Jump to content

मनू बाबा/जमीनदार व त्याचे दोन मुलगे

विकिस्रोत कडून
ज मी न दा र व
त्या चे दो न मु ल गे

♣ * * * * * * ♣







 रायगावात दिगंबराय हा मोठा जमीनदार होता. सारा गाव त्याला मान देई. गावात काही तंटाबखेडा झाला, तर त्याचा निवाडा दिगंबरराय करायचे. दिगंबररायांना दोन मुलगे होते. मोठ्या मुलाचे नाव संपतराय व धाकट्याचे नाव ठकसेन. दिगंबररायांची पत्नी मरण पावली होती. घरात आचारी स्वयंपाक करी. घरात सारी अंदाधुंदी असे. सारा पसारा. घरात स्त्री असेल तर व्यवस्था रहाते. स्त्रियांशिवाय घराला शोभा नाही. सारे ओसाड, उदास व भगभगीत दिसते.

 "संपत, तू आता लग्न कर. त्या दलपतरायांची मुलगी इंदुमती तुला साजेशी आहे. त्यांचं घराणंही मोठं खानदानीचं आहे. इंदुमतीचंही तुझ्यावर प्रेम आहे. तिच्या पित्यानं तिचं कधीच लग्न केलं असतं, परंतु तिचं तुझ्यावर प्रेम आहे असं त्याला कळलं. त्यामुळं तो थांबला आहे. संपत, तू का नाही लग्नाला तयार? वेळीच सारं करावं. तुझी पंचविशी उलटून गेली. माझं ऐक. मीही आता म्हातारा झालो आहे. मरणापूर्वी घराला कळा आलेली पाहू दे. घरात सून आली म्हणजे घराला शोभा येईल, घरात आनंद येईल, व्यवस्थितपणा येईल. हल्ली घर म्हणजे धर्मशाळा वाटते. घरपणा स्त्रियांशिवाय नाही. करतोस का लग्न?" पित्याने विचारले.

 "बाबा, थोडे दिवस आणखी जाऊ देत. इंदुमतीचं माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट मला माहीत आहे. ती आशेनं आहे. तिची आशा पूर्ण होईल. परंतु काही दिवस थांबा. मी तुमच्या शब्दांबाहेर नाही. खरोखर नाही" संपत म्हणाला.  "तू चांगला आहेस. तो ठकसेन तर वाटेल ते करतो. त्याला काही धरबंधच नाही. तू माझी आशा. तू कुळाचं नाव राख. तू कुळाची परंपरा सांभाळ. आपली प्रतिष्ठा जाऊ देऊ नकोस. आणि संपत, आता घरचा कारभार तूच पाहू लाग. हिशेब वगैरे ठेव. जमाखर्च बघ. चांगला हो. समजलास ना?" पिता म्हणाला.

 "होय बाबा, मी कारभार बघत जाईन. तुमचा त्रास कमी करीन. तुमचं सुख ते माझं." संपत म्हणाला.

 एके दिवशी संपत वसूल गोळा करून येत होता. चारपाचशे रुपयांचा वसूल आला होता. बाबांना केव्हा एकदा सांगू असे त्याला झाले होते. इतक्यात तिकडून धाकटा भाऊ ठकसेन आला. त्याला चुकवून संपत जाऊ बघत होता. परंतु ठकसेन जवळ आलाच.

 "दादा, भावाचा असा का रे कंटाळा करतोस? तुझ्याशिवाय मला करमत नाही. मी कुठं गेलो तरी तुझी आठवण येते. आणि पुन्हा मी तुला भेटायला येतो. आज बरेच दिवसांनी आलो तरीही मला पाहून तुला आनंद का होत नाही?" ठकसेनाने विचारले.

 "ठकसेन, बाबांना तू आवडत नाहीस, म्हणून मलाही तू आवडत नाहीस. तू वाटेल तसा वागतोस. उधळपट्टी करतोस. तुला ताळतंत्र नाही. आपल्या घराण्याचा मोठेपणा तुझ्या लक्षात येत नाही. सारे लोक तुला हसतात, नावं ठेवतात. तुझ्याबरोबर मी राहीन तर मलाही नावं ठेवतील." संपत म्हणाला.

 "दादा, तुझं मझ्यावर प्रेम नसलं तरी माझं तुझ्यावर आहे. मला जे जे लागतं ते मी फक्त तुझ्याजवळ मागतो. तू नाही नाही म्हणतोस परंतु मला देतोस. तू वरून नाही दाखवलीस तरी मनात माझ्याबद्दल तुला सहानुभूती आहे. आज मी अडचणीत आहे. मला तीनशे रुपये पाहिजेत. कोठूनही दे. नाही म्हणू नकोस." ठकसेन हात धरून म्हणाला.

 "कुठून देऊ पैसे? मागं दिले होते. आज पुन्हा कुठून देऊ? बाबांना हिशेब द्यायचा आहे. जाऊ दे मला" संपत रागाने म्हणाला.

 "मी तुझा हात सोडणार नाही. तू माझा दादा. तू माझा मोठा भाऊ. तुझा आधार मी कसा सोडू? दादा, तू पैसे दिलेच पाहिजेस. मला नाही देणार? तुझी ती गोष्ट,-हं. मी कोणाला ती सांगणार नाही. दादाची गुप्त गोष्ट मी कशी कोणाला सांगू? दादा म्हणजे कुळाचं भूषण, कुळाची कीर्ती. खरं ना? मी तुझी गोष्ट माझ्या पोटात ठेविली आहे. परंतु मला पैसे दे. फक्त तीनशे. अधिक नकोत." ठकसेन हसत म्हणाला.

 "घे बाबा. तू तरी एक माझ्या मानगुटीस बसलेला गिऱ्हाच आहेस. पुन्हा नको मागू." संपत म्हणाला.

 "पुन्हा लागले म्हणजे मागेन. दादाजवळ नाही मागायचे तर कोणाजवळ? गिऱ्हा म्हण, भूत म्हण, काही म्हण, पैसे देत जा म्हणजे झालं तुझी गोष्ट मी कधीही कोणाला सांगणार नाही, खरं ना?" असे म्हणून ठकसेन निघून गेला.

 ठकसेनाचे उपद्व्याप सारखे चाललेले असत. त्याने कुबेराला भिकेस लाविले असते. खावे, प्यावे, चैन करावी यापलीकडे त्याला कर्तव्य नव्हते. तो रायगावात फारसा राहत नसे. पैसे घेऊन बाहेर जाई. तिकडे चैन करावी, रंगढंग करावे. पैसे संपले की तो घरी परत येई. तो वडिलांना कधी तोंड दाखवीत नसे. परंतु वडील भावाच्या पाठीस लागत असे. आणि काय असेल ते असो, वडील भाऊ त्याला भीत असे. ठकसेनाच्या हातात वडील भावाच्या जीवनांची कोणती तरी एक कळ होती. त्यामुळे दादापासून त्याला पैसे उकळता येत.

 ठकसेन तीनशे रूपये घेऊन गेला. परंतु तीन महीने ही त्याला झाले नाहीत तो, तो पुन्हा आला. पैशासाठी पुन्हा दादाच्या खनपटीस बसला.

 "दादा, मला पाचशे रूपये हवेत या वेळेस." तो म्हणाला.

 "दादाला वीक आता व घे पैसे." संपत म्हणाला.

 "दादाला कसं विकू? दादाची घोडी आहे ती फार तर विकीन. तुझी घोडी विकली तर पाचशे रूपये सहज मिळतील. देतोस मला तुझी घोडी? उद्या बाजारात विकीन. दादा, तु माझा आधार. आणि तुझी ती गोष्ट मी कोणाला सांगणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे खरंच." ठकसेन कावेबाजपणे हसून म्हणाला.

 "घोडी कशी विकायची?" संपत संतापून म्हणाला.  "कशी म्हणजे? बाजारात. मी विकीन. तू नको येऊ. तुला तो कमीपणा वाटेल. नेऊ ना तुझी घोडी?" त्याने पुन्हा विचारले.

 "बाबा काय म्हणतील?" संपत खिन्नतेने म्हणाला.

 "जरा रागावतील. मग गप्प बसतील. मी घेऊन जातो घोडी. उद्या गुरांचा बाजार आहे शेजारच्या गावी. तिथं विकीन. माझी अडचण भागेल. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खरंच." असे म्हणून ठकसेन घोडा घेऊन निघून गेला.

 शेजारच्या गावी गुरांचा बाजार भरला होता. सुंदर सुंदर घोडे तेथे विक्रीसाठी आणलेले होते. ठकसेनही घोडी घेऊन ऊभा होता. ती घोडी आसपास प्रसिद्ध होती. पुर्वी अनेकांनी ती घोडी विकत घेण्यासाठी खटपट केली होती. परंतु संपतरायाने ती कधीही दिली नाही.

 घोडीभोवती लोकांची गर्दी झाली.

 "हजार रुपये मागं एकजण देत होता. घोडी म्हणजे घोडी आहे." ठकसेन म्हणाला.

 "कोणाला पाहिजे तुमची घोडी? पाचशेसुद्धा कुणी देणार नाही." एकजण म्हणाला.

 "आपली वस्तु आपण होऊन बाजारात आणली म्हणजे तिची किंमत कमी होते." दुसरा म्हणाला.

 "खरोखरच विकायची आहे का?" तिसऱ्याने प्रश्न केला.

 "योग्य किंमत आली तर विकीन. नाही तर काही अडले नाही." ठकसेन कुर्ऱ्याने म्हणाला.

 "लोकांचंही अडलं नाही. परंतु संपतरायांची घोडी तुम्हांला कशी मिळाली?" कोणी तरी प्रश्न केला.

 "आम्ही दोघं भाऊ आहोत. मोठ्या भावानं ही घोडी मला बक्षीस दिली आहे." ठकसेन म्हणाला.

 "बक्षीस मिळालेली वस्तु का कोणी विकतो?" एकाने विचारले.

 "अडचण भासली म्हणजे भावना दूर ठेवाव्या लागतात." दुसरा म्हणाला.  "तुमची घोडी साडेपाचशेला देता का? पाहा पटत असेल तर उद्या घोडी आमच्या घरी घेऊन या. घरी पैसे देईन. आज सौदा ठरवून ठेवू." एकजण निश्चित स्वरात म्हणाला.

 "ठीक. साडेपाचशेला देऊन टाकतो. तुम्हांला उत्क्रृष्ट घोड्यांचा षोक आहे. ही घोडी तुमच्याकडे जाण्यात औचित्य आहे. केवळ पैशांकडेच बघून चालत नाही." ठकसेन म्हणाला.

 "सायंकाळ होत आली. लोक घरोघर जाऊ लागले. ठकसेन आपल्या घोडीवर बसून निघाला. उद्या घोडी दुसऱ्याच्या घरी जाणार होती. दादाने ठकसेनाला त्या घोडीवर कधी बसू दिले नव्हते. आज घोडी दौडवावी, हौस फेडून घ्यावी असे ठकसेनाच्या मनात आले. त्याने घोडीला टाच मारली, घोडी वाऱ्याप्रमाणे निघाली. घोडी बेफाम सुटली. ठकसेनाला ती आवरेना. बाहेर अंधार पडू लागला. ठकसेनला समोर दिसेना. शेवटी घोडी एकदम एक खळग्यात पडली! ठकसेन बाजूला पडला. तो चांगलाच आपटला. घोडी तर दगडावर आपटून तात्काळ गतप्राण झाली. ठकसेन लंगडत कण्हत घोडीजवळ गेला. घोडीचे प्रेत तेथे होते. आता पैसे? साडेपाचशे रूपये कोठून मिळणार? आज मेली ती उद्या विकल्यावर मरती तर? घोडीचे ठकसेनाला काहीच वाटले नाही, परंतु पैशांचा प्रश्न त्याच्यासमोर होता.

 तो उठला. अंधारातून चाचपडत निघाला. हातात सोन्याच्या मुठीचा चाबूक होता. गाव जवळ आला होता. आता त्याला प्रथम मनू विणकराचे घर लागले असते. भुतासारखा राहणारा मनू! मनूजवळ खूप पैसा आहे. सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या पिशव्या आहेत. मनूच्या घरी आपण दरोडा घातला तर? मनूला एकदम जाऊन भिवविले तर? त्याला धाकदपटशा दाखवला तर? मनूचे पैसे लांबवावे, लुबाडावे, असा विचार ठकसेनाच्या मनात आला. त्याला ती सोन्याची नाणी दिसू लागली. तो जणू स्वप्नात होता.

 इतक्यात एकाएकी वादळ उठले. गार वारा वाहू लागला. आकाशात ढग जमले. अंधार अधिक दाटला. ठकसेन झपझप चलू लागला. मनू विणकराची झोपडी आली. झोपाडीचे दार उघडे होते. आत चुलीत मंदाग्नी पेटत. दिवा मिणमिण करीत होता. परंतु मनू कोठे होता? तो तेथे नव्हता. आपले द्रव्य सोडून तो कोठे गेला?

 ठकसेनाने आत डोकावून पाहिले. आत कोणी नव्हते. तो पटकन झोपडीत शिरला. परंतु तेथे त्याला पेटीबिटी दिसेना. कोठे आहे या कृपणाचा ठेवा? ठकसेन पाहू लागला. तो त्या मागाजवळ गेला. तेथे त्याला उखळलेले जरा दिसले. त्याने भराभर माती उखळली. भुसभुशीत होती माती. थोडीशी माती काढताच हाताला त्या दोन पिशव्या लागल्या. ठकसेनाने त्या बाहेर काढल्या. हेच ते द्रव्य. जड होत्या पिशव्या. त्याने त्या पिशव्या उचलल्या. माती नीट करून ठेवून तो बाहेर पडला. अंधारात निघून गेला.

 बाहेर वादळ फारच जोरात सुरू झाले. कडाड कडाड मेघ गरजू लागले. गाराही पडू लागल्या. मोठ्या आंब्याएवढाल्या गारा. गारांचा पाऊस. असा पाऊस कधी पडला नव्हता. मनू बाहेर गेला होता. दोरा विकत आणण्यासाठी गेला होता. सकाळी नवीन ठाण लावावयाचे होते. त्यासाठी दोरा हवा होता. म्हणून तो गेला होता. तो तिकडेच अडकला. आपण पटकन घरी येऊ असे त्याला वाटत होते. कडी न लावताच तो गेला होता. त्याच्या घराची सर्वांना भीती वाटे. कोणीही त्याच्या वाटेस जात नसे. आपल्या घरी कोणी चोर येईल अशी शंकाही मनूच्या मनात कधी येत नसे.

 वादळ जरा थांबले गारांचा वर्षाव थांबला. पाऊस पडतच होता. मनू घरी येण्यास निघाला. पावसातून भिजत तो घरी आला. दुसरे कोरडे नेसून तो चुलीजवळ गेला. तो गारठला होता. आता ऊब आली. त्याने जेवण केले आणि झोपडीचे दार लावून, खिडक्या लावून तो आपल्या त्या ठेव्याजवळ आला. मिणमिण करणारा दिवा जवळ होता.

 मनू माती उकरू लागला. नेहमीप्रमाणे त्याने माती दूर केली. परंतु पिशव्या कोठे आहेत? पिशव्या नाहीत. तो घाबरला. त्याने हातभर खणून पाहिले, दोन हात खणले. परंतु पिशव्या नाहीत! त्याने सर्वत्र पाहिले. कोपरान् कोपरा शोधला. परंतु सोने नाही. कोठे गेले सोने? पंधरा वर्षे प्रेमाने साठविलेले सोने. बाहेरच्या गारठ्याने मनू गारठला



१८ मनूबाबा नाही. परंतु पैशाची ऊब नाहीशी होताच तो कापू लागला. आपले प्राण जाणार असे त्याला वाटले. त्याने आपले ह्रदय घट्ट धरून ठेवले. छाती फुटणार असे त्याला वाटले. तो मध्येच डोळे फाडफाडून पाही. मध्येच तो डोळे मिटी. 'माझं सोनं, माझं सोनं-' असे म्हणून तो रडू लागला.

 पाऊस थांबला होता. परंतु मनू विणकराच्या डोळ्यातून पाऊस पडत होता. आकाश निर्मळ झाले, परंतु मनूचे ह्रदय अंधाराने भरले. तो वेड्यासारखा झाला. 'माझं सोनं, माझं सोनं-' करीत तो झोपडीच्या बाहेर पडला. दिगंबररायांकडे दाद मागवी असे त्यच्या मनात आले, रडत रडत तो निघाला. दिगंबरराय आज घरी नव्हते. त्यांचा मोठा मुलगा संपतराय तोही घरी नव्हता. ते शेजारच्या कोणत्याशा गावी मेजवानीला गेले होते, त्यांच्या घरी गडीमाणसे होती. कारभारी होते. त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. कोणी खेळत होते.

 इतक्यात "माझं सोनं गेलं, माझे प्राण गेले. द्या हो माझं सोनं. आणा हो शोधून. कसं गेलं. माझं सोनं? कोणी नेलं?" असे ओरडत मनू तेथे आला. वाड्यातील सारी मंडळी. त्यांना आधी काही कळेना. सारा गोंधळ.

 "हे पाहा मनू, नीट सारं सांग." प्रमुख म्हणाला.

 "काय नीट सांगू? मी दोरा विकत आणण्यासाठी बाजारात गेलो होतो. पावसामुळं दुकानात अडकलो. परंतु पाऊस संपताच घरी गेलो. घरी जाऊन माझी पिशवी पाहतो तो नाही. दोन पिशव्या होत्या दोनशे बह्हात्तर मोहरा होत्या.लवकरच तीनशे झाल्या असत्या. कितीदा तरी या बोटांनी मी त्या मोजीत असे. माझी मोहर मी अंधारातही ओळखीन. गेल्या, साऱ्या गेल्या. तुम्ही जा. शोधा चोर. कुठं गेला चोर? काय करू मी? माझा सारा आनंद गेला. माझी शक्ती गेली. छे! पायानं चालवत नाही. आणा हो माझ्या पिशव्या."

 असे म्हणून तो म्हातारा विणकर तेथे मटकन खाली बसला. त्या सर्वाना त्याची कीव आली. मनूने कधी गोडगोड खाल्ले नही. चांगले वस्त्र ल्यायला नाही. गाडीघोडा ठेवला नाही. चैन त्याला माहीत नव्हती. दिवसभर तो काम करी. काम करून त्यान पैसे जमविले. निढळाच्या श्रमाचे पैसे. परंतु सारे गेले. त्या पैशांचा काय होता त्याला उपयोग?


                                     जमीनदार व त्याचे दोन मुलगे      १९ परंतु ते जवळ असणे, त्यांचा स्पर्श बोटांना होणे, त्यांचे दर्शन डोळ्यांना 

होणे, यातच त्याचा आनंद होता. पैशाचा दुसरा उद्देश नव्हता. दुसरे प्रयोजन नव्हते. ते पैसे म्हणजे मनूबाबाचे एक प्रेमाचे जणू स्थान होते.

 "तुम्हांला कोणाचा संशय येतो का?" त्या प्रमुखाने विचारले.

 "हा तुमचा गडी भिकू याचा मला संशय येतो. तो मागे एकदा म्हणाला होता, की तुझे पैसे चोरले पाहिजेत. याला विचारा." मनू म्हणाला.

 भिकू एकदम संतापला.

 "थोबाड फोडीन बुढ्ढ्या. मी का तुझे पैसे चोरले? संध्याकाळपासून मी इथं आहे. आणि तुझे पैसे तर आता गेले. वा ! कधी थट्टेत बोललो असेन तर त्यासाठी का माझ्यावर आळ घेतोस ?" भिकू रागाने म्हणाला.

 "हे पाहा मनू, असं उगाच कोणाचं नाव घेऊ नकोस. भिकू प्रामाणिक आहे. आज किती तरी वर्ष ह्या बड्या वाड्यात तो काम करीत आहे. परंतु त्यानं कधीही कशाला हात लावला नाही." प्रमुख म्हणाला.

 "भिकू, मला क्षमा कर. परंतु माझं सोनं? कोणी नेलं माझं सोनं? शोधा हो तुम्ही. पंधरा वर्षांची सारी कमाई गेली, अरेरे ! आता कसा जगू? कसा राहू? जा, कोणी शोधा." तो काकुळतीने म्हणाला.

 काही लोक कंदील घेऊन गेले. कोणी हातात काठ्या घेतल्या. कोणी या बाजूला गेले, कोणी त्या. परंतु चोर सापडला नाही. लोक घरोघर झोपले होते. हवेत गारठा होता. संशोधन करणारी मंडळी परत आली.

 "सापडलं का सोनं? माझं सोनं?" मनूने विचारले.

 "चोराचा पत्ता नाही. सर्वत्र शोधलं. जिकडे तिकडे चिखल झाला आहे. नद्यानाल्यांना पूर आले आहेत. शक्य तो प्रयत्न केला. मनू, झालं ते झालं. असेल आपलं तर परत मिळेल." तो प्रमुख म्हणाला.

 "माझंच होतं. माझ्या श्रमाचं होतं सारखं मी काम करीत असे. कधी विश्रांती घेतली नाही." मनू रडत म्हणाला.

 "जा आता घरी. काळजी करून काय होणार?" प्रमुख म्हणाला.

 मनू आपल्या झोपडीत गेला. तो तेथे बसून राहिला. शून्य दृष्टीने तो सर्वत्र पाहात होता. हळूहळू त्याचे डोळे मिटले. पहाटे त्याला झोप लागली.  सकाळी सर्व गावात चोरीची वार्ता पसरली. सारा गाव मनूच्या झोपडीपाशी जमा झाला. जो तो हळहळत होता. प्रत्येकाला वाईट वाटत होते. मनू खिन्न होउन बसला होता. त्याचे आधीच खोल गेलेले डोळे एका रात्रीत आणखी खोल गेले. त्याच्या तोंडावर प्रेतकळा आली होती. एक शब्दही त्याला बोलवेना.

 मनूच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर सखाराम राहात असे. सखाराम मोलमजुरी करी. त्याच्या बायकोचे नाव साळूबाई. साळूबाई मोठी प्रेमळ होती. दुसऱ्याची मनःस्थिती तिला पटकन समजे. तिला एक मुलगा होता. असेल पाच-सहा वर्षांचा, मोठा गोड मुलगा. तो आईबापांचा फार आवडता होता. त्याचे नाव रामू.

 साळूबाई रामूला बरोबर घेऊन मनूकडे आली. गर्दी आता ओसरली होती. लोक आपापल्या उद्योगाला निघून गेले होते. मनू तेथे एका जुन्या आरामखुर्चीत विषण्णपणे पडला होता.

 "वाईट झालं हो. कसे नेववले पैसे तरी. वाईट नका वाटून घेऊ वाईट वाटून काय करायचं मनूदादा? आणि तुम्ही भारीच पैशाच्या मागं लागता. कधी देवळात जात नाही. देवदर्शन करीत नही. एकादशी नाही. सोमवार नाही. रोज उठून मेलं ते अक्षै काम! काम! मनूदादा, काम करावं परंतु रामाला विसरू नये. देवाला विसरू नये. आता देवाला विसरू नका. कधी भजनाला जात जा. तुम्हांला येतं का भजन? या आमच्या रामूला येतात अभंग. रामू, दाखव रे म्हणून अभंग. हसतोस काय लबाडा! म्हण की. मनूबाबांना म्हणून दाखव." साळूबाई बोलत होती.

 रामू लाजला. त्याने आपले डोळे दोन्ही हातांनी मिटले. पुन्हा ते हळूच उघडून त्याने बघितले. नंतर आईच्या पाठीमागे जाऊन लपला.

 "म्हण ना रे. लाजायला काय झालं?" आई म्हणाली.

 रामू अभंग म्हणू लागला.

  आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आयुष्याचा
  सकलांच्या पायां माझे दंडवत, आपुलाले चित्त शुध्द करा
  हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन एकविध
  तुका म्हणे हित होय, तो व्यापार करा, काय फार शिकवावे||

                          जमीनदार व त्याचे दोन मुलगे * २१     

 त्या लहान मुलाची वाणी निर्मळ होती. ती वाणी गोड वाटत होती. अभंग म्हणून झाल्यावर रामूने आईच्या गळ्याला एकदम मिठी मारली. तिने त्याचा प्रेमाने मुका घेतला.

 "मीही माझ्या सोन्याच्या त्या मोहरांचे असेच मुके घेत असे. त्या मोहरा म्हणजे जणू माझी मुलं, त्यांचे मी मुके घेत असे. त्यांना मी पोटाशी धरीत असे. आता कोणाला धरू पोटाशी, कोणाचे घेऊ मुके?" मनूबाबा म्हणाला.

 "या माझ्या रामूचे घ्या." साळूबाई म्हणाली.

 "रामूचे?" मनूबाबा आश्च्रर्याने विचारले.

 "हो. रामू म्हणजे आमचं सोनं. आम्ही मोलमजुरी करतो, परंतु कोणासाठी? या रामूसाठी. आमचे पैसे या रामूसाठी. रामू आमची धनदौलत. चालती बोलती धनदौलत. हसणारी, खेळणारी धनदौलत." असे म्हणून साळूबाईने पोटाशी धरले. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही.

 "आज मनूबाबा, तुम्ही किनई, आमच्याकडेच जेवायला या. घरी करू नका. आणि आता हे थालीपीठ आणलं आहे ते खा. आज सकाळी कामाला जाताना म्हणाले, 'थालीपीठ कर.' केलं. पुरुषांच्या पोटांना निरनिराळे पदार्थ हवे असतात. आम्हा बायांना काहीही चालतं. घ्या हे थालीपीठ. नाही म्हणू नका. तुम्ही बरेच दिवसांत खाल्लं नसेल." साळूबाई म्हणाली.

 तिने म्हाताऱ्याच्या हातांत थालीपीठ दिले. पानात गुंडाळलेले होते ते. मनूबाबा त्याच्याकडे पाहात राहिला. त्याने एक तुकडा रामूला दिला.

 "त्याला कशाला? तो सारं खाईल. लबाड आहे तो. तुम्हीच खा. मी आता जात्ये. आणि तुम्ही किनई, मनूबाबा, फार नका काम करीत जाऊ. जरा हसत बोलत जा. देवदर्शनाला जात जा. भजन करा. समजलं ना?" असे म्हणून साळूबाई रामूला घेऊन निघाली.

 मनूबाबा खुर्चीतच होता. गावातील किती तरी मंडळी येऊन गेली. परंतु साळूबाईचे बोलणे किती साधे, किती प्रेमळ! त्याच्या मनावर

२२ * मनूबाबा त्याचा परिणाम झाला. त्याच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यांतून पाणी येणार होते. परंतु मोठ्या कष्टाने ते त्याने आवरले. गेल्या पंधरा वर्षात त्याच्या हृदयाला भावनाचा स्पर्श झाला नव्हता. स्वत:च्या हृदयाची जाणीवच जणू त्याला नव्हती. परंतु त्याला स्वतःला हृदय असल्याची जाणीव झाली. त्यालाही गोड गोड अभंग आठवू लागले. आपण एके काळी देवळात जात असू, देवासमोर बसत असू. ते त्याला आठवले. हृदयाचे बंद दार जरासे किलकिले झाले. ते दार गंजून गेले होते, परंतु साळूबाईच्या शब्दातील स्नेहाने गंज निघून गेला. दार जरा उघडले. थोडासा प्रकाश हृदयात शिरला.