Jump to content

मनू बाबा/एकाकी मनू

विकिस्रोत कडून
ए का की
म नू

♣ * * * * * * ♣







 मनू आता रायगावात होता. या गावात येऊन त्याला पंधरा वर्षे झाली. परंतु त्याची कोणाशी मैत्री नव्हती. गावाच्या टोकाला त्याची लहानशी झोपडी होती. ही झोपडी म्हणजे त्याचे जग. या झोपडीत त्याचा विणण्याचा माग होता. मनू दिवसभर विणीत असे. चांगला विणकर म्हणून त्याची प्रसिद्धी झाली होती. मोठमोठ्या श्रीमंतांच्या बायकांकडून त्याला काम येई. त्याला भरपूर काम मिळे व मजुरी ही चांगली मिळे.

 मिळालेले पैसे मोजणे एवढाच काय तो मनूचा आनंद होता. त्याला दुसरा आनंद नव्हता. सायंकाळ झाली म्हणजे मनूचा माग थांबे. मग तो मिणमिण दिवा लावी. चुलीवर भाकरी भाजी. ते साधे जेवण संपवून तो आपल्या मागाजवळ येई. तेथे जमिनीत पुरलेले एक लोखंडी भांडे असे. त्यातील सोन्याची नाणी काढून तो मोजीत बसे. सार्‍या खिडक्या बंद असत, दारे लावलेली असत, आणि मनू ती सोन्याची नाणी हातांत घोळवीत बसे. त्या सोन्याच्या मोहरा तो हृदयाशी धरी. जणू त्याचे ते जीवनसर्वस्व होते.

 सोन्याची नाणी त्या लोखंडी भांड्यात मावेनाशी झाली. मनूने दोन चामड्याच्या पिशव्या विकत घेतल्या, त्यांत ती नाणी त्याने ठेवली. सोन्याच्या नाण्यांत नेहमी भर पडत असे. मनू चैन करीत नसे. त्याच्या अंगावर फाटके वस्त्र असे. तो चांगले पदार्थ खात नसे. ना दुधातुपाचा थेंब. कोरडी भाकर तो पाण्याबरोबर खाई. सोन्याचे नाणे अधिक कसे पिशवीत पडेल याचीच त्याला अहर्निश चिंता असे.


एकाकी मनू ९  मनूचे जीवन केवळ यांत्रिक झाले होते. दिवसभर तो खटक खटक मागाचा आवाज त्याच्या कानांत भरत असे, आणि रात्री त्या नाण्यांचा आवाज. तिसरा आवाज त्याला माहीत नव्हता. त्याचे डोळे विचित्र दिसत. ना त्या डोळ्यांत कोणताही भाव. ते डोळे यांत्रिक झाले होते. त्या डोळ्यांचे पाहाणे अर्थहीन झाले होते. मनूची मुद्रा फिक्कट झाली होती. तोंडावर ना तेज ना प्रसन्नता. मनू एखाद्या भुतासारखा भासे. गावातील लोकांना त्यची भीती वाटे. तरीही त्याच्याकडे कधी कधी बायका आपली मुले घेऊन येत. मुलांचे रोग कसे बरे करावे ते मनूला माहीत होते. त्याला अनेक औषधे माहीत होती. तो साधी साधी औषधे सांगे. झाडांचे पाले, वनस्पतीची मुळे हीच त्याची औषधे, परंतु मुलांचे रोग बरे होत. बायका त्याला धन्यवाद देत. जरी असे धन्यवाद मिळत असले तरी एक प्रकारची मनूबद्दलची भीतीही बायकांना वाटे. कोणी म्हणत, "मनूला भूतविद्या येते. पिशाच्चं त्याल वश आहेत, म्हणून त्याला रोग बरे करता येतात. नाही तर या बावळटाला कोठली येणार वैद्यकी?". कोणी म्हणत, "मनू आघांतरी चालतो. शरीरातून आपला प्राण वाटेल तिथं नेतो. पुन्हा शरीरात येतो. त्याला योगविद्या येते." असे नाना तर्कवितर्क याच्याविषयी चालत.

 मुले त्याच्या झोपडीत डोकावत व म्हणत, "ते पाहा भूत बसलं आहे. मागावर बसून विणीत आहे. कसा म्हातारा दिसतो नाही?" कोणी त्याल 'ए म्हातारड्या मनू' अशी हाक मारीत. मनू त्यांच्याकडे बघे. मुले पळून जात.

 मनूबद्दल जरी भीती वाटत असली. तरी हा निरुपद्रवी मनुष्य आहे अशी सर्वांची खात्री झाली होती. पंधरा वर्षांत त्याचे कोणाजवळ भांडण नाही, कधी तंटा नाही. विणाईच्या मजुरीविषयी घासधास नाही. जे लोक देत ते तो घेई. लोकांना त्याची करुणा वाटे. एकटा जीव. कोणी सखा ना मित्र. मूल ना बाळ. कसा राहात असेल विचारा, असे सर्वांना वाटे.

 मनूच्य साऱ्या भावना गोठून गेल्या होत्या. त्याचे सारे प्रेम, त्याचा सारा लोभ, त्या सुवर्णमुद्रांत साठवला होता. आईबाप आपल्या मुलांना

कुरवाळतात. मनू ती सोन्याची नाणी कुरवाळी. हातांत घोळून घोळून ती सोन्याची नाणी गुळगुळीत झाली होती. 'शंभर झाली माझी नाणी, आता सव्वाशे होतील. सव्वाशेची दीडशे व दीडशेची दोनशे होतील.' असे तो मनात म्हणे व त्या मोहरांचे चुंबन घेई.

 त्याच्या हृदयातील ओलावा एखादे वेळेस नकळत प्रकट होई. मनूच्या घरात फारशा वस्तू नव्हत्या. एक मातीचा घडा होता, तो मनूला फार आवडे. त्या मडक्यावर त्याचा जीव होता. तो घडा घेऊन विहिरीवर जाई व रोज भरून आणी. हलक्या हाताने तो घडा मनू स्वच्छ करी. त्या घड्यातील निर्मळ पाण्याकडे तो बघत राही. 'मनुष्याच्य डोक्यपेक्षा हा घडा निर्मळ आहे. डोक्यात घाणेरडे विचार येतात, परंतु माझ्या मडक्यात घाणेरडे पाणीही निर्मळ होते!' असे तो म्हणे.

 परंतु एके दिवशी तो घडा फुटला. त्याचे तीन तुकडे झाले. जणू मनूचे प्राणच गेले. त्या तीन तुकड्यांत त्याचे त्रिभुवन होते. त्या तुकड्यांकडे तो पाहात राहिला. इतके दिवस तो घडा त्याच्यासाठी झिजला होता. पंधरा वर्षे त्या घड्याने निर्मळ जीवन दिले. तो घडा मनूच्या जीवनाचा जणू एक भाग झाला होता. तो घडा निर्जीव नव्हता. तो घडा मनूशी बोले, मनूशी हसे. परंतु तो घडा आज गेला. एक महान मित्र गेला. मनूने आदराने ते तीन तुकडे उचलून घरी आणले. ते तीन तुकडे त्याने कसे तरी सांघवून तेथे ठेवले. ते जणू त्या घड्याचे स्मारक होते. ती जणू आठवण होती. फुटलेल्या घड्याला मनूच्या प्रेमाने जणू पुनर्जन्म दिला. परंतु तो घडा आता पाण्याच्या उपयोगी नव्हता.

 मनूच्य झोपडीतील साऱ्या वस्तू जणू सजीव होत्या. तो मग गाणे गाई. ते फुटके मडके बोले. ती सोन्याची नाणी म्हणजे तर परमानंद. त्या खोलीतील वस्तू म्हणजे त्याचे मित्र. तेच त्याचे कुटुंब. तीच त्याची मुलेबाळे. अशा रीतीने मनूचे आयुष्य चलले होते. तो आता म्हातरा दिसू लागला. त्याचे वय फार तर चाळीस असेल. परंतु सारे त्याला "बुढ्ढेबाबा" म्हणून म्हणतात.