भोवरा/आजोबा

विकिस्रोत कडून




 
 आजोबा


 "मी अगदी मजेत आहे. मी आनंद लुटतो आहे." थोडा वेळ थांबून ते परत म्हणाले, "मी आयुष्यातला आनंद लुटतो आहे."
 कोणी तरी आजोबांची मुलाखत घ्यायला आले होते व आजोबा आपल्या नेहमीच्या स्पष्ट, खणखणीत आवाजात बोलत होते. आतल्या खोलीत मला सर्व मुलाखत ऐकू येत होती.
 आजोबा म्हणजे मामंजी. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रसंग फारसा येतच नाही. आला तरी हाक मारायचा येत नाही. मी घरात आल्यापासून जाऊबाईंची मुले त्यांना आजोबा म्हणत. मीही तोच शब्द उपयोगिते. आज तीस वर्षांवर मी त्यांच्या घरी आहे; निदान पंधरा वर्षे तरी ते सर्वस्वी माझ्या घरी राहतात; तरी त्यांच्या मनाचा ठाव काही मला घेता आला नाही. त्यांचे बोलणे किंवा त्यांची एखादी कृती अजूनही मला आश्चर्याचा धक्का देतात.
 आताच पाहा ना. किती मनापासून ते सांगत होते की मी आनंद लुटतोय म्हणून! आणि मी आश्चर्याने ऐकत होते. माझे वय आहे बावन्न, आजोबा आहेत शंभरीच्या घरात. माझे आयुष्य दुःखात गेले असेही नाही; पण 'आनंद लुटणं' मला ह्यापुढे अशक्य वाटते. आयुष्याच्या वाटेकडे पाहायला लागले तर मध्ये मोठमोठाले पांढरे दगड आहेत, काही आनंदाच्या स्मृती आहेत, तर जवळजवळ तितक्याच दुःखाच्या घटना आहेत. किती तरी प्रेमाची माणसे नाहीशी झाली आहेत. त्यांच्या आठवणीने मी रोज अश्रू गाळीत आहे असे नव्हे; पण त्या अनुभवामुळे आज आनंद लुटणे मला अशक्य झाले आहे. 'वेणीसंहार' नाटकात एके ठिकाणी उद्गार आहेत:
"गांधारी शंभर पुत्रांस नव्हे तर शंभर दुःखांस प्रसवली." मला वाटते, ह्या उद्गारात साऱ्या जीवनाचे व मायेच्या गुंफणीचे तत्त्व गोवले आहे. आजोबांच्या शंभर वर्षांच्या आयुष्यात किती तरी प्रेमाची माणसे व सहकारी गेले. आई, वडील, दोन बायका, मुले, नातवंडे व किती तरी सहकारी. सासूबाई व थोरले भाऊजी गेले त्याला तर अशी काही फार वर्षे लोटली नाहीत, त्यांची आठवण काय होत नसेल?
 थोरले भाऊजी गेले त्या दिवशी पुण्यातील लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाचाराला येऊन गेले. एक गृहस्थ सकाळचेच आले होते. त्यांच्याजवळ आजोबा चार शब्द बोलले; आणि ते काय, तर "आता त्याच वय झालेलं होतं- प्रकृतीहि बरी नव्हती. एक दिवस माणूस जायचंच." भेटायला आलेला गृहस्थ तर हे उद्गार ऐकून आश्चर्याने थिजलाच; पण मलाही धक्का बसला. कुटुंबियांविषयी त्यांची वृत्ती 'जसी गोरुवे रुखाखाली बैसली' अशा तऱ्हेची आहे. दुपारच्या उन्हात गायी-बैल झाडाखाली बसतात; थोड्या वेळाने निघून जातात, काही नवे येतात. तसे कुटुंबाचे आहे.
 ते घरात आहेत, पण घरातल्या माणसांशी संबंध जवळजवळ नाही म्हटला तरी चालेल. माझी लेक- त्यांची एक नात-फलटणला राहते. गेल्या वर्षी त्यांना नव्याण्णव वर्षे पुरी होऊन शंभरावे वर्ष लागले. तेव्हा काही फलटणकर तिच्याकडे येऊन म्हणाले, "आज तुम्ही आपल्या आजोबांच्या आठवणी सांगा." ती म्हणाली, "काय सांगू? माझ्याजवळ आठवणी अशा नाहीतच. मी अगदी लहान असताना आजोबा घरी येत असत, पण कधी माझ्याशी बोललेले आठवत नाहीत. मी जरा मोठी झाल्यावर मी त्यांच्याशा जे काही बोलले ते 'आजोबा, पाणी तापलं आहे;- आंघोळीला जाता ना?... आजोबा, चहा झाला आहे... आजोबा पानं वाढली आहेत... आजोबा, तुम्हांला कुणी भेटायला आले आहे!... ह्या- पलीकडे काही बोललेली स्मरत नाही." इतर नातवंडांशी ते काही जास्त बोलले असतील असे वाटत नाही. आम्हा सुनांशीही कधी बोललेले मला स्मरत नाही. मुलाशी बोलत असत का, म्हणून खोदखोदून विचारते. पण तेही दिसत नाही. तसे ते फारसे बोलके नाहीत; अगदी अबोल आहेत, असेही दिसत नाही. पण कुटुंबात घरगुती गप्पा झालेल्या आठवत नाहीत युनिव्हर्सिटीतदेखील सर्व कमिट्यांवर असूनही कधी माझ्या आठवणीत
बोललेले नाहीत. सासूबाई म्हणत, "आधी सर्व दिवसभर बाहेर असायचं. रात्रीचं जेवण झाल्यावर काही घरगुती विषय (आजोबांच्या मते, कटकट) काढावा. तो हे आपले भिंतीकडे तोंड करून निघून जात. मग काय करायचं? किती कटकट केली तरी हे बोलायचे नाहीत व मनचं करायचं सोडायचे नाहीत."
 'मनचे करायचे' हे प्रकरणही मोठे गमतीदार. आजोबांच्या आत्मचरित्रावरून दिसते की एखादा विचार मनात आला की ते दिवसेन् दिवस, महिनेन् महिने त्यावर विचार करीत. एकदा विचार पक्का झाला की कृती करीत. त्यांनी कृती केली म्हणजे त्यांचे विचार लोकांना समजायचे. हिंगण्याचा आश्रम काढल्यानंतरची गोष्ट, आजोबा फर्ग्युसन कॉलेजात प्रोफेसर होते. त्यांनी कोणाला न कळवता सवरता एक दिवस आपली तीन हजारांची पॉलिसी आश्रमाच्या नावाने करून दिली. सासूबाई सांगत, "अग, पुनर्विवाह केल्यामुळे पहिल्या सासरला मुकले, माहेराला मुकले. नव्या सासरच्या मंडळींनी वाळीत टाकलेलं. त्यातून शंकर झालेला. विधवा बाईला पोळपाट-लाटणं असतं; तोही मार्ग मला बंद. काही बरेवाईट झाले तर जीव देण्यावाचून मार्ग नव्हता मला! खूप रडले, खूप आदळ आपट केली, पण ह्यांना काही पाझर फुटला नाही. तेव्हा ठरवलं की ह्या संसारात मलाच माझं व मुलांचं बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणं केलं"
 'मलाच माझे व मुलांचे बघितले पाहिजे' ह्याप्रमाणे त्यांनी केलेही. आजोबा शंभर रुपये पगारापैकी पंचेचाळीस रुपये घरात खर्चासाठी देत. त्या दिवसांत स्वस्ताई होती तरीदेखील नवराबायको, तीन मुले आणि इतर दोघेतिघे तरी कोणी घरात असत. इतक्यांचे एवढ्या पैशात कसे होत असेल ह्याचा त्यांनी कधी विचारच केला नसावा असे वाटते. सर्व स्वस्तात स्वस्त करून शिवाय दोन पैसे गाठी बांधायचे ह्या विवंचनेत सासूबाईंचा संसार कसा झाला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आजोबांचा बराच वेळ बाहेर जायचा, पण मुले घरीच; म्हणून काहींच्या मनात तरी सासूबाईंबद्दल अढी बसली. "आमच्या घरी खेळगडी घेऊन जायची आमची कधी छाती झाली नाही... बी. ए. च्या वर्गात गेल्यावर मला पहिला कोट शिवला... बायाला (सासूबाईंना) भांडी घासायला मी कितीदा मदत केली..." असे मुले सांगतात. सासूबाई- आजोबांच्या लग्नाचा पन्नासावा
वाढदिवस मुलांनी साजरा केला त्या दिवशी सासूबाई सांगत होत्या की, "गेल्या ५० वर्षांत कर्व्यांनी कधी मला लुगडं घेतलं नाही!"
 मुलांना बी.ए.पर्यंत शिक्षण द्यावयाचे (डी.ए. सोसायटीचे लाइफमेंबर असल्यामुळे फी कधीच पडली नाही.) पुढचे त्यांचे त्यांनी पहावे, असा आजोबांचा करार. दुसऱ्या मुलाने डॉक्टरीचे शिक्षण घेतले. मुंबईस राहावयाचा व शिकावयाचा जो खर्च झाला तो आफ्रिकेत डॉक्टरी करावयास जाऊन फेडला. तिसरा मुलगा बी. एस्सी.त पहिला येऊन स्कॉलरशिप मिळवून बंगलोरला शिकायला गेला. तेथे एम्. एस्सी. झाल्यावर विलायतेला जायचे मनात आले. पैसे कुठून आणायचे? आजोबा तर कुणाजवळ मागायचे नाहीत. हिंगण्याच्या संस्थेचा सर्व किराणा माल त्या वेळी आढाव नावाच्या मंडईजवळच्या दुकानदाराकडून घेत असत. सासूबाई त्यांच्याकडे गेल्या व तीन हजारांचे कर्ज मागितले. त्या देवमाणसाने पण सासूबाईंच्या शब्दावर कर्ज दिले! कर्ज मिळाल्यावर सासूबाईंनी आजोबांच्या खनपटीस बसून त्यांना प्रॉमिसरी नोट लिहावयास लावले. विलायतच्या अभ्यासाला आणखीही पैसे लागले. पैकी साडेपाच हजार आजोबांचे कर्ज म्हणून परत केले, व त्या पैशांत शेवटचा मुलगा विलायतेला गेला. तो हिंगण्याला आजन्म सेवक झाला, म्हणून आजोबांनी त्याच्याकडून कर्ज परत घेतले नाही. सासूबाई कधी ह्या सर्व जुन्या गोष्टी काढून डोळ्यात पाणी आणू लागल्या, की आजोबा खूप वेळ एकून घेत. मग म्हणत, "अग, त्याचे सगळे नीट झाले आहे ना? आता का रडतेस?"
 पहिल्या मुलावर सासूबाईंचा फार जीव. तो जोशांसारखा गोरा, बाकीची मुले कर्व्यांसारखी काळी! तो हुशार, कर्तबगार, श्रीमंत! पण खरे म्हणजे ह्या सर्वांपेक्षा पुनर्विवाह झाल्यावर झालेले हे पहिले अपत्य, तेव्हा त्यांना साहजिकच त्याच्याबद्दल फार जिव्हाळा! पण तो तर आफ्रिकेत जाऊन बसलेला. "अरे, इथं नसती का तुला डॉक्टरी करता आली?" तर उत्तर येई, "कधी घर असं माहीतच नव्हतं आम्हांला. सदा आपली धर्मशाळा. इथं पुण्यात तसंच होईल, म्हणून मी लांब जात आहे. सासूबाईंचा संसार होता खरा तसाच; पण त्याला काय त्या एकट्याच जबाबदार होत्या? पण त्या कळवळ्याने कधी बोलत, कधी रागावत म्हणून त्यांना उत्तरे मिळत. आजोबांनी कधी शब्दाने विचारपूस केली नाही. कोणी
एका शब्दानेही त्यांना बोलले नाही. शंकरराव कधी पाच वर्षांनी नाही तर दहा वर्षांनी पुण्यास यायचे. ते यायचे कळले म्हणजे "शंकर येणार, शंकर येणार. त्यानं माझ्याकडे राहिलं पाहिजे. तुम्हा कुणाकडे एक दिवस राहू देणार नाही!" म्हणून सासूबाईंची नुसती धांदल उडायची. अर्थात् सासूबाईंकडे कंटाळून दोन दिवसांतच शंकरराव कोणा तरी भावाकडे जात. पण तरीही शंकर असेपर्यंत त्यांचा आनंद उतू जाई. ते जायचा दिवस जवळ आला की त्यांच्या जिवाची घालमेल होई. बोलता बोलता डोळ्यांत पाणी येई. "शंकर आता नाही रे परत दिसणार!" म्हणून त्या वारंवार म्हणत. शंकररावांच्या पोटातही कालवून येई. ते म्हणत, "हिच्या दुःखामुळं भेटीगाठीचा आनंद पार नाहीसा होतो." सासूबाईंच्या दुःखामुळे आम्ही पण कष्टी असायचो. एक अचल तेवढे आजोबा ! "शंकर आलास का?.... शंकर जातोस का?" संपले. "जैसी गोरुवे रुखाखाली बैसली."
 आजोबा सर्वांशी सारखेच वागत; पण आप्पांच्या (कै. रघुनाथराव, थोरले भावजी) सांगण्यात येई की, आजोबांची त्यांच्याबाबतची वागणूक कठोर व कर्तव्यनिष्ठ होती. अप्पांना कॉलेजात जाईपर्यंत शेंडी- हजामत करून घेरा ठेवून ठेवावयास लावली होती. नाटक पाहण्याची सक्त मनाई होती आणि गंमत म्हणजे सर्व मुलांना, विशेषतः आप्पा व शंकरराव ह्यांना नाटकाचा शौक भारी. अर्थात् चोरून नाटके पहावी लागत. सासूबाई व आजोबा ह्यांच्या कचाट्यातून बाहेर पडण्याची जरूरी ह्या दोघांना विशेष वाटली.- आणि लहानपणाच्या काटकसरीची, कंजूष संसाराची प्रतिक्रिया म्हणून की काय ही दोघेही मुले बरीच खर्चिक बनली. स्वतःचे लहानपण आठवून शंकररावांनी आपल्या मुलाच्या एकाही हौसेला नाही म्हटले नाही. अर्थात् सासूबाई ह्या खर्चावर फार रागावत आणि मुलगा दाद देत नाही तर सुनेवर राग निघे. साधासाधा खर्चही त्यांना वावगा वाटे. बोलण्याने बोलणे वाढे व कटुता उत्पन्न होई. आजोबा अगदी ह्याउलट. त्यांनी कधी एका अक्षरानेही ह्याबद्दल विचारले नाही. अर्थात् आम्हा सुनांनाही आजोबा फार प्रिय. सासूबाई आल्या म्हणजे आता ह्या काय बरे म्हणतील, असे वाटे आजोबांच्या पुढे हापूस आंबे ठेवले म्हणजे आस्वाद घेऊन मोठ्या आनंदाने खात. ते आंबे स्वस्त की महाग विचारीत नसत. चहा-फराळाचे खात. आता चहाची वेळ आहे का नाही? सकाळचा हा कितव्यांदा चहा झाला?
आणि फराळाचे घरी केलेस का बाजारचे आणलेस, ह्याची चौकशी करण्याचे कधी त्यांच्या मनातही आले नाही.
 आजोबांनी शंभर वर्षांच्या आयुष्यात कधी पैशाचा तरी जिन्नस बाजारातून आणला असेल असे वाटत नाही. सर्व जगभर प्रवास केला. हिंदुस्थानभर वर्गणी गोळा करीत हिंडले, पण कधी स्वतःचे आगगाडीचे तिकीट काढले नसेलसे वाटते. लोक तिकीट काढीत, हे पैसे देत. स्वतःच्या कपड्यांबाबत ते फार काळजी घेत. विशिष्ट तऱ्हेची धोतरे, डोईला बांधायचा रुमाल, विशिष्ट कापडाचा कोट, असा त्यांचा पोशाख आहे. पण हे सर्व बाजारातून आणणे, शिंप्याकडे शिवायला टाकणे ही कामे इतर मंडळी करीत- माझ्या आठवणीत सासूबाई व मुले करीत. एकदा अप्पांना ब्लँकेट आणावयास सांगितले. मला वाटते, कुठे दूर प्रवास करायचा होता. घरातली सर्व पांघरूणे जीर्ण, परत परत शिवलेली, तेव्हा जरा नवे ब्लँकेट घ्यावे, असा विचार झाला होता. अप्पांनी वडिलांसाठी म्हणून एक मऊ, दुरंगी ब्लँकेट आणले. किंमत रुपये साठ! आजोबांचे पेन्शन रुपये सत्तर. आजोबांनी मुकाट्याने साठ रुपये दिले व परत रघुनाथाला काही जिन्नस विकत घ्यायला सांगायचे नाही म्हणून मनाशी खूणगाठ बांधला. आजीबाईंनी खूप तळतळाट केला. ते ब्लँकेट म्हणजे सबंध घरात मोठा थट्टेचा विषय झाला. पण आजोबा मात्र काही बोलले नाहीत.
 ब्लँकेटवरून गोष्ट निघाली म्हणून सांगते. ह्या किंमती मालाचे पैस अप्पांनी दिले असते. इतरही मुलांनी दिले असते. पण आजोबा स्वतःसाठी इतरांची- म्हणजे मुलांचीसुद्धा- पै घेत नसत. पोस्टाचे तिकीट जरी लागले तरी त्याचे पैसे ताबडतोब हातात ठेवीत. त्यांनी स्वतः व इतरांनी या गोष्टीबद्दल लिहिले आहे. पण मला कित्येक दिवस हे उमजले नव्हते. मी म्हणे (अर्थात मनाशी) की पन्नास वर्षे बायको काय नेसते आहे, कुणाकडून काय मागून आणते आहे, ह्याची दादही नाही- हा अपरिग्रह कोण्या गावाचा? सासूबाई बहुतेक रोज गावात जात. कधी संस्थेसाठी वर्गणी मागत; कधी आत्मचरित्राच्या प्रती खपवीत; कधी बाळगलेल्या मुलांसाठी धान्य, वस्त्र वा पैसा मागत;-कधी स्वतःसाठी मागत. माझे लग्र होऊन नुकताच संसार थाटला होता. गावात जाण्यासाठी आमचे जिमखान्याचे घर जवळ पडे म्हणून सासूबाई आमच्याकडे राहायला होत्या. त्या डब्यातून
कधी काही आणायच्या. "हे जेवताना वाढून घे." म्हणायच्या. यावरून आमचा पहिला खटका उडाला. मी म्हटले, "मी घरचं ओलंकोरडं आनंदाने खाईन, पण तुम्ही वाटेल तिकडून मागून आणता ते खाणार नाही. नवऱ्याला वाढणार नाही." सासूबाईंनी परत कधी आमच्याकडे काही आणले नाही. सुनांना कोणालाच ते खपत नव्हते; पण आजोबा मात्र सासूबाई पुढे ठेवतील ते खात. ते आपण दिलेल्या पंचेचाळीस रुपयांतले, की मागून आणलेले ह्याची कधी वास्तपुस्तच होत नसे. मला पहिल्यापहिल्याने ह्या वागणुकीचा अर्थच लागत नसे; पण आता पंधरा वर्षे आजोबांबरोबर राहून मी मनाशी एक संगती लावली आहे. ती बरोबर आहे असे मला म्हणता येणार नाही. पण ती त्यांच्या स्वभावाला धरून आहेसे वाटते.
 मी वर 'अपरिग्रह' असा शब्द वापरला, तो आजोबांचा नव्हे. ते कधीच जाडेजाडे शब्द वापरीत नाहीत. त्यांच्या वागणुकीचे मर्म म्हणजे एक, स्वतः लोकांचे काही घ्यावयाचे नाही; व दुसरे आपल्याला योग्य वाटेल ते आपण करायचे, दुसरा काय करतो ते पाहायचे नाही. पैकी घ्यायचे म्हणजे आजोबांच्या मते फक्त पैसे. कोणी पैसे दिले तर ते ताबडतोब आश्रमाकडे जातात. फलटणच्या राजेसाहेबांनी त्यांना खास स्वतःला म्हणून पन्नास रुपये महिना दिलेले आहेत. ते चालू झाल्यापासून आजोबा फक्त सहीचे धनी आहेत. पैसे जातात संस्थेकडे. कोणी त्यांनी वापरावी म्हणून वस्तू दिली; त्यांना काही खाण्यासाठी दिले; मोटरीत घेऊन गेले, तर ते आजोबा मोठ्या आनंदाने स्वतःसाठी स्वीकारतात, ते आपण घेता कामा नये किंवा परत केले पाहिजे अशी त्यांची भावना नाही. ते कुठचीच गोष्ट अतिरेकाला नेत नाहीत. 'अपरिग्रह' वगैरे मोठ्या गोष्टीत ते पडत नाहीत. कोणाचे पैसे घेत नाहीत-इतर काही कोणी प्रेमाने दिले तर नाही म्हणत नाहीत.
 दुसरे म्हणजे, काय त्यांचे नियमबियम असतील ते स्वतःपुरते. आपल्याप्रमाणे इतरांना करण्याच्या फंदात ते पडत नाहीत. चालवले तोवर ते न चुकता आठ मैल रोज चालत असत; पण व्यायामाबद्दल कोणाला व्याख्यान देताना मी कधी ऐकले नाही. त्यामुळे बायको, मुले-प्रत्येक जण आपल्याला योग्य दिसेल ते करीत होती. आजोबांनी त्यांच्यावर कसलेच बंधन घातले नाही. त्यांचे स्वतःचे जीवन ते जगतात; इतर काय करतात,
ह्याची त्यांना पर्वा नाही किंवा पुष्कळदा जाणीवच नाही असे वाटते.
 लोकांचे काही घ्यायचे नाही हा कटाक्ष खरा, पण पैशाखेरीज इतर गोष्टींत उपकाराचे ओझे होते ही जाणीव त्यांना नव्हतीसे वाटते. ते कुठे वर्गणी मागावयास गेले म्हणजे लोकांकडे उतरत. लोकांची वहाने वापरीत; पण हे ओझे आपले आहे, असे त्यांना वाटले नाही. मी संस्थेसाठी ह्या गृहस्थाकडे उतरलो आहे- माझ्या स्वतःसाठी नव्हे, ही त्यांची भूमिका असे. ते योग्यच होते. कारण त्यांच्या पगारातून काही देणे त्यांना परवडले नसते; द्यावे असे कधी त्यांच्या मनातही आले नाही व संस्थेच्या पैशातून देणे गैर झाले असते. पण लोकांकडून पैशाव्यतिरिक्त सेवा करून घेण्याचा हक्कच मनाला वाटू लागतो.
 एकदा आजोबा खूप आजारी होते व पुण्यातील एका प्रख्यात सर्जनच्या दवाखान्यात एका महिन्यावर उपचारासाठी राहिले. त्या दवाखान्यात औषध पाणी, खाणेपिणे, नर्सकडून सेवा अगदी उत्कृष्ट झाली. आजोबांना घरी आणल्यावर सर्जनना बिल विचारले. ते काहीही घेईनात, पण आम्हां सर्वांच्या आग्रहावरून फक्त इंजेक्शने, औषधे, वगैरेच बिल मोठ्या नाखुषीने त्यांनी घेतले. आजोबा चांगले बरे झाल्यावर ही गोष्ट त्यांना सांगितली. ही हकीकत ऐकून ते म्हणाले. "अरे, आता माझ्या बँकबुकात काही शिल्लक नाही. चार सहा महिन्यांत मी तुम्हा मुलांचे पैसे फेडीन." आम्ही सर्वांनी त्यांच्याशी वाद घातला. की "जर त्या सर्जनच्या उपकाराचे ओझे खरोखर मोठे झाले होते; पण ते तुम्हांला वाटले नाही. आणि ज्या मुलांना तुमच्यामुळे आज चांगले दिवस होते, त्यांनी कधी जन्मकर्मात चार कवड्या खर्च केल्या तर परत देण्याची गोष्ट करता, हे योग्य आहे का?" आजोबांनी आमचे म्हणणे कबूल केले. पण त्या वर्षी दिवाळीच्या दिवशी मला वीस रुपये देऊ केले व म्हटले, "हे तुझ्यासाठी खण नि मुलांसाठी खाऊला." मी घेत नाहीसे पाहून म्हटले. "अग, परतफेड नाही. माझी दिवाळीची भेट आहे ही." मी काय बोलणार? मुकाट्याने पैसे घेतले. त्या दिवाळीला आम्हा पाची सुनांना (आम्ही चौघी व नानासाहेब आठवल्यांची पत्नी सुशीलाबाई) व नातवांना त्यांनी आयुष्यात पहिल्यादा व शेवटचे खणासाठी व खाऊसाठी पैसे दिले !
 आजोबांनी कधी एखाद्या मुलाच्या हातात खाऊ ठेवला किंवा एखाद्या
मुलाला मांडीवर घेतलेले मला स्मरत नाही. ते काही चांगला पदार्थ खात असले, समोर बशी भरलेली असली, तरी आपल्या पुढेच टुकत उभ्या राहिलेल्या लहान मुलाच्या हातावर त्यांनी कधी काही ठेवले नाही. माझे थोरले भाऊजी कै.अप्पासाहेब ह्यांचे पण अगदी असेच होते. अर्थातं आजोबा कोणाही लहान मुलाला हिडीस-फिडीस करीत नाहीत. रागावले तर कधीच नाहीत. आपण होऊन मूल जवळ घेणार नाहीत; पण एखादे जवळ गेलेच तर त्याच्याजवळ गोड बोलतील. मात्र जवळ घेऊन कुरवाळणार नाहीत. अण्णांच्या अगदी उलट त्यांचे मामेभाऊ अप्पासाहेब परांजपे. जाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन माहेरी आली हे कळले मात्र, लगेच तिला पाहायला आले. ते येतात तो मुलगी दूध पिऊन निजली होती. तिच्याकडे टक लावून बघत बसले व मला म्हणतात, "किती गोड आहे नाही जाईची मुलगी!" जाईची मुलगी आहे आपली दहा जणींसारखी. पण अप्पासाहेबांचे वात्सल्य मात्र अति गोड आहे खरे. मुलांच्या बाबतीत आजोबा व त्यांचे थोरले चिरंजीव ह्यांच्यासारखी सर्वस्वी उदासीन माणसे मी पाहिली नाहीत. आजोबांनाही मुले नको होती, असे सासूबाई अधूनमधून सांगत. त्यांत तथ्य किती व तिखटमीठ किती, त्यांनाच माहीत. एवढे मात्र खरे. की आजोबा कधी कोणावर रागावले नाहीत; म्हणून इतर कुटुंबियांप्रमाणे नातवंडेही एकंदरीने आजोबांवर खूष आहेत.
 आजोबा अतिशय भित्रे आहेत. ज्यांनी लोकमताला न जुमानता पुनर्विवाह केला, लोकापवाद व स्वजनांचा राग सहन केला, त्यांच्याबद्दल असे म्हणणे चमत्कारिक दिसते. पण ते जात्या भित्रे ह्यात शंका नाही. तोंडास तोंड देणे, वादविवाद करणे, आपली बाजू मांडणे त्यांना जमत नाही. ते गप्प बसतात. फार तर विचार करून लिहीत, पण बोलत नसत. बायकांच्या युनिव्हर्सिटीच्या किती तरी सभा भांडणाने गाजलेल्या आहेत. पण आजोबा मात्र कधी बोलत नसत. कमलाबाई देशपांडे ह्यांच्यावर सव्वीस हजार रुपयांची अफरातफर केल्याचा एक विचित्र आळ आला होता. तो सर्वथैव खोटा होता, हे दहा वर्षांच्या वह्या पाहून सिद्ध झाले. हा आळ आणणारे कोण आणि त्यांनी तो का आणला हेही उघडकीस आले. ह्या सर्व प्रकाराबद्दल खंत वाटून श्री. धनंजयराव गाडगीळ ह्यांनी युनिव्हर्सिटीच्या सेनेटचा राजीनामा दिला. त्या वेळी वह्या तपासणे, हिशेब
लावून देणे, वगैरे कामे रात्रंदिवस कमळाबाई, नानासाहेब आठवले व मधूनमधून दिनकर इतकी जणे करीत होती. आजोबा सिंडिकेटमध्ये होते. आम्ही त्यांना म्हणत होतो, की आळ खरा की खोटा हे आम्ही पाहून घेतो, पण "कमळाबाई असं करतीलसं वाटत नाही." एवढे एक वाक्य तुम्ही म्हणा. तुमच्या गप्प बसण्याने लोक नाना कुतर्क काढतात. पण हरे राम! ह्यांनी काही ते वाक्य तोंडून काढले नाही. कमळाबाई काही इतर अनाथ विधवांप्रमाणे आश्रमात आलेल्या नव्हत्या. त्या हुजूरपागेच्या विद्यार्थिनी. खऱ्या म्हणजे फर्गसन कॉलेजात जायच्या. पण तात्यासाहेबांनी मोठ्या ध्येयवादाने त्यांना स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीत घातले. त्या वेळी युनिव्हर्सिटीने केवढी जाहिरात केली होती! त्यांनी आपले आयुष्य संस्थेच्या सेवेला वाहिलेले, पण आजोबा काही एक साधे वाक्य त्यांच्याबद्दल बोलायला तयार नव्हते, हे पाहून मला फार राग आला होता. हा प्रसंग एकच नव्हे. ज्या सहकाऱ्यांनी सर्वस्व देऊन संस्था नावारूपास आणली, त्यांच्यावर काही अशा तऱ्हेचा प्रसंग आला तर हे आपले अलिप्त राहात.
 वर्गणी मागायला जायचे खरे, पण दुसऱ्या कोणाला तरी पुढे करून. अशा एका वेळेचे श्री. मायदेवांनी वर्णन केले आहे. कोण्या श्रीमंताकडून अपमान झाला तर "मला कशाला इथं आणलंस?" म्हणून मायदेवावरच रागावले. अशा तऱ्हेचे प्रसंग नानासाहेब आठवले. हरिभाऊ दिवेकर वा सर्वांवर आले. ज्याने त्याने आपले पाहून घ्यावे; आजोबा कशात मन घालतील, कोणाची कड घेतील ही गोष्टच कधी झाली नाही. घरातही ताेच प्रकार. सासूबाई आमच्याकडे राहायला आल्या होत्या. आमची काही कुरबूर चाले. पण ह्यांचे आपले कशातच लक्ष नाही. ह्या सर्व कृतीच्या बुडाशी कठोरपणा किंवा आप्पलपोटेपणा नसून कमालीचा भिडस्त, भित्रा स्वभाव आहे असे मला वाटते. त्यांच्या आत्मचरित्रात एका प्रसंगाचे वर्णन आहे. खोटा आळ येऊन छड्या खाण्याचा प्रसंग आला होता. त्यांनी आपला कपाळाला हात लावला आणि ते पाहून साहेब हेडमास्तरांनी खऱ्याखाेट्याची चौकशी केली व ते प्रसंगातून निभावले; पण निक्षून, न डरता आपल्या निरपराधीपणाची ग्वाही काही त्यांना देता आली नाही. जातीच्या भित्र्या लाजाळू माणसाने इतकी कामे करावीत हा विरोध मला मोठा मजेदार वाटतो त्यांचे सहकारी नरहरपंत ह्यांची बहीण विधवा नसती तर पुढाकार
घेऊन, चार चार मित्रांच्या द्वारे चौकशी करून सर्वस्वी अनोळखी विधवेशी लग्न करण्यास लागणारी धडाडी आजोबांनी दाखवली असतीसे वाटत नाही. म्हणजे असे की, विधवेशी लग्न लावण्याची त्यांची तयारी होती, पण त्यासाठी काही खटाटोप - विशेषतः चार लोकांकडे जाऊन चौकशी वगैरे करण्याचा- त्यांना जमला नसता. जात्या अबोल स्वभाव, घरातसुद्धा फारसे न बोलणारे, आणि जन्मभर काम केले वर्गणी मागण्याचे, हाही विरोध मजेदार नाही का? पण त्यांनी एकट्याने हिंडून फारशी वर्गणी मागितली नाही. कोणी तरी खटपट करणारे असे बरोबर असे. वर्गणी मागतानाही ते फारसे बोलत नसत. व्यासपीठावरून मात्र फार सुंदर, मुद्देसूद व कळकळीने ते बोलत. त्यांचे थोरले चिरंजीव अप्पासाहेब घरात असेच अबोल असत. मग त्यांनी स्वतःचे असे एक मासिक काढून वर्षानुवर्षे त्यांतील मजकूर स्वतः लिहून काढून घरातल्या अबोलपणाचा वचपा काढला.
 ही माणसे माणूसघाणी नव्हेत; पण आपण होऊन ओळख काढणे, परक्या माणसाला आपण होऊन एखादा प्रश्न विचारणे, माणसाच्या मनाचा ठाव घेण्यास बघणे, भोवतालच्या माणसांशी समरस होणे, ह्यांना जमत नाही. ती आपले हृदय क्षणभरही गमवावयास तयार नसतात. माणसाने माणसाशी समरस होण्यात आनंद असतो खरा, पण त्याचबरोबर दुःखाचे वाटेकरी होण्याचाही संभव असतो. जीवनाच्या शांत, धीम्या प्रवाहात त्यांना भावनांची खळबळ नको असते. आनंदाचा पूर नको, क्रोधाची आग नको; दुःखाचे चटके नकोत - म्हणून ह्यांचा माणसांशी संपर्क दुरून दुरून असतो. ह्यांच्या सहानुभूतीचा उगम भावनेत नसून बुद्धीवर आधारलेला असतो. प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने कदाचित ही भूमिका फलदायी असेल; पण शेजारी असणाऱ्याला पुष्कळदा असे वाटते की आपल्या घरी माणूस वावरते की माणसाची छाया !
 आजोबा मैलन् मैल चालले असतील; पण चालत असताना भोवतालच्या सृष्टीच्या सौन्दर्याकडे त्यांचे लक्ष गेले असले, तरी निदान मला उमगेल अशा तऱ्हेने नव्हे. उकडते आहे की गारवा आहे, जमीन कोरडी आहे की चिखलाने चिकचिकाट झाला आहे, ह्याबद्दल कधी तरी ते बोलताना ऐकले आहे पण आकाश निळेशार आहे की ढगांनी भरले आहे,
सगळीकडे हिरवेगार आहे की रुक्ष आहे, वेताळावरून देखावा सुंदर दिसतो की धुळीमुळे काही दिसेनासे झाले आहे, ह्याबद्दल कधी अक्षर ऐकले नाही. भोवतालची सृष्टी, झाडेझुडपे, आकाश, लहानमोठे प्राणी ह्यांत त्यांना कधी गंमत वाटली नाही. त्यांचे मन मनुष्य व त्याची एक विशिष्ट परिस्थिती ह्यांना सर्वस्वी वाहिलेले होते. पण त्यातही वर सांगितल्याप्रमाणे एक प्रकारचा अलिप्तपणा आहे. ह्याही बाबतीत त्यांच्यात व त्यांच्या थोरल्या चिरंजीवांत विलक्षण साम्य दिसते.
 त्यांच्या आयुष्याची वाट थोडी अरुंद वाटते. करमणूक काय, काम काय- सगळे एका अरुंद सीमेत आखलेले आहे. ते पूर्वी सुटीत कधीकधी पत्ते खेळत. पत्त्यांचे त्यांचे डाव म्हणजे 'लॅडिस' व 'झब्बू'. पुढेपुढे नातींबरोबर गुलामसत्ती खेळत आणि कोणी अडवाअडवीचा डाव खेळू लागले की रागवत. सुरुवातीलाच न अडवण्याबद्दल बजावीत. ह्या कंटाळवाण्या डावाला नाती व सुना अर्थातच कंटाळून जात. पण तेही आता कित्येक दिवस सुटले आहे. त्यांच्या करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे वाचन. मराठी हाती पडेल ते वाचतात- फक्त आधुनिक कविता व रहस्यकथा मात्र वाचीत नाहीत. बाकी वाचून काढतात. मला वाटते, पूर्वी कादंबऱ्या फारशा वाचीत नसत. इंग्रजी वाचनात फक्त गंभीर लिखाण वाचीत. नाटके, कादंबऱ्या, कविता (अर्थातच) प्रवासवर्णने, वगैरे त्यांना वर्ज्य होती. घरात ह्या प्रकारची पुस्तके कधी हाती लागली तर पान उघडून काय आहे हे कळल्याबरोबर खाली ठेवीत. माझ्या विषयावरील पुस्तके कधी हातात घरीत नसत. आता मात्र सारा वेळ वाचतात व वर सांगितलेल्या ललित वाङ्मयाखेरीज सर्व वाचतात. माझ्या टेबलावरील एकही पुस्तक त्यांच्या तडाक्यातून सुटत नाही; आणि वाचताना त्यांना एक पुस्तक पुरत नाही तर चांगली दहा-पंधरा लागतात. ही पुस्तके पुष्कळदा इतकी रुक्ष व तात्त्विक चर्चेने भरलेली असतात की मलासुद्धा वाचायला कठीण जातात. त्यांना कळते म्हणून ते हल्ली वाचतात असे वाटत नाही. अशा एका पुस्तकाचे पानभर वाचतात, मग ते खाली ठेवून दुसरे काढतात. असा क्रम चालतो. एखादे सोपे मराठीतले पुस्तक असले म्हणजे मात्र अगदी आस्वाद घेत वाचतात. पु. ल. देशपांड्यांचा लेख त्यांच्या हातांत आला व त्यात काव्य (!) नसले, तर त्यांच्या खदखदून हसण्याने खोली दणाणते.
कथा, कादंबऱ्या, कविता ह्यांत त्यांना कधी गोडी वाटली नाही ह्याचे कारणही भावनांच्या कल्लोळापासून दूर राहावयाचे हा जो त्यांचा स्वभाव, तेच असावे.
 त्यांच्या संस्था काढण्याच्या कृतीतही असेच एक विशिष्ट मर्यादेत आखलेले वर्तन दिसते. मनात आले की संस्था काढायची. ती काही उत्तम कार्यक्षम माणसांच्या हवाली करायची व आपण वर्गणी जमवायची. संस्थेच्या दैनंदिन कारभारात त्यांचे लक्ष नसे. संस्थेमध्ये आपण मुख्य म्हणून अधिकार गाजवावा असेही कधी त्यांच्या मनात आले नाही. खर्च जास्त होते असे वाटले, तर ते कधीकधी एखादे वाक्य बोलत. एरवी कडाक्याचे वादविवाद होऊन आजीव सेवकांचे खून होण्याची पाळी आली तरी ते आपले स्वस्थ बसत. किती विषय शिकवावेत, कसे शिकवावेत, वगैरे विषय युनिव्हर्सिटीत येऊन त्यावर किती जरी काथ्याकूट झाला तरी ते कधी बोलले नाहीत. हिशेब चोख आहेत ना, वर्गणीदारांना कार्डे वेळेवर गेलीत ना, नवे वर्गणीदार किती झाले, जुने किती गळले, ह्याकडे त्यांचे लक्ष असते. आपले सहकारी संस्था नीट चालवतील ना, अशी शंकाही कधी त्यांच्या मनात आली नाही. ज्या तऱ्हेने त्यांनी मुलांच्या संसारात कधी लक्ष घातले नाही, त्याच तऱ्हेने संस्थांच्या संसारातही मन घातले नाही. वर्गणीचे काम करावयाचे. त्यातून निवृत्त झाल्यावर फक्त समारंभास जातात. अमके कसे चालले आहे, तमके कसे चालले आहे, त्याची चौकशीसुद्धा करीत नाहीत. त्यांना फार निःस्वार्थी व कर्तबगार आजीव सेवक मिळाले; व त्यांनी संस्था नावारूपाला आणल्या. हा अलिप्तपणा म्हणा, किंवा वादविवाद व भांडणांला भिणारा स्वभाव म्हणा, तो नसता व त्यांनी युनिव्हर्सिटीच्या भांडणांत पहिल्यापासून लक्ष घातले असते तर युनिव्हर्सिटी गोडीगुलाबीने मुंबईला जाती आणि सर्वांचेच कष्ट व मनाचा निष्कारण त्रास वाचला असता.
 आजोबांचा आयुष्यमार्ग असा ठराविक आहे. ते आपले सरळ त्या वाटेने जातात. उगीच उपचार व दंभ त्यांना मुळीच माहीत नाहीत. एकदा आपले ठरले ते खरे. सरळ त्या वाटेने मुकाट्याने जावयाचे. ह्यावरून एक मजेदार प्रसंग आठवला. मी एम्. ए. झाल्यावर जर्मनीत पुढच्या अभ्यासासाठी जावे असे दिनकरने ( माझ्या नवऱ्याने) ठरविले. त्याप्रमाणे
त्याने आजोबांना कळवले. आजोबा या बेताच्या विरुद्ध होते. आणखी शिकून काय करायचे? खर्च फार येईल, मी आता तुला युनिव्हर्सिटीत नोकरी देतो, वगैरे त्यांनी सांगितले. दिनकरला ते पटले नाही. तो म्हणाला, "आम्ही पैशाची काही व्यवस्था करू." एवढी बोलणी झाली व आजोबा कुठे गावाला गेले. नंतर पैसे कर्जाऊ मिळून माझे जायचे ठरले. बोट निश्चित झाली. तेव्हा दिनकरने वडिलांना एक कार्ड लिहिले की, "अमक्या बोटीने इरावती जर्मनीला जात आहे, आपला आशीर्वाद असावा." पत्राचे उत्तर ताबडतोब आले की, "माझे म्हणणे मी तुला कळवलेच आहे. हिने जावे असे मला वाटत नाही." संपले. आशीर्वाद वगैरे कुछ काही नाही! ह्या गोष्टीचे शल्य माझ्या मनाला बरेच दिवस वाटत असे. त्यातूनही अभ्यासात कधी विशेष मन घातले नाही, अशा बायांना जेव्हा त्यांनी मोठ्या उत्साहाने विलायतेला जाताना आशीर्वाद दिले, तेव्हा तर मला फारच राग आला. पण त्यांच्या ह्याही कृत्याची संगती लागली व मला त्याचे काही वाटेनासे झाल. ती संगती अशी : एकदा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हटले, म्हणजे उगीच तोंडदेखला आशीर्वाद देण्याची आजोबांची वृत्ती नाही. रागाने शाप देणे त्यांना शक्य नाही, पण उपचार म्हणून आशीर्वाद देणेही त्यांना जमणार नाही. दुसरे, ज्या बायांच्या विलायतयात्रेबद्दल त्यांनी उत्साह दाखवला त्या सर्व त्यांनी काढलेल्या स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीच्या पदवीधर होत्या. आजोबांनी जे हृदय सर्व माणसांपासून चोरून ठेवले ते त्यांनी आपल्या संस्थांना, विशेषतः हिंगण्याला दिले आहे.
 संस्थेबद्दल त्यांना फार आपुलकी वाटे व अजूनही वाटते आणि ह्या आपुलकीपुढे त्यांची उदासीनता पार कुठच्या कुठे लोपते. सासूबाई मुला व सुनांच्या जिव्हाळ्यामुळे चारचौघांत वेळीअवेळी त्यांची स्तुती करत. दुसऱ्यांशी तुलना करून माझी मुले व सुना किती चांगली ह्याचे वर्णन करीत. अगदी तीच तऱ्हा आजोबांची त्यांच्या संस्थांबद्दल होती. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.बाया व त्यांच्या विद्यापीठाच्या जी.ए.बाया ह्यांची एक अगदी नावनिशीवर यादी देऊन बी.ए.बायका काही समाजकार्य करीत नाहीत व जी.ए.बायका मात्र ते करतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी दिलेल्या यादीतील बऱ्याचशा जी.ए बाया विधवा होत्या. त्याच्या पदवीला सरकारात मान्यता नव्हती. त्यांच्या
पोटापाण्याची व्यवस्था करणे संस्थेचे एक प्राप्त कर्म होते व ते करताना जिल्ह्याच्या ठिकाणी नवी शाळा काढण्यास त्यांना मदत करून संस्थेने व आजोबांनी दोन समाजकार्ये साधली. पण त्यावरून आजोबांची तुलना योग्य नव्हती हेही कळते. ह्या तुलनेमुळे बऱ्याच बी. ए. बायका चिडल्या असल्यास नवल नाही.
 एकदा जिव्हाळा म्हटला म्हणजे संगती - विसंगती ही बुद्धिप्रामाण्ये लुळी पडतात. मी फार उंच म्हणून सासूबाई नाक मुरडीत व "काय दीपमाळ आहे !" म्हणून म्हणत. माझी मुलगी जाई अशीच उंच झाली तेव्हा म्हणत, "दिनूची मुलगी काय सुरेख उंच वाढली आहे !" संस्थेच्या बाबतीत आजोबांची वृत्ती अगदी तशीच होती. इंग्रजीतून शिकण्याने, गणित विषय सक्तीचा असल्यामुळे स्त्रियांच्या मेंदूला शीण होतो; त्यांचे असे विशेष विषय त्यांनी शिकावे, म्हणून स्त्रियांची युनिव्हर्सिटी निघाली. ह्यांतील काही जी. ए. स्कॉलरशिप मिळवून विलायतेला गेल्या तेव्हा आजोबांना फार आनंद झाला. परदेशात विदेशी भाषेतून शिक्षण घेण्याने ह्या स्त्रियांच्या मेंदूला त्रास होईल असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. उलट आमच्या जी. ए. पदवीधर बी. ए. ची बरोबरी करू शकतात म्हणून भरपूर जाहिरात झाली. प्रेमाच्या राज्यात तर्काला जागा नाही आणि आजोबांचे एकमेव प्रीतिस्थान त्यांच्या संस्था, तेव्हा ते असे वागले तर नवल नाही. संस्थेच्या बाबतीत तरी ते केवळ छाया नसून हाडामासाचे माणूस आहेत हे पटते.
 आजोबांच्या संस्थेवरील प्रेमामुळे जसे कुटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असे वाटते, तसेच संस्थेत शिकण्यास आलेल्या काही व्यक्तींबद्दल झाले असा माझा समज आहे. संस्थेत आरंभी आरंभी बऱ्याच विधवा शिकल्या. काही थोड्यांनी पुनर्विवाह केला. पण बऱ्याच अशा विधवा होत्या की पुनर्विवाहासारखे वय असूनही आजोबांनी त्यांच्या हाती जबाबदारीची कामे सोपवली व विवाहाचा प्रश्न पुढे आणलाच नाही. कदाचित् असेही झाले असेल की, ह्या विधवांनीच पोटापुरते मिळून प्रतिष्ठेने समाजसेवा करता येत आहे, तर विवाह नको, असा निर्णय घेतला असेल. कदाचित् हिंगण्याची संस्था व पुनर्विवाह हे विषय अगदी वेगवेगळे ठेवण्याच्या आजोबांच्या संकल्पामुळे येथे शिकाऊ बाया त्यापासून दूर राहिल्या
असतील. शिक्षण व पोटाचा प्रश्न आधी आणि मग विवाहाचा प्रश्न असा जो आजोबांनी निर्णय घेतला तो विधवांनाच नव्हे तर सर्वच स्त्रियांना उपकारक ठरला ह्यात शंका नाही.
 संस्थासंस्थांतही डावे-उजवे आहेच. जोपर्यंत युनिव्हर्सिटीचे केंद्र पुणे होते, युनिव्हर्सिटीच्या एकमेव कॉलेजचे प्रिन्सिपॉल व युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार हिंगण्याचे आजीव सदस्य होते, तोवर आजोबांच्या मनात हिंगणे व युनिव्हर्सिटी हा भेदभाव नसावा. हिंगण्याची संस्था युनिव्हर्सिटीचा जन्मदात्री. मुलगी कायम आईशी संलग्न राहील असे त्यांना वाटत असावे. खरोखर पाहता विद्यापीठ मुंबईस जावयाचे- ते तसे जावे म्हणून ठाकरसीबाईंची धडपड, तर ते पुण्याहून जाऊ नये अशी हिंगण्याच्या मंडळींची इच्छा. येथेही आश्रमाच्या प्रेमाने उचल खाल्ली व आजोबांना सर्व वादविवादात त्रयस्थाची भूमिका घेता आली नाही; आणि सर्वांनाच अतोनात त्रास सोसावा लागला. ह्या सर्व प्रसंगातही त्यांनी पुढाकार घेतला नाही. इतर बरीच जणे होरपळून निघाली. पण हे मात्र सहीसलामत सर्व मानसन्मानासह होते तेथे राहिले. तरीही त्यांचे प्रेमाचे पहिले स्थान हिंगण्याची संस्था हेच राहिले आहे. एखादे पत्र वाचून आजोबा विशेष प्रसन्न दिसले म्हणजे हिंगण्याला काही पैशाचे दान त्या पत्रातून मिळाले असले पाहिजे, असा गौरीचा ठाम सिद्धांत आहे ! परगावचे कोणी भेटण्यास आले तर अजून उत्साहाने सांगतात, "अहो, तुम्ही हिंगण्यास जा. तिथला आश्रम ही एक फार उत्तम संस्था आहे." त्यांचे प्रेम आग्रही व अहंकारी नाही. पुष्कळ आजीव सदस्यांना वाटते की आपल्याशिवाय संस्था चालायची नाही. त्यामुळे सर्व सूत्रे ते हाती ठेवतात; सर्व कामे मोठ्या हिरीरीने अंगावर घेऊन पार पाडतात; इतरांना वाव देत नाहीत. आजोबांनी तसे केले नाही. त्यामुळे संस्थेचे सर्वच सभासद संस्थेच्या उत्कर्षासाठी झटले. अण्णांच्या मोठेपणाच्या सावटाखाली त्यांचे कुटुंबीय व सहकारी खुरटले नाहीत.
 कित्येक मोठ्या माणसांना आपले असे काही वैशिष्ट ठेवावेसे वाटते. शरीराबद्दल अनास्था हे तर मोठेपणाचे लक्षणच मानले जाते. आजोबांची वृत्ती अशी मुळीच नाही. शरीराचे चोचले करायचे नाहीत, पण शरीर हे वैरी आहे असे म्हणून त्याला दंडही करायचा नाही, अशी त्यांची वर्तणूक
आहे. फक्त लिहिण्यावाचण्याचा आनंद शरीराला मिळाला म्हणजे पुरे; इतर कोणताही आनंद पापमय आहे म्हणून त्यापासून दूर राह्यचे, अशी कल्पना बऱ्याच ऋषितुल्य मोठ्या माणसांची भारतात आहे. पण आजोबा त्याला अपवाद आहेत. ते आपणहून एखाद्या आनंदासाठी धावपळ करीत नाहीत; तो आनंद मिळाला नाही तर त्यांना चुकल्याचुकल्यासारखे वाटत नाही. त्यांची वृत्ती सदैव प्रसन्न, आनंदमय आहे; पण एखादी चांगली गोष्ट मिळाली तर अगदी आस्वाद घेऊन ते तिचा उपभोग घेतात. ते कधीही दारूसाठी हपापलेले नसतात. असा एखादा जिन्नस जगात आहे ह्याची नित्याच्या व्यवहारात त्यांना दखलही नसेल. पण त्यांच्या मुलाने त्यांना रोज रात्री निजायच्या आधी घोटभर पिण्यासाठी म्हणून मद्य (Wine) आणून दिले होते; ते अगदी स्वाद घेत घेत, मान डोलवून, "छान लागते!" असे म्हणत ते घेत. बाटली संपली- मग त्याबद्दल बोलणे नाही. त्यांचे खाणे मांसाहाराचे नव्हे; पण कांदे घातलेले अंड्याचे चुरचुरित ऑमलेट ते आवडीने खातात. कोंबडीच्या किंवा बैलाच्या मांसाच्या अर्काचे गरम गरम सूप ते चमच्याचमच्याने मिटक्या मारीत मारीत पितात. बाटली संपली की ते खाणेही संपले. ते त्याचा विचारही करीत नाहीत. त्यांना पोळी किंवा फार तूप असलेले पदार्थ आवडत नाहीत. पण बाहेर गेले की लोक वाढतील ते खातात. ते आवडले, का नावडले ह्याची चर्चा करीत नाहीत. एकदा एका मानलेल्या मुलीकडे जेवावयास गेले होते. संध्याकाळी मी सहज विचारले, तेव्हाच मला म्हणाले, "अग, तिला माहीत असूनही तुपात भिजलेला शिरा केला होता. खावा लागला!" रेशनच्या दिवसांत आम्ही नेम केला होता की काळ्या बाजारात एक पैचा जिन्नस घ्यावयाचा नाही; जे रेशनमध्ये मिळेल ते खायचे. फक्त अधूनमधून माझ्यातले गहू कोणाला देऊन त्या बदल्यात बाजरी मिळाली तर मी घेत असे. आजोबांनी तांबडा मायलो, मक्याच्या भाकऱ्या, उकड्या तांदुळाचे जिन्नस, सर्व काही खाल्ले, आणि संतोषाने; कुरकूर न करता. जी साखर मिळे त्यातला थोडा जास्त वाटा त्यांना देत असू, पण कधी काळ्या बाजारातली साखर आणावी लागली नाही. गुळाच्या पोळ्या, गुळाचे, बेसनाचे किंवा मुगाचे किंवा कणकीचे लाडू, गुळाची केक- सर्वच गोडधोड गुळाचे होई. त्यांनी कधी नाक न मुरडता ते खाल्ले, रेशन संपले, साखर आली, आता साखरेचे खातात. रेशनच्या दिवसांतल्या
हालांचे रसभरित वर्णन किती लोक करतात; पण रेशन आले व गेले, आमच्या घरात आजोबांनी कसलीच दखल घेतली नाही.
 ते सत्तर वर्षांचे असताना त्यांचे बरेच दात पडले होते. शिल्लक होते त्यांत खालचा व वरचा दात एकत्र येऊन चावण्यास मदत होईल अशा जोड्या नव्हत्या. खाण्याचा त्रास होई. मुलांनी सांगितले, नवे दात बसवा आणि त्यांनाही ते पटले. पण सासूबाई त्यांना दात बसवू देईनात. त्यांनी निरनिराळी कारणे पुढे केली. त्या म्हणत, "ज्या वयात दात पडतात त्या वयात आपण दातांनी चावावे लागतील असे जिन्नस खाऊ नयेत अशी देवाची योजना आहे."
 पण सासूबाईंच्या कानांत देव आपल्या योजना कुजबुजताे हे मानावयास आजोबा काही तयार नव्हते. ते म्हणत, "देवाने नागडे जन्माला घातले म्हणून आपण काही जन्मभर नागडे राहात नाही. डोळे अधू झाले तर चष्मा लावून वाचतोच की."
 मग सासूबाई म्हणत, "अहो, दात काढताना शेरभर रक्त जाईल."
 "हरकत नाही."
 शेवटी सासूबाईंनी अगदी रामबाण मुद्दा काढला. त्या म्हणाल्या, "अहो, आता सत्तराव्या वर्षी दोन-अडीचशे रुपये खर्च करून दातांची कवळी घेणार? समजा, काही बरेवाईट झाले तर ती कोणाच्या उपयागी का पडणार आहे? जोडे, कोट वाटले तर नवीन घ्या. पण एका कवळीपायी एवढे पैसे नका घालवू"
 हा मुद्दा आजोबांना पटण्यासारखा होता. पण दातांमुळे नुसती स्वतःचीच गैरसोय होत नव्हती, तर इतरांनाही त्रास झाला असता; आणि आपल्यामुळे एवढासुद्धा त्रास कोणाला होऊ नये अशी त्याची इच्छा. ते सासूबाईंशी बोलले नाहीत. सासूबाईंना वाटले, आपण जिंकली. आजोबा एकदा अप्पांकडे राह्यला म्हणून गेले. आठपंधरा दिवस राहून नवीन कवळी बसवून आले व सासूबाईंनी खूप बडबड केली, ती ऐकून घेतली.
 इतर जेवतात ते आजोबा जेवतात. वेडी वेडी बंधने आपल्यावर लादून घ्यायची, त्यांची जाहिरात करायची आणि ती पाळता यावीत म्हणून आपल्याला व जगाला त्रास द्यायचा, अशी त्यांची वृत्तीच नाही. खरेखुरे गरिबीचे जेवण ते आवडीने जेवतात. बाजरीची, जोंधळ्याची भाकरी,
लसणाची तिखट चटणी व त्यावर तेल ह्या गोष्टी आजही ते आवडीने खातात. अंबाडीची किंवा फणसाची भाजी, त्यावर लसणाच्या फोडणीचे तेल ह्या जिनसा ते मिष्टान्न म्हणून खातील. चार माणसांसारख्या आवडीनिवडी आहेत, पण त्या आवडीनिवडींचा त्यांनी कधी बडेजाव केला नाही. अमके सात्त्विक, अमके तामस, अशा निरर्थक चिकित्सा करीत बसले नाहीत. सर्व खाणे सारखेच - सर्व पदार्थांनी त्यांच्या पोटात जाऊन त्यांची प्रकृती धारण केली. अन्नाला त्यांचे गुण आले. त्यांनी कधी अन्नाचे गुण धारण केले नाहीत. मी दिवसातून चारदासुद्धा चहाकॉफी पितो, असे त्यांनी सांगितले की कित्येक आहारचिकित्सक अगदी वाईट तोंड करून निघून जातात.
 जी गोष्ट जिभेची तीच इतर इंद्रियांची. गृहस्थाश्रमाचा त्यांनी उपभोग घेतला - आनंदाने घेतला. स्वतःचा मोठेपणा वाटण्यासाठी बायकोच्या कामुक वृत्तीचा उल्लेख काही महात्म्यांनी केला. काहींनी ब्रह्मचर्याचा डांगोरा पिटला. काहींनी आपल्या सहकाऱ्यांवर व अनुयायांवर नसते नियम लादले. आजोबा स्वतःचे जीवन पूर्णतया जगले. अगदी छिद्रान्वेषी मनुष्यालासुद्धा त्यांच्या आयुष्यात स्त्रियांच्या बाबतीत वावगे असे काही सापडणार नाही. स्त्रियांच्या संस्थेत, त्यातून विधवाश्रमात, काम करण्यात जन्म गेला; पण त्यांनी कधी कोणत्याही मुलीला आपली सेवा करू दिली नाही. मर्यादेची लक्ष्मणरेषा त्यांनी कुठल्याच बाबतीत, कधीही ओलांडली नाही. तसा गवगवा त्यांनी केला नाही.
 त्यांना सौंदर्यदृष्टी मात्र आहे. पूर्वी ते कोणाशी कधी फारसे बोलले नाहीत. आताही इतरांशी बोलत नाहीत. पण ते स्वतःशीच मोठ्याने व स्वच्छ बोलतात, ते आम्हांला ऐकू येते आणि साहजिकच त्यांचे विचार कळतात. एखाद्या दिवशी माझ्या हृदयात कसेसेच होते. त्यांनी लपवलेले विचार आज उघडे होत आहेत आणि जे पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही ते आपण पाहात तर नाही ना, अशी अपराधाची जाणीव मनाला होते. पण मी आपण होऊन ऐकत नाही, आणि जे ऐकते ते इतके निर्व्याज असते की, त्यांच्याजवळ लपवायला काही नव्हतेच हे समजून येते. लोकांच्याजवळ लपवायचे म्हणून ते अबोल नव्हते, अबोलपणा हा त्यांचा स्वभाव होता. परवा 'वन्य जाती' ह्या मासिकाचा अंक माझ्या टेबलावर
पडला होता व नेहमीच्या पद्धतीप्रमाणे इतर बुकांबरोबर तोही त्यांनी घेतला. वरतीच तो अंक होता म्हणून हाती धरला. त्यावर एका वन्य कन्येचे चित्र होते. आजोबांनी न्याहाळून पाहिले, मान डोलवली व म्हटले, "सुंदर आहे, सुंदर आहे."
 उत्तम संगीत व नाटक ही त्यांना मनापासून आवडतात. कधी पैसे टाकून गाण्याच्या बैठकीचे किंवा नाटकाचे तिकीट त्यांनी घेतलेले स्मरत नाही. कोणी नेले तर संकोच न करता जातात आणि अगदी शेवटची तान व शेवटचा अंक होईपर्यंत बसून ऐकतात व बघतात.
 त्यांच्या वागण्यातली निर्व्याजता मुलाची आहे. एक प्रकारचा आत्मकेंद्रितपणा आहे; तोही मुलाचा आहे. फरक एवढाच की, मुले रुसतात, रागावतात. हे मूल बहुधा आत्मतुष्ट असते. यंदा विभागासाठी काम करायला मला जीप गाडी मिळाली आहे. ती जेव्हा मोकळी असेल तेव्हा आठ आणे मैल भाडे देऊन डेक्कन कॉलेजातील लोकांना ती वापरता येते. मी ती एक दिवस घरी आणली व आजोबांना खडकवासल्याच्या धरणापर्यंत फिरायला नेऊन आणायला सांगितले. बरोबर गौरीची एक मैत्रीण व माझे एक मित्र बडोद्याचे प्रो. कालेलकर असे होते. गौरीला सांगितले होते की धरणावरून परत या. पण तिला तिच्या आजोबांप्रमाणेच खर्चाची कधी कल्पना नसते, तिने आजोबांना धरण तर दाखवलेच, पण नॅशनल डिफेन्स ॲकाडेमी, पुणे युनिव्हर्सिटी, वगैरे चांगले ४० मैल फिरवून आणले. आजोबा चढ चढून, धरण पाहून मोटरीत बसले. युनिव्हर्सिटीत बागवानाकडून फुलांचा मोठा गुच्छ विकत घेऊन नातीबाईने आजोबांना दिला, सगळी मंडळी अगदी खुषीत होता व मोटरीत गात होती. मुली म्हणत होत्या, "Que Sera, Sera, Whatever will be will be" आजोबा म्हणत होते "त्रैगुण्यविषया वेदाः निस्त्रैगुण्याे भवार्जुन…" कोणीच अर्थासाठी गाणी म्हणत नव्हते, आनंद व्यक्त करायचा ती एक तऱ्हा होती, एवढेच. घरी आल्यावर एवढी हवा खाल्लयामुळे भूक लागली होती. आजोबा, नातीबाई व पाहुणी हात मारून जेवली व नंतर आजोबा नेहमीप्रमाणे तीन तास बाळ झोपेने झोपले. कधी अननस, हापूसचा आंबा किंवा असाच काही सर्वांच्या आवडीचा जिन्नस आणला व सर्वांना बशा भरून ठेवल्या म्हणजे आजोबा मिटक्या मारून खातात. बशी रिकामी झाली की निरागसपणे विचारतात, "एवढाच का माझा वाटा?" दिनू नाही तर मी
आमच्यातले इवलेसे देतो. आजोबांना वाटते, आपण कधी जास्त मागत नाही; अगदी काटेकोरपणे वाट्याचे तेवढे खातो. गौरीला पण तसेच वाटते!
 आजोबांची टापटीप फार असते. सगळे कपडे अगदी नीट घड्या करून जागच्या जागी ठेवलेले असतात. कपडे मळले तर आजकाल त्यांच्या लक्षात येत नाही; म्हणून ते पाहून धोब्याला देण्याचे काम दिनूचे. किती माणसे म्हातारी झाली, पेन्शनात आली, म्हणजे कपड्यालत्त्यांत फार गबाळेपणा करतात. काही कार्यकर्त्यांना गबाळेपणा म्हणजेच कर्तृत्वाची निशाणी वाटते, ह्यांनी कधीही गबाळेपणा केला नाही, पोषाख साधाच. पण तो नेहमी टापटिपीचा असतो. सदऱ्याचे किंवा कोटाचे बटण तुटले तर "अग, हे एवढं बटण शिवून दे बरं." असे सांगतील. शर्ट लांब हाताचा घालतात व कफांना बटणाऐवजी रुंद एक इंच बंद शिवलेला असतो. ह्यामुळे बटणे किंवा कफलिंक घालाय-काढायचा त्रास वाचतो. हा बंद बरेचदा उसवतो; पण उसवलेल्या बंदांचा शर्ट ते कधी घालीत नाहीत. बाहेर जाताना धोतर, लांब कोट व टोपी (पूर्वी रुमाल) असा त्यांचा पोशाख. कुठे जायचे असले म्हणजे ठरलेल्या वेळेआधी पंधरा मिनिटे ते तयार होऊन बसतात. दोन वर्षांपूर्वी रात्री नवाला कुठच्या तरी सभेला जायचे होते; म्हणून ते पाऊणेनऊलाच पोशाख करून तयार राहिले. साडेनऊ झाले; त्यांना घेऊन जाणाऱ्या माणसाचा पत्ता नाही. ते पोशाख बदलून येऊन बैठकीच्या खोलीत वाचीत बसले. एवढ्यात त्यांना घेऊन जायला मोटार घेऊन गृहस्थ आले. मी खूप रागावले. हे फक्त म्हणाले, "थांबा, येतो." मी म्हटले, "असू दे आता पायजमा, धोब्याकडचा आहे. वर फक्त कोट घाला." पण छे! त्यांना नाही ते पटले. ते परत खोलीत जाऊन नीट पोशाख करून आले.
 नुकतीच झालेली गोष्ट. मी कुठून गावाहून आले होते. बैठकीच्या खोलीत खुर्चीवर एक फ्लॅनेलची विजार दिसली. चौकशी करता समजले की ती दिनूने आजोबांसाठी शिवायला टाकलेली त्याच शिंप्याकडून आली होती. आजोबांना दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे सत्कारसमारंभासाठी जायचे होते. फेब्रुवारीचे दिवस. थंडी बरीच होती. मी म्हटले, "आज धोतर नका नेसू. नवी फ्लॅनेलची विजार घालून जा!" त्यांनी विजार पाहून अगदी पसंतीने मान डोलवली. आंघोळ करून कपडे करू लागले. विजार घातली. मी
कपाटातून कोट काढून दिला. विजार होती लोकरीच्या कापडाची, तपकिरी रंगाची. कोट होता लोकरीचाच पण राखी रंगाचा. कोट हाती घेतला व मला म्हणाले, "हे काय, ह्या विजारीवर हा कोट कसा चालेल? बरा दिसेल का?" मी "छान आहे." म्हटले; पण माझे मत मानायला ते तयार नव्हते. भास्करने "छान आहे, शोभतो." असे म्हटल्यावर तो कोट घातला. दिनू गावाला गेला होता. तो परत आल्यावर त्याला ही हकीकत सांगितली, तेव्हा त्याने मुकाट्याने कोटाच्या रंगाची नवी विजार करवून आणली! न्हावी जर पंधरवड्याने आला नाही तर उद्गारतात, "अरे, केस बरेच वाढले आहेत. जा बरं, न्हाव्याला बोलवून आण." हल्ली विस्मरण फार होते. न्हावी एका आठवड्याने आला तरी परत केस कापायला बसतात! आजोबा वहाण घालून सतरंजीवर पाऊल टाकीत नाहीत. सतरंजीच्या बाहेरच्या फरशीवर वाहणेशिवाय चालत नाहीत!
 पूर्वी आजोबा कफल्लक असत. सासूबाईंना महिना रुपये पस्तीस (हे त्यांनी भांडून भांडून मिळविले होते), आमच्या घरी राहायला आले म्हणून आम्हांला रुपये पंचवीस (गेली १५ वर्षे देत आहेत. हा अपरिग्रहाचा एक भाग); एवढे गेले म्हणजे सत्तर रुपये पेन्शनीपैकी फक्त दहा रुपये उरत. त्यांत स्वतःचे करावयाचे म्हणजे फार काटकसरीने राहावे लागे. मी मागे म्हटले की त्यांचे कुटुंबाकडे लक्ष नव्हते. पण एक मात्र अपवादात्मक गोष्ट आठवते. त्यांनी २५ वर्षांपूर्वी अप्पांना एक हजार रुपये दिले. इतर मुलांना तेवढे दिले होते म्हणून. अप्पांनी ताबडतोब मोठ्या उत्साहाने ते हजारच्या हजार 'संततिनियमन' ह्या पुस्तकाची नवी आवृत्ती काढण्यात खर्च करून टाकले. नंतर बऱ्याच वर्षांनी परत अप्पांचे नीट चालत नाही, बायकाेच्या आजारामुळे अतोनात खर्च झाला, वगैरे गोष्टी यांच्या ध्यानात आल्या. अर्थात् हे गुपित नव्हते. आम्ही सर्व व खुद्द अप्पाही त्याबद्दल बोलत असत. पण ते ऐकून ध्यानात धरले हे नवल! अप्पाच्या हातांत पैसे दिले तर तो लगेच खर्च करून टाकील, म्हणून त्यांनी भास्करजवळ तीन हजार रुपये हिंगण्याच्या संस्थेत ठेवावयास दिले व सांगितले की अप्पाला कधी गरज लागली तर ह्यांतून दे. सासूबाई गेल्यानंतर आजोबांचा खर्चच नाहीसा झाला. त्यांनी स्वतः व दिनकर ह्या जोड-नावाने बँकेत खाते काढले. त्यात पैसे पडत असतात. ते स्वतः कधी किती पैसे आहेत. ह्याची चौकशी करीत
नाहीत. कुठे पैसे द्यायचे झाले म्हणजे आपण आकडा सुचवला की दे म्हणतात. मला वाटते, पैशाचा मुळीच हिशेब केला नाही अशी हीच वर्षे त्यांच्या आयुष्याची असावीत. आम्ही त्यांच्यासाठी चांगले चांगले कपडे शिवून आणतो व त्यांचेच पैसे खर्च करतो. तरीही खूप पैसे उरतात. दर वर्षी संस्था व व्यक्ती मिळून तीन-चारशे रुपये तरी इकडेतिकडे दे म्हणून दिनकरला सांगतात. फक्त दर महिन्याला न्हाव्याचे पैसे व सुपारीचे पैसे आपल्या पैशातून मागून घेऊन देतात ! जुन्या सवयीचे एवढेच वैशिष्ट आता राहिले आहे.
 त्यांचे वागणे प्रसन्न, वाणी गोड व त्या सर्वांपेक्षाही हसणे गोड, मनमोकळे व खदखदून आहे. मुद्दाम उपचाराने वागणे त्यांना जमत नाही. पण नैसर्गिक वागणेच इतके आर्जवी की मनुष्य मोहून जातो. माझ्या आईला मी पुष्कळ अर्ज-विनंत्या करून माझ्या घरी राहावयाला बोलावते. सासूबाई होत्या तेव्हा त्यांनी आईला पाहिले की हसून म्हणावे, "का भागीरथीबाई, आलीस वाटतं! आता बरेच दिवस मुक्काम असेल?" ह्या पहिल्या सलामीनंतर माझ्या आईला चारदोन दिवस राहवून घेणेसुद्धा शक्य होत नसे. आता आई आली व आजोबांनी तिला पाहिले म्हणजे तेही हसून म्हणतात, "कोण? भागीरथीबाई का? फार दिवसांनी आला?" एवढ्यावर आई अगदी प्रसन्न होते. "अग, त्यांनी मला ओळखलं! चारच महिने झाले ना जाऊन, पण फार दिवसांनी आलात म्हणाले." असे दिवसातून दहादा मला सांगते.
 आजोबांनी मुद्दाम आशीर्वाद दिला नाही. पण आयुष्यातले दोन प्रसंग आजोबांमुळे चिरस्मरणीय झाले आहेत. माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कर्व्यांकडचे जेवण होते. लग्नांत दोन्हीकडच्या निरनिराळ्या नातेवाईकांकडून इतका आचरटपणा व आडमुठेपणा झाला होता, की मी अगदी कावून गेले होते. मन अप्रसन्न, भांबावलेले असे होते. पंक्तीत श्लोक म्हणणे चालले होते. नेहमी शेवटचा श्लोक आजोबांनी म्हणावयाचा अशी इकडे पद्धत आहे. आजोबांचा आवाज नाणे वाजवावे असा खणखणीत व वाणी स्पष्ट आहे. माझ्या मनस्तापात इतर काय म्हणाले, इकडे माझे लक्षही नव्हते. पण आजोबांच्या आवाजाने व उच्चारांच्या स्पष्टपणामुळे माझे मन वेधले. "प्रेयो मित्रं बंधुता वा समग्रा" हा श्लोक आजोबा सावकाशपणे
म्हणत होते. आजोबांचे शब्द किती स्पष्ट ! दगडावर कोरून लिहावे त्याप्रमाणे एकएक अमृताची ओळ माझ्या कानांवर पडत होती व माझ्या हृदयावर कोरली जात होती. माझे मन शांत झाले. हा आशीर्वाद घेऊन मी कर्व्यांच्या घरी आले.
 दुसरा प्रसंग नुकताच पाच-सहा वर्षांपूर्वी घडला. आजोबांना घेऊन आम्ही सर्वजण हैदराबादला माझ्या भावाकडे दिवाळीला गेलो होतो. दिवाळीच्या अवसेच्या दिवशी बंगला शृंगारण्यात, मुले दारू उडवीत होती ते पाहण्यात श्रम व जाग्रण झाले होते. शिवाय सुटी म्हणून आम्ही उशिराच उठत असू. माझा भाऊ व आजोबा सहाच्या आतच उठून चहा वगैरे घेत आणि आजोबा गरम कपडे घालून बागेत फेऱ्या घालीत. तसेच पाडव्याच्या दिवशी घालीत होते. त्यांचा पायरव येऊन मी जागी झाले. एवढ्यात त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात गेली. "अंतरिचा ज्ञानदिवा मालवूं नको रे- " पाडव्याच्या पहाटे ऐकलेले हे शब्द असेच हृदयात कोरून राहिले आहेत. आयुष्याच्या ह्या काळात परत आजोबांनी मार्ग दाखवला. पहिल्या आशीर्वादाने पूर्वायुष्य उजळले, आताच्या उपदेशाने उत्तर आयुष्यात माझी सोबत व्हावी.
 ' नुकतीच एका अमेरिकन मित्राला स्थितप्रज्ञ म्हणजे काय, ज्ञानोत्तर व्यवहार म्हणजे कसा असतो हे समजावून सांगत होते. तासभर आमचे संभाषण झाल्यावर त्याने विचारले, "अहो, तुम्ही सांगता तसे माणूस कधी खरोखरीचे तुमच्या पाहण्यात आले आहे का ?"
 मी विचार करून उत्तरले, "पाहण्यात काय, माझ्या घरात असं माणूस आहे; पण मी इतकी पापी, की ही स्वभावलक्षणं ज्ञान्याची की आत्मतुष्ट आत्मकेंद्रिताची हेच मला कळत नाही. "
 केवढे माझे भाग्य, की मी अशा माणसाची सून झाले! त्याहीपेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही !

*