बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी

विकिस्रोत कडून
बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी





बचत गटातील ग्रामीण महिलांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण





ज्ञान प्रबोधिनी : स्त्री शक्ती प्रबोधन

५१०, सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०

प्रकाशक :
श्री. वि.शं./सुभाष देशपांडे
कार्यवाह
ज्ञान प्रबोधिनी,
५१०, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०
फोन : (०२०) २४२० ७१६२/१३३


मुद्रक :
बालोद्यान प्रेस, १३५८ अ, शुक्रवार पेठ
पुणे - ४११ ००२


लेखन :
सुवर्णा गोखले, बागेश्री पोंक्षे
suvarna.gokhale@jnanaprabodhini.org
ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन
५१०, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०

(C) सर्व हक्क प्रकाशकांचे स्वाधीन


प्रथम आवृत्ती महाराष्ट्र दिन, १ मे २०१९
*अर्थसाहाय्य :- रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ
प्रस्तावना

 महिला सबलीकरणात जे स्थान बचत गटाचे आहे ते बचतगट चळवळी मध्ये ‘आर्थिक साक्षरता' या विषयाचे महत्व आहे. महिला आर्थिक साक्षर नसल्यामुळे त्या आर्थिक निर्णय प्रक्रियेच्या बाहेर असतात. विकास प्रक्रियेतील महिलांचा गुणात्मक सहभाग वाढवण्यासाठी आर्थिक साक्षरता पण फारच गरजेची आहे. आर्थिक साक्षरता म्हणताना त्याला अनेक पैलू आहेत, त्यापैकी बचत गटांसाठी बँकेचे व्यवहार करण्याकरता लागणारी पैशाविषयीची जी किमान माहिती लागते, तिला आपण या पुस्तिके पुरती आर्थिक साक्षरता म्हणूया !.
 अनेकदा ग्रामीण महिलांना व्यावहारिक जगात लागणारे आर्थिक शहाणपण असते पण ग्रामीण महिला कमी शिकलेली असल्याने कागदपत्रां पासून ती दूर राहते. म्हणून ग्रामीण महिलेला आर्थिक साक्षर करणे ही काळाची गरज आहे. आर्थिक साक्षर होण्याच्या या प्रक्रियेत त्यांनी बँक ही रचना तपशिलात माहिती करून घेणे गरजेचे आहे. बँकेसोबत करायच्या व्यवहारांबद्दल माहिती करून घ्यायला हवी. बँकेत जाण्याचा सराव नसल्यामुळे गटातील महिलांमध्ये खूप गैरसमज असतात. त्याबद्दलचे पुरेसे आणि अचूक स्पष्टीकरण त्यांना हवे असते असे लक्षात आले. बचत गटातील ग्रामीण महिला बँकेतील व्यवहार अनुभवातून शिकत असल्यामुळे कधी-कधी त्यांच्याकडून चूका होतात आणि त्याची कदाचित फार मोठी किंमत गटाला मोजावी लागते. यासाठी बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी या पुस्तकाची रचना केली आहे..
 ज्ञान प्रबोधिनीने रिझर्व बँकेच्या अमृत महोत्सवा निमित्त सेंट्रल बँकेच्या वेळू शाखेच्या मदतीने भोर तालुक्यातील खोपी हे गाव १००% , अर्थसाक्षर केले म्हणजेच ‘इन्क्लूजन' मध्ये आणले. या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक घरातल्या किमान एका व्यक्तीचे तरी बँक खाते काढले, बँक या विषयावर गावामध्ये वारंवार चर्चा करून माहिती देण्यात आली, त्यावेळी ज्या गोष्टी चर्चेमध्ये लक्षात आल्या त्यावरून ही पुस्तिका तयार करण्यात आली. पहिल्यांदाच बँक रचनेत पाऊल टाकणा-या व्यक्तीसाठी ही पुस्तिका आहे.
 या पुस्तिकेत ग्रामीण भागात बँकेसोबत बचत गटांचे काम करताना आलेले अनुभव आहेत. थोड्याफार फरकाने हे अनुभव सगळीकडेच येतात असे लक्षात आले. त्यामुळे या अनुभवांद्वारे लक्षात आलेल्या गोष्टींसाठीचे काही पाठ तयार केले. ते नक्कीच बचतगटांच्या कार्यकर्त्यांना उपयोगी पडतील. हे पाठ बचतगटातील सभासदांच्या प्रशिक्षणासाठी वापरले तर प्रत्यक्ष बँकेशी व्यवहार करताना महिलांची पुरेशी तयारी होईल असे वाटते. बँकेत पाऊल टाकण्या पूर्वी त्यांना ही माहीत असेल तर आत्मविश्वासाने व्यवहार करून ग्रामीण महिला बँकेची चांगली ग्राहक बनेल यासाठीचा हा प्रयत्न!.

*****
भाग १ अनुभव
बँक:एक औपचारिक रचना, एक व्यवस्था

'बचत गट बँक जोडणी' या उपक्रमामुळे ग्रामीण महिला प्रथमच बँकेत जातात. त्याना नव्याने शिकावे लागते ते म्हणजे बँक ही एक रचना आहे. जरी त्या रचनेत माणसे काम करत असली तरी ती काम करणारी माणसे म्हणजे बँक नाही.

बचत गटातील बँक जोडणीसाठी येणा-या महिला या प्रौढ व बहुतेक वेळा शालेय शिक्षण कमी असणा-या अशा असतात. गटात येण्यापूर्वी पैसे कर्जाऊ घेण्यासाठी गावातील सावकार या एका व्यक्ती'शी त्यांचा संपर्क आलेला असतो. बँक ही तशी एक व्यक्ती नाही तर 'रचना' आहे हे वेगळे समजणे आवश्यक आहे, ‘व्यक्ती' व 'रचना' या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात हे त्यांना माहीत असायला हवे. अनुभवांतून बँकेची व्यावहारिक ओळख आपण ग्रामीण महिलांना करून देऊ या.

अनुभव १   फोटो माझ्या ओळखीसाठी
अनुभव २   पासबुकात नोंद होईपर्यंत स्लिप जपून ठेवावी.
अनुभव ३   धनादेशचा (चेकचा) आकार सारखाच कसा?
अनुभव ४   सही कशी हवी?
अनुभव ५   सही म्हणजे काय?
अनुभव ६   बेअरर व क्रॉस चेक
अनुभव ७   बँकेत जाऊनही काम झालं नाही, कारण........
अनुभव ८   बँकेचा व्यवहार
अनुभव ९   सावकाराचे भयंकर गणित

अनुभव १०  बदलता व्याजदर
फोटो माझ्या ओळखीसाठी
अनुभव १

 बँकेत खाते काढायचे होते. कुसगावच्या भागिरथीबाईंना खाते काढण्यासाठी फोटो हवा असे सांगितले. संस्थेच्या कार्यालयात त्या आल्या तेव्हा त्यांनी सोबत फोटो आणला होता. ताईनी विचारले, “भागिरथीबाई, पाहू फोटो." तर त्यांनी त्यांचा भरपूर दागिने घातलेला उभ्याचा असा पूर्ण फोटो हातात ठेवला. फोटो पाहून ताई म्हणाल्या, “आता एवढा मोठा फोटो का हो काढून घेतलात?" असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “ताई, एवढी वर्षं झाली, कधी माझा फोटोच कोणी काढला नव्हता. लग्नात सुदिक तवा फोटो काढत नव्हते. म्हंटलं आता आली आहे संधी तर चांगले दागिने घालून पूर्ण फोटोच काढून घेतला! नाहीतरी माझ्या मेलीची हौस कधी भागणार ?".
 बँकेत लागणारा फोटो हा बँकेत आपली ओळख पटविण्यासाठीचे उपयुक्त कागदपत्र म्हणून काढायचा असतो. तो अर्धा असतो. हा फोटो खातेदाराचा चेहरा स्पष्ट दिसणारा व दोन्ही कान दिसणारा असा समोरून काढलेला हवा. त्याचा आकार ३.५से.मी x ४.५ से.मी. असावा.

पासबुकात नोंद होईपर्यंत स्लिप जपून ठेवावी.
अनुभव २

 झेप महिला बचत गटाची प्रमुख असणाऱ्या नंदाने बँकेत पैसे भरले, पण ती बँकेतून बाहेरच पडायला तयार नव्हती. ती मॅनेजरना म्हणाली, "तुम्हाला पैसे मिळाले असं लिहून द्या की माझ्या वहीत." मॅनेजर म्हणाले, "असं काय सगळ्यांच्या वहीत लिहीत बसू का काय? म्हणून तर ती पावती शिक्का मारून दिली आहे. ती जपून ठेवायची. पासबुकात नोंद झाली की मग टाकून द्यायला हरकत नाही. रोख पैसे असले तर अर्ध्या तासात नोंद होते, पण धनादेश / चेक भरला असला तर मात्र तो वठल्यानंतर पासबुकात नोंद दिसते. कधी कधी चेक वठायला आठ-पंधरा दिवस सुद्धा लागतात."
 हे ऐकल्यावर मात्र नंदाने शिक्का मारलेला स्लिपचा भाग पावती

म्हणून वहीत जपून ठेवला. आता तिच्याकडे बँकेत पैसे भरल्याचा पुरावा होता.
धनादेशचा (चेकचा) आकार सारखाच कसा?
अनुभव ३

 वाजेघर गावाच्या वाटेवर सीताबाई झपाझपा चालत राधाच्या घरापर्यंत पोहोचल्या. हाश-हुश करत पाण्याचा तांब्या संपवून त्यांनी खाली ठेवला. "काय राधा, काल झालं ना बँकेतलं सगळं काम? भरले का चेक दोन्ही गटांनी?" त्यांनी राधेला विचारले.
 “नाही ताई, त्या बँकेचं आम्हाला काही खरं वाटत नाही. मी वाजेघरावरनं बँकेत पोहोचले अन् कुसुम पाल गावावरून आली होती. दोघींनीही तुम्ही सांगितल्यावानी चेक घेतले अन् स्लिप भरली. बरं झालं बँकेत भरण्यापूर्वी आम्ही बघितलं ते! अवं ताई, माझा चेक होता ५,०००/- रू. चा अन् कुसुमचा होता १0,000/- रू. चा, बघतो तर काय? दोघींचे चेक सारखेच! आकार, रंग, चेकवरच्या सह्या समदं सारखंच. मी म्हंनलं काहीतरी भानगड आहे. म्हणून आम्ही चेक भरलं न्हाईत"
 “अगं पण झालं काय?" सीताबाई म्हणाली......“ताई, नोटा कशा वेगवेगळ्या आकाराच्या अन् रंगाच्या असतात का न्हाई? ५00 रूपयाची ची मोठी, १00 रूपयाची त्यापेक्षा छोटी दिसती का न्हाई? मग हे चेक ५,000 चा अन् १0,000 रूपयाचा, तरी सारखेच कसे? म्हंटलं आम्हाला कुणी फसवायला नको, म्हणून चेक भरलेच नाहीत."

वेगवेगळ्या रकमेचे असले तरी बँकेतील चेक हे एकसारखेच असतात.
चेकवर खातेदार जी रक्कम लिहील त्या रकमेचा असतो.
सही कशी हवी
अनुभव ४

 बँकेत भीमाबाईचं खातं राधाच्या ओळखीमुळे निघालं, हे राधाने तिच्या फॉर्मवर सही केल्यामुळे भीमाबाईला कळलं. गावाकडे येताना राधाला भीमा म्हणाली, 'आता तुझ्या ओळखीनं खातं निघालं म्हणजे तुला दर बारीला माझ्या सोबत यायला हवं. नायतर मला कोण ओळखणार बँकेत?' न रागावता राधा म्हणाली, 'नाही आत्या तुमचा फोटो लावला आहे ना? मग मी नसले तरी कोणी पण ओळखेल तुम्हाला बँकेत.... म्हणून नेहेमी दिसता तसा दिसणारा फोटो बँक मागते. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमची सही! त्यावरून बँकेचा साहेब तुम्हाला ओळखतो..... कधी कधी जर साहेबाला प्रश्न पडला तर तो कॉम्प्युटर वर तुमची सही मोठी करून सुद्धा बघतो मगच पैसे देतो.'
 तिच्या बापानं दारुड्या नवर्याशी लगीन लाऊन दिलं तसं 'आपले भोग' असं वाटून ती निमुटपणे सारं सहन करत होती. अडीनडीला दुस-याच्या शेतावर काम करून पैसे आणत होती...तरी तिनं कमावलेले ते पैसे मार बसला कि दारूला देत होती.
 आज तिचं मन शांत झालं. तिनं राधाला चहाला घरी नेलं, पटकन चहा केला. चहा देतादेता हळूच म्हणाली, 'त्यांना मान्य नाही हे काही. तरी तुझ्यामुळे धाडस केलं बघ!' राधाच्या नजरेनच तिला सारं समजलं अस सांगितलं....
 थोडे चहाचे गरम गरम घोट पोटात गेल्यावर भीमा म्हणाली, 'सगळे पैसे नाही भरले. थोडे ठेवलेत लपवून.... माझी सीता माहेराला येईल तेव्हा खर्चायला होतील.' राधाने ‘कधी येणार?' विचारले तर भीमाने सहा महिन्या नंतर असे सांगितले. राधा म्हणाली, 'मग तेव्हा आणले असते कि काढून... आता तर ठेवायचे बँकेत.' त्यावर भीमा म्हणाली, “तसं व्हाई ह्यांना हे काही मान्य न्हाई. गेले बँकेत नि आणले माझे पैसे काढून तर मलातर कळणार पण व्हाई.... म्हणून म्हंटले आपले राह देत माझ्यापाशी थोडे.....' 'म्हणजे?' राधाने न समजून विचारले पुन्हा पुन्हा विचारल्यावर तिला समजलं की भीमाबाईला वाटतंय की तिचा नवरा तिच्या खात्यातून भिमाच्या न कळत पैसे काढून आणेल. मग राधाने सांगितले, 'अस होणार नाही कारण खातं तुझं एकटीचं आहे.'.... पण भिमा आपलं म्हणत होती 'अग राधा खात्यावर माझं नाव आहे ना ....मग कळणारच की बँकेला कि ते माझे मालक आहेत म्हणून!..... ‘त्यावर राधा सांगत होती की ‘तरीही तुझ्या सही शिवाय त्यांना तुझ्या खात्यातले पैसे मिळणार नाहीत' हे भीमाला समजूच शकत नव्हते. 'अगं अन वेळेला मीच पाठवलं त्यांना पैसे काढून आणायला तर?.... बँक माझे पैसे त्यांच्याकडे देणार न्हाई होय?'.... भिमात्याचा परत प्रश्न होताच, ‘हो हो ....अस झालं तर तुला सही केलेला चेक द्यावा लागेल त्यांच्या सोबत... तरच तुझ्या खात्यातले पैसे त्यांना मिळतील ....जसे ते त्यांना मिळतील तसे ते कोणाला पण मिळतील. तू ज्याचे नाव चेक वर लिहिशील त्याला मिळतील.... माझं नाव लिहिलंस तर मलाही मिळतील. पण आता एक लक्षात ठेवा बँक काही तुझे मालक म्हणून त्यांना तुझ्या खात्यातले पैसे देणार नाही. एवढच काय तुझ्या नावात त्याचं नाव लपलं असलं ....ते तुझे मालक असले तरी पण तुझ्या खात्यात किती पैसे आहेत हे बँक तोंडाने सांगणार सुद्धा नाही.' आता मात्र भिमा आत्याचा चहा गारच झाला. तिला कानांन ऐकू येत होतं सगळं पण मन मानत नव्हतं. आज पर्यंत मालका शिवायच्या स्वतःच्या अशा वेगळ्या अस्तित्वाचा तिने कधी विचार सुद्धा केला नव्हता. हे काहीतरी अघटितच झालं, अस तिला झालं. झालाच आपला अभिमन्यू! असंही क्षणभर वाटून गेलं.... तो तिच्या चेह-यावरचा भाव राधानं नेमका टिपला नि म्हणाली, 'हीच वेळ आहे आत्या, चार पैसे बाजूला टाका. अडीनडीला तुम्हालाच उपयोगी पडतील. तुमची मर्जी होईल तेव्हा काढा. कोणी जबरदस्तीने नाही काढू शकणार तुमचे पैसे. पैसे बँकेत टाकले कि कोन्नाकोन्नाला कळणार सुद्धा नाही. तुमच्या खात्यात कोणीही पैसे टाकू शकतं म्हणजे दर बारी तुम्हाला बँकेत यायला नको मी गटाच्या कामासाठी जातेच बँकेत तेव्हा तुमच्या खात्यात पैसे टाकू शकते पण अजून आपण तुमच्या खात्याचा चेक घेतला नाही म्हणून पैसे काढायला मात्र तुम्हांलाच यायला हवे कारण तुमची तिथे सही हवी.' भीमा आता कुठे समजून म्हणाली, '.... आता मी साहेबीन झाले म्हणायचं!. माझ्या सही शिवाय अडणार तर सगळं... यांना म्हणून नको होतं तर मी बँकेत जायला. बरं झालं सांगितलं नायतर म्या अडाण्याला कोण सांगणार. बचत गटात आले म्हणून कळतंय सारं

सही म्हणजे काय?
अनुभव ५

 बँकेतून फुणफुणतच संगीता संस्थेच्या कार्यालयात आली. “काय गं संगीता, बँकेत काम झालं नाही जणू!" भारतीताईंनी तिला विचारले. “अवं तुमचा तो बँकेतला संगणक, तो मला वळखीत न्हाई म्हणे! जळलं त्याचं लक्षण!" संगीता म्हणाली, “बर, मला शांतपणे सांगशील का सगळे?" भारती म्हणाली.
 “मी बँकेत गेले.भरलेली स्लिप त्यांना दिली तर ते म्हणतात, 'तुमची ही सही नाही.' याला काय म्हणायचं ताई?" “बर, पाहू बरं मला ती स्लिप." भारतीताईंनी स्लिपवरील सही पाहीली. तिने सही केली होती, 'संगीता आप्पा वाशिवले'. "अगं संगीता, तुझी सही 'संगीता किसन वाशिवले' अशी केवढी छान घटवून तू तयार केली होतीस ! आणि इथे संगीता आप्पा वाशिवले काय केलीस?" "मग, त्यांनाच आप्पा पण म्हणतात हे ताई ठावं न्हाई व्हंय् तुम्हाला?" “आता काय म्हणावं तुला संगीता, अग त्या संगणकाला कसे कळेल की किसन म्हणजे आप्पा ते!"

बँकेसाठी खाते काढताना जी सही केलेली असते,
तीच आणि तशीच सही ही आपली ओळख असते.
आपण चेहरा पाहून जसे माणसाला ओळखतो तसेच
बँकेतला संगणक सही च्या फोटोद्वारे तुम्हाला लक्षात
ठेवतो म्हणून आपली सही अगदी जशीच्या तशीच
करायची असते.

बेअरर व क्रॉस चेक
अनुभव ६

 शारदानं केलेले पापड ती कोप-यावरच्या हनुमान लॉजला नियमित पुरवत होती. हनुमान लॉजचा हनुतात्या तिला त्याचे पैसेही वेळेवर द्यायचा. एकदा त्यानं शारदाचं खात बँकेत आहे असे कळल्यावर तिला ३000 रूपयाचा चेक दिला. शारदा तो चेक घेऊन तशीच बँकेत गेली. तिने मॅनेजरला त्याचे पैसे मागितले. मॅनेजरने सांगितले, “चेक क्रॉस आहे. वठला की पैसे मिळतील".
 शारदाला मॅनेजरचे बोलणे समजले नाही. फक्त पैसे मिळणार नाहीत एवढेच समजले. मॅनेजर म्हणत होते बँकेत चेक भरा. तरी त्यांचे काहीही न ऐकता ती तो चेक घेऊन घरी आली. संध्याकाळी पुन्हा हनुकडे गेली. म्हणाली, “बँकेत पैसे नव्हते तर चेक कशाला दिलास?" हुनु म्हणाला, “कुणी सांगितलं बँकेत पैसे नाहीत? आहेत की!" तिने घडलेला प्रसंग सांगितला. मग हनुनं तिला समजावून दिलं. तो म्हणाला, “आक्के, अगं माझ्याकडे तुला द्यायला रोख पैसे नव्हते. या वेळेचे बिल मोठे होते. उगाच पैसे अडकायला नकोत म्हणून मी तुला चेक दिला. पण मी तो 'क्रॉस' केला होता. याचा अर्थ तो तुझ्या खात्यातच भरायला हवा मग माझ्या खात्यातून पैसे तुझ्या खात्यात गेले की तुला  या चेकचे पैसे मिळणार! जर तो चेक मी क्रॉस न करता दिला असता तर मात्र माझ्या बँकेने तुला पैसे लगेच दिले असते. या बघ, डावीकडे दोन रेषा मारल्यात म्हणून त्याला 'क्रॉस' म्हणतात. जेव्हा अशा रेषा नसतात तेव्हा आपण चेक लिहिणा-या खातेदाराच्या बँकेत गेलो तर ज्याच्या नावाचा चेक आहे त्याला लगेच पैसे मिळतात.
 पण असा बेअरर चेक हरवला तर चो चेक ज्याला मिळेल तो कोणीही पैसे काढू शक्ण्याची भिती असते , असा धोकाही त्यात असतो ! म्हणून चेक नेहमी क्रॉस केलेला बरा! हो, पण गटातल्या बायांची खाती नसतील तर त्यांना बेअरर चेक दे. नाहीतर सांगशिल हुनुतात्यानं सांगितलंय नि मग येईल मोर्चा माझ्या लॉजवर!"
 आता शारदाला सारं उलगडलं. बँक मॅनेजर बरोबर सांगत होते. चेक तिच्या खात्यावर भरूनच यायला हवा होता. म्हणजे पुढे गेला असता. आता पुन्हा बँकेत एक हेलपाटा मारणं आलं...... चेकची स्लिप भरणं आलं...... असं म्हणत शारदा घराकडे परतली.

  •  चेकच्या डाव्या वरच्या कोप-यात तिरप्या दोन रेषा काढलेल्या असल्या की त्याला चेक 'क्रॉस' करणे असे म्हणतात. ज्याच्या नावाने हा चेक असतो फक्त त्यालाच त्याच्या खात्यात क्रॉस चेक भरता येतो. सुरक्षिततेसाठी असा क्रॉस चेक देतात.
  •  'बेअरर' चेक याचा अर्थ क्रॉस नसणारा चेक या चेकवर ज्याचे नाव लिहिले आहे, त्याला त्या चेकवरील रक्कम ज्याने चेक लिहिला आहे, त्याच्या बँकेत गेले असता रोख मिळते. जर असा चेक हरवला आणि दुस-या कोणाच्या हातात पडला तर ती व्यक्ती त्या चेकवरील पैसे काढू शकते. याचाच अर्थ आपल्या किंवा गटाच्या नावाने मिळणारा चेक हा क्रॉस चेकच असावा असे आपण म्हंटलं पाहिजे. बेअरर चेक डावीकडे तिरप्या दोन रेषा मारून आपणही क्रॉस करू शकतो. म्हणजे ज्याला/जिला चेक देऊ तिच्या खात्यातच तो जमा होऊ शकतो.
बँकेत जाऊनही काम झालं नाही, कारण.........
अनुभव ७

 एकदा सरूबाई बँकेत काम होतं म्हणून गेली. तिथे जाऊन बसली आणि वेळ संपला म्हणून काम न करताच परत आली. तिला विचारलं “काम का नाही केलंस?" तर म्हणाली “मी तिथे पहिल्यांदाच गेले होते तर मला कुणी विचारलंच नाही की काय काम आहे तुझं? मग मी काम कसं सांगायचं?" त्याच बैठकीत रखमानं सांगितलं की माझ पण काम झालं नाही कारण आमच्या जातीचा कोणी पुरूष बँकेत नव्हता. मग पर-पुरूषाशी कसे मान वर करून बोलायचे?
 तिचं ‘बाईपण' आडवं आले..... आता काळ बदलला आहे, बायका समाजात पुरूषाच्या बरोबरीनं काम करतात पण या बदलांना सामोरे जाण्याची संधी सगळ्यांना सारख्या प्रमाणात मिळतेच असे नाही. त्यामुळे बचतगटातील सभासदांना बँकेचे काम पाहायला एखाद्या दिवशी न्यायचे. त्यांना बँकेत चाललेली कामे पाहायला सांगायची. याचा नक्की उपयोग होतो.
 बँक हे काही घर नाही. ती आपल्यासाठी केलेली एक व्यवस्था आहे. तेथे गेले की आपण आपले काम करायचे. अडचण आली तर बँकेतील कर्मचा-यांना विचारायचे असते. बँकेमधील सर्व कर्मचा-यांना बँकेत करावयाची सगळ्याप्रकारची कामे येतच असतात. ती कामे ते आलटून पालटून करतात. त्यामुळे खिडकीतील माणूस बदलला तरी आपले काम होते. माणूस बदलला तरी आपले कागद, पैसे सर्व सुरक्षितच राहते. त्यांना काम करण्यासाठी टेबल व केबीन असल्यामुळे त्यांचा फक्त चेहरा आपल्याला दिसतो. ही व्यवस्था मुद्दाम सुरक्षिततेसाठी असते. काम करण्याच्या भागात सगळ्यांचा प्रवेश झाला तर गोंधळ होईल. तो टाळण्याकरीता असे करावे लागते. कारण खूप संख्येने माणसे बँकेत येत राहतात.

बँकेचा व्यवहार
अनुभव ८

 गावात बचत गट सुरू झाल्याची बातमी तान्हुबाईला वाडीवर कळली तेव्हापासनं तिला एकदा गटाची बैठक बघायला जायचं होत. शेवटी तिनं गटाची सकाळची वेळ गाठलीच! गावातल्या सा-या बायाबायाच पैशाची सारी कामं करत व्हत्या. “कोण करतंय हिशेब?" तिने विचारले. सुरेखाकडे साऱ्यांनी बघितलं. तिला वाटलं सुरेखाचे मालक! ती जरा बघते तो काय सुरेखाच पुढे होऊन सगळा हिशेब बघत होती. पैसे घेणं, व्याजाचा हिशेब करणं, कर्ज देणं, सारं चोख! जिच्या तिच्या पुस्तकात लिहून पण देत होती. तान्हु म्हणाली, "अगं बायांनु, किती गं फुढं गेलात? आम्हाला संगती न्हाई व्हय घेणार?"
 “या की! आम्ही काय मुरळी पाठवून बोलवायचं का काय तुम्हाला? सुरेखा म्हणाली. एकीकडे गटाची बैठक संपवून ती तान्हुबाईला पुढे म्हणाली, "चलाच आता माझ्या संग. मी हे गटाचे पैसे भरायला बँकेत चालली आहे." तान्हु तशी सवड घेऊनच सकाळचीच बाहेर पडली होती. सुरेखा संग ती बँकेत गेली.
 सुरेखाने गटाचा शिक्का बँकेतून घेतलेल्या स्लिपवर मारला, खाते नंबर लिहीला, बँकेत भरायचे पैसे कितीच्या किती नोटा आहेत सारं लिहिलं, नि खिडकीत दिलं. बँकेतल्या माणसांनी शिक्का मारून कागद फाडला नि पुन्हा सुरेखाच्या हातात दिला. सारं पाहून तान्हु म्हणाली, “अगं त्यानं तुझे पैसे सा-या पैशात मिसळले कि गं! आता? तुझे किती कसं कळायच?" सुरेखानं शिक्का मारलेला कागद काढून दाखवला. “यावर लिहीलय बघ बँकेला पैसे मिळाले. म्हणजे मी पुढच्या वेळी पैसे काढायला परत आले की दुसरी स्लिप भरून देणार. मग ते मला त्यावर लिहीलेली रक्कम देतील पण त्यावेळी बँकेकडे असलेल्या नोटा मधून पैसे देतील. आपल्या ह्याच नोटा देणार नाहित बँक काही सावकाराने ठेवलेल्या दागिन्यासारख्या आपल्याच नोटा जपून त्याच मला परत देणार नाही." बँक हे पैसे वापरते म्हणून तर आपल्याला बचत खात्यावर व्याज मिळते ना!
 तान्हु तोवर बँकेत इकडे-तिकडे बघत होती. पाठीमागे ठेवलेल्या मुख्य खुर्चीवर बसलेल्या बाईकडे बघून तान्हू म्हणाली, “ही बया इथं बसून काय करतीय?", सुरेखा म्हणाली, “जरा हळू बोल, ती बया म्हणजे या बँकेची शाखा व्यवस्थापक म्हणजेच बँक मॅनेजर आहे. तीच आपल्या गावाची सारी कामं इथं बसून करते."
 सुरेखा सोबत तान्हु घरी परत आली खरी पण बचत गट करून बँकेत खातं काढायचं हे ठरवूनच. गावातल्या बायांचं शहाणपण ह्या बँकेच्या

व्यवहारातनं किती वाढलंय हे तिला चांगलंच लक्षात आले होते!

सावकाराचे भयंकर गणित
अनुभव ९

 एकदा भीमाचा बा आजारी पडला दवाखान्यात न्यावे लागणार होते कदाचित डॉक्टर दवाखान्यात भरती पण करून घेतील असे वाटत होते. जायचं दवाखान्यात तर चार पैसे बरोबर हवेतच....पण जवळ पैसे नव्हते ... काय कराव काही सुचेना शेवटी भीमा म्हणाली 'देईल का बँक मला पैसे? फार नको पण ५००० मिळाले तरी चालतील' ...भीमा म्हणाली , ‘आजारपणाला बँक कर्ज देत नाही'... शेवटी काही सोय होईना म्हणून तिने शेवटी सावकाराला कर्ज मागितले ५००० रुपये पैसे मिळाले पण व्याज कापून हातात ४५०० पडले पण त्यासाठी तिने शेताचा एक तुकडा लिहून दिला. तो तुकडा अगदी छोटा फक्त ५ गुंठ्याचा होता. पैसे परत केले की लगेच सोडवून घ्यायचा होता. दवाखाना झाला एका दिवसात सलाईन भरून सोडलं पण जाणे-येणे, डॉक्टरची, फी औषध धरून ४५०० झालेच! बा घरी आला पण त्या धकाधकीत महिना कधी संपला कळलंच नाही. सावकार दारात हप्त्याला उभा राहिला. पण पैसे नव्हते सावकाराने माफ केलं पण म्हणाला मुद्दलाला जोडतो.
 त्यादिवशी ५००० रुपयाचे व्याज धरून मुद्दल झाले ५५००/- पुढच्या महिन्यात १०% दराने व्याज झाले ५५०/- पण तेही नव्हते मग पुन्हा मुद्दल वाढली ६०५० झाली मग व्याजही वाढत गेले ६०५ झाले. सोबतच्या तक्त्यात भीमाचे व्याज कसे वाढत गेले बघा.
 न परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज घेतल्यामुळे भीमाचे म्हणता म्हणता व्याज वाढत गेले आणि शेवटी २ वर्षात सारी ५ गुंठे जमीन सावकाराला द्यावी लागली. तिला व्याज काढता येत नव्हते त्यामुळे अशी शेती विकावी लागली..... पण तिने ती शेती जर पहिल्यांदाच विकली असती तर जमिनीचे ५०,०००/- मिळाले असते आणि आजाराचा ५०००/- खर्च करूनही ४५,०००/- उरले असते. ‘पैसे येतील' या आशेचा आर्थिक फटका बसला नसता. असे अनेकांचे होते. त्यांना वाटते सावकाराने फसवले पण तसे नसते १0% महिन्याला व्याज हे कधीच परवडणारे नाही हेच मुळात समजत नाही. हे समजत नसल्याने अनेक शेतकरी आपली शेती किरकोळीत गमावून बसतात म्हणून आर्थिक साक्षर झालेच पाहिजे!
 नाहीतर समजतच नाही की ४५००/- रुपये हातात पडले अशा कर्जाचे २ वर्षात १० पट कसे होतात!

महिना वाढत जाणारी मुद्दल मुद्दलीवरचे १०% दम दराने
५००० ५००
५५०० ५५०
६०५० ६०५
६६५५ ६६६
७३२१ ७३२
८०५३ ८०५
८८५८ ८८६
९७४४ ९७४
१०७१८ १०७२
११७९० ११७९
१० १२९६९ १२९७
११ १४२६६ १४२७
१२ १५६९२ १५६९
१३ १७२६१ १७२६
१४ १८९८७ १८९९
१५ २०८८६ २०८९
१६ २२९७५ २२९७
१७ २५२७२ २५२७
१८ २७८०० २७८०
१९ ३०५८० ३०५८
२० ३३६३७ ३३६४
२१ ३७००१ ३७००
२२ ४०७०१ ४०७०
२३ ४४७७२ ४४७७
२४ ४९२४९ ४९२५

बदलता व्याजदर
अनुभव १0

 बँकेत गेलेली शोभा परत संस्थेच्या कार्यालयात येताना लांबूनच आशाला दिसली होती. ती जवळ येताच काहीतरी दुखतंय हे त्यांना समजलं होतं. गार पाणी पिऊन थोड्या शांत झालेल्या शोभाला आशाने विचारले, “काय मग आज चेहरा काअसा दिसतोय?" आशासमोर बँकेचं पासबुक टाकून शोभा म्हणाली, “ताई, व्याजाचं गणित काही कळेना झालंय, मागच्या वर्षी बँकेने जे व्याज आपल्या गटाकडून घेतलं होतं, त्यापेक्षा जास्ती दराने ह्यावर्षी व्याज घेतलंय त्यांनी."
 आशाच्या लक्षात काय घोटाळा झालाय ते लक्षात आलं. बचतगटाचा व्याजदर हा एकदा ठरला की गट फुटेपर्यंत तोच असतो. पण बँकेच्याबाबतीत तसे नाही. कर्जावरील व्याज किती घ्यायचे हे बँकेतील संचालकांच्या बैठकीत ठरते. तो व्याजदर शासनाच्या धोरणाप्रमाणेसुद्धा बदलू शकतो. त्यामुळे तो बदलला तर गटाला परवडणार की नाही याची खातरजमा करायची. हे गणित शांताला समजावून सांगता-सांगता संध्याकाळ कधीच झाली. आशाच्या लक्षात आले. आता गटांच्या प्रशिक्षणात एका नवीन मुद्याची भर पडणार होती........ बँकेचा कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर हा बदलू शकतो. तो गटाप्रमाणे स्थिर नसतो. कर्ज घेण्यापूर्णी सभासदांना बँकेच्या अधिका-यांनी हा मुद्दा सांगितला तर त्यांना तो समजणे सोपे जाईल. बँक बदललेला

व्याजदर बँकेत फलकावर लावते, प्रत्येक गटाला ती कळवेल असे नाही.

भाग २ प्रशिक्षण
प्रशिक्षकासाठी हितगुज

 पुस्तिकेतील पुढील प्रशिक्षणे, बचत गटातील महिलांनी व गट प्रमुखांनी बँकेची रचना व्यवहारासाठी अधिक तपशिलात समजून घेतल्यावर माहिती पुरेशी पोहोचली आहे ना, हे बघण्यासाठी करण्यात आलेली आहेत.
 प्रत्यक्ष बँकेचे व्यवहार करताना महिलांना अडचणी येतात, त्यावर मात कशी करायची हे त्यांच्या लक्षात यावं यासाठी पहिले १० अनुभव दिलेले आहेत. त्यावर प्रशिक्षकाने आधी बोलावे, त्यात स्वतःच्या अनुभवांची भर घालावी, माहिती सांगावी. ही प्रशिक्षण घेताना प्रत्येक विधानांवर पुरेशी चर्चा होणे अपेक्षित आहे. शेवटच्या पाना वर या प्रशिक्षणातील पाठांची अपेक्षित उत्तरे दिली आहेत. त्याचा संदर्भ घ्यावा.
 हे प्रशिक्षण गाव पातळीवर घ्यावे व जास्तीत-जास्त खेळीमेळीच्या वातावरणात व्हावे. बँकेची कामे करण्याचा सराव असलेल्या महिलांना बोलते करावे. प्रशिक्षणामध्ये प्रत्येकजण सहभागी व्हावी ह्यासाठी प्रशिक्षकाने प्रयत्न करावेत.

प्रशिक्षणे
१. खाते काढताना ... १५
२. गाळलेल्या जागा भरा १५
३. योग्य पर्याय निवडा १ १६
४. योग्य पर्याय निवडा २ १६
५. तर काय झाले १ १८
६. तर काय झाले २ १९
७. तुमची बाजू कोणची ? २०
८. विधान चूक का बरोबर ते लिहा २१
९. काही करून पाहण्या सारखे ..... २२

प्रशिक्षण १

खाते काढताना..

खाते काढताना काय कराल ?
 पार्वतीला महाराष्ट्र बँकेत खाते काढायचे होते. तिने खाते उघडण्यासाठीचा फॉर्म घेतला. तो फॉर्म संपूर्णपणे भरला. त्या बँकेत ज्यांचे पूर्वीपासून खाते आहे अशा खातेदाराची ओळखीसाठीची स्वाक्षरी घेतली. पार्वतीला खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
१)
२)
३)

*****

प्रशिक्षण २

गाळलेल्या जागा भरा

 शैला गटाच्या पुस्तकातून पैसे काढायला बँकेत गेली. तिने पैसे काढताना खालील प्रमाणे कृती केली. गाळलेल्या जागी खाली दिलेल्या शब्दापैकी कंसातील योग्य शब्द भरा.
१) सर्व प्रथम पैसे काढण्याची -------------
२) स्लिप भरताना

  •   गटाचे --------- * खाते --------- * -------शिक्का * ------------ ------------------ यांच्या सह्या घेतल्या.*----------रक्कम, सारे स्लिपवर भरले.

३) गटाचे ---------, आणि भरलेली स्लिप घेऊन शैला कॅशियर समोरच्या खिडकीत उभी राहीली.
४) कॅशियरने दिलेले पैसे शैलाने --------- घेतले.
( अक्षरी, गटाची तारीख, नाव , खात्यातून काढायची रक्कम, अध्यक्ष व सचिव पासबुक, मोजून, गटाचा गटातील सदस्यसंख्या, स्लिप भरली, क्रमांक )

*****

प्रशिक्षण ३

योग्य पर्याय निवडा १

१)  सखूबाई पैसे भरण्याच्या रांगेत उभी होती. त्याचवेळी तिथे एक पलीकडच्या गावातला माणूस आला. त्याने सखूबाईला म्हंटले, “ताई, मी आज बँकेत खाते काढायला आलो आहे. मला एका खातेदाराची ओळखीची सही हवी आहे. तुम्ही मला सही देता का?" त्याचे हे बोलणे ऐकून सखूबाईच्या मनात खालीलपैकी कोणते विचार यायला हवेत असे तुम्हाला वाटते?
अ)  फारशी ओळख नसणारा माणूस आपल्याशी बोलायला आला म्हणून तिला दडपण आले.
ब)  आपल्याला कोणीतरी पुरूषमाणूस सही मागतो आहे या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे.
क)  फारशी ओळख नसताना मी कोणालाही सही देऊ शकत नाही. ओळखीची सही म्हणजे ज्या माणसाशी माझा परिचय आहे, ज्यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल मला खात्री आहे, त्यांनाच मी ओळख असल्याची सही देऊ शकते. या माणसाला मी सही देता कामा नये.

२)  खात्यामध्ये पैसे भरायला सखूबाई बँकेत पोहोचली. पैसे भरण्याकरता पैसे घेऊन ती रांगेत उभी राहिली. खिडकीपाशी सखूबाईचा नंबर आल्यावर तिने पैसे दिले. पासबुक दिले. तरी ते पैसे खिडकीतील ताईंनी लगेच तिचे पैसे जमा करून घेतले नाहीत. कारण ----

अ) सखूबाईने पैसे भरण्यापूर्वी स्लिप भरली नव्हती.
ब) सखूबाईने दिलेल्या नोटा चुरगाळलेल्या होत्या.
क) सखूबाईला खिडकीतील कॅशीयर ओळखत नव्हती.


३)  गोदाबाईंनी बँकेत चेक भरला. त्यानंतर खिडकीमध्ये जाऊन त्यांनी त्यांचे पासबुक भरून घेतले. पाहतात तर त्यांनी भरलेल्या चेकचे पैसे अजून त्यात जमा झाले नव्हते. कारण.....

अ) चेक वठल्याशिवाय त्याची नोंद पासबुकात होत नाही.
ब) ते वेगळ्याच माणसाच्या खात्यावर जमा झाले होते.
क)बँकेतील सदस्यांना त्या दिवशी खूप कामे होती.
*****

प्रशिक्षण ४

योग्य पर्याय निवडा २

१)  कोदापूरमधील गहूबाईंना बचतगटांतील मैत्रिणींनी सांगितलेले बँकेचे महत्त्व पटले म्हणून त्यांनी त्यांचे बचतखाते काढले. त्यात ५०० रू. भरले. त्यांना असा प्रश्न होता की हे ५०० रूपये बँकेत भरलेले त्यांच्या खात्यात जमा आहेत हे त्यांच्या घरात बसलेल्या नव-याला कसे पटवायचे?
 अ) नव-याला बँक मॅनेजरला फोनवरून विचारा असे म्हणावे.
 ब) बँकेत शिपाई म्हणून काम करणारा यशवंता त्यांच्या मामांचा पुतण्या होता. त्याला विचारायला सांगावे.
 क) खातेदाराच्या खात्यावरचा उतारा त्यांच्या बँकेतील पासबुकात असतो. बँकेत गेले की पासबुक भरून आणावे म्हणजे घरात बसूनही आपल्या खात्यावरील शिल्लक घरच्यांना समजेल.
२)  बँकेत चेक भरून गोदाबाई घरी गेल्या. त्यांनी घरच्यांना पासबुकात भरलेल्या चेकचे पैसे लगेच जमा होत नाहीत, चेक वठल्यावर जमा होतात असे सांगितले, तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांना पुढील गोष्ट सांगितली......
 अ) पासबुक बँकेतच ठेवून ये म्हणजे बँकेतील माणसे त्यात नोंद करतील.
 ब) चेक भरल्यानंतर तुला जी स्लिप शिक्का मारून मिळाली असेल ती जपून ठेव म्हणजे २-४ दिवसांनीही जर नोंद झालेली नसेल, तर तुझ्याकडे चेक भरल्याचा पुरावा असेल.
 क) बँकेतील लोकांशी गटातील गोष्टींवरून भांडू नकोस म्हणजे ते बरोबर नोंद करतील.

*****

प्रशिक्षण ५

तर काय झाले १

१) कमलने बँकेत जमा केलेल्या नोटांवर खुणा करून ठेवल्या होत्या. ज्यावेळी तिने बँकेतून पैसे काढले तेव्हा तिच्या लक्षात आले की तिने ज्या १००च्या आणि ५००च्या नोटा बँकेत ठेवल्या होत्या त्या ह्या नव्हत्याच. भलत्याच कोणाच्यातरी नोटा तिला मिळाल्या होत्या. काय घडले होते?
 अ) बँक मॅनेजरने भलत्याच व्यक्तीच्या नोटा कमलला दिल्या होत्या.
 ब) बँकेत ठेवलेले पैसे बँक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवते, ते चलनात येतात त्यामुळे कमलला त्याच नोटा मिळतील असे नाही, परंतु,जेवढे पैसे ठेवले आहेत ते मिळू शकतील.
 क) खरे तर कमलला तिच्याच खूणा केलेल्या नोटा मिळायला हव्या होत्या.
 ड) कॅशियरच्या हातून चूक घडली.
२)  मंगलला २०००/-रूपयांचा चेक मिळाला होता. तो तिच्या नावाकर काढलेला पहिलाच चेक होता. ती अगदी हरवून गेली होती. पण त्या चेकवर डाव्या कोप-यात दोन तिरक्या रेषा काढलेल्या होत्या. ती हिरमुसली. काय होता त्या तिरक्या समांतर रेषांचा अर्थ? त्याचा अर्थ----
अ)  की हे पैसे फक्त मंगलच्याच खात्यात जमा व्हावेत.
ब)  चेक लिहिल्यावर चुकून कोणीतरी तशा रेषा काढल्या होत्या.
क)  चेक चुकीचा होता.

*****

प्रशिक्षण ६

तर काय झाले २

१)  सविता आणि सरिताला बँकेचे रू. ५,०००/- आणि रू. ५०,०००/- चे चेक मिळाले. त्यांनी ते बारकाईने पाहिले तेव्हा त्यांना दिसले की.......

  • ते सारख्याच आकाराचे आहेत,
  • त्यांच्यावरच्या सह्याही सारख्याच आहेत
  • त्यांचा रंग, दिसणे सगळे अगदी सारखेच आहे.

त्यांनी ते चेक बँकेत भरावेत का? तुम्हाला खालीलपैकी काय वाटते आहे?
अ)  फार विचार करू नये, चेक मिळालेत ना ते भरून टाकावेत.
ब)  रू. ५,०००/-चा आणि रू. ५०,०००/- चा चेक सारखेच कसे? कोणीतरी त्यांना फसवत आहे. त्यांनी ते चेक भरू नयेत.
क)  वेगवेगळ्या रकमेच्या नोटा वेगवेगळ्या दिसतात तसे हे चेकही वेगवेगळ्या आकाराचेच असायला हवेत.
ड)  बँकेचे चेक हे वेगवेगळ्या रकमेचे असले तरी ते एकसारखेच असतात. त्यामुळे त्यांनी ते चेक बँकेत भरावेत, यात काहीही फसवणूक नाही.
२)  सविताच्या नावाने आलेला रू. १०,०००/-चा शेवया विक्रीची रक्कम असलेला चेक तिने कुठे ठेवला हे तिला आठवत नव्हते. मुख्य म्हणजे तो बेअरर चेक होता. ती अस्वस्थ होती. कारण..........
अ)  तो तिला मिळालेला पहिलाच चेक होता.
ब) चेक बेअरर असल्यामुळे जर दुस-या कोणाच्या हातात पडला तर ती व्यक्ती सविता असल्याचे भासवून ते पैसे काढू शकली असती.
क)  त्या दिवशीचा वार चांगला नव्हता.

*****

प्रशिक्षण ७

तुमची बाजू कोणची ?

१) भाग्यश्रीची का सोनालीची खालील प्रसंग वाचून त्यावर चर्चा करा.
 शिन्देवाडीतील भाग्यश्रीने बँकेत खाते काढायची तिची तयारी नाही असे सांगितले. तिने बँकेविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या त्या ती सांगू लागली.
भाग्यश्रीः मी बँकेत खाते काढत नाहीये कारण.......
 १) माझ्या खात्यावर किती पैसे आहेत ते सगळ्यांना कळेल.
 २) माझ्या घरातील लोक माझ्या नकळत माझ्या खात्यावरचे पैसे काढतील.
 ३) माझ्या मैत्रिणीने त्या बँकेतून कर्ज काढले तर बँक माझ्या नकळत मला जामिनदार करेल.
सोनालीः तेव्हा बँकेची कामे करण्याचा खूप अनुभव असणारी सोनाली तिला म्हणाली बँकेचे व्यवहार पारदर्शक असले तरी खातेदाराच्या माहितीबद्दल गुप्तता पाळली जाते. खातेदाराच्या न कळत आणि त्याची संमती नसताना बँकेतील सदस्य :-
 १) खातेदाराची बचत किती हे कोणाला सांगू शकत नाही.
 २) खातेदाराच्या स्वाक्षरीशिवाय कोणीही त्याच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही.
 ३) खातेदाराच्या संमतीशिवाय त्याला कोणत्याही कर्जासाठी जामीन धरू शकत नाही.

*****

प्रशिक्षण ८

विधान चूक का बरोबर ते लिहा

खालील विधानांतील चूक विधानानंतरच्या चौकटीत x अशी व बरोबर विधानानंतरच्या चौकटीत ✓ अशी खूण करा.
१. सावकार जसा माझा दागिना सांभाळतो, तशी मी जमा केलेली रक्कम बँक त्याच नोटांमध्ये सांभाळते.  
२. बँकेचा मॅनेजर हा बँकेच्या जागेत मॅनेजर असतो. तो कुठेही भेटला तर बँकेचे व्यवहार करत नाही.   
३. चेक /धनादेश हा त्यावर लिहिलेल्या तारखेनंतर ६ महिन्यांपर्यंत बँकेत भरला तरी चालतो.     
४. बँकेचे पासबुक जपून ठेवावे कारण ते हरवले तर खात्यातील पैसे बँकेत जमा होतात       
५. बँकेतून कर्ज ११ ते १३.५% दराने मिळते तर गटातून २% दराने याचाच अर्थ गट बँकेपेक्षा खूपच कमी दरात कर्ज देतो.☐
६. बँकेची निर्णयकर्ती अधिकारी महिला असू शकते.     

*****

प्रशिक्षण ९

काही करून पाहण्या सारखे.....
चला 'ट्रिपला' बँकेत जाऊ !

 प्रशिक्षकाने प्रत्येक बचत गटातील ५ सभासद महिला, ज्यांना व्यवहाराची जाण आहे अशा, एकूण २0-२५ जणींना एकत्र करून बँकेत दुपारी १.३० ते २.00 च्या सुमारास घेऊन जावे. ( साधारणपणे तुमच्या बँकेतील कर्मचा-यांची जेवणाची वेळ झाल्यावर बँकेत जावे. ) बँकेत लोक रांगेत उभे राहून काय-काय व्यवहार करतात ते बघायला सांगावे. कॅश देणे-घेणे संपल्यावर बँक व्यवस्थापकांना बँकेबद्दल माहिती सांगायला सांगावी.

ही सहल बँकेला पूर्वसूचना देऊनच न्यावी.

या सहलीचा अधिक उपयोग होण्यासाठी

  • पासबुक भरणे, वेगवेगळ्या रंगाच्या स्लीप भरणे ही कामे करायला लोक

येतात हे चर्चेत येईल असे पाहावे.

  • काचेच्या खोलीतील किंवा जाळी लावून तयार केलेल्या खोलीतील

(केबीन) माणूसच फक्त पैसे देवाण-घेवाण करतो, हे सर्व जणांच्या लक्षात येते ना ते पाहावे.

  • एकाच आडनावाचे खूप लोक असल्यामुळे बँकेतील स्वतःची ओळख

म्हणजे आपला खाते क्रमांक असतो, हे सुद्धा आवर्जून सांगावे.

  • पैसे काढायला जाताना पासबुक गरजेचे आहे हे निरीक्षणातून सांगावे.

बँकेत पैसे भरणे म्हणजे ती कर्जाची परतफेडच असते असे नाही, तर बचतसुद्धा असते हे सांगावे.

  • बँकेत व्यवहारासाठी एखादी अनुभवी ग्राहक महिला आली असेल तर

तिला व्यवहार करताना भिती वाटते का? असे जरूर विचारावे व तिचे बँकेचे अनुभव सर्वांपर्यंत पोहोचतील असे बघावे.

  • अशी बँकेत ट्रिप काढल्याने ग्रामीण महिलांच्या मनावरचे दडपण दूर

होते व आपल्यालाही हे जमेल असे वाटते. त्यामुळे बँक व्यवहार जास्त जागरूकपणे केले जातात.

*****

भाग ३
आर्थिक साक्षरते विषयी थोडेसे ...

बचत गटांच काम करताना महिलांशी गप्पा मारताना असं लक्षात यायचं कि बँकेविषयी कमालीची भीती मनात घर करून बसली आहे. ही भीती कसली आहे तर बँकेत फक्त पुरुष असतात, तिथे खूप कागद-पत्र असतात, ओळखीचं कोणीच नसतं, सगळे इंग्रजीतून असतं, तिथली मराठी सुद्धा समजत नाही, टेबला पलीकडचा पूर्ण माणूस दिसत नाही फक्त माणसांच डोकंच दिसतं! ....या कारणावरून बायकांना बँकेत जायला नको वाटायचं !
 बँकेबद्दल किती अज्ञान एकदा तर एक जण बँकेत कामाला गेली नि काम न करताच परत आली का? विचारले असं का केलं तर म्हणाली 'काय काम आहे?' असं कोणी विचारलं सुद्धा नाही!..... एकदा रेश्माने विचारलं, 'ताई बँक खरंच माझे पैसे सांभाळेल?' मी विचारले, 'का गं तुला असा प्रश्न का पडला?' तर ती म्हणाली, 'मी काही श्रीमंत नाही. माझ्याकडे फार पैसे नाहीत...... म्हणून विचारते' बँक ही श्रीमंतांसाठी आहे असा एक समज ग्रामीण भागात आहे हे. तो मुळातूनच दुरुस्त केला पाहिजे म्हणून हा अनुभव कथनाचा प्रपंच!

१ परताव्याचे गणित समजून घेऊ

सगळ्यांनाच श्रीमंत व्हावे असे वाटत असते पण श्रीमंती, समृद्धी अशी काही एका दिवसात येत नाही, आणि जर अशी एकदम आलीच तर अशा संपत्ती पासून सांभाळूनच असलेले बरे. कष्टाने येणारी संपत्ती ही नेहेमी सावकाश येते पण नक्की येते. अशी संपत्ती टिकतेही आणि सुख मिळवून देते.
 सणासुदीच्या दिवसात गावात कधीतरी एखाद्याला कोणीतरी गपचूप येउन सांगतो, 'आज मला दहा हजार रुपये दे तुला वर्षभरात दुप्पट करून देतो.' मोहापोटी एखादा माणूस गुंतवतोही... आपण पाहू या असे म्हणणारा माणूस दहा हजाराला किती दराने व्याज देतो माहिती आहे? वर्षभरात रक्कम दुप्पट होण्यासाठी व्याजदर महिन्याला ६% असावा लागतो. म्हणजे वर्षाला सरळ व्याजाने हिशोब केला तर १२ महिन्याचे (१२ महिने ६% असे) ७२% होतात पण व्याजावर व्याज वाढत जाते त्यालाच चक्र वाढ व्याज म्हणतात. ते बाराव्या महिन्याला १०१% होते! याचा अर्थ ६% महिन्याला या दराने एक वर्षानंतर दहा हजार रुपयावर व्याज दहा हजार शंभर रुपये मिळते. चक्रव्याढ दराने म्हणजे व्याजावरच्या व्याजाने किती फरक पडतो बघा. आपल्याला या चक्रव्याढ व्याजाच्या ताकदीचा अंदाजच येत नाही. जशी जशी टक्केवारी वाढत जाते तसं तसे व्याजा वरचे व्याजही वाढत जाते. म्हणजे ६% दर महाचा दर १ % ने वाढून ७% महिना केला तर वर्षभरात १२५% व्याज मिळते (शंभर रुपया वर वर्षाच्या शेवटी व्याज १२५ व मुद्दल १०० असे २२५ मिळतील)
 हेच दहा हजार आपण जर राष्ट्रीय बँकेत ठेवले तर सध्या बँका गुंतवणुकीवर दर वर्षाला दर शंभराला ६.२५ रुपये देतात. म्हणजेच ६.२५% बँकांचा हा व्याजदर शंभर रुपयाला वर्षभर ठेवले तर वर्षानंतर मिळणारा असतो म्हणजे वर्षाच्या शेवटी दहा हजाराच्या गुंतवणुकीला बँक ६४३ व्याज देते. (व्याजा वरचे व्याज धरल्याने ६२५ पेक्षा जास्त मिळते), रीतसर मार्गाने मिळणा-या या ६४३ रुपया ऐवजी कोणी १०००० देतो म्हणत असेल तर मोह तर होणार पण या व्यवहारात मुद्दलच बुडायचा धोका आहे हे लक्षात ठेवा. कारण असा कुठलाच उद्योग नाही की जो दर महिन्याला ६% परतावा देउ शकेल. कायम लक्षात ठेवा की यशस्वी उद्योग करायचा असेल तर महिन्याला १ ते १.२% या पेक्षा जास्त दराचे कर्ज परवडत नाही बँकांनी असा विचार करूनच असा व्याजदर ठरवलेला असतो. त्यामुळे रचनेतल्या पतसंस्था किंवा सहकारी बँका सुद्धा परवडणाऱ्या दरानेच कर्ज देतात. बचतीवर कोणी जास्त परतावा देत असेल तर धोकाही तेवढाच जास्त आहे हे समजून घ्या

महिना वाढत जाणारे मुद्दल व्याज एकूण
१०० १०६
१०६ ६.३६ ११२.३६
११२ ६.७४ ११९
११९ ७.१४ १२६
१२६ ७.५७ १३४
१३४ १४२

१४२ ८.५१ १५०
१५९ ९.५६ १६९
१० १६९ १०.१३ १७९
११ १७९ १०.७४ १९०
१२ १९० ११.३९ २०१
२ आर्थिक साक्षरतेच्या पायऱ्या

 १ बँकेत खाते काढणे: बँकेत खाते काढले की पैसे बँकेत पैसे ठेवायचे. गरजे पुरते काढायचे त्यामुळे पैसे सुरक्षित रहातात हे जेवढे खरे असते तेवढेच आपले पैसे आपण वापरत नसतो तेव्हा इतरांना वापरायला मिळतात त्यामुळे आपल्या पैशावर व्याज मिळवता येते. जर पैसे नक्की लागणार नसतील तर ते नेहेमी मुदत ठेवी मध्ये गुंतवून ठेवावेत त्याला बँक जास्त व्याज देते.
 २ बचत करणेः कितीही कमी मिळकत असली तरी बचत करायला शिकायला हवे. ही बचतीची सवय आपल्याला पुढे खूप उपयोगी पडते. जेवढी लहानवयात आपण बचत करू तेवढी कमी रक्कम बचत केलेली पुरते.
 ३ विमाः अचानक आलेल्या संकटाला तारून नेण्यासाठी विमा काढणे जरूरीचे आहे. विमा अपघातात होणा-या हॉस्पिटलसाठीच्या खर्चाचा असू शकतो किंवा अचानक मृत्यू आला तर मिळणारा परतावा असू शकतो. कधी पिकाचा असू शकतो किंवा अगदी चोरीचा किंवा वाहनाच्या अपघाताचा सुद्धा असू शकतो. आपण एक लक्षात घेऊया कि विमा म्हणजे गुंतवणूक नाही. कधी कधी लोकं विचारतात कि ‘वर्षाचा हप्ता ५00 रु भरला होता पण काहीच झालं नाही म्हंजे गेले ना वाया!' तर तसे नसते. चुकून गरज पडली असती तर?.... विमा नसेल तर २५००० खर्च आला असता तो ५०० रुपये देउन भागवला हे आश्वासन हीच सुरक्षा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अचानक काहीही घडू शकते त्याला अचानक पैसे पडू शकतात असा विचार करून विमा काढणे शहाणपणाचे लक्षण आहे. अचानक खर्च करावा लागला कि चांगले चांगले चाललेले संसार कोलमडून पडतात. तसं होउ नये म्हणून विमा काढायचा असे केले की त्यालाच म्हणतात आर्थिक साक्षर!
 ४ म्हातारपणाची सोय: रोजचा गाडा ओढता ओढता पुढंच बघून आपल्या म्हातारपणाची सोय करणे हे फार महत्वाचे असते. जेंव्हा हात पाय हलणार नाहीत तेव्हाही जगायला खर्च येणार आहे तो कसा भागवायचा याचा वेळेत विचार केलेला बरा. आपल्याला लागणा-या औषध पाण्यासाठी चार पैसे बाजूला पडलेले असलेले बरे हे नेहेमी लक्षात ठेवायला हवे. या पैशाला मी कधीही हात लावणार नाही असे म्हातारपणासाठी पैसे बाजूला ठेवलेले असायला हवेत असे जो करतो तो स्वतःसाठी आर्थिक नियोजन करू शकतो असे म्हणतात यालाच आर्थिक साक्षर म्हणतात!
 या चार गोष्टीचा विचार करायला हवा. ‘मला कधी काही होणार नाही' असे होणे नेहेमीच चांगले पण काही झालेच तर...पैशाची सोय असलेली बरी. असा विचार नेहेमी करायला हवा. आज हातात चार पैसे आले तर त्यातला एखादा तरी बाजू टाकावा तरच उद्याची सोय होईल हे कायम लक्षात ठेवेलेले बरे. असा विचार करून गरज नसलेल्या गोष्टीवर पैसे खर्च करताना हात आखडता घेणे चांगले.

३ जरा विचार करा कर्ज घेणे खरच वाईट असतं ?

सुरुवाती सुरवातीला बचत गट, हिशोबाला बसला कि गटातल्या सभासद महिला महिन्याची महिन्याला न चुकता बचत करायच्या पण गटात पैसे जमल्यावर गट चालू असताना कोणीच कर्जाची मागणी करायच्या नाहीत. बचत गट बैठकीच्या आधी किंवा नंतर खाजगीत येऊन कर्जासाठी प्रमुखाला भेटायच्या. पण सर्वांसमोर व्यवहार झाले नाहीत म्हणून अनेकींना कधी कर्ज मिळायचे नाही. गरज असायची पैसेही असायचे पण तरी पैसे तसेच पडून रहायचे. गट चालू असताना कोणीच का बरं कर्ज मागत नव्हतं? तर कर्ज हवे होते पण गटात सगळ्यांसमोर कर्जाची मागणी मांडायचा संकोच होत होता....... कारण ‘गरजेला आवश्यक तेवढे कर्ज घ्यावे' असा संस्कार कोणावरंच झालेला नव्हता. संस्कार असा होता तो ‘कर्ज घेणे अतिशय वाईट' !
 ‘कर्ज' हा दारिद्रयाचा कळीचा मुद्दा असूनही 'कर्ज' या विषयावर कोणाचेही कधीच शिक्षण झालेले नाही आणि त्यामुळे किती कर्ज घ्यावे? कधी घ्यावे? कोणाकडून घ्यावे? काय दराने घ्यावे? कुठल्या योजनेतून घ्यावे? अशा कुठल्याही विषयाची कोणालाच पुरेशी माहिती नाही.... म्हणजे महिलांनाच माहिती नव्हती असं नाही तर पुरुषांनाही ही माहिती नव्हती. बहुतेक जण जाहिरातीतूनच काय ते शिकत होते! कर्ज हा विषय अतिशय महत्वाचा असून सुद्धा ग्रामीण भागात त्या बद्दल कमालीची गोपनीयता बाळगली जायची आणि या अशा गुपचुपच्या व्यवहारामुळेच नेमके फसायला व्हायचे. कर्ज घेणा-याला आपण कर्ज घेतले आहे हे कधीही कोणालाही कळू नये असेही वाटत असायचे. कर्ज घेणे ही सन्मानाची गोष्ट तर कधी कोणाला वाटलीच नाही.
 एकदा एका बैठकीत महिलांना विचारले ‘तुम्हाला माहित असणा-या श्रीमंत लोकांची नावे सांगा' तर 'टाटा, बिर्ला, अंबानी' अशी बरीच नावे महिलांनी सांगितली मग विचारले त्यांच्या नावावर कर्ज असेल का?' महिला लगेच म्हणाल्या ‘अर्थातच नाही! त्याना कर्जाची काय गरज?' त्यांनी ठामपणे उत्तर दिलं. जेव्हा मी त्यांना सांगितलं, 'असं काही नाही, त्यांच्यावर कर्ज असूही शकेल! ....आणि समजा नसेल तर बँक त्यांच्यापाठी ‘कर्ज घ्या' ‘कर्ज घ्या' असं म्हणत मागे लागत असतील, असं मला वाटतं!'
  ....क्षणभर शांतता पसरली....... 'हो बँकांना खात्री आहे ते श्रीमंत असल्यामुळे कर्ज नक्कीच फेडतील' एक जण बँकेची भूमिका ‘समजून' बोलली....'बरोब्बर! अगदी बरोब्बर! म्हणजे कर्ज घेणं हे वाईट नाही पण ते फेडता येण्याची पात्रता सिद्ध करता येणं महत्वाचं म्हणजे आपण कर्ज फेड करू अशी आपली बाजारात पत तयार करणं महत्वाचं.
 जी महिला गटाच्या नियमाप्रमाणे नियमित कर्जफेड करते तिला कुठल्याही अडचणी शिवाय पुढचं मोठं कर्ज मिळत. 'कर्ज घेणं वाईट' हा समज मनातून काढून टाकायला हवा!....
 सरसकट कर्ज घेणं वाईट नसतं. माफक दारानं कर्ज घेतलं आणि योग्य प्रकारे खर्च केलं तर घेतलेलं प्रत्येक कर्ज आर्थिक परिस्थिती सुधारायला उपयोगी पडतं, पण बेताबेतानं घ्यायचं.... पत वाढवत वाढवत पुढे सरकायचं.' त्यावर एक जण म्हणाली, 'बँकेतून घेतलेलं कर्ज सरकारनं ‘माफ केलं' म्हणून फिटलं असं ज्यांच होतं त्यांची वेगळी यादी बँकेकडे असते का?' तर हो! आता बँकेच्या चोख आणि फसव्या गिर्हाइकामध्ये बँक फरक करते ही नवीन माहिती करून घेतली पाहिजे.
 जीवन जगण्यासाठी लागणारं असं पैशाच्या व्यवहाराचं शिक्षण ना पुरुषांना कधी मिळतं ना महिलांना!... त्यामुळे शिकायला असं हवं कि वेळेत ठरलेला हप्ता भरला कि ‘कर्ज आहे' याचा संकोच बाळगायची गरज नाही बँकेचे किंवा गटाचे कर्ज सन्मानाच कर्ज असते ते घ्यायचे नि चोख फेडायला फेडायला शिकायचे! असे केले की बँकेची मदत घेतली तर राजकीय पुढार्याच्या मदतीशिवायही आपण आपापली परिस्थिती सुधारू शकतो हे नव्याने ग्रामीण जनतेला समजले.
 अशा बँक व्यवहारामुळे उत्पादक कर्ज व इतर कर्ज यातला फरक महिलांना समजू लागला. बँक व्यवहारामुळे आता बचत गटातल्या या महिला उत्पादक कर्जाचं आर्थिक गणित समजून, बँकेच्या कर्जाची फेड हा खर्च नाही तर गुंतवणूक आहे असं कळू लागलं. कर्जाच्या व्याजाचा दर योग्य असतो हे विचारात घेऊन, कर्ज देणा-या बँकेची भूमिका समजल्यावर गटात मोठमोठ्ठाली कर्ज मागायला लागल्या. चारचौघीसमोर कर्ज घ्यायला पूर्वी वाटणारी लाज आता वाटेनाशी झाली, कर्जाची मागणी व्हायला लागली, तशी चोख वेळेत हप्त्या- हप्त्यानं परत फेडही व्हायला लागली. हे सारं समजून करायला तपापेक्षा जास्त काळ लागला! त्यामुळे आता त्याच महिला, बँकेतून काही लाखाची कर्ज हसत हसत घेतात आणि घेतलेलं कर्ज ‘आवाक्यातल आहे' असं म्हणून शांत झोपतातही!

याच साठी केला होता अट्टाहास..........

 आयुष्यात पहिल्यांदाच आज सावित्रा ही तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये पाऊल टाकत होती. तिच्या लेकीने,भाग्यश्रीने वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळविले होते. त्याचा बक्षीस समारंभ होता. माणसांनी गच्च भरलेल्या हॉलमध्ये भाग्यश्रीचे नाव पुकारल्यावर ज्या सहजपणाने ती माईकसमोर उभी राहीली आणि अत्यंत धीटपणाने तिचे विचार मांडू लागली ते पाहून सावित्राचे डोळे भरून आले. तिला पुढचे काहीही दिसेनासे झाले. तिचे मन भूतकाळात हरवले.......
 सासरी आल्यापासून जणू गाड्याला जुंपलेल्या गुरासारखी संसाराचा गाडा ओढणारी सावित्रा कधी माणूस नव्हतीच! तिला तिची स्वतःची ओळखच नव्हती. घरातील मोठी माणसे आणि शेतावरील-घरातील काम यांची ऊठबस करणे हेच तिचे काम. तिला घरातही काही किंमत नव्हती. ना घर तिच्या नावावर ना शेतातल्या ओंजळभर धान्यावर तिचा अधिकार. तिला ओळख मिळाली ती तिच्या बचतगटामुळे! अत्यंत नियमित उपस्थिती आणि नियमित परतफेड यामुळे गटात आणि बँकेतल्या अधिका-यांमध्येही सावित्राची पत तयार झाली. म्हणूनच गटातील खात्याबरोबरच तिचे व्यक्तिगत खातेही खोलले. खाते खोलताना बँकेच्या अधिका-यांनी तिला पूर्ण सहकार्य केले. आज त्याच खात्यावर तिने भाग्यश्रीच्या शिक्षणासाठी कर्ज काढले होते. त्यामुळेच तिची मुलगी इतक्या धीटपणाने एवढ्या मोठ्या लोकांसमोर तिची मते मांडत होती.
 बँकेबद्दलची कृतज्ञता तिच्या मनात दाटून आली. जे तिला घरातून मिळालं नव्हतं ते मानाचे स्थान आज बँकेमुळे तिला मिळालं. ती आज ‘मुलीची पालक' म्हणून कॉलेजमधील कार्यक्रमासाठी शिक्षकांनी दिलेल्या निमंत्रणावरून हजर होती! तिचा मुलगा महेशही हल्ली कोणतीही गोष्ट करताना तिला विचारू लागला होता. एकूणच तिला मिळालेल्या या आर्थिक बळामुळे तिचं असणं हेही सार्थ झालं होतं. त्याला अर्थ मिळाला होता.
 कार्यक्रमाहून परतल्यावर हे सगळे बँकेतील अधिका-यांना ती सांगणार होती. ती सांगणार होती की लहान माणसांना या ओळखीची किती गरज असते ते! रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, गटाचे पासबुक हे सगळे-सगळे त्यांच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे असते. या सगळ्यांमुळे त्यांना समाजात एक ओळख मिळते. एक महत्त्व मिळते. त्यांचे असे एक वजन तयार होते. नाहीतर भाग्यश्रीचे वडील, आजा सगळे सगळे असताना भाग्यश्रीच्या शिक्षणासाठी सावित्राने कर्ज काढले म्हणूनच केवळ भाग्यश्रीचे भाग्य उजळले असे कोण म्हणाले असते? तिच्या कष्टांचे माप तिच्या पदरात कोणी घातले असते?
 बँका ठिकठिकाणी करीत असलेल्या या महत्त्वाच्या कामाचा, त्यांच्या माहितीपत्रकात कुठेच उल्लेख नसतो. बचत गटातल्या आयांना ख-या अर्थाने कर्ते बनविण्याचे काम, सगळ्या स्त्रियांना मानाने पैशाशी निगडित काम करण्याची संधी देण्याचे काम! समाजातील त्यांची पत वाढवण्याचे काम ! ही कामं सुद्धा खूप महत्त्वाची आहेत..........सावित्रा विचार करत होती.
...... ह्या विचारांबरोबरच टाळ्यांच्या कडकडाटामुळे सावित्रा भानावर आली.

*****

प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शक उत्तरे

प्रशिक्षण १  खाते काढताना..फोटो, आधार कार्ड व लाईट बिल/रेशन कार्ड
प्रशिक्षण २  या प्रशिक्षणात गाळलेल्या जागांमध्ये कंसातील दिलेल्या
  शब्दांपैकी पुढील शब्द पुढील क्रमाने नोंदवावेत.
स्लिप भरली, नाव, क्रमांक, गटाचा, अध्यक्ष व सचिव, अक्षरी पासबुक, मोजून काही शब्द जास्तीचे अनावश्यक दिले आहेत.
प्रशिक्षण ३  योग्य पर्याय निवडा
   १) क २) अ ३) क
प्रशिक्षण ४  योग्य पर्याय निवडा
   १)अ २) ब ३) ब
प्रशिक्षण ५  तर काय झाले १
   १) ब २)अ
प्रशिक्षण ६  तर काय झाले २
   १)ड २) ब
प्रशिक्षण ७   तुमची बाजू कोणची ?
   सोनालीची बाजू पटवून द्यावी.
प्रशिक्षण ८  विधान चूक का बरोबर ते लिहा
प्रशिक्षण ९  चला म ट्रिपला फ बँकेत जाऊ !
   विधानांवरील चर्चेचे मुद्दे
१. हे विधान X आहे. सावकार आपला दागिना जपून ठेवतो पण बँक आपल्या त्याच नोटा जपून ठेवत नाही. त्या चलनात येतात. पण आपण ठेवलेल्या रकमेसाठी बँक जबाबदार असते.
२. हे विधान ✓ आहे. सावकाराकडची कर्ज फेड त्याच्या पत्नीकडे दिली तरी ती त्याचा स्वीकार करते किंवा सावकार त्याच्या घराबाहेर कोठे भेटला आणि तेथे त्याची रक्कम त्याला दिली तरी तो ती स्वीकारतो. बँकेचे अधिकारी मात्र व्यवहार फक्त बँकेतच करतात. त्याच्या पत्नीचा किंवा कुटुंबियांचा त्या व्यवहाराशी काहीही संबंध नसतो
३. हे विधान X आहे. धनादेश हा त्यावर लिहिलेल्या तारखेनंतर ३
महिन्यांपर्यंतच स्वीकारणे कायदेशीररित्या बंधनकारक असते.
४.हे विधान X आहे. पासबुक हरवले तर बँकेला तसा अर्ज दिल्यावर किरकोळ पैसे भरुन दुसरे पासबुक मिळू शकते. पासबुकावरील आपले पैसे आपल्याच नावाने बँकेत जमा राहतात.
५. हे विधान X आहे. बँकेचा व्याजदर हा वार्षिक असतो. तर गटाचा व्याजदर हा मासिक असतो. २ टक्के महिना दराने वर्षाचा दर हा २४% होतो. याचा अर्थ गटाचा व्याजदर हा जास्त आहे.
६. हे विधान ✓ आहे. याचा अनुभव आपण सर्वच घेत असतो. महिला या विविध क्षेत्राबरोबरच बँकींगमध्येही आघाडीवर आहेत.

******

रिझर्व बँकेच्या पंच्याहत्तरी निमित्त भारतभर आर्थिक समावेशनाचे काम झाले. या योजनेतील एकमेव १००% यशस्वी गाव म्हणजे भोर तालुक्यातील खोपी! ज्ञान प्रबोधिनीच्या सहकार्याने आणि बचत गटातील महिलांच्या पुढाकाराने झाले. या गावात धडपडून काम केलेल्या कावेरीताई शिवरकर यांना तत्कालिन गव्हर्नर डॉ. सुब्बाराव यांनी भेटायला बोलावले तेंव्हा.

आधुनिक काळात दैनंदिन जीवनातही अनेक परिमाणे बदलत चाललेली आहेत. पूर्वीपासून संपूर्ण आर्थिक क्षेत्रात बँकांचे मोलाचे आणि महत्त्वाचे स्थान असले तरी आता बँकांच्या कार्यप्रणालीत अमुलाग्र बदल झाला आहे. राष्ट्रीयकरणानंतर ग्रामीण क्षेत्रात बँकांचे जाळे विस्तृत प्रमाणात पसरले, तेथेही स्वाभाविकपणे हा बदल दृष्टोत्पतीस येतो. सांप्रत या संबंधातील महिलांचे योगदानही लक्षणीय ठरले आहे. आर्थिक साक्षरतेच्या प्रसारामुळे व प्रशिक्षणामुळे ग्रामीण महिला उद्योगशील बनल्या आहेत. त्यांचे तसे होणे ही काळाचीही गरज आहे. लघुउद्योग, बचत गट, अनुषंगिक इतर कामे यामुळे महिलांचे हाती आता पैसा खेळू लागला आहे. शिवाय कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना, तेथील आर्थिक व्यवहारातही महिला जागरूकतेने लक्ष घालू लागल्या आहेत. आता महिलांचा बँकेशी संबंध येणे गरजेचे, आवश्यक व अपरिहार्य ठरले आहे. परंतु कित्येक वेळा असे आढळून येते की, महिलांना बँकेच्या कामाची, त्यांच्या कार्यप्रणालीची, संबंधित सोयी सुविधांची पूर्ण माहिती नसते. त्याबाबतची तोंडओळख झाल्यास त्यांना बँकेत जाऊन सहजतेने व्यवहार करणे सोयीचे होईल या उद्देशाने स्त्री शक्ती प्रबोधन-ग्रामीणच्यावतीने 'बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी' हे प्रस्तुतचे पुस्तक अनुभवी व कुशल मान्यवरांकडून तयार करून घेण्यात आले आहे. मला नमूद करताना आनंद वाटतो की, आमच्या रोटरी क्लब पुणे साऊथच्या योगदानातून हे पुस्तक आकाराला आले आहे. मला विश्वास वाटतो की ग्रामीण महिलांनी या पुस्तकाचा बारकाईने धांडोळा घेतल्यास त्यांना बँकाविषयीचे काम करणे अधिक सुकर होईल.

रो. मोहन पटवर्धन

अध्यक्ष, २०१८-१९

रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ