मनतरंग/धक्क्याच्या मागे डोकावून पहा !

विकिस्रोत कडून



 पासपोर्टवर शिक्का मारला गेला नि आम्ही बाहेरच्या प्रचंड दालनात आलो. माझ्या आणि आशाच्या साडीमुळे ब्रिजिटा धावतच आमच्याजवळ आली. इतक्यात लिंडाही सामनवाहू गाडी घेऊन पुढे आली. आमचे सामान त्यात ठेवून आम्ही तिच्यामागे चालू लागतो. दोन्ही बाजूंनी असंख्य जाहिराती. सेक्सशॉपच्याही. अंबाजोगाईसारख्या चिमुकल्या आणि जुनाट वळणाच्या गावातून थेट फ्रॅंकफूर्टला पोचलेल्या मला पहिला धक्का बसला. सरकते रस्ते. फिरते जिने पार करताना वाटे आपण पुनः पुन्हा त्याच त्याच रस्त्यावरून फिरतोय, जणू 'चकव्या' त सापडलोय. फ्रॅंकफूर्ट विमानतळाची प्रचंड जादुई गुहा एकदाची पार केली आणि मोकळ्या आभाळाखाली आलो.
 निरभ्र आभाळ. अधमुऱ्या दह्यासारखं कोवळं ऊन आणि भयानक थंडी. मागून आणलेला ओव्हरकोट 'कारणी लागला' याचं समाधान !! गाडीत बसताच ब्रिजिटानं एक पट्टा माझ्या गळ्यात अडकवला होता. गाडीचा वेग पाहून तो पट्टा किती 'संरक्षण' करणार आहे ते मनोमन पटलं. गाडीच्या वेगाची नोंद घेणारा काटा शंभर ते दीडशेत फिरत होता आणि म्हणे ती खास आमच्यासाठी गाडी 'स्लो' याने के 'सावकाश' चालवीत होती.
 मौलोफ या चिमुकल्या खेड्यात तेरे देस होम्स या जर्मनीतील संस्थेने महिलांची परिषद आणि पंधरा दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. बत्तीस देशांतल्या... विशेष करून विकसनशील देशातल्या पासष्ठ महिला एकत्र येऊन एकमेकींच्या अनुभवांची देवाणघेवाण करणार होत्या. स्त्रियांच्या प्रश्नांवर विचारविनिमय करणार होत्या. मौलोफ हे खेडे फॅंकफूर्टपासून पन्नासएक किलो मिटर्सवर असेल. तेथील सुसज्ज अशा सांस्कृतिक केंद्रात रिक्रिअेशन सेंटरमध्ये आमची ही परिषद होती आणि तिकडेच आम्ही भारतीय पंचकन्या निघालो होतो.
 वेगाने धावणारी गाडी. भवताली हिरव्या रंगाच्या तऱ्हेतऱ्हेच्या छटांच्या लाटा. जमिनीवर हिरव्या रंगाचे लुसलुशीत गालिचे. त्यांच्यापाठी हिरव्या गर्द पाईन वृक्षांच्या लहानमोठ्या भिंती. हिरवी तटबंदीच म्हणाना ! सर्वात मागे शेकडो फूट उंचीचे विशाल वृक्ष. जणू निसर्ग आणि माणूस यांचे रक्षण करणाऱ्या पुरातन यक्षांचा थवाच ! नखशिखांत सजलेल्या चैत्र गौरीसारखी भूमी. जिकडे तिकडे ताजेपणा. इतका टवटवीत निसर्ग मी फक्त कॅलेंडरवर किंवा चित्रातच पाहिला होता. पिवळ्या रानफुलांचे अधूनमधून वाफे. या हिरव्या मैफलीत अधून मधून उतरत्या छपरांच्या घरांचे थांबे लागत. चिमखडी घरे... काचेच्या खिडक्या आणि प्रत्येक खिडकीत फुलांची टवटवीत गर्दी.
 मौलोफच्या देखण्या रस्त्यावरन भरकटताना फ्रैंकफूर्टच्या विमानतळावर पाहिलेल्या 'सेक्सशॉप्स' च्या भडक जाहिराती मनाच्या तळाशी कधी जाऊन बसल्या ते कळलं नाही. इतक्यात ब्रिजिटा जर्मनीच्या मुक्कामात काय काय पाहायचं त्याची माहिती देत होती आणि आमचे मनसुबेही विचारीत होती.
 "तुम्हाला लेस्बीयन्सना भेटायला आवडेल ? इथे त्याच्या वसाहती आहेत. ब्रेमेनला तुम्ही आठ दिवस राहाणार आहात. तिथे त्या चालवीत असलेले कॉफीशॉप आहे. तिथे जाता येईल तुम्हाला...'
 लेस्बीयन... लेस्बीयन... फारसा न ऐकलेला शब्द. माझ्या मनातली डिक्शनरी उलगडून पाहिली आणि तिच्या या प्रश्नाने मला पुन्हा एकदा धक्का बसला.
 आज बारा वर्षांनी 'फायर' च्या निमित्ताने त्या कॉफीहाऊसला दिलेली भेट...त्या मुली. सारे आठवतेय. चुकलेल्या वाटेने बरेच अंतर चालून आल्यावर धड ना मागे फिरता येतं, धड ना पुढे जाण्याचे मानसिक बळ राहतं. अशावेळी झालेला मानसिक गोंधळ चेहऱ्यावर उमटलेला. प्रश्नांचे जाळे नि अवाक् डोळे पाहून उला या कार्यकर्तीने माझा हात घट्ट धरून कानात सांगितले होते.
 'डोंन्ट गेट एक्साइटेड...' बाई गं अशी धक्का बसल्यागत त्यांच्याकडे पाहू नकोस. त्यांच्या मनात शिरून काही उलगडा झाला तर शोध !!
 आज दहा बारा वर्षानंतर पुन्हा.... 'फायर' च्या निमित्ताने.

■ ■ ■