प्रेरक चरित्रे

विकिस्रोत कडून





प्रेरक चरित्रे
डॉ. सुनीलकुमार लवटे




 प्रेरक चरित्रे
(व्यक्तीलेखसंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in


तिसरी आवृत्ती २०१८


© डॉ. सुनीलकुमार लवटे


प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com


मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य ₹३५३५/- चरित्रे यांची पहा जरा...

‘प्रेरक चरित्रे' हे माझे छोटेखानी पुस्तक म्हणजे मला प्रेरक वाटणाच्या व्यक्तींविषयी लिहिलेल्या श्रद्धासुमनांची माळ होय. महाराष्ट्राचे शिल्पकार व संस्थापक मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांचा नि माझा कधी प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग आला नाही तरी त्यांना मी अनेक समारंभात ऐकलं, पाहिलं आहे. कळत्या वयात त्यांची आत्मकथा, भाषणे वाचली आहेत. गेल्याच वर्षी त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रकाशित लेख, ग्रंथ आवर्जून वाचून मनन केलेले आहे. राजकीय जीवनात समाज, संस्कृती, साहित्य, सभ्यता व सोज्ज्वळता जपणारा हा नेता मला आपला का वाटतो नाही सांगता येणार. पण एक नक्की की असं नेतृत्व ज्या राज्याला लाभतं ते राज्य सर्वसामान्यांचे हित जपत प्रगती करत राहतं. राजकारणाला अपवाद आदर्श म्हणून त्यांची मजवर मोहिनी आहे खरी!
 सर्वोदयी कार्यकर्ते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांचा मला निकट सहवास लाभला ही माझ्या जीवनाची मोठी जमेली बाजू, मिळकत म्हणायला हरकत नाही. या सा-या व्यक्तींचं विधायकपण व परहितदक्षता यांनी मला नेहमीच कार्यप्रवण बनवलं आहे. समाज नुसता तत्त्व आणि ध्येयांनी मोठा होत नाही. त्यापुढे काही प्रतिदर्श (Model) आदर्श लागतात. वरील दोन्ही चरित्रे या संदर्भात अनुकरणीय म्हणून लक्षात घ्यायला हवी. अण्णासाहेबांनी मला दिलेलं पितृप्रेम मी कधी विसरू शकणार नाही. ते कर्मठ नि पारंपारिक सर्वोदयी नव्हते. त्यांचं प्रागतिकपण हा त्या काळी माझ्या आकर्षणाचा विषय होता नि अनुकरणाचाही!
 श्रीमती तारा अली बेग यांना मी कधी पाहिलं, ऐकलं नाही. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊनच मी त्यांच्याबद्दल लिहिलं. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजकार्य करणं नि तेही जात, धर्मापलीकडे जाऊन करणे ही सोपी गोष्ट नव्हती. महिला व बाल कल्याणासारख्या क्षेत्रात त्या रवींद्रनाथ टागोर, कमलादेवी चटोपाध्याय व आपले पती अली बेग यांच्यामुळे आल्या खऱ्या, पण त्यांनी वंचितांचं जे कार्य केलं ते आंतरिक उमाळ्याने, बालशिक्षण व बालकल्याण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ही दोन्ही अंगे बळकट झाल्याशिवाय बाल्य सुदृढ व समृद्ध होत नाही, हे भान देणाच्या अनुताईंना भेटलो व एका भेटीत आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला. त्याचं एकमेव कारण आम्हा दोघांतील कार्य साम्य हेच होय. समाजकार्यातील त्या माझ्या बालपणापासूनच्या आदर्श असल्याने त्यांच्या माझ्या संबंधात आई-मुलाचा ओलावा मी सतत अनुभवला आहे.
 ऐन तारुण्यात बाबा आमटे यांचे कार्य पाहिलं. त्यांचा सहवास लाभला व मला माझ्या नाकर्तेपणाची घृणा वाटू लागली. समाजकार्यही एका पुरुषार्थी योद्ध्याप्रमाणे करण्याचा वस्तुपाठ जर मला कोणी शिकवला असेल तर तो बाबा आमटेंच्या जीवन व कार्याने. कळत्या वयात अशा माणसांशी गाठ पडणं हे समाज रासायनिक अभिक्रियेसारखं (Social Chemical Process) असतं. ती ऊर्जा, दृष्टी तुमच्यात सतत विचार वाहात ठेवत कृतीरूप कधी धारण करते तुम्हास कळतसुद्धा नाही. कुष्ठपीडित, अंध, अपंग, वृद्ध सर्व वंचितांप्रति तुम्हाला कळवळा वाटायला तुमच्या संवेदनेचा पाझर जिवंत व जाज्वल्यच असायला लागतो. समाजातील प्रसंग हे ते पाझर फुटण्याची क्षणिक कारणे असतात. स्थायीभाव असतो तो परहितध्यास!
 इव्हान लोमेक्स मला भेटल्या प्रसंगाने पण त्यांनी संवेदी व समर्पित वृत्तीनं माझं गर्वहरण केलं. रस्त्यावरच्या किळसवाणं जीवन जगणा-याला कवटाळणं सिनेमात पाहणं कितीही उदार वाटत असलं तरी वास्तवात ती कृती करणं काळीज असल्याशिवाय शक्य नाही, हे त्यांच्या कामातूनच माझ्या लक्षात आलं. मी काही मोठा कार्यकर्ता नाही; असेन तर एक संवेदी नागरिक. पण या सा-यांची चरित्रं मला नित्य बेचैन ठेवत आलीत. जी काही थोडी कृती माझ्या हातून घडली ती यांच्या चरित्रांमुळे, जीवन, कार्य, प्रेरणेमुळे! ‘चरित्रे यांची पहा जरा' असं म्हणत लिहिलेले हे लेख म्हणजे आपल्यात झालेला संकर, संसर्ग इतरांप्रत परितर्वनार्थ पसरवणे, पोहोचवणे होय. तेवढे जरी झाले, पोहोचले तर ती या लेखनाची मी सार्थकता मानीन.
 ‘अक्षर' प्रकाशनाच्या अमेय जोशींमुळे हे घडू शकले. मी त्यांचा ऋणी आहे.

२० मे, २०१३
डॉ. सुनीलकुमार लवटे
 
अनुक्रम

१. सुसंस्कृत राजकारणी : यशवंतराव चव्हाण/७

२. सर्वोदयी विश्वस्त : अण्णासाहेब सहस्रबुद्धे/१४

३. समाजसेविका : तारा अली बेग/१८

४. वंचितांच्या वाली : अनुताई वाघ/२१

५. अश्रूमधलं इंद्रधनुष्य : बाबा आमटे/२४

६. उपेक्षितांची प्रेषित : इव्हान लोमेक्स/२७ सुसंस्कृत राजकारणी : यशवंतराव चव्हाण

सामान्यातून असामान्य झालेल्या परंतु सतत सामान्यांची काळजी वाहणारा लोकनेता म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे महत्त्व कालातीत आहे. या नावाशी माझी पहिली ओळख झाली तेव्हा मी कोल्हापूर आर्य समाजाने चालविलेल्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत इयत्ता ५वीत शिकत होतो. त्या वेळी बहधा शिक्षण तोंडी असायचं. गुरुजींचा

ठरलेला प्रश्न असायचा... नव्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण? सारा वर्ग त्यांनीच पाठ करून घेतलेलं उत्तर एका स्वरात द्यायचा... यशवंतरावऽऽ चव्हाण! पुढे दोन एक वर्षांतच ते मी शिकत, राहात असलेल्या रिमांड होममध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या समवेत आले... त्यांच्यापुढे कार्यक्रमाशेवटी जवळ उभारून राष्ट्रगीत म्हणण्याची संधी मिळणार होती. पण उंचीनी घात केला नि मी मोठा म्हणून मला बाजूला करण्यात आलं. पण तासभर आम्ही त्यांच्याजवळ होतो. बालपणात त्यांच्याबद्दल निर्माण झालेले कुतूहल वय वाढेल तसं वाढतच गेलं. ते या जन्मशताब्दी वर्षांपर्यंत वाढतच आहे. कधी मुत्सद्दी म्हणून, कधी मवाळ म्हणून, कधी वादग्रस्त झाले म्हणून ते माझ्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिले. महाराष्ट्राच्या पुरोगामी चरित्राची त्यांनी केलेली जडण घडण, सामान्याच्या हाती सत्ता यावी म्हणून त्यांनी केलेला पंचायत राज्याचा प्रयोग (जो आज राष्ट्रभर राबवला जातोय!), साहित्य, संस्कृती, कला, संगीताबद्दल त्यांचं सहज प्रेम अशा अनेक कारणांनी मी त्यांच्याकडे ओढला गेलो. सन १९८५ मध्ये मी त्यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ' वाचलं नि त्यांच्या असामान्य धडपडीचं अप्रूप वाटलं. त्या वेळी ‘महाराष्ट्र मानस नावाचं हिंदी पाक्षिक महाराष्ट्र शासन प्रकाशित करायच. यशवंतराव चव्हाण निधन १९८४ ला झाल्यानंतर आलेल्या पहिल्या जयंतीला (१२ मार्च, १९८५) 'लोकराज्य' व 'महाराष्ट्र मानस' पाक्षिकांचे 'यशवंतराव चव्हाण विशेषांक' प्रकाशित झाले होते. त्यात मी कृष्णाकाठची समीक्षा नि त्यांच्या निवडक भाषणांचे अनुवाद केले होते व ते त्यात प्रकाशितही झाले होते. तेव्हापासून मी वेळोवेळी त्यांना जाणून घेत आलो आहे.
 मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे यशवंतराव चव्हाण यांच्या मोठेपणाची चुणूक शाळेतूनच दिसून आली. देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी ते शाळेत शिकत असताना 'तू पुढे कोण होणार?' असं गुरुजींनी विचारल्यावर ‘मी यशवंतराव चव्हाण होणार' म्हणणारा हा माणूस उपजतच स्वयंभू, स्वप्रज्ञ होता. गुणदोषांसह तो स्वतःचं चित्र, चारित्र्य नि चरित्र घेऊन जन्मला होता. लहानपणी वडील वारले. मोठ्या भावानं त्यांचं शिक्षण केलं. घरी सत्यशोधक चळवळीचं वातावरण होतं. राष्ट्रीय आंदोलनाचा काळ होता तो. वयाच्या १५-१५ व्या वर्षी जो मुलगा राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला म्हणून तुरुंगात जातो, ते केवळ बाह्य प्रभावांनी नाही. त्यांच्यात उपजतच राष्ट्रभक्ती होती. हायस्कूलला ते क-हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्या शाळेचं ब्रीद वाक्य होतं- ‘सर्व हि तपसा साध्यम'... तपस्येनं सर्वकाही साध्य होतं. या वाक्याचा त्यांच्या जीवनावर असाधारण प्रभाव पडल्याचं दिसतं. त्यांनी 'लोकनेता' म्हणून मिळविलेलं बिरुद कुणाच्या पूर्व पुण्याईनं आलं नव्हतं. कष्टसाध्य, प्रयत्नसाध्य, संघर्षसाध्य असं त्यांचं यश होतं.
 मॅट्रीक होऊन ते पदवी शिक्षणासाठी म्हणून कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आले. बिंदु चौकातील भुसारी वाड्यात त्या वेळी ते राहात. करवीर नगर वाचन मंदिरात नित्यनियमाने वाचन करीत. 'यशवंत', 'वैनतेय इ. नियतकालिकांचे नियमित वाचन करीत. याच काळात त्यांनी वि. स. खांडेकरांच्या दोन ध्रुव', 'पांढरे डाग' सारख्या कादंब-या वाचल्या नि त्यांचे मन समाजवादी झालं. आयुष्यभर त्यांनी वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, शिवाजी सावंत, आनंद यादव, रणजित देसाई इ. कोल्हापूरच्या साहित्यिकांचं लेखन ऋणानुबंध म्हणून वाचलं. ना. सी. फडके तर त्यांचे प्राध्यापकच! यशवंतराव चव्हाण यांची जयंती भाषणं ऐकली असतील त्यांना त्यांच्या भाषणावर असलेलं फडके-खांडेकर प्रभाव लगेच लक्षात आल्यावाचून राहणार नाही. वि. स. खांडेकरांना ते प्रकाशाचा, चांदण्याचा लेखक मानत, तर ना. सी. फडके त्यांच्या दृष्टीने कल्पनाप्रभू साहित्यक होते. वाचनाचा या काळात जडलेला छंद त्यांनी आयुष्यभर जपला.
 सन १९३८ मध्ये राजाराम कॉलेजमधून त्यांनी इतिहास व अर्थशास्त्र विषयातील मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी मिळवली. १९४० मध्ये ते एल. एल. बी. झाले. सन १९४२ च्या लढ्यात त्यांनी सातारा जिल्ह्याचं नेतृत्व केलं व ते सक्रिय राजकारणी झाले. सन १९३० ते १९४५ हा त्यांच्या राजकीय घडणीचा काळ होता. या काळात ते तीनदा तुरुंगात गेले. तुरुंगात त्या वेळी राजकीय कैद्यांना पुस्तके वाचणे, भाषणे, शिबिरे इत्यादींची मुभा असे. त्याकाळात यशवंतराव चव्हाण यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, एम. एन. रॉय, कार्ल मार्क्स, जवाहरलाल नेहरू यांच्या साहित्याचं वाचन, चिंतन, मनन, चर्चा केली. या सा-याची परिणती पुढे त्यांच्यातील प्रगल्भ विचार, व्यवहारात दिसत राहिली.
 सन १९४२ च्या २ जूनला ते विवाहबद्ध झाले नि ‘भारत छोडो' आंदोलन सक्रिय झाल्यानं त्यांना भूमिगत व्हावं लागलं. त्या अर्थानं त्यांनी कधी स्वसंसार केलाच नाही. कायम ते लष्कराच्याच भाकरी भाजत राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी वयाच्या ३८व्या वर्षी सन १९५२ ला मुंबई राज्याचं पुरवठा मंत्रीपद भूषवलं. मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळातही ते मंत्री होते. पण सन १९५६ ला झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात झालेल्या गोळीबारात १०६ हुतात्मे झाले नि मोरारजी देसाईंना पाय उतार व्हावं लागलं. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. ही संधी सोनेरी खचितच नव्हती. जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असल्यानं यशवंतराव चव्हाण हे सतत टीकेचे लक्ष्य असायचे. आचार्य अत्रे यांनी लढ्यातून त्यांच्याविरुद्ध नि काँग्रेसविरुद्ध रान उठवलेलं. हा काळ यशवंतराव चव्हाणांच्या दृष्टीनं कसोटीचा असला तरी कर्तृत्व सिद्ध करायचा काळ होता.
 यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. मोरारजी देसाईंच्या कार्यपद्धतीपेक्षा लोकानुनय नसला तरी लोकभावनांचा आदर करण्याची कार्यपद्धती त्यांनी अवलंबली. लोकांनी बोलावलं नसलं तरी ते लोकांत जाऊ लागले. सन १९५७ ला प्रतापगडला शिवस्मारक उभारून त्यांनी मराठी मन, माती व मतं मिळविली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना स्मारकाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणून स्वतंत्र मराठी भाषी राज्याविषयीच्या लोकभावना त्यांनी लक्षात आणून दिल्या. त्या वेळी नेहरूंचे स्वागत सर्वत्र काळे झेंडे दाखवून झाल्यानं त्यांना गुजरात व महाराष्ट्र स्वतंत्र करणे भाग पडलं. स्वतंत्र महाराष्ट्राचे मराठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला.
 १ मे, १९६० ला ते मुख्यमंत्री झाल्यावर एका मोठ्या वादानं चर्चेचं वादळ उठलं. महाराष्ट्र राज्य 'मराठ्यांचं' की मराठीचं? कारण त्यांच्या मंत्रीमंडळात मराठे बहुसंख्य होते... यशवंतराव ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर चळवळीत बहुजनांचे ते समर्थक होते... यशवंतरावांनी खंबीरपणे हे राज्य मराठीचे आहे असे नुसते ठासून सांगितले नाही तर ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी ‘मराठी विश्वकोश मंडळ' व 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' स्थापन केले. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तर्कतीर्थ लक्ष्णशास्त्री जोशींसारख्या पंडीताची त्यावर नेमणूक करून आपण ब्राह्मणद्वेष्टे नाही हे कृतीने सिद्ध केले. मुख्यमंत्री पदाच्या आपल्या उण्यापुऱ्या दोन वर्षात त्यांनी महत्त्वाच्या विषयांत मूलभूत व क्रांतिकारी निर्णय घेऊन अंमलबजावणीचा धडाका सुरू केला. मराठी माध्यमाच्या उच्च शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाची स्थापना, सहकार प्रसारासाठी धनंजय गाडगीळांची नियुक्ती, सत्तेच्या विकेंद्रीकरणार्थ पंचायत राज्य व्यवस्थेची मुहूर्तमेढ, शेतीसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोयना धरणांची उभारणी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, छत्रपती शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील प्रभृतींच्या विचारांची पाठराखण अशा त्रिविध पद्धतीनी त्यांनी महाराष्ट्र राज्य पुरोगामी व्हावे म्हणून एकामागून एक कार्यक्रम हाती घेतले. महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक धोरणाचे जनक म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे असाधारण महत्त्व आहे. हे सर्व करत असताना सर्वसाधारण माणसात ‘लोकनेता' म्हणून त्यांनी आपल्या कार्यशैलीतून व कर्तृत्वातून जी प्रतिमा निर्माण केली ती या शताब्दी वर्षापर्यंत अन्य कुणालाही लाभू शकली नाही.
 सन १९६३ ला चीननी भारतावर आक्रमण केले व त्यात भारताला हार खावी लागली. त्याचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना राजीरामा देणे भाग पडले. भारताला कणखर व विश्वासू संरक्षण मंत्र्यांची गरज भासू लागली. पंतप्रधान नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांची यासाठी केलेली निवड एका अर्थाने त्यांच्या कार्य, कर्तृत्व, प्रशासन कौशल्य यांचाच तो सन्मान व स्वीकृती होती. या संधीने यशवंतरावर चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविण्याची नामी संधी लाभली. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृती व समाजकारण हेच आपलं इतिकर्तव्य बनवून टाकलं होतं. ते करताना त्यांना अनेकदा मनाला मुरड घालावी लागली. तडजोडी कराव्या लागल्या. पक्षांतरं झाली. त्यामुळे धरसोडीच्या दोषाचे खापर त्यांच्या माथी फुटले. तरी जीवनात आलेल्या प्रत्येक संधीच त्यांनी कर्तव्यभावना, शुचिता व सुसंस्कृतपणानं सोनं केलं.
 यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले, तेव्हा सर्वांत प्राथमिकता होती ती सेनादलाचं नीतीधैर्य वाढवण्याची. त्यासाठी त्यांनी तिन्ही दलाच्या नियमित बैठकांचा रिवाज पाडला. रोज सकाळी ९.३० वाजता संरक्षण मंत्रालयात तिन्ही दलांचे प्रमुख संरक्षण सचिव, स्वतः यशवंतराव उपस्थित असत. त्या बैठकांमागे महात्मा गांधींच्या दैनिक संवादातून सौहाद्र निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असायचा. त्या सभांचं नावंच मूळी प्रार्थना बैठक (Prayer Meeting) ठेवलं होतं. रोज संरक्षण स्थितीचा आढावा, प्रशिक्षण, उत्पादन, साधन संग्रहावर खल असायचा. सैनिक दुर्गम जागी पहारा देत. यशवंतरावांनी टोकावरच्या एकट्या दुकट्या सैनिकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा रिवाज सुरू केला. या समाजशील धोरणाचा फायदा लगेचच १९६५ मध्ये झालेल्या पाकिस्तान युद्धात आपणास मिळाला. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानला जेरीला आणलं. सेना साधनसंपन्न केली. मिग विमानांची निर्मिती, पॅटन रणगाडे, बोफोर्स तोफा इत्यादींनी आज आपलं सैन्य सज्ज दिसतं, त्याचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला होता. हे इतिहासाला नाकारता येणार नाही.
 संरक्षण मंत्री होताच त्यांनी सैन्याप्रमाणेच भारतीय नागरिकांचे मनोधैर्य बलवत्तर केलं. संरक्षणमंत्री झाल्यावर आलेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी आपली संरक्षण सिद्धता प्रदर्शित करण्याकडे विशेष लक्ष पुरविले होते. त्यातून जगभर भारताच्या संरक्षण क्षमतेत सुधारणा होत असल्याचा संदेश गेला. त्या काळी प्रजासत्ताक दिनी सायंकाळी नवी दिल्लीत हिंदी साहित्य संमेलनातर्फे कवी संमेलन योजलं जायचं. चीनच्या नामुष्कीमुळे संरक्षण मंत्री सर्वांचे केंद्र होते. संमेलनाला यशवंतराव चव्हाण यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं... हे काय बोलणार हिंदी असा नूर... सूर होता. यशवंतराव चव्हाण तयारीनिशी आले होते. त्यांच्या अस्खलित वाक्याने यशवंतरावांनी दिल्लीकरांना काबीज केलं. ते म्हणाले, “चीन चीन है, पर यह कभी न भूलना भारतवर्ष प्राचीन है।" टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटाने त्यांनी कवी संमेलनावर पकड मिळविली.
 यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्रीय पातळीवर व केंद्रात गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थ आयोगाचे अध्यक्ष, उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदं भूषविली. पण त्या सर्वापलीकडे एक सुसंस्कृत राजकारणी मनुष्य म्हणून असलेली त्यांची प्रतिमा मला अधिक महत्त्वाची वाटते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यशवंतराव चव्हाण हे मूलतः समाजशील गृहस्थ होत. त्यामुळे लोकसंग्रह व लोकस्मरण यात त्यांचा हात धरणारा विरळा. गर्दीत ओळखीच्या प्रत्येकास नावानिशी बोलवण्याची त्यांची कला त्यांच्या लोकसंग्रहाचे रहस्य म्हणून सांगता येईल. सामान्यातल्या सामान्य कार्यकत्र्याची त्यांनी सतत आठवण ठेवली. चौकशीचा रिवाज ठेवला. पदापेक्षा आपल्यातला माणूस जिवंत राहिला पाहिजे यांची ते दक्षता बाळगत. पदामुळे अहंकार येऊ नये म्हणून स्वतः ऋजू राहात. आपल्यावर कधी काळी उपकार केलेल्यांच्या छोट्या गोष्टींमचं स्मरण करून उतराई करीत. वाचन, चिंतन नियमित करीत. आपल्या पत्नीचं स्मरण नेहमी ठेवीत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी फोन करून त्यांना संरक्षण मंत्री होण्याचं निमंत्रण दिलं तेव्हा ते पत्नीला विचारून निर्णय देतो म्हटल्याने नेहरूंना मोठं आश्चर्य वाटलं होतं. कोणताही निर्णय त्यांनी पत्नीशी सल्लामसलत केल्याशिवाय घेतला नाही. हे होतं त्यांचं स्त्री दाक्षिण्य.
 त्यांच्या भाषण व साहित्यातून जे यशवंतराव चव्हाण दिसून येतात त्यांची प्रतिभा लक्षात येते. क-हाडचं साहित्य संमेलन, कोल्हापूरच्या वि. स. खांडेकर ज्ञानपीठ सत्कार, न. चिं. केळकर जन्मशताब्दी व्याख्यानमालेचं अध्यक्षीय भाषण, संरक्षण मंत्री म्हणून संसदेतील भाषणे अशी अनेक भाषणे ऐकली, वाचली की या माणसाची प्रतिभा लक्षात येते. त्यांच्या भाषा, भाषण व भविष्यवेधी गुणांची कदर प्रा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर साऱ्यांना होती. ज्ञानपीठ मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या खासबागेत झालेलं भाषण ऐकून वि. स. खांडेकर म्हणाले होते की, “मला यशवंतराव चव्हाणांसारखा गुणग्राहक साक्षेपी समीक्षक लाभला असता तर माझ्यातला साहित्यिक आणखी वेगळा घडला असता." आचार्य अत्रेसारख्या टीककाराला यशवंतराव चव्हाणांनी आपल्या शालीनतेनं गारद केलं होतं. हे कोण विसरेल. पंडित भीमसेन जोशीचं गाणं ऐकत राहावं वाटलं म्हणून विदेश जाणं रद्द करणारा हा मनस्वी आस्वादक! पंडितजींची कोणतीच मैफल त्यांनी कधी अर्धी सोडली नाही. अभिनेत्री सुलोचना यांनी आपल्या वहिनी वारल्यानंतर तिचे सारे दागिने संरक्षण निधीला दिले. त्या वेळी यशवंतराव चव्हाणांना चित्रपटातील त्यांच्या भूमिका आवडत. कारण त्यात महाराष्ट्र गृहिणींचा आदर्श असे. त्यांच्या या सेवेचं त्यांना मोठं कौतुक. म्हणत “आपली आई, बहीण, वहिनी आसावी तर तुमच्यासारखी असं एका चित्रपट अभिनेत्रीबद्दल वाटायला लावणं... ही किती मोठी समाजसेवा!" असं कौतुक फक्त यशवंतराव चव्हाणच करू शकतात. कारण त्यांच्यात एक उपजत शहाणपण, शालीनता, प्रतिभासंपन्नता, प्रगल्भता होती. ती त्यांनी वाचन, अनुभव, संघर्षातून मिळविली होती. स्वतःचा बळी देऊन दुस-याचे उपकार स्मरायचे. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे मोठेपण आपल्याकडे चालून आलेलं पंतप्रधानपद इंदिरा गांधीसाठी सोडून सिद्ध केलं होतं. पुढे इंदिरा गांधींना त्यांचं स्मारण राहिलं नसलं तरी तरी यशवंतरावांनी स्वतःस सतत मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून राहण्याच्या प्रतिबद्धतेपोठी प्रसंगी कमीपणा, कटुता स्वीकारली. पण सुसंस्कृतपणा मात्र कधी सोडला नाही. शेवटच्या दिवसात वेणुताई, पुतण्या गेल्यानंतरचा त्यांचा काळ विजनवासाचा होता. तोही त्यांनी सुसंस्कृतपणानी, संयमानी स्वीकारला. सर्वोदयी विश्वस्त : अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे

विश्वस्त होणे ही जशी वृत्ती आहे, तसा तो धर्मही आहे. विश्वस्त वृत्तीची कल्पना जनमानसात रूढ झाली ती गेल्या शतकाच्या आरंभीच्या काळात. महात्मा गांधींनी देशाचे सुराज्य करण्यासाठी जे अनेक उपाय सुचवले होते, त्यात सामाजिक समता निर्माण करण्याचा उपाय म्हणून त्यांनी विश्वस्ताच्या कल्पनेचा पुरस्कार केला होता. परंतु ही कल्पना काही या युगाची अथवा गांधीजींची देणगी म्हणता येणार नाही. या कल्पनेचा उगम महाभारताच्या एका श्लोकात असल्याचे आपणास दिसून येईल. महाभारतात म्हटले आहे की, ‘धर्मार्थ यस्य वित्तेहा वरं तस्य निरहिताः' - अर्थात संपत्ती मिळवावी आणि नंतर तिचा धर्मासाठी विनियोग करावा, अशी इच्छा धारण करण्यापेक्षा संपत्तीची इच्छाच माणसाने धरू नये, हे अधिक श्रेयस्कर.
 महात्मा गांधींच्या नि महाभारतातील विश्वस्त कल्पनेत फरक आहे. महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेत अतिरिक्त संपत्तीचा विनियोग अपेक्षित आहे तर महाभारतातील कल्पनेने धनप्राप्तीच न करणे. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे एक विश्वस्त म्हणून या दोन्ही कसोटीस उतरणारे एकमेवाद्वितीय असावेत. अण्णांनी धनप्राप्तीचा कधी हव्यास धरला नाही. ‘पर धन विष समान' म्हणत मात्र त्यांनी अत्यंत निरपेक्ष वृत्तीने सामाजिक धनसंचयाचे संवर्धन, रक्षण व विनियोग करून एका सचोटीच्या कार्यकत्र्याचे आदर्श रूप आपल्या जीवनाद्वारे उभे केले.
 सन १९३२ च्या आंदोलनात साने गुरुजींना तुरुंगवास भोगावा लागला होता. 'चले जाव' चळवळीत जे तरुण कार्यकर्ते सार्वजनिक कार्यात आले, त्यांना निर्वेधपणे आपले काम करता यावे, या हेतूने पावने दोन लाखांचा निधी जमा करण्यात आला. विनोबांच्या हस्तेच तो गुरुजींना देण्यात आला. या निधीच्या विनियोगासाठी एकमेव विश्वस्त म्हणून अण्णांची योजना गुरुजींनी केली. अण्णा साने गुरुजींच्या कार्याचे विश्वस्त झाल्याचा हा पहिला प्रसंग. पुढे अण्णांनी ठरलेली काही रक्कम साधना प्रेस, साधना प्रकाशन व साधना साप्ताहिकासाठी दिली.
 अण्णा अनेक सामाजिक संस्थांचे विश्वस्त होते. या संस्था विविध क्षेत्रांतील होत्या. शैक्षणिक, सामाजिक, कृषी इत्यादी. या संस्था सर्व भारतभर विखुरलेल्या होत्या. कोल्हापूरची ‘कोरगावरकर धर्मादाय संस्था', बेंगलोरचा ‘विश्वनीडम' शेती प्रकल्प, गोपुरी आश्रम, सेवाग्राम आश्रम अशा कितीतरी संस्थांची नावे घेता येतील. या विविध संस्थांमधून विश्वस्त भूमिकेतून दिसणारे अण्णा आपण जेव्हा आपण पाहायला लागलो, तेव्हा आपल्या हे लक्षात आल्यावाचून राहात नाही की, अण्णांच्यातील विश्वस्त हा कर्मठ गांधीवादी नव्हता. अण्णांच्यातील विश्वस्त हा गांधीवादी संकल्पना, विज्ञान नि व्यवहार यांच्या समन्वयाने बनलेला एक प्रगतीशीलं समाजसेवक होता. अण्णांनी... जिथे विश्वस्त पद स्वीकारले तिथे तिथे आपल्या या विज्ञाननिष्ठ दृष्टीने सुधारणा घडवून आणल्या. मी एकच उदाहरण सांगतो बेंगलोरचा ‘विश्वनीडम' कृषी प्रकल्प दहा हजार रुपये तोट्यात होता. अण्णा तिथे गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, तेथील गोरस शाळेस पांजरपोळाचे रूप आले आहे. ज्या गोरस शाळेची स्थापना दुग्धोत्पादनासाठी झाली होती ती भाकड गायी पोसणारे केंद्र बनली होती. गाईचे दूध पाड्यांसाठी खर्च व्हायचे. अहिंसेच्या या भ्रामक कल्पनेस अण्णांनी बाजूस सारून आपली कृती कशी अव्यवहार्य आहे, हे कार्यकत्र्यांना पटवून दिले. शेती अथवा शेतीपूरक कोणताही उद्योग उत्पादन खर्च व निघणारे उत्पादन यांचा मेळ घातल्याशिवाय किफायतशीर ठरत नसतो, हे त्यांनी दाखवून दिले. गाईला दिले जाणारे खाद्य व तिच्याकडून मिळणारे दूध यांची व्यवहार्य सांगड घालून दिली व बघता बघता 'विश्वनीडम' कृषी प्रकल्प फायद्यात चालू लागला. याच वैज्ञानिक नि व्यवहार्य दृष्टिकोनाचा पुरस्कार करून त्यांनी मांजरीचा सुभाष सहकारी शेती प्रकल्प किफायतशीर कसा होईल, हे दाखवून दिले. बदलत्या काळाप्रमाणे घडून येणा-या वैज्ञानिक, औद्योगिक विकासाकडे गांधी विचाराच्या पारंपारिकतेमुळे जर आपण डोळेझाक केली तर आपले आचरण कालबाह्य ठरेल हे अण्णांनी पुरेपुर ओळखले होते. कमरेला वा खिशात ठेवण्याचे साखळीचे घड्याळ वापरण्यातील स्वदेशी कर्मठता न दाखवता एच. एम. टी. डे-डेटर वापरून अण्णांच्यातील विश्वस्ताने जणू आपण प्रगतीशील आहोत, हेच दाखवून दिले होते.
 मी काही काळ अण्णांच्या सहवासता होतो. अनेक विश्वस्त संस्थांत त्यांच्याबरोबर फिरण्याचा योग आला. तिथे अण्णा कधी अधिकाराच्या दर्पाने फिरले नाहीत. खरे तर दर्प ही त्यांच्या वृत्तीत न बसणारी कृती. ते सर्व संस्थांत जात तेव्हा सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचत. त्यांच्याशी गप्पा करत करत अनेक नव्या गोष्टी सांगून जात असत. कोल्हापूरच्या ‘कोरगावकर धर्मादाय संस्थे'चे ते विश्वस्त होते. प्रभाकरपंतांच्या मृत्यूनंतर म्हणजे सन १९६८ पासून ते आमरण अध्यक्ष होते. या लेखाच्या संदर्भात सामग्रीची जुळवाजुळव करत असताना एकदा ओघाने मी श्री. अनिल कोरगावकरांना एक प्रश्न विचारला होता. त्याचे त्यांनी दिलेले उत्तर अण्णांच्या विश्वस्त भूमिकेबद्दल बरेच काही सांगून जाते. मी असे विचारले की, गेली दहाबारा वर्षे आपण अण्णांना विश्वस्त म्हणून जवळून पाहिले आहे. त्यांच्या विश्वस्त वृत्तीबद्दल आपणाला काय वाटते? क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, “अण्णांनी मला माझ्या वडिलांच्या (कै. प्रभाकरपंतांच्या) मृत्यूनंतर वडिलांचा आधार दिला. अध्यक्ष असून अण्णा नेहमी आपण हे करू या का?' अशा सहविचाराच्या भावनेने बोलायचे. यातच विश्वस्त अण्णांचे उदात्तपण सामावलेले आहे.
 अण्णांच्यातील विश्वस्त हा मोठा चिकित्सक होता. कोणतीही गोष्ट करायची तर त्यावर दीर्घ विचार करणे हे अण्णांच्या बाबतीत ओघाने आलेच. भावनेवर आरूढ होऊन निर्णय घेतल्याचे उदाहरण अण्णांच्या बाबतीत फारसे कधी घडले नाही. सेवाग्रामच्या शेती प्रकल्पावर एकदा पाणीपुरवठ्यासाठी विहिरीवर मोटर पंप बसवण्याचा प्रस्ताव होता. अण्णांच्यासमोर जेव्हा तो आला तेव्हा अण्णांनी पहिला प्रश्न केला होता की, 'विहिरीमध्ये किती घनफूट पाणी आहे?' या प्रश्नाचे उत्तर अर्थातच योजना समोर ठेवणाच्या कार्यकर्त्यांकडे नव्हते! या नि अशा कितीतरी घटना सांगता येतील की त्यात असे दिसून येईल की, कोणतीही योजना आखत असताना अण्णांनी चिकित्सक बुद्धीशी कधी फारकत घेतल्याने दिसून येत नाही. अण्णांच्यातील विश्वस्त ही चिकित्सक वृत्ती एवढ्याचसाठी दाखवायचा, कारण त्या विश्वस्तास या गोष्टीचे सदैव भान असायचे की, आपण सामाजिक धनसंचयाचे विनियोजक आहोत. सार्वजनिक पैशांचा विनियोग सत्कारणी करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणा-या विश्वस्त अण्णांच्या या जाणिवेतून बरेच शिकता येण्यासारखे आहे.
 स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चतुःसूत्रीवर नवा समाज निर्मिण्यासाठी व तशी रचना अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक वृत्ती व उपाय म्हणून महात्मा गांधींनी विश्वस्त कल्पनेचा पुरस्कार केला होता. विश्वस्ततेची संकल्पना विशद करताना ते म्हणाले होते की, “व्यक्तीच्या हाती जी अतिरिक्त संपत्ती येते ती समाजहितासाठी आहे, असे मानून स्वतःच्या, सहका-याच्या नि संपत्ती निर्मिणाऱ्या घटकांच्या सहविचाराने सामाजिक अपेक्षांच्या पूर्तीसाठी तिचा विनियोग करणे म्हणजे विश्वस्त बनणे होय." महात्मा गांधींच्या विश्वस्त संकल्पनेत विश्वस्तांची विश्वासार्हता गृहीत आहे. विश्वस्तांच्या विश्वासार्हतेवरच विश्वस्त संपत्तीचा समायोजपोग विनियोग अवलंबून असतो. विश्वस्त अण्णा हे महात्मा गांधींच्या स्वप्नाचे मूर्त रूप म्हणता येईल. अण्णांनी विश्वस्त संस्थाकडे असलेल्या पैशाचा समाजहितासाठी विनियोग तर केलाच, पण स्वतःच मिळणारे मानधनदेखील सामाजिक संपत्तीतून आलेले आहे, याचे भान ठेवून त्या व्यक्तिगत मानधनातूनही त्यांनी समाजोपयोगी काम केल्याचे मी पाहिले व अनुभवले आहे. कुणा कार्यकर्त्यांच्या मुलाची फी भागव, कधी नाडलेल्या कार्यकर्त्यास वैद्यकीय उपचारासाठी पैसे दे, कधी एखादा तरुण कार्यकर्ता दिसला तर त्याला स्वतःच्या पैशाने प्रायोगिक संस्था दाखव, अशा छोट्या सामाजिक कार्यात त्यांनी अनेकदा आपले मानधन खर्च केल्याचे मी पाहिले आहे. आजच्या स्वकेंद्रित युगात ही सामाजिक बांधिलकी केवळ दुर्मिळ म्हणावी लागेल.
 या लेखाने सर्व सार्वजनिक कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन विचारास प्रवृत्त केले तरी ती अण्णांना वाहिलेली खरीखुरी आदरांजली ठरेल. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे नावाचा संन्यस्त कर्मयोगी, मानवातील मांगल्य शोधणारा निःस्पृह, प्रामाणिक विश्वस्त होता. अण्णा विश्वस्त होते, हे आपल्या समाजाचे मोठे भाग्य होते. त्यांच्या विश्वस्त होण्याने सामाजिक संस्थांची प्रतिष्ठा वाढली. आपले लघुजीवन विशाल सामाजिक जीवनात विसर्जित करून अण्णांनी समष्टी माहात्म्य समजावले आहे. समाजसेविका : तारा अली बेग

सन १९३७ ची गोष्ट. अवघे वीस वर्षे वय असलेली एक विवाहित मुस्लीम युवती मुलकी सेवेत उच्चपदावर असलेल्या आपल्या पतीसमवेत हैद्राबाद सोडून दिल्लीत येते. राष्ट्रीय चळवळीने प्रभावित होते नि नेहरूंना विचारते की, “मी देशासाठी काय करावं, असं तुम्हाला वाटतं?" नेहरूही तितक्याच मिश्किलपणे उत्तर देतात, “देशासाठी तुला काही करायला सुचवणं धाडसाचं होईल. आपल्या देशात अनाथ, निराधार मुलांसाठी कुणी फारसं जाणिवेने कार्य करताना दिसत नाही. ते काम म्हणजे देशसेवाच आहे." ती युवती हा सल्ला शारोधार्य मानते. स्वातंत्र्य चळवळीच्या क्षणिक रोमांच देणाऱ्या सनसनाटी कार्यात उडी मारण्यापेक्षा अनाथ संगोपनाचे काम तिला अधिक आकर्षक वाटतं. तिने ते करण्याचे जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत व्रतासारखे मनोमन ठरवलं. हे सर्व वाचले, अनुभवले की आपलं आत्मकेंद्रित जीवन किळसवाणं नि निष्क्रिय वाटायला लागते. ती विवाहित युवती म्हणजेच तारा अली बेग.
 अमेरिकन आई आणि बंगाली वडील. विवाह सनातनी मुस्लीम अधिका-यांशी. सारचं आयुष्य असं अचंबित करणारं. देखणं रूप व कुशाग्र बुद्धी असलेल्या ताराजींचा विवाह अवघ्या सोळाव्या वर्षी झाला. पती मुलकी सेनेत उच्च राजनैतिक अधिकारी. त्यामुळे अवघ्या विसाव्या वर्षी सर्व राष्ट्रीय नेते व इंग्रज अधिका-यांचे निकट साहचर्य लाभले. यात त्यांनी निवड केली राष्ट्रीय नेत्यांची नि त्यांच्या आदर्शाची. ब्रिटिशांची सेवा, त्यांच्या मानसन्मानाची सर्व शक्यता असताना तारा अली बेग यांनी ती दूरदृष्टीनी नाकारून आपल्या देशनिष्ठेचा परिचय दिला. पंडित नेहरूंच्या सांगण्यावरून त्या सामाजिक कार्यात आल्या. बालकल्याणकारी कार्याने त्यांनी आपल्या सामाजिक सेवेचा प्रारंभ केला. तेच त्यांचे पुढे जीवित कार्य झाले. त्यांच्या या निवडीचे अप्रूप वाटण्याचे आणखी एक कारण आहे. एक तर त्या समृद्ध नि सनातनी मुस्लीम घराण्यात दिल्या गेलेल्या. तिथल्या पारंपरिक वातावरणाचा बीमोड करण्यात त्यांनी दाखवलेले धाडस केवळ आश्चर्यकारक, शिवाय लक्ष्मी पायी लोळण घालत असताना तिकडे दुर्लक्ष करून समाजसेवेचं सतीचं वाण त्यांनी स्वीकारावं, या सर्वच गोष्टी त्यांच्या चरित्र नि चारित्र्याच्या अभ्यासात अनाकलनीय वाटतात. विशेषतः तत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर.
 तारा अली बेग यांनी ज्या काळात समाजकार्याचा श्रीगणेशा केला तेव्हा त्यांच्यापुढे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, कमलादेवी चटोपाध्याय, अली बेग (पती) यांचा आदर्श होता. त्यांच्या प्रभावाने प्रेरित होऊन त्यांची मुळात असलेली समाजसेवेची वृत्ती विकसित झाली. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यसातत्याने आपली वेगळी अशी प्रतिमा तयार केली. सतत १०-१२ वर्षे त्यांना महिला व बालकल्याण कार्याच्या क्षेत्रात विविध उपक्रम, संस्था इत्यादींद्वारे मोलाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या पहिल्या नियोजन मंडळाच्या त्या सदस्या म्हणून नियुक्त झाल्या. इतकेच नव्हे, तर या मंडळाने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणासाठी जी समिती नेमली होती तिचे निमंत्रक होण्याचा बहुमानही श्रीमती बेग यांना मिळाला.
 पुढे ताराजींनी दुस-या महायुद्धात मोठ्या प्रमाणात अनाथ, निराधारांची निर्माण झालेल्या संगोपनविषयक समस्यांच्या निराकरणार्थ युरोपात स्थापन झालेल्या एस. ओ. एस. चिल्ड्रन व्हिलेज या योजनेचा अभ्यास करून ही योजना भारतात कशी राबवता येईल, याचा ध्यास घेतला. त्यांच्या या ध्यासातूनच भारतात बालग्राम चळवळीचे लोण दूरपर्यंत पसरले. या संस्थेच्या त्या सतत २२ वर्षे अध्यक्षपदी कार्यरत होत्या. त्यांच्या कार्य सातत्याचा आणखी दुसरा पुरावा तो कोणता असणार? बालग्राम योजना अनाथ, निराधार बालकांना केवळ अन्न, वस्त्र, निवारा देत नाही तर त्यापुढे जाऊन ती त्यांना आत्मसन्मान, श्रद्धा, प्रेम, स्वावलंबन देते, अशी त्यांची श्रद्धा असल्याने त्यांनी या योजनेचा हिरिरीने पुरस्कार केला. तारा बेग यांच्या या कार्याची दखल घेऊन जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघटनेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या निवडीमुळे त्यांना जागतिक पातळीवर बालकांच्या विविध समस्यांचा अभ्यास करण्याची संधी लाभली.  तारा बेग यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र होते. समाजसेवक, लेखक, समीक्षक, प्रचारक इत्यादी विविध भूमिकेतून त्यांनी कार्य केले. त्यांनी लिहिलेले ‘पोट्रेट ऑफ अॅन इरा' हे पुस्तक बरेच गाजले. या रेखाचित्र संग्रहात त्यांनी नेहरू, टाटा, राजदूत, महाराजे इत्यादीची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. हे पुस्तक त्या वेळी थोडे विवादग्रस्तही झाले होते. सामान्यांसाठी जीवनभर झगडणाच्या ताराजींनी उच्चभ्रूची चरित्रे रेखाटावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यांनी लेखिका म्हणून चौफेर लेखन केले. चित्रपट समीक्षा प्राणी, जंगले, कुटुंब नियोजन, आदिवासी कल्याण अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. श्रीमती बेग यांच्या लेखनाप्रमाणे कामातही वैविध्य होते. बालकल्याण, महिला पुनर्वसन, निर्भगी शौचकूपाचा प्रसार इत्यादी कामे वानगी दाखल सांगता येतील. शासनाशी जवळीक असूनही शासनाच्या योजनेतील त्रुटी त्या नेहमीच निर्भिडपणे मांडत. या सर्व कार्य व लेखनात प्रेमाचा सतत ओलावा त्यांनी ठेवला. त्यांच्या कार्याचे वेगळेपण, विविधता, सातत्य यात जसे आहे तसे ते निर्व्याज ओलाव्यातही. वंचितांच्या वाली : अनुताई वाघ

वर्षापूर्वीच अनुताईंची भेट झाली होती. त्या भेटीत त्यांचा ८0 वर्षीय उत्साह त्यांच्यापेक्षा निम्मे वय असलेल्या माझ्यासारख्या मधल्या फळीच्या कार्यकर्त्यास लाजवणारा होता. अनुताई आल्या होत्या एका शैक्षणिक शिबिरासाठी. पण अनाथ मुलांच्या संगोपन व पुनर्वसनाचे काम पाहायचे म्हटल्यावर सर्व मोह बाजूला सारून त्यांनी बालकल्याण संकुलाकडे धाव घेतली. संकुलाच्या वात्सल्य बालसदनमधील अनाथ अर्भकांना पाहून त्यांचे पाझरलेले मातृत्व प्रतिबिंबित डोळे भरभरून पाहण्याचे भाग्य मला लाभले. तिथेच बागडणा-या चिमुकल्यांना त्यांनी बडबडगीत शिकवताना पाहिले तेव्हा आठवले की कृष्णाबाई मोटेंनी म्हटलेले खरे होते की, ‘अनुताई आगगाडीत बसल्या तरी बालवाडी चालवतील.' अनुताई पुढे शाळेत जाणाच्या मुला-मुलींत रमल्या. मुलांनी त्यांना त्यांचा आपल्या पाठ्यपुस्तकात असलेला धडा शिकवा म्हणून आग्रह धरल्यावर चक्क त्यांनी तो शिकवलाही. हाडामासी 'शिक्षक' भिनलेल्या अनुताईंमध्ये ओथंबलेले मातृत्व माझ्या आयुष्यात सतत डोळ्यांनच्या कडा पाणावत राहते. मुलांचा निरोप घेऊन निघालेल्या अनुताई मोटारीत बसलेल्या उतरल्या नि ५१ रुपये माझ्या हाती देत म्हणाल्या, 'मुलांना खाऊ आणायला विसरले, आठवणीने द्या.' पुढे कोसबाडला गेल्यावर त्यांनी आपले नवप्रकाशित पुस्तक ‘दाभोणच्या जंगलातून' स्वाक्षरीसह साशीर्वाद मला पाठवले. या साच्यातून वंचितांच्या वाली’ होण्याचा प्रत्यय त्या मला सतत देत राहिला. 'कोसबाडच्या टेकडीवरून' नि ‘दाभोणच्या जंगलातून' दिसलेल्या अनुताई आणि प्रत्यक्ष सहवासात दिसून आलेल्या अनुताईंनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची अमीट छाप मजवर सोडली आहे.
 अनुताई वाघ या साध्या पदवीधर. पण शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून एक नवी पद्धती उदयाला आणली. त्यांना गुरूस्थानी असलेल्या ताराबाई मोडकांच्या जन्मशताब्दी वर्षात अनुताईंनी आपला निरोप घेतल्याने बालशिक्षणाचा नंदादीप तेवत ठेवण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांवर येऊन पडली आहे.
 अनुताई वाघ यांचा जन्म १७ मार्च १९१० रोजी पुणे येथे गरीब कुटुंबात झाला. तत्कालीन रीतिरिवाजाप्रमाणे विवाह म्हणजे काय, हे कळण्याचं वय होण्यापूर्वी विवाह झाला व दुर्दैवानं त्यांना अल्पकाळात वैधव्य आले. पुण्याच्या हुजूर पागा शाळेत त्यांनी १३ वर्षे अध्यापन कार्य केले. पुढे त्या श्रीमती ताराबाई मोडकांच्या सहवासात आल्या. ताराबाईंबरोबर त्यांनी १९४४ ते १९५६ या काळात बोर्डीत बालशिक्षणाचे धडे घेतले. त्यांची पहिली बालवाडी महार, भंगी इत्यादींच्या वस्तीत सुरू झाली. पुढे तिने आदिवासींच्या अंगणात भागातील वस्ती, पाड्यांत दिसून येणाच्या येणाच्या ‘अंगणवाड्या' या अनुताईंच्या कार्याच्या 'चेतनामय स्मृती' होत. ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा' अशी घोषवाक्ये घराघरांवर लिहिण्याचा प्रचारी, दिखाऊ शिक्षणाचा प्रसार अनुताईंनी कधीच केला नाही. अंधार फार झाला म्हणून आपल्यातील पणती त्यांनी सतत मिणमिणती ठेवली. त्यांच्यामागे समर्पित कार्यकर्त्यांचं फार मोठं मोहोळ होतं अशातला भाग नाही. पण प्रश्नाला जाऊन भिडण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये होती. हे सर्व करत असताना केल्याचा आविर्भाव कधी त्यांच्यात दिसला नाही. मंदपणे व सतत तेवत राहणा-या नंदादीपाप्रमाणे त्यांचे कार्य होतं. वयाच्या बावन्नव्या वर्षी व तेही एक डोळा गेलेल्या स्थितीत अनुताईंनी पुणे विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. त्याच विद्यापीठाने पुढे त्यांना डी. लिट. ही मानद उपाधी देऊन गौरविले ते शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या असाधारण कामगिरीमुळेच.
 अनुताईंच्या कार्याचा प्रवास शिक्षणाकडून समाजकल्याणाकडे सतत होत राहिला. आपल्या उत्तरायुष्यात त्यांनी महिला अपंग कल्याण कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोसबाडची टेकडी असो की दाभोणचे जंगल, सर्वच ठिकाणी अनुताईंनी वंचितांच्या समग्र विकासाचा ध्यास घेतलेला दिसतो. आपल्या जीवन काळात त्यांनी ११ बालवाड्या, १० पाळणाघरे, ४ पूर्व प्राथमिक शाळा, ३० प्रौढ शिक्षण केंद्रे, काही प्राथमिक प्रशिक्षण विद्यालये, बालसेविका अभ्यासक्रम, बालसेविका अभ्यासक्रम, वसतिगृहे, किसान शाळा, आरोग्य केंद्रे, मूकबधिरांसाठी शाळा, रात्रशाळा अशा नानाविध उपक्रमांची बोर्डी, कोसबाड, दाभोणचा परिसर शिक्षण स्पर्शानं रोमांचित करून टाकला. 'शबरी उद्योगालय' हे अनुताईंच्या दूरदृष्टीचे मूर्त प्रतीक होय. शिक्षणाबरोबरच आदिवासींना रोजगाराच्या संधी देऊन त्यांनी आदिवासींचे परावलंबन दूर केले. गोदावरी परूळेकरांनी वारली परिसरात माणूस जागवण्याचे कार्य केले तर जागा झालेल्या माणसास माणूस म्हणून घडवण्याचे कार्य अनुताईंनी केले.
 ‘शाळा म्हणजे मुलांच्या अंगणातील झाड' असं वरकरणी शिक्षणाचं बालबोध सूत्र सांगणाच्या अनुताईंच्या विचारात आचारपूर्ण चिंतन सामावलेले असायचे. त्यामुळे आपण जे केले त्यात त्यांना कृतार्थता वाटत राहायची. ‘कोसबाडच्या टेकडीवरून' या आपल्या आत्मपर लेखनात त्यांनी ‘कृतार्थतेने व कृतज्ञतेने जगाचा निरोप घेण्याची तयारी दर्शवली होती व ती त्यांनी सार्थ करून दाखवली. आपल्या जिवित कार्याचा त्यांना सतत ध्यास होता. ध्यासाशिवाय जीवनात सर्जनात्मकता येत नसते. जिथे सृजन नाही तिथे तिथे आनंद कुठला? अनुताई या ख-या अर्थाने वंचितांच्या वाली होत्या. उपेक्षितांबद्दल असाधारण कणव व जाणीव असलेल्या अनुताईंच्या हातून माणूस घडविण्याचे जे कार्य झाले ते त्यांच्यात वसलेल्या, सतत अस्वस्थ असलेल्या शिक्षक, समाज, कार्यकर्त्यांमुळेच.

☐☐

अश्रूंमधलं इंद्रधनुष्य : बाबा आमटे

सन १९६७-६८ चे दिवस. ऐन तारुण्यात मी मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात सोमनाथला होतो. बाबा आमटेंनी सुरू केलेल्या कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांना १३00 एकर जमीन दिली होती. जमिनीच्या नावाखाली शासनाने बाबांना १३00 एकराचं जंगल दिलं होतं. ते जंगल लागवडयुक्त जमिनीत बदलायचे आव्हान तरुणांना बाबांनी केलं होतं. त्यास प्रतिसाद म्हणून गेलेल्या शेकडो तरुणांतील मी एक होतो. त्या काळात मी बाबा आमटे प्रथम पाहिले. अनुभवले. नंतर मी त्यांचं ‘ज्वाला नि फुले' हे काव्य बायबलसारखं नित्य वाचतो. ‘माती जागविल त्याला मत' सारखं पुस्तक मला लोकशाहीचं महत्त्व समजावतं. ‘वर्कर्स युनव्हर्सिटी'सारखं पुस्तक श्रममहात्म्य देत राहतं.
 काही वर्षापूर्वी कोल्हापूरला रोटरी इंटरनॅशनलची एक परिषद भरली होती. बाबा त्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा ते म्हणाले होते की, “माणसं सौंदर्य शोधण्यासाठी अजंठा-वेरूळला जातात. तिथल्या भग्न मूर्तीत माणसाचं सौंदर्य शोधतात. आपण हे विसरतो की, जोवर आपण जिवंत भग्नमूर्तीतील (कुष्ठरोगी) माणसाचं मांगल्य (करुणा) शोधणार नाही तोवर माणूस नावाचा समाज ख-या अर्थाने सुंदर होणार नाही." बाबा आमटे यांचे समग्र जीवन, कृतीपाठ हा नव्या युगाचं कृतीशील उपनिषद आहे. ज्यांना समाजातील वेदनांतून वेद निर्माण करायचे आहेत त्यांनी बाबांचे जीवन व कार्य आचारधर्म बनवायला हवे.
 बाबांना बालपणी वडिलांनी फटाक्यासाठी पैसे दिलेले. भावंडांबरोबर बाजारात गेलेले बाबा. त्यांना एक भिकारी भेटतो. बाबांकडे भिक मागतो. बाबा आपल्या खिशातील सारा खुर्दा त्याच्या वाडग्यात टाकतात. भिका-याच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. अश्रूत त्यांना इंद्रधनुष्य दिसतं. मग रोज इंद्रधनुष्य निर्मिण्याचा बाबांना ध्यासच लागून राहतो.
 सामान्य माणसं मोठी होतात, ती सामान्य प्रसंगात असामान्य धैर्य दाखवितात म्हूणन. बाबा शिक्षणाने वकील झालेले. वकिली केली असती तर वडिलांची श्रीमंती शतपट करू शकले असते. पण शहराकडून खेड्याकडे परतणारा हा कार्यकर्ता. त्यांच्यापुढे महात्मा गांधींचा आदर्श होता. महात्मा गांधींनी केलेली कुष्ठरोगी परचुरे शास्त्रींची रुग्णसेवा ते ऐकून होते. अन् जीवनात असा रोगी भेटल्यावर ते प्रथमक्षणी भेदरले. नंतर भिडले ते कायमचे. त्यातून 'आनंदवन' उभारलं. या साच्यामागं ही एक जीवनदृष्टी होती. कुरूप जग सुंदर करण्याचा ध्यास होता. ‘दान माणसाला नादान करतं' हे विनोबांचं वाक्य त्यांच्या कानी-कपाळी घोंघावत होतं. मग त्यांनी कुष्ठरोगी फक्त बरे होऊन चालणार नाही तर ते स्वावलंबी, मिळविते झाले पाहिजेत म्हणून बाबांनी ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’, ‘श्रमआश्रम’, ‘साम्यकुल असे अनेक प्रयोग केले. सार्वजनिक शेतीचा प्रयोग केला. मार्क्स, प्रिन्स क्रोपोटकीन, रस्कीन, कुमारप्पा वाचलेल्या बाबा आमटेंनी श्रमिकांची संघटना उभी केली. साऱ्याच प्रयोगांना यश नाही आलं, पण 'लढल्याशिवाय हार मानणार नाही' अशी जिद्द घेऊन जन्मलेल्या बाबांनी सतत अपयशामागे धावणं चालू ठेवलं. 'अपयशातून दिशा निश्चित होतात, अपयश नेमक्या मार्गाने नेणारे वळण असते' यावर बाबांचा विश्वास होता.
 ‘जे जगाकडे पाठ करतात, जग त्यांच्या पाठीशी उभं राहतं.' याचा प्रत्यय बाबा आमटेंना सन १९५४ साली आला. ‘सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल' या संस्थेने ‘आनंदवन'च्या कार्याची दखल घेतली. १४ देशातील २३ भाषा बोलणारे ५0 स्वयंसेवकांचे एक पथक वरोऱ्याला आले. त्यांनी ‘आनंदवना'तील कुष्ठरोग्यांसाठी दोन इमारती श्रमदानातून उभ्या केल्या. वरोऱ्यात ही बातमी पसरली. मग रेल्वेतील हमालांनी एक विहीर खोदून दिली आणि बाबा आमटे करीत असलेल्या कार्यात समाज सहभागाची परंपरा निर्माण झाली. त्यातून आनंदवन मित्र मेळावा सुरू झाला. मध्यम व उच्च मध्यमवर्गीय समाज पायउतार झाला. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा, उपचार, पुनर्वसन केले. यापेक्षा समाजातील एक निष्क्रिय वर्ग सक्रिय सहभागी बनविला, ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते. एकांताचे कैदी असलेल्या एका वर्गास दुसरा एकांत कैदी वर्ग जोडण्याचे बाबांचे कार्य अजोड म्हणावे लागेल.
 बाबांनी १९५७ साली नागपूरजवळ १२० एकर शेती घेतली. त्यातून अशोकवन उभारले. १९६२ साली त्यांना आनंद निकेतन महाविद्यालय अशासाठी सुरू केलं की परिसरातील विद्यार्थ्यांना वर्धा, नागपूर, अमरावतीकडे धाव घ्यायला लागायची. हाताची बोटं झडलेल्यांनी धडधाकट विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची इमारत उभी केली. आज २000 विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत. कला, वाणिज्य, कृषी अशा अनेक विद्याशाखा कार्यरत आहेत. १९६६ साली त्यांनी संधीनिकेतन उभारले. अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, अपघातग्रस्त, पोलिओग्रस्त अशा विकलांगांना पुनर्वसनाचे साधन म्हणून अनेक उद्योग प्रशिक्षण व उत्पादनाची संधी दिली व ते स्वावलंबी झाले.
 बाबा आमटेंचं कार्य जितकं प्रेरक तितकंच त्यांचे साहित्यही. विशेषतः ‘ज्वाला आणि फुले'सारखा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे कृतिशील माणसांना त्यांनी दिलेलं एक बौद्धिक होकायंत्रच. ज्यांना कुणाला आपला सद्सद्विवेक सदैव सजग ठेवायचा असेल त्यांना ‘ज्वाला नि फुले' रामबाण उपाय होय. ज्यांच्या पावलांखालील काट्यांची फुलं झाली त्या ‘भारत जोडो' यात्रेमागे बाबांचं तत्त्वज्ञान होतं.
 हाती घेतलं ते तडीस नेण्याच्या निर्धारानं बाबांनी एकामागून एक उपक्रम, प्रकल्प उभारले नि ते यशस्वी करून दाखवले. मातीचं सोनं करण्याची किमया त्यांनी वरोरा, सोमनाथ, मूल, हेमलकसा, भ्रमरागड परिसरात करून दाखवली ती मातीच्या नात्यातून. श्रमिकांचं राज्य या मार्क्सच्या कल्पनेतून अवतरलेली प्रत्यक्ष सृष्टी म्हणजे 'श्रमिक विद्यापीठ' होय. 'ज्याने कु-हाडीने लाकडे फोडून आपल्या हातावर घट्टे उठवले आहेत त्यालाच त्या लाकूडतोड्याच्या हातावर उठून फुटलेल्या फोडांच्या वेदना कळतील,' असं त्याचं असलेलं म्हणणं चिंतनीय खरं! अन्न हेच आजचं उपनिषद मानणारे बाबा एकविसाव्या शतकात दारिद्र्याचा महासागर आटवायला निघालेले आधुनिक अगस्ती होते! उपेक्षितांची प्रेषित : इव्हान लोमेक्स

मदर इव्हान लोमेक्स. वय ५७ तीन मोठ्या हृदयशस्त्र क्रियेमुळे विदीर्ण हृदय, अर्धशिशीचा विकार गेली अनेक वर्षे सोबतीला. हे सर्व कमी म्हणून बाल दम्याची नित्याची साथ सांगत. पती निवर्तल्यापासून आयुष्याची एकाकी लढत. पदरात अपंग आई. हाडात सळ्या ठोकून डॉक्टरांनी उभी केलेली. प्रौढ वयात केलेलं लग्न. कूस उजवायचा सोस म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन इव्हाननी कन्येला जन्म दिला. कन्यारत्नाने आणखी एक संकट पदरी घातलं. ती जन्मतः मतिमंद, मंगोल. अवघी चार फुटी नेडन १८ वर्षांची आहे हे सांगूनही खरं वाटत नाही.
 भरीस भर म्हणून मदर इव्हान निराधारांचा सांभाळ करतात हे कळल्यावरून एके दिवशी दाराच्या पायरीवर ठेवलेलं अज्ञात अर्भक. तेही कन्यारत्नच. पामेला तिचं नाव. अपहणाचं बालंट माथी नको, म्हणून इव्हाननी पामेलाला रीतसर दत्तक घेतलं, चक्क जाहीर सूचना देऊन. आणखी एके दिवशी एक मधुमेहग्रस्त रेणुका इव्हानच्या पदरात पडली. तिला रोज इन्शुलीन द्यावं लागतं. इन्शुलीनचा खर्च न परवडणाच्या गरीब आई-वडिलांनी भूमिगत राहून तिला इव्हानच्या हवाली करणं श्रेयस्कर मानलं. या सा-याचं दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात उपसतही इव्हान थकत नाही.
 पतीच्या निवृत्तीवेतनातून येणा-या पैशात बेळगावच्या गणेशपूरमध्ये चार खोल्यांचे घर घेऊन रस्त्यावर मरणासन्न पडणाच्या प्रत्येक निराधाराला आपल्या ‘डॉ. रेमंड लोमेक्य होम फॉर होमलेस'मध्ये आणते. त्यांच्या जखमा साफ करणे, शी-शू पाहणे, अंघोळ घालणे, कपडे धुणे, पुरुष रुग्णांची दाढी करणे, औषधोपचार, कुणी निवर्तला तर ज्याच्या त्याच्या धर्मानुसार अंत्यक्रिया. हे सारं स्वखर्चानं, नव-याच्या मिळणाच्या निवृत्तीवेतनातून चालतं.
 कोडग्या, गोठलेल्या, निबर मनाच्या आपल्या समाजास कोणी पदर मोडून लष्कराच्या भाकरी भाजतं हे खरं वाटत नाही. आपणास काही करता येत नाही यावर खात्री असलेले तथाकथित जागरूक समाजरक्षक मग लोमेक्सविरुद्ध तक्रार गुदरतात. आठ वेळा आठ-आठ तास चौकशी, मारहाण, कोठडी होते. निष्पन्न मात्र काहीच होत नाही. बेळगावचा फायदा एकच झाला. रस्त्यावर कोणी पडलेला असला की, पोलिसांचा फोन येतो... कधी एखाद्या नागरिकाचा पण... ‘अमुक ठिकाणी एक निद्रिस्त निराधार पडलाय... घेऊन जाणार काय?' इव्हान शांतपणे हात पुढे करते. आज असे १५ ‘होमलेस', 'होपलेस' इव्हानकडे येऊन सनाथ, आशावादी, सानंद जीवन जगत आहेत. हे सारं पाहताना, ऐकताना, समजून घेताना मला माझीच शिसारी येत होती ती माझ्याभोवतीच्या निष्क्रियतेमुळे... तटस्थपणामुळे!
 मदर इव्हान लोमेक्सचं हे जगावेगळं जग मी जागी जाऊन पाहिलं नि मला नवी जाग आली. मी केलेल्या तुटपुंज्या समाजसेवा नामक लुडबुडीचीही शरम वाटली. मी मदरचं जीवन समजून घेतलं तेव्हा लक्षात आलं की, हे येरागबाळ्याचं काम नाही. ज्याच्या आत-आत संवेदनेचा सततचा पाझर असतो तोच हे करू जाणे.
 तशी इव्हान खिश्चन कुटुंबात जन्मली. आई-वडील तमिळ मातृभाषी. २८ नोव्हेंबर १९४६ ला मदुराईत जन्मलेली इव्हान. सेनेतील वडिलांच्या नोकरीमुळे तिची फरफाट होत राहिली. वडील इंग्रजांच्या फौजेत कॅप्टन. पुढे मराठी लाईट इन्फंट्रीच्या बेळगाव छावणीत आले. तत्पूर्वी सिकंदराबाद आदी ठिकाणी बदल्या. इव्हान इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकत राहिली; पण वडिलांच्या अकाली निधनाने कुटुंबाची वाताहातच झाली. भावानी हॉटेलमध्ये नोकरी पत्करली. कशी तरी मॅट्रीक पास झालेल्या इव्हाननं टायपिंग शिकून घेतलं नि वकिलांकडे पाचशे रुपयावर गुजराणा केली. घरी आई-भावाचं करत ती अकाली प्रौढ झाली नि आईसाठी अविवाहित राहिली. घरातील ख्रिश्चन संस्कारांमुळे येशू ख्रिस्त तिला भेटला नि तोच तिचा सखा, मित्र, मार्गदर्शक, आश्रयदाता झाला. जीवनात जे करायचं ते मनस्वीपणे हा तिचा परिपाठ. त्यामुळे चर्चच्या कर्मकांडात ती कधी अडकली नाही. घरी राहून व्यक्तिगत प्रार्थना केल्यानं तिनं जे बळ मिळवलं त्यानं तिला तारलं.
 वयाच्या छत्तिशीत असताना हॉटेलमध्ये काम करणारा इव्हानचा भाऊ एक दिवस अचानक एक प्रस्ताव घेऊन आला. म्हणाला, “हॉटेलात एक कॅनेडियन गृहस्थ आलेत. वय वर्षे ६0. त्यांना एक जीवनसाथी (कंपॅनियन) हवाय... तू विचार कर." विचार होतो नि लग्नही. या लग्नानं लोमेक्सच्या जीवनात क्रांती केली. याचं सारं श्रेय डॉ. रेमंड लोमेक्सना द्यायला हवं. ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीत कॅनडात कार्य करणारे डॉ. रेमंड काही काळ गोव्यात आलेले. अचानक आलेल्या श्रीमंतीत लोमेक्सचं भांबावून जाणं स्वाभाविक होतं; पण तिनं स्वतःला सावरलं. दारी आलेली समृद्धी अनेक दिवस दबून राहिलेल्या ऊर्मीसाठी वापरायची तिने ठरलवं. डॉ. रेमंडनी प्रोत्साहन दिलं. अन् गोव्याच्या कळंगुट बिचसमोर तिने मोफत उपचार सुरू केले. तेही आपत्ती म्हणून. पण पुढे तीच इष्टापत्ती ठरली. औपचारिकपणे होमिओपॅथी, आयुर्वेद, शुश्रूषा (नर्सिंग) शिकत, तिनं स्वतःतील सेविका स्वतःच घडवली. 'हे सारं येशूच्या प्रेरणेनं घडतं' ही तिची ठाम समजूत, श्रद्धा! जीवनात काही करायचं, घडायचं तर अविचल निष्ठा हवी. ती लोमेक्सकडून शिकावी.
 वडिलांच्या मृत्यूनंतर सोसलेल्यावर फुंकर पडावी म्हणून केलेलं लग्न. मातृत्वाची अनिवार ओढ मनी. बाळ होऊ देणं धोक्याचं असं डॉक्टर सांगत असतानाही इव्हाननी नेडनला जन्म दिला. नेडन मतिमंद जन्मली. इव्हानच्या हृदयी असलेल्या मातृत्वाच्या कस्तुरीगंधांनी नेडनला आपलंसंच केलं. आज १८ वर्षांची पण अवघी चार फुटांची नेडन आईभोवती अबोल घुटमळत राहते... सोबतीला अशाच व्याधीग्रस्त पामेला, रेणुकालाही बहिणींप्रमाणे एकसारखं करताना मी पाहतो तेव्हा रक्ताच्या नात्यातील व्यर्थपणा मला ठामपणे लक्षात येत राहतो. नेडन पदरात पडली नि डॉ. रेमंडनी लोमेक्सचा पदर सोडला. ते अकाली निवर्तले तशी लोमेक्स ढासळली; पण क्षणभर. परत तिनं गोवा सोडून बेळगाव गाठलं, पण आता नोकरी मिळणं दुरापास्त झालेलं. कशी तरी गुजराण करत असताना अचानक एके दिवशी ऑस्ट्रेलियाहून एक पत्र व चेक हाती पडला. नव-याला निवृत्तीवेतन मंजूर झालं होतं नि लोमेक्स डॉ. रेमंडची एकमेव वारस ठरली होती. चेक तेवीस हजार रुपयांचा होता. इतके पैसे एकावेळी पाहण्याचा तिच्या आयुष्यातला तो पहिला प्रसंग होता. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंदाच्या भरात तिनं सांजा शिजवला नि बेळगावच्या रस्ते, स्टँड, स्टेशनवरील भिकारी, कुष्ठरोग, अपंग, अंध, निराश्रितांना खाऊ घातला. तो घालत असताना तिच्या लक्षात आलं की, यांना खरंच मदतीची गरज आहे. मग तो तिचा दिनक्रमच बनला. इव्हान रोज संध्याकाळी नित्यनियमाने त्यांना खाऊ-पिऊ घालू लागली. तिच्या लक्षात आलं की, यांना अन्नाइतकीच औषधाची, उपचाराची गरज आहे. तिनं त्यांना सरकारी दवाखान्यात नेणं, मलमपट्टी करणं, औषध देणं सुरू केलं. तिच्या या नित्याच्या निष्ठेचा त्रास तेथील काहींना होणं स्वाभाविक होतं... त्यांनी ओरड सुरू केली... पण इव्हान आपल्या सेवेशी इमान राखून राहिली. मग इव्हानच्या रोग्यांची संख्या वाढू लागली. रिक्षा, औषधे, जेवण सारं इव्हान आपल्या नव-याच्या निवृत्तीवेतनातून करायची. लोकांना खरं वाटायचं नाही... मतलबी लोकांनी आवई उठवली... ही बाई धर्मांतर करते... किडनी विकते... हिच्याकडे एवढा पैसा येतो कुठून... वर्तमानपत्रांनी पण चौकशी न करता कॉलम भरभरून लिहून आपली ‘सामाजिकता' सिद्ध केली... बेळगावला मदर इव्हान लोमेक्सना मंगल पुरस्कार जाहीर करण्यासाठी तिथल्या विद्यानिकेतनमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतली... तिथंही पत्रकारांनी मला छेडलं... मी नम्रपणे त्यांना विचारलं की, “तुम्ही एकदा तरी काम जाऊन पाहिलंय का?" पत्रकारांचे मौन त्यांचा गोठणबिंदू सांगून गेला.
 इव्हान लेमेक्सना 'मदर' ही उपाधी कोणत्या चर्चने दिली नाही. ही उपाधी, पदवी तिच्या कामातून आली. ती दिलीय अशा लोकांनी ज्यांची ती निरपेक्ष, मनोभावे सेवा करते. चर्चने अशी पदवी द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण समज आल्यापासून तिला चर्चला गेल्याचे आठवत नाही. इव्हानचं दुःख तेच आहे. इव्हान मनुष्य हीच एक जात मानते. माणुसकी हाच तिचा धर्म. तिच्या होमलेस होममध्ये सर्व धर्माचे लोक, स्त्री-पुरुष, मुलं आहेत. संस्था नोंदणीकृती आहे. संस्थेत प्रत्येकास ज्याच्या त्याचा धर्म पाळण्याचे, प्रार्थना, व्रत करण्याचे स्वातंत्र्य आहे. आश्रमात कोणतंही धार्मिक कर्मकांड नाही. तिच्या या जगावेगळ्या व्रतामुळे मात्र तिची मोठी पंचाईत होऊन गेली आहे. ख्रिश्चन समुदाय तिला ख्रिश्चन मानत नाही. कारण ती चर्चमध्ये येत नाही. हिंदू-मुसलमान तिला ख्रिश्चन मानतात कारण ती जन्मजात ख्रिश्चन आहे. इव्हान आपणास एकविसाव्या शतकाचा खरा आचारधर्म शिकवते. बेळगावमध्ये इव्हानला कोणी ओळखत नाही. अगदी गणेशपूरमध्येही. इतक्या टोकाच्या प्रसिद्धीविन्मुख इव्हानला मी याचं रहस्य विचारलं तर त्यांनी अनेक कटू प्रसंग सांगितले. त्यापेक्षा तक्रार नसलेल्या, तक्रार न करणाच्या माणसात तिला राहणं आवडतं! तिची मात्र कुणाबद्दल तक्रार नाही. 'आय अॅम डुईंग माय जॉब! फिनिश!!' असं म्हणून त्या अबोल राहतात. त्यांचं मौन मला जास्त बोलकं वाटलं... वाटतं.

☐☐

पूर्वप्रसिद्धी

१. सुसंस्कृत राजकारणी : यशवंतराव चव्हाण
(पावनखिंड : ऑगष्ट, २०१२ जिल्हा परिषद, कोल्हापूर)
२. सर्वोदयी विश्वस्त : अण्णासाहेब सहस्रबुद्धे
(साप्ता. साधना, पुणे - १४ मार्च, १९८१)
३. समाजसेविका : तारा अली बेग
(समाजसेवा त्रैमासिक, पुणे - जुलै/सप्टेंबर, १९८९)
४. वंचितांच्या वाली : अनुताई वाघ
(समाजसेवा त्रैमासिक, पुणे - ऑक्टोबर/डिसेंबर, १९९२)
५. अश्रृंमधलं इंद्रधनुष्य : बाबा आमटे
(दै. पुढारी, कोल्हापूर १४ फेब्रुवारी २००८)
६. उपेक्षतांची प्रेषित : इव्हान लोमेक्स
(दै. सकाळ, कोल्हापूर - १८ ऑक्टोबर, २00३)


☐☐

डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा

१. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00६/पृ. २१0/रु. १८0 सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00७/पृ. १३८/रु. १४0 तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
 निर्मिती संवाद, कोल्हापूर/२0१२/पृ.१००/रु.१00/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५0/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२00/तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३0/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२00/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.२११/रु.२७५/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५0/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६0/रु.१८0/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२00/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा
(सामाजिक लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२00/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३० रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२0 रु. ३00 /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५0 /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१७७/रु.२५0/पहिली आवृत्ती

आगामी

  • भारतीय भाषा (समीक्षा)
  • भारतीय साहित्य (समीक्षा)
  • भारतीय लिपी (समीक्षा)
  • वाचन (सैद्धान्तिक)
  • वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन