डॉ. विजय करंडे

 हा काळ सन १९७५-७६ चा असावा. दिवस आणीबाणीचे होते. घरं बदलत मी कोल्हापूरच्या राजारामपुरी उपनगरात येऊन स्थिरावलो होतो. घरी मी, पत्नी, आई व छोटा मुलगा निशांत होतो. निशांत अगदी लहान होता. वर्षभराचा असावा. लहान मुलांच्या डॉक्टरांच्या शोधात मला प्रथमतः डॉ. विजय करंडेंचं नाव कळलं. सांगणारी घरमालकीण व मोलकरीण दोघींनी वेगवेगळ्या वेळी पण एकच गोष्ट सांगितली, ती अशी की गरिबांचा डॉक्टर हाय! हातात गुण हाय आणि पैशाचंबी काय नसतं... पैसे नसलं तरीबी औषधं देतो. फकत वेळ वंगाळ लागतुया... हीऽऽऽ गर्दी असतीया बगा!' मी नि रेखा बाळाला घेऊन गेलो तेव्हा वरील सर्व वर्णन तंतोतंत खरे ठरल्याची अनुभूती आली. अनुभव हीच खात्री म्हणतात ते हेच.
 पुढे मी सन १९८१ च्या मध्यास केव्हातरी राजारामपुरीचं घर बदलले अन् मी सन्मित्र वसाहतीमध्ये राहण्यास आलो. एव्हाना मी शिक्षकाचा प्राध्यापक नि प्राध्यापकाचा डॉक्टर झालेलो. म्हणजे डॉक्टरेट संपादली होती. सौ. रेखा दुस-यांदा गरोदर होती. नवं बाळ येणं हेही घरबदलाचं एक कारण होतं. जुन्या घरी डॉ. करंडेंचा दवाखाना चौथ्या गल्लीत तर मी पाचव्या. इथेही पहिल्या चौकात मी तर डॉ. करंडेंचं घर पुढच्या चौकाच्या तोंडावर. राजारामपुरीतील दवाखान्यात जाण्यापूर्वी डॉक्टर इथे पेशंट तपासत. ही मोठी सोय होती. डॉक्टर रोज सकाळी आपलं पामेरियन कुत्रं घेऊन नियमित फिरायला जात, तेव्हाही ‘हायऽ ऽ हॅलोऽ ऽ' होत असे.
 अंकुर जन्मून सहा महिनेही झाले नसतील. सायंकाळी त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागले, ते थांबेनाच म्हणून डॉक्टरांकडे गेलो. ते दवाखाना बंद करत होते. त्यांनी बाळाला पाहिलं. त्यांनाही काय करावं सुचेना. त्यांनी डॉ. गोगटेंना फोन लावला. तेही दवाखाना आवरून निघायच्या तयारीत होते. ई.एन.टी.सर्जन ते. डॉ. करंडेंच्या शब्दासाठी आम्ही जाईपर्यंत थांबून होते. बाहेर आकाश फाटले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. डॉ. करंडे यांनी स्वत:ची गाडी काढली. भर पावसात आम्हास नेलं. डॉ. गोगटेंनी तपासणी, स्वच्छता करून कसलंसं इंजेक्शन दिलं. बाळाच्या नाकात कापसाच्या नळ्या भरल्या अन् थोड्या वेळानं रक्त थांबलं नि आम्ही निश्चिंत झालो. डॉक्टरांनी बाळाला मांडीवर घेऊन रात्र काढायची सूचना दिलेली होती. आम्ही दोघे आळीपाळीने जागे. आई मात्र रात्रभर जागीच होती. पहाटे पाचला दारावर टकटक झाली. उघडतो तर डॉ. करंडे दत्त! ‘बाळाचं रक्त थांबलं का? मला रात्रभर झोप नव्हती म्हणून इतक्या सकाळी आलो. आजच्या काळात पेशंटच्या व्यथा, वेदनांत असा परकाया प्रवेश करणारा डॉक्टर शोधून सापडणे दुर्मीळ! त्या दिवशी मला डॉक्टर प्रेषितापेक्षा कमी नाही, हे लक्षात आले.
 डॉ. करंडे पेशंटचं टोकाचं करीत. पेशंटनी पण पाठपुरावा करीत डॉक्टरांना प्रगती कळवली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असायची. त्यात गैर काहीच नसायचे. मी अंकुरची प्रगती त्यांना फोनवर सांगितली होती; पण त्यांच्या लक्षात नव्हती. त्यामुळे एकदा ते प्रथमदर्शनी माझ्यावर उखडले; पण नंतर समजून घेतले. डॉक्टर-पेशंट हे उभयपक्षी नाते निर्माण करण्यात, जपण्यात, ते वाढवण्यात डॉ. करंडेंचा प्रयत्न केवळ मानवधर्मी व मानवसेवी असायचा. मोठ्यांपेक्षा छोट्या पेशंटमध्ये ते अधिक रमायचे. मुलेही त्यांच्याकडेच जायचा हट्ट धरत. डॉ. करंडेचा आदर्श साने गुरुजी होता. पेशंट प्रतीक्षालयात एकच फोटो होता, तो म्हणजे साने गुरुजींचा. ऐंशीच्या दशकात दोन-पाच रुपये केसपेपर फी म्हणजे मोफत वा धर्मादाय दवाखाना चालविल्यासारखेच होते. जवळ वड्डुवाडी होती. तेथील पेशंट अधिक असतं, म्हणून उच्चभ्रू डॉक्टरांकडे येत नसत. ही त्यांच्या ‘जनता डॉक्टर' असल्याची पोहोचपावतीच होती.
 आणीबाणीच्या काळात मी कोल्हापूरच्या आंतरभारती शिक्षण संस्थेच्या विविध शाळांत शिक्षक म्हणून कार्यरत होतो. त्या काळात आमचं मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह होतं. ते पूर्वी राजारामपुरीच्या अकराव्या गल्लीत होतं. माझ्या आठवणीप्रमाणे तेथील मुलांच्या औषधोपचाराची जबाबदारी डॉ. करंडेंनी स्वतः स्वीकारली होती. विशेष म्हणजे नाममात्र असलेली फी घेणे तर सोडाच; पण त्या विद्यार्थ्यांना ते पदरमोड करून औषधोपचार करीत. धन्वंतरी हा गरिबांवर उपचार करणारा योगी होता तसे हे डॉक्टर. कुठेही आपली गरज दिसली की तिथे स्वतः जाण्याचा त्यांचा रिवाज खानदानी सभ्यता सिद्ध करणारा असायचा. आपल्याकडे जे आहे, ते दुसन्यास देण्याची त्यांची धडपड त्यांचं संवेदी मन व्यक्त करणारी होती.
 डॉ. विजय करंडेंचे पूर्वज मूळ कोकणातील. कोल्हापुरात आलेल्या मूळ कोकणवासीयांची एक संस्था होती. ‘कोकण मित्र मंडळ' तिचे नाव. संस्थेचे मूळ काम कोकणची संस्कृती जपण्याचे व नव्या पिढीत ती रुजविण्याचे असायचे. म्हणजे जे कोकणवासी कोल्हापुरात येऊन स्थायिक झालेत, घरे बांधलीत, त्यांनी आपल्या परसात, अंगणात नारळ, पोफळी, अबोली, आंबा लावावा. कोकण शॉपीत कोकणचे पदार्थ व मेवा मिळावा. सण साजरे करावेत अशी कल्पना; पण त्या संस्थेचे कामाचे स्वरूप क्लबसारखं औपचारिक होत गेलेलं. डॉ. करंडे संस्कृतिहरणानी अस्वस्थ असत. त्या अस्वस्थतेतून ते या मंडळाचे अध्यक्ष झाले. मित्र मेळावा, कोकण महोत्सव, संस्थेसाठी इमारत, कोकण साहित्य चर्चा असे नानाविध उपक्रम हाती घेऊन त्यांनी संस्थेचे पुनरुज्जीवन केले होते. त्यांच्या काळात मी एक-दोन उपक्रमांत कोकणचा नसून पाहणा होऊन जे कोकण समजावून सांगितले होते, त्यामुळे डॉ. करंडे बेहद्द खुश होते. त्यांची गुणग्राहक वृत्ती अनुकरणीय होती.
 कोकणातून आलेले गृहस्थ म्हणून असेल; त्यांचे सर्व बालपण, काही शिक्षण कोकणात झाल्यामुळेही असेल, निसर्गाची त्यांना उपजत आवड होती. कोल्हापुरातील काही मित्रांनी एकत्र येऊन ‘निसर्ग मंडळ' स्थापन केले होते. त्यातून निसर्गभ्रमंती असायची. डॉ. करंडे त्यात सपरिवार सामील होत असत. मूळचे कोणकातील असल्यामुळे असेल, ते उदारमनाचे गृहस्थ होते. त्यांच्या अंगणात कलमी आंब्याचे मोठे झाड होते. त्यास खूप आंबे लागत. डॉक्टर आपल्या सर्व आप्त-स्वकीय, मित्रमंडळींना ते वाटत. ते जोपर्यंत हिंडत-फिरत तोपर्यंत न चुकता उतरलेले डझनभर आंबे प्रेमाने आणून देत. डॉक्टरांकडून आंबे आले म्हटले की मग माझे पाय मंडईकडे वळत असत. या उपक्रमात डॉक्टरांचे प्रेम एकतर्फी होत राहायचे. त्यात खंड नसायचा. ही नम्रता, मोठेपणा त्यांच्यात कुठून आला होता, याचा शोध घेताना लक्षात येते की पुरुषांचे

मातृहृदयी असणे ही खास कोकणच्या मातीची किमया. कोकणी माणूस फणसासारखा. कधी काटे मिळणार पण लक्षात राहणार गच्याचं मऊपण नि मिठासच. कोकणी माणूस एकदा का तुमचा झाला मग तो ताईतच. निष्ठा शिकावी कोकणी माणसापासूनच. डॉ. करंडे या वृत्तीचा मूर्तिमंत आदर्शच!
 मी पीएच. डी. झाल्यानंतर अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यास वाहून घ्यायचं ठरविले. हा काळ साधारणपणे १९८० चा होता. रिमांड होम ही माझी मातृसंस्था. तिच्या आधारामुळे मी स्वावलंबी झालो होतो. उतराई म्हणून काम सुरू केले होते. साधारणपणे पहिली पाच वर्षे संस्था समजून घेण्यातच गेली होती; पण हळूहळू आम्ही संस्थेचा सेवाविस्तार करायचे ठरवून मुलींचे निरीक्षणगृह, अनाथ मुलांसाठी अनिकेत निकेतन सुरू केले होते; पण अनाथ अर्भकांना सांभाळण्याचे दिव्य करू इच्छित असायचो. पण धाडस नाही व्हायचे. अनाथ अर्भकांना सांभाळणे हे जबाबदारी व जोखमीचे काम होते. ही बाळं सरकारी दवाखान्यात असत. अनेक मृत्युमुखी पडत. 'वात्सल्य बालसदन' हे अनाथ अर्भकांचे पाळणाघर सदृश शिशुगृह सुरू करायचे योजत असताना डॉक्टर ही मुख्य गरज होती. डॉ. करंडे एका पायावर तयार झाले, तसे आमच्या उत्साहास उधाण आले. सन १९८६ ला स्वातंत्र्यदिनी की प्रजासत्ताक दिनी आम्ही 'वात्सल्य बालसदन सुरू केले नि पहिल्याच वर्षी एखादा अपवाद वगळता आम्ही सर्व दाखल बाळे जगवू शकलो. इतकेच नव्हे तर त्यांना दत्तक पालक देऊन सनाथ करू शकलो, याचे खरे श्रेय डॉ. करंडे, नर्सेस व काळजीवाहक मातांच्या समर्पणासच द्यावे लागेल.
 डॉ. करंडे यांचे आठवड्यातून एकदा येणे अपेक्षित होते; पण गरजेप्रमाणे ते कितीही वेळ येत. प्रत्येक मुलाचे लसीकरण पाहत. उपचार करीत. आपल्याकडील औषधे आणत. कमी पडली तर मित्रांकडून आणत. पाहता पाहता मुलांचा आकडा २५-३० झाला; पण डॉक्टर करंडे न थकता सर्वांचे करत. इतर मोठ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबीरे घेत. राणी म्हणून अपंग मुलगी होती. केवळ डॉक्टर करंडेंमुळे ती चालू लागल्याचे मला आठवते. तिच्यासाठी ते नारायण तेल आणत. स्वतः तिला चोळत. डॉ. करंडे आमच्या लेखी ‘ख्रिश्चन मिशनरी' वृत्तीने सेवा करीत. त्यात असलेली निरपेक्षता त्यांना तर 'देवदूत' सिद्ध करणारी असायची. मुला-मुलींच्या, संस्थेच्या सर्व उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आत्मीय असायचा. वीसएक वर्षे त्यांनी किमान दोन हजार अर्भकांना जीवनदान दिले होते. ही समाजबांधीलकी, हे व्रत ते अबोलपणे, भूमिगत होऊन करीत राहत. कळस म्हणजे त्यांना आम्ही मासिक ७५ रुपये इतके अल्प मानधन देत असू. ते महिन्याच्या महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करीत राहायचो; पण वीस वर्षांत ते त्यांनी कधी स्वत:साठी वापरले असे घडले नाही. दरवर्षीच्या मार्चमध्ये ते सर्व रकमेचा चेक संस्थेस देणगी म्हणून पाठवित. इतकी व्रतस्थता व निरीच्छता मी कुणाच्यात पाहिली नाही. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन कोल्हापूर 'सकाळ'ने आपल्या वर्धापनदिनी त्यांचा केलेला गौरव हा माझ्या दृष्टीने 'कोल्हापूर भूषण'पेक्षा कमी महत्त्वाचा नव्हता.
 डॉ. करंडे म्हणजे 'देवमाणूस' असं प्रत्येक परिचिताला का वाटावं? यातच त्यांच्या जीवन, कार्य, विचार, मूल्ये, वृत्ती यांची थोरवी सामावलेली आहे. ते संवेदी धन्वंतरी ठरावे असं त्यांचं कार्य, कर्तृत्व! त्यात शोभा नसायची, असायचं सौंदर्य! काही बाबतींत मात्र ते फार कठोर होते. विशेषतः सेवा संस्थांमध्ये राजकारण करण्याच्या वृत्तीचा त्यांना तिटकारा असायचा. अशा लोकांपासून ते स्वत:ला दोन हात दूर ठेवीत. 'असंगाशी संग' त्यांना कधी जमला नाही, ते त्यांच्या उपजम सभ्य वृत्तीमुळे. ते फार श्रीमंत गृहस्थ नव्हते आणि नाहीत पण; परंतु मनाची श्रीमंती त्यांच्या दृष्टीने मोठी गोष्ट होती. गांधीवाद न उच्चारता त्यांनी आचरला. ख्रिश्चन धर्माचा सेवाभाव त्यांनी धर्मांतर न करता जपला. हे सारं घडतं माणसाच्या स्वीकृत मूल्यनिष्ठतेतून. जो माणूस स्वेच्छेने एखादे मूल्य, तत्त्व व आचार स्वीकारतो, ते जपण्यापाळण्याचे निकषही त्याचे स्वत:चे असतात. अशी माणसे कधी स्वत:स दुस-याच्या तुलनेच्या आरशात पाहत नसल्याने ते आत्ममग्न समाधानीच असतात. डॉ. करंडे कुटुंबवत्सल गृहस्थ. आपल्या मुलाइतकेच नातवात गुंतलेले मी पाहतो तेव्हा लक्षात येते की आप-परच्या पलीकडचा त्यांचा नित्य व्यवहार त्यात घरी एक नि दारी एक असा फरक नाही. आतबाहेर एक असणारी माणसं सुसंगत जीवन जगत समाजासाठी अनुकरणीय आदर्श बनतात. तसे डॉ. विजय करंडे होत. उतारवयातही त्यांच्या सेवापरायण व कर्तव्यतत्परतेत तसूभर न्यून आलेले नाही. व्रतस्थ माणूस घेतला वसा टाकत नसतो. निरंतरता झरते ती आत्मविस्मृत करणा-या परहितदक्ष कर्तव्यभावनेने. तेच डॉ. विजय करंडे यांचे बलस्थान व जीवनमर्मही! गांधीवादी उद्योजक : भवरलाल जैन

 जैन इरिगेशन, गांधी तीर्थ, लेखन व्यासंग, मनुष्यसंग्रह, शेती, निसर्ग, साहित्यप्रेमी अशा अनेकविध कारणांनी मी भवरलाल जैन यांना ओळखून होतो; पण प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग जळगावच्या ‘सीड' संस्थेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने आला. माझे मित्र डॉ. प्रसन्नकुमार (रेदासनी) ‘सीड'चा कार्यक्रम आटोपल्यानंतर मला भवरलाल जैन यांच्या भेटीस रात्री त्यांच्या घरी घेऊन गेले होते. भेटीत या गोष्टीचा मला सुखद धक्का बसला की, त्यांनी मी वि. स. खांडेकरांचे संपादित केलेले साहित्य वाचलेले होते. विशेषतः ‘दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी' शिवाय माझे आत्मचरित्र ‘खाली जमीन, वर आकाश' ही पहिल्या भेटीत आम्हा उभयतांत स्नेह जडायची अनेक कारणे समान होती ती म्हणजे खांडेकर, गांधी आणि साहित्यप्रेम! पहिल्या भेटीत भवरलाल जैन यांचा लाघवी स्वभाव माझ्या लक्षात आला. अकृत्रिम मैत्रभाव त्यांच्यात उपजत असल्याचे माझ्या लक्षात आला. कोल्हापूरला परतल्यावर मी माझे समग्र लेखन त्यांना भेट म्हणून पाठविले होते. ते वाचून आवडल्याचेही आवर्जून कळविले होते. एव्हाना त्यांचे वस्तुसंग्रहालय सहायक, तज्ज्ञ, लेखक भुजंग बोबडे यांचाही परिचय झालेला. ते आता माझ्या नि बडे भाऊ अर्थात भवरलालजींमधील मैत्री दृढ करणारे सेतू बनले होते.
 भवरलाल जैन यांनी उभारलेलं गांधी तीर्थ मी पाहिले नि भाऊंच्या प्रती माझ्या मनातील प्रेमाची जागा आदराने घेतली. महात्मा गांधी तीर्थ उभारून भाऊंनी महात्मा गांधींचे जीवन व कार्य अत्यंत प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविले होते. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी' हे संतवचन त्यांनी आचारधर्म बनविल्याचे माझ्या लक्षात आले. गांधी तीर्थबरोबर मी त्यांचे अनुभूती' विद्यालय पाहिले. एकच दर्जाची दोन विद्यालये. एक श्रीमंतांसाठी, तर दुसरे गरिबांसाठी. एका श्रीमंत पालकाने आपण दिलेल्या फीतून एका गरीब मुलाला शिकवायचे. समाजवादावर आयुष्यभर नुसतं भाषणं देत फिरण्यापेक्षा बडे भाऊंची ही कृती प्रभावी समाज परिवर्तन करणारी होती. ‘गांधी तीर्थ' इतके भव्य की, महात्मा गांधींच्या साधेपणाचे वैभवी उन्नयन! त्याबद्दल मतभेद असूनही त्यामागची श्रद्धा, समर्पण, प्रभावीपणा हा अपराजेयच. बडे भाऊचं समग्र जीवन म्हणजे साध्या विचारांचे प्रभावी आविष्करण वाटत आले आहे.
 भवरलाल जैन यांनी हे सारं केलं, उभारलं ते जर आपणास समजून घ्यायचे असेल तर त्यांची घडण आपण पाहायला हवी. भवरलाल जैन यांचा जन्म १२ डिसेंबर, १९३७ रोजी जळगाव जिल्ह्यातील वाकोड नामक छोट्या खेड्यात झाला. ते गाव, तो काळ, ती माणसं सारं ‘वाकोदचा वटवृक्ष'मध्ये चित्रीत केले आहे. त्यांचे पूर्वज राजस्थानातील, व्यापारउद्योगाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले नि इथल्या माती व माणसांत मिळून मिसळून गेले. पूर्वापार त्यांच्या घराण्यात संयुक्त कुटुंबाची प्रथा. ती भवरलाल जैन यांनी आपल्या आयुष्यातही श्रद्धेने जपली, जोपासली; पण भवरलालजी यांचे श्रेय आपल्या पत्नी कांताबाईंना देतात. आपल्या पत्नीबद्दल त्यांनी ‘ती आणि मी' या आत्मचरित्रात भरभरून लिहिलं आहे. आपल्या यशाचं सारं श्रेय ते पत्नीच्या वटवृक्षी व्यक्तिमत्त्वास, तिच्या त्याग नि समर्पणास देतात.
 भवरलालजी वयाच्या तेविसाव्या वर्षी विधी विशारद झाले. मनात आणलं असतं तर ते नामांकित वकील होऊ शकले असते; पण त्यांनी वडिलार्जित शेती कसणे पसंत केले. शेती व्यवसायातील अशाश्वतता त्यांनी अनुभवली व व्यवसाय करायचे ठरवले. प्रारंभी त्यांनी ढकलगाडीतून रॉकेल विकायला सुरुवात केली. व्यवसायात यशस्वी व्हायचं तर श्रमाची लाज बाळगायची नाही, हा यशाचा मूलमंत्र त्यांनी वडिलांच्या चरित्रातून अंगीकारलेला होता. नंतर त्यांनी व्यापार थाटला. पूर्वापर चालत आलेले अवघे सात हजार रुपये कनवटीला होते. त्या बळावर त्यांनी व्यापार करीत परत शेतीत लक्ष केंद्रित केलं. एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं की, भारतासारख्या देशात शेती, व्यापार व उद्योग असा त्रिमितीय व्यवसाय केल्याशिवाय स्थैर्य व समृद्धी लाभणार नाही. सन १९७२-७४ मध्ये शेतीकेंद्रित मनाचे भवरलाल जैन सन १९८० मध्ये एकदम उद्योग करण्याचा धाडसी निर्णय घेतात. पी. व्ही. सी. पाईप उत्पादनात त्यांनी लक्ष घातले नि त्यांना अनपेक्षित यश लाभले ते त्यांच्या द्रष्टेपणामुळे. त्यांनी पुढे सन १९८७-८८ मध्ये आणखी एक धाडसी पाऊल उचलले ते म्हणजे त्यांनी पब्लिक कॉर्पोरेशनची स्थापना करून आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. भवरलाल जैन यांच्या प्रत्येक क्षेत्रातील यशाचे श्रेय त्यांचा अभ्यास, संशोधन, कालभान, द्रष्टेपण नि धडाडीस द्यावे लागेल. खानदेशात यापूर्वी कुणी इतकं मोठं साहस केल्याचं ऐकिवात नाही.
 त्यांनी सुरू केलेल्या जैन ठिबकला केवळ महाराष्ट्रातच नाही, भारतभर उदंड प्रतिसाद लाभला. पाण्याचे घटते प्रमाण व कसण्याखाली येणारे वाढते शेती क्षेत्र, त्यामधील विषमता व दरी ओळखून त्यांनी जैन ठिबक सिंचनचे उत्पादन, प्रचार-प्रसार, प्रगती इतक्या जोमाने आणि नेटाने केली की, सिंचन क्षेत्राबरोबर दुष्काळी भागातही तिचे समान स्वागत झाले. जैन शब्दाचा पर्यायी अर्थ ‘ठिबक' निर्माण करण्यापर्यंतचे अभूतपूर्व यश त्यांना लाभले. एखाद्या व्यवसायास आलेले यश हे राज्य नि देशाच्या सरकारचा कार्यक्रम होतो, हे अभूतपूर्व, अघटित असे सत्य होते. पुढे त्यांनी ‘जैन हिल्स' नावाने आज ओळखला जाणारा उजाड परिसर विकत घेतला. तो सिंचनप्रवण बनवून ‘सुजलाम् सुफलाम्' केला. 'आधी केले, मग सांगितले' असे सूत्र वापरून त्यांनी शेतक-यांची कोरडवाहू पिकाची मानसिकता बदलून सिंचनक्षम शेतीची गोडी शेतक-यास लावली. भरड माळावर नंदनवन फुलू शकते हा विश्वास भवरलाल जैन यांनी प्रात्यक्षिकांतून सर्वत्र रुजविला. पुढे ठिबकचे रूपांतर तुषार सिंचनात करून मोठी आघाडी घेतली व इस्राइलसारख्या शेतीतील प्रयोगांना मागे टाकले. जैन हिल्स, जैन व्हॅली, जैन अॅग्री पार्क, जैन फूड पार्क आज भारतातील शेतक-यांसाठी ‘कृषितीर्थ' बनले आहे. भारतभरातून रोज येणा-या शेतक-यांच्या सहली हा त्याचा पुरावा म्हणून सांगता येईल. त्यांच्या या पुरुषार्थाची नोंद घेऊन त्यांना आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभलेत. फाय फाउंडेशन, क्रॉफर्ड मेमोरिअल अॅवॉर्ड, वर्ल्ड ट्रेड सेंटर जीवन गौरव, फोर्ल्स एशिया अशी मोठी यादी सांगता येईल.
 आपण जे केले ते त्यांनी शब्दबद्ध केले. मूळ मराठी पुस्तके कितीतरी. त्यांची हिंदी, इंग्रजी भाषांतरेही उपलब्ध आहेत. आजची समाजरचना', ‘अतिथी देवो भव', जलनियोजन’, ‘कार्यसंस्कृती', ‘उमललेले संवाद', 'वाघूरचं पाणी', 'पाषाणातून पाझर', 'मरुभूमीतून बाहेर', 'जैन हिल्सवरील जागरण', ‘मुरलेलं लोणचं’, ‘सुजलाम् सुफलाम्', 'थेंबभर पाणी, अनंत आकाश' ही आणि अशी पुस्तके लिहिणारा हा भगीरथ एकाच वेळी लक्ष्मीपुत्र नि सरस्वतीपुत्र होतो याचं रहस्य या माणसाच्या दिवसाची रात्र करण्याच्या अथक श्रमनिष्ठेत सामावलेलं आहे.
 दिवसाची रात्र म्हटल्यावर लक्षात आलेली गोष्ट सांगतो. अगदी अलीकडच्या काळात मी बार्शीला कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे स्मृती संग्रहालय उभारले. त्याचे उद्घाटन बडे भाऊंच्या हस्ते व्हावे म्हणून आम्ही त्यांना भेटण्यास गेलो होतो. पूर्वीच्या मानाने ते थकलेले होते. एक शस्त्रक्रिया नुकतीच झालेली; परंतु चेह-यावरचे हास्य, उमेद, उत्साह, मात्र पूर्वीचाच होता. आम्ही त्यांना दिलेले निमंत्रण त्यांनी सहर्ष स्वीकारले. गप्पात तब्येतीचा विषय निघाला. तर म्हणाले, “बाकी सगळे ठीक आहे. रात्रीची झोप मात्र कमी झाली; पण त्यामुळे एक प्रकारे फायदाच झाला म्हणायचा. आता रात्री मी युरोपचे काम करतो नि दिवसा आशियाचे! ते सहज बोलले; पण त्यातून त्यांचं वैश्विक उद्योगसाम्राज्य माझ्या लक्षात आले. शिवाय संकटे ही श्रमशील माणसास पर्वणी असते, याचाही एक नवा वस्तुपाठ मिळून ज्ञानात एक नवी भर पडली.
 पुढे आमच्या बार्शीच्या वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनाच्या तोंडावर त्यांची प्रकृती ढासळली. कार्यक्रमावर मळभ साठू लागलं. ते येतील की नाही शंका, धाकधूक, म्हणून मी फोन केला. तर म्हणाले, “डॉक्टर, तुम्हाला शब्द दिला ना. मग मी येणारच. काहीही होवो.' नंतर मला खासगीतून समजलं की बडे भाऊंच्या या निर्णयाने घरचे सचिंत असणे स्वाभाविक होते. त्यात भाऊंनी रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला. काळजी अधिकच वाढली. घरचा विरोधही वाढणे स्वाभाविक होते. एका निर्वाणीच्या क्षणी ते म्हणाले, 'मी काय कुणाच्या मेजवानीस निघालोय? शून्यातून विश्व उभारलेल्या एका सामान्यातून कर्मवीर झालेल्याचं स्मारक लोकार्पण करायला निघालोय. ते करताना मरण आलं तर उलट मी सामाजिक हुतात्मा होईन.' मग मात्र सारं कसं शांत नि सहज घडलं. बडे भाऊ आले. दोन मजले थांबत-थांबत चढून वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. सुंदर भाषण केले. भाषणातून लक्षात आलेली गोष्ट अशी की ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे जीवनकार्य समजून घेऊन आलेले होते. येण्यामागे पण इतरांप्रती श्रद्धाभाव होता. संस्थेच्या सर्व मुलांची बडे भाऊंच्या संवादाचा कार्यक्रम ठेवला होता. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. अनुभूती विद्यालयातही ते नेहमी मुलांशी संवाद साधत असत. माणसाचं मोठेपण दुस-याचं होण्यात असतं, हे भाऊंकडे बघून लक्षात येते. भवरलाल जैन यांचे २५ फेब्रुवारी, २०१६ मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार घेत असतानाच निधन झालं. सुमारे ८0 वर्षांच्या जीवनकाळात त्यांनी सहा दशके अहोरात्र कार्य केले. ते कार्य केवळ उद्योग, व्यापार, शेती अशा क्षेत्रांत बंदिस्त करता येणार नाही. वस्तुसंग्रहालय निर्मितीत भारतात त्यांनी नवा अध्याय निर्माण केला. भारतातील आजवरची वस्तुसंग्रहालये स्थिर व वस्तुरूप होती. वस्तुसंग्रहालयास दृक्श्राव्य बनविण्याचे योगदान हे भवरलाल जैन यांचंच. थेंबाचे लक्ष कण करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे शेती व सिंचन क्षेत्रातील मूलभूत उपयोजित संशोधन होय. जलसंधारण व मृदसंधारण यांची सांगड घालत त्यांनी पाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला. उद्योगास निरंतर संशोधनाची जोड देऊन उद्योगाचे प्रतिदर्शी रूप (Role Mode) त्यांनी जगापुढे ठेवले. इस्राइल व जपान दोन्ही देशांची सांगड घालणा-या या उद्योगी महात्म्याकडे गांधींच्या विश्वस्त वृत्तीचा आदर्श म्हणून पाहावे लागते. राजकारणात राहन समाजकारणी, उद्योजकांत राहून शेतकरी, समृद्धीनंतर वितरागी जीवनशैली अशा अनेक अंग नि पैलूंनी भवरलाल जैन यांचे जीवनकार्य, विचार समजून घेता येतात. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो, की गर्भश्रीमंत होऊनही हा माणूस माणूसकीचा गहिवर घेऊन जगत राहिला. त्यांचे मन व्यापारात कठोर, कणखर असेल; पण जीवनाच्या क्षेत्रात ते नेहमीच संवेदनशील, समाजशील राहिले. माझ्या एका विद्यार्थ्यास त्यांनी शिक्षक म्हणून निवडले. त्याला फक्त एकच वाक्य सांगितले, बडे भाऊंनी, 'तुझ्या शिक्षकांप्रमाणे तू असावास म्हणून घेतो. एका वाक्याच्या प्रभावाने त्या विद्यार्थ्यांचा कायाकल्प झाला. मी भाऊंच्या कामगार, कर्मचा-यांमध्येही भाऊंबद्दलचा आदर, प्रेम पाहिले. ते मालक म्हणून कमी, पालक म्हणून अधिक दिसले. सर्वसामान्य माणसात तुमची प्रतिमा काय असते, ही तुमच्या आयुष्याची खरी इतिश्री. भवरलाल जैन घरी नि दुनियेतही ‘बडे भाऊ होते. गांधीवादी जीवनव्यवहार त्यांनी आत्मसात नाही केला. उपजत होताच. तो फक्त त्यांनी बांधीलकीपूर्वक वृद्धिंगत केला. दिव्यत्वाची त्यांच्यातून आलेली प्रचिती मला कर जोडण्यास, कृतज्ञ होण्यास भाग पाडते, हीच त्यांची जीवनथोरवी... पूर्वप्रसिद्धी सूची


१.  आदर्श समाजशिक्षक : अनंतराव आजगावकर
(अनंतराव आजगावकर अमृत महोत्सव गौरविका २00६)
२. मूल्याधारित निरपेक्ष कार्य : अॅड. के. ए. कापसे
(अॅड. के. ए. कापसे गौरवग्रंथ २०१५)
३. जगण्याचा उपदेशित आदर्श : प्राचार्य अमरसिंह राणे
(प्रिन्सिपल राणे स्मृती गौरवग्रंथ २०१५)
४. समाजशील कार्यकर्ते : मोहनराव लाटकर
(मोहनराव लाटकर गौरविका २०१५)
५. जनसामान्यांचे कैवारी : केशवराव जगदाळे
(जन्मशताब्दी लेख १० फेब्रुवारी २०१५. दैनिक पुढारी)
६. नवसाक्षरांचा नंदादीप : बाबूराव शिरसाट
(सेवानिवृत्ती गौरव अंक २०१५)
७. यशवंत वारसा संवर्धक : मोहनराव डकरे
(पारिजात मोहनराव डकरे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा २०१५)
८. सिद्ध संकल्पक : प्राचार्य मधुकर फरताडे
(प्राचार्य फरताडे स्मृती स्मारिका शाश्वतबंध २०१६)
९. बेलौस, बेधडक : वसंत केशव पाटील
(वसंत केशव पाटील सन्मानग्रंथ, वसंतायन, २०१५)
१०. सामाजिक प्रशासक : लक्ष्मीकांत देशमुख
(सेतू २०१३, लक्ष्मीकांत देशमुख विशेषांक)
११. शाहूप्रेमी इतिहासकार : डॉ. जयसिंगराव पवार
(डॉ. जयसिंगराव पवार अमृतमहोत्सवी गौरवग्रंथ ‘संशोधक' २०१७)
१२. अजब प्रकाशक : अनिल मेहता
(अमृतगौरव लेख, दैनिक सकाळ, ३ मार्च २०१६)
१३. हरहुन्नरी शिक्षक : वसंत पाठक
(निवृत्ती गौरव, दै. सकाळ, कोल्हापूर, १४ मे, १९९७)
१४. समर्थचरित्र : दि. ग. गंगातीरकर
(गुरुवर्य गंगातीरकर गौरवग्रंथ २000)
१५. राजनैतिक विधिज्ञ : अॅड. महादेवराव अडगुळे
(अॅड. आडगुळे सत्कार/दै. सकाळ, १९ जैन १९९९)
१६.   पब्लिक अंकल : मुक्तेश्वर मुनशेट्टीवार
(चळवळ्या माणूस गौरवग्रंथ २००३)
१७. सर्वाश्रयी दाता : बापूराव जोशी
(दै. ऐक्य, सातारा/ ३० डिसेंबर १९९६)
१८. संवेदनशील विद्यार्थी : सुनील धोपेश्वरकर
(स्मृतिलेख/दै. सकाळ कोल्हापूर, ३0 जून, २००३)
१९. समाजसेवी उद्योगपती : वसंतराव घाटगे
(अप्रकाशित टिपण)
२०. व्रतस्थ वारस : प्रा. मंदाकिनी खांडेकर
(दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर ३० नोव्हेंबर २०१४)
२१. ऋजु पण कठोर प्राचार्य : डॉ. हिंदुराव पाटील
(दै. महाराष्ट्र टाइम्स/ प्राचार्य पाटील गौरविका २७ एप्रिल, २०१७)
२२. सभ्यतेचा सत्त्वशील उपासक : सतीश पाध्ये (अप्रकाशित)
२३. बार्शीभूषण : डॉ. बी. वाय. यादव (अप्रकाशित)
२४. संवेदी धन्वंतरी : डॉ. विजय करंडे (अप्रकाशित)
२५. बडे भाऊ अर्थात भंवरलाल जैन (अप्रकाशित)

◼◼



डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा


१.  खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२०० /तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती

१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती
आगामी
भारतीय भाषा (समीक्षा)
भारतीय साहित्य (समीक्षा)
भारतीय लिपी (समीक्षा)
वाचन (सैद्धान्तिक)
* वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन

◼◼