Jump to content

भारता'साठी/पौरुषहीनांचे इतिहासप्रेम

विकिस्रोत कडून


पौरुषहीनांचे इतिहासप्रेम


 कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाबद्दल पंतप्रधानांनी बैठक बोलावली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी, कर्नाटकचे पटेल - दोघेही मुख्य विवादी हजर होते. तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील हा विवाद वर्षांनुवर्षे चालला होता. १९२४ साली मद्रास प्रांताचे गव्हर्नर आणि म्हैसूरचे महाराजा यांच्यात उभयपपक्षी करार झाला. एका बाजूला इंग्रज शासन आणि दुसऱ्या बाजूला, महाराजा असला तरी, देशी – दोघांमधील तडजोडीत झुकते माप इंग्रजांच्या बाजूनेच पडले असणार हे उघड आहे. कराराची मुदत पन्नास वर्षांची होती. १९७४ साली ती संपली. आता दोघेही विवादी भरतीय संघराज्यातील समान दर्जाची दोन घटक राज्ये - दोनही राज्यांतील सर्व पक्षांनी आणि पुढाऱ्यांनी आपापली बाजू कडेलोटाच्या अभिनिवेशाने मांडली. दोन शेजारी राज्यांत वर्षानुवर्षे शत्रुराष्ट्रांत असावी तशी वैमनस्याची भावना पेटत होती. त्यातच जयललिता अम्मांनी त्यांचे राजकारण पुढे ढकलण्याचे हत्यार म्हणून कावेरीवाद हाती घेतला; या प्रश्नावर दिल्लीचे सरकार कोसळते काय अशी भीती निर्माण झाली.
 अशा मोठ्या कडेलांटाच्या परिस्थितीत संबंधित पक्षांची बैठक झाली आणि सर्वसंमत तडजोड निघाली. वाटपाची जुनीच पद्धत चालू राहवी; पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत काही अडचणी आल्या तर त्यांचे निराकारण दस्तरखुद्द पंतप्रधानांच्या अध्यतेखालील एका समितीने करावे; या समितीला सल्ला देण्यासाठी तंत्रविशारदांचा एक गट असावा असेही ठरले. राज्यशासनाच्या पातळीवर प्रश्न निकालात निघाला. करुणानिधी आणि पटेल या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे.
 दोनही राज्यांतील विरोधी पक्षांनी गहजब सुरू केला. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हितांचा बळी दिला; अशी तडजोड करायची होती तर इतकी वर्षे हा वाद पेटत ठेवलाच कशासाठी? अशा टीकांच्या फैरी झाल्या; पण त्या सगळ्यांना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शांतपणे, धीरगंभीरपणे आणि मुत्सद्दीपणाने तोड दिले. यापेक्षा चांगली तडजोड निघणे शक्य नव्हते. तेव्हा, सद्य:परिस्थतीत राज्याचे जास्तीत जास्त हित सांभाळणारी ही व्यवस्था आहे, असं त्यांनी स्पष्ट मांडले. केंद्रशासनानेही दिरंगाई न करता तत्परतेने निर्णयासंबंधी अधिसूचना जारी केली. सुदैवाने, यंदा पाऊसमान व्यवस्थित आहे. दोनही राज्यांत सध्यातरी पाण्याचा तुटवडा नाही. त्यामुळे, विरोधकही संघर्ष, आंदोलन अशी भाषा न करता शांत बसलेले दिसत आहेत. करुणानिधी आणि पटेल यांचा मुत्सद्दीपणा असलेले नेतृत्व राज्याराज्यात आणि केंद्रशासनात उभे राहिले तर अनेक प्रश्न सोडवणे सहज शक्य व्हावे.
 गेल्या पन्नास पर्षांत प्रश्न सुटले असे कोणतेच नाहीत; नवे नवे प्रश्न तयार होत गेल्यामुळे जुन्या प्रश्नांचा काहीसा विसर पडला, त्या प्रश्नांवरील भावनांची तीव्रता थोडी कमी झाली आणि त्यामुळे, ते प्रश्न मिटल्यासारखे वाटते, एवढेच; पण काही निमित्ताने सुप्त विवादांचा उल्लेख झाला तरी दोन्ही बाजूची मंडळ भीमदेवी गर्जना करून जिवाच्या आकांताने, लढण्याचे संकल्प बोलू लागतात.
 महाराष्ट्र आणि कर्नाटक यांतील बेळगाव हिल्ह्यासंबंधी सीमाप्रश्नाचे उदाहरण घ्या. राज्यपुनर्रचना झाल्यानंतरचीच वर्षे मोजली तरी, चाळीस वर्षे हा वाद धुसमसत राहिला आहे. राज्यपुनर्रचनासमितीने काही निर्णय दिला, महाजन समितीने शिफारशी केल्या; पण प्रश्न काही सुटला नाही. सुरुवातीसुरुवातीस सीमा प्रश्नावर मोठी जनआंदोलने झाली. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी बांधून सीमाप्रश्नी लढ्यात उडी घेतली. दोन्ही राज्यांतील सर्व पक्षांचे पुढारी सीमाप्रश्नावर मोठ्या तावातावाने बोलतात आणि मोठ्या पोटतिडकीने आपली बाजू मांडतात; पण सीमावाद सुटण्याची काही लक्षणे नाहीत. मनोहर जोशी आणि पटेल एकत्र येतील आणि काही समझोता काढून सीमावाद एकदाचा संपवून टाकतील अशी काही शक्यता दिसत नाही. मराठी काय आणि कानडी काय - दोघेही एकाच देशाचे नागरिक, दोन थोर संस्कृतीचे वारसदार; पण सीमाप्रश्नावर आले की, विरुद्ध बाजूचे लोक म्हणजे निव्वळ रानटी, दुष्ट, दुसऱ्याच्या प्रदेशावर बळजबरीने हक्क सांगणारे राक्षस असल्या भाषेत ते बोलू लागतात. जणू काही, सीमावादाचा प्रश्न हा चीन आणि भारत यांमधील ईशान्य सरहद्दीवरील वाद किंवा भारत-पाकिस्तान यांमधील जम्मू-काश्मिरचा वाद या बरोबरीचा वाद असावा.
 ईशान्य सरहद्दीच्या प्रश्नाबद्दल हिंदुस्थान आणि चीन असेच तुटून बसले आहेत. हिंदुस्थानचे म्हणणे इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश स्वातंत्र्यानंतर हस्तांतरणाने आमच्याकडे आला आहे; चीनचे म्हणणे - इंग्रजांच्या साम्राज्यवादी आक्रमणामुळे त्यांनी अनेकाचे प्रदेश बळकावले, त्याचा फायदा घेण्याचा हिंदुस्थानने प्रयत्न करू नये. त्यावर प्रतिवाद असा की, मुळात तिवेट हाच चीनचा भाग आहे का नाही? चीनमधील तिबेटच्या प्रदेशाच्या धार्मिक सत्ताधाऱ्याशी इंग्रजांनी करारमदार केले होते. पार राजधानी ल्हासापर्यंत भारतीय टपालसेवा चालत असे. मग, चीन त्या आधीचा इतिहास सांगू लागला. सारा चीन कम्युनिस्टांनी मुक्त केला त्याबरोबर धर्मवाद्यांच्या आधिपत्याखाली गुलामीचे जीवन जगणाऱ्या तिबेटी लोकांनाही त्यांनी मुक्त केले. हिंदुस्थानने पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा सोडविले. त्यासारखाच हा इतिहास. थोडक्यात, युक्तिवादाने हा प्रश्न सुटण्यासारखा नाही, सीमाप्रश्न उभा राहिला, इंच इंच जमीन लढविण्याच्या भाषा सुरू झाल्या, एक तसूभर जमीन गेली तरी भारतमातेची विटंबना होईल अशा काव्यपंक्ती लोकांच्या लोकांच्या तोंडी आल्या; युद्ध झाले, हिंदुस्थानच्या लष्कराला माघार घ्यावी लागली, मग चिनी सैन्य मागे परतले. आजही जगातील सर्वात उंच, दुर्गम अशा प्रदेशात मरणाच्या थंडीत दोन्ही बाजूचे जवान गस्त देत असतात. वाद मिटण्याची काही लक्षणे नाहीत. तडजोड करणे म्हणजे अपमान स्वीकारणे, आपली पौरुषहीनता कबूल करणे असा एक मोठा गंड सर्व नागरिकांच्या आणि नेत्यांच्या मनात घर करून समझोता करावा आणि प्रश्न मिटवून टाकावा, तेथे ठेवाच्या लागणाऱ्या प्रचंड लष्कराचा खर्च आणि तकलीफ कमी करावी अशी हिम्मत कोणी नेता करणार नाही. त्याच्या विरुद्ध लगेच, भारतमातेचे विच्छेदन केल्याचा गिल्ला होईल. मध्येतरी, काही नेत्यांनी थोडा समजुतीचा सूर काढण्याचा प्रयत्न केला; पण लोकांची प्रतिक्रिया पाहिल्यावर त्यांनी तातडीने काढता पाय घेतला.
 जम्मू आणि काश्मिरचा प्रश्न तर त्याहूनही निकराचा. हिंदु आणि मुसलमान या दोन जमातीत उभे हाडवैर. अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झली तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कमेकांविषयी कमालीचा विद्वेष आणि शत्रुभावना धगधग राहिली आहे. भलेभले सज्जन हिंदुस्थानी आणि पाकिस्तानीसुद्धा हिंदुस्थान-पाकिस्तानच्या वादात न्याय, सत्य, शांती या मूल्यांचा काही संबंध नाही असे मानतात. पाकिस्तानी तेवढा सारा नीच. दिसेल तेव्हा ठोकून काढावा अशी हिंदुस्थानात भावना आणि तीच परिस्थिती पाकिस्तानातही. फाळणीच्या वेळी पाकिस्तानला तोडून दिलेले सिंध, पंजाब, बलुचिस्तान, पूर्व बंगाल हे प्रांत सोडल्यास पाकिस्तानने कोणत्याच संस्थानी प्रदेशावर हक्क सांगणे गैर आहे अशी हिंदुस्थानी लोकांची ठाम समजूत आहे. जुनागढ संस्थान बहुसंख्य हिंदु प्रजेचे संस्थानिक मुलसमान नवाब. भारताच्या स्वातंत्र्य कायद्यानुसार संस्थान हिंदुस्थानात विलीन करावयाचे का पाकिस्तानात हे ठरविण्याचा अधिकार व्यक्तिशः संस्थानिकांकडे सोपविण्यात आला होता. जुनागढच्या नवाबाने पाकिस्तानात सामील व्हायचं ठरविले. संविधानाच्या दृष्टीने तसे करण्याचा त्याला हक्क होता; पण बहुसंख्य हिंदु प्रजेला पाकिस्तानात घालण्याचा या नवाबाला काय अधिकार असे. साहजिकच, हिंदुस्थानात मत. लष्कराच्या मदतीने जुनागढ संस्थान ताब्यात घेण्यात आले; हिंदुस्थानात सर्वत्र 'आनंदी आनंद जाहला.'
 दक्षिणेतील हैदराबाद हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान. बहुसंख्य प्रजा हिंदु, आधिपत्य मुसलमान निजामाचे. येथेही वाद जुनागढसारखाच. जुनागढ निदान एका कोपऱ्यात समुद्रतटाकी बसलेले. हैदराबाद उपखंडाच्या मध्यभागी - ते पाकिस्तानात जाणे म्हणजे हिंदुस्नानी भूप्रदेशाला मध्यभागीच भगदाड पडण्यासारखे पोटात असा कॅन्सरचा गोळा राहिला तर हिंदुस्थान जगूच शकत नाही हे स्पष्ट होते. लष्कर पाठवून निजामाचे सारे संस्थान हिंदुस्थानने ताब्यात घेतले.
 जम्मू आणि काश्मिरची परिस्थिती नेमकी याउलट, राजा हिंदु, प्रजा बहुसंख्येने मुसलमान; पण काश्मिरची स्वत:ची अशी प्राचीन संस्कृती आहे. ती अर्वाचीन हिंदुस्थानच्या कडव्या मुसलमानी समाजधारणेशी तर नाहीच नाही. काश्मिरचा राजा निर्णय करण्यास असमर्थ ठरला. पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या नवाखाली लष्कर पाठवून आक्रमण केले. काश्मिरी प्रजा आणि हिंदुस्थानी लष्कर त्याला परतवून लावले; निम्मा प्रदेश मोकळा झाला. निम्मा पाकिस्तानच्या अंमलाखाली राहिला. शस्त्रसंधीची रेषा आखली गेली, ती रेषा ओलांडून पाकिस्तानव्याप्त प्रदेश मुक्त करणे हिंदुस्थानी लष्कराला झेपणारे नाही म्हणून ते शस्त्रसंधी रेषेवर पहारा देत बसले आहेत. शेख अब्दुलांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या काळात असलेली निर्धामिक राष्ट्रभावना संपुष्टात आली. हिंदुस्थानी प्रशासक, लष्कर आणि कामिश्मिरी नेते यांच्या भ्रष्टाचाराला काश्मिरी वैतागले. हिंदुस्थानच्या तावडीतून सुटण्याकरिता मदत करण्यासारखा शेजारी देश म्हणजे पाकिस्तानच. स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाच्या उद्घोषाखाली पाकिस्तानने प्रशिक्षित आतंकवादी काश्मिरात पाठवून घातपात घडवून आणण्याचा तडाखा लावला आहे.
 पंजाबातील आतंकवाद संपुष्टात आणणे हिंदुस्थानी सुरक्षा दलांना मोठ्या कष्टाने का होईना, जमले. कारण, तेथील हिंदु व शीख समाजांमध्ये खोल खाई आहे. हिंदुस्थानी लष्कराची स्थिती व्हिएटनाममधील अमेरिकन फौजेसारखी थेट झाली नाही. कारण, एकच की, पाकिस्तानविषयी काश्मिरी लोकांच्या मनात मोठी धास्ती आहे. हा वाद मिटण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. काश्मिर प्रश्नावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान - दोन्ही देशांत कडेलोटाच्या तीव्र भावना आहेत. सार्वमत घ्यावे आणि उभय पक्षांनी निर्णय खिलाडूपणे मान्य करावा या अटीवर समझोता होण्याची शक्यता नाही. शस्त्रसंधी रेषा आता पन्नास वर्षे कायम आहे, देशाची फाळणी झाली तशी काश्मिरचीही झाली आहे. त्या फाळणीला फक्त अधिकृत मान्यता मिळण्याचेच बाकी राहिले आहे, ती देऊन हा प्रश्न सोडवावा असे धीटपणे सांगण्याची हिम्मत कोणत्याही पक्षाचे पाकिस्तानी सरकार करू शकणार नाही. हिंदुस्थानातही तीच स्थिती. दोनचार वेळा लपतछपत असा प्रस्ताव पुढे आला; अगदी सरकारी पातळीवरही या शक्यतेवर चर्चा झाली; पण, काश्मिरची फाळणी झाली तर लोकक्षोभाचा डोंब उठेल आणि अशा योजनेला पाठिंबा देणारांची त्यात आहुती पडेल हे इतके स्पष्ट होते की हा प्रस्ताव पुढे नेण्याचे धैर्य कोणाला झाले नाही.
 हिंदुस्थान-पाकिस्तानातील काश्मिर वादासारखीच परिस्थिती इस्त्रायल आणि अरब देशांतील संघर्षात आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान रबीन यांनी तडजोडीसाठी पाऊल पुढे टाकले आणि त्यांची हत्या झाली. काश्मिर प्रश्नावर समझोता करू धजावणाऱ्या हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी पंतप्रधानांची स्थिती तीच होणार आहे. शांततेचा मंत्र सांगणाऱ्या महात्मयाची हत्या करणाऱ्या या उपखंडात राजकीय समझोता करू पाहाणाऱ्या पुढाऱ्यांचा काय टिकाव लागणार आहे? शस्त्रसंधी रेषेवर उभयतांची लष्करे सज्ज आहेत. दररोज घातपाताचे प्रकार घडत आहेत; पण तडजोड काढली तर आपली देशद्रोह्यांत गणना होईल या भीतीने कोणी समझोत्याचे पाऊल उचलण्यास धजावत नाही. गेल्या दोन महिन्यापासून तर दोन्ही देश हातात अणुबाँब घेऊन सज्ज झाले आहेत. अण्वस्त्रांचा वापर झाला तर साऱ्या आशिया खंडाचाच काय पृथ्वीचाही विद्ध्वंस होईल हा धोका असताना 'काश्मिर प्रश्नाचा समाधानकारक निर्णय झाल्याखेरीज आम्ही अणुबाँबचा पहिला वापर न करण्याचा करार करू शकणार नाही.' असे पाकिस्तानी पंतप्रधान म्हणतात. हिंदुस्थानचे पंतप्रधानही म्हणतात, "आक्रमणासाठी त्याचा वापर करणार नाही." एवढेच म्हणतात; पण आक्रमण म्हणजे नेमके काय याची व्याख्या जो तो आपल्या सोयीने करीत असतो. आपल्यावरच आक्रमण झाले आहे असा कांगावा खुद्द हिटलरनेही केला होता. आजही आक्रमक असाच युक्तिवाद करतात. तात्पर्य, दोन्ही देश जगाचा विध्वंस झाला तरी चालेल पण काश्मिर प्रश्नी तसूभर मागे हटणार नाही. अशा जिद्दीने एकमेकांसमोर ठाकले आहेत.
 जगभर सर्वत्र राष्ट्रराष्ट्रातील विद्वेषाचा विखार पिढ्यान्पिढ्या जळत ठेवला जातो असे दिसत नाही. इंग्लंडपासून रशियापर्यंत सर्व युरोपीय देश एकमेकांशी शतकानुशतके महावैराची युद्धे झुंजत आले आहेत. या युद्धात प्रदेशच्या प्रदेश ओसाड झाले, लखावधी ठार झाले, जखमी अपंगांची मोजदादजच नाही. चालू शतकातही दोस्त राष्ट्रे विरुद्ध जर्मनी अशी दोन महायुद्धे घडली. युद्धाच्या काळात एकमेकांवर आगीचा वर्षाव करणारे देश आज युरोपीय संघटनेत सामील झाले आहेत. एकराष्ट्राच्या भावनेने सतत प्रगती करीत आहेत. जपान अमेरिकेची तीच परिस्थिती. दुसऱ्या महायुद्धात दोन्ही राष्ट्रे कमालीच्या कडवटपणे झुंजली. मनुष्यजातीच्या इतिहासातील सर्वात राक्षसी आणुबाँबचा हल्ला हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर झाला. क्षणार्धात लक्षावधी माणसे मृत्यूमुखी पडली. जपानला शरणागती स्वीकारावी लागली. पंतप्रधान तोजो यांना फाशी देण्यात आली; पण युद्ध संपताच चित्र झटकन बदलले. दोघांत काही संस्कृतीची समानता नाही. दोन देशांतील भाषांचे एकमेकांशी काही नाते नाही आणि तरीही, अमेरिका आणि जपान परममित्र असल्यासारखे सारे जुने विसरून नांदत आहेत. साम्यवादी रशिया आणि भांडवलवादी अमेरिका यांच्यापेक्षा अधिक कडवे वैर जगाच्या इतिहासात कधी झालेच नाही; पण लोखंडी पडदा फिटला आणि ही दोन्ही राष्ट्रे कमालीच्या सलोख्याने, गुण्यागोविंदाने संबंध ठेवीत आहेत. आयर्लंडमधील वाद संपत आहेत. दक्षिण अमेरिकेतील वंशविद्वेषाची व्यवस्था फाळणी झाली पूर्व जर्मनी समाजवादी रशियन आधिपत्याखाली समाजवादी बनला, तर पश्चिम जर्मनी भांडवलशाही व्यवस्थेचा आदर्श नमुना मानला गेला. हिंदुस्थान-पाकिस्तानचे जसे उभे वैर तशीच स्थिती पूर्व-पश्चिम जर्मनीची ही दोन शकले पुन्हा एकत्र झाली. आज एकसंध राष्ट्र म्हणून भूतकाळातील सर्व कडवटपणा विसरून सलोख्याने राहत आहेत. वर्षांनुवर्षे सापमुंगसाप्रमाणे झुंजलेले देश आपापल्या भूमिकांविषयीचा अट्टाहास सोडून नव्या मार्गाने आंगकूच करीत आहेत.
 विकसित संपन्न राष्ट्रातील लोक जुन्या चिघळणाऱ्या वादांवर वेळ आणि शक्ती व्यर्थ घालवीत नाहीत. काही व्यावहारिक तोडगा शोधून काढतात. समझोता स्वीकारण्याकरिता आवश्ये ती दूरदृष्टी दाखवतात. समझोत्यामुळे समाधान कोणाचेच होत नसते. दोन्ही पक्षांतील असमाधानाची पातळी जवळपास सारखी करणे एवढाच समझोत्याचा उद्देश असतो. ते असमाधान स्वीकारण्यात काही मुत्सद्दीपणा असतो आणि पुष्कळसा व्यवहारी हिशेबही असतो. जुन्या वादांवर अभिमानापोटी झुंजत राहिल्याने नवी प्रगती खुंटते. प्रतिस्पर्ध्याकडून अधिक हिस्सा वळकावण्यापेक्षा तोच वेह आणि ताकद वापरून दुसऱ्या क्षेत्रात अधिक लाभ पदरी पाडून घेता येईल. अशा हिशोबाने जुन्या वादावर पांघरूण घालण्याची तयारी अशा देशातील नागरिक आणि नेते दाखवितात.
 गरीब देशातील लोक असा समजूतदारपणा म्हणा, मुत्सद्दीपणा म्हणा का हिशोबीपणा म्हणा क्वचितच दाखवितात. भावाभावांची जमिनीवरून वादंगे होतात, प्रकरणे कोर्टात जातात, वर्षांनुवर्षे तारखा पडत राहतात, वकीलांच्या तिजोऱ्या भरत जातात आणि मूळचे मालदार भाऊ खचत खचत जातात. तरीही, "आपला भाऊच आहे, घेऊ दे त्याला थोडे जास्त." फसा समजूतदारपणा, दिलदारपणा, उदारपणा फारसे कोणी दाखवत नाही. आपण भांडण मिटवले आणि भावाचे मन जिंकून घेतलं तर दोघांच्या एकोप्याने गावात, तालुक्यात दोघांचाही दबदबा वाढेल असा दूरदर्शी मुत्सद्दीपणा त्याहूनही दुर्मिळ भाची खोडकी जिरविण्यासाठी पैसे, बुद्धी, ताकद घालविण्यापेक्षा दुसरा काही उद्यागधंदा सुरू केला तर वादातील मालमत्तेपेक्षा कित्येकपट अधिक मोठे घबाड पदरात पडून घेता येईल असा शुद्ध स्वार्थी हिशेबीपणासुद्धा क्वचितच सुचतो.
 जशा व्यक्ती तसेच राष्ट्र. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांत देशाची प्रगती झाली नाही. साधनसंपत्ती भरपूर असलेला हा देश अजूनही जगातील भिकारी देशांच्या पंगतीतच आहे; याची कारणे अनेक आहेत; पण काश्मिर, पंजाब, ईशान्य प्रदेश येथील फुटीवर चळवळीचा पाडाव करण्यात अपरंपार शक्तिपात झाला आणि त्यामुळे विकासाची गती खुंटली हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे. देश म्हणजे कोणी आपली आई आहे आणि भूप्रदेशाचा एवढासा तुकडा काढून देणे आहे अशा काही प्रतिमा इतक्या रुजल्या आहेत की, "देशाच्या रक्षणात आम्ही प्रयत्नांची प्रत्येक भाषणात म्हणताना चौऱ्याहत्तर वर्षांच्या अटलविहारी वाजपेयींचा गळा भरून येत आहे आणि डोळ्यांतून स्फुल्लिंग बाहेर पडत आहेत. असा भास होतो आणि श्रोत्यांच्याही मनात राष्ट्रभक्तीची एक प्रचंड लाट उसळून जाते, "देशाकरिता मरण्यासाठी कोण तयार आहे त्याने पुढे यावे." असे आवाहन केले तर लक्षावधी लोक त्याक्षणी तरी सहर्ष पुढे येतील. अशी ही राष्ट्रभक्तीची प्रभावी भावना गरीब देशांत सापडते.
 सगळ्या देशाची फाळणी झाली. फाळणी झाली तो देशही इंग्रजांच्या साम्राज्यवादामुळे एका राजकीय छत्राखाली आलेला. इतिहासात इंग्रजी अंमलाखालील हिंदुस्थानसारखा देश एक अंमलाखाली कधीच नव्हता. पूर्वापारचा इतिहास पाहू गेले तर वायव्येस अफगाणिस्तानापासून तो अग्नेयेस बळीच्या बेटापर्यंत हिंदुस्थानच्या संस्कृतीची सलगता सापडते हे खरे; पण हिंदुस्थानचा राजकीय नकाशा म्हणतात तो इंग्रजांनी तयार केला. अनेकांच्या मनात भारतमातेचे असे एक मोठे सुंदर चित्र असते. काश्मिरात विपुल केशसंभार मंडित मुख. गंगायमुनेचे असे एक मोठे सुंदर चित्र असते. काश्मिरात विपुल केशसंभार मंडित मुख, गंगायमुनेच्या प्रदेशाचे बक्षस्थल, कच्छ आणि बंगालचे उजवेडावे बाहू आणि रामेश्वरी पदकमले असे चित्र अनेक कॅलेंडरवाल्यांनी काढले आहे.
 "जिचे पदकपीठ हे जन म्हणोत लंकारिते
 सुवर्णकलशापरी पदतले अलंकारिते।।"
 असले वर्णन अनेक कवीनी रंगविले आहे.
 हिंदुस्थानच्या प्रतिमेशी काही आकृतिबंधात उभ्या माणसाच्या प्रतिमेशी काही सादृश्य आहे. बाकी बहुतेक देशांचे आकार लोळागोळाच असतात. तेथील कवी राष्ट्रमातेचे चित्र कसे रंगवितात कोणास ठाऊक! ऑस्ट्रेलिया तर मला उलटा टांगलेल्या डुकराच्या आकाराचा वाटतो. इंग्लिश लोक.
 "ब्रिटानिया राज्यकरी समुद्रलाटांवरी,
 तुझे पुत्र न मानतिल कधी गुलामगिरी"
 असे अभिमानाने म्हणतात, ब्रिटानियाचे चित्रही कधी कधी पहायला मिळते; पण तिला ब्रिटिश बेटांच्या भौगोलिक आकाराच्या गोणपाटात बळजबरीने बसविण्याचा प्रयत्नही कोणी करत नाही. भारतमातेची चित्र खोल रुजण्यात नकाशाच्या आकृतिबंध इंग्रजांनी जमविला आहे. इतिहासाने नाही. त्याचीही फाळणी. लक्षावधी लोक निर्वासित झाले, दोनचार जिल्हे इकडचे तिकडे झाल्याने इतिहासाला किंवा संस्कृतीला काही तडा जाणार आहे असे नाही. विशेषतः त्या प्रदेशातील नागरिकांची एकत्र राहण्याची इच्छा नसेल तर त्यांना बळजबरीने कोंडून ठेवण्यात शहाणपणा नाही, देशभक्ती नाही आणि व्यवहारीपणा तर त्याहून नाही.
 स्वयंनिर्णयाचे तत्त्व एकदा मान्य केले असते तर बेळगावपासून काश्मिरपर्यंत सगळे प्रश्न सुटण्याला काहीच अडचण आली नसती. अशी उदारमतवादी भूमिका घेतली असती तर कोणत्याही सार्वमताचा निर्णय आपल्याविरुद्ध गेला नसता. ज्याला बाहेर जायचे असेल त्याला दार उघडे आहे अशी स्पष्ट भूमिका असली की, बाहेर जाण्याची खळखळ फारशी कोणी करीत नाही. दरवाजा बंद आहे असे दिसले की, बंदीच्या मुठी दरवाजावर आदळू लागतात.
 समजा, सार्वमताचा निर्णय आपल्या विरुद्ध गेला असता, काश्मिर वेगळे झाले असते किंवा पाकिस्तानात गेले असते; काय झाले असते? असल्या समस्यांचा बोजा राहिला नसता तर जागतिक राजकारणात हिंदुस्थानची प्रतिमा उज्ज्वल तर झाली असतीच; पण त्यापलीकडे आपण संपन्नतेच्या दिशेने झपाट्याने आगेकूच करीत राहिलो असतो. महायुद्धात उद्ध्वस्त झालेला पश्चिम जर्मनी तीन दशकांत वैभवाच्या शिखराला पोहोचला. तेथील राहणीमान, रोजगाराच्या संधी आणि स्वातंत्र्याच्या कक्षा लक्षात आल्यावर पूर्व जर्मनीच्या नागरिकांच्या मनातील विभक्त राहण्याचा हट्ट वितळून गेला. सारा राग, द्वेष सोडून पूर्व जर्मनी पश्चिमेतील भावांबरोबर नांदायला तयार झाला.
 संपन्न घरातून वेगळे कोणीच पडू इच्छित नाही. हिंदुस्थानात देशापासून किंवा राज्यापासून वेगळे होऊन स्वतंत्र चूल घालण्याचा खटाटोप चळवळी, आंदोलनाने सर्व दूर होत आहेत. अमेरिकेत अशी एकही चळवळ नाही. उलट, अमेरिकेतील नवे राष्ट्रे आनंदाने तयार होती. दरिद्री भारतात भावंडांना मारूनमुटकून बळजबरीने कोंडून घरात ठेवण्याऐवजी त्यांना मोकळे केले असते, गृहकलह संपविला असता आणि उरलेला हिंदुस्थान बलसागर झाला असता तर, फुटून गेलेले भाऊसुद्धा पुन्हा एकदा हिंदुस्थानात सामील होण्याकरिता आनंदाने तयार झाले असते.
 ही समजसपणाची बुद्धी श्रीमंतांना सुचते, गरीबांना क्वचित! हा काय प्रकार आहे? हे असे का होते? याचे एक कारण सहज समजण्यासारखे आहे. विकसित देशांत माणसांचे, समाजाचे आणि राष्ट्राचे हिशेब शुद्ध आकड्यांचे असतात. अधिकाधिक सुखाने जगावे, अनुभवाचे विश्व व्यापक करावे असा त्यांचा शुद्ध स्वार्थी विचार असतो. व्यापारी मंडळी देवघेव करायला तयार असतात; एखाद्या व्यवहारात घाटा आला तरी चालेल, पुढे कसर भरून काढू असा विचार करतात. कारकून असलो म्हणून काय झाले. साहेबाला फाडकन सांगितले आणि राजीनामा टाकून मोकळा झालो. असली बाणेदार तडफ हिशोबी माणसे दाखवीत नाहीत. आपला स्वार्थ साधायचा तर त्यात इतरांच्याही स्वार्थाची सोय झाली पाहिजे याची व्यवहारी जाणीव त्यांना असते, आपला फायदातोटा, इतरांचा कायदातोटा याचे, पैशाच्या रूपात का होईना, मोजमाप कराण्याची फूटपट्टी असली म्हणजे आक्रस्ताळीपणाचे निर्णय नाहीत.
 पारमार्थिकांचे, धर्मवाद्यांचे, समाजवाद्यांचे किंवा इतर साऱ्या 'निःस्वार्थ' जीवन आदर्शाच्या लोकांची परिस्थिती वेगळी असते. कोणाला साक्षात जगन्नियंत्या परमेश्वराकडूनच 'कुणी कसे चालावे, कुणी कसे बोलावे. यासंबंधी आदेश मिळालेले असतात. कोणाला एखाद्या सारग्रंथाने, कुराणाने, बायबलने झपाटलेले असते. आपलं जीवन हा काही वैश्विक सत्तेच्या किंवा इतिहासाच्या हेतूपूर्ततेकरिता आहे; आपली म्हणून काही तत्त्वे आहे आणि त्या तत्त्वांबाबत तरडजोड पैशाच्या राशी ओतल्या तरी होणार नाही असा काहीसा त्यांचा विचार असतो. ईश्वरी आदेशाचे मोल काय? मार्क्सच्या उकतीची किमत काय? आकडेवारी जमत नसली की, अशा तत्त्वांसाठी लोक बेहिशेबी लढाया करण्यास तयार होतात. 'शिर कटेल, पण वाकणार नाही.' अशी 'सरफरोशी की तमन्ना' अंगअंगातून सळसळू लागते. अल्लाचे नाव घ्यावे आणि खुशाल खंड खंड लूटमार, जाळपोळ, कत्तली, बलात्कार करावे आणि यामागे अल्लाचाच आदेश आहे असे मानावे हे इतिहासात वारंवार घडले आहे. बौद्धांनी केले आहे. ख्रिश्चन, मसलमान, समाजवादी या साऱ्यांनीच एका हातात आपापले 'कुराण' आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन राक्षसी विद्ध्वंस केले आहेत. स्वार्थभावनेचा कोणी कितीही उपहास करो. निदा करो; कोणाही स्वार्थी माणसाने आपल्या स्थार्थासाठी धार्मिक आणि समाजवादी यांच्या तुलनेने सहस्त्रांशही विद्ध्वंस केलेला नाही.
 संपन्न देश आणि संपन्न लोक आकाशाला गवसणी घालणाऱ्या वावदूक तत्त्वज्ञानाला आटोक्यात ठेवतात, चर्चमध्ये जातात, अनुभवाची ती छटा महत्त्वाचीही मानतात; पण 'देवाचे नाणे देवाला, राजाचे राजाला' असा विवेकही करतात. निर्णय घेण्यासाठी काही निश्चित फूटपट्टी ठरली की, निर्णय घेणे सोपे होते. हिशेबाने होते; प्रलयंकारी होत नाही, प्रत्यक्ष परिणाम पाहू गेले तर ईश्वर, परमार्थ आणि करुणा यांचा जप करणारांनीच महापातके केली आणि आपल्या संसारासाठी धडपड करण्याऱ्यांनी परमोच्च नैतिकता दाखवीली असे म्हणावे लागेल. मग, ही सांसारिक नैतिकता गरीब समाजात अभावानेच का आढळावी? खरे म्हटले तर, गरीबांनाच जीवनमान उंचावण्याची, शिकण्याची, औषधपाण्याची गरज असते. व्यवहारी हिशेबांपणा त्यांना अधिक सहजपणे सुचला पाहिजे; पण असे होत नाही.
 बेहिशेबी परमार्थ हे प्रगतीचे लक्षण नाही. माकडातून नुकत्याच उत्क्रांत झालेल्या मानवप्राण्याच्या अवस्थेशी सुसंगत असलेली ती मनोधारणा आहे. आपल्या उत्क्रांत इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या साहाय्यानेमाणूस जितकी प्रगती करतो तितका तो अमूर्त कल्पना आणि आदर्श यांच्या कचाट्यातून सुटत जातो. चांगले रहावे, अधिक शिकावे इंद्रियांची व्यापकता वाढवावी या इच्छा आणि भका त्यांची पूर्तता केल्याने वाढत जातात; त्यांची गाडी लागावी लागते. आहार, निद्रा भय आणि मैथुन यांची आवड पुरवावी तशी वाढते. तसेच, स्वातंत्र्याच्या कक्षांची तहानही जितकी भागवावी तितकी वाढते. गरीब विकसित देश वाढत्या स्वातंत्र्याच्या चक्रात स्वतःला लोटून देतात.
 मुंबईला गिरण्या सुरू झाल्या त्याकाळी बहुसंख्य मजूर कोकणातून, देशावरून आलेले असते; शेतीवर जगता न आल्यामुळे मुंबईला निर्वासित होऊन आलेले; गिरणीत नोकरी करून दोन पैसे जमले की, आपण आपल्या शेतीवर परत जायचे आहे असा ध्यास मनाशी बाळगणारे; निदानपक्षी, आपण नोकरी करीत राहवे आणि शेतिीवरल्या माणसांकडे मनी ऑर्डर पाठवून शेती चालत ठेवावी आणि गौरी, गणपती, दिवाळी, आंब्यांचा मोसम - जितके दिवस गावाकडे काढता येतील तितके काढावे अशा बुद्धीचे मंबईत कोणत्यातरी पत्र्याच्या किंवा सिमेंटच्या चाळीत पाठीला पाठ लावून झोपण्यापुरती जागा असती की, पुरे झाले. तेथे बऱ्यापैकी बस्तान बसावावे, कुटुंबाला आणावे, सुखाने जगावे असा स्वार्थी विचार त्यांच्या मनाला शिवतही नसे. बोनस किंवा इतर वरकड कमाई झाली तर त्याचा उपयोग मुंबईतील जगणे सुधारण्यासाठी कधी व्हायचा नाही. बिडीचे एखादे किंवा क्वचितप्रसंगी थोडी बाटली यापलीकडे चैनशौक म्हणून नाही. ज्यादा पैसे हाती आले की 'वाल्या' मंडळी बोट भरून कोकणात रवाना. कामगारी अभावी गिरण्या बंद ठेवायची वेळ येई. काळ गेला. नवनवीन पिढ्या मुंबईत काम करू लागल्या. त्यांची गावाशी आतड्याची गुंतवणूक कमी कमी होत गेली. कुटुंबे मुंबईत स्थायिक होऊ लागले तेव्हा कोठे मुंबईकर कामगारांची जीवनमान सुधारण्याची धडपड सुरू झाली. जुन्या गावातील रहिवाशांच्या वसाहती सलगपणे मुंबईत उभ्या राहिल्या आहेत. अमुक झोपडपट्टीतला अमुक कोपरा म्हणजे रत्नांग्रीच्या खानवली जवळील आडिवरे ग्रामस्थांचा! तेवढ्या कोपऱ्यात गावचा गणपती वेगळा होणार, भजनीमंडळ वेगळे होणार, अजूनही गाव हे महत्त्वाचे एकक आहे; पण सगहेच गाचकरी समोर असल्यामुळे जरा चांगले रहावे याची गोडीही वाढत आहे. अर्थकारण हे त्यांच्या जीवनाचे सूत्र अजून झालेले नाही. रोजगार मिळेनासा झाला की विकासाच्या आर्थिक वाटा समजून घेण्याचे त्यांच्या मनातही येत नाही. जगण्याची शैली सामूहिक, टीळीची; त्यामुळे, कोणत्याही अडचणीच्या दोषाचे खापर दुसऱ्या एखाद्या जनसमूहावर फोडण्याची प्रवृती, त्यांचा राग कधी मद्राशांवर, कधी गुजराथ्यांवर, कधी मुसलमानावर फिरवणारे नेते मिळाले की प्राणपणाने झुंजायला ही मंडळी तयार.
 याउलट, अमेरिकेसारख्या संपन्न देशात अगदी श्रीमंत बापाची लाडकी लेक हातखर्चासाठी भरपूर पैसे मिळत असले तरीदेखील फावल्या वेळात अगदी हॉटेलात कपबशा धुण्याचेदेखील काम करून चार पैसे वर मिळविण्यात कमीपणा मानीत नाही. चांगले जगणे आणि स्वातंत्र्य उपभोगणे यांची गोडी लागत नाही ते जगतात. 'आहारनिद्राभयमैथुना'च्या क्रात, उच्च उच्च परमार्थाच्या कल्पना बाळगीत आणि झुंजीसाठी सोडलेल्या कोंबड्या आणि टकरीसाठी सोडलेल्या रेड्याबैलांप्रमाणे मरण येईपर्यंत झुंजत. निरर्थक झुंजत राहणे हा जनावरांचा गुण आहे. आपण कशाकरता लढतो आहोत असा विवेक करून झुंजीतील प्राणी झगडायचे थांबून झुंज पहायला जमलेल्या गर्दीकडे कुतुहलाने पाहत बसले आहेत असे झाल्याचे काही कधी ऐकिवात नाही.
 संपन्न आणि विपन्न देशातील लोकांच्या मनोधारणांत फरक असण्याचे एक कारण त्यांच्या खाण्यापिण्यातील फरक, हेही असू शकते. युरोप खंडात सर्वत्र कडव्या कॅथॉलिक पोपची अधिसत्ता शतकानुशतके चालत होती. मार्टिन ल्यूथरने प्रोटेस्टंट धर्माची स्थापना केली. परमेश्वर मानणाऱ्या पण पोपची मध्यस्थी नाकारण्याच्या अधिक खुल्या दृष्टीकोनाच्या प्रोटेस्टंट बंडाचा प्रसार झपाट्याने युरोपभर झाला. अतिथंडीचे स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी, बेल्जियम - सारे प्रोटेस्टंट बनले. इंग्लंडध्ये राजालाच श्रेष्ठ धर्मगुरु मानणारा पंथ निघाला. गंमत अशी की, स्पेन, आयर्लंड, दक्षिण फ्रान्स, इटली या देशात मात्र पोपच्या अधिसत्तेला धक्का लागला नाही. हे दक्षिणेकडील सारे प्रदेश अधिक उष्ण हवामानाचे. मुख्य व्यवसाय शेतीचा, राहणीमान निकृष्ट. वर्षातील अनेक महिने मुख्य अन्न बटाटे म्हणजेच पिष्टमय पदार्थ, आहारात प्रथिनांचे प्राधान्य असलेल्या उत्तर युरोपात ज्ञानकर्ममार्ग फोफावला आणि दक्षिणेत मात्र पोपवार श्रद्धा बाळगणाऱ्यांची चलती राहिली. निकृष्ट असंतुलित आहारामुळे माणसाची जिद्द कमी होते, तो अधिकाधिक श्रद्धाळू बनतो याचा अनुभ्ज्ञव आपल्याकडेही आहे. उपासतापास केल्याने सात्विकता वाढते. धर्मप्रवृत्ती वाढते असे आपण मानतोच. बालविधवांचे पाऊल वाकडे पडू नये यासाठी त्यांनादेखील निकृष्ट, निकस आहारावर जगविण्याची ब्राह्मण कुटुंबात पद्धत होतीच. जीवनाविषयी सकारात्मक बुद्धी असली म्हणजे अतिरेकीपणाला आळा बसतो. बुद्धी सकारात्मक बनण्याच्या मार्गात गरीबी हा मोठा अडथळा होऊ शकतो.
 जगातील बहुतेक संपन्न देश हे थंड हवामानाचे आहेत. याउलट, बहुतेक गरीब देश उष्ण कटिबंधात आहेत. उष्ण प्रदेशात माणसाच्या गरजा तशा थोड्या असतात. शरीराला उष्मांक फारसे पुरवावे लागत नाहीत. कपडालता, अंथरूणपांघरून जुजबी असते तरी चालते. आकाशाखाली झोपावे, भाकरीवर संतुष्ट व्हावे हे उष्ण प्रदेशात शक्य असते, एवढेच नव्हे तर सुखकारकही असते. थंड प्रदेशात असे जगताच येत नाही. थंडीच्या कडाक्यात पुरेसे उष्मांक मिळाले नाही. जीव वाचविण्यासाठी का होईना, राहणीमान सुधारण्याची आणि जीवनाविषयी सकारात्मक, व्यवहारी हिशोबी भूमिका घेणे भाग पडते.
 आणि शेवटी, सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. संपन्न समाज आणि लोक वर्तमान काळात जगतात, भविष्याकडे डोळे लावून जगतात. दरिद्री समाज आणि माणसे भूतकाळाकडे मागे पहात दिवस काढतात आणि जुन्या काळात कधी तरी संपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे, थोरवीचे आणि वैभवाचे वर्णन आठवतात; अशा थोर पूर्वजांचे आपण वंशज, तेव्हा 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना, भावी रम्य काल' अशा श्रद्धेने इतिहास 'चक्रनेमिक्रमाने' आपल्यावर फिरून एकदा बहाल होण्याची वाट पाहत राहातात.
 कर्णाला पौरुषाचा अभिमान होता. म्हणून सारथी कुळात जन्मल्याच्या आरोपाचा त्याला फारसा विषाद वाटत नव्हता; पण वर्तमानळात ज्यांची बुद्धी, शक्ती, धाडस कमी पडते त्यांनी जागवे कसे? आपण सर्वच तऱ्हांनी नादान ठरलो आहोत आशा नाही, वर्तमानातही काही स्थान नाही. अशांना भूतकाळाकडे नजर फिरविण्यापलीकडे काही विकल्पच रहात नाही. आम्ही असेही असू पण आमचे पूर्वज थोर, आमचे बीज श्रेष्ठ आहे, आम्ही थोर जातीचे, थोर धर्माचे, आमच्या मातृभाषेसारखी भाषा नाही, आमच्या साहिल्यासारखे साहित्य नाही, खरेखरं थोर संत झाले ते येथेच, आमच्या राजासारखे राजे कोठे झाले नाहीत. असे स्वप्न रंजन हा एकच आशेचा तंतू रहातो. या तंतूला प्राणपलीकडे जपावे लागते. हा धागाही तुटला तर मग सगळा अंधःकारच. पौरुषहीनांचे इतिहासप्रेम ही त्यांच्या ठेचल्या गेलेल्या अहंकाराची मलमपट्टी असते.
 गावागावातील शेतकरी एकमेकांशी भांडणे तंडत तंडत विनाशाकडे घसरत जातात. एमेकांतील किरकोळ वाद लढत लढत समाज आणि राष्ट्रे घसरत अधःपाताकडे जातात. सकारात्मक बुद्धी नाही म्हणून समंजसपणा दाखविता येत नाही आणि सामंजस्य नाही म्हणून सकारात्मक बुद्धी येत नाही, अशा मोठ्या दुष्ट चक्रात गरीब देश आणि लोक सापडतात आणि शतमुखांनी विवेकभ्रष्टांचा अधःपात चालू रहातो. अनादि काळापासून शतमुखांनी वाहणाऱ्या काबेरी, गोदावरी, गंगा, यमुना हे सारे विषण्ण मनाने हताशपणे युगानुयुगे पहात राहतात.

(२१ ऑगस्ट १९९८)

♦♦