भोवरा/भटके

विकिस्रोत कडून




 १७
 भटके


 घर अगदी निःशब्द होते. जिन्यावर कुणाची पावले धाड धाड वाजत नव्हती, माडीवर कुणाची हालचाल ऐकू येत नव्हती, वर्तमानपत्राची खसखस नव्हती की टाइपरायटरचे टक् टक् नव्हते. मी माझ्या आवडत्या हिरव्या खोलीत पडले होते… भिंतीवरच्या फोटोकडे पाहात. पोरगा हजार मैलांवर गेलेला.. तो कसला इतक्यात दिसणार? केवढे अंतर आहे ! पण ह्या अंतरापेक्षाही आता मोठे अंतर पडले आहे- एका पिढीचे, एका जन्माचे. इतके दिवस हे त्याचे घर होते- आता तो दुसरे घर करणार. पोरीसारखाच. ती नाही का जवळ असून दूरच? मीच नाही का तिला दूर केले? अगदी मोठा समारंभ करून? आता का कुरकूर? ती दोघे काही कारणाने गेली, पण बाकीच्यांना काही तसे कारण नव्हते. एकाला कंटाळा आला म्हणून- एक प्रवासाला म्हणून- पण बाहेर जायला कारण कशाला !
 "कित्येक जिप्सी ह्या घरात अगदी उघडपणे वावरतात.
 काही मला आई म्हणतात, एकजण मला बायको म्हणतो.
 जमतात, हसतात. हसवतात. निघून जातात, नि रडवतात.
 परत जमतील, परत हसवतील, परत जातील, परत रडवतील.
 माझ्या घराच्या थडग्यात मला गाडून जातील.
 सोबतीला आठवणींचा पाचोळा नि प्रतीक्षेची हुरहूर.
 ह्या भटक्यांना जखडून कसं टाकू ?
 कोणत्या दाव्यानं बांधून ठेवू?
 गायी म्हशी, उंटघोडे, शेळ्यामेंढ्या, अगदी हत्तीसुद्धा बांधून घातले.
 पण ह्यांना नाही बांधता येत.
 जगाच्या सुरुवातीपासून प्रत्येकीनं शिकस्त केली.
 घरं सजवली, ऊब केली, न्हाऊ घातलं, खाऊ घातलं;
 उंबरठे केले, कवाडं मिटली, कुलपं लावली;
 तरी एक दिवस सारे दरवाजे उघडून,
 सारे उंबरठे ओलांडून,
 ते निघून जातात.
 आणि सगळ्याजणी, अगदी एकट्या
 आपल्या सजवलेल्या घराच्या पिरामिडमधे
 नाईलच्या हिरव्या पाण्याशेजारी
 जिवंतपणी मरून पडतात. "
 मी रागारागाने उठले. पाडगावकरांच्या दरोबस्त सगळ्या जिप्सी, मनात खोल दडलेल्या होत्या त्यांना ओढून बाहेर काढले, त्यांच्या मुंड्या मुरगळल्या, एक खड्डा खणला आणि खरोखर त्यांना अगदी खोल खोल गाडून टाकले.
 घर भरलेले होते. खायच्या वेळी जेवणघरात गर्दी होत होती. किती खायचे केले तरी कधीच संपून जात होतं. नातींच्या रडण्याओरड्याने घर दणाणून जाई; तर त्याच्या आईवडिलांच्या न संपणाऱ्या वादविवादाने डोके दुखू लागे. गेला आठवडा ज्या घरात एक शब्दसुद्धा ऐकू येत नव्हता; तिथे आज निवांतपणे बसायला खोली नाहीशी झाली होती. माझी चिलीपिली माझ्या भोवती भोवती होती.
 दुसरा दिवस धांदलीचा उजाडला. सर्वजण परत गावी जाणार होती. धाकटी पण ताईबरोबर जाणार म्हणाली. बांधबांध चालली होती. मी मदत करीत होते- त्यांच्या धांदलीत, गडबडीत जाण्याचा क्षण जवळ आला आहे हे विसरण्याचा प्रयत्न करीत होते- पण शेवटी तो आलाच.
 "आम्ही जातो हं." जातो हं." जाते हं." सगळीजणे गेली… परत आपले माझे घर अन् मी.
 संध्याकाळी स्वारी आली; आणि मग माझ्या सुजलेल्या डोळ्यांकडे पाहून चौकशी सुरू झाली. चौकशी बारीक आणि त्यावरचा निकाल सरळ न्यायाच्या तराजूने तोललेला.
 " का रडलीस ? पोरी मनाला लागेल असं काही बोलल्या का?"
 "नाही रे. त्या गेल्या म्हणून एकटं वाटलं. निदान धाकटीनं तरी जायला नको होतं."
 "ते का ? सुटीत एकटी घरी राहून तिला कंटाळा आला. तिच्या बरोबरच कोणी नाही. गेली ताईबरोबर "
 धड उत्तर सुचेना. म्हणणे बिनतोड होते. पण मग आठवण झाली. "सुटी झाल्यापासून काडीचं वाचन नाही की अभ्यास नाही. नुसती उनाडते आहे. घरी राहून थोड वाचन झालं असतं." पण हा साळसूदपणा उपयोगी पडला नाही. लगेच उत्तर मिळाले.
 "बी.ए.ची परीक्षा झाली तेव्हा तू नाही का सबंध सुटी पोहण्यात न् टेनिस खेळण्यात घालविलीस? तेव्हा किती वाचलं होतंस सुटीत ? जा, जाऊन नीज. उगीच काही तरी वेड घेऊन बसतेस."
 "ही-ही-ही-ही-खी-खी-खी खी ! कशी जिरली! कशी जिरली!" मी दचकून पाहिले, मघाशी मुंड्या मुरगळून मारून टाकलेले सगळे जिप्सी परत आले होते. माझ्याभोवती नाचत होते. दात विचकून हसत होते.
 भितीवर आईचा नि सासूबाईंचा फोटो समोरासमोर लावलेले होते. भावजी हजारो मैलांवर नोकरीला होते. ते आले म्हणजे सासूबाईंचा आनंद- ते जाऊ लागले की सासूबाईंची होणारी तडफड आठवली. आता जाऊबाईंचे मन मुले लांब गेली म्हणून तसेच तडफडते.
 मी कपाळाला हात लावला. पंढरपूरला विठोबाच्या पायांवर डोके ठेवले, तेव्हा त्याचे पाषाणाचे गार गार पाय कपाळाला लागले. तो स्पर्श आठवला. बायका पंढरपूरला का जातात? घरातले सगळे भटके लांब जातात पण विठोबा मात्र न हालता, न चालता शतकानुशतके तेथेच उभा आहे. जन्मभर भटकणाऱ्या, कोणाच्या हाती न सापडणाऱ्या कृष्णाला येथे दोन विटांवर डांबून ठेवले आहे. सगळ्यांचे सैरावैरा धावणारे जीव, प्रिय जनांचा निरंतर, न संपणारा पाठलाग या दोन पायांशी स्थिरावतो. एकेक दैवत एकेका इच्छेच्या पूर्तीसाठी निर्माण झालेले असते ना? मग विठोबाचे अठ्ठावीस युगे खडे राहिलेले ध्यान खात्रीने त्या पिरामिडमधल्या बायांनी निर्माण केलेले असणार…
 बायांनीच काय म्हणून ? पुरुषच फक्त भटके असतात ? तू त्यांतलीच. आईच्या डोळ्यांकडे पाहिले. ती काही रागाने पाहात नव्हती; पण चित्रात
ती थोडी गंभीरच दिसत होती. मला एक प्रसंग आठवला-एक संभाषण आठवले. पुण्याच्या शाळेतून मी मोठ्या आनंदाने घरी जायला निघाले होते. प्रवासाचा प्रत्येक क्षण नवं नवं पाहण्यात गेला होता. दिवसा खिडकीजवळ बसून पळणाऱ्या सृष्टीचा चित्रपट पाहायचा, रात्री जुन्या काळच्या दुसऱ्या वर्गाच्या प्रशस्त बाकावर, आगगाडीच्या चाकांचा मधुर खडखडाट ऐकत, डब्याच्या मजेदार हालण्याबरोबर हालत अधूनमधून जागं होत झोपी जायचं. हा प्रवास झाल्यावर तीन दिवस बोट, मग रंगूनमधले दोन स्वप्नमय दिवस. मग परत आगगाडी.
 आगगाडी सागाच्या जंगलातून जात होती. मोठ्या मोठ्या पानांच्या सरळसोट झाडांची भिंत होती. कुजलेल्या पाचोळ्याचा वास येत होता. खिडकीबाहेर पाहावेसे वाटेना, इतकी कंटाळवाणी वाटली ती झाडी. पण मग गाडी रानाबाहेर आली व आम्ही एकदाचे मिंजानला पोचलो. घरी आई व अजूनपर्यंत न पाहिलेला एक गोड गोड भाऊ! केवढा मोठा दुमजली प्रशस्त बंगला. पूर आला म्हणजे वरच्या मजल्यावरून इरावतीचे पाणी दिसत असे. पण मला नवल वाटे ते निराळेच. ह्या बंगल्याला कुठे दगडविटांचा स्पर्श नव्हता. सारे काम लाकडाचे व बांबूंचे, लाकडाचे उंच खांब, लाकडी आडव्या तुळया, वर लाकडी कैच्या व त्यांवर लाकडी कौले होती. जमीन लाकडाची तर भिंती होत्या दुहेरी चटयांच्या. जोराचे वादळ आले की भिंती आतबाहेर व्हायच्या व अधूनमधून होणाऱ्या धरणीकंपात संबंध घर हाले पण मोडत नसे. लहानपणी पाहिलेल्या पण मध्ये पुण्याच्या शाळेत विसर पडलेल्या ह्या जगाची परत नव्याने ओळख करून घेताना मी अगदी आनंदात बुडून गेले होते. पण हळूहळू मला कंटाळा येऊ लागला. माझ्या बरोबरीचे, माझे खेळगडी असलेले दोघे भाऊ हिंदुस्थानात होते. नवा भाऊ छान खरा पण भारीच लहान. मला परत हुजूरपागेची आठवण होऊ लागली. वर्गातील मुली परत भेटाव्या म्हणून उत्सुकता लागली. मी बाबांना विचारले,
 "परत शाळेत कधी जायचं?" तर ते म्हणाले, "अशी काय लौकर लौकर रजा मिळते वाटतं? जाऊ दोन तीन वर्षांनी."
 उत्तर ऐकून मी सुन्न झाले. दिवसेंदिवस असा कंटाळा वाढत चालला! तो सुंदर बंगला, ती मोठी बाग, मला तुरुंगासारखे वाटू लागले. यातून सुटका कशी होणार या चिंतेत मी पडले. पण बाबांचे अचानक काम निघाले
व वर्षभरातच मी खूप हट्ट करून त्यांच्याबरोबर परत हिंदुस्थानात यायला निघाले. आईचे डोळे भरून आले होते, पण ती काहीच बोलली नाही.
 याही गोष्टीला कित्येक वर्षे लोटली होती. आई माझ्या घरात काही दिवस राह्यला आली होती. मुली घरात कशा कंटाळतात, याची कुरकूर मी आईजवळ करीत होते. आई म्हणाली,
 "तू तर घराला कंटाळली होतीस एवढंच नव्हे तर घरातून जायला मिळावं म्हणून देवाला नवस केला होतास."
 मी आश्चर्याने विचारले,
 "काय सांगतेस आई? कधी?"
 तिने जुनी आठवण दिली व मला सांगितले, "तू हिंदुस्थानला परत गेल्याच्या दुसऱ्या दिवशी कृष्णा स्वयंपाक्याने एका वाटीत देवापुढे गूळ घालून ठेवला. त्याला विचारले, तर तो म्हणाला-माईने सांगितले होते की, "कृष्णा, मी जर घर सोडून परत शाळेत जायला निघाले, तर देवाला गूळ ठेव बरं का. माझा नवस आहे." आई किंचित् थांबली. जुन्या जखमा परत वाहावल्या. घोगऱ्या आवाजात ती म्हणाली, "माई, त्या वेळी तुला आमचा इतका कंटाळा आला होता, की आमची संगत सुटावी म्हणून तू नवस बोलली होतीस. आता का बरं मुली जरा सुटीच्या बाहेर गेल्या तर कुरकुरतेस?"
 जुन्या स्मृती जाग्या झाल्या, अभावितपणे केवढा क्रूरपणा केला त्याची जाणीव झाली. आयुष्यात काही गोष्टींची भरपायी करताच यायची नाही हे उमजले. आईने मला सांगितले ते खरेच होते. न्यायाचे होते. मुलींच्या बापाने सांगितले तसेच. पण मला न्याय कुठे हवा होता? आई पुढे म्हणाली होती, "हे असंच चालायच-पिढ्यान् पिढ्या असंच चालायचं."
 मला तत्त्वज्ञानही नको होते… न्यायही नको. आता मला माझा एकटेपणा सहन करवत नव्हता. मी वैतागाने पुटपुटले, "असं असेल तर मुलं दहा वर्षांची झाली की आयांनी मरूनच जावं आपलं."
 "ही-ही-खी-खी…. अगदी बरोबर!" माझ्या भोवतालची भुतावळ किंचाळली. मी कानात बोटे घातली.

१९५९
*