Jump to content

मनू बाबा/सोनी

विकिस्रोत कडून
सो नी
♣ * * * * * * ♣








 मनूबाबाच्या आयुष्यात आता क्रांती झाली. त्या लहान मुलीचे तो सारे करी. लहान मुलांचे कसे करावे ते त्याला माहीत नव्हते. प्रेमाने मनुष्य सारे शिकतो, आणि साळूबाई होतीच धडे द्यायला.

 "मनूबाबा. तुम्हांला मुलीच्या अंगात नीट आंगडं घालता येईल का? नाही तर घालाल कसं तरी. तिच्या हातांची ओढाताण कराल. चिमुकले हात. का मी नीट घालून दाखवू?" साळूबाईने विचारले.

 "दाखवा. एकदा दाखविलंत म्हणजे पुरे. त्याप्रमाणे मी करीत जाईन. आणि वेणी कशी घालायची? केस सारखे डोळ्यांवर येतात. नाही तर तिरळी व्हायची. मला दाखवा वेणी घालून." मनूबाबा म्हणाले.

 "मी रोज येऊन वेणी घालीत जाईन." साळूबाई म्हणाली.

 "नको. माझ्या हातांनी मला सारं करू द्या. मी करीन सारं. मी शिकेन. तसंच हिला न्हायला कसं घालायचं तेही सांगा. केस स्वच्छ राहिले पाहिजेत. नाही तर होतील उवा." मनूबाबा म्हणाले.

 "मी दाखवीन एकदा न्हायला घालून. परंतु मनूबाबा, मुलीचं नाव काय ठेवायचं? तिला कोणत्या नावानं हाक मारायची? चांगलसं नाव हवं. साधं व सुटसुटीत." साळूबाई म्हणाली.

 "माझी एक लहान बहीण होती. तिची आठवणही मी विसरून गेलो होतो. या मुलीला पाहून तिची मला आठवण झाली. ती बहीणच देवाघरून पुन्हा माझ्याकडे आली की काय असं वाटलं. त्या बहीणीचं नाव हिला ठेवावं असं मनात येतं. परंतु ते नाव उच्चारायला कठीण होतं. तुम्ही सुचवता का एखादं नाव?" मनूबाबांनी विचारले.

३६* मनूबाबा  "सोनी ठेवा नाव. तुमचं गेलेलं सोनं, तेच जणू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परत आलं. सोनी नाव छान आहे. लहानसं, गोड नाव." साळूबाई म्हणाली.

 "सोनी. खरंच सुंदर नाव. कसं सुचलं तुम्हांला. माझं सोनचं आहे ते. चालतं बोलतं सोनं." मनूबाबा म्हणाला.

 मनूबाबा सोनीला पायांवर घेई. तिच्या अंगाला तेल लावी. हळद, दूध लावी. नंतर कढत पाण्याने तिला अंघोळ घाली. तिचे अंग नीट पुशी. मग तिला तो झोपवी. तो गोड ओव्या म्हणे. सुंदर अभंग म्हणे. एके दिवशी मनूबाबा सोनीला झोपवीत होते. अभंग म्हणत होते. इतक्यात साळूबाई तेथे आली. झोपडीच्या दारात उभी राहून ती ऐकत होती.

 "तुम्हांला येतात वाटतं अभंग? किती गोड म्हणता!" तिने पुढे येऊन विचारले.

 "मी सारं विसरून गेलो होतो. परंतु ही सोनी आली व माझी सारी स्मृतीही आली. लहानपणी माझ्या बहिणीला मी ओव्या म्हणत असे. माझी बहीण लहान असताना आईबाप मेले. माझ्या बहिणीला मीच वाढविलं. त्या वेळच्या ओव्या आता आठवतात." मनूबाबा म्हणाला.

 "निजली वाटतं?" साळूबाईने विचारले.

 "निजली. अलीकडे ती एकसारखी बाहेर जाते. आणली आत तरी पुन्हा बाहेर जाते. मला भीती वाटते. तिला आता पाय फुटले आहेत. नजर चुकवते व जाते बाहेर. गाई-गुरं जात असतात. शिंगंसुद्धा मारायची. मघा जरा रागं भरलो तर लगेच रडायला लागली, मग मी घट्ट पोटाशी धरली तेव्हा थांबली. जरा बोललेलं तिला सहन होत नाही." मनूबाबा सांगत होता.

 "परंतु थोडा धाक दाखवायलाच हवा. मारू-बिरू नका. आमचा रामू लहान होता, तेव्हा असाच त्रास देई. एके दिवशी त्याला घरातील कोळसे ठेवायच्या खोलीत नेलं व म्हटलं, 'ठेवू कोळशाच्या खोलीत? येतील उंदीर, मग चावतील. ठेवू कोळशाच्या खोलीत? नाही ना जाणार बाहेर? बाहेर गेलास तर या कोळशाच्या खोलीत ठेवीन.' त्या

                               सोनी*३७ दिवसापासून रामू बाहेर जाईनासा झाला. काहीतरी असं करावं लागतं." साळूबाई अनुभव सांगत होती.

 मनूबाबा मागावर बसले होते. सोनी जवळच खेळत होती. सुताच्या गुंड्यांशी खेळत होती. परंतु तिकडे रस्त्यावरून एक बैलगाडी जात होती. सोनीने बैल पाहिले. ती दाराकडे वळली. ती घरातून बाहेर पडली. ती लांब गेली. मनूबाबांच्या एकदम लक्षात आले. सोनी कुठे आहे? ते इकडे तिकडे पाहू लागले. ते घाबरले. त्यांनी झोपडीच्या सभोवती पाहिले. त्यांचा जीव घाबरला. छाती धडधडू लागली. कोठे गेली सोनी? 'सोने. सोने!' -ते हाका मारू लागले. सोनी ओ देईना, नाचत पुढे येईना. त्यांना झोपडीच्या उत्तर बाजूला असलेला तो खळगा आठवला. त्या खळग्याकडे तर नाही ना गेली? पडली तर नसेल तेथील चिखलात? ज्या दिवशी मनूबाबांचे सोने चोरीस गेले होते, त्या रात्रीच्या पावसात तो खळगा कोसळला होता. तो खळगा त्या दिवशी बराच भरून गेला होता. गावातील पावसाचे सारे पाणी तेथे जाई. तेथे दलदल असे. मनूबाबांचे मन दचकले. ते धावपळ करीत होते. इतक्यात त्यांना सोनी दूर दिसली.

 "सोने, सोने!" म्हाताऱ्याने हाक मारली.

 सोनीचे लक्ष नव्हते. ती रानफुले गोळा करीत होती. पिवळी, जांभळी फुले.

 "सोने, सोने!" असे म्हणून मनूबाबाने तिला एकदम उचलून घेतले. तिचे पटापट मुके घेतले. तिचे गोरे गोरे गाल लाल झाले होते. सोनी मनूबाबाच्या कानांत फुले ठेवीत होती. सोनीला घेऊन तिथे तो म्हातारा उभा होता. त्या जागेकडे पाहात होता. ती पवित्र जागा होती. येथेच सोनीच्या आईने शेवटचे अनंतशयन केले होते. येथेच भू-मातेच्या मांडीवर सोनीच्या आईने आपले डोके ठेवले होते. येथेच 'मा मा मा मा' करीत लहानगी सोनी आईला उठवीत होती. आईने घ्यायला यावे म्हणून रडत होती. आज सोनी येथेच येऊन बसली. तेथेच रमली. त्या जागेवरची फुले गोळा करीत राहिली. त्या मातेचा का आत्मा तेथे होता? त्या मातेच्या डोळ्यांतील अश्रूंची का ती फुले होती!

३८*मनूबाबा  मनूबाबाच्या मनात किती तरी विचार आले. त्याने ती फुले सोनीच्या केसांत घातली. जणू वनदेवतेची मुलगी अशी सोनी दिसू लागली. त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले. तिला उचलून घेतले. तो सोनीला घेऊन घरी आला.

 "सोने, बाहेर गेलीस तर बघ. त्या कोळशाच्या खोलीत कोंडून ठेवीन. ठेवू कोंडून? ठेवू?" असे म्हणून त्याने त्या लहान मुलीला त्या कोळशाच्या बळदात थोडा वेळ ठेवले. ती रडू लागली. त्याला दया आली. त्याने तिला जवळ घेतले. तिचे डोळे त्याने पुसले. तिच्या पायांना काळे लागले होते ते त्याने धुतले. "नाही हो, माझी बाळ ती! नाही हो ठेवायची कोळशात. माझी सोनुकली ती." असे म्हणून त्याने तिचे मुके घेतले.

 सोनीला खेळण्यांचा तोटा नव्हता. वाटेल ती वस्तु तिला चाले. मनूबाबांची कात्री - त्या कात्रीवर तिचे फार लक्ष असे. एके दिवशी तिने ती कात्री पळविली. सुताच्या गुंड्यांचे ती तुकडे करीत होती. सोनी कशाशी खेळत आहे हे पाहाण्यासाठी मनूबाबा गेले, तो सोनी सुताचे धागे तोडीत आहे असे त्यांना दिसले.

 "तुला कात्री घेऊ नको सांगितलं तरी पुन्हा घेतलीस? हात कापेल ना! त्या कोळशाच्या बळदात ठेवू?" त्याने विचारले.

 "हं ठेवा बाबा. त्या कोळशाच्या खोलीत मला ठेवा. मग तुम्हांला मी हाका मारीन. तुम्ही मला घ्याल. माझे काळे पाय धुवाल. ठेवा ना या खोलीत." ती सोनुकली म्हणाली.

 मनूबाबाला हसू आले. ज्या वस्तूची दहशत तो दाखवू पाहात होता, तीच वस्तू सोनीला गमतीची वाटत होती. सोनीला खोटी भीती घालायची नाही असे त्याने ठरविले. मोकळेपणाने सोनी वाढू दे.

 त्याने सोनीसाठी मुद्दाम सुंदर कापड विणले. त्याचे कपडे तिच्यासाठी करण्यात आले. किती सुंदर दिसे सोनी त्या कपड्यात. सोनीसाठी तो चांगली भाजी करी. तिच्यासाठी दूध घेई. सोनीच्या भातावर तूप वाढी. तिच्या पोळीला तूप लावी. मनूबाबाचे पैसे आता शिल्लक पडत नसत. पूर्वी पैसे भराभर साठत. मोहरा जमत. परंतु आता? पूर्वी पैशांना हेतू

                                 सोनी*३९ नव्हता. ते निर्हेतुक पैसे भराभर जमत असत. परंतु आता पैशांचा उपयोग होऊ लागला. पूर्वी पैशांसाठी पैसे होते. आता सोनीसाठी ते हवे होते.

 सोनी चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढत होती. मनूबाबा तिला घेऊन बसे. तो तिला गोष्टी सांगे कधी कधी तो तिच्याबरोबर खेळे. तो तिला धरी, ती त्याला धरी. मनूबाबाची पुर्वीची निराशा गेली. पूर्वी त्याच्या जीवनात अर्थ नसे. यंत्राप्रमाणे तो काम करी. कापड विणी. पैसे साठवी. ते पैसेच कुरवाळी, तेच हृदयाशी धरी, परंतु आता त्याच्या जीवनात प्रकाश आला. प्रेम, स्नेह, दया, माणुसकी, कर्तव्य, आनंद यांचे बंद झरे पुन्हा वाहू लागले. जीवनाला आता अर्थ प्राप्त झाला. जीवनात गोडी आली. पूर्वी मनूबाबाचे डोळे कसे तरी भयाण दिसत, शून्य दिसत. परंतु आता तेच डोळे प्रेमळ दिसू लागले. पूर्वी त्याच्या तोंडावर कोणतीच भावना नसे. परंतु आता ते तोंड सात्विकतेने फुलले होते. पंधरा वर्षात मनूबाबा हसला नाही. परंतु आता सोनीशी तो हसे, खेळे. मनूबाबा पुन्हा मनुष्य झाला. पूर्वीचे पाषाणमय जीवन संपले. मनूबाबाचा जणू पुनर्जन्म झाला. लहानशी सोनी. परंतु तिने ही क्रांती केली होती. तिचा हात अद्याप धरावा लागत होता. तिला नीट बोलता येत नव्हते. परंतु म्हाताऱ्या मनूबाबाला न कळत ती आधार देत होती. त्याचे जीवन ती फुलवीत होती. त्याच्या जीवनात ती रस ओतीत होती. आनंद ओतीत होती. जगात असे चमत्कार होतात. एखाद्या लहान मुलाचा चिमणा हात माणसाचा उद्धार करू शकतो, माणसाला विनाशापासून वाचवू शकतो.

 सोनी आता बरीच मोठी झाली. ती पुष्कळदा साळूबाईकडे जाई. तिच्याकडे खेळे. कधी ती भातुकली करी. रामू तिचा खेळ मांडून देई. परंतु एखादे वेळेस तो भातुकलीचे सारे मटकावून टाकी. मग सोनी संतापे. ती सारा खेळ फेकून देई. बुटकुली भिरकावी. मग रामू पुन्हा तिचा खेळ मांडी, तिची समजूत घाली.

 "रामू, का रे तिला रडवतोस?" साळूबाई रागाने विचारी.

 "तिला मागून हसविण्यासाठी." तो लबाड उत्तर देई.

 "असं भांडू नये. ती लहान आहे." साळूबाई म्हणाली.


 "मी वाटतं मोठा आहे?" तो विचारी.

 "मला फुलं देशील आणून, रामू? फुलं आणून देणार असलास तर मी हसेन. नाही तर आता रागावून निघून जाईन." सोनी म्हणे.

 "बरं आणीन फुलं. आता हस." तो म्हणे.

 मग सोनी हसे व रामूचे डोळे धरी. अशी गंमत चाले. कधी कधी सोनी साळूबाईकडेच जेवे. मग मनूबाबा घरी रागावत.

 "रामू वाटतं लोक आहे? रामू आपलाच. रामूची आई आपलीच. त्यांच्याकडे जेवल्ये म्हणून काय झालं हो बाबा? तुम्ही रागावलेत? नको जाऊ?" ती विचारी.

 "एखादे वेळेस जावं." तो म्हणे.

 "मग मी का रोज जाते?" ती विचारी.

 असे दिवस जात होते. मनूबाबा आता सोनीला लिहा वाचायला शिकवू लागले. एके दिवशी सोनीसाठी त्यांनी लहानसे पुस्तक आणले. ते तिच्या बरोबर वाचीत होते. तो साळूबाई आली.

 "मनूबाबा, तुम्हांला वाचता येतं वाटतं?" तिने आश्चर्याने विचारले.

 "मध्यंतरी विसरलो होतो. पंधरा वीस वर्षात कधी लिहीलं नाही, कधी वाचलं नाही. परंतु आता सारं आठवतं. माझी विद्या परत आली. लिहीणं वाचणं परत आलं. सोनीला शिकविता यावं म्हणून माझं शिकणं मला परत मिळालं, खरं ना सोने? आम्हांला लहानपणी शिकवताना मारीत. परंतु सोनीला नाही हो मी मारीत. सोनी शहाणी आहे. भराभर येतं तिला." मनूबाबा सांगू लागले.

 "रामूसुद्धा चांगलं वाचतो. बाकी गरिबांना फार शिकून काय करायचं म्हणा. परंतु लिहिता वाचता आलं पाहिजे. म्हणजे पत्र लिहिता येतं, आलेलं वाचता येतं. हिशेब करता येतो. नाही तर गरिबांना फसवतात. मला नाही वाचता येत. रामू माझ्या पाठीस लागतो. परंतु मी त्याला म्हणते, 'मला नको रे आता शिकवू. तुझी बायको आली म्हणजे पुढं तिला तू शिकव.'" साळूबाई हसून म्हणाली.

 "रामूची बायको! अय्या!" सोनी आश्चर्याने ओठावर बोट ठेवून हसून म्हणाली.  एके दिवशी सोनी बाहेर गेली होती. संपतरायांच्या वाड्यावरून जात होती. संपतरायांनी तिच्याकडे पाहिले. सोनीला हाक मारावी असे त्यांना वाटले. परंतु इतक्यात त्यांची पत्नी इंदुमती त्यांच्याजवळ आली.

 "काय बघता?" तिने प्रेमाने विचारले.

 "त्या विणकराची मुलगी." तो म्हणाला.

 "बाकी त्या मनूबाबाची कमाल आहे हो. त्या पोरीचं तो सार करतो. एवढीशी होती. तेव्हापासून त्यानं ती वाढविली. तिचं हगमूत काढलं. आजारीपणात जपलं. तिला भरवी, तिला खेळवी. तिच्या बरोबर नाचे, हसे. तिला लिहावाचायला सुद्धा शिकवितो. बायकासुद्धा करायला कंटाळतील. परंतु मनूबाबा सारं आनंदानं करतात. आणि मुलगीही कशी आहे सुंदर, ती काय पाहाते आहे?"

 "ती आपल्या बागेतील फुलांकडे बघत आहे."

 "केसांत घालायला हवी असतील."

 "चल, तिला आपण देऊ फुलं."

 "थांबा, मी गड्याला सांगते."

 परंतु इतक्यात सोनी तेथून पळाली. संपतरायांचा कोणीतरी नोकर तिच्यावर ओरडला. ती घाबरली. धापा टाकीत ती घरी आली. मनूबाबा स्वयंपाक करीत होते. सोनी रडत होती.

 "काय झालं बेटा?" त्याने प्रेमाने विचारले.

 सोनी बोलेना. ती त्याच्याजवळ आली. त्याने तिच्या केसांवरून हात फिरविला. तिच्या पाठीवरून हात फिरविला. सोनीचे रडे थांबले.

 "का रडत होतीस?" त्याने पुन्हा प्रश्न केला.

 "बाबा, आपल्या घराजवळ एखादी बाग करा ना. लहानशी फुलांची बाग. त्या बागेत तुम्ही नाही काम करायचं. मी व रामू त्या बागेत खपू. आम्ही खणू. फुलझाडं लावू. पाणी घालू. रामूनं कबूल केलं आहे. कराल का बाग? लहानशी असली तरी पुरे. परंतु कुठं करायची? आपली अशी जागाच नाही. किती तरी जमीन पडली आहे पलीकडे. त्या खळग्याजवळ. आपणाला ती घेता नाही येणार का?

४२*मनूबाबा येईल का घेता? त्यासाठी का बरेच पैसे पडतील?" सोनीने मनूबाबाच्या गळ्याला मिठी मारून विचारले.

 "घेऊ हो जागा. करू हो बाग. मग सोनीच्या केसात रोज फुलं. रोज गजरे." मनूबाबा हसून म्हणाला.

 "रामूच्या आईच्या देवांनाही होतील, आणि मी गुच्छ करून तुम्ही विणता तेथील खिडकीत ठेवीन. तुम्हांला विणताना छान वास येईल, नाही? पण बाबा, एक अट आहे. तुम्ही नाही हो बागेत काम करायचं. तुम्ही दमाल. तुम्ही आम्हांला सांगा बाग कशी करायची ते. रामू व मी दोघंजणं काम करू." ती म्हणाली.

 "काम करता करता भांडू लागाल." तो हसून म्हणाला.

 "आता का आम्ही लहान आहो भांडायला?" तिने हसून विचारले.

 "मग तू का मोठी झालीस? अहा रे मोठी सोनी." मनूबाबा म्हणाले.

 "खरंच बाबा. मी काही लहान नाही. आता मी झाले बाबा मोठी" ती म्हणाली.

 आणि खरेचं, सोनी आता मोठी होत चालली होती व रामूहि मोठा होत चालला होता. एके दिवशी रामू व सोनी दोघेजणे बसली होती.

 "सोन्ये, तुला मी एक विचारू?" त्याने गंभीरपणे प्रश्न केला.

 "विचार ना. माझी परवानगी कशाला?"

 "तू रागावशील."

 "आता का मी लहान आहे? भातुकली खेळत असे तेव्हा रागावत होते. तेव्हा मी लहान होते."

 "आता तू मोठी झालीस."

 "आणि तूसुद्धा मोठा झालास."

 "म्हणूनच तुला मी काहीतरी विचारणार आहे."

 "जे विचारणाराहेस ते का मोठं झाल्यावरच विचारायचं असतं?"

 "हो."

 "मग विचार."


 "तू माझ्याशी लग्न लावशील? आपण पति पत्नी होऊ. दोघं संसार करू."

 "परंतु मग माझ्या बाबांना कोण? ते म्हातारे झाले आहेत. त्यांना मी कसं सोडू? त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. ते का म्हातारपणी एकटे राहाणार? हल्ली त्यांच्यानं काम होत नाही. त्यांना सोडून जाणं म्हणजे कृतघ्नपणा आहे."

 "परंतु त्यांना नको सोडून द्यायला. आपण सारी एकत्र राहू. मनूबाबांना विश्रांती देऊ."


४४* मनूबाबा  "असं चालेल का?"

 "न चालायला काय झालं? परंतु मी तुला आवडत असेन तर."

 "तू नाही आवडत तर कोण? तुझ्याशिवाय मला करमत नाही. तू चांगला आहेस. खरंच मला तू आवडतोस."

 "आणि मला तू आवडतेस."

 "मी बाबांना विचारीन. ते काय म्हणतात पाहू."

 "विचार. त्यांचा आनंद तोच आपला."

 रामू व सोनी निघून गेली. रामू कामाला गेला. सोनी घरी आली. त्या दिवशी सायंकाळी मनूबाबा सोनीचा हात धरून फिरायला गेले होते. सूर्य अस्तास जात होता. पश्चिमेकडे किती सुंदर रंग पसरले होते आणि सोनीच्या तोंडावरही शतरंग नाचत होते.

 "सोन्ये, किती सुंदर दिसतं आहे तुझं तोंड!" मनूबाबा म्हणाले.

 "तुम्हांला मी नेहमीच सुंदर दिसते!" ती म्हणाली.

 "मलाच नाही. सर्वांना तू सुंदर दिसतेस. परंतु तुझं सौंदर्य कोणाच्या पदरी घालायचं? सोन्ये, तू आता मोठी झालीस. तुझं लग्न केलं पाहिजे. मी आता म्हातारा झालो. तुझे हात योग्य अशा तरूणाच्या हाती दिले, म्हणजे माझं कर्तव्य संपले."

 "बाबा!"

 "काय सोन्ये!"

 "तुम्हांला एक विचारू?"

 "विचार बेटा."

 "रामू मला विचारीत होता."

 "काय विचारीत होता?"

 "तू माझी बायको होशील का म्हणून."

 "तू काय म्हणालीस?"

 "म्हटलं की बाबांना विचारीन."

 "तुम्ही दोघांनी ठरवून टाकलंत एकंदरीत. माझी चिंता कमी केलीत."

 "बाबा, रामू चांगला आहे. तुम्हांला नाही तो आवडत?"  "साऱ्या जगाला तो आवडतो. दिसतो कसा दिलदार, आळस त्याला माहीत नाही. खरंच चांगला आहे रामू."

 मनूबाबांचे डोळे ओले झाले. त्यांनी सोनीचा हात हातांत घेतला. त्या हातावर त्या प्रेमळ डोळ्यांतील पाणी पडले. त्या अश्रूंत किती तरी अर्थ भरलेला होता!

 "सोन्ये, आज सारं आठवतं आहे. सारं माझं व तुझं आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. या रायगावात मी एकटा होतो. कधी हसलो नाही, कधी कोणाजवळ बोललो नाही. मी शुष्क होतो. सारं जीवन जणू पाषाणमय होतं. मी दिवसभर विणीत बसे. पैसे मिळत ते साठवीत असे. मोहरांच्या दोन पिशव्या भरल्या. त्या मोहरा म्हणजे माझं जीवन. परंतु त्या मोहरा चोरीस गेल्या आणि तू मला मिळालीस. एके दिवशी पहाटे तू माझ्या झोपडीत आलीस. तुझी आई झोपडीपासून काही अंतरावर मरून पडली होती. तुला मी माझी मानली. तुला वाढवलं. माझ्या जीवनात तू आनंद आणलास. पंधरा वर्ष माझी वाचा बंद होती. जीवनाचे सारे झरे बंद होते. परंतु मी हसू, खेळू लागलो. सोन्ये, तुझ्यामुळं माझ्या जीवनात केवढी क्रांती झाली, ती तुला माहीत नाही. तू माझा उद्धार केलास. तुझे बोबडे बोल, तुझं हसणं, तुझं रडणं यांनी माझं वाळलेलं जीवन पुन्हा फुललं. आता तू मोठी झालीस. तुझ्या डोळ्यांसमोर नवीन क्षितिजं आता दिसत असतील. संसाराची स्वप्नं दिसत असतील. सोन्ये, जा. योग्य अशा तरूणासह संसार करायला जा. मी पुन्हा एकटा राहीन. पूर्वी एकटा होतो, पुन्हा एकटा माझा प्राण व मी. माझ्यासाठी तुझा कोंडमारा नको, सोन्ये."

 म्हाताऱ्याला बोलवेना. घळघळ अश्रू पुन्हा वाहू लागले.

 "बाबा, नका रडू. तुमचं माझ्यावर किती प्रेम. तळहाताच्या फोडाप्रमणं तुम्ही मला वाढवलंत. मला कोण होतं जगात? या लहानशा मुलीचे तुम्ही आईबाप झालांत. आता तुमच्या हातांनीच योग्य पती द्या.

४६*मनूबाबा रामू चांगला आहे. आणि बाबा, तुम्हांला काही सोडून नाही मी जाणार. आपण सारी एकत्र राहू. रामू व मी काम करू. तुम्ही विश्रांती घ्यायची. तुमचा आशीर्वाद आम्हांला मिळायचा. खरंना बाबा? तुम्हांला सोडून मी कशी जाईन? आपण एकत्र राहू."

 "राहू. एकत्र राहू."

 सोनीने मनूबाबांचा हात धरला. दोघं घरी आली. आज त्या दोघांचे हृदय भरून आले होते.