भोवरा/प्रवास संपला

विकिस्रोत कडून




 २०
 प्रवास संपला


 सहा महिने झाले, मन आणि शरीर इतके थकले आहे की, निजताना मी म्हणायची, "आत उठणे नको." सकाळी आपले डोळे उघडत. तीच खिडकी, तेच झाड, तीच टेकडी. "अरे, मी उठले वाटतं!" परत एक दिवस, परत रात्र आणि मग न चुकता आणखी एक दिवस. कितीदा असे चालणार आहे?
 एक एक गाव म्हणजे नव्या नव्या वेदनांची स्मृती, झूरिच, म्युनशेन. ट्युबिगेन, बॉन, आमस्टरडॅम, न्यूयॉर्क. मला वाटले होते युरोपच्या थंड हवेत बरे वाटेल. पण बरे कसले ? घरी नुसता थकवा वाटत होता. आता त्याच्या जोडीला वेदना पण आल्या. सगळ्यांचा विरस. आज सॅनफ्रान्सिस्कोला पोचलो व बसत उठत कशीबशी मोटरपाशी पोचले. परत वीस मैलांचा प्रवास. एकदाचे बिऱ्हाडी आलो. एक नर्स तयारच होती. तिने काही परीक्षा केली. दुसरी नर्स आली, तिने रक्त काढले, डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली. घरमालकीण व मालक येऊन स्वागत करून गेले. दोघे प्रोफेसर आले होते. ते थोडा वेळ बसून गेले. आमचे बिऱ्हाड चालू करून देण्यासाठी एक बाई आल्या होत्या. त्यांच्याबरोबर सामान आणायला घरची मंडळी गेली. मी बसायच्या खोलीतच निजले हाेते. अंगावर पांघरूण होते. मंडळी जाताना काहीतरी सांगून गेलीसे वाटले, पण मला वाटते मी अर्धवट झोपेत होते.
 डोळे उघडले तो मी कुठे आहे ते कळेना. मग लक्षात आले. हळूहळू प्रवास आठवला. मोठ्या समाधानाने मी म्हटले. "संपला एकदाचा प्रवास"
 "प्रवास संपतो का कधी?"
 मी रागानेच म्हटले, "मेल्यावर !"
 "खरंच?" हेटाळणीचा सूर आला.
 "नाही बाबा, कधीच संपत नाही. युगानुयुगे संपत नाही बरं. पण आता आयुष्यात माझा तात्पुरता प्रवास संपला आहे… प्रवास संपला आहे."
 पडल्या पडल्या स्वस्थपणे मी खोली न्याहाळाली. सकाळी एकदा घर पाहिले होते, पण घाईत. माणसांच्या गर्दीत.. माझ्या शेजारीच मोठ्ठे काचेचे दार होते, त्यातून बाहेरची बाग दिसत होती. आमच्या लहानशा बंगलीभोवती आवार बरेच मोठे होते व त्यात खूप झाडे होती. झाडे आणि वेलींनी घर वेढले होते. वेलींचे तणावे व झाडांच्या फांद्या दरवाजापर्यंत आल्या होत्या. पडल्या पडल्या मधल्या खोलीचा कोपरा दिसत होता. त्याच्या पलीकडे जेवणघर - स्वैपाकघर व अमेरिकन घराला लागणारी सर्व यंत्रे. पाणी तापत होते, चुलीचा गॅस मंद ज्योतीने जळत होता. पदार्थ थंड होण्याच्या फडताळात पदार्थ थंड होत होते. पण ह्या यंत्राचा आवाज मात्र सुदैवाने मला ऐकू येत नव्हता, इतकी ती खोली दूर होती. जर्मनीतली एक रात्र आठवली. घर इतके लहान होते की ह्या सगळ्या यंत्रांचा आवाज आळीपाळीने रात्रभर ऐकू येत होता आणि डॉक्टर सकाळी म्हणत होते की 'रात्रभराच्या विश्रांतीनंतरसुद्धा तुम्हांला थकवा वाटतो का', म्हणून !
 बसायच्या खोलीत मी नजर फिरवली. घर मोठे गमतीदार होते. एकतर इथल्या मानाने जुने आणि दुसरे म्हणजे जुन्या धर्तीचा माल विकणाऱ्या बाईचे होते. भिंतींचा रंग मंद होता. खालची जमीन काळसर होती. डोळ्यांना त्रास होईल असा रंग कोठेही नव्हता. शंभर दोनशे वर्षांपूर्वी ज्या तऱ्हेची खुर्च्या-टेबले लोक वापरीत, तशा सामानाने खोली सजली होती. प्रत्येक वस्तू भारी किमतीची, पण हल्लीच्या काळी मोठ्या उपयोगाची नाही अशी. एक बाजाची पायपेटी, एक पियानो. दिसायला फार सुंदर; भारी लाकडाची, गुळगुळीत पॉलिश केलेली; पण ह्यातून सूर निघत नव्हते. गौरीने आल्याबरोबर वाजतात का; ते पाहिले होते. लिहायचे टेबल फार नाजूक पण फार तर एखादे पुस्तक व एखादा कागद मावेल एवढे. बहुतेक जागा लहान लहान ड्रॉवर व मोठाल्या आरशांनीच व्यापलेली. पलीकडल्या भिंतीत एक खोटी खोटी आगोटी. लोखंडी मोठी शेगडी, तिच्यासमोर मोठे नक्षीचे लोखंडी दार, आगटीवर संगमरवरी
फरशी, तीवर चिनीमातीची चित्रे. सगळे काही होते. फक्त आत लाकडे जळत नव्हती व धूर वरती जाण्यासाठी धुराडे म्हणून उभे केले होते त्याला वरती भोकच नव्हते. जेन ऑस्टेनच्या वेळच्या घरातील बैठकीच्या खोलीचा देखावा उभा केला होता. माझ्या थकलेल्या पापण्या जड झाल्या, पण तेवढ्यात मला दिसत होते, त्या चिटुकल्या लिहिण्याच्या टेबलावर बसून ॲन एक चिटुकली चिट्ठी लिहीत होती. बाजूच्या छोट्याशा टेबलावरील नक्षीच्या फुलदाणीत फॅनी बागेतली गुलाबाची फुले रचीत होती. त्या मोठ्या पियानोशी कोण बरं? एलिझाबेथच ती. एवढ्या मोठ्या पियानोशी बसायचा धीर दुसऱ्या कुणाला होणार? बरं झाल, नॉरीसबाई व बेनेटबाई इथे कटकट करायला नाही आल्या ते. ह्या पोरी असल्या तरी मला त्यांचा मुळीच त्रास होत नाही.
 किती वेळ लोटला होता कोण जाणे. मी परत डोळे उघडले तर संध्याकाळच्या सावल्या घरात शिरल्या होत्या. खोलीच्या कोपऱ्याकोपऱ्यांत अंधार भरला होता. आधीच मंद रंगाच्या भिंती जवळजवळ दिसेनाशा झाल्या होत्या. खिडकीच्या तावदानातून वेलींची पाने झाडांच्या फांद्यावर घासताना दिसत होती, पण त्यांचा आवाज आत ऐकू येत नव्हता. मा सगळीकडे नजर फिरवली. ॲन, फॅनी, एलिझाबेथ सगळ्या जणी निघून गेल्या होत्या. शंभर वर्षांपूर्वीची टेबले, खुर्च्या, आगोटी पुसटपुसट दिसत होती. घरात सगळीकडे नीरव शांतता भरून राहिली होती. माझ्या शेजारी फक्त माझा कायम सांगाती बसून होता- डोळ्याची पापणी न हालवता सारखा बघत होता. "बघ, सारखा बघत राहा. मी उपभोगणारी आणि तू बघणारा."
 मी समाधाने पुटपुटले, "मला आवडलं घर. छान आहे. मरायलाही छान आहे न् जगायलाही छान आहे."

१९५९
*