Jump to content

प्रस्तावना

विकिस्रोत कडून

प्रस्तावना
-------

 “ज्ञान प्रबोधिनी" "संस्था १९६२ पासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण, ग्रामविकस, संशोधन आणि संघटन ही प्रमुख उदिष्टे समारे ठेवून अनेक प्रकल्प सुरु आहेत. व्यक्तिविकास व कार्यविकास याबरोबर समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्वविकसन होण्यासाठी वैशिष्ठयपूर्ण कार्यपध्दतीची या सर्व प्रयोगांना जोड दिली जात आहे.

 ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत ग्रामीण उद्योजकतेच्या संदर्भात १९६५ ते २००० या कालावधीत काय उपक्रम राबविले, त्याचं उद्दीष्ट काय, त्यामागची भूमिका कोणती होती, या कामामुळे काय साध्य झालं, या साऱ्याचा आढावा घ्यायचं ठरलं. यासाठी ज्यांच्याबरोबर काम केलं, ज्यांच्यासाठी काम केलं, ज्यांनी काम केलं अशा अनेकांच्या भेटी घेतल्या. या उपक्रमात सहभागी असणाऱ्यांनी यासाठी वेळही दिला नि माहितीही दिली. सर्वांच्याच मुलाखती जागेअभावी सविस्तर देता आल्या नाहीत. तरीही सर्वांचे मुद्दे येतील असा प्रयत्न केला आहे. या साऱ्या मुलाखती घेण्याचं , त्याचं संकलन करण्याचं आणि त्यांना शब्दरूप देण्याचं काम सुनीला गोंधळेकर ह्यांनी केले.

 बीजारोपण -

 आर्थिक स्वावलंबन ही प्रत्येकाचीच प्राथमिक आवश्यकता आहे. खेडेगावातून या संधी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. तिथल्या हुशार, उत्साही तरुणांना बेकारीचा प्रश्न जास्तच तीव्रतेनं भेडसावतो. शहरी भागातल्या तरुणांना शिक्षण तर ग्रामीण भागामध्ये उद्योजकतेचं प्रशिक्षण अशी दुहेरी भूमिका मग संस्थेनं निवडली. १९६५ पासून या प्रकारच्या कामाला सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक व आद्य संचालक वाचस्पती आप्पा पेंडसे यांची दूरदृष्टी आणि सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्याची क्षमता यातून हे काम उभे राहिले.

 प्रबोधिनीचे प्रथम अध्यक्ष श्री. कोटिभास्कर यांनी या कामात पुढाकार घेतला. ते स्वत: मुंबईतले एक उद्योगपती होते. उद्योगधंद्याना चालना मिळण्याची निकड त्यांना जास्तच जाणवत होती. त्यांनी स्वत: प्रबोधिनीत ही कल्पना विकसित केली. त्यासाठी देणगीही दिली. त्याशिवाय १९६८ साली सुपरिचित उद्योगपती मा. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या सहकार्याने ही संकल्पना जोम धरू लागली. शंतनुरावांशी असा व्यावसायिक प्रकल्प कसा उभा करता येईल याविषयी चर्चा झाली. मग त्यांनी त्यांच्या कारखान्यात प्रशिक्षण दिलं, आर्थिक मदत केली आणि उत्पादन केंद्र १९६९ मध्ये पुण्यात चालू झालं.

 १९७१ मध्ये हे उत्पादन केंद्र शिवापूर ह्या पुण्याजवळील सातारा रस्त्यावरील शिवापूर गावात सुरू झालं. स्वत: मा. शंतनुराव किर्लोस्कर त्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. त्यांनी ५० यंत्रे या केंद्राला देऊ केली आणि कामही दिलं. उद्योगला कोटिभास्कर स्मृति उद्योग अर्थात किर्लोस्कर ज्ञान प्रबोधिनी तत्रंशाळा असं नाव देण्यात आलं. १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर Unicef संस्थेमार्फत हातपंप तयार करण्याची मागणी आली. सुमारे १०-१५ हजार हातपंपांची यावेळी निर्मिती या उद्योगातून झाली. आणि मग मागणीप्रमाणे योग्य ते डिझाईन करणे, १२००तरुणाना या उद्योगात प्रशिक्षण देण्यात आले. त्यावर संशोधन करणे व मोठ्या असे अनेक प्रकल्प इथे हाताळले गेले. साधारणत: २०० कामगार या ठिकाणी काम करत होते.

 कालांतराने या कारखान्यातून 'यंत्रविस्तार योजना' ही कल्पना मूळ धरू लागली. या एका कारखान्यात काम देऊन सगळ्या भागाचा विकास होऊ शकत नाही. हे काम वाढण्यासाठी यंत्रविस्तार योजना १९७५ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमुळे या भागात उद्योजक वाढावेत अशी कल्पना राबवण्यात आली. या प्रदेशातील तरुणांनी स्वत:चा उद्योग चालू करावा यासाठी त्यांना आवश्यक ती मदत या योजनेमुळे केली गेली. ३० ते ४० तरुणांना यात प्रत्यक्ष यंत्रे दिली. काहीना यंत्रासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं, कामेही पुरविण्यात आली. असं सर्वांगपरिपूर्ण सहाय्य गावातल्या तरुणांना प्रथमच मिळत असेल. १९८१ मध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यातूनही आजपर्यंत सुमारे ४० उद्योगांना सुरुवात झाली. या प्रकल्पामधून सर्व आर्थिक स्तरांतील शेतकरी, नवशिक्षित तरुण, हरिजन, वाजंत्री वादक, मुस्लीम समाज अशा वेगवेगळ्या थरातून उद्योजक तयार झाले आणि स्वत:च्या पायावर उभे राहू शकले.

 बाजारपेठेशी सांधेजोड -

 या एका कारखान्याशिवायही ग्रामीण भागातल्या इतर उद्योगांना चालना मिळावी यासाठीही अनेक प्रकल्प राबवले गेले. यात प्रामुख्याने शिवगंगा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना पुण्यासारख्या जवळच्या बाजारपेठेत माल आणता यावा, विकता यावा यासाठी योजना तयार करण्यात आल्या. व्यावसायिक शेतीसाठी तांदूळ विक्री व दूध विक्री या महत्त्वाच्या बाजारपेठेशी ओळख अशा सगळ्याच बाबींचा समावेश होता.

 १९७८ साली पुणे जिल्ह्यातील दुर्गम वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथे शिवभूमी खांडसरी उद्योग उभारणीचाही प्रबोधिनीने बदललेल्या शासकीय धोरणांमुळे राज्यातील अनेक खांडसऱ्या प्रमाणे हाही उद्योग स्थगित करावा लागला.

 प्रयत्न करुन पाहिला.

 शहरामध्ये उद्योजकता-

 ग्रामीण भागामध्ये हे प्रयत्न चालू असतानाच शहरी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच होते. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या माध्यमातून हे कौशल्य आत्मसात झाले तर वाढत्या वयात नक्कीच जोमाने विकास होईल हे त्यामागचे तत्त्व. खाद्यपदार्थांची विक्री या माध्यमातून काही वर्षे केली. प्रबोधिनीने कपॅसिटर्स बनवण्याचा व्यवसायही केला. सध्या उद्वाहक (लिफ्ट) बनवणे व त्याचे दुरुस्तीचे कंत्राट घेणे असा व्यवसाय १९८६ पासून चालू आहे. या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर इथे कार्यालये सुरू केली होती. या व्यापार उद्योग विभागातून त्या त्या शहरांमध्ये विक्रीची व्यवस्था करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनीना विद्यार्थी दशेतच विक्रि कौशल्य जोपासनेवर भर दिला गेला. शालेय वयापासून हे कौशल्य आत्मसात झाले तर वाढत्या वया नक्कीच जोमाने विकास होईल हे त्यामागचे तत्व. महिलासाठी तांत्रिक प्रशिक्षण व त्यातून उद्योजकता यावर अलिकडच्या काळात भर देण्यात आला आहे.

 प्रयत्नांचे फलित -

 जवळ जवळ ३० वर्ष केलेल्या उद्योजकतेच्या डोळस प्रयत्नांचं दृश्य, फलित आता पहायला मिळत आहे. प्रामुख्याने शिवापूर ते वेल्हा या पट्यातील गावांमध्ये हा बदल जाणवणारा आहे. गाव म्हणजे शेती आणि शेती संबंधित पूरक उद्योग, तांत्रिक ज्ञानाचा अभाव, समीकरण बदलली आहेत. १९७१ च्या आधी या भागात एकही कारखाना नव्हता पण आता सुमारे ४०० लहान- मोठे उद्योग या टापूत उभे आहेत. या उद्योजकांमध्ये तरुण आणि स्त्रियांचा सहभाग मोठा आहे.

 एवढ्या प्रमाणावर उद्योग याचाच अर्थ उद्योगाचं वातावरण इथे तयार झालं आहे. उद्योग म्हणजे मालाची पारख, दर्जाची खात्री, वेळेवर माल तयार होणे, बाजारपेठेची नाडी ओळखणे, कामगारांचे व्यवस्थापन, पैशांचे हिशोब, कामातलं सातत्य आणि नावीन्यही. या सगळ्यांची रुजवण गेल्या ३० वर्षांत इथे झाली आहे. तांत्रिक सक्षमता आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ याच खेड्यामधून निर्माण झालं आहे. त्यामुळेच नवीन तरुण पिढी केवळ नोकरीच्या आशेवर जगत नाही तर उद्योगातली धडाडी दाखवण्याची जिद्द त्यांच्यात तयार झालेली दिसते. २०-२५ वर्षांचे हे तरुण स्वत:च्या जबाबदारीवर यंत्र खरेदी करतात. माल खरेदी करतात आणि उद्योगाला सुरुवात करतात. अपयश आलं तरी अपयश हाही उद्योगाचाच उद्योगाचाच एक भाग आहे हे समजून पुन्हा नव्या उमेदीनं व्यवसायाला सुरुवात करतात.

 हेच तरुण उद्योजक उद्योजकांची पुढची पिढीही घडवत असतात. नवीन मुलांना तेच काम शिकवतात व आपल्या इथे कामही देतात. यातून गावातच नोकरीच्या संधी वाढतात. गावातला तरुण गावातच रहातो आणि निसर्गाच्या लहरींवर अवलंबून न रहाता स्वत:च्या पायावर उभा रहातो. या

 पाठोपाठ येणारी सुबत्ता, आर्थिक सुस्थिरता त्यांच्या दैनंदिन जीवनात, राहणीमानात नक्कीच डोकावत. आर्थिक स्थैर्याचा एक परिणाम म्हणून कुटुंब अधिक सुदृढ, तणावरहित आणि स्थिर होतं.

 उद्योग करायचा ठरवलं की बऱ्याच अडचणी डोळ्यांसमोर येतात. कधी पैसे असतात तर काय करायचं तेच समजत नाही. कधी काय करायचं ते पक्क असतं पण पैसे कसे उभारायचे ते समजत नाही. कधी हे दोन्ही जमतं पण बाजारपेठेचा अंदाज येत नाही. या अशा अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रबोधिनीने ग्रामीण भागात उद्योजकता प्रशिक्षणाचे ३ वर्ग घेतले. या वर्गामध्ये शिवगंगा-गुंजवणी खोऱ्यातील साधारण ९५ युवक व महिला सहभागी झाल्या. या वर्गांमध्ये उद्योग संधी, विपणन, अर्थसहाय्य व प्रेरणा जागरण अशा विविध विषयांचे प्रशिक्षण दिले. याचा उपयोग होऊन अनेकांनी स्वत:चे स्वतंत्र उद्योग सुरू केले. अशा प्रशिक्षणामध्ये जेव्हा १०० जणी सहभागी होतात तेव्हा कुठे १० जणी पुढच्या टप्प्यावर पोहोचतात. त्यातूनही टिकून यशस्वी होणाऱ्या थोड्याच असतात. यापुढे दिलेल्या कहाण्या या अशा थोड्यांपैकीच आहेत.

***