Jump to content

भारता'साठी/अति दक्षता विभाग-रोगी भारत

विकिस्रोत कडून


अतिदक्षता विभाग-रोगी भारत


 संकटांची धाड येते
 "तारुण्य, वैभव, सत्ता आणि सौंदर्य या चार गोष्टींपैकी एक गोष्ट लाभली तरी त्यामुळे अनर्थ होऊ शकतो. चारही जिथे एकत्र येतील तेथे काय अनर्थ घडेल?" असे जुने संस्कृत सुभाषित आहे.
 चार चांगले दुर्गुण एकत्र आले तरी विनाश ओढवतो, मग चार दुर्गुण एकत्र आहे तर? आधीच माकड, त्यात दारू प्याला, त्या अवस्थेत त्याला विंचू चावला आणि सर्वात कडी म्हणजे त्याला भूत लागले तर त्या माकडाची स्थिती काय वर्णावी? असा विनोदी श्लोकही आहे.
 एक एक व्याधी मृत्यू ओढवण्याला पुरेशी असते. दोनचार रोगांनी मिळून हल्ला केला तर निष्णात वैद्यांनाही हात टेकावे लागतात. त्यात, ओढवलेला प्रत्येक आजार असाध्य असेल तर? एके काळी असाध्य समजले जाणारे हिवताप, देवी, विषमज्वर, प्लेग यांसारख्या रोगांवर वैद्यकशास्त्राने मात केली आहे; पण आजही कॅन्सर आणि एडस् हे दोन असाध्य रोग मानले जातात. त्यावर औषधोपचाराची नक्की उपाय योजना सापडलेली नाही.
 कॅन्सर आणि एडस्
 कोणा एकाला कॅन्सर झाला म्हटले की त्याला इस्पितळात नेऊन दाखल करायचे, केल्याशिवाय राहवत नाही म्हणून औषधोपचार करायचा, पण मनामध्ये ही निश्चिती की आपले माणूस पुन्हा ठीकठाक होऊन हिंडू फिरू लागेल हे अशक्य आहे.
 एडस् या रोगाची त्याहून भयानक अवस्था. या रोगाचा संसर्ग झाला की माणसाचा मृत्यू अटळ. या रोगामुळे माणूस मरत नाही, पण रोग्याला साध्या सर्दीपडशाची बाधा झाली तर त्या जंतूंनासुद्धा तोंड देऊन प्रतिकार करण्याची शक्ती रोग्यात राहत नाही. एडस् चा रोगी सर्दी पडशानेसुद्धा मरू शकतो.
 कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. सर्वात जास्त आढळणाऱ्या प्रकारात शरीरात काही पेशींच्या गाठी तयार होतात. या पेशी शरीरावर पोसतात, पण शरीराच्या उपयोगी काम कोणतेच करत नाहीत. झाडावरच्या बांडगुळाप्रमाणे हा पेशींचा गठ्ठा वाढत जातो. पसरत जातो. त्याच्या वाढीमुळे शरीराचे चलनवलन बंद होते आणि माणूस मरतो.
 एडस् रोगाची बाधा शरीराच्या कोणा एका भागापुरती मर्यादित होत नाही. सर्व रक्तप्रवाहच दूषित होतो. शरीरावर बाहेरून आक्रमण झाले तर त्यांच्याशी निकराने झुंजणाऱ्या आणि शरीराचे रक्षण करणाऱ्या पेशी नाहीशा होतात आणि प्रतिकार शक्तीच संपते.
 रोगाचे निदान
 दोन्ही रोग महाभयानक, एकेक मृत्यूला पुरेसा आहे, हे दोन्ही रोग कोणा एकाच माणसाला झाले तर काय सांगावे? अशा परिस्थितीची कल्पनाही करणे कठीण आहे. कॅन्सर किंवा एडस् चा रोगी परीक्षेसाठी आला, त्याच्या रोगाचे निदान झाले म्हणजे डॉक्टर रोग्याला आणि त्याच्या नातेवाईकांना शांतपणे हळूहळू परिस्थिती समजावून सांगतो. रोगाचे स्वरूप सांगतो, रोगी आणि नातेवाईक धक्क्याने कोसळून जाणार नाहीत अशा पद्धतीने त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगतो; पण त्याबरोबर त्यांच्या मनात खोटी आशा फुलेल असेही करत नाही.
 मीही अशाच प्रयत्नात आहे. आपल्या देशाचे भले इच्छिणाऱ्या मित्रमंडळीचे धैर्य कोसळता कामा नये, त्यांची हिंमत हादरता कामा नये, समोर असलेल्या शर्थीच्या झुंजीकरिता त्यांनी तयार झाले पाहिजे अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. देश आजारी आहे; आजार तसा गंभीर आहे. कॅन्सरचा संशय आहे, किंबहुना कॅन्सर आहेच. कॅन्सरला काही उपाययोजना करून पाहता येईल, कॅन्सरच्या वाढत्या गाठी शस्त्रक्रिया करून काढून टाकणे कदाचित शक्य होईल, पण पराकोटीचे प्रयत्न लागतील. कारण कॅन्सरबरोबरच सगळा देश HIV +ve आहे. सारांश, देशाला कॅन्सरबरोबरच एडस् चीही बाधा झाली आहे.
 घाबरून जाऊन धीर सोडण्यासारखे काही नाही; देश अजून वाचू शकेल; पण आजाराचे स्वरूप गंभीर आहे, प्राणघातक आहे, हे समजून प्रयत्न करावे लागतील.
 शरीर कोणते, कॅन्सर कोणता?
 कॅन्सरची बाधा फार जुनी आहे. तिच्याकडे दुर्लक्ष झाले, उपाययोजना झाली नाही. एवढेच नाही तर ज्या ज्या गोष्टींमुळे कॅन्सर बळावतो त्या सगळ्या गोष्टी रोगी फार काळ करत राहिला आहे. त्यामुळे कॅन्सरच्या गाठी शरीरात पसरल्या आहेत. देशाच्या पोषणाकरिता ज्यांची काहीही मदत नाही; उलट, पोषणाच्या कामात अडथळा आणणाऱ्या या गाठी वेगाने फोफावत आहेत. या गाठी नोकरदार कॅन्सरच्या आहेत. यात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे आहेत, गचाळ, अकार्यक्षम काम करणारे खाजगी उद्योगधंदेही आहेत. देशाच्या शरीरावर ताव मारून या सगळ्या भयानक गाठी पोसल्या गेल्या आहेत, आणखी फोफावत आहेत.
 प्रतिकार सोडाच, स्वागतच
 माणसाच्या शरीरातील कॅन्सरच्या गाठींपेक्षा देशाच्या कॅन्सरच्या गाठी अधिक भयानक आहेत. शरीरातील निरोगी पेशींना कॅन्सर आपला शतू आहे हे समजते; पण त्यांचा काही इलाज चालत नाही. देश-शरीरातील कॅन्सरच्या गाठींनी सगळ्या शरीरातील पेशींची खात्री पटवून दिली आहे की त्या गाठी म्हणजेच देश आहे. देशाचे भले त्यांनाच समजते. कॅन्सरची जितकी वाढ होईल तितके त्या शरीराचे भले होईल अशी देशाच्या घटकांची खात्री पटली आहे. गाठी पसरत आणि बळावत आहेत आणि शरीरातील निरोगी पेशी त्यांची वाहवा करत आहेत, टाळ्या पिटून आनंदोत्सव करीत आहेत.
 एडस् ची बाधा
 एडस् च्या रोग्याच्या शरीराप्रमाणेच देशाचीही स्थिती झाली आहे. कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती तर सोडाच, इच्छाही राहिली नाही. सातबाराच्या उताऱ्यासाठी गेलेला शेतकरी तलाठी सांगेल ती रक्कम निमूटपणे त्याच्यासमोर ठेवतो. गावचा पाटील तालेवार माणूस, पण गावांत आलेल्या पोलिस शिपुर्ड्याचीसुद्धा कोंबडी, बाटली आणि दक्षिणा ठेवून आळवणी करतो. दुकानदार, व्यापारी मंडळी घिरट्या घालणाऱ्या इन्स्पेक्टरच्या झुंडींना बिनतक्रार हप्ता देतात. आसपासचे गुंडागर्दी करणारेसुद्धा बिनदिक्कत येतात, हप्ते मागून घेऊन जातात. कारखानदार म्हणजे बडी प्रस्थे, पण अधिकारी आणि पुढारी दोघेही त्यांच्याकडून सुटकेसा भरभरून वसुली करून जातात. ही सगळी लूट आपण देशाच्या भल्याकरिता करीत आहोत, आपण म्हणजेच देश, 'कॅन्सर' म्हणजेच शरीर असे म्हणत लूट करतात आणि त्याबद्दल कुणीही रागवत नाही, चिडत नाही. लाच मागणाऱ्याला पोलिसात नेण्याचा प्रश्नच नाही. एका कॅन्सरच्या गाठीविरुद्ध दुसऱ्या गाठीकडे तक्रार गुदरण्यात काय अर्थ आहे? असे स्वतःचे समाधान करून आपल्या नपुंसकतेचे, प्रतिकारहीनतेचे समर्थन करीत स्वस्थ बसून राहतात. कॅन्सरसारखा रोग आणि प्रतिकारशक्ती संपलेली!
 काही निरोगी पेशी अजून शिल्लक
 देश अजून थोडीफार हालचाल करतो आहे. धुगधुगी दाखवतो आहे. कारण कॅन्सरच्या गाठींसकट सगळ्या देशाला पोसण्याचे काम अजून काही पेशी करत आहेत. सगळ्या सरकारी कारभाराचा जाच सोसूनही शेतकरी शेते पिकवीत आहेत. कोठे सरकारशी, इन्स्पेक्टरांशी लढता? आपल्याला जमेल तसे व्यापारउदीम चालवावा अशा विचाराने व्यापारी, स्वयंरोजगारी काम करत आहेत म्हणून देश चालत आहे.
 रोग बळावतो आहे. कॅन्सरच्या गाठी सगळ्या नाड्यांना आवळून अधिक कठोरपणे सर्व जीवनरस शोषून घेण्याच्या प्रयत्नाला लागल्या आहेत. कॅन्सरचा प्रभाव जितका वाढेल तितकी त्याची प्रतिकार करण्याची शक्ती एडस् च्या प्रभावाने कमी होते आहे.
 वैदूंचा विषोपचार
 रोगी इस्पितळात आहे; पण आशा फार नाही. जुनीपानी माणसे पंचाक्षऱ्याकडून अंगारे धुपारे करवत आहेत. गंडे, दोरे बांधणाऱ्या वैदूंचीही गर्दी उसळली आहे. राहिल्यासाहिल्या निरोगी पेशीत एकमेकांत लढाई लावून देण्याची त्यांची उपाययोजना आहे. त्यासाठी जातिद्वेषाचे, धर्मद्वेषाचे विष ते शरीरात सोडत आहेत.
 हजारो वर्षांच्या दुरवस्थेने खंगलेला देश, त्यात कॅन्सरसारखा असाध्य रोग, त्यात एडस् मुळे प्रतिकारशक्ती संपलेली आणि औषध म्हणून विषाची इंजेक्शने! अतिदक्षता विभाग, रोग्याचे नाव भारत; त्याच्या परिस्थितीसंबंधीची ही कागदपत्रे!


(६ ऑक्टोबर १९९३)

♦♦