मनू बाबा/सोनीचा नकार

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
सो नी चा
न का र

♣ * * * * * * ♣
 सोनी व मनूबाबा प्रेमळपणे गोष्टी बोलत बसली होती. झोपडीत दिवा होता.

बाबा, तुम्ही अंगावर घ्या ना ती शाल. आज बाहेर थंडी आहे. घालू तुमच्या अंगावर?” प्रेमाने सोनीने विचारले.

 “तू ज्या दिवशी मला सापडलीस, त्या दिवशी याच्याहून अधिक थंडी होती आणि तू लहान असूनही उघड्यातून रांगत माझ्या झोपडीत आलीस. माझ्या लहान सोनीला थंडी बाधली नाही. मी तर मोठा आहे. आज थंडीही तितकी नाही, मला कशी बाधेल?” मनूबाबा म्हणाले.

 “बाबा, आज सारं सोनं सापडलं. कल्पनाही नव्हती.”

 “तुझ्या लग्नासाठी आले. रामूही गरीब आहे. तुला आता दोन दागिने करता येतील. तुला आवडतात की नाही दागिने ? ”

 “मला आवडतात. आता आपली बाग लवकर तयार करायची. आमच्या लग्नाला आमच्या बागेतील फुलं. त्या फुलांना आईच्या श्वासोच्छ्वासाचा सुगंध येईल. आईचे आशीर्वाद त्या फुलांतून मिळतील. नाही बाबा?” तिने सद्गदित होऊन विचारले.

 “होय बेटा. आईच्या आशीर्वादाहून थोर काय आहे? मरता मरता तिनं स्वतःचं लुगडं फाडून ते तुझ्याभोवती गुंडाळून ठेवलं होतं. जणू तिनं आपलं प्रेम तुझ्याभोवती गुंडाळून ठेवलं. आई मेली. परंतु तिचं प्रेम मागं राहिलं प्रेम अमर आहे. त्या प्रेमाची स्मृतीही आपलं पोषण करीत असते. त्या प्रेमाच्या स्मृतीनं उत्साह येतो, सामर्थ्य येतं. आपणास निराधार असं वाटत नाही.” मनूबाबा बोलत होते.


सोनीचा नकार * ५३  "बाबा, तुम्ही रामूच्या आईजवळ बोललेत का? रामूची आई किती मायाळू आहे! त्या दिवशी माझं जरा डोकं दुखत होतं, तर लगेच त्यांनी तेल चोळलं. किती तरी त्या माझं करतात."

 "साळूबाई खरंच थोर आहेत. त्यांनी मला कितीदा तरी धीर दिला आहे. तू लहानपणी कधी आजारी पडलीस, तर लगेच यायच्या. औषध उगाळून द्यायच्या. तुला त्यांनी न्हाऊमाखू घातलं आहे. तुझं सोनी नाव त्यांनीच सुचविलं. साळूबाईसारखी सासू मिळणं म्हणजे पूर्वपुण्याईच हवी. मी अद्याप त्यांच्याजवळ बोललो नाही, परंतु बोलेन साळूबाई नाही म्हणणार नाहीत. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. जसा रामू,तशी त्यांना तू. तू सर्वांना आवडतेस." मनू बाबांनी सोनीच्या केसांवरून हात फिरवीत म्हटले.

 झोपडीत अशी बोलणी चालली होती. तिकडे संपतराय व इंदुमती झोपडीकडे येण्यासाठी बाहेर पडत होती. घोड्याची गाडी तयार झाली. त्यात ती दोघे जण बसली. संपतरायाच्या हातात इंदूमतीचा हात होता. कोणी बोलत नव्हते. गाडी निघाली. रात्रीच्या वेळेस आवाज घुमत होता. कोणी कोणी घरातून डोकावून पाहत होते. "जात असतील फिरायला. घरात करमत नसेल. मुल ना बाळ!" असे कोणी म्हणत होते.

 झोपडीच्या दाराशी गाडी थांबली. सोनी व मनूबाबा चकित झाली कोणाची गाडी? रात्रीच्या वेळी कोण आले असेल? आपल्याकडे का कोणी आले आहे? कोणी प्रवासी आहे? इतक्यात दारावर टकटक आवाज झाला. सोनी पटकन उठली व दाराजवळ गेली. तिने "कोण आहे" म्हणून विचारले.

 "मी संपतराय" उत्तर आले.

 सोनीने लगबगीने दार उघडले. दारात संपतराय व इंदुमती उभी! म्हातारा मनूबाबा उठला. सोनीने पटकन बैठक घातली. एक आराम खुर्ची होती व दुसरी एक खुर्ची होती. त्या दोन्ही खुर्च्या पुढे करण्यात आल्या.

 "बसा" मनूबाबा आदराने म्हणाला.

 "तुम्हीही बसा. बस सोन्ये." संपतराय प्रेमाने म्हणाले.


५४ * मनूबाबा  “सोन्ये, दार लाव बेटा.” इंदुमती म्हणाली.

 “आज हवेत गारठा आहे.” म्हातारबाबा म्हणाले.

 “तुमच्या झोपडीत तर अधिकच थंडी लागत असेल आणि भरपूर पांघरूणही नसेल. खरं ना सोन्ये ?” संपतरायाने विचारले.

 “आम्ही चुलीत विस्तव ठेवतो. त्यामुळे ऊब असते आणि बाबांचं प्रेम आहे ना. त्यांनी नुसता हात माझ्या पाठीवरून फिरविला तरी थंडी पळते. प्रेमाची ऊब ही खरी ऊब.” सोनी म्हणाली.

 “आणि तुम्हीही मधूनमधून मदत करता. सोनीची चौकशी करता. मी तिच्यासाठी घेतलं आहे पांघरूण. तुम्ही किती उदार. खरोखरच तुमची श्रीमंती तुम्हांला शोभते. तुमची श्रीमंती म्हणजे जगाला शाप नसून जगाला आशिर्वाद आहे. वास्तविक सोनी कुठची कोण. एका अनाथ स्त्रीची अनाथ मुलगी. लोक तर अशांचा तिरस्कार करतात, परंतु तुम्ही त्या दिवशी स्वतः सोनीला आपल्या घरी बाळगण्यास तयार झाले होतेत. मला ती गोष्ट आठवते आहे. पंधरा-सोळा वर्ष झाली. त्या वेळेस मी सोनीला घट्ट धरून म्हटलं, ‘नाही. मी ती कोणाला देणार नाही. ती माझ्याकडे आली. माझी झाली.’ तुम्ही ‘बरं’ म्हटलंत. तत्काळ दहा रूपये मदत म्हणून दिलेत आणि नेहमी चौकशी करता. थोर आहात तुम्ही. सोनी तुम्ही नेली असतीत तर माझी काय दशा झाली असती ? सोनीमुळे माझ्या जीवनात आनंद झाला. माझा पुनर्जन्म झाला. ही पंधरा वर्षे किती सुखात गेली! ती पंधरा वर्षं व ही नंतरची पंधरा वर्षं;दोघांत किती फरक ? सोनीनं मला कृतार्थ केलं.” मनूबाबा प्रेमाने सोनीच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले.

 “सोनीनं कृतार्थ केलं. आता आम्हाला कृतार्थ करू दे.” संपतराय म्हणाले.

 “म्हणजे काय ?”, म्हाताऱ्याने भीतभीत विचारले.

 “मनूबाबा, आज इतक्या रात्री आम्ही दोघं तुमच्याकडे का आलो माहीत आहे ? आहे काही कल्पना ? ”

 “थंडी पडली आहे, सोनीला पांघरूण वगैरे आहे की नाही पाह्यला आले असाल. किंवा देण्यासाठी बरोबर एखादं लोकरीचं पांघरूण घेऊन

             सोनीचा नकार * ५५ आले असाल किंवा दुसरी काही मदत घेउन आले असाल." मनूबाबा म्हणाला.

 "सोनीला माझं सारंच देण्यासाठी मी आलो आहे. पाच दहा रुपयांची मदत किती दिवस पुरणार ? एखादं पांघरूण किती पुरं पडणार ! सोनीला नेण्यासाठी मी आलो आहे. सोनी आमच्याकडे येऊ दे. आमच्याकडे कायमची राहू दे. सुंदर कोवळी मुलगी. तिला गरिबीचा गारठा नको. रानात फूल फुलतेच. परंतु बागेत अधिक चांगले फुलते. बागेतील फुलांच्या पाकळ्या मोठ्या टपोऱ्या दिसतात. त्याला सुवास अधिक येतो. कारण बागेत नीट वाढ होते. सोनीची नीट वाढ होऊ दे. तिला शिकू दे. मी पंतोजी ठेवीन. तो तिला शिकवील. तसंच भरतकाम वगैरे शिकवायला एक बाई ठेवीन. सोनी कुशल होऊ दे. हुशार होऊ दे. तिचा नीट विकास होऊ दे. मनूबाबा, तुम्ही नाही म्हणू नका. इतके दिवस सोनीचं तुम्ही केलंत, आता आम्हांला करू दे. इतके दिवस तुम्ही घरात मूल असल्याचा आनंद उपभोगलात. सोनीचे आईबाप झालात. आता आम्हांला होऊ दे तिचे आईबाप. आमच्याही घरात मूलबाळ नाही. सोनी आमची मुलगी होऊ दे. सुखात वाढू दे. पुढे तिचं लग्न करू. मोठ्या घराण्यात देऊ. अंगावर हिऱ्यामोत्यांचे दागिने पडतील. घरात गडीमाणसं कामाला असतील. फिरायला जायला घोड्याची गाडी असेल. फुलांच्या बागा असतील. सोनी जशी राजाची राणी होईल. मनूबाबा, असे का खिन्न दिसता ? मी सांगता याचा तुम्हाला नाही आनंद होत ? सोनी एखाद्या गरिबाच्या घरी पडावी असं का तुम्हाला वाटतं ? तिचे हात काबाडकष्ट करून दमावेत असं का तुम्हांस वाटत ? तिच्या अंगावर सुंदर वस्त्रं नसावीत, दागदागिने नसावेत असं का तुम्हासं वाटतं ? सोनी सुखात नांदावी असं तुम्हांला नाही वाटत ? " संपतराय थांबला.

 "सोन्ये, तू सारं ऐकतच आहेस. मी तुझ्या सुखाच्या आड कशाला येऊ ? तुला गरिबीचा वारा लागावा असं मी कसं म्हणू ? माझ्या स्वार्थासाठी मी तुला कशाला दुःखी करू ? मी एकटा राहीन. एकटा होतो, ऐकटा राहीन. माझ्यासाठी तुला नको त्रास, तुला नकोत कष्ट. जातेस त्यांच्याकडे ? माझी आडकाठी नाही. असं नको कुणी म्हणायला, की


५६ * मनूबाबा म्हातारा मनुबाबा सोनीच्यां सुखाव्या आड आला. माझी सोनी कुठेही असो परंतु सुखात राहो माझं काय ? मी पिकलं पान झालो. आता केव्हा गळून जाईल त्याच्या नेम नाही. जे दोन दिवस जगून या जगात काढायचे असतील ते एकटा राहून काढीन. सोन्ये, काय आहे तुझा विचार ? तुला आता सारं समजतं. तू मोठी झाली आहेस. तू काय ते त्यांनां सांग. ते उदारपणे बोलवीत आहेत. जातेस ?" मनूबाबांनी विचारले.

 "मी नाही जात. तुम्हांला सोडून कुठं मी जांऊ ? ही झोपडी म्हणजेच माझा राजवाडा. इथं माझी सारी सुखं आहेत. या झोपडीत साऱ्या गोड आठवणी. झोपडीत आहे ते राजवाड्यात नाही. मला कामाचा कंटाळा नाही. रामू काम करतो. काम करणारा का कमी दर्जाचा ? काम करतो तोच खरा मनुष्य. देवानं मला चांगले हातपाय दिले आहेत. ते का पुजून ठेवु ? मला गडीमाणसं नकोत, दासदासी नकोत. सुंदर वस्त्रं नकोत, दागदागिने नकोत. चार फुलं केसात घातली की पुरे. मला नको श्रीमंती. बाबा, तुमच्याजवळच मला राहू दे. तुम्हीच माझं सारं सुख." सोनी म्हणाली.

 " आणि आम्ही नाही का कुणी तुझी ? सोन्ये, ऐक. हे मनूबाबा तुझे मानलेले बाबा आहेत. परंतु तुझे बाबा तुझ्या समोर आहेत. मी तुझा पिता. तुझा जन्मदाता. पंधरा वर्षापूर्वी तू या झोपडीत आलीस, त्या वेळेसच तुला मी नेत होतो. परंतु नेता आलं नाही. आज पंधरा वर्षानंतर पुन्हा तुला न्यायला आलो आहे. तुझ्या पित्याकडे तू नाही येणार ? जन्मदात्याचं नाही ऐकणार ?" संपतराय भावनावश होऊन बोलत होते.

 खोलीत गंभीर शांतता पसरली होती. सोनीच्या डोळ्यांत पाणी आले. तिने आपले डोळे पुसले. आता ते डोळे निराळे दिसू लागले. त्या डोळ्यांत कठोरता आली. एक प्रकारचे सात्विक अशा संतापाचे तेज आले. तिने आपला ओठ थोडा चावला. ती जरा क्रुद्ध दिसू लागली. परंतु अद्याप वाणी बाहेर पडत नव्हती. संमिश्र भावनांचा सागर उसळला होता. इतक्यात इंदुमती शांतपणे म्हणाली, "सोन्ये तू ऐक. पित्याचं ऐक. पित्याला सुख देण्यासाठी चल. आज इतकी वर्ष त्यांचा जीव गुदमरला असेल ते ध्यानात आण. किती


               सोनीचा नकार * ५७ मानसिक दुःखं, मानसिक यातना त्यांनी भोगल्या असतील ? तू त्यांची असून तुला फार तर मधूनमधून ते मदत देत. त्या वेळेस त्यांच्या मनाला किती दुःख होत असेल! आपण सुखात आहोत, चांगले खातपीत आहोत, गाडीघोडयांतून हिंडत आहोत परंतु आपली मुलगी तिकडे गरिबीत आहे या विचाराने तुझ्या पित्याला काय वाटत असेल ? झालं ते झालं आता तरी तुझ्या पित्याकडे ये. त्यांच्या मनाला शांति,समाधान दे. मंलाही तुझी आई होऊ दे. मला मूल ना बाळ तू आमची, आता खरोखरची आमची हो. नाही म्हणू नको. आमचे मोठे घर आनंदानं भर. गाणे गायला शीक. पेटी वाजवायला शीक. एवढे मोठे घर, परंतु मुंलांशिवाय ओस दिसते. तू ये. म्हणजे घरात प्रकाश येईल, संगीत येईल, एक प्रकारची मधुरता पसरेल. आमचा संसार सुखाचा व गोड होइल.सोन्ये, नाही म्हणून नको आमंचं ऐक. तुझ्यां पित्याचं ऐक. जगात आई बाप म्हणजे थोर दैवतं. तुझी आई गेली. परंतु सुदैवाने पिता आहे. तो पिता तुझ्यासमोर बसला आहे. इतक्या वर्षांनी आपला पिता आपणाला भेटला याचा तुला आनंद नाही होत ? तुझे हृदय उचंबळत नाही.? जगात पित्याचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं ! मनूबाबांची तुझ्यावर सत्ता आहे परंतु जन्मदात्या पित्याची अधिक आहे.”

 सोनी एकदम उसळून म्हणाली, ” जन्मदात्यापेक्षा या प्राणदात्याची अधिक आहे. जन्मदात्याने जन्म दिला व जगात उघडे ठेवले. माझ्या आईला जगात उघडे ठेवले. मनूबाबांनी माझे सारं केले. त्यांनी आज पंधरा वर्षे मला वाढविले. लहानाच मोठे केलं. मलां जरा बरं वाटेनासं झालं तर मनूबाबा कावरेबावरे होत. मी त्यांच्या अंगाखांद्यावर मुतले असेन, हगले असेन त्यांनी ते सारं सहन केलं. त्यांनी माझी परकरपोलकी धुवावी, मला आवडणारी भाजी करावी. त्यांनी मला शिकवावं, गोष्टी सांगाव्या. त्यांनी माझे काय केलं नाही ? माझ्या शरीराची, मनाची, बुद्धीची, हृदयाची वाढ त्यांनी केली. माझ्या जीवनाची बाग त्यांनी फुलविली. त्यांना का सोडू? रोपटं लहान असतं, तेव्हाच उपटून दुसरीकडे लावलं तरं ते जगतं. परंतु जूनं झालेलं झाड उपटून दुसरीकडे लावू पहाल तर ते मरेल. मी लहान होते, अनाथाप्रमाणे हात पसरीत या गावात आले, या गावात रांगत आले, त्या वेळेस तुम्ही मला का नेले नाही? तुम्ही नेत होतेत, परंतु एक अनाथ मुलगी म्हणून नेत होतेत .‘ ही माझी मुलगी आहे,आणि ही मरून पडलेली माझी पत्नी आहे’ असं त्या वेळेस जगाला का सांगितलंत नाही ? ही माझी मुलगी आहे असं म्हणतेत तर' मनूबाबांनी हट्ट धरला नसता. परंतु तसं म्हणण्याचं तुम्हांला धैर्यं झालं नाही. ज्या मुलीला जन्म दिला, ती माझी मुलगी असं जगाला सांगण्याची तुम्हाला लाज वाटली. का वाटली लाज ? माझ्या आईला पत्नी म्हणून इथं का आणलंत नाही ? त्या तुमच्या मोठ्या वाड्यात का आणलं नाहीत तिला ? तिला आणतेत तर मी तुमच्या मांडीवर खेळल्ये असते. आणखीही सुंदर भावंडं मला मिळाली असती. तुमचं घर गोकुळासारखं भरलेले दिसलं असतं. तुम्ही माझ्या आईला फसवलंत. तिचं रूप पाहून भुललेत. परंतु 'ही माझी पत्नी’ म्हणून जगाला सांगायला लाजलेत. तुम्ही खानदानी घराण्यातील. माझी आई गरिबाची. मोलमजुरी करणाऱ्या कुळातील म्हणून तुम्हाला लाज वाटली. प्रेमापेक्षा कुळाची व धनाची खोटी प्रतिष्ठा तुम्हांला अधिक मोलाची वाटली. काय करायची ती श्रीमंती ? चुलीत घाला ती श्रीमंती. जी श्रीमंती माणुसकी ओळखीत नाही, प्रेमाला ओळखीत नाही, ती श्रीमंती पै किंमतीची आहे. त्या श्रीमंतीची मी कशाला वाटेकरीण होऊ ? मीही मग पैशाला मोठं मानायला शिकेन व माणुसकी पायाखाली तुडवीन. मी मग रामूबरोबर लग्न करायला होईन का तयार ? "

 रामूबरोबर लग्न ? त्या सखारामाच्या मुलाशी ? "" संपतरायाने आश्वर्याने विचारले.

 “ हो रामूबरोबर. तो गरीब जांहे. त्याचा बाप गरीब आहे परंतु त्यांची मनं फार श्रीमंत आहेत. त्या रामूबरोबर मी लग्न लावणार आहे. तुम्ही द्याल का त्या गोष्टीला संमती ? तुम्हांला मोठं घराणं हवं. मोठं तेवढं खोटं. मी काय नुसती मोठी घरं पाहू ? मोठे खांब व तुळया पाहू ? की अंगाखांद्यावरचे दागिने कुरवाळीत बसू ? मनूबाबा नसत का पूर्वी मोहरा मोजीत बसत, मोहरा पोटाशी धरून नाचत परंतु त्यात होतं का त्यांना समाधान? समाधान माणुसकीत आहे. निर्मळ प्रेमात आहे. खोटे अहंकार, धनाचे व कुळाचे गर्व, ते काय कामाचे ? श्रीमंतांचे रक्त का निराळं असतं ? श्रीमंत मेले म्हणजे त्यांच्या शरीरांची कस्तुरी होते आणि गरीब मेले म्हणजे त्यांच्या देहाची केवळ माती होते असं का काही आहे ? सारे मातीचेच पुतळे. किंमत असेल तर ती फक्त या मातीच्या मडक्यात असणाऱ्या मोठ्या मनाची, प्रेमळ हृदयाची, उदार विचारांची. मला तुमची श्रीमंती नको. मला इथं या झोपडीत सारं सुख आहे. या झोपडीतील उपासमारही तुमच्या श्रीमंतीतील मेजवान्यांपेक्षा गोड आहे. या झोपडीतील अणुरेणू प्रेममय आहे, कर्तव्यमय आहे. हा माझा स्वर्ग सोडून कुठं येऊ मी? इथेच मी राहीन. माझ्या मनूबाबांजवळ राहीन. तेच माझे खरे आईबाप. त्यांचाच माझ्यावर अधिकार. त्यांचीच माझ्यावर सारी सत्ता. त्यांना का म्हातारपणी सोडूं ? मी का कृतघ्न होऊं ! उद्या त्यांना काय वाटेल ? मी गेल्ये तर ही झोपडी त्यांना खायला येईल. जरा मी डोळ्याआड झाल्ये, तर भिरि भिरी हिंडतात व मला शोधतात. त्यांना काय वाटेल ? त्यांना म्हातारपणी का रडवूं? त्यांचे उरलेले थोडे दिवस, ते का दुःखात दवडायला लावू ! आत्ताच तर माझी त्यांना जरुरी, मीही आता मोठी झाल्ये आहे. आता मी स्वयंपाक करीन, त्यांना आवडतील ते पदार्थ करीन. आता मी केर काढीन, भांडी घाशीन, त्यांचे कपडे धुवीन. त्यांना कढत पाणी आंघोळीला देईन. आता मी त्यांचे अंथरूण घालीन. त्यांचे भक्तिप्रेमाने पाय चेपीन. एखादं चांगलं पुस्तक रात्री त्यांना वाचून दाखवीन. त्यांचा हात धरून त्यांना फिरायला नेईन, त्यांना दोन सुवासिक फुले तोडून देईन. माझ्या बाबांचे उरलेले आयुष्य सुखात जावो. इथंच मी राहीन. माझ्या बाबांजवळ राहीन कुठंसुद्धा जाणार नाही त्यांना सोडून." असे म्हणून सोनीने मनूबाबांच्या गळ्याला मिठी मारली. म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून धारा लागल्या होत्या.

 "सोन्ये, तुझं म्हणणं खरं आहे. रहा हो. इथंच राहा. तुझ्या पित्याला क्षमा कर. त्यांच्याविषयी फार कठोर भाव मनात नको बाळगू. आपण सारी मर्त्य माणसं. पदोपदी चुकणारी व घसरणारी. असो. सुखी राहा. कुठंही अस, पण सुखी राहा. आम्ही मधून लधून काही पाठविले तर ते घेत जा. आम्हाला अगदी परकं नको समजू. हृदयात थोडीशी जागा तुझ्या

६० * मनूबाबा पित्यासाठी ठेव. मनूबाबा, तुमचं उरलेलं आयुष्य सुखात जावो. राग नका धरू तुम्ही कुणी. क्षमा करा. येतो आम्ही. चला, उठा." इंदुमती पतीचा हात धरून म्हणाली.

 संपतराय उठला. पत्नीने त्याचा हात धरला होता. तिने दाराची कडी काढली. बाहेर गाडीत गाडीवान झोपी गेला होता. परंतु तो एकदम दाराचा आवाज ऐकून जागा झाला. त्याला लाज वाटली. तो एकदम उठून उभा राहिला. धनी व धनीण गाडीत बसली. मनूबाबा व सोनी दारात उभी होती. गाडी निघाली. चाबूक वाजला. घोड्याचा टाप् टाप् आवाज रात्रीच्या शांत वेळी घुमत होता. "फिरून आल्या ‌ श्रीमंताच्या स्वाऱ्या !" जागे असणारे म्हणाले. टाप् टाप् आवाज आता दूर गेला. ऐकू येईनासा झाला. मनूबाबा व सोनी दोघे घरात आली. त्यानी दार लावले. सोनीने म्हाताऱ्याच्या गळ्याला एकदम मिठी मारली. तिला अश्रू आवरत ना. आणि म्हाताऱ्या मनूबाबांनाही पुन्हा जोराचा हुंदका आला. हळूहळू भावना ओसरल्या. बोलायला अवसर झाला.

 "बाबा, तुम्हांला मी कधीही सोडणार नाही."

 "होय हो बाळ. तू गुणाची आहेस."


मनू बाबा.djvu