Jump to content

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/बायजाबाईसाहेबांच्या कांहीं गोष्टी

विकिस्रोत कडून
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 138 crop)
भाग ८ वा
,
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 138 crop) 2
बायजाबाईसाहेबांच्या कांही गोष्टी.

 बायजाबाईसाहेबांच्या राजकीय चरित्राविषयीं ह्मणजे त्यांच्या राज्यकारभाराविषयीं जी माहिती उपलब्ध झाली आहे, ती स्वतंत्र भागांत निवेदन केली आहे. आतां त्यांच्या खाजगी चरित्राविषयीं-ह्मणजे स्वभाव, दिनचर्या, वर्तनक्रम, औदार्य वगैरे गोष्टींविषयीं दोन शब्द सांगणे जरूर आहे. बायजाबाईसाहेब ह्यांची दिनचर्या किंवा रोजनिशी लिहून ठेविलेली अद्यापि उपलब्ध झालेली नाहीं. तेव्हां त्यांच्या खाजगी चरित्राबद्दल पाश्चिमात्य लोकांनी आपल्या प्रवासवृत्तांतामध्यें जी माहिती लिहिली आहे व जे उल्लेख नमूद केले आहेत, त्यांच्यावर सर्वस्वीं अवलंबून राहणें भाग आहे. अशा प्रकारचे पाश्चिमात्य ग्रंथकारांचे लेख व ग्वाल्हेर दरबारातील माहितगार व जुन्या लोकांच्या मुखांतून ऐकलेल्या आख्यायिका ह्यांच्या आधाराने हा भाग तयार केला आहे.

स्वरूप.
 बायजाबाईसाहेब ह्या फार सौंदर्यवती होत्या अशी ख्याति आहे. ह्यांच्या लावण्यास लुब्ध होऊन दौलतराव शिंदे ह्यांनी तत्प्राप्त्यर्थ शेवटच्या बाजीरावास गादीवर बसविलें, व त्यांचे वडील सर्जेराव घाटगे ह्यांस आपली दिवाणगिरी दिली, ही गोष्ट मागें सांगितलीच आहे. ह्यांच्या रूपगुणसंपन्नतेसंबंधाने एका एतद्देशीय ग्रंथकाराने "ही शहाणी, सद्गुणी, सुशील तशीच लावण्यरूपवती होती" असें वर्णन केलें आहे. कित्येक आंग्ल स्त्रियांनींही ह्यांच्या स्वरूपाचें व दरबाराचें प्रसंगानुरूप जें वर्णन लिहिलें आहे, त्यांत बरीच विस्तृत माहिती दिली आहे. मिसेस फेनी पाकर्स नामक एका आंग्ल युवतीनें बायजाबाईसाहेबांची ता. १२ एप्रिल इ. स. १८३५ रोजीं फत्तेगड येथें भेट घेतली. त्या भेटीच्या वर्णनांत त्यांच्या स्वरूपाबद्दल पुढें लिहिल्याप्रमाणे उल्लेख केला आहेः-_"महाराणीसाहेब ह्या भरगच्चीच्या गादीवर आपली नात गजराजासाहेब हिला घेऊन बसल्या होत्या. त्यांच्यासभोंवतीं त्यांच्या परिचारिका उभ्या होत्या; आणि शिंदे सरकारची तरवार त्यांच्या गादीवर त्यांच्या पायाजवळ ठेविली होती. आह्मी त्यांच्याजवळ जातांच, आमचा आदरसत्कार करण्याकरितां त्या उठून उभ्या राहिल्या, व आपल्यासन्निध त्यांनी आह्मांस जागा घेतली. बायजाबाईसाहेब ह्या बऱ्याच वृद्ध झाल्या असून त्यांचे केश शुभ्र झाले आहेत; व त्यांचे शरीर किंचित् स्थूल झालें आहे. त्या आपल्या तारुण्यामध्यें फारच सुंदर असल्या पाहिजेत. त्यांचें हास्य अतिशय मधुर असून त्यांचे बोलणेंचालणें विशेष चित्ताकर्षक आहे. त्यांचे हातपाय लहान असून, फार नाजूक व सुंदर आहेत. त्यांची मुखचर्या फार शांत आणि निष्कपट असून, त्यांच्या मुद्रेवर जें स्वातंत्र्य आणि जी प्रगल्भता दिसत होती, तिची मला फार प्रशंसा केल्यावाचून राहवत नाहीं. हे गुण अफू खाऊन सदैव सुस्त व निद्रावश झालेल्या मुसलमान स्त्रियांच्या चेहऱ्यावर मला दिसून आले नाहींत."[]
 दुसरी आंग्ल स्त्री धि ऑनरेबल एमिली ईडन हिनें ता. ७ डिसेंबर इ. स. १८३७ रोजीं अलहाबाद मुक्कामीं हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल लॉर्ड ऑक्लंड ह्यांचेबरोबर बायजाबाईसाहेबांची भेट घेतली. त्या वेळीं तिनें "बायजाबाई ह्या वृद्ध असून दिसण्यांत हुशार आहेत, व त्यांचे चेहऱ्यावर सौंदर्याचा अंश अद्यापि कायम आहे[]" असें वर्णन केलें आहे. ह्यानंतर इ. स. १८५८ सालीं मिसेस ड्युबर्ली नामक दुसऱ्या एका आंग्ल युवतीनें बायजाबाईंची भेट घेतली होती. त्या प्रसंगी तिनें त्यांच्याबद्दल असा उल्लेख केला आहेः– "बायजाबाईसाहेब ह्या पडद्याजवळ उच्च स्थानीं बसल्या होत्या. त्यांच्या साधेपणामुळें व त्यांच्या प्रौढ व गंभीरवर्तनामुळें माझे लक्ष्य चटकन् त्यांच्याकडे गेलें. त्यांचे नेत्र अद्यापि विलक्षण तेजस्वी दिसतात; त्यांकडे पाहून, प्रकाशामध्यें द्राक्षार्क धरिला असतां त्याची जी चमक दृष्टीस पडते, तिंचे मला स्मरण झालें. त्यांचे वय ७० वर्षांपेक्षां अधिक आहे; परंतु त्यांच्या जास्वल्य आणि राजकारणप्रचुर तारुण्यावस्थेंत त्यांच्या ठिकाणीं जो उत्साह होता, तो अद्यापि कायम आहे.[]" ज्या अर्थीं आंग्ल स्त्रियांनीं बायजाबाईसाहेबांच्या उतारवयामध्यें देखील त्यांच्या स्वरूपाबद्दल इतके चांगले उद्गार काढिले आहेत, त्या अर्थीं तारुण्यावस्थेंत ते अप्रतिम असले पाहिजे हें उघड आहे.
पोषाख व राहणी.
 बायजाबाईसाहेब ह्यांचा पोषाख व राहण्याची तऱ्हा फार साधी असे. दौलतराव शिंदे वारल्यानंतर त्यांनी केव्हांही अलंकार धारण केले नाहींत. त्या मोठ्या पतिनिष्ठ होत्या व त्यांच्यावर त्यांच्या पतीचें प्रेमही पराकाष्ठेचें होते. ब्रौटन नामक एका लष्करी अधिकाऱ्यानें आपल्या पुस्तकांत असें लिहिलें आहे कीं, "सर्जेरावांचा भयंकर रीतीनें खून झाल्याचें वृत्त बायजाबाईंस ज्या वेळीं समजलें, त्या वेळीं त्या दुःखसागरात बुडून गेल्या. त्या प्रसंगी खुद्द दौलतराव शिंदे ह्यांनी त्यांचें सांत्वन केलें व त्यांचे अश्रु स्वतः आपल्या हातांनीं पुशिले." ह्यावरून त्यांच्या पतिप्रेमाची कल्पना करितां येईल. अर्थात् अशा प्रियकर पतीचा वियोग झाल्यामुळें बायजाबाईसाहेबांस आजन्म दुःख व्हावें हें साहजिक आहे. त्यांनी हिंदुस्थानांतील साध्वी व सुशील स्त्रियांप्रमाणें आपल्या पतीच्या पश्चात् आपले सौभाग्यालंकार व सर्व राजविलास सोडून दिले होते, आणि राज्याधिकाराची परिसमाप्ति झाल्यानंतर त्यांनीं आपलें सर्व लक्ष्य पारमार्थिक कृत्यांत घातलें होतें. त्या फक्त साधीं वस्त्रें परिधान करीत असत; आणि जमिनीवर निजत असत. मिसेस फेनी पार्क्स ह्या बाईनें ह्या गोष्टीचादेखील उल्लेख आपल्या प्रवासवृत्तामध्यें केला आहे. "बायजाबाई ह्या अगदीं साधें रेशमी वस्त्र नेसल्या होत्या. त्यांच्या हातांत सोन्याच्या साध्या पाटल्या मात्र होत्या. त्याशिवाय त्यांच्या अंगावर एकही अलंकार नव्हता. वैधव्यदशा प्राप्त झाल्यापासून त्यांनी रत्नालंकारांस स्पर्श केला नाही. त्यांनी अनेक नेमधर्म व उपासतापास स्वीकारिले होते. त्या सदोदित जमिनीवर निजत असत. त्यामुळे त्यांस संधिवाताची विकृति झाली. तेव्हांपासून त्यांच्या अंगाखालीं जाड्याभरड्या कापडाची गादी असे. परंतु त्या कधींही पलंगावर निजल्या नाहींत."
स्वभाव.

 सर्जेराव घाटगे यांचा स्वभाव क्रूर व तामसी असल्यामुळें त्यांच्या प्रमाणेंच त्यांच्या कन्येचा स्वभाव असेल, असें समजून पुष्कळ लोक बायजाबाईंस क्रूर व जुलमी राजस्त्रियांच्या मालिकेंत गोंवितात. परंतु वास्तविक त्यांचा स्वभाव तशा प्रकारचा नव्हता. त्या 'मानोहि महतां धनम्' ह्या कोटींतल्या असल्यामुळें फार मानी व पाणीदार होत्या. त्यामुळें त्यांच्या वृत्तीमध्यें थोडासा तापटपणा आला होता. त्याचप्रमाणें त्यांची कदर प्रखर असल्यामुळें त्या विशेष करारी व दृढनिश्चयी अशा भासत होत्या. परंतु सर्जेरावांचे दुर्गुण त्यांचे अंगांत वसत होते असें दिसत नाहीं. मिल्लसाहेबांनी बायजाबाईंच्या राज्यकारभाराविषयीं लिहितांना, "ती स्वभावाने कडक होती, तथापि क्रूर किंवा खुनशी नव्हती." ह्मणून त्यांच्या स्वभावाचें जें वर्णन केलें आहे, तेंच खरें आहे. त्यांना मानहानि किंवा उपमर्द सहन होत नसे. त्याबद्दल मात्र त्या कडक शिक्षा देत असत. परंतु, विनाकारण अनाथाचा छल करणें, किंवा अन्यायानें प्रजेस पीडा देणें, वगैरे प्रकार त्यांचे हातून कधी घडल्याचें आढळून येत नाहीं. एवढेच नव्हे, तर प्रजेस सुख देण्याविषयीं व गरीब लोकांवर उपकार करण्याविषयीं त्या सदोदित दक्ष असत.

औदार्य.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्याजवळ द्रव्य विपुल होतें व कांहीं अंशीं तेंच त्यांच्या त्रासास मुख्य कारण झालें होतें. तथापि त्यांनी आपल्या द्रव्याचा पुष्कळ चांगल्या रीतीनें व्यय केला. त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत तीर्थयात्रा केल्या व अनेक ठिकाणीं बहुत दानधर्म केला. काशी येथे त्यांनी एक सुंदर घाट बांधिला आहे, व पंढरपूर मुक्कामीं श्रीद्वारकाधीशाचें मंदिर बांधिलें आहे. काशी येथील बायजाबाईंचा घाट अवलोकन करून मिसेस फेनी पार्क्स ह्यांनी असें लिहिलें आहे कीं, "बायजाबाईंचा घाट पाहण्यापूर्वीं मला असें वाटत होतें कीं, चिमाजीआपा पेशव्यांचा घाट सर्वांत उत्तम आहे. परंतु बायजाबाई जो घाट बांधीत आहेत, तो पाहिला ह्मणजे त्याच्यापुढें पहिल्याचें सौंदर्य लुप्त होतें. ह्या घाटाचा आकार इतका विस्तृत, इतका सुंदर, इतका साधा आणि इतका प्रमाणशुद्ध आहे कीं, तो पाहून मला फार हर्ष झाला. काशींतील सर्व घाटांमध्ये हा घाट अतिशय सुंदर आहे ह्यांत शंकाच नाहीं." ह्या घाटाकरितां बायजाबाईंनी ३७ लक्ष रुपये खर्च करण्याचा संकल्प केला होता; परंतु त्यांच्या द्रव्यावर मध्यंतरीं विघ्नें आल्यामुळें त्यांच्या हेतूप्रमाणें काम झालें नाहीं. पंढरपूर येथील द्वारकाधीशाचें मंदिरही असेंच सुंदर आहे. ह्यासही सुमारें दोन लक्ष रुपये खर्च झाला. हें देऊळ इ. स. १८४९ सालीं बांधण्यात आलें. काशी, पंढरपूर वगैरे क्षेत्रीं बायजाबाईसाहेबांनी अन्नछत्रें स्थापन केलीं होतीं, व तेथील देवालयांस देणग्या व उत्पन्नें पुष्कळ दिलीं होतीं. त्यांच्या दानधर्माची व देवस्थानांस दिलेल्या वर्षासनांची बरोबर माहिती मिळाली नाहीं. तथापि त्यांचें औदार्य थोर असून त्यांनीं बहुत धर्मकृत्यें केलीं व सर्व जनांवर उपकार केले, असें स्थूलमानानें ह्मणण्यास हरकत नाहीं.

आवड.

 बायजाबाईसाहेबांस घोड्यावर बसण्याची फार षोक असे. मि. फेनी पार्क्सबाई ह्यांनीं बायजाबाईंचे बसण्याचे घोडे पाहिले होते. त्यांना घोड्यावर बसण्याचा नाद विशेष असून त्या अश्वपरीक्षेंत फार निपुण होत्या, असें त्यांनीं वर्णन केलें आहे. त्यांचा घोड्यावर बसून फेरफटका करण्याचा नित्यक्रम असे. कोणी आंग्ल स्त्रिया त्यांस भेटण्यास गेल्या, ह्मणजे त्यांना घोड्यावर बसतां येतें कीं नाहीं, ह्याची चौकशी केल्यावांचून त्या राहत नसत; एवढेंच नव्हे, तर त्या त्यांची परीक्षाही घेत असत. त्याचप्रमाणें युद्धवार्ता विचारण्यांत त्यांना नेहमीं आनंद वाटत असे. मिसेस ड्युबर्ली नामक एका आंग्ल स्त्रीस त्यांनीं रशियांतील युद्धाच्या गोष्टी विचारिल्या होत्या. त्यांना आपण घोड्यावर बसण्यांत पटाईत आहों हें सांगण्यांत फार भूषण वाटत असे. नेहमी त्या वेलस्ली साहेबांच्या वेळच्या युद्धाच्या गोष्टी सांगत; आणि रणांगणांतून घोड्यावर बसून आपण कसें निसटून आलों, ते मोठ्या कौतुकानें व गर्वाने निवेदन करीत[] . त्यांनीं आपल्या जवळच्या सर्व दासींना व सरदारांच्या स्त्रियांना घोड्यावर बसण्यास शिकविलें होतें, व बायकांच्या घोडेस्वारांची एक स्वतंत्र पलटणही तयार केली होती.

 बायजाबाईंच्या आवडीबद्दल मिसेस फेनी पार्क्स ह्यांच्या प्रवासवृत्तामध्यें एक मौजेचा उल्लेख आहे. ही आंग्ल स्त्री ज्या वेळीं इंग्लंडास परत गेली, त्या वेळीं बायजाबाईंनीं तिला आपल्या आवडीच्या तीन वस्तू इंग्लंडाहून पाठविण्याबद्दल सांगितलें होतें. त्या येणेंप्रमाणे :- १ एक अतिशय उमदी व अस्सल जातीची आरबी घोडी. २ एक अगदीं चिमुकलें–चेंडूएवढें, सफेत रंगाचें, लाल डोळ्यांचें व लांब केंसाचें कुत्रें. आणि ३ एक वाद्य वाजविणारी कळसूत्री बाहुली !
आदरातिथ्य.

 बायजाबाई ह्या मनानें उदार असून आदरसत्कार करण्यांत फार तत्पर असत. ह्यांनीं लॉर्ड वुइल्यम बेंटिंक व लॉर्ड ऑक्लंड ह्या गव्हरनरजनरलसाहेबांच्या भेटी घेतल्या होत्या, व त्यांचा आदरसत्कार उत्तम प्रकारचा केला होता. त्या सर्व युरोपियन लोकांशी फार चांगल्या रीतीनें वागत, आणि त्यांचा सत्कार करण्यांत औदार्य दाखवीत. त्यांच्या पाहुणचारानें संतुष्ट झाला नाहीं, असा एकही युरोपियन गृहस्थ सांपडणें विरळा. बायजाबाईसाहेबांचे हे आदरकौशल्य पाहून युरोपियन लोक त्यांची फार तारीफ करीत असत.

स्वाभिमान व उपचारप्रियता.
 बायजाबाईसाहेब ह्या फार तेजस्वी व अभिमानी असून त्यांस मानपान विशेष आवडत असे व त्यांत यत्किंचित् देखील अंतर पडलेलें त्यांस खपत नसे. त्यामुळे त्यांच्या दरबारी लोकांस ह्याबद्दल फार काळजी बाळगावी लागत असे. त्यांत कोठें न्यून पडलें तर बाईसाहेबांकडून कडक शिक्षा होत असे. ह्या त्यांच्या सन्मानप्रियतेमुळें ग्वाल्हेर दरबारच शिस्त फार कडक व विशेष आदबशीर झाली होती. त्यामुळें एतद्देशीय लोकांस व युरोपियन लोकांस त्याबद्दल फार जपावें लागत असे. त्यांच्या दरबारचे शिष्टाचार ह्मणजे एकप्रकारची प्रतिष्ठित शिक्षाच होऊन राहिली होती. युरोपियन लोकांनी देखील बूट काढून त्यांच्या दरबारांत गेले पाहिजे, असा त्यांचा सक्त नियम असे. परंतु तो शिंद्यांच्या स्वातंत्र्याच्या उतरत्या कलेप्रमाणें पुढे नाहींसा होत चालला. ह्या उपचारप्रियतेमुळें बायजाबाईसाहेबांच्या दरबारात नेहमीं चमत्कारिक गोष्टी घडत असत. हिंदुस्थानचे मुख्य सेनाधिपति लॉर्ड कोंबरमियर हे इ. स. १८२९ सालीं ग्वाल्हेर येथे आले. त्या वेळीं हिंदु दरबारच्या चालीप्रमाणे त्यांनी बूट काढून आलें पाहिजे, असा आग्रह बाईसाहेबांच्या दरबारी मंडळीनें केला. परंतु लॉर्ड कोंबरमियर ह्यांचे दुभाष मेजर मेकन ह्यांनीं, "जे सन्मान आह्मी इंग्लंडच्या राजाच्या दरबारी अमलांत आणितों, तेच आह्मी येथे करूं. त्यापेक्षां अधिक उपचार आह्मी करणार नाही" असे उत्तर दिलें. हें उत्तर बायजाबाईसाहेबांस व त्यांच्या दरबारी मंडळीस रुचलें नाहीं. त्यांचें ह्मणणें असें पडलें कीं, "भिन्न भिन्न देशांत सन्मानाच्या रीति वेगवेगळ्या आहेत. तेव्हां आमच्या दरबारांत ज्या असतील त्या तुह्मीं पाळल्या पाहिजेत." परंतु ही गोष्ट लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या पक्षानें मान्य केली नाहीं. अखेर होय नाहीं करितां करितां, दरबारचा समारंभ व भेटी वगैरे झाल्या. ह्या दरबारामध्यें बायजाबाईसाहेबांनी सर्व युरोपियन लोकांस बुटांसह येऊ दिले. परंतु आपल्या चालीप्रमाणें दरबारामध्यें खुर्च्या न मांडितां, रुजाम्यावर गालिचे घालून, मराठी तऱ्हेची बिछायत मांडली. त्यामुळे तंग विजारी घातलेल्या ह्या आंग्ल वीरांस तिच्यावर बसणें फार कठीण पडेले[]. ह्यामुळें जो प्रकार घडला तो वर्णन करणे कठीण आहे !! तात्पर्य, बायजाबाईसाहेबांच्या स्वाभिमानामुळें व उपचारप्रियतेमुळें ग्वाल्हेर येथें त्या कालीं अशा गोष्टीं वारंवार घडत असत.
अपमानाबद्दल शिक्षा.

 महाराजपुरची लढाई झाल्यानंतर बायजाबाईसाहेब नासिकाहून ग्वाल्हेरीस गेल्या. नंतर बरेच दिवस त्या लष्करामध्यें फुलबागेंत राहत असत. त्यांच्या तैनातीकरितां तेथे कांटिन्जन्ट फौजेपैकीं थोडेसे लोक (a guard of honour) व त्यावरील एक नेटिव अधिकारी असे ठेवण्यांत आले होते. त्यांनी बायजाबाईंच्या स्वारीबरोबर हरहमेषा राहावें व त्यांची स्वारी कोठें बाहेर जाईल त्या वेळीं त्यांस सलामी द्यावी, असें त्यांच्याकडे काम होतें. एके प्रसंगी बाईसाहेबांच्या स्वारीची प्रतीक्षा करीत, हे लष्करी लोक फुलबागेसमोरील मैदानांत उभे राहिले; परंतु त्यांच्या स्वारीस वेळ लागल्यामुळें, त्यांच्यावरील सुभेदारसाहेब कंटाळले, आणि विश्रांतीकरितां एका खुर्चीवर जाऊन बसले. बायजाबाईसाहेबांनी चिकाच्या पडद्यांतून ही गोष्ट पाहिली; व आपली स्वारी निघण्याचे शिंग झाले असतांना, हे सुभेदारसाहेब बंदूक घेऊन सलामी देण्याकरितां तत्पर असावयाचें सोडून, आपल्यासमक्ष खुर्चीवर बसले, हें त्यांस पसंत पडलें नाही. त्यांनी लगेच तीच खुर्ची त्यांच्या डोक्यावर आपटण्याचा हुकूम दिला ! ही गोष्ट एका एस्कॉर्ट ऑफिसरनें लिहिली आहे.

राजकारणचातुर्य किंवा मुत्सद्दीपणा.

 बायजाबाईसाहेबांच्या ठिकाणीं राजकारणचातुर्य किंवा मुत्सद्दीपणा हा गुण पूर्णपणें वसत असे. ह्या गुणाची उणीव मोठमोठ्या राजांमध्यें देखील असते, परंतु ती ह्या राजस्त्रीच्या ठिकाणीं बिलकूल नव्हती. ह्या गुणावरून ह्या स्त्रीचे बुद्धिवैभव व स्वाभाविक शहाणपण हें दिसून येतें. ह्याच विशिष्ट गुणामुळें ही स्त्री राज्यकारभार वाहण्यास पूर्णपणे पात्र व समर्थ झाली होती. हिच्या राजकारणचातुर्याच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीं ग्वाल्हेर दरबारचे पूर्ण माहितगार युरोपियन गृहस्थ डा. होप ह्यांनी जी गोष्ट आपल्या पुस्तकांत दिली आहे, ती येथें सादर करण्यासारखी आहे. ती येणेंप्रमाणें :-

 "[]ह्या स्त्रीच्या हातीं ग्वाल्हेरचा सर्व राज्यकारभार असतांना, ब्रह्मी लोकांशीं व भरतपूरची गादी अन्यायानें बळकावणाऱ्या राजाशीं आमचीं अनेक युद्धें झाली. ह्या युद्धांमुळे मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज ह्या गव्हरनर जनरलसाहेबांच्या काटकसरीच्या कारकीर्दीमध्यें कलकत्याच्या खजिन्यांत जो अतिशय द्रव्यसंचय झाला होता, तो सर्व संपून गेला. त्यामुळें गव्हर्नरजनरल लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांस कोठून तरी व कसें तरी द्रव्य लवकर मिळविलें पाहिजे, अशी जरूरी वाटूं लागली. अयोध्येच्या नबाबाजवळून पैसा मागतां येईना. त्यानें ५०|६० लक्ष रुपये नुकतेच उसने दिले होते, व त्याबद्दल नेपाळ संस्थानांकडून मिळालेला थोडासा प्रांत त्यास मोबदला दिला होता. तेव्हां कलकत्त्याच्या एका लोहचुंबकाच्या (द्रव्याकर्षण करणाऱ्या गव्हरनरजनरलसाहेबांच्या) मनांत अशी कल्पना आली कीं, आपण शिंद्यांकडून काय मिळतें ते पहावें. मराठे लोक हे फार कृपण आहेत, व त्यांचे यजमान शिंदे सरकार ह्यांच्या खजिन्यांत दोन तीन कोटी रुपये पुरून ठेविलेले आहेत, असें ह्मणतात. तेव्हां बायजाबाई ह्या कंपनी सरकारास दहापांच लक्ष रुपये कशावरून सहज देणार नाहींत ? ह्याप्रमाणें गव्हरनर जनरलसाहेबांच्या मनांत विचार आला; व तो त्यांनी युक्तीने सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला. ह्या वेळी शिंद्याच्या दरबारी कर्नल स्टुअर्ट हे फार हुशार व राजकारणी गृहस्थ रेसिडेंट होते. त्यांच्याकडे महाराणी बायजाबाईसाहेबांकडून हें द्रव्य उकळण्याचें नाजूक काम गुप्त रीतीने सोपविण्यांत आलें.

 प्राणिशास्त्रावरील कोणत्याही प्रसिद्ध ग्रंथामध्यें विसल नांवाचा प्राणी झोपी गेल्याचा कोठें उल्लेख सांपडत नाहीं; परंतु एखाद्या दक्ष पारध्यास तें गाढ निद्रेत असलेलें कदाचित् सांपडले असेल, असेंही आपण खरें समजूं; परंतु बायजाबाई कधीं निद्रित असलेली एकाही रेसिडेंटास आढळून आली असेल किंवा नाहीं, ह्याची मात्र शंका आहे. कारण, ती डोळ्यांमध्ये तेल घालून रेसिडेन्सीमधील गुप्त राजकारणे एकसारखी पाहत असे.

 बायजाबाईमध्यें आशिया खंडांतील लोकांचे सर्व गुण वसत होते. एवढेंच नव्हे, तर तिच्यामध्यें आणखी काही विशेष गुण होता. ती फार धूर्त, मायावी, मनसबेबाज, दक्ष अशी होतीच- परंतु तिच्यामध्ये आणखी विशेष गुण असा होता कीं, तिला मोह पाडून फसविण्यासारखें तिच्यामध्ये एकही व्यंग नव्हते. ह्या वस्ताद स्त्रीला आपल्याकडून सरकार उसने पैसे घेणार ही गुप्त बातमी कळली; आणि स्वाभाविकपणें, आपल्या खजिन्यावर संकट येणार ह्मणून तिला भीतिही उत्पन्न झाली. तेव्हां तिनें एक नामी युक्ति योजिली. तिनें आपले खाजगी कारभारी दादा खाजगीवाले ह्यांस बोलाविलें; आणि रेसिडेंटसाहेब आपल्याकडे पैसे मागण्याकरितां येण्यापूर्वींच, त्यांस रेसिडेंटसाहेबांकडे पाठविलें; आणि त्यांच्याकडून त्यांस असें विचारविलें कीं, "आमचें सैन्य पगार न मिळाल्यामुळें अगदीं बेदिल होऊन दंगा करण्याच्या बेतांत आहे, ह्याकरितां ब्रिटिश सरकाराकडून आह्मांस दहा लक्ष रुपये आपण मेहेरबानी करून कर्ज देववाल काय ?" हा प्रश्न ऐकून रेसिडेंटसाहेब मनांतल्यामनांत थिजून गेले. अर्थात् ग्वाल्हेरच्या खजिन्यांत जर पैसे नाहींत व तेथील सैन्याच्या पगाराची अशी रड आहे, तर इंग्रज सरकारास कोठून पैसे मिळणार ? अशाप्रकारें दोन्ही गोष्टींचा हा चमत्कारिक मेळ बसलेला पाहून, रेसिडेंट कर्नल स्टुअर्ट हे निरुत्तर झाले; व त्यांनी मोठ्या दिलगिरीनें व विस्मयाने हिंदुस्थान सरकारास असें कळविलें, “महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनाच पैशाची फार जरूर आहे. त्यांचा खाजगी कारभारी मजकडे येऊन त्यानेंच मला असा प्रश्न विचारिला आहे की, ब्रिटिश सरकाराकडून आह्मांस दहा लक्ष रुपये उसने मिळतील काय ?"

 हे पत्र गेल्यानंतर काय घडलें असेल हे कल्पनेनें कोणासही सहज ताडितां येईल. ज्या अर्थी बायजाबाई ह्याच द्रव्याच्या अडचणींत असून, ग्वाल्हेर येथील फौजेचा पगार तुंबला आहे व ती फौज बिथरली आहे, त्या अर्थीं तेथून पैशाची अपेक्षा करणे योग्य नाहीं, असें समजून गव्हरनरजनरलसाहेबांस तो विचार सोडून देणे भाग पडलें असेल हें साहजिक आहे. तात्पर्य, अशा रीतीनें बायजाबाईसाहेबांनीं आपली मुत्सद्दीगिरी चालवून ग्वाल्हेरच्या खजिन्यावर आलेले संकट दूर केलें.

चातुर्य.

 बायजाबाईसाहेबांच्या चातुर्याच्या व शहाणपणाच्या गोष्टी अनेक प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीं मौजेची एक गोष्ट येथें दाखल करितों. बायजाबाईसाहेबांच्या हातीं ग्वाल्हेरचा सर्व राज्यकारभार असतांना एके वेळीं त्यांनी तुळसीच्या लग्नाचा टोलेजंग समारंभ केला; आणि शिंदे घराण्यांतील पुरुषांच्या लग्नास जसा खर्च येतो, तसा प्रचंड खर्च केला. तुळसीच्या लग्नास असा मनस्वी खर्च झालेला पाहून, त्यांचे दिवाण बापूजी रघुनाथ ह्यांनी त्यांच्याजवळ नापसंती दर्शविली. बाईसाहेबांनी त्यांस कांहींएक उत्तर न देता, ती गोष्ट लक्ष्यांत ठेवून, लग्नसमारंभ उत्तम प्रकारें साजरा केला. नंतर एके दिवशी त्यांनीं शिंद्यांच्या घराण्यांतील चालीप्रमाणे लग्नाप्रीत्यर्थ नजरनजराणे व अहेर स्वीकारण्याचा दरबार भरविला; व त्यास सर्व सरदार, शिलेदार, मुत्सद्दी, वगैरेंनीं हजर राहून रीतीप्रमाणें लग्नाचे अहेर करावेत, असा हुकूम सोडिला. त्या दिवशीं बाईसाहेब स्वतः दरबारांत आल्या, व त्यांनी आपल्या गादीजवळ राधाकृष्णांच्या मूर्ती मांडून त्यांच्यापुढे सर्व नजरनजराणा व आहेर ठेवविला. अशा मंगल प्रसंगी नजरनजराणे व अहेर करणें सर्व लोकांस अगदी योग्य वाटून त्यांनी मोठ्या संतोषानें ते केले. येणेंप्रमाणें दरबार झाल्यानंतर बाईसाहेबांनी दिवाणास बोलावून आणून एकंदर नजरनजराण्यांची वगैरे जमा काय झाली तें विचारलें. दिवाणांनी खर्चापेक्षां जमेची रक्कम अधिक झाल्याचें सांगितले; आणि बाईसाहेबांच्या शहाणपणाची तारीफ करून आपला शब्द परत घेतला.

जुन्या चालीरीतींविषयी अभिमान.

 बायजाबाईसाहेबांस आपल्या हिंदु चालीरीतींचा व शिंद्यांच्या दरबारांतील जुन्या पद्धतींचा फार अभिमान असे, व त्या पाळण्याविषयीं त्या फार दक्ष असत. एके प्रसंगीं महाराज जयाजीराव शिंदे बायजाबाईसाहेबांस भेटण्याकरितां मुद्दाम उज्जनीस गेलें. त्यांच्याबरोबर लवाजमा अगदीं बाताबेताचा असून त्यांचा सर्व पोषाख इंग्रजी नमुन्याचा- बूट पाटलुणीचा- होता. महाराज प्रवासाच्या श्रमानें थकून गेले होते; ह्मणून ते त्याच पोषाखानिशीं बाईसाहेबांस भेटण्याकरितां एकदम राजवाड्यांत गेले. तेव्हां त्यांनीं, महाराजांचा पोषाख वगैरे शिंदे सरकारास शोभण्यासारखा नाहीं व राजकीय इतमाम त्यांच्याबरोबर नाहीं असें पाहून, महाराजांची भेट घेतली नाहीं; आणि असा निरोप पाठविला कीं, "चाबुकस्वारास मी भेटत नाहीं. महाराज शिंदे मला भेटण्यास येतील, तेव्हां त्यानं त्यांजबरोबर यावें. शिंदे सरकार इतमामावांचून कधींही येणार नाहींत." नंतर महाराज जयाजीराव हे आपल्या दरबारी चालीप्रमाणें भालदार चोपदार ललकारत, सर्व लवाजमा व स्वारीचीं राजचिन्हें बरोबर घेऊन, मोठ्या थाटानें बाईसाहेबांस भेटण्यास गेले. नंतर बाईसाहेबांनी त्यांची भेट घेऊन स्वागतपूर्वक त्यांचा गौरव केला. ह्या दिवसापासून महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनीं आपल्या स्वदेशी रीतिरिवाजांत कधींही अंतर पडूं दिले नाहीं असें ह्मणतात.

बायजाबाईसाहेबांचे बंधु.

 बायजाबाईसाहेबांचे बंधु जयसिंगराव ऊर्फ हिंदुराव बाबा घाटगे ह्यांची थोडीशी माहिती बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीच्या पांचव्या भागांत दिली आहे. तथापि त्यांचा संबंध बायजाबाईसाहेबांच्या जीवनचरित्रांत विशेष असल्यामुळें त्यांच्याबद्दल आणखी थोडी माहिती सादर करणें अवश्य आहे. हिंदुराव बाबा घाटगे हे बायजाबाईसाहेबांच्या हातीं सर्व राज्यसूत्रे असतांना त्यांचे मुख्य मसलतदार होते, व त्यांचे बायजाबाईसाहेबांच्या दरबारीं विशेष वजन होतें. पुढें बायजाबाई साहेबांच्या हातून राज्यकारभार जाऊन त्यांस स्थलांतर करावें लागलें, त्या वेळीं हे त्यांच्याबरोबर गेले होते. पुढें फत्तेगड येथून इ. स. १८३५ मध्यें बायजाबाईसाहेबांस अलहाबादेस आणिल्यानंतर, ह्यांस इंग्रज सरकाराने पेनशन करून दिल्लीस ठेविलें. दिल्ली येथे हिंदुराव बाबांचा वाडा प्रसिद्ध असून त्यांची युरोपियन लोकांत विशेष चाहा असे. हिंदुराव बाबा रूपाने बायजाबाईंसारखे सुंदर नव्हते. त्यांची एक मोठी तसबीर दिल्ली येथील पदार्थसंग्रहालयामध्यें ठेविलेली आहे; तिच्यावरून त्यांच्या स्वरूपाची कल्पना करितां येते. ‘कलकत्ता रिव्ह्यू' मधील एका लेखकानें असें लिहिलें आहे कीं, "[]मालकम साहेबांनीं कृष्णाकुमारीच्या सौंदर्याची कल्पना तिच्या भावाच्या सुस्वरूप मुद्रेवरून बसविली आहे. त्याप्रमाणें पाहूं जातां, दिल्ली येथील पदार्थसंग्रहालयामध्यें असलेल्या हिंदुरावांच्या तसबिरीवरून बायजाबाईंचें स्वरूप मोठें सुंदर होतें असे मानितां येत नाही. त्या तसबिरीवरून, हिंदुरावांचे नेत्र तेवढे पाणीदार असून, त्यांचें शरीर कृष्णवर्ण व स्थूल असावें असे दिसून येतें." परंतु बायजाबाईसाहेबांसंबंधानें हें अनुमान चुकीचें आहे. हिंदुराव जरी विशेष सुस्वरूप नव्हते, तरी बायजाबाईसाहेब ह्या सुस्वरूप होत्या, ह्याबद्दल मुळींच शंका नाहीं. हिंदुराव बाबांबद्दल क्याप्टन मुंडी व मेजर आर्चर ह्या दोन लष्करी अधिकाऱ्यांनी, इ. स. १८२९ मध्ये, लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या भेटीच्या प्रसंगानुरोधानें जे लेख लिहिले आहेत, ते विशेष अनुकूल नाहींत. त्यावरून युरोपियन लोकांस प्रिय होण्यासारखें मार्दव त्या वेळी ह्यांच्या ठिकाणी होते असे दिसत नाही. मराठी तऱ्हेची ऐट, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य हे गुण ह्यांच्या ठिकाणी विशेष होते. 'एशियाटिक जर्नल' मधील एका लेखकानें, इ. स. १८२७ साली दौलतरावांचे मृत्युवृत्त लिहितांना, असे लिहिलें आहे कीं, "बायजाबाईसाहेबांचे बंधु हिंदुराव ह्यांचे दौलतरावांवर अखेर अखेर फार वजन होते. हे बाणेदार मराठ्याची एक हुबेहूब प्रतिमा होते; आणि ह्यांना जर संधि प्राप्त झाली असती, तर हे प्रतिशिवाजीच निघाले असते.[]” हिंदुरावांची ऐट व बाणेदारपणा वायजाबाईसाहेबांचे स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर आपोआप नाहींसा झाला होता. इंग्रज सरकारानें ह्यांस पेनशन करून देऊन दिल्लीस ठेविल्यानंतर हे युरोपियन लोकांचे प्रिय भक्त बनले होते. ह्यांच्याबद्दल बीलसाहेबांनी असें लिहिलें आहे कीं "हे हिंदुस्थानांतील इंग्रज लोकांचे चाहते असून त्यांस ते फार प्रिय झाले होते[]."

 ह्यावरून हे नेहमी युरोपियन लोकांत मिळून मिसळून वागत असत; व त्यांना प्रिय झाले होते असे दिसून येते. इंग्रजांचे प्राबल्य व त्यांची युद्धसामग्री पाहून त्यांच्यापुढे कोणाचा टिकाव लागणार नाही अशी हिंदुरावांची पुढे पुढे समजूत झाली होती. ह्याबद्दल एक मौजेची आख्यायिका एका युरोपियन गृहस्थाने लिहिली आहे. ती येणेप्रमाणे: इ. स. १८३८ मध्ये फेरोजपूर मुक्कामी इंग्रज व शीख लोक ह्यांचा कांहीं राजकीय गोष्टींसंबंधानें विचार करण्याकरितां दरबार भरला होता. त्या वेळीं गव्हरनरजनरल लॉर्ड ऑक्लंड हे इंग्रजांच्या बाजूने व महाराज रणजितसिंग हे शीख लोकांच्या वतीनें आले होते. त्यांमध्ये हिंदुरावही एक सभासद होते. ते, गव्हरनरजनरल व महाराज रणजितसिंग ह्यांच्या भेटीच्या वेळीं एकदम पुढें जाऊन बसले. त्या वेळीं एका शीख सरदारानें त्यांस प्रश्न विचारला कीं, "आपण इंग्रज सरकाराचे एक पेनशनरच आहांत ना?" त्या वेळीं हिंदुरावांनी असें खोंचदार उत्तर दिलें कीं, "होय, मी इंग्रजांचा पेनशनर आहे; व आपणही आमच्यासारखे लवकरच व्हाल!” हें उत्तर ऐकून तो स्वाभिमानी शीख सरदार मनांतल्यामनांत ओशाळा झाला.

 हिंदुराव बाबा इ. स. १८५६ मध्यें मृत्यु पावले. पुढे इ. स. १८५७ सालीं दिल्ली येथें बंड झालें. त्या वेळीं हिंदुरावांचा वाडा ही एक युद्धांतील माऱ्याची जागा होऊन राहिली होती. येथें फार घनघोर युद्ध झालें. त्यावरून दिल्ली येथील बंडाच्या इतिहासांत हिंदुरावांच्या वाड्याचें नांव प्रसिद्धीस आलें. त्यामुळें हिंदुराव हेही बंडवाले होते असा युरोपियन लोकांचा समज होऊन, पुष्कळ ग्रंथकारांनीं त्यांस पुनः जीवंत करून लढावयास लाविलें आहे !! परंतु तें सर्व चुकीचें आहे. हिंदुराव बाबा ह्यांनीं कागल येथें बांधलेला राजवाडा व किल्ला अद्यापि अस्तित्वांत आहे; व त्यांचे वंशज श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब घाटगे सर्जेराव बजारत-मा-आब हे तेथील जहागिरीचा उपभोग घेत आहेत.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 156 crop)
  1.  1. "We found her Highness Baiza Baie seated on her guddee of embroidered cloth with her grand-daughter the Gaja Rajah Sahib at her side; the ladies, her attendants, were standing around her; and the sword of Scindia was on the guddee, at her feet. She rose to receive and embrace us, and desired us to be seated near her. The Baiza Baie is rather an old woman, with grey hair and en bon point. She must have been pretty in her youth ; her smile is remarkably sweet, and her manners particularly pleasing; her hands and feet are small and beautifully formed......Her countenance is very mild and open; there is a freedom and independence in her air that I greatly admire, so unlike that of the sleeping, languid, opium-eating Mussalmanees."
  2.  1. "She is a clever looking little old woman, with remains of beauty." -Up the country. Vol. 11 Page 65.
  3.  2."The Bhae-sa-bhae sat in the place of honour next the purdah, and arrested my attention at once, both by the simplicity of her toilette and the great dignity and self-possession of her deportment. The lustre of her still glorious eyes reminded me of the light which shines through port-wine when held against the light. She is over seventy years of age, but apparently as energetic as in the days of her fiery and intriguing youth,' -Mrs. Duberly.
  4.  १ बायजाबाईसाहेब ह्या घोड्यावर बसण्यांत पटाईत असून त्यांनी समरांगण पाहिलें होतें असा उल्लेख दोन आंग्ल स्त्रियांनी केला आहे. मिसेस फेनी पार्क्स ह्यांनी पुढील लेख लिहिला आहे:-
     "The ladies relate, with great pride, that in one battle, her Highness rode at the head of her troops, with a lance in her hand, and her infant in her arms!"
     मिसेस ड्युबर्ली ह्यांनी खुद्द बायजाबाईंच्या तोंडचेच पुढील उद्गार दिले आहेत :-
     "I too, have ridden at a battle: I rode when Wellesley Saib drove us from the field, with nothing but the saddles on which we sat."
  5.  १ ह्या गोष्टीचा उल्लेख लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या चरित्रांत देखील आलेला आहे. तो येणेप्रमाणे :-
     "The neighbourhood of this city was reached on the 2nd of January, 1829, when a halt took place for the purpose of settling the etiquette to be observed on this occasion. There were great difficulties in the way of coming to an arrangement, for the capital had never before been visited by a personage of such high rank as Lord Combermere. All the artifices of
    what may be termed 'gentleman ushers' diplomacy were exerted to induce the Commander-in-Chief to take off his shoes when within a certain distance of the throne; but Major Macan, the Persian interpreter, declared that neither Lord Combermere nor any other English gentleman would submit to any other forms than those required at the court of his own Sovereign. After much argument the point was yielded, and Lord Combermere and his staff went, as one of the latter apt]y termed it, "booted and spurred like soldiers." The Mahratta, however, had his revenge, for the only seats at the grand durbar were saddle-cloths-articles of furniture characteristic of the warlike camp-life of the nation-on which the English officers, with tightly-strapped trousers and long sharp spurs, found it impossible to contrive a comfortable posture,”

    -Memoirs and Correspondence of Viscount Combermere.

    Vol. II. Page 197.

  6.  1. "It was during the regency of this lady that our wars with the Burmese and the usurper of Bhurtpoor took place— wars which cleared the treasury of Calcutta of the immense surplus cash which the frugal administration of the Marquis of Hastings had amassed. To get money somewhere and somehow was a necessity which the Governor-General, Lord Amherst, felt, admitted of no delay. The king of Oude could not be applied to again. He had lent a few millions five or six, and had been paid off with a strip of territory taken from Nepaul, 'Suppose' said a Calcutta magnate, 'we try what Scindea will do. The Mahrattas are a singularly penurious race, and the coffers of their chief are believed to be well filled with rupees-two or may be three crores buried in the palace; and who can say that the Baiza Bye would be indif- ferent to the eclât of lending the great Company Bahadoor a paltry million ?' The shrewd idea was acted on. Colonel Stewart, a very able diplomatist, was the Resident at the Court of Gwalior, and to him was confidentially entrusted the delicate task of pumping—we beg parden for the vulgarism-her Royal Highness. Now, we do not doubt that some extremely watchful game-keeper has caught a weasel very fast asleep, although the fact is not recorded in any known work on Natural History; but we very much question if any Resident at her court ever found the Baiza Bye napping. She was a true Asiatic woman, 'and something more;'— crafty, false, intriguing, vigilant; 'the something more' being that she had not, it was said, a single amiable weakness. By some means or other, this artful personage got scent of the intention to borrow, and naturally enough became awakened to a sense of the danger. She hastily dispatched a favourite, one Dada Khasgeewalla -of whom we shall hear more by and by-to the Colonel, to ask him if he thought, her troops being mutinous on account of not getting their pay, the British Government could be pursuaded to lend her a million ? Here was a singular coincidence certainly, and one that took the wind completely out of the sails of the gallant Resident. We may suppose, without drawing largely on the imagination, that Colonel Stewart wrote to his lordship, Lord Ahmerst, expressing his deep concern and surprise- we know that Dada did surprise him-to find that her Highness herself was in great want of money. 'Indeed, her minister has just been here to ask me if the British Government could lend her a million !'"

    —House of Scindea. Page 19-20.

  7.  1. "If Malcolm inferred Kishen Komari to have been beautiful from the comely features of her brother, one may conclude Baiza Baiee to have had little pretensions to a good physiognomy, judging from the portrait of her brother, which hangs on the walls of the Delhi museum. In that portrait, Hindoo Rao appears to have been a stout gentleman of the regular swarthy colour, but with a pair of very animated eyes."- Calcutta Review.
  8.  1. “Her brother, Hindu Rao, had latterly very great influence with Scindhia; he was a fine specimen of a turbulent Mahratta, and with opportunity, might have been a second Shivajee."-Asiatic Journal. (1827)
  9.  2. " He was fond of the society of Englishmen in India, among whom he was very popular."