मनतरंग/उद्याच्या पिढ्यांना ते भाग्य देणार ना आम्ही ?

विकिस्रोत कडून

  सामाजिक कामातील कृतिशील सहभाग हे एक निमित्त. पण त्यामुळे अनेक देशांतील निसर्ग, माणसे, संस्कृती पाहण्याची संधी मिळाली. या भेटीतील अनुभव सांगण्याच्या निमित्ताने एका शिक्षकांच्या प्रबोधन वर्गात बोलावले होते. नुकतीच जर्मनीला भेट देऊन आले होते. ती माझी पहिलीच परदेश यात्रा. प्रत्येक अनुभव नवा आणि माझे डोळे, कान म्हणजे अगदी आसुसून टिपणारा ब्लॉटिग पेपरच ! मला आवडलेल्या काहीशा आगळ्या अनुभवांचे मी विश्लेषण करून थांबले. इतक्यात मागून एक हात वर उंचावला. माझ्यासाठी एक प्रश्न होता.
 "मॅडम, तुम्ही जर्मनीभेटीने खूप भारावलेल्या दिसता. पण आपल्या देशाची संस्कृती त्यांच्या पेक्षा किती महान आहे! हे तुम्हाला क्षणोक्षणी जाणवले असेलच ना?"
 "होय, माझ्या मातृभूमीची आठवण मला क्षणोक्षणी होत होती. माझ्याही मनात माझ्या संस्कृतीबद्दलचा अभिमान ओतप्रोत भरला होता. पण तेथील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांनी मला गोंधळात टाकले. माझ्या नजरेला नवी दृष्टी दिली." माझे उत्तर.
 त्यांनी विचारलेले प्रश्न असे :-
 "आम्ही ऐकलंय की रुपकुँवर नावाच्या तरुण मुलीला मृत नवऱ्याबरोबर जाळून टाकले. नवरा मेला तर बायकोलाही त्याच्याबरोबर जाळतात म्हणे ! खरंय हे ? बायकोला केव्हाही नवरा घराबाहेर हाकलून लावतो, तिला मारतो, जाळतो असंही ऐकलंय खरंय हे ? छोटी छोटी मुले मजुरी करतात...शाळेत जात नाहीत. या मुलांनी मजुरी केली नाही तर त्यांना जेवण मिळत नाही..." असे प्रश्न ऐकून मला खूप वाईट वाटले. पण माझ्याजवळ उत्तरही नव्हते. एक छोटा सहावीतला मुलगा मला गंभीरपणे विचारत होता, 'गालिचा तयार करण्याच्या आणि फटाक्याच्या व्यवसायात तर आठ ते बारा वर्षांची मुलेच असतात. मला खूप वाईट वाटलं हे वाचून ! तुम्ही पण लहानपणी मजुरी केली?" हा प्रश्न ऐकून मी थक्कच झाले. "सर्वच मुले बालमजुर नसतात... थोड्या गरीब मुलांनाच काम करावे लागते वगैरे सांगत मी विषय बाजूला नेला...हे मी त्या शिक्षकाला सांगितले, पण याचे म्हणणे एकच; भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे तुम्ही पटवले की नाही त्यांना?
 मग नाइलाजाने मी प्रश्न टाकला. संस्कृती म्हणजे काय ? आपला आहार, सणवार, राहण्याची... पोशाखाची पद्धती, आपली महाकाव्ये, तत्त्वज्ञान, विचारांची धारा, आम्ही एक एक यादी करीत होतो. विविधतेतील एकात्मता वगैरे सगळे मुद्दे एकत्र केले. पण परत एक सवाल मी टाकला.
 "मग ही संस्कृती एका रात्रीत निर्माण झाली ?"
 "आपल्या पूर्वजांनी निर्माण केली" उत्तर आले.
 "किती वर्षांत निर्माण केली ?" 'घर बांधूया' असे म्हणत घर बांधतो. पण आता संस्कृती निर्माण करूया" असे म्हणत ती निर्माण करता येते का ?" माझा प्रश्न.
 "नाही" सामूहिक उत्तर.
 "अप्रियमपि सत्य:च वक्ता श्रोताच दुर्लभः । हे वचन म्हणजे अनुभवातून अकारलेले सत्य आहे. अप्रिय असलेले सत्य मान्य करणारा श्रोता दुर्मिळ आणि अप्रिय असलेले सत्य समाजासमोर मांडण्याचे धाडस करणारा वक्ताही दुर्मिळ. राम सत्यवचनी होते, श्रीकृष्णांनी निष्काम कर्मयोग सांगितला. द्रौपदी...राधा, रुक्मिणी, मीरा यांच्यावर प्रेम करीत प्रेमाच्या विविध छटा साकार केल्या. आपल्या लेकीच्या मागे कामभावनेने धावणारा ब्रह्मा आम्ही लक्षात ठेवत नाही तर निर्मितीच्या तत्त्वाचा उद्गाता ब्रह्मा आम्ही आदर्श मानतो...सत्यवचनी हरिश्चंद्र, त्याच्या सत्यवचनांना साक्षात् करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारी तारामती, असे हे अनेक आदर्श आपल्या पूर्वजांनी वागण्यातून निर्माण केले; म्हणून आज आम्ही आमची संस्कृती श्रेष्ठ! असे म्हणू शकतो. पण आणखीन दोन-चारशे वर्षांनंतर आमच्या भावी पिढ्यांना 'आमची संस्कृती श्रेष्ठ आहे' असे सांगण्याची संधी आपण देणार आहोत की नाही ? आज कोणतेही वर्तमानपत्र चाळा, त्यात स्त्रियांवरील अत्याचार, पैसा वा सत्ता यावरून होणारे खून, तरूण मुलींवर होणारी बळजबरी... त्यामुळे त्यांच्या कुटुंब प्रमुखाने वा कुटुंबानेच केलेल्या आत्महत्या, लहान बालकांना वेठीस धरून केलेला छळ... यांच्या बातम्यांनी पाने भरलेली असतात. किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या 'मोठेपणा' च्या बातम्यांनी. मुंबई म्हणजे नंबर दोन वाल्यांची नगरी ! अशी व्याख्या आज रूढ होऊ पाहते आहे.
 पूर्वी संतापुढे राजा झुकत असे, सर्वांगीण चारित्र्य हे श्रेष्ठ मानले जाई. तुकारामाना भेटण्यासाठी जाणता राजा शिवाजी महाराज वेश बदलून कीर्तन ऐकण्यास गेले. मीराबाईचे दर्शन अकबरासाख्या मोगल सम्राटाला घ्यावेसे वाटले. पण त्यासाठी वेश बदलून जावे लागले.

"जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधु ओळखावा,
देव तेथेचि जाणावा ॥"

 असे श्रद्धेने जगणाऱ्यांची परंपरा अखंडपणे या देशात होती म्हणून 'भारतीय संस्कृती' हा शब्द उच्चारताना आजही आमची मान ताठ होते. हे भाग्य उद्याच्या पिढ्यांना आम्ही देणार ना? की 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ' या ओळी नुसत्या आळवीत बसणार?

■ ■ ■