भोवरा/सत्याचा शोध

विकिस्रोत कडून




 १५
 सत्याचा शोध


 "आजच्या विज्ञानयुगात शुद्ध स्वरूपात ज्ञानसाधना होत आहे. सत्य काय आहे हे हुडकून काढताना शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसावर घासून बघतात व मगच ती ग्राह्य धरतात. सर्व व्यवहार बुद्धिप्रमाण्यावर आधारलेला आहे 'बाबावाक्यं प्रमाणम्' ही वृत्ती आता राहिलेली नाही.
 विज्ञानयुगाचे ढोलके बडवण्याच्या दोन तऱ्हा आहेत. एक प्रत्यक्ष स्तुती करून जाता जाता इतर युगांतील लोकांचा कमीपणा दर्शवायचा ही, व दुसरी प्राचीन संस्कृतीचा इतिहास लिहिता लिहिता त्या वेळचे कायदे, नीतिकल्पना, धर्म, ही सर्वच हल्लीच्या मानाने हीन दर्जाची होती म्हणून प्रतिपादन करावयाचे "मिसर (ईजिप्त), बावेरू (बाबिलॉन) वगैरे देशांचे लोक कायम भीतीच्या वातावरणात राहात असत. रोग पसरवणारी निरनिराळी दैवते, माणसाला झपाटणारी भुते, ह्यांनी सर्व सृष्टी भरलेली आहे, असे त्यांना वाटे व मानवी जीवनाचा आनंद त्यामुळे हरपून जाई" असे एक इतिहासकार लिहितो. जणू हल्लीच्या युगात कोणाला कसलीही भीती व रोग नाही! पूर्वीचे जीवन आनंदी होते किंवा नाही, हे त्यांना काय माहीत? ज्या लोकांत पूर्वीच्या समजुती आहेत त्यांचे जीवन या समजुतींमुळे जसे निरानंद दिसत नाही, तसेच पूर्वीच्या लोकांचे असणार. वैदिक काली मलेरिया घालविण्यासाठी मंत्र म्हणत असत व त्यामुळे मलेरियाचा राक्षस निघून जाई अशी कल्पना असे. मलेरियाचा राक्षस आहे का जंतू पसरविणारे डांस आहेत, ह्या ज्ञानावर आयुष्यातील आनंद अवलंबून असण्याचे कारण नाही. ज्ञानामुळे काही अवस्थांत रोगांवर नीट उपाययोजना करणे शक्य आहे; पण त्यामुळे जीवनातल्या आनंदात भर
पडलीच पाहिजे व ते निर्भय झालेच पाहिजे ही अपेक्षा मात्र चूक आहे. जगांत सर्वत्र जंतू पसरले आहेत व ते आपल्या अंगात शिरून रोगराई होईल, ह्या ज्ञानामुळे जीवनांतील गंमत नाहीशी झाल्याची अनेक उदाहरणे मी पाहिली.
 मला आठवते, एकदा एक विलायती माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन आमच्याकडे चहाला आला होता. फराळाला नाना तऱ्हेचे गोडाचे व तिखटाचे पदार्थ केले होते. बापाने एक कपभर बिनदुधाचा चहा घेतला व मुलाला दूध हवे असूनही घेऊ दिले नाही. दुधात टायफॉइडचे जंतू असतील ही भीती! माझी मुले खात होती व तो बिचारा मुलगा आशाळभूतपणे बघत होता. पण बापाने स्वतः खाल्ले नाही व मुलालाही खाऊ दिले नाही. शेवटी टेबलावरचे एक केळे मुलाला दिले व आपण एक खाल्ले. खाण्याच्या पदार्थात जंतू असतील ही भीती! केळ्याचे साल स्वतः काढले म्हणजे आतमध्ये निर्जंतुक शुभ्र पांढरे फळ असते ते खाल्ले तर अपाय होणार नाही ही कल्पना. शेवटी हा कोल्हा-करकोच्याचा पाहुणचार संपला व पाहुणे निघून गेले.
 जी गोष्ट आनंदाची तीच सत्याची. पूर्वीच्या लोकांचे सत्यशोधन व हल्लीच्या लोकांचे सत्यशोधन ह्यांत जो फरक आहे तो उपकरणांचा आहे, मनोवृत्तीचा नाही. गेल्या सहा हजार वर्षांत मानवाने जो ज्ञानाचा व द्रव्याचा संचय केला आहे, त्यामुळे सत्यशोधनाची निरनिराळी साधने उपलब्ध झाली व आता त्याचा खटाटोप व आटापिटा जास्त वाढला. पूर्वी ज्ञानाची साधने सोपी, सर्वांच्या जवळ असलेली अशी असत व म्हणून अमका म्हणाला ते खरे का खोटे, हे स्वतः पडताळून पाहण्याची शक्यता तरी होती. आता मात्र बहुसंख्य लोकांना अमका असं म्हणतो म्हणून विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही.
 अमक्या दिवशी मृगनक्षत्रातील व्याधाचा तारा सूर्याबरोबर उगवला, असे जेव्हा जगभर देशांतील ज्योतिर्विद सांगत, तेव्हा ते कितपत बरोबर आहे, ह्याचा अंदाज करणे त्या अक्षांश-रेखांशावर राहणाऱ्या इतर लोकांना स्वतः लौकर उठून बघणे शक्य असे. पण आता मृग नक्षत्रातील अमक्या ताऱ्याजवळ मोठे तेजोमेघ आहेत व त्यात आपल्या सूर्यमालेसारख्या कित्येक सूर्यमाला आहेत असे सांगतात, त्याचा प्रत्यय काय आपल्याला
येणे शक्य आहे ? जे सांगतात त्यांचा शब्द हेच ना सत्याचे प्रमाण? कोठच्या तरी बाबाचेच वाक्य शेवटी प्रमाण मानावे लागते.
 हल्लीच्या युगात शब्दप्रामाण्याला महत्त्व नाही हे म्हणण्यात अर्थ नाही. साध्या व्यवहाराचं काय पण शास्त्रीय बाबतींतसुद्धा शब्दप्रामाण्यावर विसंबून राहावे लागते व अशा वेळी माणूस विश्वास ठेवतो ते अमकी गोष्ट बुद्धीला पटते म्हणून नव्हे; तर अमक्याने सांगितली म्हणून.
 गौरी आम्हांला गोष्ट सांगत होती : "त्या लहानग्या कुत्र्याने छोट्या जॉनच्या हाताला बांधलेली दोरी कुरतडून टाकली व त्याची सुटका केली मग जॉन कुत्र्याच्या पाठीवर बसून भरधाव पळत सुटला व चोराच्या गुहेपासून दूर गेला…" ही घटना ऐकल्याबरोबर आम्ही सर्वांनी एकच गिल्ला केला. "गौरे, काहीतरी सांगू नकोस. सहा महिन्यांचं लहानसं कुत्रं आठ वर्षांचं मूल पाठीवर घेऊन कधी पळू शकणार नाही." गौरी आमचे ऐकेना, तेव्हा तिला वेड्यात काढून आम्ही मोकळे झालो. सर्वांनी गौरीपुढे बुद्धीची फुशारकी मारली तरी या हकीकतीवरून एवढेच दिसते की, आम्ही गौरीच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हतो. एखाद्या लठ्ठ इंग्रजी पुस्तकात जर कोणी लिहिले असते की अमक्या देशातली कुत्री इतकी मोठी व बावळट असतात की तेथे ती घोड्याप्रमाणे माणसाच्या बसण्यासाठी उपयोगी पडतात, तर आम्ही खचित त्यावर विश्वास ठेवला असता!
 गौरी बागेतून पळत पळत येऊन सांगू लागली असती की, "अरे दादा, मी आत्ता एक बेडूक पाहिला, तो सापाला खात होता." तर कॉलेजात जाणाऱ्या तिच्या दादाने तिच्यावर कदापि विश्वास ठेवला नसता. पण तोच दादा प्राण्यांविषयी नवीनच प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकातील सापाला खाणाऱ्या बेडकांविषयीचे वर्णन घरातील प्रत्येकाला वाचून दाखवीत आहे. बेडूक हा प्राणी सापाला खाणे शक्य आहे का, असा मूलगामी प्रश्न तो स्वतःला विचारतच नाही. तसा प्रश्न विचारण्याची पात्रता अजून त्याला आली नाही. त्याचे सृष्टीविषयक ज्ञान आज तरी बव्हंशी त्याचे शिक्षक, आईवडील व पुस्तके ह्या आप्तांच्या शिकवण्यावर आधारलेले आहे. कसल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा ह्याबद्दल तो विचार करीत नाही, तर कोणावर विश्वास ठेवायचा, ह्याबद्दलच त्याने विचार केला आहे.
 फक्त लहान मुले व साधारण माणसे ह्यांचाच व्यवहार शब्द-
प्रामाण्यावर बालतो असे नव्हे; तर मी मी म्हणणारे शास्त्रज्ञही आप्तवाक्याच्या आहारी कसे जातात, हे पाहण्यासारखे आहे.
 इंग्लंडमध्ये १९०८ साली डॉसन नावाचा एक प्रतिष्ठित गृहस्थ फिरावयास जात असता रस्त्याची खोदाई चालली होती, तेथे गेला. तेथे काही हाडे व माणसाची एक कवटी सापडली असे कळल्यावर तो खाली उतरला. माणसाची कवटी अति पुराणकालीन आहे, हे ओळखून त्याने कवटी व इतर हाडे उचलून आणली व त्यांचे वर्णन प्रसिद्ध केले. प्राण्यांची हाडे, सुमारे दोन अडीच लाख वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये असले प्राणी राहत असत, त्यांची होती. माणसाची कवटी त्यांच्या समकालीन म्हणून तितकीच जुनी, म्हणून ह्या हाडांचे महत्त्व. अतिशय विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कवटीबरोबरच एक खालच्या जबड्याचे हाडही सापडले होते व ते त्या कवटीबरोबरचेच असे डॉसनचे म्हणणे होते. जबड्याचे हाड माणसाच्या जबड्यासारखे नसून आधुनिक वानराच्या जबड्यासारखे आहे असे कित्येक प्राणीशास्त्रज्ञांचे मत पडले. पण इतर प्राण्यांच्या हाडांचे जे अवशेष होते, त्यांत वानराची हाडे मुळीच नव्हती व ते हाड त्या कवटीचेच असले पाहिजे, असे दुसरे शास्त्रज्ञ म्हणत. त्या कवटीवर व जबड्यांवर कित्येक ग्रंथ झाले. त्यावरून प्राचीन मानव कसा दिसत असेल, ह्याची कितीतरी चित्रे प्रसिद्ध झाली. त्या कवटीची व जबड्याची मोजमापे झाली व अडीच लाख वर्षांपूर्वी मानवाचे डोके सध्याच्या मानवाच्या डोक्याएवढे मोठे व आकृतीनेही सध्याच्या मानवाच्या डोक्यासारखेच होते व जबडा मात्र वानराच्या जबड्यासारखा होता, असा सिद्धांत प्रस्थापित झाला. ह्या सिद्धान्ताविरुद्ध लिहिणारे एक दोन शास्त्रज्ञ होते, पण त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ह्या पुराणमानवाचे "एओ ॲन्थोपस डॉसोनी" (डॉसनने शोधलेला मानवाच्या प्रभावळीचा मनुष्य) असे अगडबंब लॅटिन नामकरण झाले व जगात जेथे जेथे मानवशास्त्र शिकवीत, त्या त्या सर्व संस्थांतून विद्यार्थ्यांना ह्या मानवाची वर्णने पाठ करावी लागली.
 १९५१-५२ साली पुराणकालीन हाडांचा जुनेपणा ठरवण्याची एक नवीन रासायनिक रीत एका शास्त्रज्ञाने शोधून काढली व ती रीत सर्व तऱ्हेच्या हाडांबाबत लागू पडते का, हे पाहण्यासाठी ब्रिटनमधल्या म्युझिअममध्ये असलेल्या प्राण्यांच्या व माणसांच्या हाडांवर प्रयोग करण्याचे
ठरले. अर्थातच डॉसनला सापडलेल्या हाडांचेही परीक्षण झाले व त्यावरून असे ठरले की, इतर प्राण्यांची हाडे २-२॥ लाख वर्षांपूर्वीची, कवटी सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची आणि जबड्याचे हाड जेमतेम १००० वर्षांपूर्वीचे आहे ! ह्या विलक्षण कालनिर्णयामुळे जबड्याच्या हाडाचे पुन्हा एकदा सूक्ष्म निरीक्षण सुरू झाले. ह्या निरीक्षणात असे आढळून आले की, जबड्याचे हाड खरोखरीच एका आधुनिक वानराचे आहे. त्याचा काही भाग मोठ्या खुबीने कापून व काही दात युक्तीने तोडून तो माणसाच्या जबड्यासारखा थोडा दिसावा म्हणून प्रयत्न केला होता. तसेच एका रसायनात बुडवून ठेवून त्याला जुन्या हाडांचा असतो तसा रंग दिला होता. म्हणजे डॉसन व त्याचा सहकारी ह्यांनी बुद्धिपुरस्सर सर्व जगाची फसवणूक केली होती!
 ह्या सर्व प्रकारात आंधळेपणाने डॉसनवर विश्वास ठेवला म्हणून शास्त्रज्ञांना दोष देता येत नाही. मानवाच्याच काय पण इतर प्राण्यांच्या उत्क्रांतीचेही शास्त्र नवे आहे. जसजशी निरनिराळी हाडे सापडत आहेत. तसतसे ज्ञान वाढत आहे. धड माणूस नाही, धड वानर नाही अशा कोणत्या तरी प्राणिजातीपासून एक वानरांची व एक माणसांची अशा शाखा निघाल्या, असा सिद्धान्त आहे. ह्या उत्क्रांतीत कोठच्या तरी एका काळी माणसाचा जबडा सर्वस्वी हल्लीच्या वानरासारखा व कवटी मात्र बरीचशी आधुनिक माणसासारखी नसणारच, असे काही खात्रीने सांगता येईना. बरे, डॉसनसारखा प्रतिष्ठित माणूस फसवीत असेल, अशी शंकाला कोणाला नव्हती. तेव्हा शास्त्रज्ञ पाहता पाहता फसले गेले तर नवल नाही.
 काही शास्त्रांत प्रयोग करणे शक्य असते; व प्रत्यक्ष पडताळून दुसरा सांगतो ते खरे का खोटे, हे ठरवता येते. पण अशा शास्त्रांतही पारंगत होण्यास अर्धे आयुष्य गुरुजनांचे वाक्य प्रमाण मानून ते सांगतील त्या मार्गाने जावे लागते व अशी उपासना केल्यावर स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त होतो. काही वेळा लोकांच्या सांगण्यावरच विश्वास ठेवावा लागतो. मूळ गोष्ट इतरांना पहावयास मिळत नाही. रूक पक्ष्याची गाेष्ट अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टीत सगळ्यांनी वाचलेली आहे. रुक पक्ष्यासारखा प्रचंड पक्षी असेल असे कोणास खरेही वाटत नसे. पण अशा पक्ष्यांची अंडी व सांगाडे आफ्रिका खंडात सापडले. व माणसाला पेलून नेण्याइतके मोठे पक्षी पृथ्वीवर होते- ते गेल्या काही शतकांतच नाहीसे
झाले असे सिद्ध झाले. आता त्या पक्ष्याचा उपयोग कोणी रत्ने वेचण्यासाठी करीत असे, ही गोष्ट कल्पनेतील का खरी हे समजण्यास मात्र सध्या काही साधन नाही.
 दुसऱ्या महायुद्धापूर्वी चीनमधे पेकिंगजवळ फार मोठे उत्खनन झाले; व त्यात पुराणकालीन मानवाच्या काही कवट्या व सांगडे सापडले. या कवट्यांचे फोटो व मापे पण घेतलेली आहेत. ते दिवस फार धामधुमीचे होते. जपानची चीनवर स्वारी झालेली होती व हळूहळू जपानी फौजा पेकिंगजवळ पोचत होत्या. शेवटी पेकिंग जपान्यांच्या ताब्यात जाण्याच्या आत घाई करून सर्व हाडे काळजीपूर्वक खोक्यात भरली व खोके बंद करून, काही अमेरिकन ऑफिसर परत चालले होते, त्यांच्याबरोबर दिले. ही गाडी वाटेत जपानी सैन्याने अडवली व सर्व अमेरिकनांना कैदेत घातले. हाडांनी भरलेले खोके मात्र ह्या धावपळीत नाहीसे झाले. जपान्यांनी नेले म्हणावे तर ते कानांवर हात ठेवतात. अमेरिकनांनी शोध केला. युद्धानंतर टोकियोतही शोध घेतला. पण ते सापडत नाही व इकडे चीन व रशिया म्हणत आहेत की हा अमोल ठेवा अमेरिकेनेच चोरून दडवून ठेवला म्हणून ! ह्या सगळ्या भानगडीत मानवेतिहासाचे एक साधन मात्र कायमचे नाहीसे झाले; व हाडांचे फोटो व मापे ह्यांवरच आता अवलंबून राहावे लागले. पेकिंगजवळ जेथे जुने उत्खनन झाले, तेथे आणखी खणल्यास तसेच सांगाडे सापडण्याचा संभव मात्र आहे.
 पुरावाच नाहीसा झाल्यामुळे आप्तवाक्यावर कसे विसंबावे लागते ह्याचे आपल्याकडील उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरीची राजवाडे संशोधित प्रत हे होय. राजवाड्यांना ज्ञानेश्वरीचे एक जुने हस्तलिखित मिळाले व त्यावरून त्यांनी एक ज्ञानेश्वरीची प्रत छापली. ह्या छापील प्रतीत त्यांनी आपल्या मते काही सुधारणाही केल्या. राजवाड्यांनी केलेले फेरफार काय व मूळ प्रत कशी आहे, हे पाहण्याची इच्छा अर्थातच पुष्कळांना होती. काही टीकाकारांनी राजवाड्यांना सापडलेली प्रत तितकी जुनी नसावी, असाही अभिप्राय व्यक्त केला. त्या प्रतीनंतर इतरही हस्तलिखिते मिळाली; व त्या सर्वांचा तुलनात्मक अभ्यास करणे अवश्य झाले. पण राजवाड्यांनी संशोधिलेले हस्तलिखित आज नाहीसे झालेले आहे. कोणी म्हणतात, राजवाड्यांनी टीकाकारांवर रागावून ते जाळून टाकले! मूळ पुरावाच
नाहीसा झाल्यावर आता त्या प्रतीबद्दल काही बोलणे म्हणजे राजवाड्यांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा, हाच वादाचा मुद्दा होऊन बसला आहे.
 तसे पाहिले तर प्रत्यक्ष प्रमाण व आप्तवाक्य ही काही एकमेकांविरुद्ध नाहीत; तर पूरक आहेत. प्रत्येक सत्यशोधकाची बुद्धी शुद्ध असेल तर तो सत्यशोधन करण्यास लायक ठरतो व शुद्ध बुद्धीचाच मनुष्य आप्त होऊ शकतो. काही संशोधन तर बरेचसे आप्तवाक्यावरच अवलंबून असते. एखाद्या प्रदेशातील पावसाची सरासरी काढावयाची असेल तर काही विशिष्ट ठिकाणी पाऊस मोजण्याची यंत्रे ठेवलेली असतात. रोज एका विशिष्ट वेळेला बाटलीत किती पाऊस पडला हे पाहून त्याची रोजच्या रोज नोंद करावयाची असते. दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी ही टिपणे मुख्य कचेरीत पाठवावयाची असतात; व तेथे ठिकठिकाणी पडलेल्या रोजच्या पावसाची सरासरी काढून दर महिन्याची किंवा वर्षाची सरासरी काढायची, असा प्रघात आहे. एकच माणूस एका मोठ्या प्रदेशातील सर्व ठिकाणे रोजच्या रोज ठराविक वेळा तपासणे शक्य नाही; म्हणून दर ठिकाणी हे काम निरनिराळ्या माणसांवर सोपवलेले आहे. ह्यांपैकी एखाद्या माणसाने जरी खोटे कागद भरून दिले, तरी सबंध काम फुकट जाणे शक्य आहे. एका गावात असाच एक पाऊस टिपणारा मनुष्य होता. एका वरच्या कचेरीतून अनपेक्षितपणे एक तपासनीस त्या गावी आला. पाहतो तो नेमलेला मनुष्य जाग्यावर नाही. पण तक्ता मात्र सबंध पुढील आठवड्याचा भरून ठेवून पाकिटात घालून ठराविक तारखेला पोस्टात टाकण्यासाठी पोस्टमास्तरजवळ दिलेला!
 सध्याच्या शास्त्रीय युगात किती तरी संशोधन मुळी आप्तवाक्याच्या पायावरच उभे आहे. म्हणून प्रत्यक्ष आणि आप्तवाक्य ही निरनिराळी स्वतंत्र प्रमाणे न मानता पूरक प्रमाणे मानावी लागतात. प्रत्यक्ष दिसते तेही आभासमय असते व कोणते प्रत्यक्ष खरे व कोणते खोटे हे ठरविण्याला परत निरनिराळी प्रमाणे लागतात, त्याचप्रमाणे आप्तवाक्याचे आहे.
 समाजातील प्रतिष्ठित अधिकारी व्यक्तीचे म्हणणे विचार न करता खरे मानण्याची प्रवृत्ती असते. लहान मुले आणि लहान माणसे ह्यांना मात्र अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा खऱ्या म्हणून लोकांना पटवायच्या म्हणजे पंचाईत पडते.
 लहानगा धनू मला म्हणत होता, "आत्याबाई, माझ्या वहीत एक वाक्य लिहून तुमची सही द्या." "कशाला रे बाबा?" "त्याचं असं आहे," धनू सांगू लागला, "मी माझ्या मित्रांना सांगितलं की तुम्ही माझ्या आत्याबाई आहात तर ते म्हणत, 'छट. तू बाता मारतो आहेस.' आता तुम्ही ह्या वहीत सही दिलीत तर त्यांना पटेल की तुम्ही माझ्या आत्याबाई म्हणून" "पण धनू, काल मी जवळजवळ पन्नास मुलांना माझी सही दिली; म्हणून काय मी त्यांची सगळ्यांची आत्याबाई होईन होय? हवं असलं तर मी असे लिहिते, की हा वेडा धनू माझा भाचा आहे व खाली सही करते; म्हणजे तुझ्या मित्रांची खात्री होईल, की मी तुझी आत्याबाई म्हणून!" पण सत्य शाबीत करण्याचा हा मार्ग धनूला पसंत पडेना व दुसरे तर काही सुचेना. बिचारा गप्प बसला.
 आम्ही जेवायला बसलो होतो. मुलांच्या आवडीची ताज्या वाटाण्याची उसळ होती. गौरी तोंड वाईट करून उसळ 'चिवडीत' म्हणाली, "उसळीला तार आली आहे." मी गरजले, "हा फाजीलपणा मला खपायचा नाही. नको असली तर मला दे. म्हणे, ताज्या उसळीला तार आली आहे." तिने मुकाट्याने उसळ माझ्या पानात घातली. "काय शिळी आहे का आंबली आहे, का आहे तरी काय?" माझं आपलं पुटपुटणं चालूच होतं. मी उसळ खाण्यासाठी घास उचलला, तर काय! खरोखरीच उसळीला तार येत होती! गौरी खुदकन हसली. "उसळीला तार आली आहे ग. कशानं बुळबुळीत झाली बघ बरं." असं मामंजी म्हणाले असते, म्हणजे मी ताबडतोब काही न बोलता कशी झाली आहे ते पाहिलं असतं व चौकशीअंती उसळीत भेंडी गेल्याचे निष्पन्न झाले असते. पण गौरीवर विश्वास ठेवायलाच मी तयार नव्हते. मनुष्य सांगते आहे ते खरे असण्याचा संभव आहे का, असा विचारच मी केला नाही. कोण सांगते आहे इकडेच माझे लक्ष होते.
 जर्मनीचा फ्रेडरिक द् ग्रेट म्हणून एक राजा होता. त्याच्या पदरी पुष्कळ शास्त्रज्ञ होते. एकदा फ्रेडरिक निरनिराळ्या शास्त्रज्ञांबरोबर आपल्या बागेत हिंडत होता. बागेत शोभेसाठी वेगवेगळ्या रंगांचे काचेचे गोळे रंगीत काठ्यांवरून लावले होते. एका गोळ्याजवळ फ्रेडरिक उभा होता. त्याने शास्त्रज्ञांना हाक मारली व एक चमत्कार दाखवला. त्या गोळ्यांची जी बाजू सूर्याच्या उन्हाकडे होती ती थंड होती, व सावलीतली बाजू तापली होती. असे का व्हावे? एक आठवडाभर ह्या विषयाची चर्चा
झाली. निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी ह्या प्रकारची उपपत्ति लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी फ्रेडरिकने सांगितले की, "अहो, तुम्हांला हाक मारायच्या आधी मीच तो गोळा फिरवला होता, व उष्ण बाजू सावलीकडे व थंड बाजू उन्हाकडे केली होती."
 हा आप्तवाक्याचा महिमा पूर्वी होता; आणि आता नाही, असे मुळीच नाही.
 सत्यशोधनाची उपकरणे जशी वाढली तशी सत्य लपवण्याची साधनेही वाढली. सत्याचा पडताळा प्रत्येकाला पाहता येत नसल्यामुळे कोणाच्या ना कोणाच्या तरी शब्दावर भरवसा ठेवणे सध्या भाग पडते. पूर्वीचा व्यवहार बहुतांशी आपल्या भोवतालच्या, आटोक्यातल्या जगाशीच होता. आताचा व्यवहार जगड्व्याळ, सर्व जगाचा कानाकोपरा व्यापून राहिला आहे व त्या व्यवहाराचे आपले ज्ञान लिहिलेल्या किंवा बोललेल्या शब्दाच्या द्वाराच होते. सकाळी उठल्यापासून निजेपर्यंत निरनिराळ्या लोकांचे शब्द कानांत घुमत असतात; किंवा डोळ्यांपुढे नाचत असतात. निरनिराळे विक्रेते आपला माल आणि आपली मते आकर्षक रीतीने मांडून खपवण्याचा प्रयत्न करीत असतात. नेसायला पंचवीस तऱ्हेची लुगडी, खायला निरनिराळ्या तऱ्हेची मिष्टान्ने, प्रकृती बिघडल्यास निरनिराळी औषधे, आपण स्वतः मेल्यास मुलांबाळांची सोय करणाऱ्या निरनिराळ्या विमा कंपन्या. निरनिराळी धार्मिक मते, एका बाजूने अमेरिकेचा आवाज तर दुसरीकडे रशियाचा प्रचार, ह्या शब्दब्रह्माच्या अफाट घोटाळ्यात खरे काय व खोटे काय; कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर नाही, हे कळणे साधारण मनुष्याला शक्य आहे का? शेवटी कोणाला तरी आप्त मानून त्याचे म्हणणे खरे असेच बहुतेक लोक मानतात. व्यवहारात संशयात्म वृत्ती ठेवून भागत नाही. त्यामुळे कुठल्या तरी एका बाजूने निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय सत्यासत्याची छाननी करून घेतलेला नाही, आप्तवाक्यावर विश्वासून घेतलेला आहे, इतकी कबुली देण्याइतपत सत्याची चाड बहुतेकांना नसते. एका बाजूने बुद्धिवादाचा डंका वाजवून दुसऱ्या बाजूने न पारखलेल्या मतांचा स्वीकार करताना त्या मतांबद्दल नसता अहंकार उत्पन्न होतो व परमताबद्दल असूया व द्वेष पण बळावतो. म्हणून हल्लीचे लेखन व भाषण केवळ आपल्या मालाची जाहिरात करून राहात नाही; तर इतरांबद्दल द्वेषही भडकवण्यास कमी करीत नाही.
 शास्त्रीय शोध लागले, सृष्टीच्या काही अंगांचे ज्ञान झाले म्हणून त्याच्या जोरावर पूर्वीच्या लोकांना हसणे म्हणजे लक्तरे गुंडाळणाऱ्याने नागड्याला हसण्यासारखे आहे. काही सत्ये हाती आली म्हणून सत्य-शोधकाला लागणारी बुद्धी आपण आत्मसात् केली, असे मुळीच नाही. सत्तेच्या लोभाने, द्वेषाने, अहंभावाने मानवी मने इतकी गढूळ झाली आहेत की सर्व सत्य एखाद्याला उमजणे शक्यच नाही ही साधी गोष्टही त्यांना समजत नाही. मला समजले नाही, माझे चुकत असेल असे वाटण्याची ज्ञानाची पहिली पायरीही ज्यांनी ओलांडली नाही, ते माझे तेच सत्य असे कंठरवाने म्हणणारच. एवढेच म्हणून ते थांबते तरी पुष्कळ होते, पण त्याचबरोबर इतरांचे खोटे, हा सिद्धान्त आपोआपच येतो व इतरांचे म्हणणे सर्वथैव दडपून टाकण्याचे सर्व उपाय योजण्यात येतात. ह्या खटाटोपात सत्याचा शोध तर होत नाहीच, पण आत्मनाश व समाजाचा नाश मात्र होतो.
 आप्तवाक्यावर विसंबून राहिल्यानेच सत्य समजण्यास अडचण पडते असे नाही. प्रत्यक्ष प्रत्येकाचे डोळे, कान, जीभ व त्वचा एकच गोष्ट निरनिराळ्या तऱ्हेने बघत असतात, ऐकत असतात; चवीने अनुभवीत असतात व स्पर्शाने जाणत असतात. एकच सामाजिक घटना निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या तऱ्हेने प्रतीत होत असते. सिंहगडावरून मेण्यात बसून एकजण उतरत होता व एकजण गड चढत होता. अर्ध्यावर दोन्ही मेण्यांची गाठ पडली तेव्हा उतरणारा माणूस "काय उकडतं आहे", म्हणून अंगावरील पांघरूण दूर करीत होता; तर चढणारा माणूस "काय थंडी लागते आहे", म्हणून शाल गुंडाळून घेत होता. ही गोष्ट सर्वांनी लहानपणी वाचलेलीच आहे. लहान मुले आवळे, कैऱ्या, चिंचा खात असतात. त्यांना विचारले की 'आंबट आहे का?' तर ती म्हणतात 'छे! छे! गाभुळलेल्या आहेत, खा ना' पण मोठ्यांना त्या तोंडात घालवत नाहीत. मुलाला घर सुखाचे वाटत असेल; पण त्याच्या बायकोला खाष्ट सासूच्या हाती वागावे लागत असेल, तर तेच घर दुःसह होईल. सत्य शोधताना निरनिराळ्या माणसांना तीच गोष्ट निराळी भासते, ही गोष्ट झाली मानवी जगातील सत्याबद्दलची. मग अंतिम सत्य शोधताना फक्त माणसाच्याच दृष्टीने जा पाह्यचं, का इतरांच्याही?
 बागेत हिंडताना हिरवी पाने, तांबडी, पांढरी, पिवळी फुले, निळे
आकाश, अशा रंगमय सृष्टीत मी रमते. माझ्याबरोबर त्याच बागेत मधमाश्या मध गोळा करीत हिंडतात. त्यांची सृष्टी पण रंगमयच आहे, पण मला जे तांबडे दिसते ते त्यांना बिनरंगी दिसते, मला जे पांढरे दिसते ते त्यांना हिरवट पिवळे व निळसर दिसते. मला निळे दिसते ते त्यांना पांढुरके दिसते व मला न दिसणारे काही रंग त्यांना दृष्टिगोचर होतात. प्रकाशलहरींतील काही भाग माझ्या डोळ्यांना दिसतो, काही मधमाशीला दिसतो व त्याचा परिणाम म्हणजे माझी व तिची सृष्टी अगदी निराळी असते. ह्यातली सत्य कोणती?
 जी गोष्ट प्रकाशलहरींची तीच ध्वनिलहरींची. माझ्या कानांना ऐकू न येणाऱ्या ध्वनिलहरी इतर प्राण्यांना ऐकू येतात. कुत्रा ज्या गंधमय विश्वात वावरत असतो, त्यातील एक-शतांश गंध आपल्या नाकाला ओळखू येत नाही.
 शिवाय मला जी ज्ञानेंद्रिये आहेत, त्यांशिवाय इतरही ज्ञानेद्रिय जीवसृष्टीत आहेत व ती त्या त्या प्राण्यांना सृष्टीचे मला अज्ञात व अज्ञय असे एक निराळेच अद्भुत दर्शन घडवीत असतील. अशा अनंत रूपाताल अमकेच रूप सत्य असे म्हणता येईल का? अगदी हाच विचार जुन्या कवींच्याही मनात आला आला असला पाहिजे. मनुष्याला सर्व सत्य सापडणे व कळणे शक्यच नाही; मग ते कोणाला कळेल? सत्य स्वरूप ब्रह्माचे वर्णन म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. "विश्वतः चक्षु: उत विश्वतो मुखो विश्वताे बाहुः उत विश्वतस्मात्।" असे हे भव्य वर्णन आहे. जो सर्वांच्या डोळ्यांनी पाहतो, सर्वांच्या अवयवांनी क्रिया करतो, तोच सर्व सत्यमय आहे. ताे मुंगीच्या चिमुकल्या पायाने व राक्षसाच्या मोठ्या पायाने चालताे. माणसाच्या व मधमाशीच्याही डोळ्यांनी पाहतो. पायदळी चिरडल्या जाणाऱ्या मुंगीचे दुःख व हिरोशिमामध्ये मेलेल्या हजारो मानवांचे दुःख दोन्ही त्याला होतात. अशाच कोणाला सत्य- अंतिम सत्य प्रतीत होणार. इतर सर्वांचे- शास्त्रज्ञांचे असो, राजकारणी पुरुषांचे असो वा लहान मुलांचे असो-सत्य नेहमी अपुरे, एकांगी व सापेक्षच राहणार.

१९५४
*