मनतरंग/यशस्वी होण्यासाठी

विकिस्रोत कडून

 परवा दिवसभर चांगले उत्फुल्ल उन्ह पडले होते. झळझळीत रंगाचे. जणू सूर्यफुलांचे शेत झुलतेय. पाहता पाहता उन्हं कधी आणि कुठे हरवली ? ते कळलेच नाही. मग फक्त गडगडाट, उरात धडकी भरवणारा. घनगंभीर लयीतला आणि लगेच हत्तीच्या सोंडेतून वेगाने उडणाऱ्या धरणीला आकंठ भिजवणाऱ्या धारा, उन्मुक्त पावसाच्या. बेभान वाऱ्यासंगे वाकड्या तिकड्या नशेत धावणाऱ्या. हे दृष्य पाहाताना मला लहानपणीच्या नाचाच्या ओळी आठवल्या.

"आसुसली माती
पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती आता,
पाऊस पाड गा, पाऊस पाऽड..."

 मी 'कालनिर्णय'कडे धावले. त्याच दिवशी हस्तनत्रक्ष लागले होते. कितीतरी वेळ तो निळा धुंद पाऊस मी अनिमिष नजरेने न्याहाळत होते. सुरुवातीला बेभानलेली लय आता संथ झाली होती. पण पावसाचा वेग आणि घनदाट पोत तसाच होता. पावसाच्या स्पर्शातून कळत होते की, हा पाऊस लोखंड्या नाही. गेल्या वर्षी याच काळात घनघोर पाऊस झाला होता. दणादण कोसळणारा. पण त्यांची पावलं जमिनीला उद्ध्वस्त करणारी...जखमा करणारी होती. त्या भयावह पावसाकडे पाहत बालाजी ड्राईव्हर म्हणाला होता, "भाबी हा लोखंड्या पाऊस हाय. याने जमीन कडक होणार. शेतीला मारक हाय हा पाऊस. याला लोखंड्या हस्त म्हणतो आम्ही. यंदा जवारी, कर्डई कमी येणार. हायब्रीडवरच पोट भागवावं लागणार !"
 हस्ताचा पाऊस आणि निरभ्र होत जाणारे नवरात्राचे चांदणी आभाळ यांचे जवळचे नाते आहे. लहानपणी हस्तनक्षत्र लागले की पुणेकर मैत्रिणींकडे हादगा मांडायची धांदल उडे. आम्हा खानदेशवासींची लाडकी माहेरवाशीण भुलाबाई मात्र अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद पुनवेला पतिराज भुलोबा आणि गणेशबाळासह महिनाभर मुक्कामाला येई. आमच्या वर्गात सांगलीची एक मुलगी होती. नवरात्राच्या पहिल्या माळेच्या दिवशी तिच्या घरी भोंडला मांडला जाई.
 भाद्रपद आश्विनातले ते दिवस आम्हा मुलींच्या स्वप्नात ज्येष्ठ आषाढापासून येत.

"ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे,करीन तुझी सेवा...

यादवराया राणी रुसून बैसली कैशी ?

भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलींना आनंद झाला"

 अशी अनेक गाणी गुणगुणण्याचे खूळ आम्हाला लागे, टिपऱ्या नाही तर टाळ्यांच्या तालात भिरभिरणारे फेर, मोकळ्या आकाशाखाली उंच आवाजात गायलेली अंगणातली गाणी आणि त्यानंतर प्रसाद ओळखण्याचा कार्यक्रम. तो चमचाभर खमंग प्रसाद आजही जिभेवर काटा फुलतो.
 भोंडला, हादगा, भराडी गौर, भुलाबाई हे उत्सव कुमारिकांचे. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत खेळले जाणारे उत्सव नावाने वेगळे असले तरी त्यांचा मूलबंध एकच आहे. कुमारिकांच्यातील सुफलन ऊर्जेचा सन्मान करणारे हे उत्सव आहेत. त्यांची गाणीही एकाच प्रकारची आहेत. मला लहानपणी नेहमीच प्रश्न पडे. भुलाबाई वऱ्हाडखानदेशातली तर हादगा-भोंडला, पुणे-सांगली-कोकणातला; तरीही या गाण्यात एवढा सारखेपणा कसा?
 असे म्हणतात की, स्त्रिया संस्कृतीच्या रक्षक आणि वाहक असतात. मुली... लेकीबाळी आपल्यासोबत ही गाणी, विधी जिथे जातील तिथे घेऊन जात असतात.

"तुळशीचं बाळ रोप
दुजा अंगणी रोवलं
मूळ...माती विसरुनि
मंजुळांनी डंवरल..."

 स्त्री वाढते एका घरात. तेथील संस्कार घेऊन सासरच्या घरात जाते आणि तेथे रुजून तुळशीसारखी मंजुळांनी बहरून जाते. दोन घरांतील, प्रदेशांतील संस्कारांचे सुंदर संतुलन स्त्री साधते. या स्त्रियांनी गाणी महाराष्ट्रभर नेली. ती एकमेकात मिसळून गेली. हादगा व भोंडला हा वर्षावाचा उत्सव. पाऊस पडला तर जमिनीतून धनधान्य उगवणार. जीवन म्हणजे पाणी. जगातील जीवनरहाटी चालू राहण्यासाठी हे 'जीवन' हवेच. आपल्याकडे एक म्हण आहे. 'पडला हस्त आणि शेतकरी झाला मस्त' भुलाबाई ही धरणीचे...भूमीचे प्रतीक. हा उत्सव जमिनीबद्दल... मातीबद्दल कृतार्थता व्यक्त करणारा उत्सव. ही धरित्री हजारो...लाखो वर्षे न थकता, न कंटाळता, अन्नधान्य, फळे फुले, कंदमुळे यांनी बहरते आहे. मानवी जीवन सुखकर करते आहे.
 आणि असे हे उत्सव कोणाचे ? तर कुमारिकांचे. कुमारिका, ज्या पाऊस, बीज झेलून नवनिर्मिती करण्यास योग्य झाल्या आहेत अशा मुली. नवनिर्मिती करण्याच्या ऊर्जेने रसरसलेल्या मुली. भारतीय संस्कृतीने या खेळोत्सवांच्या माध्यमातून कुमारिकांच्या सर्जनशक्तीचा केलेला हा सन्मान, आज जाणवलं की मन कृतार्थ होते. भारतातील विविध पारंपरिक सण, उत्सव या मागच्या घनगंभीर, मधुर भावसौंदर्याचा शोध कोणी घ्यायचा ? आम्हीच ना ? तेही आपल्या पायाखालची जमीन उकरून पाहू ना; त्यात अनमोल रत्नांचा खजिना भरला आहे.

■ ■ ■