Jump to content

महालक्ष्मीची कहाणी

विकिस्रोत कडून

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती. दुसरी नावडती होती. आवडतीचं नांव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नांव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता, त्याचं नांव नंदनबनेश्वर होतं. तो क्षणीं उडे, क्षणी बुडे, क्षणीं आताळीं जाई, क्षणीं पाताळीं जाई. असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला.

एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले, नंदनबनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनीं राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधूं लागले. त्याच नगरांत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणूं लागला, “आई आई, मला भाकरी दें, मी राजाच्या शत्रूला मारायला जातों.” म्हातारी म्हणाली, “बाबा, तूं गरीबाचा पोर, चार पावलं पुढं जा. झाडाआड ही वाळली भाकरी खा. म्हणजे लोक तुला हंसणार नाहींत.” पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली. म्हातारीचा लेक भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्य पुढं गेला.

इतक्यांत संध्याकाळ झाली. सर्व लोक घरीं आले. त्यांना नंदनबनेश्वर कांहीं सांपडला नाहीं. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्रीं काय झालं? नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. पोरानं विचारलं, “बाई बाई, ह्यानं काय होतं?” त्यांनीं सांगितलं, “पडलं झडलं सांपडतं. मनीं चिंतलं कार्य होतं.”

इतकं ऐकल्यावर तोहि त्यांच्याबरोबर वसा वसूं लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहांटेस उत्तरपूजा केली. जशी पहांटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती, झाली तसा नागकन्या-देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा, ह्यानेही मागितला. तसा देवीनं दिला. “राजाचा शत्रु मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधील. नवलवाट नांव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकीं घेऊन उद्यां राजाच्या अंगणांत मरून पडेल.” असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरीं आला.

दुसर्‍या दिवशीं राणी पहांटेस उठली. परसांत आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल, असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावूं धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरीं आला, त्यानं राजाला विचारलं, “राजा राजा, आळ नाहीं केला, अन्याय नाहीं केला, मला इथं का बोलावलं?” राजा म्हणाला, “भिऊं नको, माझा वैरी नंदनबनेश्वर कोणीं मारला? सगळे लोक तुझं नांव सांगतात. याचं काय कारण तें सांग.”

पोर म्हणाला, “राजा राजा, मी मारला नाहीं,पण तो देवीच्या वरानं मेला.”राजा म्हणाला, “ती देवी कोणती? तिला तूं कुठं भेटलास?” पोर म्हणाला. “सगळ्यांच्या पाठीमागून निघालों. त्यांच्यापुढें थोडासा गेलों. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येतां येतां रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्रीं नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. त्यांनीं महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मीं पूजा केली. घागरी फुंकल्या. पहांटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला.

“तुला आशीर्वाद काय मिळाला?” “मला आशीर्वाद असा मिळाला, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्धे राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील.” असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्हीं उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरीं आलों, तों तुझं बोलावणं आलं.”राजानं हकीकत ऐकली. आनंदीआनंद झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं. माडीशीं माडी बांधून दिली. नवलवाट नांव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागूं लागला. ही बातमी आवडत्या राणीला समजली, राणीनं नवलवाटाला बोलावूं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवातानं तातू दाखविला.

तिला सांगितलं, “आश्विनमास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशीं सोळा सुतांचा तातू तेल-हळद लावून करावा. सोळा दुर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातांत बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं दर आश्विनमासीं करावं.” असा तिनं वसा समजून घेतला. आपले तें व्रत पाळूं लागली.

पुढें एके दिवशी काय झालं? राजा राणीच्या महालीं आला. सारीपाट खेळूं लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हें काय? म्हणून विचारलं. राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, “माझे घरीं हारे बहू, दोरे बहू, कांकणं बहू; कळाचे बहू; व्रताचं सूत तोडून टाक. मला ह्याची गरज नाहीं.” पुढं रात्र झाली राजाराणी निजलीं. सकाळीं दासी बटकी महाल झाडूं लागल्या. केरांत त्यांना तातू सांपडला. दासींनीं तो तातू नवलवाटाला दिला, त्याला राणीचा फार राग आला.

इतक्यांत काय चमत्कार झाला? त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, “उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” तिनं सांगितलं, “उतणार नाहीं,मातणार नाहीं, घेतला वसा टाकणार नाहीं.” तसा तातू तिच्या हवालीं केला, वसा सांगितला.

पुढं अश्विनमास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला? देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाटमाधवराणीचे महालीं गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाहीं हें पाहू लागली, तों घरांत कोठें कांहीच तयारी दिसेना. तेव्हां ती पाटमाधवराणीला म्हणूं लागली, “अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे?” राणीनं उत्तर दिलं, “आज माझ्या घरी कांहीं नाही.” तेव्हां ती राणीला पुन्हां म्हणाली, “अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणीला देशीला तर तुझ्या राज्याला पुरे होईल.” राणीनं उत्तर दिलं, “म्हातारीला तांब्याभार पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाहीं.”

तेव्हां म्हातारीनं पुन्हा पाटमाधवराणीला हाक मारली, “अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दहींभाताची शिदोरी देशील, तर तुझ्या राज्याला पुरे होईल.” राणी म्हणाली, “म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली, तर माझ्या राज्याला पुरणार नाही.” म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला? “सवतीच्या न्हाणीं डाराडुरी करीत असशील. अर्धं आंग बेडकाचं, अर्धं आंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील.” इतकं राणीनं ऐकलं. खदखदा हंसली.

पुढं म्हातारी निघून गेली ती चिमादेवराणीच्या महालीं आली. इकडे तिकडे पाहूं लागली. तों तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेवराणीला विचारलं, “अग अग चिमादेवराणी, पुत्राची माय. आज तुझ्या घरीं काय आहे?” तिनं उत्तर दिलं. “आज माझ्या घरीं महालक्ष्मी आहे.” तेव्हां म्हातारी म्हणाली “कशानं ओळखावी? कशानं जाणावी?” तों ती सकाळीं कुंवारीण झाली, दुपारी सवाशीण झालीं; संध्याकाळीं पोक्त बायको झाली, अशा तिन्ही कळा तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरांत बोलावलं, न्हांऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. चौरंग बसावयास दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली.

संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजणं घागरी फुंकूं लागली. तसा घागरींचा आवाज राजाचे कानीं गेला. धुपाचा वास महालीं आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हांक मारली. “नावडतीच्या घरीं आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या” शिपाई नावडतीच्या घरीं आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, तसेच ते परतले, राजाच्या महालीं आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, “मला तिथं घेऊन चला.” शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली, राजाचा हात धरला, मंदिरात घेऊन गेली, सारीपाटा खेळूं लागलीं. खेळतां खेळतां पहांट झाली.

पहांटेस लक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली तशी राणी म्हणाली, “माय, मला आशीर्वाद दे.” महालक्ष्मी म्हणाली, “तुला आशीर्वाद काय देऊं? राजा तुला सकाळीं घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणीं डाराडुरी करील. अर्धे अंग बेडकाचं, अर्धे आंग मनुष्याचं, अशी होऊन पडेल.” तशी चिमादेवीराणीनं तिची प्रार्थना केली कीं, “तिला इतका कडक शाप देऊं नये.” तसं देवीनं सांगितलं की, राजा तिला बारा वर्ष वनांत तरी धाडील.” असं म्हणून देवी अदृश्य झाली.

उजाडल्यावर राजानं तिला रथांत घातलं, वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधवराणीला निरोप धाडला कीं, राजा राणीला घेऊन येतो आहे. तिला तूं सामोरी ये. तशी ती फाटकं तुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगांत घातली, केंस मोकळे सोडले, कपाळीं मळवट भरला, जळतं खापर डोकीवर घेतलं, आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तों राजानं विचारलं, “ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे कीं खेत आहे?” शिपायांनीं सांगितलं, ‘भूत नाहीं, खेत नाहीं, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे.” राजा म्हणाला, “तिला रानांत नेऊन मारून टाका.” असा शिपायांना हुकूम केला. आणि आपण उठून महालीं आला, राजाराणी सुखानं नांदूं लागलीं.

इकडे शिपायांनीं पाटमाधवराणीला रानांत नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळूं रडूं लागली, तसं शिपायांनीं सांगितलं. “बाई बाई, रडूं नको; आम्ही तुझ्या हातचं खाल्लेले प्यालेले हों. आमच्यानं कांहीं तुला मारवत नाहीं, म्हणून आम्ही तुला सोडून देतों. पुन्हां तूं या राज्यांत कांहीं येऊं नको. “असं म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरांत आले.

नंतर ती तशीच फिरतां फिरतां एका नगरांत गेली. पहिल्यानं कुंभाराचे आळींत गेलीं. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते. परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनीं चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तों ही सांपडली. त्यांनीं तिला हांकून पिटून लावलं.

पुढं ती कांसाराच्या आळींत गेली. तों तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते. पण एकही चुडा उतरेना. तेव्हां चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तेव्हां ही सांपडली. लोकांनीं तिला हांकून पिटून लावलं.

तिथून निघाली ती सोनाराच्या आळींत आली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते. तों एकही दागिना उतरेना. तेव्हां त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तेव्हां ही सांपडली. त्यांनीं तिला हाकून पिटून लावलं.

तिथून निघाली. साळ्यांच्या आळींत गेली. तों तिथ नव्या राणीसाठीं नवा साडा विणीत होते. पण एकही साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? इकडे तिकडे पाहूं लागले. तों ही सांपडली. मग तिला तेथून हांकून पिटून लावलं.

पुढं ती रानांत निघून गेली. जातां जातां ऋषीची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली. तों ऋषि ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषि स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडसारवण करी, पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं बारा वर्ष सेवा केली. ऋषि प्रसन्न झाले व म्हणाले, “इथं झाडसारवण कोण करतं, त्यानं माझ्यासमोर यावं.” तशी ती ऋषींच्या पुढं आली, नमस्कार केला. ऋषींनीं झाडसारवणचं कारण विचारलं. ती म्हणाली, “अभय असेल तर सांगते,” ऋषींनीं अभय दिलं.

राणीनं पहिल्यापासून हकिकत सांगितली, ऋषींनीं पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तों तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजल. ऋषींनीं तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करविली, रात्रीं घागरीं फुंकविल्या, पहाटे महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली, तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनीं देवीजवळ क्षमा मागितली होती.

देवीनं उःशाप दिला. “ह्या झाडाखालीं सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर. कापुरी विडा ठेव. वाळ्याचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊं लागेल. राजा इथं आज उद्यां येईल. तहानेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल.”

त्याप्रमाणं दुसर्‍या दिवशीं तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला, पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला, पुढं राजानं शिपायांना विचारलं, “इथं मी पाणी प्यालों, फराळ केला, विडा खाल्ला, ह्या सगळ्याला पाटमाधवराणीच्या हाताचा वास कसा आला?” शिपाई म्हणाले, “अभय असेल तर सांगतो.” राजानं अभय दिलं.

तेव्हां शिपाई म्हणाले, “आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालं, आमच्यानं कांहीं तिला मारवलं नाहीं म्हणून आम्हीं तिला सोडून दिलं.” राजा म्हणाला. “असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा.” शिपाई निघाले. ऋषीच्या गुंफा पाहिल्या. तिथं ही सांपडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या गुंफेत्र गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनीं ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला राज्या हवालीं केलं. तसा उभयतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनीं त्यांना आशीर्वाद दिला.

पुढं राजानं तिला रथांत घातलं, आपल्या नगरीत घेऊन आला. बाहेर रथ उभ केला. राणीला निरोप पाठविला. “राजा पाटमाधवराणीला घेऊन येतो आहे. त्याला तूं सामोरी ये.” तशी राणी न्हाली, माखली, पीतांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले. नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली.

राजानं विचारलं, “वाजतगाजत कोण येत आहे? नागकन्या कीं देवकन्या?” तसं शिपायांनीं सांगितलं, “नागकन्या नाहीं, देवकन्या नाहीं, तझीच राणी तुला सामोरी येत आहे. ” तेव्हां राजा पाटमाधवराणीला म्हणाला, “तूं जर, अशीच सामोरी आली असतीस, तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते.” राणी उगीच बसली राजानं चिमादेवराणीला उचलून रथांत घेतलं आणि दोघींसह वाजतगाजत नगरांत आला. सुखानं रामराज्य करूं लागला.

जशी पाटमाधवराणीवर महालक्ष्मीमाय कोपली, तशी तुम्हां आम्हांवर न कोपो. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य : देवीची भक्ति सर्व काळीं सारख्याच भावानें करावीं. अडचणीच्या वेळीं त्याला प्रसन्न करण्यासाठीं व्रतें उपोषणें करावीं आणि मग बरे दिवस आल्यावर देवाला विसरावें, हें चांगलें नाहीं.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.