Jump to content

पुरातत्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र

विकिस्रोत कडून
अभिनव ग्रंथ माला पुष्प ७ वे



पुरातत्त्वभूषण
कै. इतिहासाचार्य राजवाडे
यांचे चरित्र.



लेखक-
पांडुरंग सदाशिव साने, एम्.ए.
(ना. गोखले व ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या चरित्रांचे कर्ते.)



प्रस्तावनाकार-
प्रो. दत्तो वामन पोतदार, एम्.ए.
न्यू पूना कॉलेज, पुणे.



संपादक व प्रकाशक-
श्रीधर नारायण हुद्दार, बी.ए. (टिळक)
[ सर्व प्रकारचे हक्क प्रकाशकाचे स्वाधीन ]



प्रथमावृत्ति
प्रती २००० 
 जून १९२८
  जेष्ठ १८५०
 
 किंमत
 १० आणे
संपादक व प्रकाशक-

 श्रीधर नारायण हुद्दार, बी. ए. (टिळक)
  संपादक, अभिनव ग्रंथमाला, नागपूर.







मुद्रक-     
 नरहर हणमंत देशपांडे,
  बाल- वसंत छापखाना
    अमळनेर-पूर्व- खानदेश.

अनुक्रमणिका.



संपादकीय, लेखकाचे दोन शब्द, प्रस्तावना.


पृष्ठसंख्या
विषय प्रवेश  .... ....
जन्म, बालपण व शिक्षण  .... ....
इतिहास संशोधन व इतिहासमंडळ  .... .... २०
भाषाविषयक कामगिरी  .... .... ४२
समाजशास्त्रविषयक व इतर निबंध  .... .... ४९
राजवाडे यांचें लिहिणें-त्याचे स्वरूप- गुणदोष  .... .... ५५
राजवाड्यांची विशिष्ट मनोवृत्ति  .... .... ६०
स्वभावाशी परिचय  .... .... ७६
अंत व उपसंहार  .... .... ९५




प्रस्तावना.


 माझे प्रिय शिष्य रा. साने यांनी थोर पुरुषांची चरित्रें लिहून प्रसिद्ध करण्याचे मोठें स्तुत्य कार्य चालविलें आहे. त्यांच्या गोखले चरित्राचा पुरस्कार करण्याचा मान त्यांनी मला दिला. त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचें चरित्र त्यांनी प्रसिद्ध केलें; आणि आज राजवाडे यांचें चरित्र ते प्रसिद्ध करीत आहेत. चरित्र लेखनाचें कार्य राष्ट्राशिक्षणास अत्यंत उपयुक्त आहे आणि रा. साने यांनी या शाखेत सालोसाल भर टाकण्याचें ठरविलें आहे. याबद्दल त्यांचं करावें तेवढें कौतुक थोडें होईल!
 रानडे, लोकहितवादी अशांसारख्या थोर महाराष्ट्रीयांची जरा विस्तृत चरित्रें त्यांच्या मृत्यूनंतर कैक वर्षांनीं प्रसिद्ध झाली. गोखले यांचें साने यांनीं लिहिलेलेच चरित्र सर्वांत मोठे आहे. टिळकांचें चरित्र त्यांच्या मृत्यूनंतर काळ न दवडतां ताबडतोब लिहिण्याचें हातीं घेऊन रा. केळकर यांनी उत्तर भाग ओढून काढून कां होईना पुरें करून टाकिलें आहे. याचा अर्थ स्पष्ट असा होतो की राष्ट्र जागे झाले आहे, थोर पुरुषांची योग्यता त्यास समजूं लागली आहे, त्यांची आठवण बुजूं नये आणि पुढील पिढीस त्यांची कामगिरी सविस्तर समजावी म्हणून त्यांची चरित्रे प्रसिद्ध होऊं लागलीं आहेत. खुद्द थोर पुरुषांचे शिष्य वा सांप्रदायिक यांनीं वास्तविक हें चरित्र लेखनाचे कार्य करावयास हवे, परंतु त्यांनी ते वेळेवर केलें नाहीं तरी रा. साने यांचेसारखे उत्साही तरुण ती उणीव भरून काढण्यास पुढे येत आहेत ही फार समाधानाची गोष्ट आहे.
 राजवाडे यांना मी प्रथम शके १८१७/१८ (इ. स. १८९५-९६) मध्ये पाहिलें. त्या वेळी मी लहान होतो आणि राजवाडे यांचे पहिल्या खंडाचें काम चालू होतें, त्यांचा पहिला खंड हा मी वाचलेला पहिला मराठी ग्रंथ होय. यांतील विषय कळण्याजोगें माझें वय नव्हते; तथापि त्यांनी आमचे इतिहासाची माहिती कोठ कोठे मिळेल त्या स्थळांची जी यादी (पहिला खंड, प्रस्तावना) दिली आहे, ती पाहून माझे मनावर विलक्षण परिणाम झाला आणि त्या वेळेपासून या कामाची गोडी मला लागली. हा अंकुर वाढीस लागून इ. स. १९०८ साली विजयानंद नाटकगृहांत जे ग्रंथकारांचे संमेलन भरलें होतें, त्यावेळी मी राजवाडे यांस घरीं- आमचे वडील राजवाडे यांचे सहाध्यायी होते- आग्रहाने बोलावून नेले. त्यानंतर १९९० त भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाडे यांनी मेहेंदळे यांच्या साह्यानें केली; किंबहुना त्या स्थापनेच्या दिवशीं- आषाढ शुद्ध १ शके १८३२ रोजी राजवाडे आमच्या घरूनच समेत गेले! असो.
 अशा या गोष्टी आतां आठवणी झाल्या. त्याप्रमाणेच त्यांचे सहाध्यायी, सहकारी, विरोधक, शिष्य, मित्र, ग्रंथाभ्यासिक या सर्वांच्या आठवणीहि पुष्कळ अजून प्रसिद्ध व्हावयास पाहिजेत. तसेच त्यांचा इतरांशी व इतरांचा त्यांशी झालेला पत्रव्यवहार, त्यांचे अप्रसिद्ध लेख व संग्रह या सर्वांचे अवलोकन त्यांच्या चरित्र लेखकास अवश्य आहे. असा योग येईल तेव्हां राजवाडे यांचें सांगोपांग चरित्र हाती घेता येईल.
 रा. साने यांचा प्रयत्न त्या दृष्टीचा नाहीं. साधारण बहुश्रुत वाचकास राजवाडे यांच्या योग्यतेची ओळख व्हावी म्हणून हा प्रयत्न त्यांनीं केला आहे. अशी या सानेकृत चरित्रसिद्धीची मर्यादा आहे. हें लक्षांत ठेवूनच त्यांच्या ग्रंथाकडे पाहिलें पाहिजे.
 या ग्रंथावरून राजवाडे यांची कांहींशी ओळख जरी वाचकांस होईल तरी त्यांची खरी आणि पक्की ओळख त्यांच्या लेखांच्या व कार्याच्या परिशीलनानेंच होणार आहे. राजवाडे यांच्या मृयूनंतर त्यांच्याविषयीं ज्या आख्यायिका व आठवणी प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांतही चुकीची माहिती व भ्रामक अनुमानें आलेली आहेत. उदाहरणार्थ राजवाडे यांच्या बंधूंकडून राजवाडे यांस चुलतीकडून आलेली किंवा अन्य मदत मिळत असे त्यामुळे त्यांनीं उपासतापास काढून मोठा स्त्रार्थत्याग केला व हाल काढले हा प्रवाद खोटा दिसतो असा एक निष्कर्ष राजवाडे यांस न पाहिलेल्या एका गृहस्थानें कोणाकडून आलेल्या ऐकीव माहितीच्या आधारें एका वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्याचे मी वाचलें! चुलतीच्या मत्तेचा वांटा चुलती मेल्यावर राजवाडे यांचेकडे यावयाचा होता, व तो त्यांचे सुशील व प्रेमळ बंधु यांनी त्यांस मिळाला तसा त्यांचे इच्छेप्रमाणें पोंचता केला. परंतु ही मदत फार थोडे दिवसच मिळाली. राजवाडे यांनीं विशेष हाल काढले ते विठ्ठल छापखाना जळून भाषांतर मासिकाचें वाटोळे झाल्यावर आणि पहिला खंड प्रसिद्ध केल्यावरच सुमारें १२ वर्षे काढले. पुढे पुढे हे हाल बंद झाले नाहींत तरी कमी झाले. असो. त्यांच्या जीवनाविषयीं असें पुष्कळ लिहितां येईल आणि लिहावयासही पाहिजे. त्यांची खरी योग्यता कशांत होती त्याचीही चर्चा व्हावयास पाहिजे. ते नुसते इतिहास संशोधक नव्हते तर ते इतिहास तत्त्वविवेचकहि जबरे असून दिव्यदृष्टि आणि प्रज्ञावंत असे विचारस्त्रष्टेहि होते. ही त्यांची उच्च कोटी पटण्यासाठी त्यांचे चरित्राचें व लिखाणाचें सप्रमाण, सांगोपांग असें पुष्कळ विवेचन व्हावयास पाहिजे. पण तो प्रसंग अर्थातच हा प्रस्तावनेचा नव्हे. राजवाडे इतिहासक संशोधन मंडळानें हें कार्य हाती घेण्यास हवें आहे. असो. एवढें सांगून जो स्वराष्ट्राची भव्य स्मृती उजळण्यासाठी स्वतः सर्वस्वे झिजला त्या महापुरुषाचा एक नम्र पाइक म्हणून कर्तव्य बुद्धीनें लिहिलेले हे चार शब्द त्यांच्या चरित्राचें व कार्याचें सखोल बुद्धीनें मनन करण्याची प्रेरणा उत्पन्न करोत अशी प्रभूस प्रार्थना आहे.
पुणे
 दत्तो वामन पोतदार
जेष्ठ व. ३ शके १८५०
चरित्र लेखकाचे दोन शब्द.


 हें चरित्र अत्यंत त्रोटक आहे व त्याचेहि श्रेय खरोखर मला नाहीं. राजवाडे यांच्या मृत्युप्रसंगानंतर केसरीत आलेले लेख, मृत्यूनंतर झालेली भाषणे, विद्यासेवकांतील लेख व मुख्य म्हणजे राजवाडे तिलांजली अंक यांतील माहितीचा मी उपयोग करून हें अल्प चरित्र लिहिलें आहे. तिलांजलि अंकांतील कृष्णाजी पांडुरंग कुळकर्णी एम. ए. सातारा, यांच्या लेखांतील मी अवतरणेंहि दिली आहेत. राजवाडे यांच्या प्रस्तावना व लेख बरेचसे स्वतः वाचून त्यांतील माहितीचा मी उपयोग केलेला आहे. चरित्रांतील बराचसा भाग राजवाडे यांच्या शब्दांतच मी दिला आहें. या अति संक्षिप्त चरित्रांत गुणलवबिंदु असलाच तर तोही माझा नसून ज्यांची माहिती मी उपयोगिली त्यांचा आहे. हा चरित्रात्मक निबंध माझ्यासारख्या मतिमंदाचा असूनही तो प्रकाशित करण्याचे काम अभिनव ग्रंथ मालेचे उत्साही व ध्येयप्रवण संपादक हुद्दार यांनी स्वीकारिलें व माझ्याकडे निरंतर कृपा दृष्टीने पाहणारे गुरुवर्य पोतदार यांनीं मी प्रार्थितांच हजार कामें असतांही, या पुस्तकास प्रस्तावना लिहून गौरविलें याबद्दल उभयतांचा मी ऋणी आहें.
 राजवाडे यांच्या छायाचित्रावर जन्म शक १७८६ घातला गेला, तो केसरीत पाहून घातला गेला. परंतु राजवाडे तिलांजलि अंकांत १७८९ हा शक त्यांच्या कुंडलीत आहे- तोच खरा समजला पाहिजे.
१०।६।२८
पांडुरंग सदाशिव साने.
 
संपादकीय.

 मालेचे सहावें पुष्प 'आदर्श शिक्षण' या पुस्तकांतील निवेदनांत प्रारंभिक निधि ५००० रु. मिळाल्यास स्वतंत्र पुस्तकें प्रसिद्ध करण्याचेंही कार्य माला अंगिकारिल असा उल्लेख मी केला होता. पण प्रारंभिक निधि जरी मिळाला नसला तरी माला आज सर्वस्वीं स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध करण्याचे धाडस करीत आहे. प्रस्तुतचे पुष्प अमळनेरच्या खानदेश शिक्षण मंडळाच्या हायस्कुलांतील विद्वान शिक्षक व गोखले चरित्र व ईश्वरचंद्र विद्यासागर या पुस्तकांचे कर्ते श्री. पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलें आहे. गेल्या जानेवारी महिन्यांत अमळनेरला गेल्यावेळी श्री. साने यांच्याशीं प्रथमच परिचय झाला व पहिल्या भेटीतच केलेल्या विनंतीचा स्वीकार करून त्यांनीं मालेसाठीं राजत्राडे चरित्राचें लिखाण पूर्ण केलें याबद्दल मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. पुण्याचें इतिहाससंशोधन मंडळ हें कै. राजवाड्यांचें एक जिवंत स्मारकच आहे असे म्हणावयास हरकत नाहीं. या मंडळाचें काम सुरुवातिपासून गु. दत्तोपंत पोतदार हे एकनिष्ठपणे व निरलसपणे करीत आले आहेत. अर्थातच गु. पोतदार यांस कित्येक वर्षे कै. राजवाड्यांच्या सहवासांत राहण्याचें भाग्य मिळाले आहे. अशा अधिकारी व्यक्तीची या पुस्तकास प्रस्तावना मिळाल्यास विशेष उचित होईल असे वाटल्यावरून मी व श्री. साने यांनी त्यांस प्रस्तावना लिहिण्याबद्दल विनंती केली. विनंतीप्रमाणें आपला अमूल्य वेळ खर्च करून त्यांनी सुंदर प्रस्तावना लिहून दिली यांत त्यांची राजवाडे- भक्तिच विशेषत्वाने प्रगट होते. आमची विनंती स्वीकारून त्यांनी मालेवरहि जो अनुग्रह केला त्याबद्दल माला त्यांची सदैव ऋणी आहे. या पुस्तकाचें मुद्रणाचें काम माझे मित्र श्री. न. ह. देशपांडे संपादक 'बालवसंत' यांनीं आपल्या बालवसंत छापखान्यांत केले असून मुद्रितें तपासण्याचे काम श्री. पुराणीक व श्री. मोहरीर शिक्षक, खानदेशशिक्षणमंडळ अंमळनेर यांनी अत्यंत काळजीपूर्वक केलें आहे. याबद्दल या तिघांचाहि मी फार आभारी आहे.
 माझें निवेदन संपविण्यापूर्वी माले संबंधी दोन शब्द लिहि- लिहिण्याची वाचकांची परवानगी घेतो. येत्या जूनमध्ये मालेस सुरुवात होऊन अडीच वर्षे होतील. संकल्पाप्रमाणें तोंवर १० पुष्पें प्रसिद्ध व्हावयास पाहिजेत व तसा प्रयत्न मालेकडून कसोशीनें करण्यांत येईलहि. पण या बाबतीत पुढील अडचण अर्थिक आहे. अमेरिका पथदर्शक व राजर्षि भीष्म या पुस्तकांचे पुनर्मुद्रणाचे काम याच वर्षांत करावे लागल्यानेंहि नवीन पुष्पाच्या मुद्रणाचे काम थोडे मागे पडले मालेजवळ थोडाफार निधि असल्यास मालेची कामे वक्तशीरपणे होऊं शकतील. यासाठी ५०रु. चा एक असे ५००० रु. चे १०० डिबेंचर्स (कर्जरोखे) पांच वर्षे मुदतीचे विक्रीस काढण्याचें मालेनें ठरविलें आहे. मालेच्या सधन ग्राहकांनी मालेचे डिबेंचर्स घेऊन मालेच्या साहित्य प्रकाशनाच्या कार्यास आपलेपणाने मदत करावी अशी त्यांस नम्र विनंति आहे. डिबेंचर घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपला मनोदय कळविल्यास त्यांचेकडे यासंबंधीची 'सविस्तर योजना' पाठविण्यांत येईल.
 आणखी एका नवीन बाबीसंबंधी येथे खुलासा करणें प्राप्त आहे. वर्गणीदारांची अडचण दूर करणे हीच ती बाब होय. ६ व्या पुष्पांतील निवेदनांत वार्षिक वर्गणीसंबंधीं उल्लेख केला होता. वार्षिक वर्गणी ठरविणें हें मालेच्या व ग्राहकांच्या दृष्टीने सोयीचे व हिताचे आहे असें दिसून आल्यावरून येत्या जूनपासून वार्षिक वर्गणी दोन रुपये निश्चित केली आहे. ज्या वर्गणीदारास वा. व. ची योजना पसंत नसेल त्यांना पूर्ववतच पुस्तकें मिळू शकतील. वा. व. ठरविण्यांत आल्यामुळें आतां ५ रु. च्या साहाय्यकांचा वर्ग ठेवण्याची अवश्यकता नाहीं. वा. व त ५०० पृष्ठांचे वाङ्मय ग्राहकांस देण्याचे योजिलें आहे. वर्गणी मनी आर्डरीनें पाठविणाऱ्यांनी सव्वा दोन रुपये पाठवावे. व्ही. पी. २ रु. ६ आ. ची जूनमध्ये करण्यांत येईल. एजन्सीच्या ठिकाणी वर्गणी दोन रुपयेच फक्त पडेल.
 ग्रंथ मालेस उत्तरोत्तर वाढती साहित्य सेवा करण्याचें सामर्थ्य प्राप्त होवो अशी इच्छा व्यक्त करून हें निवेदन संपवितो.
नागपूर शहर
 श्रीधर नारायण हुद्दार.
७-६-१९२८

कै. राजवाडे यांच्या चरणीं प्रणति.


वृत्त - भुजंगप्रयात.

नमो विश्वनाथा नमो बुद्धिमंता । नमो तेजवंता नमो मानवंता ।
स्वभू तोषवीली, स्वभू भूषवीली । तिची कीर्ति, धीरा, दिगंतांत नेली ॥
धनाला, सुखाला विलासांदिकांला । स्तुतीला जनांच्या, नृपांच्या कृपेला ।
तुवां हाणली लाथ निःस्वार्थ होसी । परी कार्य केलें प्रचंड प्रकाशीं ॥
स्मृती पूर्वजांची किती स्तव्य दिव्या । किती शौर्य धैर्य प्रभा बुद्धि भव्या ।
परी तत्स्मृती टाकिली मालवोनी । जनांनीं जितात्मे गतश्री बनोनी ॥
स्मृती जागवीली, तुव कष्ट केलें । निराशादिकांतें लयालागि नेलें ।
तुवां ओतिला दुर्बलांती हुरूप । असें कार्य केलें, महंता, अनूप ॥
मलीना मनाला तुवां निर्मळोनी । मृतात्म्यांस तेजें तुवां चेतवोनी |
वरी राख जी संचली, फुंकरोनी । तुवां प्रज्वळीला पुन्हां ज्ञान वन्ही ॥
तुझा धीर गाढा, निराशा शिवेना । तुझा निश्चयो थोर केव्हां ढळेना ।
अहो निःस्पृहा, निस्तुला, निष्प्रपंचा । किती साधिलें कार्य नेसून पंचा ॥
तुझें तेज वैराग्य विज्ञान सिंधू । तयाच्या पुढें शोभती अन्य बिंदु ।
तुझा आयसी वज्रवत् दिव्य देह । प्रतापी सदा मूर्त उत्साह गेह ॥
तुझ्या बुद्धिला कांहीं नाहीं अगम्य । सदा डुंबसी ज्ञानगंगेत रम्य ।
किती पंकजें आणिलीं त्वां खुडोनी । मती आमुची गुंग होते बघोनी ॥

कुणी पाणिनी मानितो मूर्तिमत । गणावें गिवन् बोलती ज्ञानवंत ।
कळावी कशी योग्यता वास्तवीक । अम्हां, जे सदा मागतों रोज भीक ॥
स्वतंत्रा, तुवां दाविला नीट पंथ । तुला पाहुनी होत संस्फूर्त संथ ।
जिथें जात भास्वान्, नुरे अंधकार । तुझ्या दर्शनें भाषणें तो प्रकार ॥
पहाडापरी धीरधिंग प्रचंड । प्रतापप्रभा उज्वलन्ती उदंड ।
हरावा रिपू थोर अज्ञान, बंड । पुकारोनियां थोपटीले स्वदंड ॥
करोनी रिपू चीत, तो ज्ञान राजा । तुवां सद्भटे आणिला देशकाजा ।
किती मांडला उत्सवो त्या प्रभूचा । अहा वाढला थोर लोकीक भूचा ॥
अलंकार राष्ट्रास होसी अमोल । सुधेचा तुझा सिंधु होईल बोल ।
तुझें स्तव्य चारित्र्य आदर्श लोकां । जया पाहुनी संहरावें स्वशोका ॥
किंती सद्गुणवृंद वर्णू वरेण्या । मला, बुद्ध राजा, न हें शक्य, धन्या ।
तुझ्या पूज्य संस्तव्य पादांबुजाला । करोनी नती नम्र हा पूत झाला ॥
तुझा देह तो पांच भौतीक गेला । त्वदात्मा महाराष्ट्र लोकांत ठेला ।
तुझी संस्मृती नित्य राही जिवंत । सदा राहसी अंतरीं मूर्तिमंत ॥


- पां. स. साने.



कै. इतिहासाचार्य राजवाडे.
विषय प्रवेश.

कै. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचें नांव सुशिक्षित महाराष्ट्रीयाच्या निकट परिचयाचें आहे. राजवाड्यांसारख्या गाढ्या पंडित प्रवराचें चरित्र मी लिहावयास घेणें म्हणजे टिटवीनें सागराचें गांभीर्य जाणूं पाहण्याप्रमाणे आहे. मी अप्रबुद्ध आहे; स्वतंत्र प्रज्ञेचा अल्पांशही मजमध्ये नाहीं; ज्या अनेक शास्त्रांत या विराट पुरुषाची विशालबुद्धी स्वैर संचारती झाली, त्या शास्त्रांचीं मला नांवें सुद्धां ऐकूनच माहीत. माझी ही यथार्थ स्थिति आहे; यांत फाजील विनय वगैरे कांहीं नाहीं. माझें मन मला पुन्हा पुन्हा सांगे की, राजवाड्यांसंबंधीं तूं काय लिहिणार? प्रश्न खरा; परंतु भक्तीला स्वस्थ बसवेना. राजवाड्यांच्याबद्दल माझ्या हृदयांत जी असीम भक्ति वसत आहे, तिला हें वरील तर्कट समजेना, राजवाडे यांच्यासंबंधीं जे जे उद्गार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाचले वा ऐकले, त्या सर्वांचा उपयोग करून तूं लहानसे चरित्र त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीं प्रसिद्ध कर, असें माझी भक्ति बोलूं लागली व म्हणून मी या कार्यास हात घातला. मला हें चरित्र त्या दिवशीं प्रसिद्ध करतां आलें नाहीं; परंतु आज तें लोकांसमोर येत आहे. 'स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती' असेंच राजवाडे यांच्या बाबतीत मला म्हटले पाहिजे. त्यांच्या निकट सान्निध्यांत ज्यांनीं वर्षे घालविली असतील, त्यांच्या प्रतिभेची प्रभा ज्यास सतत पहावयास मिळाली असेल व त्यामुळे ज्यांच्या हृदयांतील भ्रांतितिमिराचा निरास झाला असेल, राजवाड्यांच्या सर्वगामी बुद्धीचें वैभव ज्यांस आकलन करितां येईल, त्यांचा गूढ स्वभाव ज्यांस उकलतां आला असेल, अशा पुरुषांनी त्यांची चरित्रे लिहिली तर तीं पूज्य व आदरणीय होतील. ती तशी लिहिली जातीलही; परंतु भक्तीला कमी जास्त समजत नसतें, म्हणून माझी भक्ति मला सांगे 'जा, तूंही आपली वाक्सुमनांजलि त्या थोर पुरुषाच्या पदारावंदी अर्पण कर.' भक्तीचा एकच घांस विश्वमोलाचा असतो; तो परमेश्वरास प्रिय होतो; तद्वत् माझ्या या भक्तीनें कै. राजवाडे यांस संतोष होवो; त्यांस संतोष होईल की नाही हें मला कळावयास मार्ग नाहीं; परंतु आपले कर्तव्य केल्यानें मला मात्र संतोष होत आहे खरा.



प्रकरण १ लें.
जन्म, बाळपण व शिक्षण.

 कै. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्म शके १७८५ आषाढ शु॥ अष्टमीस झाला. त्यांच्या आईचें नांव यमुना. बालपणी त्यांची वृत्ति कशी होती, ते काय खेळत, कसे वागत वगैरे माहिती आम्हांस नाहीं. त्यांचें प्राथमिक शिक्षण वडगांव येथें झालें. राजवाडे यांच्या पितामहानें स्वराज्याच्या पडत्या काळांत लोहगडची किल्लेदारी केली होती. तेव्हां याच बाजून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे वडील बालपणींच निवर्तले. यामुळे त्यांचें लहानपणी संगोपन शिक्षण वगैरे त्यांच्या चुलत्यांनीं केलें. राजवाडे यांनी स्वतः 'कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव' म्हणून ग्रंथ मालेमध्ये एक लेख पुष्कळ वर्षांपूर्वी लिहिला आहे. त्यावरून त्यांच्या सर्व शिक्षणाची माहिती मिळते. आठ वर्षे वयाचे असतां त्यांनी धुळाक्षरें शिकण्यास आरंभ केला. त्यांनी हे मराठी शिक्षण ३ वर्षे घेतलें. येवढ्या काळांत त्यांनी कधी शाळेत जाऊन तर कधीं घरी राहून सामान्य मराठी पुस्तक वाचण्याइतकें भाषाज्ञान व केरोपंती अंकगणितांतील वाटेल तो प्रश्न सोडविण्याची तयारी हें संपादन केलें, या तीन वर्षांत भूगोल, इतिहास, व्याकरण, व्युत्पत्ति, भूमिति, काव्य यांची बिलकूल कल्पना त्यांस नव्हती; या गोष्टींचा त्यांच्या बालमनावर ठसा कांहींच उमटलेला नव्हता. या तीन वर्षांत ते शाळेत सरासरीने दीडवर्षे गेले असतील; बाकीचे सर्व दिवस धांगडधिंगा, मस्ती कुस्ती करण्यांत त्यांनी दवाडले. मारामाऱ्या करण्यांत त्यांचा पहिला नंबर असे; विटी-दांडूचा खेळ खेळण्यांत तर ते तरबेज. पोहण्यांतही चांगलेच प्रवीण झाले. एकही शिक्षक या बालवयांत नीट शिक्षण देणारा त्यांस मिळाला नाहीं. ते या आत्मचरित्रांत सांगतात "पंतोजी आडमुठे, पोटभरू, इकडची पाटी तिकडे नेऊन टाकणाऱ्यांपैकी होते." यामुळे आठवड्यांत फक्त दोन तीन दिवस घटका अर्धघटका अभ्यास करूनही पंतोजीची कृपा राजवाडे यांस संपादितां येई. ते म्हणतात "जर चांगला शिक्षक मला मिळता तर ३ वर्षांत मी बी. ए. इतकी तयारी केली असती" या गोष्टींत कोणास अतिशयोक्ति वाटेल, परंतु मला तसें कांहींएक वाटत नाहीं. मिलसारखे पंडित किती बालवयात लॅटीनग्रीक भाषांचे पंडित झाले, ज्ञानेश्वरांसारखे किती बालवयांत भाष्यकारांस मागोवा पुसणारे झाले, ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखे विशालधी १५।१६ वर्षे वयाचे असतांना कसे सर्व-शास्त्रपारंगत झाले. हें पाहिलें म्हणजे राजवाडे यांच्या म्हणण्यांत मला अत्युक्तीचा अंश दिसत नाहींसा होतो.
 मराठी ४ थी इयत्ता शिकल्यावर राजवाडे पुण्यास आले व इंग्रजी शिकूं लागले. १८७६ मध्ये ते पुण्यास बाबा गोखले यांच्या इंग्रजी शाळेत दाखल झाले. या शाळेत ३।४ शें मुलें होती. शाळा सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी १० वाजे पर्यंत असे. कारण शिक्षकांस दुपारी इतर व्यवसाय करण्यास मोकळीक असावी म्हणून ही योजना असे. शाळा अगदी गलिच्छ ठिकाणी असे. दमट व कोंडलेली अशी हवा असावयाची. मोकळी, खेळती हवा तेथें मिळावयाची नाहीं. पडक्या भिंती, गटारे, डांस यांमुळे प्रसन्नता मुळीं नसे; पायखानेही तेथें लागूनच; यामुळे दुर्गंधीचें माहेरघरच तेथें होतें. एकाच वर्गात अनेक मुले असत. त्या मुलांची तयारी सर्वांची सारखीच नसे. कोणी जास्त शिकलेला, कोणी कमी; कोणी हॉवर्डचे पाहेलें पुस्तक पढलेला. तर कोणी दुसरें वाचावयास शिकलेला. तरी सर्व एकाच वर्गांत. एकच मास्तर या निरनिराळ्या मुलांस नवीन धडे देई. राजवाडे म्हणतात "माझ्या बरोबरीच्या मुलांच्या तुकडीच्या वाट्यास ५।४ मिनिटे तासांतील यावयाची व त्या ५|४ मिनिटांतील अर्धे मिनिट माझ्या वाट्यास यावयाचें!"
 अशा प्रकारचे शिक्षण या शाळेत कांहीं दिवस चालले. पुढे बाबा गोखले यांचें लक्ष वकिलीच्या धंद्याकडे गेलें व ही शाळा संपली. राजवाडे मग सरकारी शाळा, मिशनस्कूल यांमध्येही कांहीं दिवस होते. प्रथम ते काशिनाथपंत नातू यांनी काढलेल्या शाळेत गेले. हे नातू मोठे विनोदी गृहस्थ होते; प्रसिद्ध वकीलांत नांव घेतले जाई. या शाळेत राजवाडे २ ऱ्या वर्गांत बसले. यानंतर वासुदेव बळवंत मुडके (बंडवाले), वामनराव भावे, लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या शाळेत राजवाडे जाऊं लागले. येथें ते ३ रे इयत्तेत शिकूं लागले १८७७ मध्यें ते चौथी इयत्ता शिकूं लागले. या सुमारास १०००।१५०० शब्द, कांहीसे व्याकरण अर्धेमुर्धे हें त्यांनी पैदा केले. १८७७, ७८, ७९ ही तीन वर्षे ते या भावे यांच्या शाळेत राहिले. या शाळेंतील वामनराव भावे यांच्याबद्दल राजवाडे यांनी आदरानें लिहिलें आहे. पुढे ही शाळा पण त्यांनी सोडली व १८८० मध्ये बोमंट यांच्या मिशन शाळेमध्ये ते दाखल झाले. ती पण शाळा कांहीं दिवसांनी त्यांनी वर्ज केली व घरीच बसले. न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झाल्यावर त्या शाळेत ते कांहीं दिवस- फक्त १५ दिवसच होते. शेवटी घरीच अभ्यास करून १८८२ च्या जानेवारी महिन्यांत खाजगी रीतीनें मॅट्रिकच्या परिक्षेस ते बसले व त्यांत उत्तीर्ण झाले. पांच सहा शाळा पाहिल्यामुळे त्यावेळच्या एकंदर शिक्षणप्रकाराचा, शिक्षकवर्गाचा त्यांना नीट अनुभव आला. अपेयपान, अभक्ष्यभक्षण, चारगटपणा. बाहेरख्यालीपणा वगैरे दुर्गुणांनी भरलेले शिक्षक या खासगी शाळांत असत.
 अर्थात् व्यसनांचे बंदे गुलाम, सुरादेवीचे कट्टे उपासक असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम करणार नीति ही उपदेशाने अंगीं मुरत नसते. तर उपदेशकर्त्यांच्या कृतीनें मनावर ठसते हा सिद्धांत आहे. विद्यार्थी उत्तम तयार होण्यास शिक्षकवर्ग स्वाभिमानी व देशप्रेमी, विद्वान् व कार्यकर, विचारवंत, आचारवंत, धर्मशील व उद्योगशील, असे असले पाहिजेत, परंतु त्यावेळेस तसे शिक्षक कोठेंच नव्हते. नाहीं म्हणावयास नवीन चिपळूणकरी शाळेत हे थोडेंफर प्रथम दिसून येई. राजवाडे लिहितात "या सुनारास विद्वत्तेने व मनोरचनेने राष्ट्रहित साधण्यास बराच लायक असा एक पुरुष सरकारी नोकरीस लाथ मारून पुण्यास आला." हा थोर पुरुष म्हणजे विष्णूशास्त्री हा होय. विष्णूशास्त्री यांचेबद्दल राजवाडे यांस फार आदर व पूज्यभाव वाटे. शास्त्रीबोवांची प्रौढ व भारदस्त मूर्ति पुण्यांत त्यांनी अनेकवेळा पाहिली होती. शास्त्रीबोवा हे परमदेशभक्त आहेत असे अनेकांच्या तोंडून त्यांनी ऐकिलें होतें. त्यांचे निबंधही त्यांनी अवलोकिले होते व वाचलेले त्यांच्या कानांवरून गेले होते.
 मॅट्रीक झाल्यावर मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये राजवाडे दाखल झाले. पहिली सहामाही त्यांना या कॉलेजमध्ये घालविली त्या वेळेस कॉलेजमध्ये शिकविणारे प्रोफेसरांची त्यांनी आपल्या लेखांत खूप टर उडविली आहे. ऑलिव्हर म्हणून एक गृहस्थ इंग्रजी शिकवी. 'Not' हा शब्द नकारार्थी आहे हें अपूर्व ज्ञानसुद्धां हे गृहस्थ कधी कधी समजून देत असत. राजवाडे त्यावेळेस नेमलेल्या इंग्रजी पुस्तकांबद्दल लिहितात 'प्रवेशपरिक्षेच्या वेळेस मी जे ग्रंथ वाचिले होते त्या मानाने हे पुस्तक केवळ पोरखेळ वाटला; आठ दहा वर्षांच्या इंग्रजी मुलांस वाचावयास ठीक आहे. घोडमुलांस अशा पुस्तकांचा उपयोग होतो. असें नाहीं.' हें पुस्तक म्हणजे सौदेकृत 'नेल्सनचें चरित्र, हें होय.
 हा गंमतीचा अभ्यासक्रम मुंबईस चालू होता. या वेळेस म्हणजे १८८८ मध्ये विष्णुशास्त्री यांच्या शोकप्रधान मृत्यूची- वार्ता सर्वत्र पसरली व राजवाडे यांस फार वाईट वाटलें. विष्णूशास्त्री यांस ते 'महात्मा' म्हणून संबोधित. त्यावेळी जें जे म्हणून स्वतःचे त्याची त्याची टर उडविण्याची जी परंपरा पडली होती, त्या परंपरेस, त्या प्रघातास ज्यानें आपल्या प्रभाव- शाली लेखणीने परागंदा केले त्या त्या पुरुषास ते महात्मा म्हणून संबोधित. स्वदेशस्थिति समजाऊन सांगणारा, स्वभाषेच वैभव वृद्धिंगत करणारा थोर पुरुष निघून गेल्यामुळे त्यांच्या तरुण व उदार मनास फार दुःख झालें. ते लिहितात 'त्यावेळीं महत्दुःख झाले. मरण हें मनुष्याची प्रकृती आहे. ही गोष्ट तोपर्यंत माझ्या अनुभवास आली नव्हती. तारुण्याच्या मुशीत जगताच्या या तीरावर स्वैर व निभ्रांत हिंडत असतां जेथून कांहीं कोणी परत आला नाहीं, त्या तीराची मला कल्पनाच नव्हती; सर्व मनुष्ये व प्राणी अमर आहेत अशी माझी अस्पष्ट भावना होती. या भावनेला शास्त्रीबोवांच्या मृत्यूनें जबर धक्का बसला. शाळेतून जातांना व येतानां आणि शहराच्या पश्चिम भागांत हिंडतानां शास्त्रीबोवांच्या मूर्तीस अनेकवार पाहिलें होतें. त्या पुरुषासंबंधाने अनेक गोष्टीचा माझ्या मनावर संस्कार झाला असल्यामुळे त्यांच्या मरणाने मला दुःख झालें.'
 पहिली सहामाही संपल्यावर दुसरी सहामाही राजवाडे कॉलेजमध्ये गेलेच नाहींत. पैशाची अडचण व इतरही कांहीं अडचणीं यांमुळे हे शक्य झालें नाहीं. ते पुण्यास आले व खासगी शिकवणीचा जुजुबी धंदा ते करूं लागले. राजवाडे यांनी एक वर्ग काढला व त्यांत १५/२० मुले येत. ३०/३५ रुपये या दोन तासांच्या वटवटीने मिळून जात. दीड दोन वर्षे त्यांनी हा धंदा चालविला. इतर काही वाचन वगैरे चाललेच होते. १८८४ मध्ये राजवाडे यांचे वडील बंधू यांस दक्षिणा फेलो ही डेक्कन कॉलेजमध्ये जागा मिळाली. राजवाडे यांनीं दुसरी टर्म डेक्कन कॉलेजमध्यें भरली व एक महिनाभर अभ्यास करून दुसऱ्या वर्षांत ते पास झाले. १८८५ मध्ये त्यांनी कॉलेजमध्ये दोन्ही टर्स भरल्या, परंतु ते परीक्षेस बसले नाहींत. सहामाही, तिमाही, नऊमाही वगैरे परीक्षांस राजवाडे बसत नसत. तेंच तेंच पुन्हा पुन्हा घोकून काय करावयाचें? वार्षिक परीक्षेत पास झाले म्हणजे झालें असें ते म्हणत. भावाकडून पैशाची मदत होऊं लागल्यावर ते १८८६-८७ मध्ये डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहांतच जाऊन राहिले. येथे राहिल्यावर त्यांनी आपला स्वच्छंद कार्यक्रम सुरू केला. लो. टिळकांप्रमाणे त्यांनी येथे प्रकृतीची फार उत्तन काळजी घेतली. भावी आयुष्यांत अत्यंत कष्टप्रद काम तीन तपें त्यांनी जें केलें त्यासाठीं वज्रप्राय कणखर शरीर असणे जरूर होतें. त्यांचा ह्या वेळचा कार्यक्रम त्यांच्यांन शब्दांत सांगितला तर फार योग्य होईल. "नियमानें पांच वाजतां पहांटेस मी उठत असे व तालमीत जाऊन दोन तास उत्तम मेहनत करीत असे. बैठका, जोर, जोडी, मलखांब व कुस्ती अशी सुमार दीड दोन हजार मेहनत रोजची होई, तो सात वाजत. नंतर शेर दीडशेर दूध पिऊन अर्धा तास कॉलेजाभोवतालील मैदानांत व झाडाखाली सहल व विश्रांति घेई. आठपासून नऊपर्यंतचा वेळ वर्तमानपत्रे वाचण्यांत जाई. पुढें एक तास नदीवर पोहणें होत असे. परत येऊन भोजन आटोपून खोलीकडे जो यावे तो नेमके साडेअकरा वाजत. नंतर अर्धा तास समानशील अशा दोन चार सद्गृहस्थांच्या समागमांत धूम्रपान आटोपून कॉलेजांतील पुस्तकालयांतून आणिलेले एखादें पुस्तक हिंडून, फिरून निजून व बसून मी चांगले वाचून मनन करीत असें. वर्गांतील शिक्षकांच्या व्याख्यानांस मी प्रायः कधी जात नसें. इतर परीक्षार्थी विद्यार्थी जे चार तास वर्गात घालवीत ते मी स्वतंत्र पुस्तकें वाचण्यांत घालवी. वाचण्याचें काम साडे-चार चारपर्यंत चालें व नंतर बंद होई. मग शादिलबोवा- जवळील होडीखान्यांत एकाद्या होडग्यांत सात वाजेतों नदीवर पांच सात मैलांचें वल्हवणें करों. तेथून परत येऊन संध्या भोजन जो आटोपावेतों साडे आठ वाजत. नंतर दहा साडे दहा वाजेतो अनेक स्वभावांच्या विद्यार्थ्यांशीं सामाजिक, राजकीय, धार्मिक व पाठशालीक विषयांवर पांच पन्नास विड्या खलास होईपर्यंत नानाप्रकारच्या गप्पा चालत. साडेदहापासून पहांटेच्या पाच वाजेपर्यंत खोलींतील दोन टेबलांवर घोंगडी पसरून त्यावर ताठ उताणें निजलें म्हणजे मला गाढ झोप येई. मेहनतीनें अंग इतकें कठीण होऊन जाई की, मऊ बिछान्यावर मला कधी झोपच येत नसे. १८८४ पासून १८९० पर्यंतच्या सात वर्षांत मी एकही दिवस कधी आजारी पडलों नाहीं."
 अशाप्रकारचा स्पृहणीय दिनक्रम या महापुरुषाचा चालला होता, ते दुपारी पुष्कळ वेळां सर्वांच्या मागून जेवावयास जात. एकतर त्यांचा आहार दांडगा असे व दुसरें शांतपणे जेवण होई. ते दूध शेळीचें पीत असत. क्रिकेट व टेनिस यांस त्यांनी कधी स्पर्शही केला नाहीं. आपले शरीर मोकळ्या हवेंत जितके अधिक ठेवता येइल तेवढे ठेवण्याची ते खबरदारी घेत. सूर्यप्रकाश व मोकळी शुद्ध मुबलक हवा ही शरीरास जितकीं मिळतील तितकीं थोडींच अशा व्यायाम पद्धतीनें राजवाडे यांनी आपली प्रकृति निकोप व सुदृढ करून घेतली व मरेपर्यंत कधी म्हणून कधींच आजारी पडले नाहींत. हीं शरीराची जोपासना चालू असतो त्यांनीं बुद्धि व मन यांची जोपासना पण एकनिष्ठपणे चालविली. १८८४-९० पर्यंत आलटून पालटून अनेक विषय त्यांनी चाळले. कोणता विषय घ्यावा हे ठरेना. गणितशास्त्र, वनस्पतिशास्त्र, मानसशास्त्र वगैरे निरनिराळ्या शास्त्रांत त्यांनी हात घातला व सर्वांची चांचणी करून ते सोडले. शेवटीं इतिहास हा विषय त्यांनी घ्यावयाचे ठरविलें व त्या दृष्टीनें ते वाचूं लागले. जरी इतिहास हा विषय घेण्याचें ठरलें तरी अवांतर वाचनाचा नाद जो लागला तो कमी झाला नव्हता. ते कॉलेजमध्ये इतिहास हा विषय घेतलेले एकमेव विद्यार्थी होते. त्यांना कॉलेजमध्ये प्रोफेसरांच्या तासांस गेलें नाहीं तरी चालेल अशी परवानगी देण्यांत आली होती. बी. ए. च्या परीक्षेत पास होण्यासाठी 'हिंदुस्थानाचा व महाराष्ट्राचा इतिहास मॅट्रिकच्यावेळीं जेवढा मी शिकलों होतों तेवढा' बस होता असे राजवाडे यांनी लिहिले आहे. यामुळें त्यांत इतर वाचन भरपूर करावयास फिकीर वाटली नाही. 'इतिहास, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीतिशास्त्र, तर्कज्ञान, तर्कशास्त्र व मानसशास्त्र यावरील प्राचीन व अर्वाचीन, अस्सल भाषान्तरित बरेच ग्रंथ मी मननपूर्वक वाचले. शिवाय वनस्पतिशास्त्र व फारशी भाषा कामापुरती मी शिकलों. कोशाच्या व व्याकरणाच्या साहाय्याने एखादा फ्रेंचग्रंथहि मी वाचीत असे. प्लेटोचें सुराज्य (रिपब्लिक) ह्याचवेळीं मी सबंध मराठीत उतरलें" असें आपलें अध्ययनवृत्त त्यांनी लिहून ठेविलें आहे. त्यांच्या दांडग्या व्यासंगास, प्रखर प्रज्ञस शांतविणारे महाविद्यालय हिंदुस्थानांत नव्हतें. ते मोठ्या खेदानें लिहितात "खरें म्हटलें असतां, ज्ञानार्जनामध्यें ज्यांचें सर्व आयुष्य गेलें, विद्येची मर्यादा वाढविण्यांत ज्यांनी तपेंच्या तपें घालविली व सर्व शास्त्रांत अपूर्व शोध करून मानवजातीला ज्यांनीं अक्षय ऋणी करून ठेविलें, अशा गुरुवर्यांनी चालावेलेली एखादी पाठशाळा त्यावेळी असावयास पाहिजे होती. म्हणजे तेथे १०/२० वर्षे राहून वरील सिद्धांताच्या अनुरोधानें म्हणजे विद्या केवळ ज्ञानार्जनाकरितां शिकावयाची या सिद्धांताच्या अनुरोधानें- विद्यार्जनाची माझी हौस, अधिकारी गुरूंच्या देखरेखीखाली मी पुरवून घेतली असती. परंतु दुदैव कीं अशी पाठशाळा व असे गुरू मला त्यावेळी मिळाले नाहींत." ४५ वर्षांपूर्वी जी रडकथा, राजवाडे यांनी गायिली तीच आजही प्रत्यक्ष आहे. एम्. ए झाला कीं झाला आचार्य. प्रोफेसर ही पदवी इतकी सोपी आहे कां? कॉलेजमध्ये शिकविणारे कांहीं प्रोफेसर जें पुस्तक शिकवावयाचें त्याचीं पानेंही वर्गांत फाडतात, इतकी शिकविण्याबद्दल त्यांची आस्था, मग त्या त्या ज्ञानप्रांतांतील ज्ञान आत्मसात् करून, त्याच्या मर्यादा वाढवू पाहणारे व वाढविणारे किती असतील हें मनाशीच ठरवावें. सर्व एकंदरीनें खेळखंडोबा झालेला आहे. ज्ञानाची टर चालली आहे. तपेंच्या तपें तीव्रतेनें अध्ययन केल्याविना गाढे पांडित्य कसें संपादन करितां येणार? परतु आमच्याकडे ज्ञान म्हणजे परसांतली भाजी झाली आहे.
 असो, राजवाड्यांचा खाक्या तर त्यांच्या छंदाप्रमाणे चालू राहिला. रात्रीं ते निरनिराळ्या विषयांवर इतर मुलांबरोबर अनेक विषयांवर चर्चाही करीत. त्यांस विड्या ओढण्याचें व्यसन मात्र लागले. ५/५० विड्या ते व इतर मंडळी सहज फस्त करीत, दुसरी गोष्ट म्हणजे सर्व व्यवहार वगैरे इंग्रजीतून चाले. राजवाडे लिहितात. "एका दुष्ट खोडीने मात्र मला अतोनात ग्रासिलें. ती खोड म्हणजे दुसरी तिसरी कांहीं नाहीं. इंग्रजी बोलण्याची व इंग्रजीत विचार करण्याची. बाराव्या वर्षापासून २६ व्या वर्षांपर्यंतच्या पंधरा वर्षांत, वाचणें, लिहिण, विचार करणें वगैरे सर्व मानसिक क्रिया मी इंग्रजीत करूं लागलों. शाळेत व कॉलेजांत प्राचीन व अर्वाचीन मराठी ग्रंथांशी शिक्षकांनी व परीक्षकांनी माझी क्षणभरही ओळख करूं दिली नाही. त्यामुळे स्वभाषेंत कांहीं प्रासादिक व नामांकित ग्रंथच नाहींत, असें इतर परीक्षार्थ्यांप्रमाणें माझेंहि मत व्हावयाला कोणतीच हरकत नव्हती. तशांत कुंटे, रानडे वगैरे विद्वान् लोकहि मोठमोठी व्याख्यानें इंग्रजीत झोडीत. कॉलेजांत तर बहुतेक सर्व व्यवहार इंग्रजीतच करूं लागलों. बंधूंना व मित्रांना पत्रे लिहावयाचीं तीं इंग्रजीत आचाऱ्याशींव व गड्यामाणसाशी बोलावयाचें तेंहि मराठीमिश्रित इंग्रजीत; डिबेटिंग सोसायटीत मोठमोठी अद्वातद्वा व्याख्यानें द्यावयाचीं तीं इंग्रजीत; देशी कपडे वापरणारी मंडळी कॉलेजांत काढिली. तिचें सर्व काम इंग्रजीत; व्यायामाचे सर्व प्रकार करावयाचे ते इंग्रजीत; सारांश सतत पंधरा वर्षे बारा आणि बारा चोवीस तास सर्व कामें मी इंग्रजींत करूं लागलों. या एवढ्या अवधीत मी मराठी बहुतेक विसरून जावयाचा; परंतु दोघा तिघा गृहस्थांनी मला ह्या विपत्तींपासून वांचविलें. विष्णुशास्त्री चिपळोणकराच्या टीकात्मक निबंधांनी इंग्रजीच्या या खग्रासापासून माझा बचाव केला. काव्येतिहास संग्रहकारांच्या ऐतिहासिक पत्रांनी स्वदेश म्हणून कांहीं आहे हे मला कळले. परशुरामपंत तात्या गोडबोले ह्यांनी छापलेल्या काव्यांनी महाराष्ट्रसारस्वताचा मला अभिमान वाटू लागला. हे तीन ग्रंथ जर माझ्या दृष्टीस न पडते. तर आज मी कुंट्यांच्या सारखी इंग्रजीत व्याख्यानें देण्यास, सुरेंद्रनाथांप्रमाणे बूटपाटलाण घालून देशाभिमानाची पत्रे काढण्यास, किवा सुधारकांप्रमाणे बायकांना झगे नेसवण्याच्या ईर्ष्येस खचित लागलो असतो. सुदैवाने ह्या देशाभिमान्यांच्या प्रयत्नाने माझी अशी विपत्ति झाली नाहीं. नाहीतर असले कांहीं चमत्कार माझ्या हातून निःसंशयं घडते! दारू पिणारे, मांस खाणारे, बूट पाटलोण घालणारे, स्वदेशाला, स्वभाषेला व स्वधर्माला तुच्छ मानणारे गांवठी साहेब त्यावेळी कॉलेजांतल्या परीक्षार्थ्यात अगदीच नव्हते असें नाहीं. परंतु त्यांचा संसर्ग उपरिनिर्दिष्ट ग्रंथकारांच्या ग्रंथांतील मतलबाने मला घडला नाही. विद्यार्थी धर्मलंड होतो की दुराचारी होतो, इकडे कॉलेजांतील शिक्षकाचें मुळींच लक्ष नसे. कॉलेजांतील युरोपीय शिक्षकाच्या मते माफक दारू पिणे, बूटपाटलोण घालणे, स्वधर्माप्रमाणें न चालणे, स्वभाषा विसरणें हीं कांहीं पापें गणिली जात नसत. तेव्हां ते ह्या गोष्टीत लक्ष घालीत नसत हें स्वाभाविक होते. गुरूंचा धाक नाहीं, पुढाऱ्यांचा कित्ता नाहीं, धर्माचा प्रतिबंध नाही, अशा स्थितीत मी पंधरा वर्षे काढिलीं. तींतून मी सुरक्षित पार पडलो त्याचें सर्व श्रेय वरील तीन ग्रंथकारांकडे आहे."
 राजवाडे यांच्या वरील लिहिण्यांत कोणास अतिशयोक्ति, विपर्यास कदाचित दिसेल; पोषाख वगैरे कांहीं कां असेना; पोषाखावर स्वदेशप्रेम व स्वधर्मप्रेम थोडेच अवलंबून आहे असें कांहीं म्हणतील; परंतु बाहेरच्या गोष्टी ह्या आंतील भावाचें दिग्दर्शन पुष्कळ वेळां करितात. बारीक सारिक गोष्टींत परकी येऊन हळुहळु नकळत आपण पूर्णपणें परकी व स्वपरंपरेस पारखे बनत चालल आहोत. "ill habits gather by unseen degrees" असे म्हणतात. अशा गोष्टीत कडवेपणा पाहिजे. साळसूदपणा उपयोगी नाहीं. भगिनी निवेदिता यांची अशी गोष्ट सांगतात की, एकदा शाळेत शिकवीत असतां Time यांस देशी शब्द त्यांस पाहिजे होता. ती शाळा बंगाली भाषा बोलणाऱ्या मुलींची होती. त्यांनी मुलींस विचारिलें. परंतु मुलींस उत्तर देतां येईना. शेवटी 'रेखा' असें एकीनें सांगितलें. त्याबरोबर निवेदिता बाई 'रेखा, रेखा' घोकीत आनंदानें निघून गेल्या. हिंदुस्थान हा देश त्यांनी आपला मानला होता व म्हणून त्यांस भारतीय भाषेची ही आस्था व गोडी. आमचा तर जन्मप्राप्त, हा देश आहे; मानीव नाहीं असें असून स्वभाषेची हेळसांड मोठमोठ्या लोकांनी का करावी! मोठमोठ्या पुस्तकांवर अभिप्रायही इंग्रजीत; ते ग्रंथलेखकांस कळले नाहीं तरी चालतील! अशी उपेक्षा कां? आपण पूर्ण स्वदेशी राहावें व परकीयाचें सर्व उत्तम आपल्या संस्कृतीत मिळवून घ्यावें. मराठी भाषेबद्दल त्या काळांत ज्यांनी लोकोत्तर अभिमान दाखविला त्यांत शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचें नांव प्रथम उच्चारिलें पाहिजे. अहर्निश १०/१२ वर्षे खपून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचंड इतिहास मराठीत लिहिला. न्या. रानडे वगैरे त्यांस हा ग्रंथ इंग्रजीत लिहून प्रसिद्ध करावयास सांगत होते. परंतु या थोर पुरुषानें उत्तर दिले "ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा शिकतील. पाश्चात्य लोक माझ्या ग्रंथाची पूजा करितील; मी परकी भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाहीं. मी कीर्तींचा हपापलेला नाहीं." चिपळूणकर, दीक्षित, राजवाडे यांसारखी भाषाभिमानी माणसें ज्यावेळेस अनेक उत्पन्न होतील, भाषाभिमानाची कडवी रजपूती कृति जेव्हा आमच्यांत उद्भूत होईल, त्यावेळेसच आमची भाषा सजेल व सुंदर होईल. कीर्ति पैसा यांची अपेक्षा ठेवून मराठी संपन्न होणार नाहा. मराठीत जें अमोल प्राचीन काव्य आहे, तें अर्थाभिलाषी कविवरांनीं विनिर्मिलें नाहीं. ज्ञानेश्वरांसारख्या वागीधरांनी आपल्या आमृतासमान ओव्या कोळशानें खांबावर लिहिल्या; दासोपंतानें निंबाचा पाला खाऊन लक्षावधि ग्रंथ लिहून ठेविला. या प्राचीन वाग्वीरांप्रमाणें निःस्वार्थ होऊन ज्यावेळी आम्ही लिहावयास लागूं त्यावेळेस मराठी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. परंतु करावयास जो तयार होईल त्याला खरी मायभाषेची माया पाहिजे; प्रेम पाहिजे; आस्था व अभिमान पाहिजे. आचार, विचार, भाषा यांत परकीयत्व स्वीकारल्यामुळे स्वजनांपासून आपण कसे दूर जात चाललों, व सुशिक्षित ही एक नवीनच जात कशी निर्माण झाली आहे हें दिसून येतें; असहकारितेपासून पुन्हां लंबकास विरुद्ध दिशा मिळू लागली आहे. सारांश राजवाडे यांनी वरील अवतरणांत जें लिहिलें आहे तें अगदी निर्विकार दृष्टीने पाहिले व दूरवर विचार करून पाहिलें तर पटेल असें वाटतें.
 निबंधमाला, नवनीत, व काव्येतिहाससंग्रह या त्रयीनें आपणांस राजवाडे दिले. निबंधमालेनें एक राजवाडे दिला एवढ्यानेंच निबंधमाला कृर्तकार्य झाली. तत्कालीन व तत्पूर्वकालीन नवसुशिक्षितांस प्राचीन इतिहास, काव्य सर्व अज्ञातच होतें. ज्यावेळेस रा. ब. माने यांनीं बखरी सारखें सुंदर हृद्य व जोरदार वाङ्मय छापावयास घेतले, त्यावेळेस मराठीचे पाणिनि दादोबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "आं, असें सुंदर वाङ्मय मराठीत आहे!" स्वदेश व स्वभाषा यांबद्दल अभिमान ज्यांनी या भावी महापुरुषाच्या हृदयांत उद्दीप्त केला ते खरोखर कृतार्थ होत.
 ज्या कॉलेजमध्ये राजवाडे शिकत होते, त्याची आजूबाजूनी स्थिति चित्तवृत्ति विषण्ण करणारी होती. ज्या लढायीनें पुण्याचे पेशव्याचें राज्य गेलें, तो लढायी येथेच झाली. तेथें हिंडत असतां पुढील आयुष्यांत पूर्वजांची स्मृति जागृत करणाऱ्या या थोर पुरुषास फार उद्विग्नता प्राप्त होई. याच पुणे शहरांत इंग्रजांचे वकील हातरुमाल बांधून पेशव्या समोर सविनय जाऊन उभे रहात; याच पुण्यांतील प्रतापी वीरांनी अटकेपर्यंत अंमल बसविला; याच पुण्यांतून हिंदुस्थानची सूत्रे खेळविली जात. परंतु काळाचा महिमा अतर्क्य! सातहजार मैलांवरचे गोरे लोक येथे येऊन आम्हांस गुलाम करून राहिले आहेत; त्यांनीं स्थापन केलेल्या शाळा कॉलेजांतून त्यांनी लिहिलेली पुस्तकें पढत आहोंत! आमचे लोक त्या रणरंगधीर पूर्वजांची पूज्य दिव्य स्मृतिही विसरून गेले व त्यांस लुटारू, दरवडेखोर, खुनी, लबाड असली शेलकीं विशेषणे पाश्चात्यांनी दिलेली खरीं मानूं लागले! हरहर! काय आमची दुर्दशा! समरचमत्कार जरी सद्यः कालांत शक्य नसले, घोड्यावर अढळ मांड ठोकून समशेर लटकावून व भाले सरसावून पुन्हा दिगंत झेंडा मिरवितां येणें सद्यःस्थितीत शक्य नसले, तरी ज्यांनी ती महनीय कामगिरी केली, त्यांस आम्ही दूषणे दिलेली ऐकावी व त्यांचीच स्वतः री ओढावी इतका आमचा अधःपात कशाने झाला? अशाप्रकारचे शेकडो कल्लोळ उडविणारे विचार राजवाडे यांच्या हृदयसमुद्रांत उसळत असत. याच क्षेत्री हिंडतां फिरतां त्यांस शहाजी, शिवाजी, रामदास, बाजी यांची स्मृति जळजळीत स्फुरली असेल. येथेच बसतां उठता आपले वैभव त्यांच्या कल्पना दृष्टोस दिसले असेल व तें दिव्य वैभव, तें यशोगान पुनरपि गावयाचें असें त्यांनी ठरविलें असेल!
 राजवाडे कॉलेजांत राहिले त्यामुळे शरीर कणखर बनलें; बुद्धि प्रगल्भ, कुशाग्र व अनेक विषयावगाहिनी बनली. १८८४ च्या शेवटी कोणत्याच परीक्षेस न बसतां ते कॉलेज सोडून गेले. पुढे १८८८ मध्ये बाहेरचा विद्यार्थी म्हणून पहिल्या बी. ए. च्या परीक्षेस ते गेले व पास झाले. ह्या परीक्षेचा सर्व अभ्यास २०/२५ दिवसांतच त्यांनी केला. पुढे १८८९ मध्ये भावे यांच्या शाळेंत ते वनस्पतिशास्त्र शिकवीत होते. एक वर्षभर हें काम करून पुनरपि १८९० मध्ये ते डेक्कन कॉलेजमध्ये रहावयास गेले. इतिहास हा विषय ऐच्छिक घेऊन ते परीक्षेस बसणार होते. हा विषय शिकविणारा कोणी शिक्षकच तेथे नसल्यामुळे वर्गांत जाण्याची अजिबात जरूर राहिली नव्हती. राजवाडे लिहितात "निव्वळ कॉलेजांतील खोलीचा, हवेचा व जवळील नदीचा उपयोग करून घेण्याकरितां मी ८० रुपये फी भरली. कॉलेजांत राहून तनु दुरुस्ती करावी, हा माझा तेथें राहण्यांत उद्देश होता. १८८९ च्या डिसेंबर महिन्यापासून ते १८९० च्या आक्टोबरपर्यंत तेथेच यथेच्छ राहिले. नंतर एक महिनाभर परीक्षेचा अभ्यास नीट कसोशीनें करण्याकरितां ते पुण्यापासून बारा कोसांवर वडगांव म्हणून एक खेडें आहे तेथें जाऊन राहिले. १८९० च्या जानेवारी महिन्यांत ते बी. ए. ची परीक्षा पास झाले. राजवाडे लिहितात "मॅटिकपासून बी. ए. पर्यंत मी कधीं नापास झालों नाहीं; १८८४ साली प्रथम मी डेक्कन कॉलेजांत गेलों, त्यावेळीं दर दोन दोन महिन्यांनी एक एक परीक्षा जर घेतली असती, तर ह्या तिन्ही परीक्षा पहिल्या सहामाहीतच मी पास झालो असतो. परंतु सहा टर्मा, सहामाही व उपान्त्य परीक्षा व मुंबईच्या फेन्या, अशा नानाप्रकारच्या खुळांत सांपडल्यामुळे १८८४ पासून १८९० पर्यंत मला व्यर्थ रखडत रहावें लागलें. ह्या रखडण्यांत इतकें मात्र झाले की, माझ्या मनाला जें योग्य वाटलें तेंच मी केले; आणि कॉलेजांतील खूळसर शिस्तीला बळी न पडतां मन व मेंदू यांना शैथिल्य व शीण येऊ न देतां, जगांत जास्त उत्साहाने काम करण्यास मी सिद्ध झाले."
 १८९० मध्ये परीक्षा बी. ए. ची झाली. मनानें व शरीरानें कर्तबगारी करावयास तयार झालेला हा वीर आतां हळूहळू आपल्या उद्दिष्ट ध्येयाकडे कसा गेला हें आतां पाहूं.



प्रकरण २ रें
इतिहास संशोधन व इतिहास मंडळ.


 राजवाडे १८९० मध्ये बी. ए. ची परीक्षा पास झाले. ते प्रथम कांहीं दिवस भावे स्कूलमध्ये शिक्षक झाले. नंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्यें ते शिक्षक म्हणून कांहीं दिवस होते. सहावी इयत्तेस Lamb's Tales हें पुस्तक राजवाडे १८९१ मध्ये शिकवीत असत. ब्राह्मण मासिक पत्रिकेच्या राजवाडे तिलांजली अंकांत श्री. काकाराव पंडित हे लिहितात 'कै. राजवाडे यांची शिकविण्याची पद्धत कांहीं विशेष होती. कोणत्याही विद्यार्थ्याने धड्यांतील आपणांस न येणारे शब्द वेबस्टरचे कोशांतूनच काढले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे. शिकवितांना प्रत्येक वाक्य प्रथमतः इंग्रजीत बोलून नंतर त्याचे बरोबर मराठी भाषांतर उच्चारावयाचें असा त्यांचा नियम असे. त्यांची ती करडी नजर, रोडकी पण कणखर शरीरयष्टी, पांढरा व स्वच्छ पोषाख आणि नेहमींच असलेली रागीट पण करारी मुद्रा हीं पाहून विद्यार्थ्यांचे मनांत त्यांनाविषयी प्रेमापेक्षां भयावाचा जास्त पगडा बसलेला असे.
 राजवाडे यांचे आयुष्य हें शाळेतील मास्तरकी करण्यांत जावयाचें नव्हतें. त्यांचे मन तेथें नीट लागेना. स्वतंत्र कार्य करण्याकरितां त्यांचा जन्म झालेला होता. १८९५ मध्ये शेवटीं त्यांनी भाषांतर हें मासिक सुरू केलें. भाषासंवर्धन करावयाचे हा त्यांचा हेतु ठरलेलच होता. मराठी मायभाषा मी वृद्धिंगत करीन हे त्यांचे ध्येय होतेच. जें कांहीं लिहावयाचें तें मराठीत आणण्यासाठी त्यांनी हें भाषांतर मासिक सुरू केलें. त्यांच्या बरोबर डेक्कन कॉलेजमध्ये शिवरामपंत परांजपे, श्री. कृ. कोल्हटकर वगैरे होते. शिवरामपंत, दिनकर त्रिंबक चांदोरकर वगैरे मंडळीनें त्यांस सहाय्य करण्याचे ठरविलें. प्लेटो याच्या रिपब्लिक या जगन्मान्य ग्रंथाचे त्यांनी कॉलेजमध्ये असतांच भाषांतर करून ठेविलें होतें; तें या भाषांतर मासिकांत राजवाडे प्रसिद्ध करू लागले. दुसऱ्याही कांहीं सुंदर ग्रंथांची भाषांतरें प्रसिद्ध झाली. मॉन्स्क्रू यांचे एस्प्रिट दि लाज या ग्रंथाचा तर्जुमा प्रसिद्ध झाला परंतु या भाषांतरार्थ त्यांची स्वतंत्र प्रतिभा जन्मलेली नव्हती. भाषांतराच्या, एकप्रकारें दुय्यम प्रकारच्या कामांत, त्यांच्या अनंत बुद्धिबलाचा व्यय व्हावयाचा नव्हता. यासाठी परमेश्वर निराळीच योजना घडवून आणीत होता.
 सन १८९५-९६ चे सुमारास रावबहादुर काशिनाथपंत साने यांचें पुणें येथें 'महाराष्ट्र इतिहासाचें महत्त्व' या विषयावर एक सुंदर व्याख्यान झालें व त्याचा सारांश केसरीत प्रसिद्ध झाला. या व्याख्यानाचा त्यावेळच्या पुण्यांतील विद्यार्थ्यांच्या मनावर फार परिणाम झाला. वाई येथील रहिवाशी श्री. काकासाहेब पंडित हे त्या वेळी पुण्यास वकिलीचा अभ्यास करण्यासाठी होते. त्यांच्या मनावर वरील व्याख्यानाचा फार परिणाम झाला व मराठ्यांच्या इतिहासाची साधने शक्य असल्यास जमवावीत असे त्यांस वाटूं लागलें.
 ज्या घरांत हे काकासाहेब राहत असत, त्या घराचे मालकानें तिसऱ्या मजल्यावरील एका भिंतीत असलेल्या अंबरांत एक जुन्या कागदांचे मोठे पेटार टाकून दिलें होतें. त्यांतील जुने कागदपत्र एकदां वाचून पहावे असे वाटून हे काकासाहेब व त्यांचे मित्र कै. रंगो वासुदेव बोपर्डीकर यांनी तें दप्तर चाळून पाहण्यास सुरुवात केली. पहिलेच पत्र हाती घेतात तो तें पत्र पानपतचे लडाईचे आधी गोविंदपंत बुंदेले यांनी लिहिलेले सांपडलें. तें पत्र पाहून या उभयतां वाचकांस किती आनंद झाला असेल हे वाचकच कल्पनेने जाणोत. पानपतच्या लढाईतील एका प्रमुख योद्ध्याचें हस्तलिखित पत्र पाहून किती आश्चर्य व धन्यता त्यांस वाटली असेल! सर्व दप्तर चाळून महत्वाचे कागद त्यांनी बाजूस काढले. याच सुमारास प्रो. आबासाहेब काथवटे वाईस गेले होते. त्यांस ही वार्ता या उभयतांनी हर्षभराने निवेदन केली. ते सर्व कागद समक्ष पाहून ते महत्त्वाचे कागद रा. ब. साने किंवा विसुभाऊ राजवाडे यांजकडे पाठविण्याची त्यांनी शिफारस केली. आबासाहेब पुण्यास गेले व त्यांनी ती वार्ता राजवाडे यांस सांगितली; व मग काय! त्या निरलस व साक्षेपी पुरुषानें एक क्षणही वायां दवडला नाहीं. पानिपतच्या लढाई संबंधीची पत्रे- केवढा मोटा लाभ असें त्यांस झाले. त्याच रात्रीं राजवाडे पुण्याहून वाईस जाण्यास निघाले व जाऊन तें दप्तर पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. कांहींएक विश्रांति न घेतां एकसा रखे सर्व कागद अथपासून इतिपर्यंत वाचावयाचे, या प्रमाणे त्यांनी काम केले. श्रमाची त्यांस पर्वा नसे. श्रमांसाठीच तर त्यांनी शरीर तयार केलें होतें. दोन महिन्यांत सर्वं दप्तर तपासून इतिहासासंबंधी सर्व कागद घेऊन ते पुण्यास रवाना झाले. तेथे श्रीविठ्ठल छापखान्यांत ते कागदपत्र छापण्यास सुरवात झाली. परंतु दुर्दैवाने हा श्रीविठ्ठल छापखाना जळून गेला. हा विठ्ठल छापखाना फडके वाड्यांत होता. भाषांतर मासिकाचें सर्व संपादित कार्य खाक झाले. याच सुमारास त्यांची भार्या पण मरण पावली. संसाराचा पाश तुटला व राष्ट्रप्रपंच सुधारावयास हा महापुरुष तयार झाला.
 पानिपतच्या लढाईसंबंधाचे सर्व कागद घेऊन ते वाईस आले. पुन्हां सर्व बालबाधीत लिहून त्याचा ते अभ्यास करूं लागले. त्या पत्रांशी त्यांची तन्मयता पूर्णपणें झालेली होती. त्यांस खाण्यापिण्याची सुद्धां आठवण नसे. पानिपतच्या प्रचंड रणसंग्रहाची साग्र सुसंगत हकिगत जमविण्यांत ते दंग झाले. सर्व कार्य कारण भाव त्यांनी जमविले. रात्री, दिवसा, पहांटे, सायंकाळी ज्या ज्या वेळी पहावें, त्या त्या वेळी राजवाडे त्या दप्तराचा अभ्यास करीत आहेत असेंच दिसे. झोंपबीप सर्व चट पळून गेलें. काम करिता करितां जरा दमले असे वाटले ह्मणजे तेथेच डोके टेकून १०।१५ मिनिटें झोंपावयाचे; परंतु फिरून जागे होऊन कागदपत्र वाचू लागावयाचे. विठ्ठलाच्या ध्यानानें तुकोबादिकांची तहान भूक जशी हरपे तसेच या महापुरुषाचें झालें. केवळ जगण्याकरितां म्हणूनच पोटांत ते चार घांस कोंबीत व अगदी डोळे उघडत नाहीसे झाले म्हणजेच डोके टेंकीत. यावेळचीच आम्ही एक आख्यायिका आमच्या लहानपणी ऐकिली होती. त्यांस कोणी तरी म्हणाले "अहो, असे अश्रांत काम करून लौकर मरून जाल" त्यावर ते संतापून म्हणाले "काम करून मनुष्य मरत नाही; आळसानें लौकर मरतो; माझ्या आधी तुम्हास मीच पोंचवनि!!" राजवाडे यांनी असा हा नीट अभ्यास करून आपला हा पहिला खंड प्रसिद्ध केला. त्यांची या खंडास १२७ पानांची द्वादश प्रकरणात्मक अद्वितीय प्रस्तावना आहे. १८८८ पासूनच त्यांनी या मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासास पद्धतशीर आरंभ केला होता. या १० वर्षांच्या श्रमाचे फळ म्हणजे ही प्रस्तावना होय.
 मोदवृत्त छापखान्यांत हा प्रथम खंड प्रसिद्ध झाला. ह्या खंडाने थोर इतिहास तत्त्वविवेचक म्हणून राजवाड्यांची सर्वत्र कीर्ति झाली. सर्वजण ही प्रस्तावना पाहून दिपून गेले. जोरदार भाषा, समपर्क सिद्धांत, इतिहासतत्त्वविवेचनाचें गाढें ज्ञान हें सर्व पाहून महाराष्ट्रीय विद्वान् लोक चकित झाले. ज्ञान- कोशकार विद्यासेवकांत लिहितात "खरोखर पाहतां साहित्य-शोधन, बारीक शोध, आणि इतिहास- विकासविषयक विचार या दृष्टीनी पाहतां अर्वाचीन इतिहासाच्या क्षेत्रांत राजवाडे यांच्या पहिल्या खंडाच्या योग्यतेचा दुसरा ग्रंथ गेल्या ५० वर्षांत हिंदुस्थानांत झालाच नाहीं. या ग्रंथामुळे त्यांस इतिहास संशोधक हें नांव मिळालें तें कायमचें टिकले." या ग्रंथाची प्रस्तावना इतकी गहन व गंभीर आहे की, ती प्रथम वाचतांना वाचक गोंधळून जातो. प्रसिद्ध रियासतकार सरदेसाई म्हणाले 'ही प्रस्तावना मी सात वेळा वाचली, तेव्हां कोठें मला त्यांतील म्हणणे सर्व यथार्थपणे समजलें.' याच प्रस्तावनेंत इतिहासाचे आत्मिक व भौतिक विवेचन म्हणजे काय हे त्यांनी विशद केले आहे. महाराष्ट्र धर्म ह्मणजे काय याची फोड याच प्रस्तावनेत त्यांनी प्रथम केली व मागून तत्संबंधी अनेक ठिकाणी उहापोह केला. इतिहासाचे क्षेत्र किती विस्तृत आहे, इतिहास सर्वांगीण होणें म्हणजे कसा करावा, किती गोष्टींचा त्यांत अंतर्भाव होतो हें या प्रस्तावनेत त्यांनी सांगितलें आहे. हे सर्व सांगून मग या खंडांत प्रसिद्ध केलेल्या पत्रांच्या अनुरोधाने त्यांनी पानपतच्या लढाईसंबंधी सुंदर खोल विवेचन केलें आहे. पानिपतच्या लढाईत पराभव होण्यासंबंधींची १८ कारणें जी आजपर्यंत इतरांनीं कल्पिलीं तीं मांडून मग कागदपत्राच्या आधारें त्या मुद्यांचे त्यांनी सप्रमाण व बिनतोड खंडन केले आहे. लढाईच्या खऱ्या यशापयशाची कारणे म्हणजे मल्हारराव होळकर यांची कुचराई व द्रोह, तसेंच गोविंदपंत बुंदेला यांची कार्यासंबंधीची उदासीनता ही मुख्य होत असे त्यांनी दाखविले आहे. या तात्कालीन कारणांशिवाय मराठ्यांच्या राज्य प्रसाराबरोबर उदार विचार प्रसाराचे रामदासी कार्य कोणी केलें नाहीं. यामुळे नवीन मिळविलेल्या साम्राज्यांतील जनतेची मनोगतें हातीं घेता आली नाहीत; हें महत्त्वाचें अपजयाचें कारण आहे. मराठ्यांनी साधी राहणी सोडली नाहीं. परंतु उच्च विचार सरणी व तिचा प्रसार हें सोडले. मराठे अर्बुज व धिप्पाड अफगाणासमोर लढाईस टिकत नव्हतें वगैरे कारणांचा राजवाडे यांनी नुसता धुव्वा उडविला आहे. रशिया बरोबर जपानी लोकांची जी लढाई झाली तींत प्रचंडकाय रशियनांचा लहान जपानी वीरांनींच नक्षा उतरला व जगास चीत केले. देह केवढा कां असेना, देहांतील देशभक्तीची ज्योत दिव्य असली म्हणजे झालें. पानिपतच्या लढाईसंबंधी त्यावेळच्या उपलब्ध तुटक साधनांच्या जोरावर राजवाडे यांनीं जे सिद्धांत प्रस्थापित केले, ते आजहि बहुतेक अबाधित आहेत, या प्रमाणे हा अलौकिक पहिला खंड प्रसिद्ध झाला व राजवाडे यांची कीर्ति अक्षय्य उभारली गेली.
 या नंतर आणखी दप्तरें शोधण्याच्या नादास ते लागले. आता तें त्यांचें पवित्र कार्यच झालें. प्रयत्न केला तर सर्व मराठ्यांचा व पर्यायानें हिंदुस्थानचा इतिहास तयार करता येईल असें त्यांस वाटू लागलें. मेणवली येथील दप्तराचा शोध लागला. एके दिवशी राजवाडे एकटेच मेणवलीस जाऊन आले. परंतु त्यांस दप्तर दाखविण्यास हरकती घेण्यांत आल्यामुळे संतप्त झाले. शेवटी एकदांचे दप्तर पाहण्याची त्यास परवानगी मिळाली व त्यांचे काम सुरू झाले. या ठिकाणीं राजवाडे यांच्या श्रम सातत्याची व उद्योगाची पराकाष्ठा झाली. पहांटे पांच वाजतां ते उठत. प्रातर्विधी आटोपून जे कामास लागत ते मध्यंतरीचा वाड्यांत जेवणास वेळ लागेल तेवढाच खर्च करून, कोणाशीही न बोलतां रात्री १०|११ वाजेपावतों दप्तर पहाणीचे काम करीत. मेणवली दप्तराचें काम चालू असतां 'मी १०० वर्षे जगलों व हें मेणवली दप्तर प्रकाशनाचे काम सुरू केलें, तर माझें सर्व आयुष्य खर्च झाले तरी हे काम तडीस जाणार नाहीं' असे उद्गार काढीत.
 त्या दप्तरांतील आनंदीबाई, राघोबादादा, सखारामबापू, निजाम अल्ली वगैरे इतिहासप्रसिद्ध व्यक्तीसंबंधीं दप्तरात उपलब्ध असलेले कागद निरनिराळे बांधण्यास त्यांनी ८० रुपये खर्च करून कापड विकत घेतलें व सर्व रुमालावर निरनिराळ्या व्यक्तींची नांवें घालून व्यवस्थित दप्तर लावून ठेविले. यांत नाना नेहमीं उपयोगांत आणीत असत ते नकाशे त्यांनी एका निराळ्याच दप्तरांत बांधून ठेविले होते. त्यांतील एक दोन नकाशे गळवठले असल्याचे आढळल्यावरून राजवाड्यांनी चौकशीस सुरुवात केली. परंतु राजवाडे यांनीच ते चोरले असा मालकानें आरोप घेतला. स्वाभिमानी व निःस्पृह राजवाड्यांस ही गोष्ट कशी सहन होणार! अनंतश्रम करून यांचीं दप्तरे तपासा व परत ही दक्षिणा! राष्ट्राचा इतिहास तयार करूं पाहणाऱ्या पुरुषाची अशी ही पूजा! त्यांनी मेणवली दप्तराचा नाद सोडून दिला. ज्या ज्या वेळेस त्यांस त्या दप्तराची आठवण येई. त्या त्या वेळी त्यांचे मन उद्वेगानें भरून येई. पुढे नाना फडणीसाचे महत्त्वाचे प्रचंड दप्तर श्रीमंत शेट पुरुषोत्तम विश्राम मावजी व पारसनीस यांचे हातीं गेलें.
 याच सुमारास पारसनीस यांनी ब्रह्मेद्रस्वामीचें चरित्र व पत्रव्यवहार प्रसिद्ध केला. या खंडांत पारसनीस यांनी प्रथम १०० पानांत ब्रह्मेंद्राचें जें चरित्र देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांत ब्रह्मेद्रांस त्यांनीं रामदासांच्या पायरीस नेऊन बसविलें आहे. फार थोर जनपदहितकर्ता व सल्लागार ह्मणून त्याची महती त्यांनीं त्यांत गायिली आहे. परंतु ज्या पत्रांवरून हें चरित्र रचिलें त्यांत ब्रह्में द्राचें चरित्र निर्विकारदृष्टीने पाहिलें तर खरोखर निराळें दिसतें. राजवाडे यांनीं ब्रह्मेंद्रासंबंधी अल्पच पत्रे मिळवून प्रसिद्ध केली व या तिसऱ्या भागांत प्रस्तावनेत त्यांनी ब्रह्मेद्रांचे त्यांच्या दृष्टीनें खरें स्वरूप दाखवून दिलें. या भागाची ही प्रस्तावना अशीच फार मार्मिक आहे. ब्रह्मेंद्र स्वामी हा कलागती लाविणारा, भांडणें लावणारा, सावकारी वृत्तीचा एक सामान्य माणूस होता व राष्ट्राचे नुकसान करण्यास मात्र कारणीभूत झाला, असें राजवाडे यांनी आपले मत स्थापिलें. या प्रस्तावनेत ते एके ठिकाणीं लिहितात "राष्ट्रांतील पुढारी व नेत्या पुरुषांची दानत धुतल्या तांदळासारखी असेल तरच कल्याण होतें." उघडच आहे "महाजनो येन गतः स पंथाः" समाजांतील नेते, त्यांचे गुरु जर ब्रह्मेंद्रासारखे चुगलखोर निघाले तर इतरांनीं त्यांचेच अनुकरण केलें तर त्यांत नवल काय?
 राजवाडे यांची ही प्रस्तावना प्रसिद्ध झाल्यावर विविधज्ञानविस्तारांत कित्येक महिने खडाजंगी चालली होती. राजवाडे यांचें लिहिणें जरी जरा जास्त दिसले, तरी तें यथार्थ वाटतें, ब्रह्मेंद्रास सिद्धी वगैरे असेल, परंतु विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणें सिद्धीच्या मार्गानें मनुष्य एकादे वेळेस अवनतीस जातो, चमत्कार करून मोठेपणा मिरवावा असें त्यास वाटूं लागतें. त्याच मासल्याचा ब्रह्मेंद्र असावा असें वाटतें. त्याच्या पत्रांत काहींना कांहीं तरी पैसे, खाद्य पेयें यांच्या शिवाय शब्द दिसत नाहीं. असला घृत- मधु सेवन करणारा व याचे पैसे घेऊन त्यास देणारा संन्यासी राष्ट्रकार्यधुरंधर रामदासांच्या पंक्तीस कोण बसवील? सावकारांच्या दारांत कपाळ छिनत चालले असले उद्धार निराश होऊन तो रणपंडित अचाट कर्तृत्वशाली बाजीराव काढतो व ब्रम्हेंद्र त्यास स्वतःच्या कर्जाचा तगादा लावतो. वाहवारे गुरु! असो. हे मतभेदाचे प्रश्न आहेत. परंतु ब्रम्हेंद्राच्या पत्रांवरून तरी ते रामदासांच्या पासंगातही पुरणार नाहींत अशी विचारशील मनाची खात्री होते.
 अशी पत्रे जमा होत होती; त्यांत ओझर्डेकर पिसाळ देशमुख यांचे दप्तर मिळण्याचा संभव दिसूं लागला. कांहीं अस्सल कागद मिळालेही. हें दप्तर औरंगजेब याने दक्षिणेकडे स्वारी केली त्यावेळचे असून त्या काळच्या इतिहासावर बराच प्रकाश पाडणारे आहे. हें घराणें सुप्रसिद्ध सूर्याजी पिसाळ देशमुख यांचें असून त्यांचेशी झालेला बादशहाचा पत्रव्यवहार या दप्तरांत आहे. सूर्याजी हा बादशहास मिळाल्यावर त्याने स्वतःचे जातभाई जे मराठे त्यांस गनीम असें पत्रांत लिहिलेले राजवाडे यांस दिसून आले, तेव्हां राजवाडे यांस संताप आला. स्वजनद्रोहाचे भयंकर पातक करून पुन्हा त्यांस शिव्या देणें म्हणजे काय असें त्यांस वाटले. राजवाडे यांनी हीं पत्रे ग्रंथमालेत प्रसिद्ध करितांना एक टीप लिहून 'सूर्याजी' हा राजद्रोही होता. असें प्रसिद्ध केलें. ही गोष्ट या घराण्यांतील मंडळीस कळल्यावर त्यांनी राजवाडे यांस दप्तर देण्याचें साफ नाकारिलें. ते म्हणत "हल्लींचे गायकवाड, शिंदे, होळकर, हे इंग्रजांशी सलोख्यानें वागून त्यांच्या हितांत समरस होतात, तरी ते राष्ट्रद्रोही ठरत नाहींत, मग त्यावेळच्या असलेल्या सार्वभौम सत्तेशीं सूर्याजी पिसाळ समरस झाला तर तो राष्ट्रद्रोही कसा?" परंतु राजवाडे यांनी आपले म्हणणे सोडले नाही व हे दप्तर हाती येण्याचा मार्ग खुंटला.
 वाई प्रांतांत इतिहासासंबंधी कागदपत्रे शोधीत असतां त्यांम जुनी काव्ये वगैरेही सांपडत. जुनी ज्ञानेश्वरी त्यांस सांपडली. दासोपंताचे एक बाड सांपडले दासोपंताचे काव्य छापण्यासाठी महाराष्ट्र सारस्वत म्हणून एक मासिक सुरू झाले. ते कांही दिवस चालू होते.
 एकदा हे संशोधनाचे काम महत्त्वाचे म्हणून पटल्यावर राजवाडे यांनी सर्व जीवित त्यास वहावयाचे ठरविले. ठिकठिकाणी ते वणवण हिंडले. काशीपासून रामेश्वरपर्यंत जेथे जेथे म्हणून कागदाचा चिटोरा मिळण्याचा संभव, तेथे तेथे ते हिंडले. ते बलुचिस्थान व अफगाणिस्थान इकडेही गेले होते. कोठे जाण्याचे त्यांनी बाकी ठेवले नाहीं. त्याप्रमाणे सर्व ऐतिहासिक स्थळे, किल्लेकोट, गुहा, दऱ्या, राजवाडे, शिलालेख, दर्गे, लेणी सर्व त्यांनी नीट पाहिले. सर्व महाराष्ट्र त्यांच्या डोळ्यासमोर उभा असे. कधी कधी या स्थानानिरीक्षणाच्या नादाने त्यांच्यावर भयंकर संकटें ही ओढवत, परंतु दैव- साहाय्यानें ते यांतून सुरक्षित बाहेर पडले. एकदां खांदेरी उंदेरी हे मुंबई जवळील समुद्रांतील ठिकाण नीट पहाण्यासाठी म्हणून मुंबईस ते कुलाबादांडी जवळ ओहटी होती, तेव्हां गेले व सर्व प्रदेश नीट न्याहाळून पहात होते. रात्र होत आली व भरती लागण्याची वेळ आहे, याकडे त्यांचे लक्षच नव्हतें. पहारेकरी म्हणाला 'येथे रात्रीचे राहावयाचें नाहीं.' शेवटी पाण्यांतून पोहत जावयाचे त्यांनी ठरविले. त्यांच्या बरोबर एक मुसलमान खलाशी येण्यास तयार झाला, परंतु मार्गात त्या भरतीत त्या मुसलमानानें चकविलें. मुंबईस त्यावेळी हिंदुमुसलमानां दंगे चालू होते. त्या मुसलमानानें तर हातावर तुरी दिल्या. समुद्रांत लाटांशी दोन हात खेळत हा पठ्या सारखा पुढे येत होता. परंतु कोठे जातो हे कळेना. इतक्यांत त्यांस एक अंधुक दिवा दिसला. त्या दिव्याच्या आधाराने ते चालले. एक कोळी जाळे पसरून मासे पकडीत होता. राजवाडे खूप मोठ्याने ओरडले. कोणी तरी पाण्यांत पोहून येण्याची धडपड करीत आहे हे त्या कोळ्याने ताडले व त्याने आपले जाळे खूप दूरवर फेकले. त्या जाळ्याच्या आधाराने राजवाडे किनाऱ्यावर आले. त्या कोळ्याने त्यांस घरी नेऊन पोचविले. राजवाडे यांनी त्यास चांगले बक्षीस दिले हे सांगण्याची जरुरी नाही. सुदैव महाराष्ट्राचे व भरतवर्षाचे की, त्या काळाच्या जबड्यांतून हा थोर पुरुष बचावला. अशाप्रकारे सर्व जागा त्यांनी डोळ्यांखालून घातल्या. पुण्याची माहिती तर त्यांच्या इतकी कोणासच नव्हती. कोणत्या ठिकाणी कोण होते, काय होते सर्व ते सांगत. ते कोकण प्रांतीही गेले होते व तिकडेही त्यांनी संशोधन केलें. कोंकण प्रांतांतील लोकांसंबंधी ते लिहितात "कोंकणांतील ब्राम्हण, मराठे, भंडारी वगैरे लोक मोठे चलाख, उद्योगी, शीघ्रबुद्धि, धाडसी व श्रमसाहस करणारे असलेले मला दिसले. ह्यांच्यांत मध्यम व उच्च शिक्षणाचा प्रसार झाल्यास एकंदर महाराष्ट्रांतील समाजाची प्रगति जास्त वेगाने होईल, असा माझा ग्रह झाला. ह्या लोकांत Naval Architecture चें एखादें स्कूल व उच्च शिक्षणार्थ एखादें तरी सर्वसाधनसंपन्न कॉलेज स्थापिल्यास, येथून धाडसी व सुशिक्षित नावाडी व कुशाग्र विद्वान् निपजण्याचा संभव आहे." अशाप्रकारें जेथें जातील तेथे सूक्ष्म बुद्धीनें सर्व पहात. पत्रें वगैरे मिळविण्यास त्यांस कशी मारामार पडे. याचे त्यांनीच आपल्या एका खंडाच्या प्रस्तावनेत वर्णन केले आहे. कनक व कांता यांस जिंकून, मानापमानाचें गांठोडें बांधून ठेवून, आशेस फार सैल न सोडतां, सतराशें खेटे घालावयास लागले तरी तयार असणें वगैरे गोष्टी संशोधकास पाहिजेत. एखादे वेळी उन्हातान्हातून जावें व पत्रे दाखवू नये. असेही होईल असे ते सांगत. कारण स्वतः त्यांस कऱ्हाड मुक्कामी असतां असे कटु अनुभव आले होते. दप्तरें झाडून साफ करावयाची, धुळीनें नाकपुड्या भरून जावयाच्या; कोळिष्टकांनी डोकें भरून जावयाचें; या सर्व धुळवडीस तयार असले पाहिजे, तर पत्रलाभ होईल असे ते म्हणत. पुन्हा कधीं कधीं पत्रें मिळत त्यांचे गठ्ठे वाळूनें खाल्लेले अगर पावसाने एकत्र झालेले असे असावयाचे. सातव्या खंडाचे संपादक आपल्या प्रस्तावनेत लिहितात. "हीं इतिहासाची साधनें अश्रांत परिश्रमानें कधीं उकिरड्यांतून तर कधीं उकिरडे वजा झालेल्या जुन्या वाड्यातील तळघरांतून अथवा कधीही वापरांत नसलेल्या तिसऱ्या, चवथ्या मजल्याच्या माळ्यावरून- उन्हाळ्यांतील कडक ऊन, पावसाळ्यांतील पाऊस व हिंवाळ्यांतील थंडीचे कडके खाऊन, कडकून, भिजून आणि फिरून आकर्षून- केर कचरा व वाळवी यांच्या अखंड मैत्रीत 'कालोह्यहं निरवधिर्विपुलाच पृथ्वी" या भवभूतीच्या उक्तीवर विश्वास टाकून बसलेलीं अशीं रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे बी. ए. यांसारखे पदवीधर उजेडांत आगीत आहेत; त्यांना अभ्यंग स्नाने घालीत आहेत; त्यांचे रोगग्रस्त भाग प्रसंगी कळकळीच्या मवाळीनें सुसह्य होणाऱ्या शत्रकारांनी कापून काढून निराळे करीत आहेत; कित्येक ठिकाणीं मलमें लावीत आहेत; तर कित्येक ठिकाणी नवे अवयवही कृत्रिम तऱ्हेने बनवून चिकटवीत आहे व जुन्यांस रजा देत आहेत. ह्या सर्व गोष्टी केवळ कवि-कल्पना वाटण्याचा पुष्कळ संभव आहे, परंतु ज्यांनी हे पत्रांचे गठ्ठे स्वतां पाहिले आहेत, त्यांस तसें वाटण्याचे कारण नाहीं. तीन- चार पुस्तकें वाळवीनें इतकी खाल्ली आहेत कीं, त्या वाळवीच्या किड्यांच्या मृत शरीराची माती त्या पुस्तकांत भिनून एकंदर पुस्तकाची माती- कां? दगडी पाटीच बनली आहे. अशा स्थितीत असलेलीं हीं पुस्तकें फिरून बोलकी करावयास प्रथम त्यांस युक्तीनें वाफारा द्यावा लागतो. हा वाफारा देतांच त्या प्रस्ताराचे पापुद्रे कांहींसे सुटे होतात. ते तसे सुटे झाल्यावर लगेच गर्भाशयांतील शस्त्रक्रियेच्या प्रसंगीं जितक्या हलक्या हातानें आणि काळजीपूर्वक काम करावें लागतें, त्यापेक्षांही अधिक हलक्या हाताने आणि कळकळीनें त्या प्रस्तरप्राय पुस्तकाचें एक एक पृष्ठ सोडवावें लागतें. अशीं ही सोडविलेलीं पृष्ठे फिरून चिकटू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये एक एक टिप कागदाचे किंवा साध्याही कागदाचें पृष्ठ घालून ठेवावें लागतें. इतकें करूनही हीं पृष्ठे आपले सर्व हृद्गत बोलून दाखविण्यास समर्थ होत नाहींत. इतकेंच नव्हे, तर कित्येक अगदी निरक्षर म्हणजे मुकीं झालेलीच जेव्हां आढळतात, तेव्हां मनाला किती उदासवाणे वाटत असेल, याची कल्पनाच करणें बरें" याच प्रस्तावनेत द्रव्यसाहाय्य करण्याबद्दल सर्व जनतेस मोठी कळवळ्याची विनंती केली आहे. या विनंतीप्रमाणे काहीं साहाय्य मिळाले. चिपळूण येथील एका गृहस्थाने मुद्दाम चार आणे या कार्यास पाठविले होते. परंतु पत्रे ज्या मानाने मिळत गेली त्या मानाने प्रकाशन झाले नाहीं. मराठ्यांच्या इतिहासांची साधने या नांवाने त्यांनी २२ खंड प्रसिद्ध केले. तरीसुद्धां ५० हजार पत्रे त्यांच्या जवळ राहिलींच हे सर्व काम राजे महाराजे, सरदार दरकदार यांच्या मदतीशिवाय कसे व्हावे? राजवाडे संतापून अपल्या प्रस्तावनेत एक ठिकाणी लिहितात 'साधने प्रकाशण्यासंबंधानें एक चमत्कार आज कित्येक वर्षे मी निमूटपणे पाहात आहे; तो असा की, शिंदे, होळकर, गायकवाड, आंग्रे, पटवर्धन, विंचूरकर, पवार, राजेबहाद्दर, कोल्हापूरकर, तंजावरकर, फडणीस, प्रतिनिधी, फलटणकर, भोरकर, जतकर, हैद्रबादकर, जयपूरकर, जोधपूरकर, सागरकर व इतर लहान मोठे संस्थानिक, जहागिरदार, इनामदार, देवस्थानवाले, व पूर्वीचे मुत्सद्दी हे अद्यापपर्यंत काय करीत आहेत? त्यांची दप्तरे किंवा त्याच्या संबंधाचे कागदपत्र आमच्या सारख्या भिकारड्यांनी शोधण्याचा व छापण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यासारख्या श्रीमंतांनी अगदीच उदासीन व निद्रिस्थ असावें, हा कोठला न्याय? काय, त्यांचे पूर्वज त्यांचे कोणी नव्हत? पूर्वजांनी संपादिलेल्या जहागिरी व राज्ये भोगण्यास राजी आणि त्यांचे पराक्रम व इतिहास जाणण्यास गैरराजी, हा न्याय पृथ्वीवर इतर कोठेही पहावयास मिळावयाचा नाहीं. वासुदेव शास्त्री खऱ्यांनीं आपले घरदार विकून पटवर्धनी दप्तर छापावे आणि मिरजकर, सांगलीकर, जमखिंडीकर ह्यांनी खुशाल झोपा काढाव्या. शिवाजी महाराज, दत्ताजी गायकवाड, परशुराम भाऊ पटवर्धन हे आम्हां संशोधकांचे आजे पणजे आहेत आणि संस्थानिकाचे कोणी नाहीत, असेच म्हणावयाची पाळी आली. संस्थानिकांची व इनामदारांची आपल्या प्रत्यक्ष पूर्वजांसंबंधाने केवढी ही विस्मृति! केवढा हा अपराध! ही भरतभूमि पितृपूजेविषयी प्रख्यात आहे. तीत प्रस्तुत काळी पितरांची अशी बोळवण व्हावीना? असो. राजे निजले आहेत, जहागिरदार डुलक्या घेत आहेत, आणि इनामदार झोपा काढीत आहेत ते जागे होईपर्यंत, जागे झालेले मध्यम स्थितींतील जे आपण, त्यांनी राष्ट्राच्या या पितरांचे स्मरण कायम ठेविलें पाहिजे. आपले सामर्थ्य अद्यापि जुजबी आहे, तथापि ह्या पुण्य कर्माप्रीत्यर्थ ते खर्चिलें पाहिजे.'
 राजवाडे यांचे पत्रे वगैरे प्रसिद्ध करण्याचे काम कै. विजापुरकर यांची ग्रंथमाला करीत होती. त्याच्या मार्मिक व मुद्देसूद प्रस्तावना याच ग्रंथमालेतून प्रसिद्ध झाल्या व त्यांच्यावर वाचकाच्या उड्या पडत. विजापूरकर व राजवाडे दोघे एकमेकांस साहाय्य करते झाले. विजापूरकरांस राजवाड्यांचे कर्तृत्व कळले होते व त्यांच्या स्वभावाशी ते नीट जमवून घेत. परंतु पुढे विजापूरकर कैदेत गेले. त्यांची मासिके बुडाली; सरस्वतिमंदिर हें द्रव्याभावी बंद पडले. पारसनीस यांचे इतिहास संग्रह चालले होते; परंतु राजवाडे व पारसनीस यांचे फारसे सख्य नसे. तेव्हा आपली टांचणें, टिपणें प्रसिद्ध करण्यास एखादें मंडळ काढावें असें ठरलें. संघटित प्रयत्न व्हावे असें त्याच्या मनानें घेतले. शके १८२७ मध्ये सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेत आरंभी ही इतिहास संशोधक मंडळाची आवश्यकता प्रथम त्यांनी पुढें मांडली. नंतर राष्ट्रोदयांत त्यांनीं पुनरपि ही कल्पना जाहीर केली.
 आपल्या कल्पनेचा नीट पुरस्कार केला जात नाहीं याचे त्यांस वाईट वाटलें. एक दिवस रात्री पांढरी घोंगडी पांघरून व ढोपरापर्यंत लहानशी धाबळी नेसलेले असे राजवाडे सरदार तात्यासाहेब मेहेंदळे यांचेकडे आले व म्हणाले "हें इतिहासाचें काम आतां मरतें; तेव्हां तुम्ही त्यास कांहीं द्रव्य खर्चतां का व कांहीं मेहनत करतां का?" त्यादिवशीं कांहीं चर्चा झाली. खरे, पारसनीस, भावे, देव वगैरे संशोधन चालवीत होते. त्यावेळेस पुण्यास राजकारण व सामाजिक सुधारणा यांमुळे पक्षोपपक्षांची बजबजपुरी माजली होती. यामुळें या पंथहीन कामांत कोणी लक्ष देईना. शेवटी या सर्व दिरंगाईस राजवाडे कंटाळले व ते मेहेंदळे यांस म्हणाले "आज आपण दोघां मिळूनच सभा स्थापन झाल्याचें जाहीर करूं या. आपल्या दोघांचा एक विचार होण्यास इतके दिवस लागले तर सर्वांचा एकसूत्री विचार होण्यास किती काळ लागावा?" गणेश व्यंकटेश जोशी, गणपतराव जोशी, मेहेंदळे, राजवाडे, व नातू अशी पहिल्या वेळची, दिवशींची सभासद मंडळी. गुरुपुष्य नक्षत्र योग असा पवित्र दिवस पाहून मंडळ स्थापन झाले. त्या दिवशी 'कर्तरित्रय' हा निबंध राजवाडे यांनीं वाचला. मंडळ स्थापन झाले. सभासदही वाढू लागले. व मंडळाचे काम जोराने सुरू झालें. शके १८३५ मध्ये प्रथम संमेलन झाले व त्यांत महत्त्वाचे ठराव पसार करण्यांत आले. यावेळचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध इतिहास संशोधक व प्रकाशक रा. ब. काशिनाथ नारायण साने यांस देण्यांत आलें होतें. त्यांनी त्या काळपर्यंत झालेल्या सर्व संशोधनाचा आढावा घेतला व "झालेले काम विस्कळित झाले; आतां सुसंघटित काम करणें या मंडळामार्फत होईल तें स्पृहणीय आहे" म्हणून सांगितले.
 या सभेत रा. देव यांनी वर्गणी जमविण्यासंबंधीचा ठराव मांडला. संशोधकास द्रव्यसाहाय्य करण्यासाठी हें द्रव्य विनियोगांत आणावयाचें हातें. या ठरावावर राजवाडे यांनी पुढील भाषण केलें. रा. कीर्तने यांची बखरीवरील टीका प्रसिद्ध झाल्यावर विविधज्ञानविस्तारांतून दोन बखरी प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर आपले सन्माननीय अध्यक्ष यांनी कोणापासूनही कसल्याहि मदतीची अपेक्षा न करितां ४०।४२ बखरी छापल्या. त्यानंतर मिरजेचे रा. खरे आले. त्यांनी आपले घरदार विकून पटवर्धनी दप्तर छापण्याचा स्तुत्य उद्योग सुरू केला. रा. ब. पारसनीस हे आपला संसार करून हें कार्य करीत आहेत. मीहि माझ्या मित्रांच्या मदतीनें वर्षादोनवर्षांनी एखादा खंड काढितों. परंतु हे सर्व प्रयत्न सर्वांशी तुटक झाले व या कार्यात आम्हांस त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या अशा कोणाहि मोठ्या मनुष्याचें अगर संस्थानिकाचें अगर इतर कोणाचें साहाय्य झालें नाहीं. आम्हां प्रत्येकास कागदपत्र हुडकून काढण्यापासून तों पुस्तकें विकून पैसे वसूल करीपर्यंतच्या सर्व विवंचना कराव्या लागल्या आहेत. यामुळे वेळाचा किती तरी अपव्यय होतो व प्रगति तर अति मंदगतीने होते. तेव्हां आपला झाला परंतु आपणांपाठीमागून जे गृहस्थ हें कार्य करण्यास प्रवृत्त होतील त्यांच्या कालाचा अपव्यय होऊन आयुष्य फुकट जाऊं नये व कार्य तर त्वरित व्हावें अशासाठी काय योजना निर्माण करावी यात मी असतां माझी व मेहेंदळे यांची गांठ पडली, व चमत्कार असा की, त्यांनीच होऊन मला विचारिलें कीं, संघटित स्वरूपाचें काम करण्यासारखी एखादी संस्था निर्माण करितां येईल का? वस्तुतः हें इतिहासाचे काम पूर्वीच्या इतिहासप्रसिद्ध लोकांच्या वंशजांचे आहे. हें एक प्रकारचें पितृकार्य आहे; व तें करण्यास त्यांच्यांतीलच एक मनुष्य तयार झाल्याचे पाहून मला आनंद झाला. अशा रीतीनें आम्हां उभयतांच्या विचाराने व आपले पहिले अध्यक्ष रा. ब. गणपतराव जोशी व आपले सध्यांचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या प्रोत्साहनानें सदरहू संस्था स्थापन झाली. रा. ब. रानडे यांनी अनेक संस्था निर्माण केल्या. परंतु त्यांनी आपल्या मंडळासारखी संस्था निर्माण केली नाहीं हें खरोखरीच आपलें, आपल्या देशाचे दुर्दैव होय. अशी जर एकादी संस्था त्यावेळी निर्माण झाली असती व जर अशा संस्थेच्या कृपेच्या छत्राखाली माझ्या सारख्यास काम करावयास मिळून जितके जरूर तितकें स्वास्थ्य असतें तर आपणांस अतिशयोक्ति वाटेल म्हणून सहस्त्रपट म्हणत नाही पण शतपट काम मी सहज उरकलें असतें. यद्यपि आपण आजवर केलेले काम अति अल्प आहे, तरी संशोधकांनी आपली जबाबदारी ओळखून सुव्यवस्थितपणें काम केलें तर आपण खचित हें कार्य लवकरच चांगल्या नांवारूपास आणूं. यद्यपि माझी प्राप्ति अति अल्प आहे वस्तुतः कांहीं नाहीं म्हटलें तरी चालेल. परंतु माझ्या बंधूंच्या कृपेने मला जो अल्पस्वल्प पैसा मिळतो त्यांतून माझ्या पाठीमागून होणाऱ्या संशोधकांचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून मी सालीना २५ रुपये ह्या कार्यास देतों." याच संमेलनासममोर राजवाडे यांनी आणखी एक ठराव मांडला. "भारतेतिहास, भारतीय अर्थशास्त्र, भारतीय राजधर्मशास्त्र, भारतीय समाजशास्त्र, भारतीय भाषाशास्त्र वगैरेंच्या अध्ययन अध्यापनाची व्यवस्था भरतखंडांत, तेथील विश्वविद्यालयादि संस्थांच्याद्वारां होणें अत्यवश्यक आहे असे या मंडळाचें मत आहे व या आशयाची सूचनापत्रे, विनंतिपत्रे वगैरे निरनिराळ्या विद्यमान नामांकित शिक्षणसंस्थांकडे पाठवावी."
 रा. मेहेंदळे यांनी याप्रसंगी राजवाडे यांच्या हातून मराठी भाषेचें ऐतिहासिक व्याकरण व्हावें असे सुचविलें व म्हणाले, 'तें छापून काढण्याची जबाबदारी मी आपल्या एकट्याचे शिरावर घेतों' या गोष्टीस राजवाडे यांनी जवळ जवळ संमति दिली होती. मराठ्यांचा इतिहासही राजवाडे यांनी लिहावा, मी तो छापण्याची जबाबदारी घेतो असें पुनरपि त्यांनी सुचविलें तेव्हां राजवाडे म्हणाले "पेशवाईचा इतिहास लिहिण्याजोगी सामग्री आता खरोरीच झाली आहे. तरी मजपेक्षां दुसऱ्या कोणी तरी हें काम करावें. विद्यापीठांतून शिकविणाऱ्या विद्वान् लोकांनी आतां आळस झाडून सर्व इतर अडचणींना न जुमानतां हें काम अवश्य करावें; असले प्रयत्न १०।१२ निरनिराळे झाले तरी दृष्टिभेदामुळें इष्टच असल्याचे सांगून या बाबतींत सक्ति न करितां खुषीवरच सोपविणें बरें."
 अशाप्रकारें हें पहिलें संमेलन पार पडलें. भारतइतिहास संशोधक मंडळाचीं इतिवृत्तें प्रसिद्ध होऊं लागली. सभासद वाढू लागले. १८३९ पर्यंत मंडळाचे काम जोराने चालले. राजवाडे कोठेही असले तरी पदरचे पैसे खर्चून मंडळाच्या सभांस होता होईतों हजर राहत. कित्येक दिवस मंडळाचें अपत्याप्रमाणे त्यांनी संगोपन केलें. परंतु शके १८३९ नंतर त्यांचे मन या संस्थेवरून उठले व त्यांनी आपला तिऱ्हाइतपणा पुन्हा पत्करिला. पुढें धुळें येथें जी सत्कार्योत्तेजक सभा स्थापन झाली होती, त्या बाजूस ते जास्त रमू लागले. तेथील प्रभात मासिकांत त्यांनी लेख लिहिले. नंतर अमळनेर येथेहि एक इतिहास संशोधक मंडळ स्थापन करण्यांत आलें. अमळनेर येथें त्या वेळेस प्रो. भानू हे होते. अमळनेरचे सुप्रसिद्ध वकील विष्णु काशिनाथ भागवत ह्यांचा उत्साह या बाबतीत फार. राजवाडे येथील सभांस नेहमी येत व कांहीं उद्बोवक निबंध, टांचणे वगैरे वाचीत. पुढें हें अमळनेरचें मंडळ बंद पडलें, पुण्याचें मंडळ मात्र आतां मोडण्याच्या भीतीच्या पलीकडे गेलें आहे. स्वतःची सुंदर इमारतही मंडळाने आतां बांधली आहे. व राजवाडे यांनी ती आपल्या हयातीत पाहिली पण होती.
 पुण्यास जी ही इतिहाससंशोधक संस्था स्थापन झाली, तिच्या कार्याची रूपरेखा ठरविण्यांत आली होती. (१) सर्व पक्षांच्या लोकांस मंडळ खुलें असावें. (२) मंडळांत जें बोलणें अगर लिहिणें तें लेखी असावें. (२). Fact finding वर भर असावा. मतप्रकाशन त्यावेळेस बाजूस ठेवून दिलें होते. मंडळांत मनमिळाऊ माणसें सामील झाल्यामुळे जहाल, मवाळ उभय पक्षांतील मंडळीही या संस्थेच्या वाढीस हातभार लावीत.

 इतिहास साधने प्रसिद्ध करण्यासाठी अशी आटाआटी या महापुरुषाने केली. सतत श्रम करून २२ पत्र खंड त्यांनी छापले व कांही भागांस सागराप्रमाणे गंभीर व भारदस्त प्रस्तावना लिहिल्या. या पत्रखंडांशिवाय महिकावतीची बखर, राधामाधवविलासचंपू या दोहोंचा इतिहास शोधनांतच समावेश करणे इष्ट आहे. महिकावतीची बखर यास त्यांची फारच गुंतागुंतीच्या प्रश्नांवर प्रकाश पाडणारी प्रस्तावना आहे. गुजराथ, कोंकण, वगैरेंचा इतिहास, रामदेवराव जाधव यांच्या पूर्वीचा व तदुत्तर इतिहास यसंबंधी राजकीय सामाजिक विवेचन या प्रस्तावनेत आले आहे. राधाभाववविलासचंपूची प्रस्तावना म्हणजे फारच मोठे काम आहे. महाराष्ट्रभूषण शहाजीच्या कर्तबगारीचं सुंदर व भव्य चित्र येथे राजवाडे यांनी रेखाटले आहे. शहाजीच्या पराक्रमाचे पवाडे वाचतांना मनास आनंद होतो. लढायांची वर्णने वाचतानां तन्मयता होते. 'पाखरांच्या पाखांवर पावसाळ्यांत जेथे शेवाळ उगवते' असे सुंदर वर्णन वाचून सार्थकता वाटते. मराठ्यांच्या गुण दोषाची चर्चा येथेही आहे. पहिल्या १२५ पानांत शहाजीसंबंधी, रामदाससंबंधी वगैरे सूक्ष्म व गंभीर चर्चा आहे. पुढे पाणिनीय कालापासून शहाजी कालापर्यंतच्या भारतीय क्षात्रांचा परंपरित इतिहास देण्याची प्रतिज्ञा करून तत्सिध्यर्थ उरलेली ७० पाने खर्ची घातली आहेत. यांचें परीक्षण करणें म्हणजे प्रतिराजवाडे- दुसरे गाढे पंडित पाहिजेत. आम्ही नुसता उल्लेख करणें हेंच योग्य.
 राजवाडे यांच्या या इतिहास विषयक कामगिरीचा हा इतिहास. याशिवाय इतिहासासंबंधी शेकडों टांचणे, टिपणे मंडळाच्या इतिवृत्तांतून प्रसिद्ध झालेली जमेस धरली, म्हणजे केवढे प्रचंड कार्य या थोर पुरुषाने केले हें दिसून येईल. या प्रस्तावनांतून जे मननीय विचार त्यांनी प्रगट केले आहेत ते स्वतः वाचावे. आम्ही पुढे त्यांची मते वगैरे सांगतांना थोडा फार त्यांचा उल्लेख करू. ऐतिहासिक काम पाहिल्यानंतर आपण त्यांच्या भाषाविषयक कामगिरीकडे वळू या.



प्रकरण ३ रे
भाषाविषयक कामगिरी.

 साहित्यशोधक या नात्याने राजवाडे यांनी जे केले, तें फार लोकोत्तर आहे यांत वाद नाहीं; परंतु ज्ञानकोशकार म्हणतात, "राजवाड्यांची भाषाशास्त्रयिक कामगिरी लक्षांत घेतली तर तीपुढे अनेक मोठमोठ्या अभ्यासकांचे प्रयत्न फिके पडतील. राजवाड्यांच्या अनेक कामगिऱ्यांपैकी सर्वात अधिक मोठी कोणती हें ठरवून राजवाड्यांचे वर्णन करावयाचे झाले तर त्यांस भाषाशास्त्रज्ञ म्हणावें लागेल आणि त्यांची गणना अत्यंत मोठ्या वैय्याकरणांत करावी लागेल. हेमचंद्र आणि वररुचि यांचे प्रयत्न राजवाड्यांच्या प्रयत्नांच्या दृष्टीने कांहींच नाहींत. इतिहासाचार्य किंवा इतिहास संशोधक हें नांव राजवाड्यांस देण्यांत आपण त्यांच्या कार्याचे अज्ञान दाखवू. त्यांच्या बौद्धिक कार्यानें गुरुलघुत्व माझ्यामतें १ भाषाशास्त्र हा, २ वैय्याकरण, ३ शब्द संग्राहक व ४ इतिहास संशोधक या अनुक्रमानें आहे "
 ज्ञानकोशकारांनी केलेलें हें गुरुलघुत्व कोणाहि विचारवंत माणसास पटण्यासारखेच आहे. राजवाडे यांची बुद्धि स्वभावतःच संशोधन प्रवण. इतिहासाच्या संशोधनानें त्यांची ही बुद्धि कमावली जाऊन विशाल व प्रगल्भ झाली. इतिहाससंशोधक क्षेत्रांत दुसरे गडी उतरलेले पाहून राजवाडे हे इतिहास संशोधनाचे संकुचित काम संपवून शब्दांची परंपरा व इतिहास हे शोधण्याकडे वळले. अफाट अशा वाणीच्या क्षेत्रांत त्यांची बुद्धि संचार करूं लागली.
 आपल्याकडे मराठीकडे प्रसिद्ध भाषाशास्त्रही म्हणून प्रथम भांडारकर डोळ्यांसमोर येतात. त्यांची १८७७ मध्ये संस्कृत प्राकृतसंबंधी अत्यंत विद्वत्ताप्रचुर अशीं व्याख्याने झाली. निरनिराळे विभक्तिप्रत्यय यांच्या उत्पत्ति संबंधी यांत पुष्कळ संशोधन आहे. भाषाशास्त्राचा मराठीत हा पहिला भर भक्कम पाया राजाराम शास्त्री या पुरुषाने घातला. या विद्वान् व नवमत पुरस्कारक पुरुषानें भाषेसंबंधी अनेक लेख लिहिले. विशेषतः वेदांतील निरनिराळ्या शब्दाचे अर्थ करण्यासंबंधीचे यांचे इंग्रजी व मराठी लेख आहेत. महादेव मोरेश्वर कुंटे हेही प्रसिद्ध व्युत्पन्न. राजवाडे यांनी भांडारकरांपासून शिलालेख शोधन आणि भाषाशास्त्र हीं घेतली. कुंट्यांपासून पुराण वस्तुनिरीक्षण, तुलनात्मक अभ्यास, संस्कृतबद्दलची आवड वगैरे गोष्टी उचलल्या जुन्याकडे नव्या दृष्टीने पाहणें, पुराणांतील भाकड कथांचे अवगुंठन काढून आंतील ऐतिहासिक सत्य संशोधणे व आपली मतें स्पष्टपणे व निर्भीडपणे मांडणें हें राजाराम शास्त्री भागवतांचे काम राजवाडे यांनी उचलले. भाषेसंबंधींने सर्व विचार व प्रमेयें, आठव्या खंडाची प्रस्तावना, ज्ञानेश्वरी, तिचा नववा अध्याय व व्याकरण, सुबंत विचार व निगंत विचार, गुणवृद्धि, कारप्रत्यय, संस्कृत भाषेचा उलगडा, राधामाधवविलासचंपू या ग्रंथात प्रसिद्ध झालेली आहेत भाषाशास्त्रांत अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव होतो; ध्वनिप्रक्रिया, वर्गप्रक्रिया, प्रत्यय चिकित्सा, अर्थप्रक्रिया, प्रयोगक्रिया वगैरे गोष्टींचा भाषाशास्त्रांत अभ्यास केला जातो. ध्वनिप्रक्रियांचे कांहीं विवेचन संस्कृत भाषेचा उलगडा व वृद्धाचा निबंध यांत त्यांनी केले आहे. यासंबंधी जास्त विवेचन व विवरण ते जो नवीन धातुपाठ तयार करीत होते, त्यांत येणार होतें. "आचार्य पाणिनीनें वृद्धिरादैव् असें सूत्र बांधून वृद्धीचा चमत्कार फक्त नमूद केला पण त्याची उपपत्ति राहिली. अ, इ, उ, ऋ यांचे आ, ऐ, औ, आ इत्यादि उच्चार होण्याची कारणपरंपरा, उच्चार करितांना मुखांतील स्नायूंच्या होणाऱ्या हालचाली, स्वरोच्चाराच्या ऐतिहासिक स्वरूपासंबंधीची अनुमाने इत्यादि मुद्यांचा विचार 'वृद्धी' या निबंधांत करून त्यांनी प्रक्रिया विशद केली आहे. नाम सर्वनामांच्या विभक्ति साधनिकेत विकल्पानें सांपडणाऱ्या रूपांचा ऐतिहासिक अर्थ काय असावा हें पाश्चात्यांसही गूढ होतें. पाश्चत्यांस शब्दांच्या मूळ रूपाशीं जातां आलें नाहीं. अहम्, त्वम्, इत्यादि सर्वनामे भाषेची आद्य प्रतीके असावीत असा तर्क मोक्षमुलरनें केला, पण त्यांची उपपत्ति व पूर्व स्वरूपें त्यांस देतां आली नाहीत." राजवाडे यांनी संस्कृत भाषेचा उलगडा या निबंधात या सर्व गोष्टींचा विचार केला आहे. संस्कृत भाषेचा उलगडा हा निबंध खरे पाहिले तर फारच गहन आहे. राजवाडे भाषेसंबंधी हे सिद्धांत मनांत रचित होते. त्याच सुमारास दामले यांने मराठी भाषेचे शास्त्रीय व्याकरण हा बडा ९०० पानांचा ग्रंथ बाहेर पडला. त्या ग्रंथांचें परीक्षण म्हणून राजवाड्यांनी हे आपले भाषेसंबंधींचे कांहीं सिद्धांत प्रसिद्ध केले. त्यांचें परीक्षण करून त्यांची शहानिशा करणें हें काम महाराष्ट्रांत चिंतामणराव वैद्याशिवाय कोणासही झालें नाहीं.
 जुनी ज्ञानेश्वरीची प्रत सांपडल्यानंतर राजवाडे यांस अभूतपूर्व आनंद झाला. या ज्ञानेश्वरीस १०० पानांची त्यांनी प्रस्तावना जोडली आहे. पुढे ज्ञानेश्वरीचें व्याकरण हा महत्वाचा ग्रंथ त्यांनी केला. मराठीतील पहिले ऐतिहासिक असें व्याकरण हेच होय. ज्ञानेश्वरीच्या व्याकरणानें विद्वानांत फार खळबळ उडाली. लोकमान्यांनीं केसरीत अग्रलेख लिहून व वैद्यांची परीक्षणात्मक लेखमाला प्रसिद्ध करून या ग्रंथाचा गौरव केला. चिंतामणराव वैद्य यांनी या ग्रंथांचे नीट परीक्षण केलें. पाणिनि, पतंजलि, भर्तृहरी, वामन यांची परंपरा राजवाडे यांनीं बुडूं दिली नाही. ग्रंथ शुद्ध व शास्त्रीय स्वरूपाचा आहे. ज्ञानेश्वरीचें व्याकरण रचल्यानंतर ते दुसऱ्या महत्त्वाच्या कामास लागले. तें म्हणजे मराठी भाषेचा धातुपाठ हें होय. जवळजवळ ३० हजार धातु त्यांनी गोळा केले व त्यांची प्रक्रिया, व्युप्तत्ति वगैरे उलगडण्याचा त्यांनी जंगी खटाटोप केला. या धातुकोशाची हजार पाने होऊन त्यास ५०० पानांची भलीमोठी विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना पण जोडण्यांत येणार होती. या धातूंचा पहिला कच्चा खर्डा १९२० मध्येच त्यांनी तयार केला होता व सारखी उत्तरोत्तर त्यांत भर पडत होती व सुधारणा करणें चालू होते. परंतु आतां या सर्व गोष्टी तशाच राहिल्या. त्यांच्या हातून हें काम झालें असतें तर मराठीस केवढा अपूर्व लाभ झाला असता! इतर सर्व भाषांकडे या एकाच अभिनव गोष्टीने, तुच्छतेने पाहण्यास मराठीस सामर्थ्य आलें असतें- परंतु दैवदुर्विलास महाराष्ट्राचा. दुसरें काय?
 भाषेचा व भाषेतील शब्दांचा अभ्यास त्यांस फार आवडे. अलीकडे ५।१० वर्षे कागदी साधनांचा त्यांनी नाद सोडून दिला होता व नैसक्तिक साधनांचाच, या भाषाविषयक साधनसामुग्रीचाच इतिहासाच्या कामीं ते उपयोग करून घेऊं लागले होते. वेदपूर्व कालापासून तों तहत सद्यःकालापर्यंतची सर्व संस्कृत प्राकृत भाषांचीं स्वरूपें ते पहात चालले व शब्दांची कुळकथा, इतिहास ते जमवीत चालले. प्राचीन शब्द साधनांची फोड करून त्यांतील अनेक सुप्तज्ञान संग्रह ते बाहेर काढीत होते. शेंकडों हजारों शब्दांच्या व्युत्पत्त्या ते बसवीत चालले व हें शब्दांतील इतिहास बाहेर काढण्याचे काम त्यांस मनापासून आवडूं लागलें. या कामांत त्यांस जुन्या ज्ञानेश्वरीचें फार महत्त्व वाटे. ज्ञानेश्वरीत अनेक रुपे- शब्दांची परंपरा कशी आलेली आहेत, क्रियापदांची संपत्ति व शब्दसंपत्ति ज्ञानेश्वरीत कशी विपुल आहे हें दाखविण्यास त्यांना आवेश चढे. सांगूं लागले म्हणजे भराभरा ज्ञानेश्वरीतील ओव्या व शब्द त्यांच्या जिव्हाग्रीं नाचूं लागत. व्युत्पत्तिशास्त्र त्यांचा हातचा मळ होऊन बसले. हजारों हजार शब्दांच्या व्युत्पत्त्या त्यांनी निरनिराळ्या भा. इ. सं. मंडळाच्या इतिवृत्तांतून व अन्यत्र प्रसिद्ध केल्या आहेत. हें सर्व एकत्र छापणें अगत्याचे आहे. मग त्या सर्व व्युत्पत्यांचा परामर्ष घेणारा कोणी प्रतिमल्ल निर्माण कधी होईल तो होवो.
 या भाषाशास्त्र विषयासंबंधीं त्यांचे जे अनेक निबंधप्रबंध आहेत, त्यांत "विचार व विकार प्रदर्शनाच्या साधनाची इतिहासपूर्व व इतिहासोत्तर उत्क्रांति हा निबंध केवळ लोकोत्तर आहे. मानव वाणीचा विकास कसकसा होत गेला, व तिची उत्क्रांति कशा क्रमानें व कोणत्या स्वरुपांत झाली हें गहन भाषा तत्वज्ञान त्यांनी येथें दाखविलें आहे. या अति गहन विषयाचे पापुद्रे आपल्या कुशल कुशाग्र बुद्धीच्या योगें त्यांनीं सोडवून दाखविले आहेत. हा निबंध मला वाचावयास मिळाला नाही. त्याच्यासंबंधी जें इतरांनी लिहिलें तें मी वर दिछें आहे.
 भाषाशास्त्रविषयक या गोष्टी सांगण्याचे वेळींच मानभावी किंवा महानुभावी पंथाच्या गुप्तभाषेचा जो उलगडा त्यांनी केला त्याचाही उल्लेख अवश्यमेव केला पाहिजे. राजवाडे यांची बुद्धि संशोधनांत सुख मानणारी होती. निरनिराळ्या ठिकाणचे शिलालेख, ताम्रपट यांतील उलगडे त्यांनी केले आहेत व त्यांनी ज्ञानात भर घातली आहे. परंतु ही महानुभावपंथाची गुप्त भाषा उलगडून त्यांनीं मोठीच कामगिरी केली. महानुभावीपंथाचें वाङमय ज्ञानेश्वरांच्याही पूर्वीपासूनचे आहे. परंतु हे सर्व ग्रंथ गुप्त संकेथांत लिहिलेले असत. 'क' बद्दल दुसरेंच एक अक्षर लिहावयाचें; आंकड्यांचेहि असेच. यामुळे यांचे ग्रंथ सर्व साधारण मराठी भाषज्ञांस अज्ञात राहिले. प्रख्यात कादंबरीकार हरि नारायण आपटे यांच्या आनंदाश्रम छापखान्यांत महानुभावी पंथाचा 'लीलासंवाद' म्हणून एक ग्रंथ होता. त्याचा कांहीं एक अर्थ या गुप्त सांकेतिक भाषेमुळें लागत नसे. म्हणून तो ग्रंथ शास्त्री पंडितांनी तसाच बाजूस ठेवून दिला होता. शेवटीं तो ग्रंथ हरिभाऊंनीं राजवाडे यांच्या स्वाधीन केला. हा ग्रंथ ज्या संकेतांनी लिहिला, तो संकेत १३ दिवस सतत एकाग्रतेनें खटपट करून राजवाडे यांनी उलगडून दाखविला व सर्व परिभाषा बसविली. कोणत्या अक्षराबद्दल कोणतें अक्षर हें सर्व नीट स्पष्ट केलें. महानुभावी महंत या वार्तनें चकित झाले. डॉ. भांडारकर यांनीं राजवाडे यांचें फार कौतुक केलें. महानुभावपंथाची अशी किल्ली सांपडल्यामुळे तें वाङमय आता मराठीत येण्यास मोकळीक झाली. हें वाङ्गमय श्रीमंत आहे. अनेक गद्यपद्य ग्रंथ, कोश, व्याकरणें वगैरे यांत आहेत. ही ग्रंथ संपत्ति जवळ जवळ ६ हजार आहे. 'मराठी भाषेतील एक अज्ञान दालन' हा कै. भावे महाराष्ट्रसारस्वतकार यांचा निबंध व महानुभावी वाङ्गमयांचा इतिहास हे वऱ्हाडांतील देशपांडे यांचे पुस्तक हीं दोन वाचलीं म्हणजे मराठीस या महानुभावी वाङमयामुळे केवढा लाभ झाला आहे याची कल्पना येईल.
 राजवाडे यांनी किती तरी काव्यें, किती तरी बायकांच्या वगैरे प्रचारांत म्हणण्यांत येणारीं गाणीं प्रसिद्ध केलीं, व त्यांतूनसामाजिक इतिहासाचा जो कण सांपडला तो पुढे ठेविला. भारत इ. सं. मंडाळाचीं इतिवृत्ते चाळीत बसलें म्हणजे हीं मौजेची गाणी व इतर गोष्टी वाचून मनास करमणूक होते व ज्ञानही मिळतें. बारीकसारीक गोष्टीकडेहि त्यांचे लक्ष असे. दासोपंताचें काव्य जेव्हां छापून निघू लागलें, तेव्हां जुन्या पोथ्यांत अनुनासिक पोकळ टिंबानें व अनुस्वार भरीव टिंबानें दाखवीत ही गोष्ट त्यांनींच दिग्दर्शित केली.
 एकंदरीत राजवाडे महान् वैय्याकरणी, प्रचंड शब्द संग्राहक होते. या कामास त्यांच्या सारखा प्रतिभावान प्रज्ञावंत व अनंतश्रमांचा पुरुष पुनरपि केव्हां लाभेल कोणास माहीत? भाषा विषयक त्यांच्या या कामगिरीस तोड नाहीं.



प्रकरण ४ थें
समाजशास्त्रविषयक व इतर निबंध.

 इतिहास- शास्त्रविवेचक व इतिहास संशोधक, महान् व्याकरणशास्त्रज्ञ आणि शब्द संग्राहक, त्याप्रमाणेंच राजवाडे हे समाजशास्त्रज्ञपण होते. महाराष्ट्रांत समाजशास्त्राचा अभ्यास करणारे जवळ जवळ फारसे कोणी पंडित झाले नाहींत. राजवाडे यांच्या पूर्वी या शास्त्रास महाराष्ट्रांत प्रथम हात घालणारा विद्वान पुरुष म्हणजे राजाराम शास्त्री हे होत. हे स्पष्टवक्ते अतएव विक्षिप्त म्हणून गाजले. स्वतंत्र विचाराचे व स्वतंत्र प्रतिभेचे असे हे पुरुष होते. राजारामशास्त्र्यांनेंच काम राजवाडे यांनी पुढे चालविलें.
 समाजशास्त्र हें मानवशास्त्रांत अंतर्भूत होणाऱ्या अनेक शास्त्रापैकी एक शास्त्र आहे. भाषाशास्त्र, प्राणिशास्त्र, शारीशास्त्र, समाजशास्त्र वगैरे गोष्टींचा अंतर्भाव मानवशास्त्रांत होतो. अशा या अनेक शास्त्रांत वाहिलेलं लोक आपणांकडे नाहीत. राजवाडे यांनी या शास्त्राचा अभ्यास केला होता; व भाषाशास्त्र आणि मस्तिष्कशास्त्र यांच्या साहाय्यानें ते यांत सिद्धांत मांडूं पाहात असत. 'हिंदुसमाजांत हिंद्वितरांचा प्रवेश, भारतीय विवाहपद्धति, चातुर्वर्ण्य, चित्पावनांचा इतिहास, वगैरे त्यांचे लेख समाजशास्त्रविषयक विवेचनाने भरलेले आहेत. चातुर्वर्ण्याच्या उत्कर्षाउपकर्षासंबंधीचे त्यांचे विवेचन मार्मिक व अभ्यासनीय आहे. असिरिया व असुर लोक यासंबंधी पण अलिकडे ते जास्त विवेचन करण्याच्या विचारांत होते. ग्राम नांवाचा अभ्यास करून त्यावरून महाराष्ट्रीय वसाहत कालाची निश्चिति करावयाची असें त्यांचे मनांत होतें. त्याप्रमाणेच सर्व आडनांवांची यादी करून त्यांच्या विभागणीनें महाराष्ट्राच्या वसाहतीच्या स्वरूपावर कांहीं प्रकाश पडतो की काय हें त्यास पहावयाचें होतें यासाठी ते प्रयत्न करूं लागले होते व निरनिराळ्या क्षेत्रीं जाऊन तेथील बडवे, पंडये यांच्या वह्या तपासण्याचा त्यांनी उपक्रम सुरू केला होता. मध्ये मध्ये त्यांस हें तर वेडच लागले होते. अमळनेरची त्यांची गोष्ट सांगतात की बाहेर ओट्यावर असून येणाऱ्या जाणाऱ्यास आडनांव, गोत्र वगैरे विचारून टिपून घेत. या मिळालेल्या माहितीवरून त्यांनीं महाराष्ट्र वसाहतीचा इतिहासकाल हा निबंध प्रसिद्ध केला आहे; व त्यापेक्षां व्यापक ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा उद्देश होता.
 समाजशास्त्राचा अभ्यास करितांना अनेक गोष्टीं जनमनास न आवडणाऱ्या लिहाव्या लागतात. प्राचीन विवाहपद्धति हा चित्रमय जगत् मध्यें प्रसिद्ध झालेला त्यांचा लेख पाहून पुष्कळ लोकांस वाईट वाटले. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करून भाऊ बहिणी- जवळ विवाह करीत असलींच तत्त्वरत्ने बाहेर काढावयाची अस तील तर तो अभ्यास न करणें बरें असे उद्गार मी पुष्कळांच्या तोंडून त्यावेळी ऐकिलें होते. महाराष्ट्रीय समाजांत नाग समाजाचें बरेंच मिश्रण आहे वगैरेही त्यांची मतें असेंच वरवर पाहाणाऱ्यास कशीशींच वाटतात; आणि समाजशास्त्र मानवशास्त्र इत्यादिकांचा कांहीं अभ्यास न केलेले बेजबाबदार लोकही बारीक सारीक लेखांत राजवाडे यांच्या मतावर हल्ले करितात. राजवाडे यांचे सिद्धांत चुकले असतील; पाली हा शब्द 'प्रकट' पासून आला असावा हा त्यांचा सिद्धांत किंवा नागसंस्कृति महाराष्ट्रांत आली वगैरे सिद्धांत चुकीचेही ठरतील. परंतु अभ्यासु लोकांनी त्यांच्यावर टीका लिहिली तर शोभेल तरी. वाटेल त्यानें एकाट्या मताच्या अभिनिवेशानें त्यांच्यावर तुटून पडणें हें चांगलें नाहीं. राधामाधव, विलासचंपु, महिकावतीच्या बखरीची प्रस्तावना वगैरे मध्येही त्यांनी समाजविषयक निरनिरळ्या अंगांची चर्चा थोडाबहुत केली आहे.
 राजवाडे यांचे इतर विविध विषयांवरही फार सुंदर निबंध आहेत. वाङ्गमय विषयक, तात्विक विवेचनात्मक, टीक. प्रतिटीकात्मक राजकारण विषयक व इतर असे त्यांचे पांच भाग पाडावे. वाङ्गमय विषयक निबंधांतं कादंबरी वगैरे साहित्य संमेलन, पुण्यातील शारदोपासक मंडळाच्या अध्यक्षपदावरून केलेलें संभाषण हे महत्त्वाचे निबंध आहेत. कादंबरी या निबंधांत त्यांनी कादंबरीचा आजपर्यंतचा इतिहास सांगितला. जगांतील उत्कृष्ट कादंबरीकारांच्या ग्रंथांचे उल्लेख करून, त्यांचे मोजमाप करून, ते महाराष्ट्रांतील कादंबरीकाराकडे वळले आहेत. हरिभाऊ आपटे यांच्या कादंबऱ्यांचा त्यांनीं गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. व शेवटीं कादंबरीग्रंथ निर्माण व्हावयास कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे हें त्यांनी सांगितलें आहे. ते लिहितात, "आतां ह्युगा, झालो, टालस्टाय ह्यांच्यासारखी ग्रंथचरना व्हावी अशी इच्छा असेल, तर त्याला एकच उपाय आहे. ह्यांच्यासारखी मनें ह्या देशांतील कादंबरीकारांची बनली पाहिजेत. विधवाची दुःखें पाहून जीव तिळतिळ तुटला पाहिजे. गरीबांची उपासमार पाहून स्वतःच्या घशाखालीं घास उतरतां कामा नये. स्वदेशाचे दैन्य पाहून रात्रींची झोंप डोळ्यांवरून उडून जावी. स्त्रियांची बेअब्रू झालेली पाहून द्रौपदीच्या भीमाप्रमाणें त्वेष यावा. ही मनोवृत्ती ज्यांची झाली, त्या ब्रह्मानंदी ज्यांची टाळी लागली, त्यांनींच कत्पान ट्रेफूसची बाजू घेऊन सर्व राष्ट्रा- विरुद्ध भांडावें व रशियांतील पातशाहांनाही चळचळ कापायला लावावें. इतरांची माय हीं कामें करणाऱ्या कादंबरीकारांना व्याली नाहीं! तेव्हां उत्तमोत्तम कादंबरीकार व्हावयाचें म्हणजे मनोवृत्ति अशी अत्यंत जाज्वल्य पाहिजे. श्रेष्ठ विद्या, विस्तृत वाचन, मोठा प्रवास, तीक्ष्ण निरीक्षण, कडक परीक्षण, थोर औदार्य, गाढ सहानुभूति, व नाटकी लेखणी हे गुण तर नांव घेण्यासारख्या कादंबरीकारांत हवेतच. परंतु सर्वांत मुख्यं गुण म्हटला म्हणजे जाज्वल्य मनोवृत्ति हवी. तिच्या अभावी वरील सर्वगुण व्यर्थ होत. ही मनोवृत्ति कृत्रिम तऱ्हेनें येत नाहीं. ही ईश्वराची देणगी आहे. उत्तेजक मंडळ्यांच्या बक्षिसांनीं किंवा प्रोत्साहक सोसायट्यांच्या देणग्यांनी रद्दड कविता, रद्दड कादंबऱ्या, रद्दड नाटकें, रद्दड चरित्रे, अशी सर्व रद्दड ग्रंथप्रजा उत्पन्न होईल. तेजस्वी ग्रंथसंपत्ति निर्माण व्हावयालय जाज्वल्य अशा प्रखर मनोवृत्तीचा- जातीचा अंकुर पाहिजे अशी उब्देोधक शब्दांनी या विस्तृत निबंधाचा शेवट केला आहे.
 कादंबरी हा निबंध जर वाङमय संबंधीच्या लेखांत उत्कृष्ट आहे, तर तात्विक विवेचनात्मक लेखांत 'रामदास' हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. 'रामदास' या निबंधानें महाराष्ट्रांत रामदासासंबधींच्या विचारांत क्रांति घडून आली. समर्थ व इतर संत यांतील फरक दाखवून राजकारण व धर्म यांचे परस्पर संबंध कशा स्वरूपाचे पाहिजेत हें समर्थाच्या ग्रंथांतील उताऱ्यांनी सिद्ध करून, पाश्चात्य राजकारण विषयक तत्वज्ञानापेक्षां समर्थांची दृष्टी किती खोल होती हें राजवाडे यांनी दाखवून दिले आहे. 'रामदास' या निबंधानें समर्थांचे विचारसामर्थ्य महाराष्ट्रांस कळू लागले. देवप्रभृति धुळे येथील लोकांस समर्थकालीन वाङ्गमय संशोधण्यास स्फूर्ति आलीं व सत्कार्योत्तेजक मंडळ स्थापन झालें. राजवाडे यांची बुद्धि किती खोल असते तें या निबंधांत उत्कृष्टपणे दिसून येतें.
 टीकाप्रतिटीकात्मक लेखांत 'किंकेडच्या ग्रंथावरील लेख' केसरीतील बाजीराव व मद्यपान यासंबंधीं वाद, ज्ञानेश्वरीवाद, वगैरे लेख आहेत. राजकारण विषयक लेखांत सुरतेची राष्ट्रीय सभा, गोखल्यांची इंग्लंडांतील कामगिरी, स्वदेशी, वेदोक्त, बडोदें राज्यांतील सुधारणा, ६ संबंधट्वालन मीमांसा ७ महाराष्ट्रांतील गेल्या ७५ वर्षांतील कर्त्यापुरुषांची मोजदाद- हे लेख महत्वाचे आहेत; हा शेवटचा निबंध फार महत्वाचा आहे. त्यावरून आपल्या समाजाची नीट कल्पना येते. याच निबंधांत तात्या टोपी, नानासाहेब बंडवाले यांस पहिल्या दर्जाचे देशभक्त असें राजवाड्यांनी गौरविलें आहे. लोकशिक्षण या मासिकांत हा लेख प्रसिद्ध झाला होता. 'गोखल्यांची इंग्लंडांतील कामगिरी, हा लेख विश्ववृत्त यांत प्रसिद्ध झाला व तोही मला फार आवडला. राष्ट्रीय पुढाऱ्यास सर्व जनतेचा पाठिंबा असल्याशिवाय त्याच्या म्हणण्यास जोर येत नाहीं. आपल्या देशांतील लोक पुढाऱ्यास फसविणारे व कृतघ्न कसे आहेत, त्यांच्यांत निष्ठा नसून ते लोचट कसे आहेत वगैरे मुद्देसूत विवेचन राजवाडे यांनी त्यांत केले आहे.
 इतर संकीर्ण लेखांत अत्यंत प्रामुख्याने ज्याचा निर्देश केला पाहिजे असा लेख म्हणजे 'कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव' हा त्यांचा आत्मचरित्रपर लेख होय.
 राजवाडे यांची मनोरचना कशी तयार झाली, त्यांच्या मनावर व बुद्धिवर कोणत्या गोष्टींचे संस्कार झाले, हें समजण्यास हा लेख फार महत्वाचा आहे. तत्कालीन शाळा, कॉलेजें, अध्यापक वर्ग वगैरेंची पण कल्पना आपणांस येते. या संकीर्ण निबंधांत तत्कालीन म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटच्या २५/३० वर्षांची थोडीफार स्थिती समजून येते. शिवकालीन समाजरचना हा केसरीमधील निबंध असाच सुरेख आहे. इतिहास व ऐतिहासिक यामधील इतिहास संशोधनाचा आढावा घेणारा त्यांचा लेख- त्यांतील दफ्तरें व संशोधनाचे कार्यांतील कष्ट व हाल यांचे विवेचन वाचण्यासारखें आहे.
 भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अहवालांतून बारीक- सारीक गोष्टींवर लहानमोठें शेंकडों निबंध, टांचणें टिपणें त्यांनी प्रसिद्ध केलीं आहेत. त्यांचे हे लेख ग्रंथमाला, विश्ववृत्त, लोकशिक्षण, सरस्वतीमंदीर, राष्ट्रोदय, इतिहास व ऐतिहासिक, रामदास व रामदासी, विद्यासेवक, चित्रमयजगत्, प्रभात, प्राचीप्रभा, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अहवाल— शिवाय ज्ञानप्रकाश, केसरी, समर्थ वगैरे वृत्तपत्रे यांतून प्रसिद्ध झालेले आहेत. ग्रंथमालेंतील त्यांचे कांहीं लेख 'संकीर्ण लेख' या नांवानें स्वतंत्र खंडांत प्रसिद्ध झाले आहेत.
 राजवाड्यांच्या या अवाढव्य लेखन सामुग्रीचा सामग्र्यानें विचार केला म्हणजे मन चकित होते व एकच पुरुष श्रम सातत्याच्या जोरावर श्रद्धापूर्वक व आस्थेनें कार्य करावयास लागला तर कसे चमत्कार घडवून आणतो हें आपणांस दिसून येतें.



प्रकरण ५ वें.
राजवाडे यांचे लिहिणें- त्याचे स्वरूप- गुणदोष.

 केवळ वाङमयवर्णन हा राजवाडे यांच्या लिहिण्याचा हेतु नाहीं. लेखणीचा विलास दाखविणें हें त्यांचें जीवित ध्येय नव्हतें. त्यांनी सर्व लिहिलें तें मराठीत लिहिलें. मराठीचा त्यांस फार अभिमान होता. इंग्रजीत एकही ओळ लिहिणार नाहीं ही त्यांची प्रतिज्ञा होती. मराठी भाषेसंबंधी ते ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत लिहितात 'शिष्ट मराठीत सात आठशें वर्षापासूनची ग्रंथरचना असून, ती महाराष्ट्रांतील सर्व प्रांतांतल्या व बडोदें, इंदूर, ग्वाल्हेर, बुंदेलखंड, तंजावर, गुत्ती, बल्लारी वगैरे संस्थानांतल्या मराठी लोकांना आदरणीय झालेली आहे. ज्या भाषेत मुकुंदराज, ज्ञानेश्वर, सूर्य ज्योतिषि, एकनाथ, तुकाराम, रामदास, चिपळूणकर वगैरे प्रासादिक ग्रंथकारांनी ग्रंथरचना केली ती शिष्ट भाषा महाराष्ट्रांतील सर्व प्रांतांतील व जातींतील लोकांस सारखीच मान्य व्हावी यांत आश्चर्य नाहीं. प्रांतिक बोलणें प्रांतापुरतें व जातीक बोलणें जातीपुरतें. परंतु ग्रंथिक बोलणें व लिहिणें सर्व महाराष्ट्रांकरितां आहे. प्रांतिक पोटभाषांच्या लहानसान लकबा आणि जातिक भाषणांतले बालिश अपभ्रंश ग्रंथिक राजभाषेच्या शिष्ट दरबारांत लुप्त होतात व एकच एक निर्भेळ अशी मराठ्यांची मायभाषा देशांतील सर्व लोकांच्या अभिमानाच्या, कौतुकाच्या व सहजप्रेमाचा विषय होते; मराठ्यांना स्वभाषेचा इतका अभिमान जो वाटतो तो फुकाचा नाहीं. मराठी भाषेतल्या शब्द प्राचुर्याची बरोबरी पृथ्वीवरील कोणत्याही भाषेला करतां यावयाची नाही. तसेंच कोणताही गूढ किंवा सूक्ष्म अर्थ नानातऱ्हांनी यथेष्ट व्यक्त करण्याची तिची शक्ती अप्रतिम आहे. शिवाय अनेक थोर प्रासादिक ग्रंथकारांनी तिला आपल्या उदात्त, गंभीर, ललित व रम्य विचारांचें निवेदन केलें असल्यामुळे तिच्यावरील महाराष्ट्रीयांची भक्ति शुक्लेंदुवत् उत्तरोत्तर वर्धमान स्थितींत आहे."
 मराठीचा हा राजवाडे यांचा अभिमान दासोपंतांनी संस्कृतपेक्षां मराठी कशी श्रेष्ठ आहे हें दाखविलें त्याप्रमाणेंच जाज्वल्च आहे. मराठी संबंधी अशी अलौकिक भक्ति असली तरी मराठीतील नामांकित ग्रंथकार या नात्यानें त्यांस प्रसिद्ध व्हावयाचें नव्हतें. राजवाडे हे वाङ्गमयसेवक, महान् सारस्वत सेवक असले तरी प्रथम- दर्शनीं ते सिद्धांत संस्थापक आहेत. समर्थांचे काव्य महत्वाचे नसून त्या काव्यांतील तत्त्वें महत्वाची आहेत. He is first a philosopher and then a poet. हे जसें रामदासासंबंधीं म्हणतां येईल, त्याप्रमाणेच राजवाडे यांचे आहे. मुक्तेश्वरादि कवि, किंवा चिपळूकर हे वाङमयाचे सेवक आहेत. वाणीस सजवावें कसें, उपमा दृष्टान्तादि अलंकार ठिकठिकाणीं योजून सर्वास कसे मोहून टाकावें, हें ते जाणतात. मुक्तेश्वरांची वाग्देवी अनेकालंकारांनी नटलेली आहे. चिपळूकर आपल्या वाग्गंगेत आम्हांस स्वैर विहार करावयास लावतात; राजवाडे यांचे तसे नाही. येथें गंगाकाठी विहार करणारे निरनिराळे पक्षी, चक्रवाक्, मयूर, कोकिलादिकांचे कलरव, भृंगांचें गुंजगान, पद्मांचे फुलणे, सुगंधाची लयलूट हें कांहीं अडणार नाही. येथें विलास, लालित्य नाही. येथे काय आहे? राजवाडे यांची भाषा सडेतोड व जोरदार आहे. मृदुत्व तिला खपत नाहीं. येयें कौमुदीचें सुकुमारत्व, सुभगत्व, शीतलत्व हें कांहीएक नसून, सूर्यप्रभेची प्रखरता व प्रज्वलता आहे. जोरकस रीतीनें सिद्धांत कसा मांडावा हेंच ते पहात असत. भाषेकडे त्यांचे लक्ष असे तथापि अर्थाकडे, सिद्धांताकडे जास्त असे. सिद्धांतस्वरूपी त्यांचें लिहिणे आहे. येथें गुळमळितपणा नाहीं. गुरु शिष्याला बजावतो आहे, सेनापति सैन्यास हुकूम करतो आहे असें त्यांचे लेख वाचतांना वाटतें. आपला सिद्धांत बरोबर आहे, आणि आपल्या विचारसरणीचे अधिकारी पुरुष आपणच आहोंत अशा आत्मविश्वासाने त्यांचे लेख भरलेले आहेत. बुद्धीचा स्वच्छपणा व भाषेचा जिवंतपणा त्यांच्या लेखांत स्पष्टपणें पाहावयास मिळतो. लेचेपेचे व गबाळ लिहिणें त्यांचें नसावयाचें. खंबीर, अर्थगंभीर असें त्यांचे लिहिणें आहे. विचारांच्या प्रखर जोरामुळे, भावनांच्या उद्रेकामुळे त्यांत समयोचित भाषा आपोआप स्फुरत असे. अर्थानुरूप त्यांची भाषा आहे. 'वाचमर्थोनुधावति' अशा ऋषिकोटीतील हा लेखक आहे असें दिसून येते. सागराचें गांभीर्य व गगनाचे गौरव आपणांस त्यांच्या लेखांत प्रतीत होतें. भाषेंतच ते गुंगत राहात नाहींत. भाषा हें गहन अर्थ स्पष्ट करावयाचें एक साधन असें ते समजत- म्हणून भाषा सजवणीला त्यांनीं अवकाश दिला नाहीं. ते वाङ्गमय राष्ट्रांतील संन्यासी आहेत. संन्याशास ज्याप्रमाणे विलास सुचत नाहींत त्याप्रमाणे भाषेचे विलास राजवाडे यांस सुचत नसत. त्यांच्या लिहिण्यांतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, प्रत्येक शब्द मोलाचा आहे. त्यांची लेखणी तीक्ष्ण होती. तिच्यांत स्पष्टपणा व कडवेपणा असे. त्यामुळे ती पुष्कळांस झोंबे. त्यांचे सडेतोड सिद्धांत वाचून दुसरा थक्क होई. राजवाडे यांच्या सिद्धांतावर टीकाही त्यामुळे पुष्कळ झाल्या राजवाड्यांच्या गागाभट्टीवरील ठाकरे यांची कोदंडाचा टणत्कार ही टीका नमुन्यादाखल म्हणून नमूद करतो. त्यांचे इतरही सिद्धांत व मतें यांच्यावर पुष्कळांनी टीका केल्या आहेत. राजवाडे हे दुसऱ्यावर कसून टीका करीत व दुसऱ्या पासूनही ते मुळमुळीत टीकेची अपेक्षा करीत नसत. या बाबतीत राजवाडे व टिळक यांचे साम्य आहे. प्रतिपक्षी यांची रेवडी कशी उडवावी हें उभयतांस फार चांगले साधे.
 राजवाडे यांची भाषा संस्कृत शब्दप्रचुर आहे; तरीपण ती जातिवंत व शुद्ध मराठी वळणाची वाटते. त्यांचें लिहिणें फार परिणामकारक असे. त्यांच्या प्रस्तावना वाचावयास वाचकांच्या कशा उड्या पडत हें पुष्कळांस माहीतच असेल. त्यांची भाषा दुसऱ्यांस अनुकरण करण्यास येत नसे. त्यांच्या प्रत्येक शब्दावर त्यांचा ठसा आहे. राजवाडे यांची भाषा ताबडतोब समजून येते. एखादें वाक्य, एखादा उतारा वाचला म्हणजे हा राजवाडी असला पाहिजे असें ताबडतोब सांगता येते. इंग्रजीमध्यें कार्लाईलची भाषाशैली जशी अगदीं निराळी व स्पष्टपणे उमटून पडणारी दिसते, तसेंच राजवाडी भाषेचें आहे. थोडक्यांत बव्हर्थ आणण्याची राजवाडी हातोटी क्वचितच इतरांस साधते. त्यांच्या लिहिण्यांत निरर्थक व उगीच विस्तार आढळणार नाहीं. त्यांच्या लेखांत त्यांच्या प्रतिभेचे व त्यांच्या बुद्धीचें स्वच्छ प्रतिबिंब पडले आहे. Style is the man- भाषाशैली म्हणजे ग्रंथकाराचें पूर्ण स्वरूपच- असे जे म्हणतात तें राजवाडे यांच्या बाबतींत खरें आहे. त्यांच्या स्वभावाचे गुण दोष त्यांच्या लिखाणांत आहेत. निर्भीडता, कळकळ, स्वतंत्रप्रज्ञा जोरदारपणा, विलास व नटवेगिरीचा तिटकारा- या त्यांच्या स्वभावाचे आविष्करण त्यांच्या सर्व लेखनसाहित्यांत झाले आहे.
 राजवाडे यांच्या लेखणीसारखी तीक्ष्ण, कार्यकर्ती, प्रभावशाली लेखणी महाराष्ट्रांत कोणी धरिली नाहीं. त्यांच्या लेखणींतील तल्लखपणा, सडेतोडपणा ही त्यांच्या सिद्धांताच्या सत्यत्वापासून उप्तन्न झालेली असत; आत्मविश्वसाचा तो परिणाम होता.



प्रकरण ६ वें
राजवाड्यांची विशिष्ट मनोवृत्ति.

 तीन तपें निरलसपणें राजवाडे यांनी निरनिराळ्याप्रकारें राष्ट्राची सेवा केली. प्रदीप्त प्रतिभा, अवर्णणीय निःस्पृहता, अत्युदात्त निरपेक्षता, अतुल कष्टशीलता इत्यादि सदुणांच्या साहाय्यानें आपल्या राष्ट्राची सेवा केली. कोणत्या हेतूनें राजवाडे या सेवेस प्रवृत्त झाले? राष्ट्राचा अधःपात झालेला आहे. हा कां झाला, असे अधःपात कां होतात, कसे होतात— याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशानें ते आपल्या जीवित कार्यास लागले. आपल्या महाराष्ट्रास निकृष्ट स्थिति हीनदीन स्थिति कां आली हें नीट सम्यग् रीतीनें, समजून घेतल्याशिवाय, राष्ट्राच्या उद्धारार्थ योग्य दिशेने प्रयत्न करणें शक्य होणार नाहीं हें त्यांच्या बुद्धीने जाणलें, आपलें चुकते आहे कोठें हे समजल्याशिवाय, आपणांस चुका सुधारतां येणार नाहीं. या साठीं ते आपला इतिहास यथार्थ स्वरूपानें पाहूं लागले. परकीय इतिहासकार आपल्या देशाचा इतिहास जिव्हाळ्याने कसा लिहिणार? इंग्लिश लोक नेपोलियन यास अधम म्हणतात, तर फ्रेंच लोक वेलिंग्टन यास तुच्छ लेखतात. तेव्हां हे परके लोक आपल्या भारताचा इतिहास असाच विकृत स्वरूपांत लिहिणार यांत शंका नाही. म्हणून प्रथम हा राष्ट्रीय स्मृति तयार करण्यासाठी राजवाडे तयार झाले. परंतु राजवाडे यांची दृष्टि एकांगी नव्हती. अनेक तऱ्हांनी व अनेक दिशांनी आपणांस खटाटोप करावे लागणार हें त्यांस स्पष्ट दिसून येत होतें. परकी लोकांशी टक्कर द्यावयाची म्हणजे आपण त्यांच्या तोलाचे झाल्याशिवाय काहीएक हातून होणार नाहीं असे ते म्हणत. प्रत्येक शास्त्रांत पाश्चात्य लोक पुढे पुढे जात आहेत व आपणांत शास्त्राभ्यास व शास्त्रसंवर्धन करणारा कोणीच पुढे येत नाहीं याचें त्यांस आश्चर्य वाटे. समाजशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहासशास्त्र, रसायनशास्त्र अशा प्रकारच्या सर्व शास्त्रांच्या अध्ययनांत गति करून घेतल्याविना आपला तरणोपाय नाहीं असें ते म्हणत. ही कामें एकेकट्याने होणार नाहीत. म्हणून त्यांनी संघटना करण्याचेही प्रयत्न केले. त्यांनी अनेक मंडळे स्थापन केली. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नमुन्यावर धुळें, अंमळनेर वगैरे ठिकाणी त्यांनी संस्था स्थापल्या. पुण्यास आरोग्यमंडळ ही सभा त्यांनी स्थापन केली. लोकांचें आरोग्य वाढल्याविना ते सशक्त च कार्यकर होणार कसे? सावकारांच्या तावडीतून कुळास सोडविणारें- हलक्या दराने कर्ज देणारें मंडळ त्यांनी काढलें होतें. रेल्वेसंबंधी उतारूंच्या तक्रारी दूर करणारें मंडळ त्यांनी काढलें होतें समाजशास्त्र मंडळ हें समाजाच्या सर्व अंगांचा विकासैक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी त्यांनी काढलें होतें. शिक्षाविचार मंडळ हें शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या चर्चा करण्यासाठी त्यांनी काढले होतें. भौतिकशास्त्र संशोधन मंडळ, हें त्यांनी काढले व स्वतः त्यास १०० रुपये दिले. ज्ञानेश्वरी मंडळ ज्ञानेश्वरीसंबंधी चर्चा करण्यास होते. अशा प्रकारें निरनिराळ्या कामांत लाकानी भाग घ्यावा म्हणून त्यांनी अनेक मंडळें स्थापिली. परंतु या मंडळापैकी किती कार्यकर्ती झाली? किती मंडळांवर राजवाडे यांचा संबंध राहिला? या अनेक मंडळांपैकीं पुण्याचें भारत- इतिहास- संशोधकमंडळ, आरोग्य मंडळ व शिक्षा विचार मंडळ हीं तीन मंडळेच जिवंत आहेत. भा. इ. संशोधक मंडळ आतां मरणार नाही. त्यास प्रो. पोतदार यांसारखे उत्साही कार्यकर्ते लाभले आहेत. शिक्षा विचार मंडळाच्या पुण्यास मधून मधून सभा होत असतात; तसेंच आरोग्यमंडळ वझे व नंतर नुकतेच कैलासवासी झालेले भट यांनी नावारूपास आणिलें होतें. बाकींची मंडळें राजवाडे ह्यांच्या हयातीतच आटोपलीं व जीं शिल्लक आहेत त्यां मंडळांजवळही त्यांचा संबंध उरला नव्हता. मंडळे स्थापन करणें हें एक काम व मंडळे चालविणें हें दुसरें काम. राजवाडे यांच्याजवळ तडजोड नसे. त्यांना अंगमोड व पदरमोड करणारी माणसें आवडत. कार्यार्थ ज्यांस तळमळ लागली आहे असे लोक त्यांस पाहिजेत. कार्य करण्याची त्यांची तडफ, त्यांचा उरक इतरांस नसे. इतरांच्या फावल्या वेळांत देशकार्य करण्याच्या प्रवृत्तीचा त्यांस संताप येई. व मग आपणच एकटे दुसऱ्यांवर न विसंबतां आपल्याच सान्निपातिक तडफेने व जोरानें काम करू लागत. रें रें करीत काम करणे हें त्यांस सहन होत नसे. त्यांना डॉ. जॉन्सन याप्रमाणें जगाचें, जगांतील लोकांच्या मनोवृत्तीचें ज्ञान नीट झालें नाहीं. डॉ. जॉन्सन लोकांवर प्रथम असाच संतापे. परंतु तो पुढे कमी संतापू लागला; कारण तो म्हणतो. "जगापासून मी अपेक्षाच थोडी करितों- त्या मुळे आतां जग मला चांगले दिसूं लागलें आहे " जॉन्सनला मनुष्य स्वभाव कळला. हा जात्याच आळशी सुखलोलुप आहे. राजवाडे यांस हा लोकांचा स्वभाव कळला असेल: परंतु तो कळून जॉन्सन प्रमाणे ते संतुष्ट न होतां उलट जळफळत. लोकांचा त्यांस तिरस्कार वाटे. गुलामगिरीमध्येच गौरव मानूं पाहणारे आपले भाईबंद पाहिले म्हणजे त्यांच्या स्वाभिमानी मनाचा भडका होई. यामुळे ही सर्व मंडळें स्थापूनही कार्य करावयास लोक तयार नाहींत हें पाहून ते पुनरपि एकाकीच काम करूं लागले.
 मंडळे जमवूनच सर्व काम होईल असें त्यांस वाटत नव्हते. मंडळें निर्माण करून कांही मंडळी कार्याथे तयार करणें म्हणजे निम्में काम झाले असे ते म्हणत. ते लिहितात "संशोधनार्थ विद्वान निर्माण करणे आणि त्यांची व सहानुभविकांची मंडळे स्थापण्याचे कार्य थोडें फार झाले आहे. परंतु एवढ्याने संपत नाही. देशांत संशोधक मंडळें व संशोधक यांची संख्या वाढली म्हणजे पन्नास हिस्से फत्ते झाली. बाकी राहिलेली पन्नास हिस्से फत्ते एका बाबीवर अवलंबून आहे. ती बाब म्हणजे द्रव्यबल. द्रव्यबलासाठीं देशांत मायेचें व जिव्हाळ्याचें Home-rule स्वराज्य होण्याची आवश्यकता नितांत भासमान होते." स्वतंत्र देशांत निरनिराळ्या संशोधकांस व संशोधक मंडळास केवढा सरकारी पाठिंबा असतो हें पाहून राजवाडे यांचा जीव तुटे. आपल्या देशांतील सरकार तर बोलून चालून परकी. विद्येच्या अभिवृव्यर्थ, शास्त्र प्रसारार्थ तें जनतेस कसें साहाय्य करणार? परंतु सरकारनें कानावर हात ठेविले देशांतील लोकांनी या शास्त्रसंवर्धनाच्या कार्यास हातभार नको का लावावयास? राजवाडे संतापून लिहितात- "विद्या वृद्ध्यर्थं द्रव्य कां, कसें व कोठें खर्चावें हें समजण्याची अक्कल अद्याप लोकांना, राजांना, परिषदांना व सभांना फुटावयाची आहे. कबुतरे, वारवनिता, पेहेलवान, तमाशेवाले यांची पारख धनिकांना होऊं शकते. विद्वान्, संशोधक व विचारदृष्टे यांना ओळखण्याची इंद्रियें अद्याप राजांना व परिषदांना आलेली नाहींत. ती आली म्हणजे वागीश्वरांची ओळख धनेश्वरांना पटून शास्त्रें, कला, ज्ञानप्रसार व विदग्ध वाङ्मय यांनी भूमि फुलून जाईल." आपल्याकडील धनिक वर्ग देशकार्यास व शास्त्रकार्यास मदत करीत नाहींत याचें त्यांस आश्चर्य वाटे. लोक नाटकें, तमाशे व सिनेमा यांस पैसे खर्चतात, परंतु या देशकार्यार्थच त्यांस उदासिनता कां येतें? राजवाडे म्हणतात 'दुष्काळानें व महर्गतेनें पोटभर अन्न न मिळाले तरी चालेल; परंतु भांडी विकून व बायको गहाण ठेवून नाटके पाहाणारे कारागीर ज्या देशांत फार झाले तो देश पक्का वेडा बनला असला पाहिजे. यांत बिलकूल संशय नाहीं. दहा वर्षांच्या खटपटीने पैसा फंडाचे महाराष्ट्रांत आठ हजार मिनतवारीने जमतात; एकट्या मुंबईतील सर्व नाटक कंपन्यांचे आठवड्याचें उप्तन्न वीस हजारावर आहे! (विश्ववृत्त सप्टेंबर १९०७)' राजवाडे यांना लोकांच्या या कर्तव्याच्या विस्मृतीची चीड येई. त्यांचा स्वतःचा जीव भारतवर्ष प्राचीन वैभवानें पुनरपि विलसूं लागेल त्याच्यासाठी तळमळत होता. इंग्रज सरकारास घालवून देऊन देश देहानें, मनानें, बुद्धीनें स्वतंत्र कसा होईल याचीच तळमळ त्यांस लागन राहिली होती. 'हिंदुस्थानांतून इंग्लिशांस घालवून देणें हेंच सुशिक्षित हिंदवासीयांचें आद्य कर्तव्य होय.' असें त्यांनी स्पष्टपणे एके ठिकाणीं लिहिलें आहे. इंग्रजांस लाथा मारून घालवून देण्याची शक्ति आमच्यांत आल्याशिवाय आमचा तरणोपाय नाहीं असें ते म्हणत. त्यांचे ध्येय हें अशा प्रकारचे आहे. या ध्येयार्थ त्यांनी सर्व आयुष्य खर्च केलें. रसायन शास्त्रांसारख्या शास्त्रांचा आपण अभ्यास केल्याविना इंग्रजांस देशाबाहेर घालविण्यास आपण समर्थ होणार नाहीं हें ते तरुणांस पुनः पुन्हा सांगत. रसायनशास्त्र, इतर भौतिकशास्त्रे यांत पारंगत व्हा. सर्व कला आपल्याशा करा, असें ते विद्यार्थ्यांस वारंवार बजावीत. याच कार्यासाठी त्यांनी रासायनिक मंडळ ही पुण्यास काढलें होतें परंतु लोकांस हौस व उत्कंठा लागली आहे कोठें? एका प्रचंड प्रयोग शाळेत अनेक विद्यार्थी निरनिराळे शोध लावीत आहेत व त्यांच्यावर आपण देखरेख करीत आहोत; जगाच्या ज्ञानांत भर पडत आहेत- अशा सुखस्वप्नांत त्यांचा आत्मा तरंगत असे. परंतु वस्तुस्थिति कशी होती? रसायन शास्त्रांतील नैपुण्य मिळविण्याऐवजी त्यांस जुनी इतिहासाची दफ्तरे झाडण्याचें काम करावें लागलें. राजवाडे म्हणत 'मी श्रीमंत व लखपति असतो तर मोठा रसायनशास्त्रवेत्ता झाले असतो; परंतु भिकारी असल्यामुळे इतिहास संशोधनाचा व भाषा संशोधनाचा बिनभांडवली धंदा मला पत्करावा लागला.' मरावयाचे आधीं कांही दिवस ते सृष्टिशास्त्र, रसायनशास्त्र यांवरील ग्रंथ वाचूं लागले होते व आपण आतां मोठे रसायनशास्त्रवेत्ते होऊ असें ते ह्मणत.
 त्यांची बुद्धि सर्वंकषा असल्यामुळे ती कोणत्याही शास्त्रांत अंकुठित रीतीनें चाले. लोक निजले आहेत, घोरत आहेत असे पाहून तेच निरनिराळ्या शास्त्रांस चालना देत. इतिहास संशोधन, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, रसायनशास्त्र सर्वत्र त्यांची दृष्टि होती. हेतू हा की निरनिराळ्या लोकांपुढे निरनिराळी कार्यक्षेत्रे मांडावी. त्यांची प्रतिभा दिव्य व ज्ञानचक्षू निर्मळ यामुळे एकाच विषयाची निरनिराळी अंगें आपल्या ओजस्वी निबंधांतून ते लोकास सांगत. सर्व शास्त्रांस त्यांनी गति दिली; चालना दिली. असा चतुरस्त्र महाधी पुरुष महाराष्ट्रांत झाला नाहीं.
 त्यांनी स्वतः प्रचंड काम केलें. परंतु अद्याप किती तरी काम झालें पाहिजे असें ते म्हणत. पूर्ववैभव, प्राचीन पूर्वजांची थोर स्मृति लोकांच्या अंतरंगी जागृत करून त्यांस कार्यप्रवण करावयाचे होते. आलस्य व किंकर्तव्यमूढता त्यांस घालवून द्यावयाची होती. राजवाडे लिहितात 'तात्विक हवेच्या संन्यासप्रवण व मांद्योत्पादक दाबाखाली चिरडून गेल्यामुळे प्रपंचाची म्हणजे इतिहासाची हेळसांड करण्याकडे लोकांचा जो आत्मघातकी कल आहे, तो घालविण्यासाठी इतिहासज्ञानप्रसाराची व तत्साधन प्रसिद्धिची आवश्यकता सध्यां विशेषच आहे असें माझें ठाम मत आहे. काल, देश, कूळ या त्रिविध दृष्टिने भारतवर्षाच्या व महाराष्ट्राच्या नानाविध चरित्राचा अफाट विस्तार पाहतां, आजपर्यंत प्रसिद्ध झालेलीं साधनें जलाशयांतून एखाद्या बेडकानें मोठ्या प्रयासाने आपल्या शूद्र ओंजळीत वाहून आणलेल्या बिंदूप्रमाणे आहेत. त्या बिंदूमात्रानें संन्यास प्रवणतेची मलीन पटलें धुवून जाणार कशी? हें मालिन्य साफ नाहीसें करावयाला जलाशयांतून शेंकडों मोठमोठे पाट फोडून संन्यास प्रवणतेवर सतत सोडून दिले पाहिजेत " राजवाड्यांचा सर्वव्यापी अनिरुद्ध खटाटोप लोकांस कार्यप्रवण करण्यासाठी होता. महाराष्ट्रांत जी एक कार्यनिरिच्छता उत्पन्न झालेली आहे तिचा निरास करण्यासाठी राजवाडे खपले व ती नाहींसी करण्यासाठीच टिळकांनी गीतारहस्य लिहिले. साधु संतांच्या उपदेशानें महाराष्ट्र संन्यासप्रवण झाला; स्वाभिमान त्याने सोडला असे कधीं कधीं राजवाडे म्हणत. तथापि सतांची खरी कामगिरी त्यांच्या डोळ्यांआड नव्हती. "शिवकालीन समाज रचना" या निबंधांत राजवाडे लिहितात "अठरापगड जातींचे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्वधर्मभ्रष्ट झाले असतां ते बहुतेक मुसलमान बनल्यासारखेच झाले इतकेंच की, त्यांनी सुंतेची दीक्षा मात्र घेतली नाहीं. तीही त्यांनी घेतली असती परंतु त्यांच्या आड एक मोठी धोंड आली. ती धोंड महाराष्ट्रांतील साधु व संत हे होत. भांडणे, तंटे, अपेयपान, अभक्ष्यभक्षण यांचें साम्राज्य सर्वत्र मातलेले पाहून ही बजबजपुरी काहींतरी ताळ्यावर यावी या सद्धेतूनें साधुसंतांनी सर्वांना सहजगम्य व सुलभ असा भक्तिमार्ग सुरू केला. धर्मज्ञान लोपलें होतें; विधिनिषेधाची प्रतिष्ठा राहिली नव्हती; प्रायश्चित्तास कोणी पुसत नव्हतें. अशी सर्व प्रजा वृषलवत् अथवा बहुतेक म्लेंछवत् बनली होती. ही प्रजा सनातन धर्मास व आर्य संस्कृतीस सोडून जावयाच्या पंथाला लागली होती. बरेच सोडून गेलेहि होते. बाकी राहिलेल्या लोकांचा मगदूर पाहून साधुसंतांनी परम कारुणिक बुद्धीनें भक्तिमार्ग सुरू केला. सद्धेतूनें कीं, कसेंहि करून हे लोक पुनः कर्मनिष्ठ बनण्याचा संभव राहावा. संतांनी वर्णाश्रमधर्मलोपप्रधान अशी ही महाराष्ट्रांतील दुर्दैवी प्रजा दोन अडीचशे वर्षे आर्यसमाजांत मोठ्या शिताफीनें थोपवून धरिली व आर्यसंस्कृतीचें रक्षण केलें. तेव्हां संतांनी आपल्या या देशावर उपकार बिनमोल केले यांत काडीचाहि संशय नाहीं. संतानी प्रजेची बुद्धि धर्मांत ठेविली. परंतु ती प्रपंच प्रवण केली नाहीं. पुढें ऐतिहासिक तत्त्वज्ञानाचा म्हणजे प्रपंच व परमार्थ यांच्या एकवाक्यतेचा उदय रामदासांच्या हस्तें झाला. एकनाथ तुकारामादि संतांचे कार्य व रामदासांचे कार्य हें परस्पर सापेक्ष आहे. संतांनीं मुसलमानी धर्मापासून जनतेचे रक्षण केले नसते, स्वधर्मनिष्ठ त्यांस ठेविलें नसतें. तर रामदासांनी तरी 'विद्या, व्याप, वैभव" याचा उपदेश कोणास केला असता? असो. तर राजवाडे यांना संताच्या कामगिरीची किंमत कळत होती. परंतु लोक जेव्हां खरें कार्य विसरून संतांच्या पाठीमागे लपण्याचा मार्ग स्वीकारतात त्याचा त्यांना तिरस्कार वाटे. ही संन्यास प्रवणता, आहे त्यांतच खितपत पडून राहण्याची प्रवृत्ति राजवाडे यांस नाहीशी करावयाची होती व यासाठीच त्यांनां प्राचीन इतिहासाची स्मृति जागी करावयाची होती. प्राचीन इतिहासाची स्मृति जागी करून पूर्व वैभवाचें यशोगान करून, त्याप्रमाणेच पूर्वीच्या चुका स्पष्टपणें दाखवून स्वाभिमानपुरस्सर नवीन कार्याचा पाया घालणें हें त्यांचें जीवित कार्य होते. सर्व जन्मभर देशाहितकारक कामगिरी व्हावी म्हणून या थोर पुरुषास काण कळकळ असे. ते आपल्या एका उद्घोधक टिपणांत लिहितात 'आषाढ शुद्ध अष्टमीस या विशाला नवें ४६ वें वर्ष लागले. ५४ वर्षे राहिली. त्यांत सर्व जगताला हितकारक व राष्ट्राला पोषक अशी कृती होवो. आजपर्यंत फक्त राष्ट्रीय स्मृति तयार करण्यांत काळ गेला. यापुढे कृति, कृति, कृति झाली पाहिजे. नाही तर व्यर्थ! चाळीस वर्षे आणखी सतत मेहनत झाली पाहिजे. आरोग्य, उत्तम हवा, उत्तम पाणी, उत्तम जागा, उत्तम शुद्ध अन्न ही मिळाली तर हेंही होईल. ईश्वराची कृपा अपरंपार पाहिजे' याच टिपणाच्या दुसऱ्या बाजूस १८९४ पासून १९०९ पर्यंत केलेल्या कामगिरीचा तपशील दिला आहे व ७५०० पृष्ठे आतापर्यंत मजकूर लिहून झाला- छापला असे सांगितले आहे. या थोर पुरुषाची राष्ट्रकार्याबद्दलची ही तळमळ पाहून कांहीतरी करण्याची स्फूर्ति कोणास होणार नाहीं? हा उदारभाव, हा आशावाद मेलेल्यासही चैतन्य देईल. परंतु आम्ही मेलेल्याहून मेलेले आहोत; त्यास कोण काय करणार? राजवाडे औंध येथे श्री. वैदिक पंडित सातवळेकर यांच्याजवळ राहणार होते. सातवळेकर त्यांस एक आश्रम बांधून देणार होते. तेथें राहून राजवाडे यांच्या मनांतून एक मासिक चालवायाचें होतें. वैदिक, पूर्ववैदिक, उत्तर वैदिक इतिहास यांत येणार होता. ऐतिहासिक व समाज विषयक शास्त्रपूत वृत्तान्त या मासिकांत यावयाचा होता. या मासिकांत दरमहा १०० पानांचा मजकूर ते स्वतःच देणार होते. महाभारत, ब्राह्मणे या कालांतील अनेक गोष्टींवर शेकडों निबंधाची रूपरेखा त्यांच्या मनांत होती. तसेच वेदमंत्रांचे वर्गीकरण करून संगति लावून आपण स्वतः बसविलेल्या उपपत्तीप्रमाणे वेदांचा खरा अर्थ करून दाखवावा व या विषयावर हजार दोन हजार पानांचा ग्रंथ लिहावा असा त्यांचा मनोदय त्यांनी सातवळेकरांजवळ अनेकदा व्यक्त केला होता. त्याप्र माणेच आर्य लोकांच्या विजयाचा एक मोठा ग्रंथ ते लिहिणार होते, या ग्रंथाची त्यांनी खालीप्रमाणे रूपरेखा आखली होती.
 १ क्षेत्रांतील पंड्यांच्या वह्यांवरून अखिल हिंदुस्थानांतील आर्यांची आडनांवें संगतवार लिहून काढणे व त्यांचे सामाजिक वर्गीकरण फार काळजीपूर्वक करणें.
 २ नंतर हिंदुस्थानांतलि बाहेरच्या देशातील गांवांची नांवें पाहून त्या आडनांवाचा व त्या स्थानांचा संबंध ऐतिहासिक व सामाजिक दृष्टीनें निश्चित करणे.
 ३ शक्य तितक्या अधिक गांवांचें अति प्राचीन नांव शोधून काढून आर्यांच्या हालचालीच्या दृष्टीनें त्यांचे महत्व निश्चित करणे.
 ४ या व अशा अनेक महत्वाच्या मुद्यांचें संगतिकरण करून आर्यांच्या एकंदर क्रांतीचे व विजयाचे स्वरूप दाखविणें. अशा प्रकारच्या अलौकिक ग्रंथाला त्यांनी आरंभ केला होता हें मागें सांगितलेच आहे. परंतु त्यांचं हें काम आतां कोण करणार?
 मरेपर्यंत अशी सांस्कृतिक व उब्दोधक कामगिरी ते करणार होते. ८५ वर्षेपर्यंत ही कामगिरी करून मग ते एकान्तवासांत रहाणार होते. केवढा हा आत्मविश्वास व आयुष्याच्या सार्थकतेसंबंधी कोण ही महनीय खटपट.
 या सर्व श्रमांची गुरुकिल्ली आपल्या समाजास जागें करणें यांत आहे. या बाबतींत ते कधी कधी उद्विग्न होत व हताश होत. परंतु पुनरपि प्रयत्नास लागत. शारदामंदीराच्या अध्यक्षस्थानी असतां त्यांनी मराठी भाषेचे व एकंदर भारतवर्षाचें एक दुदैवी चित्र काढले होते. मराठी भाषा मरत जाणार व हिंस्थान म्हणजे गुलाम व मजुरांचे राष्ट्र होणार असा भयसूचक व्युगूल त्यांनी वाजविला. परंतु अशी निराशा दिसत असूनही ते प्रयत्न अखंड करीत होते. निराशेची आशा त्यांज्या जवळ होती. दामले यांच्या व्याकरणाचे परीक्षण करून ते शेवटी म्हणतात 'प्रत्येकाने आपापले काम स्वतःच करावें हें श्रेयस्कर, कां कीं, प्रस्तुत काली आपल्या देशांतली परिस्थितीच अशी आहे. कोणतेही शास्त्रीय काम करण्याला ह्या देशांत प्रायः अनेक तर सोडून द्या पण अर्धाहि माणूस तयार झाला नाहीं. तेव्हा श्रमविभाग होण्याची आशा करणें आणीक पन्नास शंभर वर्षे ह्या देशांत अयुक्त होय. कधी काळी चुकून माकून एखाद्याच्या मनांत कांहीं शास्त्रीय कृत्य उठविण्याचें सुदैवानें मनांत आले व मनांत येऊन त्या कृत्याचा अंत पाहण्याचा उत्साह त्याच्याठायीं वर्षोनवर्ष कायम राहिला तर त्याने ह्या देशांत इतर कोणाच्याही साहाय्याची अपेक्षा करूं नये हें उत्तम. कारण साहाय्य होण्यासारखी परिस्थिती नाहीं. एका काळच्या ह्या शास्त्रीय भूमीत सध्या शास्त्राचा अत्यन्त लोप झालेला आहे. प्रायः ह्या देशांतील यच्चयावत लोकांची स्थिति आफ्रिकेतील निग्रोंच्या स्थितिच्या जवळ जवळ आलेली आहे. ज्यांना ग्राजुएट म्हणून म्हणतात त्याच्याजवळही शास्त्र नाहीं व ज्यांना शास्त्री म्हणतात त्यांच्याजवळही शास्त्र नाहीं. एक पाश्चात्य सटर फटर पुस्तकें वाचून घोकून खर्डेघाश्या गुलाम बनलेला आहे व दुसरा पौवार्त्य ग्रंथ घोकून मद्दड झालेला आहे. अशा ह्या दुहेरी, कंगाल समाजाला सुधारण्याचें म्हणजे शास्त्रीय स्थितीस नेण्याचें बिकट कृत्य, कोणाचेहि साहाय्य मिळण्याची आशा न करि तां पार पाडावयाचें आहे. राजकीय, सामाजिक, वाङ्गमय वगैर कोणतेंहि कृत्य ह्या देशांत ज्या कोणाला करण्याची उमेद आली असेल त्याने अंगिकारिलेल्या कृत्याच्या विस्ताराचा अंदाज घ्यावा, त्यांत व्यंगें व दोष कोठें आहेत त्याची विचक्षणा करावी, व ते दोष, व्यंगें काढण्यास स्वतांच लागावें, इतर कोणींची वाट पाहूं नये. कारण ममतेनें धावून येण्यास कोणीच नाहीं. स्वजनहि नाहींत व परजन तर नाहीतच नाहींत. अशी एकंदर फार हलाखीची स्थिति आहे. आणि ही स्थिति कांहीं उत्साह विघातक नाहीं. संकट यावें तर असेच यावे. ह्या संकटांतच आपल्या कर्तबगारीची खरी परिक्षा आहे."
 राजवाडे यांस सर्व शास्त्रांची कशी जरूर भासे हेही त्यांनी वरील लेखांतच पुढे लिहिलें आहे. ते लिहितात "व्याकरणशास्त्रावांचून सध्या काय अडलें आहे, असा बालिश प्रश्न कोणी कोणी करतात. त्यांना उत्तर एवढेच की हरएक शास्त्रांवाचून तर देशाचे सर्वत्र नडत आहे; जितकें रसायनशास्त्रावाचून नडत आहे, जितकें राज्यशास्त्रावांचून नडत आहे, जितकें युद्धशास्त्रावांचून नडत आहे, तितकेंच व्याकरण शास्त्रावांचूनहि नडत जाहे" राष्ट्राच्या प्रगतीला व व्यवहाराला सर्व शास्त्रांची जरूरी आहे. हे लक्षांत आणूनच राजवाडे अकुंठित गतीनें वनराजाप्रमाणे सर्व ज्ञानक्षेत्रांत अनिरुद्ध विहार करते झाले. भारतीयांच्या शब्दालाहि मान ज्ञानक्षेत्रांत मिळावा ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. भारतीयांचा देह पारतंत्र्यात असो; पण मानसहंस तरी स्वतंत्र होवो हें त्यांचे दिवारात्रीचें स्वप्न होतें. भारतीयांच्या विचार विहंगमास ज्ञानाच्या गुलामगिरीतून त्यांनी मुक्त करावयाचे कठिणतर कर्तव्य स्वीकारले होते. बंगालमध्यें आशुतोष मुकर्जी यांनी जें कार्य केलें, तेंच कार्य एकाकी राजवाडे यांनी महाराष्ट्रांत दृढमूल करण्याचा प्रयत्न केला. राजवाडे यांचा स्वभाषावलंबाचा मार्ग मात्र आशुतोषजींच्या मार्गापेक्षां निराळा होता. आशुतोष यांनी बंगाली भाषेस उत्तेजन दिलें. परंतु इंग्रजी लिखणावर त्यांचा कटाक्ष नसे. या कठोर कर्तव्यास्तव ते आमरण कष्टत असतां सुसंपन्न ग्राजुएटही सरकारच्या कच्छपी कसे लागतात याचें त्यांस राहून राहून नवल वाटे. आपला भिकारडा चारित्र्यक्रम तिरस्कृत मानावा असें ते या ग्राजुएटस सांगतात, "जोपर्यंत शास्त्रांत तुम्ही गति करून घेणार नाहीं तोंपर्यंत तुमच्या तरणोपायाची आशा नाहीं" असे त्यांचे शब्द आहेत स्वराज्याच्या गप्पा मारणारे व गुलामगिरीचे दिवसभर काम करून रात्री देशभक्तांच्या कामाची उठाठेव करणारे लोक त्यांस तिरस्करणीय वाटत ते म्हणत दिवसभर राज्ययंत्र चालविण्यासाठीं त्यास तेल घालीत असतां व रात्री मात्र त्या राज्ययंत्राचा वाचिक निषेध करितां- यांत काय अर्थ आहे? कधीं कधीं संतापून ते या लोकांस Biped द्विपाद पशू अशी संज्ञा देत. काय, शाळेत मास्तर आहांत- गाढव आहांत झाले. असे ते स्पष्टपणे म्हणत. कारण शाळेत शिकून सरकारचें राज्ययंत्र सुरळीत चालविणारे गुलामच बाहेर पडणार ना असे ते म्हणत जोपर्यंत हा गुलामाच्या उत्पत्तीचा धंदा तुम्ही सोडला नाहीं तोंपर्यंत तुम्ही पशूच नाहीं तर काय असे राजवाडे बेमुर्वतपणे म्हणत- यांतील इंगित वाचकांच्या लक्षांत येईलच.
 स्वाभिमानशून्य जिण्याची त्यांस लाज वाटे. जदुनाथ सरकारासारखे गाजलेले इतिहास लेखक शिवाजीस 'शिवा' संभाजीस 'संभा' असे मुसलमानांच्या पद्धतीचे अवलंबन करून लिहितात याचा राजवाडे यांस मनस्वी संताप येई. मुसलमानात शिवाजी हा काफर वाटे, परंतु सरकार तरी हिंदू रक्ताचे व हिंदू संस्कृति संरक्षण करणाऱ्याचा अभिमान बाळगणारे आहेत ना? मग या महाराष्ट्रास स्वातंत्र्य मंदिरांत नेऊन बसविणाऱ्या श्रेष्ठतम पुरुषांस सरकार असें हीन तऱ्हेनें कसें संबोधतात? आपल्या मधीलच पुढारी व विद्वान् समजले जाणारे लोक जर असें वर्तन करीत असतील तर मग कसली आशा राहिली? परकीय लोक तर हिंदुस्थानांतील सर्वत्र गोष्टींस नांवें ठेवणार. राजवाडे एके ठिकाणी लिहितात "कार्ल्याची व वेरूळची लेणी केवळ हिंदुस्थानांतील म्हणून तीं साहेबास त्याज्य व पै किंमतीची. काश्मीर किंवा महाबळेश्वरसारख्या ठिकाणची शोभा केवळ हिंदुस्थानांतील म्हणून रद्दड. शंकराचार्य, भास्कराचार्य हिंदुस्थानांत जन्मले म्हणून तुच्छ"- असे साहेबास हिंदुस्थानांतील वस्तूंचे वावडे असतें. परंतु स्वजनच जेव्हां आपल्या थोर पूर्वजांबद्दल अभिमान व पूज्यबुद्धेि दाखवितनासे होतात तेव्हां काय रडावयाचें ही स्थिति पाहून, नैराश्यतिमिर पसरलेले पाहून, कोणी कार्यकर्ता पुढे येत नाहीं असें पाहून राजवाडे कां संतापून जाणार नाहींत? त्यांस सर्व स्वजन तुच्छ कां वाटणार नाहीं?
 असो. तर राजवाड्यांची मनोवृत्ति देशाभिमानाने प्रेरित झालेली होती. त्यांस पूर्वजांचे दुर्गुण स्पष्टपणे दिसत होते. शास्त्रसंवर्धन केलें नाहीं, कार्यप्रवणता ठेविली नाही, उद्योगधंदे, कारखाने, जगाकडे पाहून विनिर्मिले नाहीत या सर्व चुका ते कबूल करितात. संघशक्ति, थोर उदार विचारांचा पुरस्कार एक रामदास सोडले तर झाला नाहीं वगैरे चुका ते मानतात. परंतु पूर्वजांच्या चुका असल्या तरी त्यांची कर्तबगारी पण नांव घेण्यासारखी आहे. प्राचीनकाळ तर सोडूनच द्या. पाणिनि, पतंजलि, राम, कृष्ण, शंकर, रामानुज यांचा काळ आपण सोडून देऊं या महाविभूतींचा जन्म या थोर देशांत झाला म्हणून अभिमान पाहिजेच परंतु अर्वाचीन काळांतही पराक्रमी व कार्यधीर पुरुष झाले. त्यांची विस्मृति करून कसें चालेल? विशेषतः राजवाडे यांस मराठेशाहीतील तीन व्यक्तींबद्दल फार आदर वाटे. श्री छत्रपति शिवाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, व श्रीमंत थोरले माधवराव साहेब पेशवे– या तीन विभूति- म्हणजे तीन परमेश्वरच त्यांस वाटत. महाराष्ट्रानें आपल्या हृदय मंदिरांत या तीन देवतांची सदैव पूजा करावी; त्यांच्या कार्याचें मनन करावें व त्यापासून आपली चुकती पाऊले मार्गावर आणावीं. राजवाडे हे आपल्या संध्येनंतर यांतील विभूतींचें तर्पण करीत. प्राचीन ऋषींच्या नांवानें व आपल्या पूर्वजांच्या नांवें आपण तर्पण करितों. या त्रिमूर्ति म्हणजे महाराष्टाचे ऋषि होत. राजवाडे यांचें अंतःकरण या दिव्य मूर्तीच्या पराक्रमानें भरून येई यांत नवल नाहीं. कारण त्यांचें हृदय स्वदेश प्रीतीच्या शुद्ध मंदाकिनीनें भरलेलें होतें. स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश- यांच्या बद्दलची जिवंत कळकळ, अकृत्रिम प्रेम होतें. याच प्रेमाच्या जोरावर, याच कळकळीच्या कैवाराने त्यांनी अफाट कामगिरी एकाकी राहून केली. त्यांनां अंतःकरणांत स्फूर्ति देणारी, चालना देणारी, प्रेरणा देणारी प्रेरक शक्ति- स्वधर्म, स्वदेश व स्वभाषा यांशिवाय अन्य कोणती असणार?
 देशाभिमानपूर्ण, जाज्वल्य व प्रखर अशा देशसेवेस वाहिलेला हा थोर पुरुष कशा मनोवृत्तीचा होता, त्यांच्या सर्व व्यवहारांतही कोणतें सूत्र अनुस्यूत होते हें वाचकांच्या ध्यानांत आले असेल. ही स्वदेशाची भावना, हा बाणेदारपणा, हा करारीपणा, निःस्पृहपणा त्यांच्या इतर बारीकसारीक गोष्टींतही कसा दिसून येई हें पुढील प्रकरणी पाहूं.



प्रकरण ७ वें
स्वभावाशी परिचय.


 राजवाडे यांची राहणी साधी व स्वच्छ असे. त्यांचा आहार शुद्ध व सात्विक असे. ते बहुतेक हाताने स्वयंपाक करीत, कधी कधी ते भात दुधात शिजवीत. मग त्या भातावर पुष्कळसा मध व तूप ओतून ते जेवीत. त्यांस मध भातावर फार आवडे. जेवणांत दूध तूप वगैरेंचा ते फार उपयोग करीत. परंतु नेहमीच असा आहार घेता येत नसे. वाईस प्रथम ते शोधावयास गेले, त्या वेळेस एक चिपटे तांदुळ घेऊन त्याचा भात करून नुसता खात; आणि ते म्हणत 'रोजच्या खर्चास मला तीन दिडक्यांचे सांदुळ असले म्हणजे झालें. तीन पैशांत मला जगांत धडधाकट राहतां येईल.' नेहमीच अशा दरिद्रावस्थेत त्यांस रहावें लागे असें नाहीं. परंतु सर्व प्रकारच्या परिस्थितीत रहावयास ते तयार असत. महिन्याचा त्यांचा भोजन खर्च कधीं कधीं कमीत कमी १० रुपये तर जास्तीत जास्ती ३० रुपये पर्यंत जाई. त्यांचा सर्व खर्च त्यांच्या पुस्तक प्रकाशनांतून बाहेर पडत नसे; त्यांना इतर मदत घ्यावी लागे. त्यांच्या वडील भावांची-वैजनाथपंत राजवाडे यांची त्यांस मदत होत असे. इतरां जवळून होता होई तों त्यांनीं कधीं पै घेतली नाहीं. कारण दुसऱ्यांचे मिंधे राहणें हें त्यांस कधीं खपत नसे. मिंधेपणा म्हणजे मरण असे ते म्हणावयाचे.
 त्यांची प्रकृति दणगट असल्यामुळे त्यांचा आहार चांगला असे. अपचनासारख्या रोगांनी ते कधीं आजारी पडले नाहींत. कधीं कधीं अटीतटीस पडून ते वाटेल तेवढ्या अन्न सामग्रीचा फन्ना उडवीत. एकदा अशीच पैज लागली व राजवाडयांनी १५० केळ्यांचा घड व ५/६ रुपयांची द्राक्षे यांचा फडशा पाडला. त्यांनां फळे फार आवडत. विशेषतः संत्री व केळीं यांची त्यांस मोठी आवड होती. भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगावर त्यांची भक्ति फार होती. या शेंगा, त्याप्रमाणेच संत्री व केळी ते किती खातील त्याचा नेम नसे.
 ते स्वच्छतेचे फार भोक्ते. गलिच्छपणा व गबाळपणा त्यांस तिळभरहि खपावयाचा नाहीं. त्यांचा पोषाख साधा व नीटनेटका असे. एक पंचा ते नेसत. अंगांत एक सदरा व कोट असे. डोक्याला फेटा असे. बरोबर कांबळें अंथरावयास घ्यावयाचें. त्यांच्याजवळ कोट एकच असावयाचा. एखादे वेळी कोट धुवून वाळलेला नसावयाचा- मग ते बाहेर जात नसत. ते स्वतः आपले कपडे पुष्कळ वेळा धुवीत. कऱ्हाडास ज्या ज्या वेळेस असत, तेव्हां कृष्णेवर जाऊन ते आपले कपडे धुवून आणीत. ते हातानें स्वयंपाक करण्याचें पत्करीत. यांत स्वच्छताच हा त्यांचा मुख्य हेतु असे. खानावळीचें अन्न त्यांस पसंत नसे; त्याची त्यांस खंत येई. खानावळी म्हणजे कितपत स्वच्छ असतात हें त्यांत जाणारांस तरी सांगण्याची जरूरी नाहीं. पुण्यास असतां अलीकडे अलीकडे अगदी फार थोडे दिवस त्यांनी एक स्वयंपाक्या ठेविला होता. त्याचे हात वगैरे ते आधी पहात. खरूज वगैरे दिसली तर त्यास ते दूर करीत. त्यांची स्वयंपाकाची भांडीं महाराष्ट्रांत अनेक ठिकाणी ठेवलेली असत. ठिकठिकाणी त्यांच्या उतरण्याच्या जागा ठरल्यासारख्या होत्या. ते फिरावयास जातांना सुद्धां शेतांभातांतून जाणे पसंत करीत. कारण रस्त्यांतून भयंकर धूळ असते. ते म्हणत 'जोपर्यंत आपल्याकडील म्युनिसिपालट्यांस रस्ते शिंपण्याची अक्कल आली नाहीं व आवश्यकता वाटत नाही तोंपर्यत अशा धुळीच्या लोटाने भरलेल्यां रस्त्यांतून चालणें व नासिकारंध्रे भरून घेणे म्हणजे क्षय रोगानें मरण ओढवून घेण्याप्रमाणें आहे.' पुण्यातील रस्ते किती घाणेरडे व मलमूत्रक्लिन्न असतात याविषयीं ते पुण्यांतील एका व्याख्यानांत म्हणाले 'मला या सभास्थानी येईपर्यंत वाटेत घाणीत पाय भरल्यामुळे १०-१२ वेळा पाय नळावर धुवावे लागले.' त्यांना आंघोळ वगैरे करण्यासही पुष्कळ पाणी लागे. एका बादलीभर पाण्यांत काकस्नान करणें त्यांस आवडत नसे. ५-६ घंगाळे पाणी असल्याशिवाय त्यांची आंघोळ व्हावयाचीच नाही. त्यांची शरीर प्रकृति निकोप होती. कॉलेजमध्ये भरपूर व्यायाम घेतलेला असल्यामुळे त्यांची शरीरयष्टि कणखर लोखंडाच्या कांबीसारखी झाली होती. मोठेपणी कधी कधी ते नमस्कारांचा व्यायाम घेत, परंतु पुढे पुढे ते फिरावयास जाण्याचाच व्यायाम घेत. चहा वगैरे अग्निमांद्य आणणाऱ्या पदार्थांचा ते तिरस्कार करीत. ते खेदानें म्हणत "अलीकडील लोकांच्या खिशांत चहा घेण्यास दोन आणे खुळखुळतात; परंतु तेवढ्याच पैशांत अर्धा मूठ बदामगर, दोनचार खडीसाखरेचे खडे, १०।१२ काळी द्राक्षे असा माधवरावी मेवा घेता येईल. (माधवरावी म्हणजे न्या, माधव गोविंद रानडे- यांचा मेवा, रानडे यांच्या खिशांत बदाम, पिस्ते वगैरे असावयाचे) मी हा मेवा घेतो म्हणून तर माझे दंड पीळदार व डोळे पाणीदार आहेत.
 राजवाडे यांचें मुखमंडल पाहून आपणांस इटालियन देशभक्त मॅझिनी यांची आठवण होत असे, असें नरसोपंत केळकर यांनी लिहिले आहे. राजवाडे हे मॅझिनीप्रमाणेच विचार क्रांति घडवून आणणारे व देशभक्त होते. राजवाडे यांची हनुवटी लांब व निश्चय दर्शविणारी होती. डोळे कोठें तरी दूर गेले आहेत असे दिसत. डोळ्यांत एकप्रकारची निःस्पृहता होती. नाक स्वतंत्र वृत्तीचें व तीक्ष्ण बुद्धीचें दर्शक होतें. त्यांचे कपाळ भव्य होते. ते मध्यम उंचीचे होते. एकंदरीत त्यांचे शरीर भक्कम व जोरदार, स्फूर्तीचें घर होतें. या जोरदारपणांतच त्यांच्या आशावृत्तीचें बीज आहे, त्यांचा आत्म विश्वास दांडगा होता. आपण म्हणूं तें करूं असें त्यांस वाटे. अजरामरवत् संकल्प करून ते कार्यास प्रवृत्त झाले होते. आपण पूर्ण शतायुषी होऊन मगच मरूं असें ते म्हणावयाचे. ८०।८५ वर्षे पर्यंत काम करून मग १०।१५ वर्षे एकांतांत विश्रांति घ्यावयाची असें त्यांनी ठरविलें होतें. केवढा हा आत्मविश्वास! निरुत्साही व रडक्या लोकांची त्यांस चीड येत असे. मी आजारी आहें, कपाळ दुखते आहे, कसें काम करावें- असें रडगाणें गाणाऱ्या लोकांस उद्देशून ते म्हणत 'मरा लेको आजच मरा; तुम्ही जितके लौकर मराल तितकें चांगलेच. कारण आपल्या रडगाण्यांनी तुम्ही दुसऱ्यासही नाउमेद करतां. आत्महत्या व परहत्या अशी दोन्हीं पातकें तुम्ही त्यामुळे करीत आहांत" राजवाडे ह्मणजे मूर्तिमंत उत्साह व आशा होय.
 ध्येयशून्य व परप्रत्ययनेयबुद्धि अशा लोकांचाही त्यांस संताप येई. एकदां वऱ्हाडांत एका विद्वान् गृहस्थानें त्यांस विचारलें "मी काय करावें असें तुमचें मत आहे? मी कोणत्या कार्यास लायक आहे असें आपणांस वाटतें?" राजवाडे रागाने म्हणाले 'तुम्ही मरावयास मात्र लायख आहांत.' ज्या गृहस्थास इतके दिवस जगांत राहून आपण कोणत्या कार्यास लायक आहोत हें समजलें नाहीं, तो दुसऱ्यानें सांगितलेल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून काय कार्यांचे दिवे लावणार हें त्यांस दिसतच होतें. आपली बुद्धि, आपली कुवत, आपली हिंमत ओळखून ज्यानें त्यानें आपले कार्यक्षेत्र ठरविलें पाहिजे. दुसऱ्याने सांगून होणार? आपल्यांतील पुष्कळ तरुण लोक असेच असतात. कॉलेजमध्ये ऐच्छिक विषय कोणता घ्यावा हे ते प्रोफेसरास जाऊन विचारतात! निरनिराळी कार्यक्षेत्रे त्यांच्या डोळ्यांसमोर उभी नसतात; व उभी राहिली तरी आपण कोणत्या कार्यक्षेत्रांत काम करण्यास लायक आहोंत हें त्यांचें त्यांस समजत नाहीं. एक नोकरीचे क्षेत्र वगळले म्हणजे अन्य क्षेत्र पांढरपेशांस दिसतच नाहीं. ज्ञानार्जनांतील निरनिराळ्पा क्षेत्रांत धडाडीने उडी घ्यावी व तेथें चमकून देशाचें व स्वतःचे नांव चिरस्मरणीय करावें असें कोणाच्याही ध्यानी मनी येत नाहीं निरनिराळ्या ललितकलांत प्राविण्य मिळवावें हें पण त्यांस पसंत नसतें. व्यापारवृद्धि करून संपत्ति घरास आणण्याचा विचारहि अंतःकरणांत उदयं पावत नाहीं. ही सर्वस्वी निरुत्साही वृत्ति पाहून राजवाडे संतापत यांत नवल नाहीं. महाराष्ट्रांत धडाडीने काम करणारे पुष्कळ लोक नाहीत म्हणून ते निराश होत, परंतु स्वतःच एकडे एकान्तिक निष्ठेनें ते पुढे पाऊल टाकीत होते.
 ज्वलज्जहाल वृत्तीने कार्यास आजन्म वाहून घेणारे कामसू लोक आढळत नाहीत म्हणून ते चिडखोर व रागीट बनले. 'पुरतें कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना' अशा बेदरकार वृत्तीचे ते बनले. कार्य करावयास नको. फुकट मोठाल्या गप्पा मात्र मारावयास पाहिजेत- असे लोकांचें खरें स्वरूप पाहिल्यामुळे ते त्यांच्या जवळ तिरस्कारानें व तुच्छतेने वागत; कधीं कधीं केवळ लहरीपणा पण असे. त्यास कोणी कांही विचारावयास गेलें तर प्रथम त्यास उडवाउडवीची, तुसडेपणाची उत्तरे ते देत. परंतु जर त्यांना असे दिसून आलें की आलेला इसम खरोखर विचार ग्रहण करण्याच्या हेतूनें आला आहे, तो तुच्छ व हीनवृत्तीचा नसून उत्कटता त्याच्या ठिकाणी आहे, तर मग ते त्या गृहस्थाजवळ नीट दोन दोन तासही मनमोकळेपणानें व हास्ययुक्त मुद्रनें बोलत मग त्यांच्या कपाळावरच्या आंठ्या मावळत व भालप्रदेश प्रशांत दिसे. विद्येचें व विद्वत्तेचें मंगल गांभीर्य व तेज त्यांच्या मुखावर दृग्गोचर होई. गाईचा खरा वत्स पाहिजे; नाहीं तर ती लाथच मारावयाची. तसें खरा ज्ञानोत्सुक गृहस्थ पाहिला म्हणजे राजवाडे यांचे होई. एकादां आपल्या तिरसट वागणुकीचे रहस्य सांगतांना ते म्हणाले "अहो, मी लोकांजवळ आधींच शिव्या शाप देऊन बोलू लागतो; म्हणजे मागून त्यांची भीड पडावयास नको. आधी जर गोडी गुलाबीनें, मृदु स्वभावानें लोकांजवळ आपण वागलों तर त्याच लोकांजवळ प्रसंग विशेषीं निःस्पृहपणें बोलतां येत नाहीं. मनांत येतें, काल आपण यांच्याजवळ साळसूदपणाने बोललों, चाललों, मग आतां यांचें मन कसें दुखवावयाचें- अशी भीड- जी भिकेची बहीण म्हणतात– ती पडूं नये व निर्भीडपणे व सडेतोडपणे सर्वांजवळ बोलतां चालतां यावें म्हणून मी कोणास जवळ करीत नाहीं. निःस्पृहस्य तृणं जगत्– या न्यायानें मी वागतों." राजवाडे स्वतंत्र वृत्तीचे होते. कधीं कोणाची पै मी लागत नाहीं या अभिमानाने ते वागले व राहिले. राजा असो रंक असो सर्वांशी त्यांचा खाख्या सारखाच.
 राजवाडे यांच्यामध्यें मनाची एकाग्रता हा गुण फार उत्कृष्टपणें होता. कनक व कांता या मनास व्यग्र व लोल करणाऱ्या दोन वस्तूंपासून तर ते दूर होते. या वस्तूंचा त्यांनी संपूर्णतः त्याग केला होता. त्यामुळे त्यांच्या मनाची एकाग्रता सहजतेनें होई. दहा दहा बारा बारा तास ते मांडी घालून झपाझप बोरूनें कधीं कधीं टाकानेही बंदावर बंद लिहून काढीत. ते मोडींत लिहीत व त्याचे छापण्यासाठीं बालबोध कोणाकडून करून घेत. त्यांचें मोडी अक्षर गोलबंद मोत्यासारखे होतें. त्यांच्या अक्षरास सुंदर वळण असे व ते सहज भासे. असें लिहित असतां आजुबाजूंचा सावळा गोंधळ त्यांस संत्रस्त करूं शकत नसे. एकदां ते इंदूरला गेले होते. ते ज्या खोलींत लिहावयास बसत, त्या खोलीच्या शेजारच्या खोलीत एक शॉर्ट हँड टाइपरायटिंगचा क्लास असे. तेथे पुष्कळ मोठ्याने बोलणे, चालणे होई. आपणांस फार त्रास होत असेल, आपल्या लिहिण्या वाचण्यांत व्यत्यय येत असेल, परंतु माफ करा, असें त्यांस म्हटल्याबरोबर राजवाडे म्हणाले 'त्यांत त्रास कसचा- मला बिलकूल त्रास वगैरे होत नाहीं. मुलें काय व माकडें काय सारखीच. त्यांच्या गोंगाटानें आपलीं डोकीं नाहींशी होता कामा नये. तुम्हीं आम्ही डोक्यानें मजबूत असले पाहिजे म्हणजे झालें.' ते बहुधा सकाळच्या वेळी महत्वाचें वाचन करीत; दुपारी १२ ते ३ पर्यंत किरकोळ सटर फटर वाचीत. सकाळी जे वाचले असेल, त्यावर ते दोन प्रहरीं व सायंकाळीं मनन करावयाचे. कधीं कधीं डोक्यांत एखादा विचार येऊन ते सारखे मननच करीत बसलेले दिसावयाचे. एकदां कऱ्हाडास असतां ते असेच कांहीं गंभीर विचारांत नेहमीं मग्न व गढलेले असत. ते ज्या स्नेह्याकडे उतरले होते त्या स्नेह्यानें विचारलें "अलीकडे सर्व वेळ आळशासारखाच आपण दवडतां एकूण; तुमचें वाचन वगैरे कांहींच हल्लीं नाहीं." त्यावर राजवाडे म्हणाले "अरे आतां पाहशील एकदां लिहावयास लागले म्हणजे कसें लिहिन तें." त्यांची ती शांति समुद्राच्या शांतीप्रमाणे असे. समुद्राची शांती हें भावी वादळाचें जसें चिन्ह समजतात, तसें राजवाड्यांची शांती म्हणजे नवीन क्रांतिकारक विचारांनी वादळ उठविण्याची ती खूण होती. पोटांत, मेंदूंत त्यांच्या विचारांचे थैमान, धुडगूस चालूच असे व या आंतरिक मंथनापासून कांहीं तरी सिद्धांतरूपी नवनीत ते जनता जनार्दनाला अर्पण करीत.
 राजवाडे यांना चातुर्वर्ण्यची उपयुक्तता पटत असावी. समर्थ रामदास स्वामीनीं सबगोलंकार दूर करून चातुर्वर्ण्याची घडी पुन्हां बसविण्याचा प्रयत्न केला. समर्थांना 'एकंकार गजावरि पंचानन' असें म्हटलेले आहे. सब गोलंकाररूपी गजाचा संहार करणारे समर्थ हे पंचानन होते. संत मंडळींनी समत्वाचा प्रसार केला परंतु चातुर्वर्ण्याविरुद्ध त्यांची शिकवणूक नव्हती; त्यांस एवढेंच शिकवावयाचें होतें कीं प्रत्येक वर्णानें वर्णाश्रमानुरूप कर्मे करावीं परंतु आपण वरिष्ठ इतर कनिष्ठ ही वृत्ति सोडून द्यावी. वर्णांनी एकमेकांचा तिरस्कार करूं नये. समाजाच्या हितासाठी एकमेकांनी त्याग वृत्ति स्वीकारून आपापली कर्में करावीत. राजवाडे याच मताचे होते. ते म्हणत 'मी ब्राह्मण आहें, म्हणून मी निःस्पृह वृत्तीनें व निर्धनतेनें राहून ज्ञानार्जनात आयुष्य दवडीत आहे. माझें हें प्राप्त कर्तव्यच आहे. पैशांचा संचय करणें हें माझें काम नव्हे. हांजी हांजी करणे हा ब्राह्मण धर्म नाहीं. मी वाणी झालों असतों तर वाण्याचें दुकान चालविलें असतें; मी व्यापार उदीम केला असता.' या उक्तींत राजवाड्यांच्या आयुष्याचें सार आहे. राजवाडे रहात होते राहात होते त्याप्रमाणें निःस्पृह, निर्धन परंतु ज्ञानधन व मानधन असे वैराग्यवृत्तीचे ब्राह्मण आपणांत किती आहेत? सर्व ब्राह्मण जवळ जवळ शूद्रच झाले आहेत असे म्हटले तर वास्तविक कोणास राग न येता लाज वाटली पाहिजे.
 स्वार्थत्यागाच्या वायफळ गप्पा राजवाडे यांस खपत नसत. स्वार्थत्याग कार्यकर, प्रभावशाली पाहिजे. ज्या स्वार्थत्यागाचा उपयोग नाही त्या स्वार्थत्यागाची कांहीं अदृष्ट किंमत असली तरी प्रत्यक्षाच्या दृष्टीनें तो स्वार्थत्याग अनाठायी आहे. निरनिराळ्या शिक्षण संस्थांतील लोक कमी पगारावर कामें करितात व आपण स्वार्थत्यागी आहोंत असें त्यांस वाटते; परंतु राजवाडे म्हणत "कमी पगार घेतां, परंतु करतों काय? नोकरशाहीचा गाडा सुरळीतपणे चालविणारे गुलामच निर्माण करितां कीं नाहीं? असे हमाल तयार करण्यासाठी केलेला स्वार्थत्याग म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. कारण राष्ट्राची कुचंबणा करणारे जें परकी सरकार, त्याला एकप्रकारें साहाय्यच तुम्ही असे लोक निर्माण करून करतां. असला स्वार्थत्याग अनाठायी आहे. चांगला लठ्ठ पगार घेत जा. ज्ञानक्षेत्रांत काम करून ज्ञानाच्या सीमा वाढवा. परंतु हें कार्य आमचे हे स्वार्थत्यागी विद्वान् कितीसे करतात? निरनिराळ्या कॉलेजांमधून असणाऱ्या आचार्यांनी ज्ञानाच्या कोणत्या शाखांत स्वतंत्र व स्पृहणीय भर घातली आहे? कोणते अभिनव व उदात्त ग्रंथ निर्माण केले आहेत? या सर्व गोष्टींच्या नांवानें जर शून्याकार असेल, त्याचप्रमाणे शाळा कॉलेजांतून बाहेर पडणारे विद्यार्थी सेवावृत्तीस आलिंगन देण्यास उत्सुक, मानहानी मुकाट्यानें सोसणारे, गतप्राण, नेभळट असेच निर्माण होत असतील तर या स्वार्थत्यागाचा उपयोग काय? तेजस्वी व तडफदार अशी तरुणपिढी तरी निर्माण करा की जी पिढी इंग्रजांस लाथ मारून हांकलून देणें हेंच जीवित कार्य मनांत धरून ठेवील, किंवा ज्ञानप्रांतांत तरी अलौकिक कामगिरी करा की जेणे करून भारतवर्ष इतर प्रगमनशील राष्ट्राच्या जोडीनें आपली जागा घेईल. परंतु या दोन्ही गोष्टींपैकी कोणतीहि गोष्ट ज्या स्वार्थत्यागी लोकांकडून- शिक्षण संस्थांकडून होत नाहीं- त्यांनी उगीच मोठेपणाची हौस कशास मिरवावी? राजवाडे अशा स्वार्थत्यागाची टर उडवीत. खरे ज्ञानाचे उपासक आपणांकडे नाहींत म्हणून त्यांस विषण्णता येई. यामुळेंच आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीसारख्या क्रियाशून्य अगडबंब मढ्यास ते न्हावगंड युनिव्हर्सिटी म्हणत. याच विषण्णतेमुळें काशीच्या भारतधर्म महामंडळानें 'पुरातत्त्व भूषण' ही पदवी राजवाडे यांस मोठ्या प्रेमानें दिली असतां, राजवाडे यांनीं तें प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) ज्या नळकांड्यांत होतें तें नळकांडे घेण्याची उत्सुकता दर्शविली नाहीं. श्रमांची योग्यता व विद्वत्तेची खरी किंमत समजणाऱ्या पुरुषाकडून गौरव केला गेला, तर तो गौरव स्पृहणीय असतो; परंतु ज्यास विद्वत्तेबद्दल श्रम करावयास नकोत, विद्वत्तेबद्दल, ज्ञानाबद्दल खरी उत्कंठा नाहीं, विद्वत्तेच्या वा ज्ञानाच्या दृष्टीनें ज्यांच्याजवळ भोपळ्या एवढे पूज्य अशाने केलेला मान व गौरव जास्तच उद्वेगकारक वाटतो. गुणवंत गुणांचें गौरव करूं जाणतो; अगुणास तें शक्य नाहीं व त्यानें केले तर तें गौरव हास्यास्पद होतें. आपली योग्यता जाणणारे विद्वान् नाहींत म्हणून राजवाडे खिन्न होत. आपले ग्रंथ समजण्याची पात्रता नाहीं म्हणून विद्वानांची त्यांस कींव येई. आजपासून २० वर्षांनी माझे ग्रंथ समजूं लागतील असें ते म्हणत. त्यांच्या व्याकरणाचा उपयोग फ्रेंच पंडित करतात; परंतु आपल्याकडील लोकांस तें समजण्याची पात्रता नाहीं. या उद्वेगजनक प्रकारानें कोणा ज्ञानाभिमान्यास विरक्तता व संतप्तता प्राप्त होणार नाहीं? यासाठीं राजवाडे या नव सुशिक्षितांस, शाळा कॉलेजांतून शिकविणाऱ्यांस तुच्छतेने कारकून म्हणत व त्यांच्या स्वार्थत्यागाची पै किंमत ठरवीत. ज्ञानप्रांतांत कै. भांडारकर, टिळक वगैरे कांहीं गाढ्या पंडितांबद्दल राजवाडे आदराने बोलत, परंतु टिळकांनीहि आपले ग्रंथ इंग्रजीत लिहिले म्हणून त्यांसहि नांवें ठेवण्यास या बहाद्दराने कमी केलें नाहीं.
 मराठी भाषेबद्दल त्यांचा अभिमान पराकोटीस पोंचलेला होता. इंग्रजी भाषेत व्यवहार करणाऱ्यांवर ते खवळावयाचे. फक्त १८९१ मध्ये एकदा ते इंग्रजीत बोलले होते- कां तर पीळानें, ऐटीनें "साहेब काय इंग्रजीत बोलतो, मी सुद्धां फर्डे बोलून दाखवितों" अशा इरेने ते बोलले. पत्रव्यवहार त्यांनी बहुतेक इंग्रजीतून केला नाहीं. पत्रे ते मोडींत व कधीं कधीं संस्कृतमधून लिहीत. भाषेचा जसा अभिमान, त्याप्रमाणेंच आचाराचा पण त्यांस अभिमान होता. पंचा नेसून प्रयोग शाळेंत काम केलें तर ऑक्सिजन निर्माण होत नाहीं की काय असें त्वेषाने ते विचारीत. स्वभूमि, स्वभाषा, स्वजन व स्वधर्म यांना वाहिलेलें त्यांचें आयुष्य होतें व त्यांच्या सर्व बारीक गोष्टीतही गोष्ट सूर्यप्रकाशाप्रमाणें स्वच्छ दिसते.
 राजवाडे रागीट होते. महाराष्ट्रांतील राष्ट्रीय शिक्षणाचे अध्वर्यु विजापूरकर त्यांस प्रेमानें दुर्वास म्हणत व कोल्हापुरास ते जें घर बांधणार होते तेथे या दुर्वासांसाठी ते एक स्वतंत्र खोली ठेवणार होते. राजवाडे कधी कोणाकडे उतरले तर त्यांच्या पोथ्या पुस्तकांची पोतीं, रुमाल त्यांच्याबरोबर असावयाचेच. 'माझ्या पुस्तकांस पोराबिरांनी हात लावला तर मी थोबाडीत देईन' असें प्रथमच सांगून मग ते तेथें रहावयाचे. म्हणजे मागाहून भांडण व्हावयास नको. आधीच हडसून खडसून असलेलें बरें. कधीं कधीं त्यांचा राग अनावर होई व त्या रागाच्या भरांत ते वाटेल तें बोलत. एकदां ग्वाल्हेरीस एका भिक्षुकाजवळ ते एक महत्त्वाची जुनी पोथी मागत होते. त्या भिक्षुकानें ती पोथी दिली नाहीं, तेव्हां संतापाने राजवाडे म्हणाले "तुझ्या विधवा बायकोपासून मी सर्व पोथ्या घेऊन जाईन." हेतू बोलण्यांतील हा कीं या पुस्तकांची व पोथ्यांची तुझ्या मरणानंतर तुझी बायको रद्दी म्हणून विक्री करील. वाण्यांच्या दुकानांत माल देण्यासाठी मग या रद्दीचा उपयोग होतो. राजवाडे यांनीं वाण्याच्या दुकानांतून कित्येक महत्वाचे कागद विकत घेतले होते. वऱ्हाडांत एकदां हिंडतांना एका वाण्याच्या दुकानांत १-२ दौलताबादी जुने कागद त्यांनी पाहिले. त्या वाण्याजवळ आणखी ४-५ कागद होते. राजवाडे यांस ते कागद महत्त्वाचे वाटले म्हणून कागद त्यांनी वाण्याजवळ मागितले परंतु तो वाणी देईना. राजवाडे सांगतात 'मी ढळढळां रडलो तरी तो वाणी कागद देईना. शेवटी कनवटीचा रुपया फेंकला तेव्हां त्या वाण्यास दया आली व ते कागद मला मिळाले.' असे महत्त्वाचे कागद ज्यांच्या घरांत असतात, त्यांना त्यांचें महत्त्व समजत नसतें; रुमाल बांधलेले धूळ खात असतात; फार तर दसऱ्याच्या वेळेस त्यांची झाडपूस होऊन, त्यांच्यावर गंधाक्षता पडावयाच्या. आणि घरांत कर्ता, मिळविता कोणी राहला नाही. म्हणजे या पोथ्या रद्दी म्हणून वाण्यास विकावयाच्या असे नेहमी होत आलें आहे. राजवाडे यांनी या गोष्टी पाहिल्या होत्या व म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणा जवळ पोथी मागितली असतां त्यानें दिली नाहीं म्हणून ते भरमसाट अशुभ बोलून गेले. परंतु त्यांचा हा राग त्यांना आलेल्या कटु अनुभवाचा परिणाम होता. अनेक अनुभवांचा तो उद्वेक होता त्यांच्या विक्षिप्तपणांतही व्यवस्थेशीरपणा होता, तसेंच त्यांच्या रागासही कांहीं तरी सबळ कारणें असत. निष्ठेने कार्य करीत असावे. त्याच्यासाठीं अनंत कष्ट करावे आणि स्वजनांकडून अल्पस्वल्प अशी मदतही होऊं नये अशा वेळी अशी जळजळीत वाणी तोंडांतून बाहेर न पडली तरच आश्चर्य. 'ज्याचे जळतें त्यास कळतें'- इतर कार्याविषयीं उदासीन असणाऱ्यांस या रागाचें, या क्रोधाचे आश्चर्य वाटेल व काय विक्षिप्त व आततायी हा राजवाडे असे ते म्हणतील परंतु राजवाडे यांस असे उद्गार काढावयास लावणारी माणसं आमच्या देशांत आहेत ह्यणून मात्र आह्मांस वाईट वाटतें व राजवाडे यांच्या कार्यनिष्ठेबद्दलचा आदर दुणावतो आणि या महापुरुषाचें अंतःकरण कसें कार्यांसाठी तिळतिळ तुटत असेल तें मनास समजून येते.
 ईश्वरावर त्यांची आयुष्याच्या पूर्वार्धांत श्रद्धा होती. परंतु पन्नाशी उलटल्यावर या मतांतही उलटापालट झाली. त्यांनी वयास ४६ वें वर्ष लागलें असतां जें उब्दोधक टिपण लिहिले आहे, त्यांत ते म्हणतात 'ईश्वराची कृपा भरपूर पाहिजे ह्मणजे सर्व होईल.' हा विश्वास पुढे राहिला नाहीं. ईश्वर ही एक मानवी भ्रांत कल्पना आहे असें ते ह्मणूं लागले. नास्तिपणाकडे ते झुकूं लागले. परंतु समाजदेवाचें अमरत्व व अस्तित्व त्यास मान्य होतें व त्यासाठी ते रात्रंदिवस खटपट करीत होते. ईश्वरावर श्रद्धा ठेवून. ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी. परलोकीं परमेश्वर प्रसन्न व्हावा यासाठी कार्ये करणारे लोक थोर खरे; परंतु अशा लोकांस कार्य करण्यास उत्साह देणारा परमेश्वर हा आधार तरी असतो; परंतु ज्यांत ईश्वरी आधाराचेहि सौख्य नाहीं, असे राजवाड्यांसारखे लोक, पारलौकिक सुख वगैरे कांहीं न मानतांही, मरणानंतर कांहीं आहे असे न मानतांही केवळ निरपेक्ष दृष्टीनें कामें करतात, याचे कौतुक वाटतें व त्यांच्याबद्दल मनांत जास्तच आदर व पूज्यभाव वाटतो.
 महाराष्ट्राच्या पूर्ववैभवासंबंधीं ते आदराने बोलत. परंतु सध्यांच्या महाराष्ट्राच्या औदासिन्याबद्दल ते खिन्न होते. स्वार्थत्याग- वृत्तीस महाराष्ट्रांत मान नाहीं, खरा स्वार्थत्याग, खरी कार्यवृत्ति, खरा कार्यकर्ता यांची किंमत महाराष्ट्रीयांस होत नाहीं असें त्यांस वाटे. काव्हूर या इटालीमधील मुत्सद्याच्या चरित्राच्या प्रस्तावनेत ते लिहितात "स्वार्थत्यागाची किंमत समजणारी अक्कल समाजांत नसेल तर स्वार्थत्याग गाभटतो." लो. टिळक यांच्या केसरी पत्रासंबंधी ते म्हणत "या पत्रासाठी बळवंतराव एवढी झीज सोसतात; त्यांतील अग्रलेखांनीं व स्फुटांनी सबंध दक्षिण व वऱ्हाड नागपूरचा भाग त्यांनी हालवून सोडला आहे, तरी या पत्राच्या प्रती लाखांनी कां स्वपू नयेत! महाराष्ट्र एक दरिद्री तरी असला पाहिजे, नाहीं तर कंजूष तरी असला पाहिजे. प्रत्येक गांवांतील मारुतीच्या देवळांतून केसरी मोठ्याने वाचला जाऊन तो लोकांनीं ऐकावा असें झाले पाहिजे. राजकीय विचारांचे लोण सर्वत्र नेऊन पोंचविलें पाहिजे" महाराष्ट्राच्या औदासिन्याबद्दल जरी ते असे उद्गार काढीत असले तरी कधीं कधीं जनतेवर असलेला आपला विश्वास ते प्रकट करीत. इतिहास साधनांच्या एका खंडातील प्रस्तावनेत ते लिहितात "कार्य करविता स्वदेशांतील अभिमानी समाज आहे." खऱ्या स्वार्थत्यागाची बूज जनता केल्याशिवाय राहणार नाहीं असें ते म्हणत. 'हें राज्य व्हावें असें श्रीच्या मनांत फार आहे.' या शब्दांनीं श्रीशिवछत्रपतींनीं आपली श्रद्धा बोलून दाखविली- त्याप्रमाणेंच राजवाडे यांनी जनतेवरील श्रद्धा बोलून दाखविली आहे. 'कार्यकर्त्या मनुष्यास महाराष्ट्र, सर्व भारतवर्ष उपाशी मरू देणार नाहीं' असा विश्वास ते प्रगट करीत असत. त्यांचा राग जनतेवर नसून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या अर्धवट सुशिक्षितांवर असे असें विचार केला म्हणजे वाटतें.
 राजवाडे हे निर्व्यसनी होते हें सांगण्याची जरूरी नाहीं. ते विरक्त व संन्यस्त वृत्तीनें राहिले हे सर्वांस महशूर आहे. फक्त विडी व तंबाकू त्यांस व्यसन होते. परंतु या व्यसनांचेहि राजवाडे गुलाम झाले नव्हतें. कित्येक दिवस ते विडीशिवाय खुशाल राहूं शकत व विडी ओढावयास न मिळाल्यामुळे कपाळ वगैरे दुखलें असेंहि त्यांस होत नसे. एकदा त्यांच्या एका स्नेह्यानें हजार पंधराशे विड्यांचा एक गठ्ठा दिला, त्यावेळेस तें रोज रोज ४०/५० विड्या ओढीत. परंतु त्यांस विचारलें असतां ते म्हणाले 'सध्या आहेत म्हणून मी ओढतों, मी विकत घेऊन कांहीं ओढीत नाहीं; परंतु ते कधीं विकतही आणीत असत; तथापि व्यसनाचे ताब्यांत न जातां व्यसन त्यांनी आपल्या ताब्यांत ठेविलें होतें. लिहितांना कधीं तोंडांत तंबाखू टाकून ते चघळावयाचें.
 त्यांना स्वतःच्या राहत्या जागेच्या भोंवतीं गुरेढोरें आलेली खपत नसत. गुरांमुळे घाण होते व मग डांस वगैरे होतात असें त्यांचें मत असे.
 राजवाडे यांचा स्वभाव जरा भित्रा होता. ते फिरावयास गेले तरी काळोख पडण्यापूर्वी परत यावयाचे. ६ वाजल्यानंतर ते फिरावयास जात नसत. माघारे यावयाचे. त्यांना सापाबिपांची फार भीति वाटे. पावसाळ्यांत ते फिरावयास जात नसत. तसेंच हिरवळीच्या जागेवरून. कुंपणावरून वगैरे फिरण्यास त्यांस भीति वाटे. कारण अशा ठिकाणी सर्प वगैरे फार असतात. त्यांच्याबरोबर त्यांचा सोटा नेहमी असावयाचाच.
 परंतु ही भीति केवळ आपल्या चुकीमुळें आपण जीवितास वगैरे मुकू नये अशा स्वरूपाची असावी. नाहीतर ते व्यक्तीस किंवा समाजास भीत नसत. सरकारवरही त्यांचा विश्वास नसे व सरकार संबंधी सडेतोड उद्गार त्यांनी काढले आहेत. ह्मणजे ही भीत केवळ भ्याडपणाची नव्हती. भ्याडपणा, ताटाखालचे मांजर होण्याची जी दीन व दुबळी वृत्ति ती ही नव्हती. ती त्यांच्या स्वभावाशीं विसंगतच असली पाहिजे. प्रत्येक व्यक्ति तडफदार, तेजस्वी व निःस्पृह बनावी अशी तर त्यांची जन्मशिकवणुक आहे. विद्यार्थी व तरुण लोक यांनीं नामर्द व लुसलुशीत वृत्तीचे न होतां रणमर्द जवा नमर्द व्हावे त्यांस खरोखर वाटे. गाणे बजावणे, नाच, कोमळ व नाजुक वाद्ये यांचा त्यांस तिटकारा येई. त्यामुळे वृत्ति बा का होतात असे त्यांस वाट. विश्ववृत्ताच्या १९०७ सप्टेंबरच्या अंकांत ते लिहितात "क्वईक्वई, किणकिण, गुईंगुई वगैरे नरम आवाज उत्पन्न करणारी सतार, दंतवाद्य, गितार वगैरे भिकार वाद्ये खुद्द भीमसेनालाहि बृहन्नडा बनवतील; मग सामान्य पोलीस, शिपाई व खडर्येघाशे यांना त्यांनी साक्षात् स्त्रैणपणा आणला तर त्यांत नवल नाहीं. बायकी आवाज काढणारे जे जनानखां व फुटक्या मडक्यासारख्या थालिपीठ्या व रेक्या आवाज काढणारे जे लंबकंठाशास्त्री त्या दोघांनाही प्रजा बिघडविण्याची सक्त मनाई असावी. नाकांतून गाणाऱ्या पारशी नाटक कंपन्या व ताणावर ताणा घेणाऱ्या मराठी नाटक कंपन्या संस्थानांत बिलकूल शिरकूं देऊं नये. ह्यांच्या ऐवजी पवाडे ह्मणणारे शाहीर, एकतारीवर भजन करणारे महार, गंभीर वीण्यावर व मर्दानी डफावर आलापणारे लावणीकार, ह्यांचा परामर्ष कदाचित् प्रजेला जास्त हितकर होईल. सगळ्यांत रणभेरी, रणतंबुर रणझांज वगैरे हत्यारें प्रजेकडून ऐकिविल्यास व योजविल्यास, तिच्यांत मर्दानी बाणा उसळेल. रडकी गाणी व किरटीं वाद्ये वाजविण्यास किंवा भिकार नाटके पाहण्यास जेथील प्रजेला मुबलक वेळ आहे, तेथील प्रजा खुळी, परतंत्र, जनानी व झिंगलेली आहे असें खुशाल समजावें" अशा प्रकारची तेजस्वी वृत्ति तरुणांत निर्माण व्हावी म्हणून गीतवाद्येही बंद करूं ह्मणणारा पुरुष स्वतः भ्याडवृत्तीचा कसा असेल? भीतीपेक्षां संशय त्यांच्या मनांत असे असे वाटते. कांही असो. ही भ्याडवृत्ति दुसऱ्याच कांहीतरी प्रकारची, म्हणजे उगीचच्या उगीच आततायीपणाने जीव धोक्यांत येऊ नये अशा तऱ्हेची असावी. कारण जगलें तर सर्व कामगिरी होणार आहे. महाभारतांत विश्वामित्र चांडालास म्हणतो 'जीवन्धमर्मपाप्नुयात्' आधीं जिवंत राहू दे आणि मग परोपकार धर्म, करूं दे. व्यर्थ अतातायीपणानें जिवावर बेतूं नये म्हणून राजवाडे खबरदारी घेत असावेत. तो नामर्दी भित्रेपणा होता असें वाटत नाहीं.
 राजवाडे हे वृत्तीनें साशंक असत. मनुष्याच्या बोलण्या- चालण्याचा त्यांना विश्वास वाटत नसे. मनुष्याच्या हेतूंबद्दल पुष्कळ वेळां ते विपर्यस्त बोलत. मोर्ले साहेबांनी जें म्हटलें आहे "It is not always safe to suppose the lowest motives to be the truest." दुसऱ्यांचे हेतु नेहमीच अशुद्ध समजणें हें चांगलें नाहीं, परंतु राजवाडे हे जगाकडे चांगल्या दृष्टीने पहात नसत. कदाचित् जगाचा कटु अनुभव आला त्याचा हा परिणाम असेल. त्यांचा हा स्वभावविशेष दर्शविणाऱ्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु त्या गोष्टींचा मी उल्लेख करीत नाहीं. त्यांच्या स्वभावांत जनतेविषयीं साशंकता होती खरी. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर पुढें पुढे कोणत्याही चळवळीत भाग घेत नसत व म्हणत 'माझा या देशांतील लोकांच्या शब्दांवर विश्वास नाहीं.' तसेंच राजवाडे यांचे झाले असेल.
 वरील एकंदर लिहिण्यावरून राजवाडे यांच्या स्वभावाची अल्पस्वल्प शतांशानें तरी कल्पना वाचकांस होईल असें वाटतें.

प्रकरण ८ वें

अंत व उपसंहार.

 

काळाचा अजब तडाखा. कोणास सुटला आहे? मी मी म्हणणारा आशावादी काळाने तेव्हांच गिळंकृत केला जातो. तसेंच शेवटीं या महापुरुषाचें झालें. आपण शंभर वर्षे जगूं व शतायुर्वै पुरुष: हें श्रुतिवचन सार्थ करूं अशी राजवाडे यांस बालंबाल खात्री होती. परंतु परमेश्वर नेमानेम निराळेच होते. कार्य करणारा पुरुष आशेच्या व इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूस दूर ढकलूं पाहात असतो, परंतु वास्तविक कोणासही मृत्यू दूर करतां येत नाहीं. त्याची वेळ झाली म्हणजे तो यावयाचा.
 मरणाचे आधी एक वर्ष दीड वर्ष आपणांस कांहीतरी विकार जडला आहे असें राजवाडे यांस वाटूं लागलें होतें. म्हणून तर पुण्यास राहण्याचें सोडून ते धुळ्यास आले. त्यावेळी ते जरा खिन्न व चिंताक्रात दिसले. आपले मित्र धुळ्याचे रा. भट यांस ते म्हणाले "तुम्ही सुग्रास अन्न जेवतां; परंतु आम्हांस असें सुग्रास अन्न कोठें मिळणार?" कदाचित् याच उद्गारावरून बंगालचे जदुनाथ सरकार यांनी राजवाडे हे पुनः लग्न करूं इच्छित होते असें लिहिण्याचें धाडस केलें असेल. सुतानें स्वर्गास जातां येतें म्हणतात तें असें. जन्मभर ज्यानें स्वयंपाक केला त्याने एखादे वेळीं आपल्या मित्रांजवळ असे उद्गार काढले म्हणजे त्याचें वैराग्य एकदम नष्ट झालें व तो सुखलोलुप बनला असें कोण विचारी मानील. परंतु कर्णोपकर्णी वार्ता ऐकून पराचा कावळा होतो व राईचा मेरू होतो त्यांतलेंच हें.
 धुळ्यास आल्यावरही एकदम भयंकर वेदना मस्तकांत सुरू झाल्यामुळे ते नाशिक येथें गेले. तेथें डॉक्टरकडून तपासणी झाली व त्यांस बरें वाटू लागले व पुन्हां धुळ्यास ते आपलें आवडतें काम जोरानें सुरू करणार होते; परंतु मरण जवळच येत होते. हें दुखणें वगैरे शेवटचींच चिन्हें होती.
 मरावयाचे वेळेस राजवाडे धुळे येथें आले होते. धुळ्यावर राजवाड्यांचा फार लोभ. रामदासी संशोधनासाठी त्यांनी ज्यांना स्फूर्ति दिली ते समर्थ सेवक शंकरराव देव याच धुळ्याचे भूषण. महाराष्ट्र धर्म हें सुंदर उद्बोधक पुस्तक लिहिणारे श्री. भट याच धुळ्याचे अलंकार. राजवाडे यांचे महत्त्व जाणणारे व त्यांस मानणारे येथे बरेंच विद्वान् लोक. राजवाडे यांच्या संग्रहाचा बराच भाग धुळ्यास आहे. अशा या धुळे शहरींच आपला देह ठेवण्यास न कळत राजवाडे आले. त्यांची प्रकृति चांगली धडधाकट होती. धातुकोशाचे काम ते जोराने सुरू करणार होते. रोज पांच सहा मैल फिरावयास जाण्याची त्यांची ताकद होती. परंतु न कळत मृत्यू जवळ जवळ येत होता. १९२६ डिसेंबरची २७ तारीख. त्या दिवशीं सोमवार होता. सोमवारी राजवाडे यांची प्रकृति उत्तम होती. शंकरराव देव वगैरे मंडळी त्यांच्याजवळ बोलणें चालणे करून गेली. मंगळवार उजाडला. सकाळी ११॥ वाजतां ते जेवणास बसले- परंतु जेवण वगैरे राहिलेच. त्यांना उलटी झाली; शौच्यासही लागली म्हणून ते जाऊं लागले; परंतु शक्ति नव्हती. क्षीणता एकाएकी आली व ते चौकांत पडले. नोकर बंगल्यांत झाडीत होता; तो आला. इतक्यांत हस्तलिखितें जीं मिळविली होती, त्यांची यादी करण्यास येणारे नित्सुरे मास्तर ते तेथें आले. त्यांनीं राजवाडे यांस उचलून आणले व अंथरुणावर निजविलें. त्यांची नाडी मंद चालू लागली होती; नाडींत क्षीणता आली होती. लसूण वगैरे अंगास चोळण्यांत आल्यावर ते शुद्धीवर आले व त्यांनी विचारलें 'काय चोळतां? डॉक्टरांस बोलावण्यास त्यांनी सांगितले. डॉक्टर आले व औषध वगैरे देण्यांत आलें. मंगळवारचा दिवस गेला व अमंगळ टळले. बुधवारी एनेमा त्यांस देण्यांत आला. झोपही चांगली स्वस्थ लागली. यामुळें गुरुवारी त्यांस जास्त हुशारी व तरतरी वाटली. परंतु ही हुशारी मालवणाऱ्या दिव्याच्या वाढत्या ज्योतीप्रमाणें आहे, तुटणाऱ्या ताऱ्याच्या वृद्धिंगत तेजाप्रमाणें आहे हें आशातंतूवर जगणाऱ्या मनास समजलें नाहीं. आपण हा लोक सोडून जाणार ही राजवाडे यांस कल्पनाही नव्हती. इतर कोणासही राजवाडे लौकरच आपणांस अंतरणार असें वाटलें नाहीं. शुक्रवार उजाडला. सकाळी शौच्यास झालें. दोनदां दूध त्यांनी मागून घेतलें. परंतु वेळ आली ८॥ वाजतो कळ आली तीच शेवटची. कळ आल्यावर ते खोलीतून कचेरीत येऊ लागले तो पडले. पुनरपि डाक्टरांस बोलावणे गेले- परंतु डॉक्टर येण्यापूर्वीच सर्व आटोपले. श्री. शंकरराव देव यांचा पुतण्या दाजीबा यानें मरतांना मांडी दिली व त्या मांडीवर या देशार्थ तळमळणाऱ्या जीवाने १९२६ डिसेंबरच्या ३१ तारखेस शांतपणे प्राण सोडला. आशेचा मेरू उन्मळला. कर्तव्यनिष्ठेचा सागर आटला. उत्साहाचा सूर्य अस्तंगत झाला. महाराष्ट्र सरस्वती अनाथ झाली; महाराष्ट्र इतिहास पोरका झाला.
 राजवाडे हे महापुरुष होते. विद्यारण्यांसारखे ते विद्येचे निस्सीम उपासक होते. परंतु त्यांचें सर्वात मोठें कार्य म्हणजे महाराष्ट्रांस ज्ञानप्रांतांत पुढे घुसण्यास त्यांनी जागृति दिली. स्वदेशाचा इतिहास सांगून स्वदेशाची दिव्य व स्तव्य स्मृति प्रचलित केली. प्रख्यात महाराष्ट्रीय इतिहासकार सरदेसाई आपल्या पाटणा युनिव्हर्सिटीतर्फे दिलेल्या व्याख्यानांत राजवाडे यांचेसंबंधे जें गौरवाने बोलले त्याचा मी अनुवाद करितों. "जनतेच्या मनांत ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनासंबंधीची तीव्र जागृति उत्पन्न करण्याचे काम राजवाडे यांनी केलें. ही जागृति उत्पन्न करण्याचें सर्व श्रेय ह्या महापुरुषाला आहे. त्यांच्याजवळ साधन सामुग्रीहि नव्हती. संपत्तीचा त्यांना पाठिंबा नव्हता. परंतु कॉलेजामधून बाहेर पडल्यावर या कार्योन्मुख पुरुषानें घरोघर भटकून, दारोदार हिंडून कागदपत्र संग्रह करण्याचे काम चालविलें. पुणें, सातारा, नाशिक वांई या मोठ्या शहरींच नव्हे तर लहानसान खेड्यापाड्यांपासूनही जुने सरदार, जुने उपाध्ये, जुने कारकून, जुने कुळकर्णी, देशपांडे यांच्या घरी ते खेटे घालीत. कागदपत्रे जमा केल्यावर नितांत निष्ठेनें व एकाग्रतेनें त्या पत्रांची ते चिकित्सा करीत. असे करीत असतां त्यांची तहानभूकही हरपून जावयाची. अल्प साधनसामुग्रीच्या जोरावर सर्व बृहन्महाराष्ट्रभर ते वणवण हिंडले व उरापोटावरून, खांद्याडोक्यावरून कागदपत्रांची पोतीं त्यांनी वाहून आणिली. हा अफाट साधनसंग्रह महाराष्ट्रांत ठिकठिकाणी आपल्या मित्रांकडे ठेविला आहे. राजवाडे यांची निरपेक्ष कार्यभक्ति पाहून इतरही तरुणांस स्फूर्ति मिळाही व या खंद्या वीराच्या सभोवती संशोधनाच्या समरांगणांत कार्य करण्यासाठी तरुणांची मांदी मिळाली. राजवाड़े हे संन्यस्तवृत्तीचे, त्यागाचे उत्कृष्ट आदर्श आहेत. मनुष्य एका कार्यास जीवेंभावें करून जर वाहून घेईल, तर तो किती आश्चर्यकारक कार्य करूं शकतो हें राजवाडे यांनी स्वतःच्या उदाहरणानें दाखविलें आहे. अडचणी व संकटें, दारिद्र्य व सहानुभूतीचा अभाव वगैरे निरुत्साहकारी गोष्टींचें धुकें कार्यनिष्ठेच्या प्रज्वलित सूर्यप्रभेसमोर टिकत नाहीं.
 राजवाडे हे केवळ संग्रहाकच नाहीत तर या संगृहीत साधनापासून किती महत्वाची माहिती मिळते व त्यापासून कसे महत्त्वाचे सिद्धांत स्थापन करतां येतात हें ते दाखवून देत. राजवाडे हे अर्थ शोधनाच्या शास्त्रांत प्रवीण झाले होते. समुद्रांत बुड्या मारून मोती आणणाऱ्या पाणबुड्यांप्रमाणें ते कागदपत्रांच्या आगरांतून तत्त्व मौक्तिकें काढण्यांत तरबेज झाले होते. जें पत्र इतरांस क्षुल्लक वाटे, त्याच पत्रांतून नाना प्रकारची अभिनव माहिती राजवाड्यांची बुद्धि उकलून दाखवी. त्यांच्या बुद्धीजवळ मुकीपत्रे हृद्गते बोलू लागत. ३५० पानांचें २२ खंड कागदपत्रांनी भरलेले त्यांनी छापले व त्या खंडांस मार्मिक व; अभ्यसनीय अंशा उद्बोधक प्रस्तावना लिहिल्या. जी पत्रे त्या त्या खंडांतून छापलीं असत त्या पत्रांशीच त्या प्रस्तावनांचा संबंध असे असे नाहीं; तर कधीं कधीं इतिहास शास्त्रासंबंधीं नाना प्रकारचे विवेचन या प्रस्तावनांतून येई. इतिहास शास्त्राची व्याप्ति या शास्त्राचे महत्त्व, या शास्त्राचा उद्भव वगैरे संबंधी उद्बोधक विवेचन त्यांच्या तत्त्व प्रचूर लेखणीतून येई.
 राजवाडे यांनी केवळ जुने कागद उजेडांत आणले आहेत एवढेच त्यांचे कार्य नाहीं. तर त्या पत्रांतून निरनिराळ्या काळाचा व निरनिराळ्या अंगांचा महाराष्ट्रीय इतिहास त्यांनी बनविला आहे. मानवी विचार व प्रगति, भाषाशास्त्र व मराठी भाषेची उत्पत्ति, सामाजिक व राजकीय भारतीय जीवनाचे स्वरूप, महाराष्ट्राच्या वसाहत कालाचें विवेचन-वगैरे विविध गोष्टींवर त्यांनी आपल्या लेखांनीं अद्भुत प्रकाश पाडला आहे. नवीन अभ्यासाने त्यांच्या सिद्धांतांपैकीं कांहीं असत्य व भ्रामक ठरतील तरीपण त्यांच्या लेखाच्या अभ्यासानें अभ्यासूस निःसंशय महत्त्वाची मदत होईल.
 राजवाडे यांची व्यापक दृष्टि वेद काळापासून तो पेशवाईच्या अंतापर्यंत सारखीच स्वैर विहार करी. त्यांच्या लेखांतील त्यांची सर्वतोगामी विद्वत्ता व व्यापक गाढी बुद्धि पाहिली म्हणजे आपण चकित होतों, भांबावून जातों. कागदपत्र, ताम्रपट, शिलालेख वगैरे सर्व साधनांच्या साहाय्यानें ते इतिहास संशोधनास चालना देत. त्यांची बुद्धि कुशाग्र होती. पायाळू माणसास भूमिगत द्रव्य कोठें आहे हें जसें समजतें त्याप्रमाणे त्यांच्या बुद्धीस अचूक तत्त्वसंग्रह सांपडे. त्यांची तीक्ष्ण बुद्धि, निरतिशय कार्यश्रद्धा, निरुपम स्वार्थत्याग- यांस महाराष्ट्रांत तोड नाहीं. सुखनिरपेक्षता व विलास- विन्मुखता, मानापमानाची बेफिकिरी या सर्व गुणसमुच्चयामुळे राजवाड्यांची कृज्ञताबुद्धीनें महाराष्ट्रानें सदैव पूजा केली पाहिजे. ते ज्ञानसेवक होते; विद्येचे एकनिष्ठ उपासक होते. आयुष्यांत ज्ञानप्रसार व विचार प्रसार याशिवाय दुसरें कार्यच त्यांस नव्हतें. 'जोरदारपणा' या एका शब्दांत त्यांचे वर्णन करणे शक्य आहे. त्यांचे मन जोरदार होते; शरीर जोरदार होतें, त्यांची मतें जोरदार होती; त्यांचे सिद्धांत जोरदार असत; कागपत्रांचे अर्थ उत्कृष्ट तऱ्हेने ते जसे फोड करून दाखवीत, त्याप्रमाणेच जर ते अचूक मार्गदर्शक झाले असते, तर हिंदुस्थानातील ऐतिहासिक ज्ञानक्षेत्रांत ते अद्वितीय मानले गेले असते."
 एका समव्यवसायी थोर विद्वानाने राजवाडे यांची केलेली ही स्तुति यथार्थ आहे. स्तुति करणाऱ्या पुरुषाच्याहि मनाचा निर्मळपणा पाहून समाधान वाटते. नाहीतर समव्यवसायी लोक पुष्कळ वेळां मत्सरग्रस्त असतात; प्रांजलपणाचा त्यांच्याठायीं अभाव दृष्टीस पडतो. तसें सरदेसाई यांच्या बाबतींत झालें नाहीं ही आनंदाची गोष्ट आहे.
 राजवाडे यांनी इतिहासाची साधनें दिली; परंतु त्यांमधून सुसंबद्ध असा थोर महाराष्ट्राचा इतिहास निर्माण केला नाहीं. परंतु असा इतिहास लिहिण्याचें त्यांच्या मनांत कधीं कधीं येत असावे. एकदां ते म्हणाले "पेशवाईचा इतिहास लिहिण्याची साधनें सध्या उपलब्ध आहेत; कोणातरी हुशार पदवीधराने हें कार्य अंगावर घ्यावें." शिवाजीचें चरित्र लिहा असें त्यांस कोणी सांगितले म्हणजे ते म्हणत 'अद्याप भरपूर माहिती हें चरित्र लिहिण्यास उपलब्ध नाहीं.' राजवाडे इतिहासाची साधनें निर्माण करीत व ते अन्य मार्गांकडे वळत. नवीन नवीन ज्ञानक्षेत्रे लोकांच्या दृष्टीस दाखवावयाची, नवीन नवीन ज्ञानप्रातांत स्वतः शिरून लोकांस. 'इकडे या, इकडे पहा केवढे कार्यक्षेत्र आहे.' असें सांगावयाचें– अशा प्रकारची त्यांची वृत्ति असे. साधनें निर्माण करून देणें हें मुख्य काम आहे. मग त्यांतून सुंदर इमारत निर्माण करणें तादृश कठीण नाहीं. साधन सामुग्रीच्या जोरावर राजवाडे यांस इतिहास लिहितांच आला नसता हें म्हणणें अयथार्थ आहे असें आम्हांस वाटतें. राधामाधव विलासचंपूच्या भव्य प्रस्तावनेत १००-१२५ पानांत शहाजी राजांचा असा सुंदर व स्फूर्तिप्रद इतिहास त्यांनी लिहिला आहे! चिंतामणराव वैद्य यांनीं राधामाधव विलासचंपूच्या या प्रस्तावनेच्या परीक्षणांत लिहिलें होतें "राजवाडे यांच्या हातून मराठ्यांचा उत्कृष्ट इतिहास लिहिला जावो." यावरून राजवाडे इतिहास लिहिण्यास लायक होते असेंच त्यांस वाटलें असावें. गिबनसारख्या इतिहासकारांप्रमाणें त्रिखंड विख्यात इतिहास लेखक त्यांसहि होतां आलें असतें. परंतु पात्रता होती एवढ्यावरून ते झाले असें मात्र कोणी ह्मणूं नये; तसे होणें त्यांस शक्य होते हें मात्र खरें. इतिहासलेखकास मन शांत व निर्विकार पाहिजे (Philosophic calm) व तें राजवाडे यांच्या जवळ नव्हते म्हणून त्यांस गिबनसारखे होत आलेच नसतें असें बंगालमधील सुप्रसिद्ध इतिहासलेखक जदुनाथ सरकार यांनीं लिहिलें. राजवाडे हे जरा पूर्वग्रह दुषित असत हें खरें. त्यांची दृष्टि केवळ सरळच नव्हती, कधीं सरळहि असे; परंतु जदुनाथ यांस आदर्शभूत वाटणारा गिबन तो तरी पूर्व- ग्रहांपासून संपूर्णतः अलिप्त होता का? गिबनच्या रोमन साम्राज्याच्या इतिहासातही पूर्वग्रह दूषित दृष्टि अनेक ठिकाणीं विद्वानांनी दाखविली आहे. सारांश पूर्व ग्रहांपासून अलिप्त कोणीच नसतो.
 राजवाडे यांचे कार्यक्षेत्र एकच नसे, म्हणून त्यांनी इतिहास लिहिला नाही. जगते तर कदाचित लिहितेहि. निरनिराळी कार्यक्षेत्रे उघडी करणें व समाजाच्या बुद्धिमत्तेला निरनिराळ्या अंगांनी कामे करण्यास लावणें. त्यांचा व्याप व पसारा वाढण्यास वाव देणें हें त्यांचे कार्य होतें. भाषा, व्याकरण, इतिहास, समाजशास्त्र सर्वत्र ते अनिरुद्ध संचार करीत, यांतील तात्पर्य हेंच होय. म्हणूनच डॉ. केतकर म्हणतात "एका क्षेत्राचा अभ्यास करून तें टाकून दुसरें क्षेत्र घ्यावें ही राजवाडे यांची वृत्ति होती पण ती 'Jack of all trades & master of none' एक ना धड भाराभर चिंध्या' यासारखीं नव्हती. तर त्या वृत्तीची कारणे फार खोल होतीं. त्यांच्याशी गप्पा मारतांना त्यांच्यांत एका गोष्टीची जाणीव दिसे, व ती जाणीव म्हटली म्हणजे आपणच राष्ट्रविकासाच्या भावनेने कामांत पडलेले पहिले संशोधक आहोंत ही होय. महाराष्ट्राच्या बुद्धीस सर्व प्रकारें चालना देण्यासाठी, त्यांनी अनेक क्षेत्रांत संशोधन स्वतः आपल्या अंगावर घेतले असावें; आणि ज्या प्रकारच्या संशोधनामध्ये किंवा ज्या विषयामध्ये पारगंतता मिळविली, त्या क्षेत्रांतच कार्य न करतां त्या क्षेत्रांचाहि त्याग करावयास त्याचें मन तयार झालें असावें. राजवाडे हे आपल्या आयुष्याकडे इतिहाससंशोधक या नात्यानें पाहात नसून संस्कृति विकास प्रवर्तक (संस्कृतीच्या निरनिराळ्या अंगांचा विकास करण्याच्या मार्गांत स्वतः जाणारे व लोकांस नेणारे) या नात्यानें पाहात आणि त्यांची खरी किंमत ओळखणाऱ्यानें त्यांच्या आयुष्याचे याच दृष्टीनें अवगमन केले पाहिजे." डॉ. केतकर यांचें हें राजवाड्यांच्या कार्यासंबंधीचे विवेचन फार महत्त्वाचें आहे व ही दृष्टि घेऊन आपण राजवाड्यांकडे पाहिले म्हणजे त्यांनी गिबनप्रमाणे इतिहास कां लिहिले नाहींत वगैरे प्रश्नांचे मार्मिक उत्तर मिळते.
 असा हा धगधगीत ज्ञानवैराम्याचा तेजःपुंज पुतळा महाराष्ट्रास मोठ्या भाग्याने मिळाला. प्रो. भानु म्हणतात 'राजवाडे यानी समर्थ ही पदवी पुन्हां नव्याने भूषविली.' प्रो. पोतदार म्हणतात.

" पुरतें कोणाकडे पाहेना । पुर्ते कोणाशी बोलेना.
पुरतें एकें स्थळीं राहीना । उठोनि जातो ॥
जातें स्थळ सांगेना । सांगितलें तरी तेथें जायेना
आपुली स्थिति अनुमाना । येवोंच नेदी ॥

 ही निःस्पृहाची समर्थांनी सांगितलेली शिकवणुक राजवाडे यांच्या चरित्रांत पदोपदी प्रत्ययास येई. परंतु 'सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूच नये' हा उत्तरार्ध समर्थांनी निःस्पृह राहूनही जसा गिरविला तसा राजवाडे यांस गिरवितां न आल्यामुळे 'बहुतांचे मनोगत' त्यांस हातीं घेतां आलें नाहीं; "महंतीची कला पूर्णपणे त्यांस साधली नाही." देशकार्य करावयास, इतके परकी सत्तेनें गांजले आहेत, तरी लोक तयार होत नाहीत म्हणून हा महापुरुष सारखा धुमसत असे. त्यांच्या सर्व कार्यात देशाभिमानाचे सोनेरी सूत्र कसे ओतप्रोत भरलेलें आहे हें मागील एका प्रकरणांत दाखविले आहे. त्यांचा देशाभिमान पराकाष्ठेचा होता. देशाभिमानास कमीपणा आणणारें एकहि कृत्य त्यांनी केलें नाहीं. आचार, विचार व उच्चार तिहींनीं ते देशभक्त होते. आमरण स्वदेशी व्रत त्यांनी पाळले. कधीही या व्रताचा त्यांनी परित्याग केला नाहीं. २५।२६ वर्षांचे असतां पत्नी वारली, तेव्हां 'पुरुष अगर स्त्री- यांस दुसऱ्यांदा लग्न करण्यास हक्क नाहीं- शेष भागीदाराने संन्यस्तवृत्तीनें देशसेवां वा देवसेवा शक्त्यनुसार करून शेष आयुष्य घालवावे' हे धीरोदात्त उद्गार त्यांनी काढले व प्रपंचांच्या भानगडीत कदापि पडले नाहीत; व सर्वजन्म देशाची निरनिराळ्या मार्गांनी सेवा करण्यांत घालविला. देशाकरितां सर्वस्वाचा त्यांनी होम केला होता. देशहितास विघातक अशा सर्व वस्तूंशी त्यांनी असहकार केला होता. महात्मा गांधीच्या संबंधानें राजवाडे आदरयुक्त बोलत व ह्मणत "असहकार हाच उपाय राष्ट्राच्या तरणोपायास आहे" हा असहकार त्यांनी जन्मभर चालविला. चिंतामण गणेश कर्वे विद्यासेवकांत लिहितात "राजवाड्यांच्या इतकी कडकडीत देशसेवा दुसऱ्या कोणी केल्याचें माहीत नाही. देशाकरितां फकिरी जर कोणी घेतली असेल तर ती राजवाड्यांनीच. गत महाराष्ट्रवीरांचा त्यांना किती अभिमान होता हें ते रोज स्नानसंध्येनंतर पितृतर्पणप्रसंगी शिवाजी व थोरले माधवराव यांना उदक देत यावरून सिद्ध होईल, खरा निःस्वार्थ व निःस्पृहपणा पाहावयाचा असेल तर तो राजवाड्यांच्याच ठिकाणी दिसेल. इतर देशभक्त निःस्वार्थीपणाच्या निरनिराळ्या पायरीवर सोयीने उभे राहलेले आढ ळतील. या निर्भेळ निःस्वार्थामुळेच त्यांच्यांत विक्षिप्तपणा दिसून येई; व तो क्षम्यहि होई. एकंदरीत आजपर्यंतच्या इंग्रजी अमदानीत राजवाड्यांसारखा पुरुष झाला नाहीं हें खास"
 गेल्या दोन तीन वर्षांत महाराष्ट्रांतील नामांकित इतिहाससेवक सर्व जात चालले. वासुदेवशास्त्री खरे, पारसनीस, महाराष्ट्र सारस्वतकार भावे, राजवाडे व साने सर्व दिवंगत झाले. न्या. रानडे यांनी मराठी इतिहासांचें आध्यात्मिक स्वरूप दाखवून दिलें व महाराष्ट्रीय इतिहासाचा मोठेपणा प्रतिष्ठापिला. त्यांच्यानंतर या पंच पांडवांनी महाराष्ट्रीय इतिहासाची बहुमोल कामगिरी केली व या सर्वांच्या कामगिरीमध्ये राजवाडे यांची कामगिरी शिरोधार्य आहे. या पांचही जणांत अर्जुनाप्रमाणें पराक्रम राजवाडयांनीच गाजविला; वासुदेव शास्त्री खरे यांचें कार्यक्षेत्र मर्यादित होते म्हणून त्यांची कामगिरी व्यवस्थित आहे व खुलून दिसते; भावे व पारसनीस यांस द्रव्याची ददात नव्हती व थोरामोठ्यांशी त्यांच्या दोस्ती होत्या. साने यांचे कार्यहि मर्यादित स्वरूपाचें होतें, परंतु ठाकठिकीचें होतें. राजवाडे यांचेंच कार्य अफाट होतें. शतमुखी गंगेप्रमाणे त्यांची कामगिरी शतमुख होती. आणि हें सर्व राजेरजवाडे, सरकार व जनता यांची हांजी हांजी न करता, त्यांचा आश्रय नसतां, स्वतःच्या हिमायतीनें केलें, ह्मणून हें कार्य थोर आहे.
 परंतु मोठ्या दुःखाची गोष्ट ही की राजवाडे हयात असतां या पुण्यभूमीत, आनंदवनभूवनीं त्यांची ती धिप्पाड व तेजस्वी मूर्ति भ्रमण करीत असतां, तिचें महत्त्व लोकांस समज़लें नाहीं. त्यांची महती, त्यांची महती फारच थोड्यांस आकलन करितां आली. परंतु त्यांच्या मरणानंतर एकदम केवढा खळगा पडला हें दिसून आल्यामुळें महाराष्ट्र जनता दुखांत बुडाली. स्विफ्टच्या मरणांनंतर एकानें म्हटलें 'Oh what a fall it was, it was like the fall of the Roman Empire'- त्याप्रमाणेंच राजवाड्यांच्या मरणासंबंधें महाराष्ट्रास वाटलें, त्यांच्या मरणानें सर्वांसच धक्का बसला. पुष्कळ वेळां असेंच होतें. मनुष्याचा अंगचा मोठेपणा व त्याची थोरवी त्याच्या मरणानंतरच समजून येते. फूल कुसकरल्यावरच त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. जिवंत असतां राजवाडे यांचें महत्त्व कळलें नाहीं- परंतु मेल्यावर त्यांचें महत्त्व, त्यांचे मोल सर्वांस कळून आलें. आतां तरी महाराष्ट्रानें या पुण्यपुरुषास, या लोकोत्तर ईश्वरी देण्याच्या पुरुषास आपल्या हृदयकमलांतून दूर करूं नये. त्यांची संपूज्य स्मृति सदैव प्रज्वलित ठेवून त्यांच्याप्रमाणें निःस्वार्थतेनें, कार्यनिष्ठेनें कार्य करण्यास पुढे यावें. निरनिराळ्या शास्त्रांत पारंगतता मिळवून पाश्चात्यांचा वरचढपणा दूर करावा व भारतवर्ष ज्ञानाचें पुनरपि माहरेघर करावें म्हणजेच राजवाडे यांच्या तळमळणाऱ्या आत्म्यास शांति मिळेल, एरव्ही नाही.
समाप्त.



शुद्धिपत्र.


पान  ओळ  अशुद्ध  शुद्ध 
१० मुडके फडके
१५ त्या त्या त्या या
१२ दुदैव दुर्दैव
१५ Time Line
१६ कृति वृत्ति
" वागीधरांनी वागीश्वरांनी
" आमृतासमान अमृतासमान
२६ चीत चकित
४२ १८ शास्त्रहा शास्त्रज्ञ
४३ शास्त्रही शास्त्रज्ञ
" २३ निगंत तिगंत
४४ रादैव रादैच्
४६ नैसक्तिक नैरुक्तिक
४८ वाङ्गमय वाङमय
४९ १० शास्त्र्यानेंच शास्त्र्याचेंच
" १२ शारीशास्त्र शारीरशास्त्र
५० उपकर्षा अपकर्षा
" अभ्यासनीय अभ्यसनीय
५१  १०  एकाट्या एकांड्या
" ११ राधमाधाव,विलासचंपू राधामाधवविलासचंपू
" १७ वगेरे बडोदें
५२ झालो झोला
५७ १२ अडणार आढळणार
५८ त्यांत त्यांस
५८ २१ प्रतिपक्षी यांची प्रतिपक्षीयांची
५९ त्यांची भाषा त्यांच्या भाषेचें
" २० ही हीं
" २१ विश्वसाचा विश्वासाचा
६० वर्णणीय वर्णनीय
" सग्दुण सद्गुण
६२ मंडळांवर मंडळांशी
६३ हा मनुष्य हा
६५ १४ आहेत आहे
६६ २१ शूद्र क्षुद्र
६७ सतांची संतांची
६८ २१ उद्धोदक उद्बोधक
७० १५ उब्दोधक उद्बोधक
७१ त्यांज्या त्यांच्या
७२ २० भारतीयांच्या शब्दालाहि भारतीयांच्याहि शब्दाला
७५ १५ यांतील या तीन
७८    स्वच्छताच हा स्वच्छता हाच
८९ उद्वेक उद्रेक
९० नास्तिपणा नास्तिकपणा
९१ २२ रोजरोज दररोज
९२ १२ कुंपणावरून कुंपणाजवळून
९४ मपाप्नयात् मवाप्नुयात्
" अतातायी आततायी
" १० Snppose Suppose
९५ परमेश्वर परमेश्वरी
१०२ १२ असा कसा

अभिनवग्रंथमालेचीं पुस्तकें.
अमेरिकापथदर्शक (दुसरी आवृत्ति) किंमत आठ आणे.
 जवळ फक्त १५ रु. असतांना अमेरिकेस जाण्याचा निश्चय करून व अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सोसून स्वामी सत्यदेव अमेरिकेस कसे पोहोंचले याची माहिती प्रथम देऊन नंतर अमेरिकेस जाणारे विद्यार्थी, प्रवाशी अगर व्यापारी यांना उपयुक्त अशा अनेक मार्मिक सूचना प्रश्नोत्तररूपानें केल्या आहेत. अमेरिकेतील शिक्षणाच्या सोयी, तेथील खाणेपिणें, वागणूक वगैरे संबंधीच्या विवेचनाबरोबरच अमेरिकाप्रवेशाचे नियम व अमेरिकेचे आगबोटीचे दरहि यांत दिले आहेत. मध्यप्रांत, वऱ्हाड, मुंबई व बडोदें विद्याखांत्याकडून शाळांतील लायब्रऱ्याकरितां व बक्षीसाकरितां मंजूर. पृष्ठसंख्या १००.
 २ अमेरिका दिग्दर्शन. किंमत १ रुपया.
 अमेरिकेंत उदंड संचार करून स्वामी सत्यदेवानी जी माहिती. मिळविली ती त्यांनी या पुस्तकांत समाविष्ट केली आहे. पैशाशिवाय काढलेली शिकागोतील पहिली रात्र, अमेरिकेतील स्त्रिया, मिस पार्करची शाळा, शेतावरील कांहीं दिवस, विद्यार्थ्यांचा जीवनक्रम वगैरे प्रकरणें वाचकांचीं मनें आपल्याकडे आकर्षून घेतात. आपल्याकडील मालकांची मजुरांशी वागणूक, आपल्याकडील शाळा व अमेरिकेतील शाळा, आपल्याकडील विद्यार्थी व अमेरिकेतील विद्यार्थी ह्यांची तुलना करून विवेचन करण्यांत आल्यामुळे देशहितेच्छु प्रत्येक वाचकानें हें पुस्तक एकदा तरी अवश्य वाचावेंच, अमेरिकेच्या शासनपद्धतीची उपयुक्त माहितीहि सुबोध भाषेत शेवटी दिली आहे. मध्यप्रांत, वऱ्हाड विद्याखात्याकडून हें पुस्तक वाचनलयांकरितां व बक्षिसांकरितां मंजूर करण्यांत आले असून इंदूरच्या ग्रंथोत्तेजक मंडळाकडून यास बक्षिस मिळाले आहे. पृ. सं. १७५.
 ३ राजर्षिभीष्म (दुसरी आवृत्ति) किंमत ५ आणे.
 महाभारतांतील श्रेष्ठ पर्वे अनुशासन व शासनपर्व यांत भीष्माचार्यांनी सर्वांस उपदेश केला आहे. अशा प्रकारचा उपदेश करण्याचा अधिकार ज्यांस प्राप्त झाला त्यांचें चरित्रहि तसेंच उज्वल असले पाहिजे यांत शंका नाहीं. लहान मुलांनाहि समजेल अशा- सोप्या भाषेत हें पुस्तक लिहिले आहे. मध्यप्रांत वहाड व मुंबई विद्याखात्यांकडून हें पुस्तक बक्षिसार्थ व लायब्रऱ्यांकरितां मंजूर झाले असून गीताधर्म मंडळाच्या मध्यम परीक्षेसाठीं हैं पुस्तक नेमण्यांत आले आहे. पृ सं ६५.
 ४ मानवी अधिकार. किंमत सहा आणे-
 प्रत्येक मनुष्य अधिकारप्रिय आहे. पण जसे मला हक्क पाहिजेत तसे दुसऱ्यांनाहि पाहिजेत, तेव्हां त्यांच्या हक्कांस जर मी मान देईन तर माझे हक्क ते केव्हांहि मानतील ही जाणीव फारच थोड्या लोकांत असते. प्रत्येकाचे जन्मसिद्ध हक्क कोणते, कोणाचे हक्क कोणी पायाखाली तुडविले आहेत आणि कोणत्या कारणास्तव समाजांत एकी घडून येत नाहीं व त्याकरितां प्रत्येकानें आपल्या वागणुकीत कशी सुधारणा घडवून आणली पाहिजे याचा उहापोह या पुस्तकांत करण्यांत आला आहे. मध्यप्रांत वऱ्हाड व मुंबई विद्याखात्यांकडून हें पुस्तक लायब्रऱ्यांकरितां व बक्षिसाकरितां मंजूर झाले असून इंदूरच्या महाग्रंथोत्तेजक मंडळाकडून यास बक्षीस मिळाले आहे. प. सं. ९०.
 ५ हिंदुसंघटनेचा बिगुल किंमत १२ आणे -
 बुद्धिवाद व राष्ट्रधर्म यानुसार केलेले संघटन हें खरें संघटन होय हें तत्व लक्षांत घेऊनच स्वामी सत्यदेवांनी हें ओजस्वी पुस्तक लिहिलें आहे. निरनिराळ्या काळी संघटनेप्रीत्यर्थ कोणते प्रयत्न झाले, हल्लीं 'स्वराज्य' संपादनार्थ संघटनेची आवश्यकता कशी आहे हें पुस्तकाच्या प्रथम खंडांत सांगितलें आहे. सामाजिक क्रांति हें संघटनेचे एक साधन असल्यानें स्पृश्यास्पृश्य, जातिभेद, क्षात्रधर्म प्रसार, विधवा विवाह, अस्पृश्योद्धार, राष्ट्रीय सण, देवळें व साधु इत्यादि बाबतींत सुधारणा कशी घडून यावयास पाहिजे याचें विशदीकरण द्वितीय खंडांत केलें आहे. तिसऱ्या खंडात युरोपीय संघटन, इस्लामी संघटन, बौद्ध संघटन यांचा विचार करून हिंदुस्थानांत राष्ट्रीय संघटन कसें घडून यावयास पाहिजे याचा विचार केला आहे. चौथ्या खंडांत हिंदु संघटनेप्रीत्यर्य मुसलमान, ख्रिश्चन शीख वगैरे समाजांनीं कोणतीं कर्तव्यें बजावली पाहिजेत हें सांगून शुद्धीची आवश्यकता कशी आहे हें स्पष्ट करून दाखविलें आहे. पुस्तकांत एकंदर ३६ प्रकरणें असून मुखपृष्ठावर स्वामी सत्यदेव यांचे छायाचित्र दिले आहे. फारच थोडक्या प्रती शिल्लक आहेत. पृ. सं. २००
 ६. आदर्श शिक्षण. किंमत. ६ आणे.-
 देशाचे उत्तम नागरीक होण्यास उत्तम शिक्षणाची आवश्यकता असते. ज्या शिक्षणामुळे शारीरिक, आर्थिक, मानसिक व आत्मिक स्वातंत्र्य प्राप्त होऊं शकेल तेंच आदर्श शिक्षण होय. प्रचलित पाश्चात्य शिक्षण पद्धतीतील दोष दाखवून वरील प्रकारच्या आदर्श शिक्षणाचे स्वरूप स्वामी सत्यदेवांनी या पुस्तकांत विशद करून दाखविलें आहे. हे पुस्तक वाचून एक सद्गृहस्थ इतके खूश झाले कीं, आनंदाच्या भरांत त्यांनी स्वामींच्या हातावर एक १०० रु. ची नोट ठेविली! मध्यप्रांत वऱ्हाड विद्याखात्याकडून बक्षिसार्थ व लायब्रऱ्यांकरितां मंजूर. पृ. सं, ९०.
 ७ के. इतिहासाचार्य राजवाडे चरित्र, किंमत १० आणे.
 इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांचें नांव माहित नाहीं असा एकहि महाराष्ट्रीय असूं शकणार नाहीं. सूक्ष्म विवेचक बुद्धिमत्ता, अगाध विद्वत्ता, साधी सरळ राहणी, निगर्वी पण स्वाभिमानी स्वभाव, अंगीकृत कार्यावरील अढळ निष्ठा, कणखर शरीरयष्टि, निःस्पृह वाणी, इत्यादि गुण त्यांच्या ठिकाणीं वास करीत होते. त्यांचें चरित्र तरुण पिढीस बोधप्रद व अनुकरणीय आहे यांत शंका नाहीं. हें चरित्र लिहिण्याचे काम कै. ना. गोखले चरित्र व ईश्वरचंद्र विद्यासागर या पुस्तकांचे विद्वान् लेखक श्री. पांडुरंग सदाशिव साने, एम. ए. यांनी केलें आहे. पृष्ठ संख्या १२०
 ८ वेदांताचा विजय मंत्र व इतर निबंध किं. ६ आ. (छापत आहे.)
 या पुस्तकांत स्वामी सत्यदेवांच्या वेदांताचा विजयमंत्र राष्ट्रीयन्त्र, गतानुगतिक पारतंत्र्याची मीमांसा व हिंदीचा संदेश, या चार बोधप्रद व स्फुर्तिदायक निबंधाचा समावेश करण्यांत आला आहे. निबंधाच्या नांवावरूनचं पुस्तकांतील प्रतिपाद्य विषयाची कल्पना येणार आहे.
९-१० शासनसंस्था भाग १ व २ (छापत आहे.)
 १ ल्या भागांत ग्रेटब्रिटन, अमेरिकेतील संयुक्त संस्थानें, फ्रान्स प्रजासत्ताक जर्मनी, जपान, स्विट्झर्लंड, समाजसत्तावादी राशिया व हिंदुस्थान या आठ देशांच्या शासन पद्धतींची माहिती देण्यांत आली आहे. दुसऱ्या भागांत शासन पद्धतीचें स्वरूप, कायदेकारी सत्ता, कार्यकारी सत्ता, न्यायदान सत्ता, स्थानिक राज्यकारभार, मतदान व मतदारसंघ आणि व्यक्तिस्वातंत्र्य व सरकारची कर्तव्यकर्मे या विषयांची चर्चा सुबोधरीत्या करण्यात आली आहे. राजकारण शास्त्राचा पद्धतशीर अभ्यास करण्यांस या प्रकारचें मराठीतील हें पाहिलेच पुस्तक आहे. पृष्ठ संख्या सुमारें २५०
सव्वादोन रुपये पाठवावेत. (८ आणे प्रवेश फी घेऊन तिकीटें मागविणें किंवा प्रत्येक पुष्प व्ही. पी. नें पाठविणें खर्चाचें व गैरसोईच असल्यानें वार्षिक वर्गणी ठरविण्यांत आली आहे.) वार्षिक वर्गणी ठरविल्यामुळें सहाय्यकांचा वर्ग कमी करण्यांत आला आहे.
 ६ एकदम २० रु. अगर त्याहून अधिक इच्छेस येईल तितकी रकम मालेच्या कार्यासाठी देणारांस मालेचे 'आश्रयदाते' समजण्यांत येईल व त्यांस मालेतून प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत विनाखर्च पाठविण्यांत येईल.
 ७ मालेची आर्थिक स्थिति पाहून इतर लेखकांचीहि पुस्तकें प्रकाशनार्थ घेतली जातील. पण पुस्तकें घेतांना मालेचे डिबेंचर्स घेतलेल्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रथम विचार करण्यांत येईल.