भाग ३ रा-मृर्त कारणें-जमीन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
भाग तिसरा.
मूर्त कारणे-जमीन

 संपत्तीच्या उत्पत्तीचीं पहिलीं मूर्त कारणें दोनच आहेत व त्यांतूनच आणखी दोन कारणें निष्पन्न होतात. पहिलीं दोन कारणें म्हणजे सृष्टी व तिच्या शक्ती वें मनुष्य व त्याच्या शक्ती. या दोहोंच्या मिलाफानेच सर्व संपत्ति उत्पन्न होते. मनुष्याला कोणतीही नवी गोष्ट जगांत उत्पन्न करतां येत नाहीं; त्याची शक्ती फक्त सृष्टींतील वस्तूंची घडामोड करुन किंवा तिच्यांत इतर फेरफार करून त्यांना नवें स्वरूप व आकार देऊं शकतें, व यालाच आपण संपत्तीची उत्पत्ती म्हणतो. समाजाच्या अगदीं बाल्यावस्थेंत संपत्तीच्या उत्पत्तीचीं हींच दोन कारणें आस्तित्वांत असतात. परंतु समाज सांपत्तिक बाबतींत वरच्या पायरीवर येऊं लागला कीं, दुस-या दोन कारणांचा प्रादुर्भाव होती व सुधारलेल्या काळांत एका दृष्टीनें याच कारणांना पहिल्या दाहापेक्षां जास्त महत्व येतें. हीं दोन कारणें म्हणजे सृष्टि शक्ती व मानवीशक्ती यांचा मिलाफ घडवून आणणारी प्रवर्तक कारण होत. ज्याच्या योगानें हा मिलाफ घडून येतो तें भांडवल व जो हा मिलाफ घडवून आणतो तो योजक अगर कारखानदार. ज्या हत्याराच्या योगानें, ज्या यंत्राच्या योगानें, ज्या उपकरणांच्या योगानें मनुष्याला सृष्टीच्या शक्तीच्या आपल्या संपत्तीच्या उत्पादनाकडे उपयोग करून घेतां येतो तें सर्व भांडवल या संज्ञत मोडतें, व जो योग्य सृष्टीच्या शक्ती, योग्य मानवी शक्ति व योग्य उपकरणें या सर्वांची जुळवाजुळव करून व त्यांची एके ठिकाणीं योजना करून प्रत्यक्ष संपात तयार करतो ती योजक किंवा कारखानदार होय. हीं चारों कारणें हल्लीच्या काळीं परस्परांपासून स्वतंत्र असतात. तेव्हां प्रत्येकाच स्वरुप काय व त्याच्या योगानें संपात कशी उत्पन्न होते या गोष्टीचें आतां विवेचन करावयास पाहिजे.
 सृष्टीच्या शक्तीचें समाजाच्या सर्व सांपत्तिक स्थितींत एक मुख्य अंग म्हणजे देशांतील जमीन होय. आधिभौतिक शास्त्राच्या प्रगतीनें देशांतील दुस-या नैसर्गिक शक्तींना औद्योगिक महत्त्व आलें आहे खरें; तरी जमीन व शेतकी हे नैसर्गीिक शक्तीचे सनातन भाग आहेत ही गोष्ट निर्विवाद आहे. म्हणून जमीन हें एक संपत्तीच्या उत्पत्तीचे कारण आहे असें सांगण्याचा अभिमतपंथाचा संप्रदाय आहे.
आतां जमीनीची संपत्ति उत्पादन करण्याची शक्ती ज्या तिच्या कित्येक गुणांवर अवलंबून आहे त्यांचा थोडक्यांत विचार करणें जरूर आहे. प्रदेशाचें हवापाणी हें एक त्याचें मुख्य अंग आहे. कारण पृथ्वीच्या पाठीवर कांहीं भाग असे आहेत कीं, तेथें थंडीच्या तीव्रतेमुळे मनुष्यवस्तीच बहुधा शक्य नसते; व शक्य झालीच तर मनुष्याचें श्रमसर्वस्व निवळ जिवंत राहण्यांतच खर्च होतो व अशा प्रांतांत शेतकीचा उदयच होणें शक्य नसतें. तसेंच कांहीं प्रांत निवळ वालुकामय असून तेथें पाणी मुळीच नसतें. यामुळेंही तेथें धनोत्पादक शतकीचा प्रादुभाव होऊ शकत नाहीं. यामुळे आधिभौतिक सुधारणा बहुतेक समशीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशांत व प्रांतांत झालेली आहे, असें दृष्टोत्पत्तीस येतें. कारण तेथें ती होण्यास हवापाणी इत्यादि प्रकारची अनुकूल परिस्थिती असते.
 जमिनीचा धनोत्पादक दुसरा गुण म्हणजे तिची भूगर्भसंबंधीं स्थिती होय. ज्या ठिकाणी निरनिराळ्या धातूच्या खाणी आहेत तेथें संपत्तीची वाढ झपाट्यानें होते. ज्या ज्या ठिकाणीं सोन्यारुप्याच्या खाणी सांपडल्या आहेत ते ते प्रदेश पूर्वी अगदी ओसाड असतांना पांच पन्नास वर्षात आधिभौतिक सुधारणेंत अग्रेसर झालेले आहेत. उदाहरणार्थ, आस्ट्रेलिया देशाची भरभराट पहा. इंग्लंडची सांपत्तिक प्रगती पुष्कळ अंशीं लोखंड व कोळशांच्या खाणीच्या शोधापासून झालेली आहे हें सर्वश्रुतच आहे.
 जमिनीचा तिसरा गुण म्हणजे तिची सुपीकता अमेरिकेंतील जमिनीच्या विलक्षण सुपीकतेमुळे त्या देशाची इतक्या लवकर सांपत्तिक भरभराट झाली. इंग्लंडच्या भरभराटीलाही तेथल्या जमिनीच्या सुपीकतेची व विशेषतः तेथल्या थंड हवेची व सततच्या पावसाची फार मदत झालेली आहे.
 देशांतील नद्या, समुद्रकिनारा, बंदरें, वायुप्रवाह व पर्वताच्या रांगा वगैरे पृष्ठभागाच्या स्थितीचाही देशाच्था सांपत्तिक स्थितीवर परिणाम होतो, हेंही पुष्कळ देशांच्या इतिहासांवरून दिसून येतें.
 या सर्व बाबतींत हिंदुस्थान देशाची स्थिती फार अनुकूल आहे. आधीं सर्व देश समशीतोष्ण कटिबंधांत असून त्याच्यामध्यें अत्यंत थंड हवेपासून तों अत्यंत उष्ण हवेपर्यंतचें बहुविधत्व आहे. तसेंच सर्व देशांतील बराच मोठा भाग सुपीक असून त्याची सुपीकता अनेकविध कारणांवर अवलंबून आहे. इजिप्त देशाची सुपीकता नाईल नदीच्या पुरावर व त्याच्या कालव्यावर अवलंबून आहे. तशा प्रकारची ही स्थिति-हिंदुस्थानांत मोठमोठ्या नद्या असल्यामुळे-कांहीं प्रांतांत आहे. गंगा, यमुना, सिंधु, व कृष्णा, या नद्यांच्या सभोंवतालचे प्रांत फार सुपीक आहेत; व त्यांची सुपीकता इजिप्तप्रमाणें नदीच्या पुरावर अवलंबून आहे. तसेच कांहीं भागांमध्यें ऋतुमानानें पाऊस मुबलक व निश्चितपणें पडल्यामुळे ते सुपीक झालेले आहेत. जें विशेषण सर्व वसुंधरेला लावतात तेंच विशेषण हिंदुस्थानासही अन्वर्थक आहे. कारण नैसर्गिक संपत्तिच्या दृष्टीनें हिंदुस्थान देश हा बहुरत्ना वसुंधरा याप्रमाणेंच आहे असें म्हणण्यास हरकत नाही.
 भूगर्भसंवंधीही हिंदुस्थानची स्थिती असमाधानकारक नाहीं. येथें मँगॅनीस आहे, रॉकेल आहे, सोनें आहे, तांबे आहे, लोखंड व कोळसा आहे, भूपृष्टविषयक बहुविधताही येथें आहे. तेव्हां धनोत्पाद्नाला जे गुण जमिनीत पाहिजेत ते सर्व येथें आहेत व म्हणून पूर्वकाळीं हिंदुस्थान सांपत्तिक सुधारणेच्या बऱ्याच वरच्या पायरीला गेलेले होतेव आताही भांडवल व योजक या दोन कारणांची जोड झाल्यास हिंदुस्थान युरोपांतील इंग्लंड व जर्मनी व अमेरिका या देशांशीं बरोबरी करूं शकेल यांत तिळमात्रं शंका नाहीं.