मनू बाबा/सोने परत आले

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
सो ने
प र त आ ले
♣ * * * * * * ♣
 मनूबाबाने पुन्हा दुप्पट जोराने काम करण्यास सुरुवात केली. काम करता करता पूर्वीच्या मोहरा त्याला एकदम आठवत व त्याचा धोटा तसाच राही. परंतु पुन्हा त्याला जोर येई. गेले तर गेले. रात्रंदिवस काम करून पुन्हा मिळवू. पुन्हा मोहरा जमवू, पुन्हा रात्री मोजीत बसेन. या बोटांनी त्याना कुरवाळीन, ते सोने हृदयाशी धरीन. मध्येच तो निराशेचा, दुःखाचा सुस्कारा सोडी. परंतु पुन्हा निश्चय करून धोटा फेकी. आता रात्रीची झोपही त्याने कमी केली. आधी त्याला झोप फारशी येतही नसे. ते सोनेच त्याला सारखे दिसे. ध्यानी मनी सोने. रात्री सुद्धा तो विणीत बसे. रात्रीही खटक खटक आवाज चाले. तुटलेला धागा एखादे वेळेस रात्री दिसत नसे. परंतु तो कष्टाने तो शोधी व सांध करी. सोन्याची भेट व्हावी म्हणून पुन्हा अशी तपश्चर्या अहोरात्र सुरू झाली. काळपुरूष ज्याप्रमाणे जीवनाचे विराट वस्त्र रात्रंदिवस विणीत असतो, त्याप्रमणे मनूबाबा रात्रंदिवस ठाण विणीत बसे.

 असे करता करता दिवाळी आली. गावात सर्वत्र आनंद होता. घरोघर करंज्या, अनरसे चालले होते. प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी हजारो दिवे रांगेने लावले जात होते. मोठी मौज दिसे. ते सहस्त्रावधी दिवे पाहून प्रसन्नता वाटे.

 "मनूबाबा, दिवाळीचे यंदा घरी चार दिवे लावा. इतक्या वर्षात लावले नाहीत, आज् तरी लावा; आणि उद्या लक्ष्मीपूजन. कदाचित् उद्या तुमचं गेलेलं सोनं परत येईल. आपोआप गेलं, आपोआप परत येईल. असं एखादे वेळेस होतं. केवळ सोन्यासाठी वेडे नका होऊ, असं जणू देवाला

२४* मनूबाबा तुम्हांला शिकवायचं असेल. सोन्यापेक्षाही सुंदर अशा पुष्कळ गोष्टी जगात आहेत. नुसतं सोनं जमवून काय कामाचं? ते कोणाच्या उपयोगी आलं तर उपयोग. नाही तर दगड नि सोनं सारखीच किंमत. ती बाहेर माती पडली आहे, तसं तुमचं सोनं घरात पडलेलं होतं. देव हे तुम्हांला शिकवू पाहात होता. देव दयाळू आहे. कदाचित् तुमचं सोनं परत येईल. ते येवो, न येवो. परंतु चार पणत्या लावा. दिव्यांच्या ज्योती सोन्यासारख्या झळकतात. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी चार दिवे लावा, आणि ह्या सांजोऱ्या व हे अनरसे मी आणले आहेत, ते ठेवा. रामूसाठी सारं सारं करावं लागतं. सण सर्वांचा आहे. गरिबी असली तरीही सण साजरा करावा. थोडं गोडधोड करावं. आनंद करावा. खरं ना मनूबाबा?" साळूबाई म्हणाली.

 ती निघून गेली. दुसरे दिवशी मनूबाबाने खरेच चार दिवे लावले. सुंदर पणत्या झळकू लागल्या. मनुबाबाने आपली झोपडी झाडून स्वच्छ केली. 'आज गेलेली लक्ष्मी परत येईल. हो, येईल. माझ्या प्रेमाचे, माझ्या श्रमांचे होते ते पैसे. त्या माझ्या मोहरा परत येतील. ते सारं सोनं परत येईल. ते मी हृदयाशी धरीन.' असे विचार त्या विणकऱ्याच्या मनात घोळत होते.

 गावात लक्ष्मीपूजनाचा महोत्सव सुरू होता. दिगंबरायाकडे तर सर्वात मोठा उत्सव. या दिवशी त्यांच्याकडे गावातील सारे लोक जमत. आसपासच्या खेड्यापाड्यांतील मित्र येत. त्यांची कुळेही येत. बैठका घातलेल्या होत्या. तक्क्ये लोड होते. सुंदर समया तेवत होत्या. पान-सुपारीची तबके होती. मंगल वाद्ये वाजत होती. अत्तर; गुलाब होते. बार वाजत होते. दारूकाम सोडले जात होते. संपतराय सर्वांचे स्वागत करीत होता. दिगंबरराय पूजा करीत होते. ठकसेन त्या वादळाच्या दिवसापासून कोठे गेला तो गेला. मेलेली घोडी मात्र आढळली. परंतु ठकसेनाचा पत्ता नाही. त्याच्यावर कोणाचे फारसे प्रेम नव्हतेच. त्यामुळे तो घरी नव्हता तरी कोणाला रूखरूख वाटली नाही.

 दिगंबरायांकडे दलपतराय व त्यांची मुलगी इंदुमती हीही आली होती. इंदुमती प्रेमाने संपतकडे बघत होती. त्यालाही आनंद होत होता. संपतच्या

                       सोने परत आले *२५ वडिलांना नमस्कार करून दलपतराय म्हणाले, "दिगंबरराय, लक्ष्मीपूजन तर केलंत. परंतु घरात ग्रुहलक्ष्मी केव्हा आणणार? आमची इंदू तुमच्या संपतलाच द्यायची. दोघांचा जोडा किती शोभतो! आपण दोघे म्हातारे झालो. या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देऊ आणि डोळे मिटू."

 "दलपतराय, माझीही हीच इच्छा आहे. येत्या मार्गशीर्षात करून टाकू लग्न. सारं वेळीच झालं पाहीजे ऐकलंस ना संपत?" पिता म्हणाला.

 "चला ना बाबा!" इंदुमती पित्याला म्हणाली.

 "अग. आता या घरातच तुला राह्यला यायचं आहे. इथंच रमायचं आहे. लवकर चला का म्हणतेस?" पित्याने विचारले.

 "ती लाजते आहे. आपल्या बोलण्यानं दोघांना मनात गुदगुल्या होत असतील. परंतु वरून निराळं दाखवायचं. प्रेमाची ही रीतच असते. फूल हळूहळू फुलतं लाजत लाजत भीत भीत फुलतं. खरं ना?" दिगंबरराय म्हणाले.

 जगात दिवाळी चालली होती. लक्ष्मीपूजने होत होती. लाखो पणत्या पाजळल्या जात होत्या. जणू आकाशातील सारे तारेच पृथ्वीवर आले होते. परंतु त्या आनंददायक चार दिवसांत जगातील दुःखी जीव काय करीत होते? काही दुःखं अशी असतात की, ती आपण कधीही विसरू शकत नाही. उलट ती दुःखे अशा मंगल प्रसंगी अधिकच तीव्रतेने भासतात.

 ती पहा एक अनाथ स्त्री. एका लहान मुलाला वक्षःस्थळाशी धरून ती जात आहे. तिच्या अंगावर फाटके लुगडे आहे. तिचे हृदयच फाटलेले आहे. डोळ्यांतून पाणी गळत आहे. ती तरूण आहे. ती सुंदर आहे. परंतु तिचे तारूण व तिचे सौंदर्य कळाहीन दिसत आहे. जगाने तिची वंचना केली आहे. कोणी तरी पाप्याने तिला फसविले आहे. भोळा जीव. ती विश्वासून होती. आपला पती आपणाला एके दिवशी घरी नेईल अशी तिला आशा होती. परंतु किती दिवस आशा खेळवायची? सुंदर मूल झाले. मूल वर्षाचे होत आले तरी पती स्वगृही नेईना. जगात कसे राहावयाचे? लोक कुजबुजू लागतात. ती टीका कशी सहन करावयाची? आणि निष्पाप मनाला तर फारच कष्ट होतात.

२६*मनूबाबा  आपले मूल घेउन ती तरूणी निघाली. पायी निघाली. चालून चालून तिच्या पायांना फोड आले. एका तीव्र भावनेने ती चालत होती. "आज त्यांच्या घरी. लक्ष्मीपूजन असेल. मोठा थाटमाट असेल. समारंभ होत असेल. शेकडो स्त्री-पुरूष आले असतील. अशा वेळेस तिथं जाऊन मी उभी राहीन. साऱ्या जगासमोर त्यांचं पाप उघडं करीन. त्यांच्या आनंदात विष ओतीन. मी त्यांची गृहलक्ष्मी. परंतु मला इकडे रडत ठेवतात. मी गरीब घराण्यातील असल्ये म्हणून काय झालं? गरिबांना का अब्रू नसते? मी गरीब होते, तर आले कशाला माझ्याजवळ? केवळ का माझी कातडी पाहून भुलले? किडे मेले. दुष्ट आहे पुरूषाची जात. मला पण सूड घेऊ दे. साऱ्या जगासमोर त्यांचं हिडीस स्वरूप उघडं करत्ये. लक्ष्मीपूजनाचे दिवे तेवत असतील. प्रकाश पसरला असेल, अशा सुंदर प्रकाशात त्यांची कृष्णकृत्यं जगासमोर मांडत्ये. जगाला ओरडून सांगेन...."

 परंतु तिच्या त्या तीव्र भावनेची शक्ति कमी पडली. पाय थकले. संकल्पशक्तीने पाय काही वेळ चालत होते. परंतु पोटात अन्न नाही. पाऊल कसे उचलले जाणार? बाहेर अंधार पडला. किती लांब आहे अजून गाव? तिला काही कल्पना नव्हती.

 रायगावातील लोक आता झोपले होते. दिवे विझून गेले होते आणि गार गार वारा सुटला होता. अंगाला झोंबणारा वारा. कडाक्याची थंडी. अशी थंडी कधी पडली नव्हती. मनूबाबा जागा होता. त्याने दार उघडे ठेवले होते. तो पुनःपुन्हा दाराशी येई व आपले सोने परत आले का पाही. दारात तो उभा राही व शून्य दृष्टीने दूरवर बघे. मग तो गार वारा अंगाला लागला म्हणजे तो पुन्हा खुर्चीत येऊन पडे. परंतु त्याला झोप येत नव्हती. त्याच्या पणत्या विझून गेल्या. फक्त एक पणती अद्याप तेवत होती. मनूबाबाने आत दार लावून झोपायचे ठरविले. तो दाराजवळ गेला. परंतु दार लावण्याचे विसरला. पुन्हा विचारात मग्न झाला. शेवटी तो अंथरूणात येऊन पडला. परंतु थंडी लागत होती. त्याच्या घरात भरपूर पांघरूण नव्हते. तो उठला. त्याने लाकडे पेटविली. त्यांच्याशी तो शेकत बसला. विस्तव सोन्याप्रमाणे चमकत होते. हे आपले सोने, असे

              सोने परत आले*२७ मनूबाबाला वाटले व तो त्या निखाऱ्यांस हात लावणार होता. पुन्हा त्याला भान आले.

 मनूबाबा अशा मनःस्थितीत असताना त्याच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर निराळा प्रकार होत होता. ती तरूणी अगदी गळून गेली. तिची सर्व आशा मेली. आता फक्त स्वतः ती मरायची उरली होती. तिच्याजवळ एक कुपी होती. त्या कुपीतील काही तरी ती प्यायली. मातृप्रेम म्हणत होते, "पिऊ नको." निराशा म्हणे, "पी. जगण्यात अर्थ नाही." ते काही तरी पिण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला एकदा शेवटचे पाजले. तिने त्याचे मुके घेतले. नंतर त्या बाळाला तिने आपल्या फाटक्या लुगड्याच पदर फाडून त्यात गुंडाळले. त्याला थंडी लागू नये म्हणून तिने मरता मरता काळजी घेतली. नंतर त्या मुलाला दोन्ही हातांनी घट्ट धरून ती चालत होती. हळूहळू त्या पेयाचा पूर्ण परिणाम झाला. किती वेळ चालणार? आता एक पायही उचलेना. शेवटी ती तेथेच मुलाला घट्ट धरून निजली. भू-मातेच्या मांडीवर निजली. शरीरातील ऊब जात चालली, प्रेम जात चालले. मुलाला घट्ट धरून ठेवणारे ते तिचे हात आता अलग झाले. मुलाकडे प्रेमाने पाहाणारे ते डोळे हळूहळू पूर्णपणे मिटले. कायमचे मिटले! ती माता गतप्राण होऊन पडली. अरेरे!

 ते मूल जागे झाले. मा मा मा मा करू लागले. आईचे हात पाहू लागले. त्या हातांनी स्वतःला पुन्हा घट्ट धरून ठेवावे असे त्या मुलाला वाटत होते. परंतु ते हात दूर झाले होते. कायमचे दूर झाले होते. इतक्यात त्या मुलाचे लक्ष समोरच्या झोपडीतून आलेल्या प्रकाशाकडे गेले. ते मूल रांगू लागले. प्रकाशाकडे येऊ लागले. झोपडीचे दार लावलेले नव्हते. त्या दारातून ते मूल आत आले. ते चुलीजवळ आले. गारठलेल्या त्या मुलाला ऊब मिळाली. मनूबाबा आपल्याच तंद्रीत होता. इतक्यात त्याचे लक्ष त्या मुलाकडे गेले. सोन्यासारखे मूल. तो पाहू लागला. सोने आले असे त्याला वाटले. त्याने ते मूल एकदम उचलले. ते 'मा मा मा मा' करू लागले. बोलणारे सोने, जिवंत सोने त्याला मिळाले! तो त्या लहान मुलाला घेऊन नाचवू लागला. त्याने त्या लेकराला धरून ठेवले. जणू पुन्हा कोणी घेऊन जाईल. ते मूल त्याच्याशी खेळू लागले. तो त्या मुलाच्या केसांवरून प्रेमाने

२८ * मनूबाबा हात फिरवीत होता. ती मुलगी होती. सुंदर मुलगी, डोळे कसे टपोरे काळेभोर होते. डोक्यावर दाट काळेभोर केस होते. अंग कसे गोरे गोरे पान होते. मातीतून, खड्यातून ती मुलगी रांगत आली होती. मनूबाबाने तिचे पाय चेपले. "कुठून आलं माझं सोनं, सुंदर सोनं!" असं म्हणून त्या मुलीचे मुके घेऊ लागला. केव्हा उजाडते असे झाले. साळूबाईला ही आनंदाची वार्ता केव्हा सांगू असे त्याला झाले. शेवटी ती मुलगी मनूबाबाच्या प्रेमळ हातांत झोपी गेली. मनूबाबांनाही झोप लागली.

 बाहेर पाखरे किलबिल करीत होती. ती लहान मुलगी उठली. मा मा मा मा करू लागली. ती दाराकडे निघाली. कोठे जाते ही मुलगी? तिची आई आहे की काय बाहेर? मनूबाबा बाहेर येऊन पाहू लागला. तो त्याला दूर काही तरी दिसले. ती चिमणी मुलगी घेऊन तो तेथे गेला, तो तेथे एक अनाथ स्त्री मरून पडलेली दिसली. मुलगी खाली उतरू लागली. मनूबाबाने तिला खाली ठेवली. ती लहानगी आईजवळ गेली. आईचे हात ती ओढू लागली. परंतु आज आईचे हात तिला प्रेमाने ओढून जवळ घेत नव्हते. ती दूध पिण्याची खटपट करू लागली. ती आईचे डोळे उघडू लागली. 'मा मा मा मा!' बोबड्या शब्दांनी ती मुलगी आईला जागवू पाहात होती. ती आईला हाका मारीत होती. आई ना उठे, ना बसे, ना बोले, ना हसे. ती लहान मुलगी रडू लागली. आपल्या रडण्याने तरी आई उठेल असे तिला वाटले. परंतु आज आई कशानेही उठेना. का झाली कठोर आई?

 मनूबाबाचे हृदय कळवळले. त्याने मुलीला उचलून घेतले. तिने त्याच्या गळ्याला मिठी मारली. मनूबाबा तेथून निघाला. तो एकदम दिगंबररायांकडे आला. दिगंबररायांकडची मंडळी आता कोठे उठत होती. कोणाची तोंडधुणी होत होती. तोच अंगणात मनूबाबा त्या लहान मुलीला घेऊन उभा राहिला. सर्वाना आश्चर्य वाटले.

 "हे काय, मुलगी कोठून आणलीत? असं उजाडत कोठे आलेत? अशी तुमची चर्या? काय आहे हकीगत?" त्यांना विचारण्यात आले.

 एक अनाथ स्त्री रस्त्यात मरून पडली आहे. ही तिची मुलगी. ही रांगत माझ्या झोपडीत आली. चला लवकर. डॉक्टर बोलवा. ती स्त्री

            सोने परत आले*२९ जिवंत आहे की मेली ते पाहा. दया करा त्या अनाथ स्त्रीवर. ह्या मुलीच्या आईवर." मनूबाबा सद्गदित होऊन म्हणाला.

 दिगंबररायांच्या अंगणात गर्दी जमली. शेजारीपाजारी जमले. संपतराय या चिमण्या मुलीकडे पाहात होता. ती मुलगी घ्यावी असे त्याला वाटले.

 "ती स्त्री जिवंत असेल का?" त्याने घाबरत प्रश्न विचारला.

 "जिवंतपणाची लक्षणं नाहीत. परंतु डॉक्टरांना बोलवा. प्रयत्न करून पाहा." मनूबाबा म्हणाला.

 शेवटी मंडळी निघाली. डॉक्टरांना बोलावणे गेले.डॉक्टर अजून अंथरूणातच होते. आता कशाला उजाडत त्रास द्यायला आले,असे त्यांना वाटले. बाहेर गारवा होता. त्यांना सुखनिद्रा, साखरझोप लागली होती. परंतु लोकांनी हाकार करून त्याची झोप मोडली. डॉक्टर आदळ-आपट करीत आले तो समोर संपतराय दिसले!

 तुम्हीही आला आहात वाटतं? एवढ्या थंडीत तुम्ही कशाला बाहेर पडलात? तुम्ही श्रीमंत माणसं, सुकुमार माणसं. थंडी बाधायची. मी जातोच आता. पाहातो कोण पडलं आहे." डॉक्टर म्हणाले.

 "मीही येतो." संपतराय म्हणाला.

 "दयाळू आहात तुम्ही. तुमचं हृदय थोर आहे. अनाथासाठी कोण येणार धावत?" साळूबाई तेथे येऊन म्हणाली.

 त्या अनाथ स्त्रीजवळ सारा गाव जमला. डॉक्टरांनी नाडी पाहिली.... प्राण केव्हाच निघून गेले होते. अरेरे! त्या लहान मुलीला सोडून माता गेली. मुलगी जगात उघडी पडली.

 "या मुलीचं आता कोण?" डॉक्टर म्हणाले.

 "मी करीन. मनूबाबा, ती मुलगी मजजवळ द्या. आमच्या घरी, तोटा नाही, दाई ठेवीन, गडीमाणसं तिला खेळवतील, आंदुळतील, द्या ती मुलगी. कशी आहे सोन्यासारखी!" संपतराय म्हणाला.

 "नाही. मी कोणाला देणार नाही. हे माझं सोनं आहे. हे माझ्याकडे आलं आहे. ह्या मुलीचं आता सारं मी करीन. मी करीन."

 असे म्हणून मनूबाबाने तिला घट्ट धरून ठेवले. तिनेही विश्वासाने त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याने तिचे मुके घेतले.

३०* मनूबाबा "मनूबाबा, तुमच्या घरात दुसरं कोणी नाही. कसं कराल त्या मुलीचं!" कोणी विचारले.

 "दुसरं कोणी नाही म्हणूनच मला करता येईल. सारं लक्ष तिच्याकडे देता येईल. मला दुसरा व्याप नाही, दुसरे धंदे नाहीत. मी या मुलीची आई होईन, बाप होईन. मी तिचं सारं करीन." मनूबाबा म्हणाला.

 "हे निदान दहा रूपये तरी घ्या. तिला गरम कपडे करा. अंथरूण पांघरूण करा. कधी लागलं तर मजजवळ मागा. मनूबाबा, तुम्ही ही मुलगी वाढवणार? आश्चर्य आहे. परंतु वाढवा. ती तुमच्या झोपडीत आली. जणू तुमची झाली." संपतराय म्हणाला.

 "या स्त्रीची क्रिया करायला हवी." कोणीतरी म्हणाले.

 "क्रियेसाठी मी पैसे देतो. तुम्ही सारं तिचं करा. हे घ्या पैसे. लागतील तेवढे खर्च करा." संपतराय पैसे देत म्हणाला.

 "किती थोर तुमचं मन. श्रीमंतांची मनंही जर अशी श्रीमंत असतील तर जगात दुःख दिसणार नाही." साळूबाई म्हणाली.

 त्या मातेच्या देहाला अग्नी देण्यात आला. मनूबाबा ती मुलगी घेऊन झोपडीत बसला होता. 'माझं सोनं परत आलं, हसत हसत परत आलं, सजीव होऊन, साकार होऊन परत आलं' असे तो म्हणत होता. त्या मुलीचे पटापट मुके तो घेत होता व ती मा मा मा मा करून त्याच्याजवळ हसत खेळत होती.

मनू बाबा.djvu

 

            सोने परत आले* ३१.   गो-गो-३....६