Jump to content

भारता'साठी/'नियतीशी गाठ' हुकल्याचा महोत्सव

विकिस्रोत कडून


'नियतीशी गाठ' हुकल्याचा महोत्सव?


 तीन आठवड्यांपूर्वी १९९६ चे वर्षे मावळून १९९७ उगवले. १९४७ साली येथून इंग्रज गेले, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला या घटनांना लवकरच ५० वर्षे पुरी होतील. साहजिकच, स्वातंत्र्याची ५० वर्षे पुरी झाल्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयाऱ्यांना आतापासूनच सुरुवात झाली आहे.
 केंद्र शासनाने हा महोत्सव धुमधडक्यात साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या आहेत. एक मंत्रीपातळीवर, एक अधिकाऱ्यांच्या पातळीवर आणि एक देशातील मान्यताप्राप्त व्यक्तींच्या पातळीवर. वेगवेगळ्या राज्यसरकारांनीही त्यांच्या त्यांच्या प्रदेशासाठी अशीच तयारी चालू केली आहे.
 स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि दिल्लीच्या दरबारगृहात आपले प्रख्यात 'नियतीशी गाठ' भाषण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा, अशोकचक्र चिन्हांकित तिरंगा झेंडा फडकला. सर्व देशभव लोकांनी प्रभातफेऱ्या, मिरवणुका, कवायती, रोषणाई स्वयंस्फूर्तीने केले; वरून धो धो पडणाऱ्या पावसाला न जुमानता बेहोश होऊन देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला.
 पहिल्या पंतप्रधानांनी पंतप्रधान म्हणून केलेल्या त्यांच्या पहिल्या भाषणात 'राष्ट्रपिता' म्हणून ज्यांना गौरव केला ते महात्माजी स्वातंत्र्यदिनाच्या कोणत्याच जल्लोशात सामील नव्हते; बंगालमध्ये जातीय दंग्यात उद्ध्वस्त झालेल्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम ते करीत राहिले.
 स्वातंत्र्यदिनाचा सोहळा काही वर्षे लोक साजरा करीत राहिले. १९५० साली गणराज्याची घोषणा झाली. राजपथावर राष्ट्रपतींनी सर्व लष्करी तुकड्यांची सलामी शाही थाटात घेतली. देशभर पुन्हा एकदा सगळीकडे दीपोत्सव झाला.
 गणराज्याच्या वर्धापनदिनी फडकविलेला राष्ट्रध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाच दिवसांनी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि स्कॉटलंडमधील बॅगपाईप वाद्यांच्या सुरांवर होऊ लागला.
 भारतीय तसे उत्सवप्रिय; पंडितजी त्यातल्या त्यात रसिकराज. त्यांची सगळी जीवनशैलीच पाश्चिमात्य. राष्ट्रीय महोत्सव कसे साजरे करायचे याचा सगळा तपशील बारकाव्यांसह ते स्वतः लक्ष घालून ठरवीत. १५ ऑगस्टच्या पहाटे ऐतिहासिक लाल कित्याच्या बुरुजावरील झेंडावंदन; २६ जानेवारीला राजपथावरील परेड, झेंडा उतरविण्याचा कार्यक्रम हे सगळे त्यांच्या प्रतिभेचे आविष्कार. महात्माजींची हत्या झाली ती पहिल्या स्वातंत्र्यदिनानंतर साडेचार महिन्यात. महात्माजींचा अंत्यविधी कसा व्हावा, त्यांचे समाधीस्थान कसे असावे हेही पंडितजींनी स्वतःच ठरविले. त्यानंतर दिल्लीत अंत्यविधी झालेले सारे पंतप्रधान विश्रांती घेत पहुडले आहेत. ते पंडितजींनी ठरविलेल्या ठशाच्या समाधीस्थानांत.
 भारताचे हे राष्ट्रीय महोत्सव जगभर प्रसिद्ध आहेत. झेंडा उतरविण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी स्कॉटलंडमधील संगिताचा जो जलसा होतो तसा खुद्द स्कॉटलंडमध्येही पहावयास किंवा ऐकावयास मिळत नाही अशी कुत्सित कबुली खुद्द स्कॉटलंडमधील लोकही देतात आणि त्याबद्दल आनंद वाटण्याऐवजी खऱ्याखुऱ्या भारतीयांच्या माना शरमेने खाली होतील.
 वर्षांमागून वर्षे गेली. स्वातंत्र्यदिन आले आणि गेले. स्वातंत्र्यदिन सरकारी बनला. राज्याच्या पातळीवर राज्यपाल, जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकारी, तालुक्याच्या पातळीवर मामलेदार खात्याच्या खाक्याप्रमाणे स्वातंत्र्यदिनाचा समारंभ पार पाडू लागले. प्रमुख अधिकाऱ्याने या दिवशी राष्ट्रीय वेष परिधान करावा, झेंडा फडकवावा आणि आपण प्रतिनेहरूनच आहोत अशा थाटात समोरच्या कनिष्ठ नोकरदारांना भाषण सुनवावे अशी प्रथा पडून गेली. देशाने प्रगती किती केली. अजून बाकी राहिलेल्या समस्या किती मोठ्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सर्वांनी देशभक्तीने प्रेरित होऊन त्याग-प्रसंगी बलिदान करण्यासही कसे सज्ज राहिले पाहिजे असे भाषण झेंडा फडकविणारे हे लोक करू लागले. वेगवेगळ्या खात्यांत याच्याच आवृत्या होऊ लागल्या.
 स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवाचा खरा जाच होतो तो शाळेतील विद्यार्थ्यांना. त्यांचा बिचाऱ्यांचा काहीच अपराध नसताना त्यांना भल्या पहाटे उठून शाळेत जावे लागले; झेंडावंनदचा कार्यक्रम पार पाडावा लागतो, रटाळा कंटाळवाणे भाषण ऐकावे लागते, मैल मैल मिरवणुकीत चालावे लागते, ज्यांचा अर्थ समजत नाहीत अशा घोषणा द्याव्या लागतात.
 पहिल्या स्वातंत्र्यदिनानंतर ५० वर्षे उलटली; स्वातंत्र्यदिन उत्साहाने कोणी साजरा केला आहे असे ऐकिवात नाही. राज्य सरकारी झाले, तसाच स्वातंत्र्यदिनही सरकारी झाला. स्वातंत्र्यदिनी हक्काची सुट्टी मिळते एवढाच काय तो सार्वजनिक आनंदाचा भाग!
 स्वातंत्र्यदिन साजरा करण्यातला उल्हास का मावळला? नवेपणाचा उत्साह टिकून राहाणे कठीण असते हे खरे; पण वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचा उत्साह दिवाळीचा उत्साह वाढतच चालला आहे. गणपती, नवरात्र, दांडिया असे नवेजुने उत्सव दरवर्षी वाढत्या जल्लोशात साजरे होत आहेत. मग, स्वातंत्र्यदिनावरच अशी अवकळा का आली?
 कारणे अनेक असतील; पण त्यातील एक आणि अत्यंत महत्त्वाचे कारण स्वातंत्र्याने जनसामान्यांची केलेली महत्त्वाचे कारण स्वातंत्र्याने जनसामान्यांची केलेली निराशा हे आहे. स्वातंत्र्य आले; पण देश अधिक बलवान झाला नाही. स्वातंत्र्य आले; पण देशाची इभ्रत, वाढणे सोडाच, पार धुळीस मिळाली. इंग्रज गेले, वसाहतीवादी लूट गेली पण देशाची अर्थकारणातील घसरगुंडी थांबली नाही. महागाई, बेकारी, गरीबी भ्रष्टाचार गुंडगिरी थैमान घालीत आहेत. थोडक्यात, स्वातंत्र्यानंतर गांधीजींचे स्वप्न साकारले नाही. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले तेव्हा चर्चिल साहेबांनी एक अभद्र भाकित केले होते. 'हिंदुस्थानचे सारे राजकीय नेतृत्व कचखाऊ, कमअस्सल आहे. हिंदुस्थानातील दरिद्री जनतेला त्यांच्या हाती सोपविणे क्रूरपणाचे होईल.' असे चर्चिलने सांगितले होते. ५० वर्षांच्या स्वातंत्र्यात काय झाले याचा एका वाक्यात सारांश द्यायचा झाला तर 'चर्चिलचे भाकित खरे ठरले' हे वाक्य पुरेसे आहे असे कोणतीही प्रामाणिक माणूस कबूल करील.
 गाधीजींनी स्वराज्याचे आंदोलन केले ते अशा स्वराज्यासाठी की जेथे माणूस महत्त्वाचा असेल, सरकारी नाही; जेथे गाव स्वयंपूर्ण असेल आणि सर्व व्यवस्थेच्या मध्यभागी असेल; जेथे महत्त्व शेतीचे आणि ग्रामोद्योगाचे असेल, कारखानदारीचे नाही.
 स्वातंत्र्य मिळाले आणि शहरांचे व कारखान्यांचे महत्त्व मानणारी समाजवादी व्यवस्था देशात आली. सर्व सत्ता शासनाच्या हाती एकवटीला. स्वातंत्र्यानंतरची सुरुवातच राष्ट्रपित्याच्या द्रोहाने झाली. समाजवादाचा कैफ आज उतरला आहे; पण समाजवादाची लत अजून सुटलेली नाही. नजिकच्या भविष्यकाळात कोठे आशेचा किरण दिसत नाही. एका काळचे दिग्गज नेते तुरंगाकडे खेचून गेले जात आहेत यातच लोकांना काही उत्साह वाटतो आहे. त्यांच्या जागी नवीन येणारेही तुरंगात जाण्याचाच पात्रतेचे आहे याचा लोकांना, तात्पुरता का होईना, विसर पडत आहे.
 स्वातंत्र्यदिनाचा सुवर्णमहोत्सव हा काही निर्भेळ आनंदाचा आणि अभिमानाचा असणार नाही हे उघड आहे. खुद्द चालू पंतप्रधानांनी समारोहाची कल्पना स्पष्ट केली आहे. १५ ऑगस्ट १९९७ ते १५ ऑगस्ट १९९८ हा कार्यक्रम चालेल. समारंभ राष्ट्रीय पातळीवर होतील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होतील; सरकारी प्रेरणेने होतील तसेच खाजगी प्रेरणेने होतील आणि सगळ्या कार्यक्रमांत उत्सवाचा भाग असेल त्याचप्रमाणे आत्मनिरीक्षणाचाही भाग असेल असे खुद्द पंतप्रधानांनी म्हटले आहे.
 पण उत्सवाची टक्केवारी किती आणि गांभीर्याने आत्मनिरीक्षण करण्याची टक्केवारी किती असा प्रश्न कोणी विचारला तर उत्सावाचे फारसे प्रयोजन दिसतच नाही.
 पण, आम्ही उत्सवप्रिय लोक आहोत. १५ ऑगस्ट १९४७ पासून वर्षभर उत्सव होणार, समारंभ होणार, भाषणे होणार; वर्षभरतरी सरकारी दूरदर्शनचे तोंड पाहू नये अशी परिस्थिती होणार.
 आत्मनिरीक्षण सार्वजनिक समारंभात होऊच शकत नाही. काही भाबडी मंडळी स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने काही विकासाचे कार्यक्रम पार पाडावेत अशा सूचना करतील. आग्रह धरतील. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत सध्या आपल्याच देशात चालू आहे ती बंद करावी, किमान प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे, पूर्ण साक्षरता आणावी, लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी काही धडक कार्यक्रम घ्यावा अशासारख्या सूचना मोठ्या निरागसपणे केल्या जातील. ५० वर्षांच्या काळात जे घडले नाही ते या वर्षांत पुरे जोऊ शकेल अशी आशा बाळगणे म्हणजे ५० वर्षांच्या पराभवाची कारणमीमांसा माहीत नसल्याचे निदर्शक आहे.
 स्वातंत्र्यदिनाचा हा सुवर्णमहोत्सव सुरू होईल. त्या १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत, कदाचित, दोनचार पंतप्रधान रंगमंचावर येतील आणि निघून जातील! महोत्सवाच्या काळात सत्ता स्थिर राहाण्याची शक्यता फारशी नाही तरीही महोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे. अशा उत्सवांनी, दररोज भेडसावणाऱ्या समस्या, टोचणारी दुःखे थोडी विसरायला होतात हे खरे, पण तरीही एक प्रश्न भेडसावत राहातो. हा महोत्सव चालू असतानाच देशात अशी परिस्थिती निर्माण झाली की वीजपुरवठा अधूनमधूनच होतो, रेल्वेगाड्या नवासा-सायासानेच येतात, पेट्रोलच्या दुर्भिक्ष्यामुळे गाड्या बंद पडल्या आहेत, सर्वत्र मंदीची व बेकारीची लाट आहे आणि रुपयाची किमत सकाळपासनच संध्याकाळपर्यंत घसरत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर? आज लक्षणे दिसतात की, ही संकटांची माला सुरू झाली आहे आणि महोत्सवाच्या काळातच आणिबाणिची परिस्थिती तयार होण्याची शक्यता जवळजवळ निश्चित.
 ५० वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रपिता गांधीजी कोणत्याच उत्सवात नव्हते, ते बंगालमधील दुःखितांचे अश्रू पुसत होते. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सवाच्या वर्षी उत्सव होतील, अश्रू पुसणारा कोणीच असणार नाही.
 सुवर्णमहोत्सवाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत निदान एक दिवसाचा एक कार्यक्रम ठेवला जावा असे मला फार वाटते. संपूर्ण देशातील सर्व नागरिकांनी एक दिवस उपवास करावा आणि ज्याला ज्याला जे काही पवित्र वाटत असेल त्याला साक्षी ठेवून स्वतःलाच प्रश्न विचारावा, "गांधीजींचे स्वप्न का भंगले आणि नेहरूंची 'नियतीशी गाठ' हुकली कोठे?"

(२१ जानेवारी १९९७)

♦♦