Jump to content

पायवाट/देवलांची शारदा

विकिस्रोत कडून
देवलांची शारदा


गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म इ. स. १८५५ साली झाला. त्यानुसार त्यांची जन्मशताब्दी इ. स. १९५५ ला मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला हवी होती, पण ती झाली नाही. देवल १९१६ ला वारले. यानुसार त्यांची पन्नासावी पुण्यतिथी पुढच्या वर्षी येते. कृतज्ञता म्हणून ही पुण्यतिथी आपण कै. देवलांच्या नाट्यसेवेच्या फेर मूल्यमापनासह साजरी केली पाहिजे. मराठी रंगभूमी आणि मराठी नाटके या क्षेत्रात किर्लोस्कर आणि देवल ही गुरुशिष्यांची जोडी अशी आहे की, ज्यांच्या वाङ्मयीन मोठेपणाबद्दल फारसे दुमत कधीच झाले नाही. कोल्हटकर आणि गडकरी या दुसऱ्या गुरुशिष्यांच्या जोडीबद्दल जेवढी विवाद्यता राहिली, तेवढी सर्वमान्यता पहिल्या जोडीविषयी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी मराठी रंगभूमीवरील सर्वांत महत्त्वाचे नाटककार म्हणून जर आपण यादी करू लागलो, तर कुणीही देवलांचे नाव विसरण्याचा संभव नाही. देवलांच्या वाङ्मयीन मोठेपणाविषयी कधीच कुणाची तक्रार नव्हती. या सर्वमान्यतेमुळेच की काय त्यांच्या वाङ्मयाचा तपशीलवार चिकित्सक अभ्यास करण्याचा फारसा प्रयत्नही झाला नाही. देवलांचे मोठेपण मान्य केले तरी त्या मोठेपणाचे स्वरूप कोणते याविषयी मात्र दुमत होण्याचा संभव आहे.
 'शारदा'कार देवल पिंडप्रकृतीने वास्तववादी नाटककार होते हे एकदा सर्वांनी गृहीत धरले आणि त्यांच्या प्रासादिक मराठीतील अकृत्रिम संवादकौशल्याची स्तुती करून बहुतेक टीकाकार थांबले. यापेक्षा खोलात जाण्याचा फारसा प्रयत्न करण्याची गरज कुणाला भासली नाही. रसिकतेच्या निकोप वाढीसाठी अशा प्रयत्नांची आवश्यकता आहे असे मला वाटते. विशेषतः मराठी रंगभूमीच्या ज्या परिस्थितीच्या चौकटीत देवल निर्माण झाले ती चौकट विसरून जाऊन देवलांचा विचार करण्याची प्रवृत्ती अलीकडे बलवान होऊ लागली आहे. एखाद्या कलावंताचे कलात्मक मोठेपण परिस्थितीच्या चौकटीवर अवलंबून असते असे कुणीच म्हणणार नाही.कलाकृतींचा दर्जा परिस्थितीसापेक्ष नसतो. हे मान्य केले तरी कलाकृतीचे आकलन मात्र मोठ्या प्रमाणात परिस्थितिसापेक्ष करणेच भाग असते. आणि कित्येकदा हे आकलन मूल्यमापनाकडे जाण्याच्या काही दिशाही दाखवून देते. ज्यावेळी कोल्हटकर, गडकरी आणि खाडिलकर यांचा अधिक्षेप करण्यासाठी देवलांचा अधूनमधून उल्लेख केला जातो, त्यावेळी मराठी रंगभूमीच्या ज्या अवस्थेत हे नाटककार उदयाला आले ती चौकटच विसरली जाते, असे मला वाटते.
 विशेषतः खाडिलकरांच्या नाटकांतील ओजस्वी वाक्यांचा खणखणाट आणि गडकऱ्यांच्या नाटकांतील कृत्रिम, काव्यमय भाषेने व्यापलेले व्याख्यानवजा संवाद यांचा विचार केला जातो, त्यावेळी हे जास्तच लक्षात येते. खाडिलकर आणि गडकरी यांच्या नाटकांमध्ये दोष नाहीत अगर त्यांना मर्यादा नाहीत असे नाही. उलट या मंडळींचे दोष स्वतःकडे हमखास लक्ष वेधून घेतील इतके ठळक आहेत. पण या दोघांच्यापेक्षा देवलांची नाटकेही फारशी निराळी नाहीत. ज्या कारणांसाठी खाडिलकर-गडकऱ्यांना दोष दिला जातो त्यापासून शारदा नाटकही फारसे अलिप्त नाही. शारदा हे नाटक वास्तववादी म्हणत असताना आपल्याला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हेच एकदा निश्चित करून घेतले पाहिजे. वास्तववाद हा शब्द जर आपण शैलीपुरता विचारात घेणार असू, तर मग किर्लोस्करांच्याइतकीच देवलांची शैली वास्तववादी आहे असे म्हणावे लागेल; किंबहुना किर्लोस्करांच्या वास्तववादाचा वारसा देवल चालवीत आहेत असेही म्हणता येईल. भाषाशैलीचा प्रश्न बाजूला ठेवून आपण समाजातील खऱ्याखुऱ्या समस्यांकडे वळलो, तर सगळ्याच नाटककारांच्यासमोर असणाऱ्या समस्या खऱ्याच होत्या असे आढळून येईल. कोल्हटकरांनी मद्यपान, पुनर्विवाह यांसारख्या समस्या आपल्या नाटकांमधून विचारात घेतलेल्या आहेत. खाडिलकरांनी राजकीय पारतंत्र्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. समस्या म्हणून पाहिले तर सगळ्याच समस्या वास्तव असतातच. समस्येचा वास्तवपणा हा कोल्हटकर, खाडिलकर आणि देवल या तिघांनाही समान आहे.
 पण वास्तववादी नाटक अनलंकृत भाषाशैलीमुळे किंवा प्रासादिक भाषेमुळे वास्तववादी होत नाही. ते समस्येच्या खरेपणामुळे वास्तववादी होत नाही. खऱ्या वास्तववादी नाटकाला वास्तववादी जीवनदर्शन लागते. म्हणजे आशयाचा वास्तववाद लागतो. हा वास्तववाद देवलांच्या नाटकांत आहे काय? हे तपासून पाहण्याचीच गरज आहे. ज्या कालखंडाच्या चौकटीत देवल निर्माण झाले त्या चौकटीत जर आपण पाहिले, तर देवलांचे दोष फारसे जाणवणार नाहीत. संवादांचा स्वाभाविकपणा सोडला तर नाट्यरचनेचे उरलेले सर्व दोष खाडिलकर, गडकरी आणि देवल यांना समान आहेत. हे मान्य केल्यामुळे आपण देवलांचा फार मोठा अपमान करत आहो असेही वाटण्याची गरज नाही. किंवा कलावंत म्हणून देवलांनी जे मोठेपण हक्काने मिळविलेले आहे त्यालाही बाधा येण्याचे कारण नाही. यशस्वी नाटककार समस्याप्रधान वास्तववादी नाटक लिहिणारा असलाच पाहिजे असा एकांगी आग्रह धरण्याचे कुणालाच काही कारण नाही.  नाट्याच्या क्षेत्रातील देवलांचा प्रवास हा फारसा सुखद असा कधीच नव्हता. देवल अतिशय चांगले तालीममास्तर होते, ते नाट्यप्रयोग फार चांगला बसवून घेत अशी त्यांची ख्याती आहे. पण नाट्यरचनेवर मात्र दीर्घकाळ त्यांना प्रभुत्व मिळवता आलेले दिसत नाही. त्यांनी लिहिलेले पहिले नाटक 'दुर्गा' हे अनुवादित आणि शोकान्त होते. हे नाटक रंगभूमीवर फारसे प्रभावी ठरले नाही. मराठी रंगभूमीवर शोकान्त नाटके आरंभापासून अधूनमधून येत राहिली. पण शोकान्त नाटके प्रेक्षकांच्या मनाची पकड दीर्घकाळपर्यंत घेऊ शकली नाहीत. शोकान्तिकेला मराठी रंगभूमीवर प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देणारे नाटककार म्हणून अग्रक्रमाने गडकऱ्यांचा उल्लेख करावा लागेल. कालक्रमाच्या दृष्टीने पाहिले, तर याबाबतचे काही श्रेय खाडिलकरांनाही द्यायला हवे. नंतर देवलांनी लिहिलेले 'विक्रमोर्वशीय' हेही अनुवादित नाटक फारसे प्रभावी ठरले नाही. 'मृच्छकटिक', 'झुंजारराव' व 'फाल्गुनराव' अर्थात 'तसबिरीचा घोटाळा' ही नाटके बऱ्यापैकी यश मिळविणारी ठरली. विशेषेकरून 'फाल्गुनरावां'चे अपयश डोळ्यांत भरण्याजोगे आहे. आपल्या उत्तर आयुष्यात देवलांनी कोल्हटकरांच्या संगीताची प्रतिष्ठा आणि खाडिलकरांच्या 'स्वयंवर', 'मानापमान' यांसारख्या नाटकांची लोकप्रियता व जनमानसावरील पकड मोठ्या आनंदाने पाहिली असेल असे नाही. आयुष्याच्या शेवटच्या काळात देवलांनी खाडिलकरांच्यासमोर आपला पराभव मान्य केलेला आहे.
 मूळच्या 'फाल्गुनराव' अर्थात 'तसबिरीचा घोटाळा' या गद्य नाटकाचे रूपांतर देवलांनी संगीत नाटकात केले. त्यामुळे 'फाल्गुनराव'चा 'संशयकल्लोळ' झाला. फाल्गुनरावला नव्या रूपात सादर करताना देवलांनी केवळ त्यात संगीतच नव्याने घातले असे नाही. त्यांनी मूळच्या गद्यावरूनही पुष्कळच हात फिरवलेला आहे. आजच्या 'संशयकल्लोळा'तील गद्य संवाद हे शारदा नाटकाच्या यशानंतर ते यश लक्षात घेऊन सुधारून घेतलेले आहेत. आणि संगीताच्याबाबत त्यांना 'मानापमाना'वर ताण करायची होती. देवलांच्या 'संशयकल्लोळा'ला मराठी रंगभूमीवर अफाट लोकप्रियता मिळाली. पण ती पाहण्यास देवल हयात नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर अव्वल दर्जाची लोकप्रियता व डोळे दिपवणारे यश या नाटकाला मिळाले. पण ते देवलांचे यश नसून ती त्यांनी खाडिलकरांना दिलेली शरणागती होती.
 'मृच्छकटिक' आणि 'झुंजारराव' यांना इतके यश मिळाले नाही. फार मोठे संवादकौशल्य किंवा नाट्यप्रयोगाची जाण नसूनही आगरकरांच्या 'विकारविलसिता'ला जे यश मिळाले, त्याच्याजवळ 'झुंजारराव' कधी जाऊ शकला नाही. 'फाल्गुनराव'नंतर देवलांनी लिहिलेले 'शापसंभ्रम' नाटकही जवळजवळ अयशस्वीच ठरले असे म्हणायला हरकत नाही. ही सारी नाट्यसृष्टी अनुवादित, आधारित आणि सुमार यशाची होती. देवलांच्या ज्या प्रासादिक गद्याची आपण मुक्त मनाने स्तुती करतो, ते या नाटकांच्यामधून क्रमाने विकसित होत गेलेले आहे.'शारदा ' आणि 'संशयकल्लोळ 'यांमधील जिवंत आणि प्रासादिक गद्य देवलांच्याजवळ आरंभापासून होते असे समजणे चुकीचे आहे. १८८६ पासून १८९९ पर्यंत म्हणजे 'शारदा' नाटक लिहीपर्यंत देवलांना मराठी रंगभूमीवर पहिल्या तेरा वर्षांत फारसे यश मिळवता आले नाही. ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. 'सौभद्रा'शी स्पर्धा करता येईल अशी लोकप्रियता तर सोडाच, पण नव्याने पुढे येणाऱ्या खाडिलकर-कोल्हटकरांची प्रतिष्ठा व लोकप्रियताही त्या कालखंडात देवलांना मिळाली नाही.
 एकदम डोळे दिपवणारी अशी देवलांची नाट्यसृष्टी नाही. ती क्रमाने अंतःकरण काबीज करून मनात रुजणारी व अढळ राहणारी अशी पण प्रकृतीने सौग्य अशी नाट्यसृष्टी आहे. कोल्हटकरांप्रमाणे देवल चटकन स्वतःकडे आकर्षित करून घेणाऱ्या नाविन्याने नटलेले नव्हते. आणि नावीन्य ओसरल्यानंतर कोल्हटकरांच्याप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीवरून त्यांचा अस्तही झाला नाही. या कालखंडात देवल स्फुट गद्य लिखाणही करीत होते. त्यांनी मराठीत भाषांतरासाठी निवडलेली कादंबरी रेनाल्ड्सची होती. त्यांना संस्कृतमध्ये आकर्षण वाटले असेल, तर ते कालिदास, शूद्रक आणि बाणभट्टाचे होते. यांत शूद्रकालाच काही प्रमाणात आपण वास्तववादी नाटककार म्हणू शकतो. त्या वास्तववादाच्या खाणाखुणा देवलांच्या अनुवादात पुसट झालेल्या आहेत.
 मराठीतील सामाजिक नाटकांचे प्रणेते म्हणून देवलांना ओळखले जाते ते 'शारदेमुळे. 'शारदा' हे प्रभावी ठरलेले व सामाजिक आशय असणारे मराठी रंगभूमीवरील पहिलेच नाटक होते. आणि देवलांचेही पहिलेच स्वतंत्र वाङ्मयीन अपत्य तेच होते. याचा अर्थ यापूर्वी हा प्रयोग कुणी केला नव्हता असा मात्र करता येणार नाही. 'शारदे - पूर्वी सामाजिक समस्यांना कोल्हटकरांनी हात घातलेला होता. 'शारदा' नाटकापूर्वी तीस-चाळीस वर्षे सुधारकांच्या विवेचनांनी आणि भूमिकांनी महाराष्ट्रीय वातावरण दुमदुमले होते. आगरकर 'शारदे'पूर्वीच वारलेले होते. न्या. रानडे व डॉ. भांडारकर यांचे कार्य 'शारदे'पूर्वी बरेच वाढलेले होते. 'शारदा' नाटकापूर्वी आठ वर्षे संमति-वयाचा कायदा मुंबई प्रांताच्या विधानसभेसमोर आलेला होता. विष्णु पंडितांनी पहिला विधवाविवाह यापूर्वीच घडवलेला होता. या सगळ्या समाजसुधारकांच्या यादीत म.फुले यांचे नाव मी मुद्दामच वगळलेले आहे. मराठी वाङ्मयाच्या पहिल्या अवस्थेच्या संदर्भात विचार करायचा तर आमच्या प्रतिष्ठित लेखकांना ज्योतिबा फुले यांचे कार्य आकलन झालेले तर दिसतच नाही, पण जाणवल्यासारखेसुद्धा वाटत नाही. या साऱ्या घटनांचे पडसाद निरनिराळ्या नाटकांमधून उमटत होतेच. बाला-जरठ विवाहावरच 'म्हातारचळ', जरठोद्वाह', 'कन्याविक्रय दुष्परिणाम', 'पद्मावती' यांसारखी नाटके देवलांच्यापूर्वी लिहिली गेली होती. सुधारकांना विरोधी म्हणून सनातन्यांनीही काही नाटके लिहिली होती.
 या सामाजिक नाटकांमधील बहुतेक नाटके प्रयोगात संपूर्णपणे अयशस्वी ठरली.ज्यांना थोडेफार यश मिळाल्यासारखे काही काळ जाणवले ,तीही नाटके ललित वाङ्मय म्हणून अयशस्वीच होती. सामाजिक प्रश्न मांडणारे सामाजिक नाटक म्हणून देवलांच्यापूर्वी एकाही नाटककाराचे लिखाण कलाकृती म्हणून विचारात घ्यावे यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान पातळीपर्यंतसुद्धा पोहोचू शकले नव्हते. तरी पण सामाजिक नाटकांची खळबळ देवलांच्यापूर्वी चालूच होती. 'शारदा' हे पहिले सामाजिक नाटक म्हणताना नेमका अभिप्रेत अर्थ कलाकृतीच्या पातळीवर पोहोचलेले पहिले सामाजिक नाटक असा असतो. हरिभाऊंच्यापूर्वी बाबा पदमनजी आहेत. तरीसुद्धा कलात्मक पातळीवर सामाजिक कादंबरी प्रथम हरिभाऊंनीच नेली असे आपण म्हणतो. कादंबरीच्या क्षेत्रात जसे हरिभाऊंचे यश आहे तसे नाटकांच्या क्षेत्रात देवलांच्या 'शारदे'चे यश आहे. पण हरिभाऊंना आशयाचा वास्तववाद उपजत होता, देवलांना तो प्रयत्नपूर्वकही आत्मसात करता आलेला नाही.
 सामाजिक नाटककार म्हणून देवलांच्याकडे ज्यावेळी आपण पाहू लागतो, त्यावेळी देवलांच्या मर्यादा प्रथम लक्षात येऊ लागतात. आणि हेही लक्षात येऊ लागते की, दोष देवलांचा नसून ज्या पातळीवर सुधारणेची चळवळ देवलांच्या काळी होती, त्या पातळीचा हा दोष आहे. आगरकरांसारखा महान प्रज्ञाशाली पुरुष बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रहाने पुरस्कार करताना या काळात दिसतो. पण त्यांनाही समाजसुधारणेचे जे प्रश्न जाणवले, ते पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे प्रश्न होते. आगरकर सोडल्यास इतर समाजसुधारकांना सुधारणावादासाठी आवश्यक असणारे झुंजार मनच नव्हते. जे सामाजिक प्रश्न या सुधारकांच्यासमोर उभे होते, त्या प्रश्नांचे स्वरूप सर्व गुंतागुंतीनिशी या सुधारक मंडळींना फारसे कळल्याचे दिसत नाही. पुढे याच मुद्दयावर डॉ. केतकरांनी सुधारकवर्गाचा अडाणी म्हणून अधिक्षेप केला आहे. प्रत्येक सामाजिक प्रश्न हा एका सामाजिक परिस्थितीत जन्माला येत असतो. त्या परिस्थितीला निरपेक्ष होऊन प्रश्नाचा विचार करण्यात अर्थ नसतो. ही सामाजिक परिस्थितीच सामाजिक प्रश्नाभोवतालची गुंतागुंत निर्माण करीत असते. आमच्या सुधारक लेखकांना ही बाब नीटशी कधी कळली नाही.
 केशवपनाला विरोध करणाऱ्या हरिभाऊंनासुद्धा आपल्या नायिकेच्या मनात पुनविवाहाचा विचार कधीच आला नाही ही गोष्ट स्पष्ट करताना सुधारक म्हणून संकोचल्यासारखे वाटले नाही. तरुण विधवांच्या मनात पुनर्विवाहाचा विचारच येणे शक्य नसले, इतक्या जर त्या पतीशी एकजीव होत हा सामान्य नियम मानला, तर मग केस तरुणपणी काढले काय अगर म्हातारपणी काढले काय याचे महत्त्व गौण होते. पतीशी एकजीव झालेल्या विधवेला आपण सुंदर दिसावे, आपले सौंदर्य शिल्लक उरावे ही गोष्ट जाणवण्याचे काहीच कारण नाही. केशवपनाचा प्रश्न अपरिहार्यपणे सामाजिक प्रश्न म्हणून विधवाविवाहाशी निगडित आहे, ही गोष्ट हरिभाऊंना जाणवली नाही. आणि विधवाविवाहाचा प्रश्न तितक्याच अपरिहार्यपणे परंपरामान्य असलेल्या पातिव्रत्य या कल्पनेला संपूर्णपणे विरोधी आहे. विधवाविवाह हा सुटा प्रश्न नसतो.त्याच्या बाजूला परीत्यक्तां चाही प्रश्न असतो. ही गुंतागुंत त्या काळी कुणीच विचारात घेतली नाही. कारण लेखकांच्यासमोर प्रत्येक प्रश्न हा सुटा प्रश्न आहे. हे सुटे प्रश्न ज्या परिस्थितीचा भाग आहेत, त्या परिस्थितीत ते एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. वैचारिक पातळीवर समाजसुधारणांचा विचार करताना कोणत्याही एका बुरुजावर निकराचा हल्ला झाला की सारी तटबंदी शिथिल होते अशी भूमिका घेता येते. कलावंतांना सामाजिक प्रश्न कलेच्या पातळीवर नेताना प्रत्येक बुरूज हा एका संपूर्ण तटबंदीचा भाग आहे हे विसरून चालत नव्हते.
 प्रश्नांचा सुटा विचार करणे ही जी त्या वेळची सार्वत्रिक पद्धत त्याला हरिभाऊ, कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी-कुणीच अपवाद नव्हते. वामन मल्हारांच्यापासून प्रश्नांचे आंतरिक संबंध लेखकांना क्रमाने दिसू लागतात. सामाजिक प्रश्नावर नाटक लिहावे असा आग्रह आजही नाही. देवलांच्या काळी तर मुळीच नव्हता. पण सामाजिक प्रश्नावर लिहायचे म्हटल्यास तो प्रश्न नीट माहीत असावा इतका आग्रह मात्र जरुरीचा ठरतो. कारण कलावंत जे उमजलेच नाहीत त्याचे चित्रण करू शकणार नाहीत. बाला-जरठ विवाहाचा प्रश्न हा अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांपैकी आहे. त्या प्रश्नाचे स्वरूप केवळ वधूवरांच्या वयातील अंतराइतके सोपे नाही. दहा वर्षांच्या मुलीचे लग्न चाळीस वर्षांच्या वराशी होणे ही घटना जितकी चिंताजनक आहे, तितकी साठ वर्षांच्या मुलीचे लग्न नव्वद वर्षांच्या वराशी होणे ही चिंताजनक घटना नाही. वयाचे अंतर तेच असले तरी सगळा संदर्भ विवाहाच्या वेळी असणाऱ्या वयामुळे बदलून जातो. दुसऱ्या प्रकारच्या विवाहात निदान मला तरी तीस वर्षांचे अंतर आक्षेपार्ह वाटत नाही.
 बाला-जरठ विवाहाचा प्रश्न एका बाजूने बालविवाहाशी निगडित आहे. सर्व मुलांमुलींची लग्ने लहान वयात व्हायची म्हटल्यानंतर दहाव्या वर्षीपर्यंत मुलींची लग्ने होऊन जातील, आणि आठ वर्षांच्या मुलीचे लग्न करणे प्रशस्त मानले जात असे. परिस्थितीनुसार ही वयोमर्यादा दोन-तीन वर्षांनी वाढत असे. पण बहुतेक मुलींची लग्ने ऋतुप्राप्तीपूर्वी होऊन जात. कचित एखाद्या मुलीला विवाहापूर्वी ऋतू प्राप्त झाला, तर मग लग्न जुळणे फारच कठीण होत असे. आणि म्हणून अशा वेळी ऋतुप्राप्तीची घटना कसोशीने चोरून ठेवण्यात येई. एरव्ही ऋतुप्राप्ती हा सोहळ्याचा भाग असे. देवलांच्या नाटकात विवाहोत्तर ऋतुप्राप्तीच्या सोहळ्याचाही उल्लेख आहे. विवाहपूर्व ऋतुप्राप्तीच्या घटनेचेही चिंता म्हणून वर्णन आलेले आहे. मराठवाडा भागात ही परिस्थिती माझ्या लहानपणी मी पाहिलेली आहे.
  या सामाजिक परिस्थितीत बहुतेक मुलांचे लग्न सोळाव्या वर्षाच्या आतच होऊन जात असे. असा हा मुलगा ऐन पंचविशीत विधुर झाल्यास या मुलाने काय करावे? स्वतः न्या. रानडे व हरिभाऊ असे तिशीच्या सुमारास विधुर झालेले होते. या मंडळींना बारा-चौदा वर्षाच्या मुलीशी लग्न करण्याशिवाय दुसरा मार्गच मोकळा नव्हता.सोळा सतरा वर्षयाच्या विधवेने वर्ष -दीड वर्षाच्या बऱ्यावाईट संसाराच्या आठवणीवर उरलेल्या जीवनाचा उन्हाळा संयमाने भोगावा ही अपेक्षा जितकी चूक, तितकीच तिशीच्या सुमारास पुरुषाने पुढचे आयुष्य व्रतस्थ राहण्याची प्रतिज्ञा करावी ही अपेक्षा चुकीची आहे. म.गांधींच्यासारख्या अपवादभूत व्यक्तीचा नियम या ठिकाणी उपयोगी पडणारा नाही. कारण सामान्य माणूस तिसाव्या वर्षी वानप्रस्थ स्वीकारण्याची कल्पना मान्य करणार नाही. विषम-विवाह हे या परिस्थितीचे अपत्य आहे. विषम-विवाहातील नवरदेव हा सामान्य नियम म्हणून पस्तीस ते चाळीस या वयातील सापत्य विधुर असे, किंवा चाळीस ते पंचेचाळीस या वयातील विनापत्य विधुर असे. सर्वसामान्य परिस्थितीत चाळिशीत विधुर होणाऱ्या पुरुषासमोर पहिला प्रश्न स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा असे. तो स्वतःच्या लग्नाच्या भानगडीत पडत नसे.
 या सामान्य नियमाला अपवाद होतेच. पण अपवाद हे अपवाद म्हणून असतात. सार्वत्रिक नियम म्हणून त्यांचा विचार करता येत नाही. पंचाहत्तर वर्षांच्या भुजंगनाथाचे लग्न चौदा वर्षाच्या शारदेशी ठरवले जावे ही घटना घृणा निर्माण करणारी व अंगावर शहारे आणणारी असली तरीही प्रातिनिधिक घटना नाही. अपवादात्मक घटना कलाकृतींना वर्ण्य नसतात. अपवादात्मक घटनांच्यावर श्रेष्ठ कलाकृतीची उभारणी झाल्याचे उदाहरण आपण कधीच विसरू शकत नाही. कारण शेक्सपिअरचे 'हॅम्लेट' असे नाटक आहे. पण अपवादभूत घटना सामाजिक समस्येच्या वास्तववादी चित्रणाला निरुपयोगी असतात.
 एका बाजूने हा प्रश्न बालविवाहाशी निगडित आहे. आज लमाच्या बाजारात सोळा ते चाळीसपर्यंतच्या कोणत्याही वयातील कुमारिका विवाहासाठी उपलब्ध आहेत. ज्या समाजात प्रौढ कुमारिका उपलब्ध असतात, त्या समाजात विषम-विवाह हा सामाजिक प्रश्न नसतो. ज्या समाजात बालविवाह सार्वत्रिक असतो, त्या ठिकाणी विषम-विवाहाला उत्तर नसते. देवल समाजसुधारणेच्या युगात होते म्हणून त्यांना काही गोष्टी जाणवल्या. कालिदासाला त्या जाणवणे शक्य नव्हते. 'मालविकाग्निमित्र' लिहिताना आपण प्रेमकथेला विषम-विवाहाचे अधिष्ठान निष्कारण देतो आहोत असे कालिदासाला वाटले नाही. उलट त्याला मालविकेचे अग्निमित्राशी लग्न ही घटना इष्ट आणि आनंददायक वाटली. दुसऱ्या बाजूने हा प्रश्न विधवाविवाहाशी निगडित आहे. बालविवाह बालविधवा निर्माण करतो. शिवाय विवाहपद्धती ज्या समाजांत रूढ आहे, त्या समाजात विधवा आणि परित्यक्ता असतातच. जर समाजात विधवाविवाह रूढ असले, तर मग लग्नासाठी विधुरांना विविध वयांच्या वधू उपलब्ध असतात. अशा समाजात पुनर्विवाह सार्वत्रिक झाल्यानंतर विषम-विवाह हा सामाजिक प्रश्न नसतो. बाला-जरठ विवाहावर नाटक लिहिणाऱ्या नाटककाराची भूमिका जर एका बाजूने बालविवाहाला प्रतिकूल आणि दुसऱ्या बाजूने विधवाविवाहाला अनुकूल नसली, तर मग त्या लेखकाचे लिखाण वास्तवाचे भान सुटणारे होणे अपरिहार्य असते.
 'शारदा ' नाटकात विधवाविवाहाला अनुकूलता अथवा प्रतिकूलता दाखवण्याची वेळ आलेली नाही. पण देवलांनी स्पष्टपणे बालविवाहांना अनुकूलता मात्र दाखवलेली आहे. शारदेच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने लहान वयांत झाली आहेत. कारण त्यांचे बाप मुलीची चिंता करणारे प्रेमळ बाप आहेत. शारदेचे लग्न लहान वयात झाले नाही, कारण तिचा बाप द्रव्यलोभी आहे. म्हणून तर आपले लग्न कधी होईल अशी चिंता करण्याची वेळ शारदेवर आलेली आहे. 'शारदा' नाटकातील संदर्भ ऋतुप्राप्तीपूर्वीच्या बालविवाहांना अनुकूल आहेत हे केवळ त्या काळच्या परिस्थितीचे चित्रण नव्हे. ती देवलांच्याही मनाची स्वाभाविक घडण आहे. बालविवाह नसावेत असे आग्रहाने प्रतिपादन करणाऱ्या देवलांच्या समकालीनांना बारा वर्षाखालील मुलीचा विवाह होऊ नये इतकेच म्हणायचे होते. बाराव्यातेराव्या वर्षी मुलगी विवाहाला योग्य होते असे हे सुधारकसुद्धा मानीत होते.<
 विषम-विवाहातील वर हाही आपल्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे भक्ष्य असतो. आपल्या मुलीच्या वयाच्या एका अर्भकाशी लग्न करताना तोही मनातून ओशाळून जात असावा. स्वतःच्या प्रकृति धर्मासमोर आणि परिस्थितीसमोर हा वरही लाचार झालेला असतो. या वराला लहान, सुबक, ठेंगणी पत्नी नको असते. तो सौंदर्याची फारशी चिकित्सा करीत नाही. त्याला शक्य तितकी मोठी दिसणारी, थोराड अंगापिंडाची आणि विवाहानंतर शक्यतो लवकर वयात येणारी गृहिणी हवी असते. रूप-सौंदर्याकडे कानाडोळा करण्यास हा वर तयार असतो. वधूपित्याचे घराणे आपल्या बरोबरीचे आहे की नाही याची चौकशी करण्यास त्याला वेळ नसतो. प्रथम विवाहाच्या वेळी रूप, हुंडा, कुलीनपणा या बाबींना त्या काळी फार मोठे महत्त्व असे. बिजवराच्या लग्नात या बाबी गौण असतातः त्या ठिकाणी शक्यतो लवकर 'संसाराला लागणारी मुलगी' एवढा एकच प्रश्न महत्त्वाचा असतो. सत्तर वर्षांच्या सुदाम-सावकारावर ताण करील अशी देखणी बायको पाहिजे हे म्हणणारा भुजंगनाथ विषम-विवाहातल्या वरांचा प्रतिनिधी नसतो. अम्लान, ताज्या सौंदर्याचा नित्य उपभोग घेण्यास वखवखलेला असा तो मध्ययुगीन बादशहा वाटतो. ज्या प्रमाणात असे वाटत जाईल, त्या प्रमाणात या नाटकातील समाजदर्शनाची वास्तवता मावळत जाणार आहे. नाटकाच्या प्रस्तावनेतच नटीच्या तोंडून देवलांनी सुदाम-सावकाराची वधू दहा वर्षांची आहे असा उल्लेख केला आहे. सत्तराव्या वर्षी लग्न करणारा माणूस विवाहसौख्यासाठी अजून चार वर्षे वाट पाहण्याइतका बिनघोर मनाचा नसतो, हे कुणाच्याही लक्षात येऊ शकेल.
 जाणूनबुजून म्हाताऱ्याच्या गळ्यात आपली मुलगी बांधणारा वधूपिता हाही आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्याजवळ अपत्यविषयक ममता नसते असे समजण्याचे काहीच कारण नाही. बिजवराला मुलगी देणारा बाप हा दारिद्रय आणि कर्जबाजारीपणा यांमुळे खंगलेला व पराभूत झालेला बाप असतो. तोही मनातून ओशाळलेलाच असतो. आपल्या एका अपत्याचे बिजवराशी लग्न लावून तो सधनाच्या शेल्याला आपली गाठ बांधू पाहात असतो.यामुळे उरलेल्या मुलाबाळांचे योगक्षेम नीट चालतील, मुलांच्या शिकण्याची सोय होईल, उरलेल्या मुलींच्या लग्नांची सोय होईल, आपल्या संसाराला मोठ्यांचा आधार लागून तो काही प्रमाणात वाटेवर येईल या भूमिकेतून आपल्या एका अपत्याचे काहीसे अकल्याण करण्यास तयार झालेला लाचार माणूस हा विषम-विवाहातील वधूपिता असतो. स्वतःच्या मुलांची माया आणि संसाराची चिंता त्याला हे पाऊल उचलण्यास भाग पाडीत असते.
  आणि तरीही हा वधूपिता आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गोष्टी सतत बोलतच असतो. वराचे वय थोडे मोठे असले तरी हरकत नाही; तो शरीराने धडधाकट आहे- गेला बाजार, अजून देवाची दया असली तर पंधरा-वीस वर्षे नवरदेव हिंडता, फिरता, कमावता असायला घोर नाही; मुलीला चार पोरे-बाळे होतील; पोरगी मोठ्या घरी पडेल--अशा प्रकारची स्वप्ने बोलून दाखविणारा, दारिद्रयामुळे दुबळा आणि वात्सल्यापोटी निष्ठुर झालेला असा हा वधूपिता असतो. पैशाच्या दोन घागरी घरी पुरून ठेवणारा, पाच हजार रुपये हुंडा घेणारा व एकुलती एक मुलगी केवळ द्रव्यलोभामुळे म्हाताऱ्यास विकायला तयार झालेला कंजूष, द्रव्यलोभी कांचनभट हा विषम-विवाहातल्या वधूपित्यांचा प्रतिनिधी नाही. अशा घटना घडत नाहीत असे कुणीच म्हणणार नाही. पण अपवादभूत घटना म्हणजे समस्येच्या प्रतिनिधिक घटना नसतात. कांचनभट मुलीचे लग्न मोडले म्हणून वेडा होत नाही, तो हुंडा बुडाला म्हणून वेडा होतो. या वेडेपणाच्या भरातसुद्धा आपला मुलगा जयंत हा जर मुलगीच असता तर त्याचेही पाच हजार रुपये मिळाले असते अशी कल्पना करतो. जवळ पैसे असूनही आपल्याला मुलीच व्हाव्या, मुलगा असू नये, सर्व मुली म्हाताऱ्यांना द्याव्या आणि प्रत्येकीचे पाच हजार रुपये उभे करावेत अशी आकांक्षा असणारा वधूपिता विषम-विवाहाच्या परिस्थितीतील वधूपित्यांचा प्रतिनिधी होऊ शकणार नाही, हे उघड आहे.
 शारदेत देवलांनी जो प्रश्न चित्रित करण्यासाठी निवडला आहे त्या सामाजिक प्रश्नावरील देवलांची पकड किती ढिली आहे व सामाजिक प्रश्न समजून घेण्याच्या देवलांच्या मर्यादा किती मोठ्या आहेत, याचे थोडेसे भान ह्या विवेचनावरून होण्यास हरकत नसावी. खरे म्हणजे बाला-जरठ विवाहावरील नाटक शोकान्त होणे अपरिहार्य होते. ही अपरिहार्यता आजच्या टीकाकारांना जशी जाणवते, तशी देवलांना जाणवलेली दिसत नाही. 'शारदेला' प्रस्तावना लिहिणाऱ्या हरिभाऊ आपट्यांनाही ह्या ठिकाणी शोकान्त नाट्याची अपरिहार्यता जाणवलेली होती असे प्रस्तावनेवरून वाटत नाही. नव्या समीक्षकांना ही अपरिहार्यता जाणवते. तिच्या संदर्भात कधीकधी असा प्रश्न विचारला जातो की, पाचव्या अंकाच्या दुसऱ्या प्रवेशात शारदा जीव देण्यासाठी नदीकाठी जाते या ठिकाणी शारदा नदीत जीव देते असा शोकपर्यवसायी शेवट 'शारदे'च्या संदर्भात स्वाभाविक व शोभून दिसणारा झाला नसता काय? मला वाटते, हा प्रश्न विचारणेच भाबडेपणाचे आहे. 'शारदा' हे नाटक सामाजिक समस्या चित्रित करणारे वास्तववादी नाटक आहे असे गृहीत धरूनच हा प्रश्न विचारला जातो. माझा मूळ गृहीताशीच मतभेद आहे.
 जर 'शारदा ' नाटक समस्याप्रधान वास्तववादी नाटक असते , तर त्याचा शेवट शोकपर्यवसायी होणे अपरिहार्यच ठरले असते. पण आहे या अवस्थेत 'शारदे'ची रचना समस्याप्रधान नाटकाची नाही. नवतरुणीचे किंवा बालिकेचे जरठाशी लग्न होणे ही सामाजिक समस्या आहे. लग्न ठरणे ही सामाजिक समस्या नाही. जर एकेका मुलीचे भुजंगनाथासारख्या वृद्ध कपीशी लग्न ठरून मोडत असते व शेवटी या मुलींना कोदंडासारखा अनुरुप वर मिळत असता, तर मग समस्या शिल्लकच राहिली नसती. बाला-जरठ विवाहाचे दुष्परिणाम दाखविण्यासाठी लिहिले जाणारे नाटक जरठाला विवाहाची इच्छा निर्माण होते इथून आरंभ पावू शकत नाही. समस्याप्रधान नाटकात निदान समस्या उपस्थित झाली पाहिजे. भुजंगनाथ आणि शारदा विवाहानंतर गंगापूरहून आपल्या गावी परत येतात व शारदेचा दु:खद संसार सुरू होतो, इथून समस्याप्रधान नाटकाचा आरंभ झाला पाहिजे. सर्व नाटकभर शारदेचा दारुण कोंडमारा प्रामुख्याने दाखवला जायला पाहिजे. परिणामी शारदा स्वैरिणी झाली असती अगर तिने आत्महत्या केली असती आणि याहीपेक्षा मोठ्या शक्तीचा नाटककार असता, तर त्याने उत्साहशून्य जीवन्मृत सौभाग्य आणि तितकेच मृतवत वैधव्य शारदा भोगीत बसली हीच बाब तिच्या मृत्यूपेक्षा अधिक भीषण करून दाखवली असती. पण अशा प्रकारचे नाटक लिहिण्याची देवलांची इच्छा नव्हती. शोकान्त नाटकाचा पुरेसा वाईट अनुभव देवलांनी घेतलेला होता. त्याची पुन्हा परीक्षा पाहण्याची देवलांची इच्छा नव्हती.
 बाला-जरठ विवाहावर नाटक लिहायचे हा देवलांचा पहिला हेतू होता. हे नाटक सुखान्त करायचे हा देवलांचा दुसरा हेतू होता. उद्बोधनासाठी ललित वाङ्मयाची निर्मिती करू इच्छिणाऱ्या लेखकांच्यासमोर एक प्रश्न नेहमी उभा असतो: आपण जे लिहितो आहोत ते जर उद्बोधनाचे साधन म्हणून उपयोगी पडायचे असेल तर रसिकांना प्रिय झालेच पाहिजे, ही त्यासाठी आवश्यक अट आहे. जे कुणीही वाचणारच नाही, जे कुणाला वाचवणार नाही अशा लिखाणाची किंमत प्रचाराचे साधन म्हणूनही शून्य असते. उद्बोधनासाठी लिहिणारे कलावंत मधून मधून रंजनाच्या सूत्रांशी तडजोड करीत बसतात असे जे आपल्याला दिसते, त्याचे कारण या ठिकाणी सापडते. उद्बोधनाच्या तीव्र जिज्ञासेपोटी देवलांनी वास्तविक जीवनदर्शनाशी तडजोडी केल्या असे म्हणावे का त्यांना मुळात शोकान्त नाटकाचा पुन्हा प्रयोग करण्याची इच्छा नव्हती असे म्हणावे, याच उत्तर निर्णायकपणे देवलच देऊ शकले असते. नाट्यरचनेच्या अभ्यासावरून आपण इतकेच म्हणू शकतो की, आरंभापासून देवलांची इच्छा सुखान्त नाटक लिहिण्याची होता. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या नाटकाचे आरंभ-मध्य-शेवटासह विकल्पन केले आहे, नाटकातील बारीकसारीक दुवासुद्धा सुखी शेवटाच्या दृष्टीने या नाटकात आलेला आहे. जर या नाटकाची रचनाच सुखान्तिकेची असेल, तर मग शारदेने जीव देण्याच्या ठिकाणी नाटक संपावे ही गोष्ट शक्यच नव्हती.
  हे नाटक सुखान्त करण्याचा निर्णय देवलांनी प्रथम घेतला. ही आयत्या वेळी मनात आलेली कल्पना नव्हती. आरंभापासूनच नाटकाशी एकजीव झालेली ही कल्पना होती. देवलांच्या नाटकातील पदे पुष्कळदा संपूर्ण नाटकाची रचना होण्यापूर्वी तयार होत असत. या दृष्टीने पाहिले तर देवलांच्या मनात कुठेतरी एक झगडा चालू असल्याचे दिसते. त्यांनी वराचे वय पन्नाशीच्या जवळपास आरंभाला गृहीत धरले असल्याचे दिसते. त्या अनुरोधानेच ‘पन्नाशीची झुळुक लागली, बाइल दुसरी करू नको' हा उल्लेख आलेला आहे. पण पुढे नाटक सुखान्त करायचे ठरल्यानंतर नवरदेव पन्नास वर्षांचा असण्याची गरज उरली नाही. त्यांनी तो पंचाहत्तर वर्षांचा ठरवलेला आहे. जोडीला जोड म्हणून सुदाम-सावकार सत्तर वर्षांचा गृहीत धरला आहे. एक विवाह नाटकाच्या आरंभी घडलेला आहे. दुसरा नाटकात घडू घातलेला आहे. दोन्ही ठिकाणी देवलांनी नवरदेव अतिवृद्ध गृहीत धरले आहेत याला कारण आहे. एकदा नाटक सुखान्त करायचे म्हटल्यानंतर देवलांना दोन गोष्टींची काळजी घेणे भाग होते. एक तर नायिकेला अनुरूप असा वर शोधून देण्याची जबाबदारी देवलांना पार पाडणे भाग होते. सुखान्त नाटकाचा शेवट अनुरूप वराशी शारदेचा विवाह घडवून दिल्याशिवाय दुसरा कोणता कल्पिणे शक्य नव्हते. यासाठी कोदंड या पात्राची निर्मिती करणे आवश्यक होते. शेवटी शारदेचे जर कोदंडाशी लग्न लावायचे असेल, तर तिचे लग्न भुजंगनाथाशी होऊ देणे शक्य नव्हते. एकदा भुजंगनाथाचे आणि शारदेचे विधिवत लग्न झाले की, त्यानंतर सुखी शेवट होण्यासाठी भुजंगनाथ मरेपर्यंत वाट पाहणे व नंतर शारदेचा पुनर्विवाह लावून देणे अशी रचना करावी लागली असती. ही रचना झाल्यानंतर ते नाटक पुनर्विवाहावरील नाटक झाले असते. बाला-जरठ विवाहावरचे नाटक उरले नसते.
 बाला-जरठ विवाहाचा प्रश्न विधवाविवाहाशी निगडित आहे ही जाणीव देवलांच्या पिढीला येणे शक्य नव्हते. सुटा-सुटा प्रश्न विचारात घेणाऱ्या मंडळींना बालविवाह, विधवाविवाह आणि बाला-जरठ विवाह असा संयुक्त विचार करणे शक्य नव्हते. म्हणून सुखी शेवट करण्यासाठी भुजंगनाथाशी लग्न होऊन चालणार नव्हते. ते लग्न ठरणे आणि मोडणे या घटना आवश्यक होत्या. पण भुजंगनाथाचा शारदेबरोबरचा विवाह मोडायचा कसा ? हा विवाह मोडण्यासाठी परंपरावादी मनाला दुखावेल असा कोणताही मार्ग देवल स्वीकारण्यास तयार नव्हते, कारण त्यांचे स्वतःचे मनच परंपरावादी होते. परंपरावादाच्या कक्षेत राहून भुजंगनाथाचा विवाह मोडायचा असेल, तर काही पर्याय डोळ्यांसमोर होते. एक पर्याय भुजंगनाथच्या अपमृत्यूचा आहे. पण त्यामुळे कांचनभटाने शारदा दुसऱ्या म्हाताऱ्याला देऊ केली असती. हा कांचनभट वाटेतून बाजूला सारण्यासाठी देवलांनी त्याला शेवटी वेडा करून टाकला आहे. आणि तो वेडा होण्याइतपत धक्का बसावा यासाठी ऐन समारंभात विवाह मोडून दाखविला आहे. एक पर्याय शेवटच्या क्षणी भुजंगनाथाला विरक्ती निर्माण होण्याचा असा होता. पण या पर्यायात प्रेक्षकांची सहानुभूती भुजंगनाथाकडे जाते. हे घडून येणे देवलांना इष्ट नव्हते. भुजंगनाथ आजारी पडल्यामुळे असो, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असो, एकदा शारदेचा पिता वाचादत्त झाला की वाचादत्त पित्याने लग्न मोडणे परंपरावादाला मंजूर नव्हते.म्हणून देवलांनी तो विवाहच अशा बेताने घडवून आणला आहे, की तो आरंभापासून शेवटपर्यंत निर्विवादपणे धर्मशास्त्रविरोधी असला पाहिजे. देवलांच्या परंपरावादी मनाला धर्मशास्त्रात आधार नसणाऱ्या मुद्दयावर विवाह मोडणे आवडले नसते.
 आमचे आद्य समाजसुधारक (म. फुले व आगरकर वगळता) हिंदूंचे परंपरागत धर्मशास्त्र गुंडाळून ठेवण्यास तयार नव्हते. स्मृतींचा पुनर्विवाहाला पाठिंबा आहे म्हणून पुनर्विवाह शास्त्रविहित आहे, असे सिद्ध करण्यावर या सुधारकांचा भर होता. समाजामध्ये जे जे काही वाईट असेल त्याची जबाबदारी रूढींच्या डोक्यावर टाकून सुधारकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला पवित्र स्मृतींचा जोरकस पाठिंबा आहे, हे दाखविण्याची धडपड सुधारक करीत होते. काही सुधारणा करण्यास ही माणसे तयार असली तरी ती मनाने सनातनीच होती. देवलही यापेक्षा निराळे नव्हते. देवलांनीसुद्धा पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात कोदंडाच्या तोंडी एक पद घालून बाला-जरठ विवाह धर्मशास्त्रविरोधी आहे असा मुद्दा आग्रहाने नोंदवलेला आहे. या मुद्दयाला देवलांना कोणत्या स्मृतिग्रंथात कुठे आधार सापडला होता, हे आज कळायला मार्ग नाही. स्मृतींचे आधार असतीलच तर ते बालविवाहाला अनुकूल असे आहेत. प्रायः स्मृतिग्रंथ विधवाविवाहाला प्रतिकूल आणि पुरुषाला विवाहाबाबत कोणतीही वयोमर्यादा निश्चित न देणारे असे आहेत. कोणत्याही स्मृतिग्रंथांनी विषम-विवाह पाप म्हणून नोंदविल्याचे निदान माझ्या पाहण्यात नाही. पण देवल आग्रहाने बाला-जरठ विवाह धर्मशास्त्रविरोधी आहे असे म्हणतात. हा काळाचा महिमा आहे. एखादी घटना इष्ट का अनिष्ट, विहित की अविहित यापेक्षा शास्त्रमान्य की शास्त्रविरोधी याला त्या काळी फार मोठे महत्त्व होते. देवलांच्या मते बाला-जरठ विवाह ही शास्त्रविरोधी रूढी आहे, आणि अन्यधर्मी राजे भारतावर राज्य करीत असल्यामुळे ही रूढी मोडली जाऊ शकली नाही.
 सारे दोष रूढीवर टाकून शास्त्राला पापातून मोकळे करणारे मन विवाह मोडण्यासाठी शास्त्रशुद्ध कारण हुडकणार हे उघडच आहे. म्हणून देवलांनी शारदा आणि भुजंगनाथ या दोघांचेही गोत्र काश्यपच करून ठेवलेले आहे. तो सगोत्र विवाह असल्यामुळे मूलतःच अवैध आहे. धर्मशास्त्रानुसार या विवाहाची सप्तपदीच होऊ शकली नसती. भद्रेश्वर दीक्षितांनी खोटेच भुजंगनाथाचे कौशिक-गोत्र आहे असे सांगितले असा उल्लेख नाटकात आहे. पण या असत्यावर आधारून जरी सप्तपदी झाली असती, तरी भुजंगनाथ स्वतःच्या गावी येताच हा विवाह त्याच्या पुतण्याने अवैध ठरविला असता. देवलांच्या नाटकात कोदंडाच्या प्रयत्नाने लग्न मोडते असा जरी भास होत असला, तरी मुळातच हे लग्न अशक्य असावे याची सोय लेखकाने करून ठेवलेली आहे. याबरोबरच कोदंड हे पात्रही उभे केलेले आहे आणि त्याचे गोत्र अत्री ठेवून शारदेशी लग्न जुळण्याची सोयही केली आहे.
 या विवेचनाचा हेतू हा की 'शारदेची' संविधानक-रचना करताना देवल काळजीपूर्वक काय करताहेत इकडे लक्ष वेधावे.लग्न ठरावे बिनतोडपणे मोडावे आणि तितक्याच पक्क्या पद्धतीने अनुरूप वरप्राप्ती व्हावी, हे सूत्र मनाशी बाळगून देवल कथानकाचा तपशील भरीत निघालेले आहेत. हा तपशील भरण्यासाठी त्यांना एक एक अपवादभूत परिस्थिती निर्माण करावी लागली आहे. ज्या प्रमाणात अशी अपवादभूत परिस्थिती निर्माण करून देवल कथानकाला सुसंगत व रेखीव करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या प्रमाणात या नाटकातील वास्तवता व समस्येचे प्रातिनिधिक रूप दोन्ही मावळत असून सोयीस्कर कल्पिताचा पसारा तेथे वाढत चाललेला आहे.
 सुखी शेवटासाठी एक तरुण, कुलीन असा कोदंड या नाटकात असणे भाग होते, तो जुळणाऱ्या गोत्राचा आणि अविवाहित ठेवणे भाग होते. कोटंड कुलीन आहे. तरुण आहे. देखणा आहे. शहाणा ब्राह्मण आहे. या परिस्थितीत हे असे राजबिंडे अपत्य अविवाहित राहणे शक्य नव्हते. देवलांनी त्याहीसाठी एक बिनतोड युक्ती हुडकुन काढली आहे. ज्या काळात देवल वावरत होते, त्या काळात ही युक्ती बिनतोड वाटली असेल -आज ती हास्यास्पद वाटते. देवलांनी कोदंडाला करवीर-पीठाच्या शंकराचार्याचा शिष्य बनवलेले आहे. देवलांनी या ठिकाणी शंकराचार्य करवीरपीठाचे घेतले, याचे कारण अगदी साधे होते. करवीरपीठ हे मोठे सुधारक होते असे नाही. सर्वांच्याचइतके ते कडवे परंपरावादी होते. पण महाराष्ट्र करवीरपीठाच्या कक्षेत मोडतो, याला देवलांचा इलाज नव्हता. शंकराचार्यांच्या आज्ञेनुसार कोदंड तीन वर्षे अविवाहित राहून धर्मसुधारणेचा प्रचार करीत हिंडतो आहे. धर्मसुधारणांचा प्रचार करण्यासाठी विशीतली कोवळी पोरे हिंडत नसतात इकडे लक्ष द्यायला देवलांना उसंत सापडणे शक्य नव्हते.
 भारताच्या इतिहासात शंकराचार्यांची गादी सनातनित्वासाठी प्रसिद्ध आहे. श्रुतिस्मृति-पुराणोक्त हिंदुधर्माचे संरक्षण आणि धर्मप्रचार, परंपरागत धर्माविरुद्ध वागणाऱ्यांना धर्मशासन करणे म्हणजे बहिष्कृत करणे व अद्वैत वेदान्ताचा पुरस्कार ही शंकराचार्यांच्या पीठांची परंपरेने चालत आलेली तीन वैशिष्टये आहेत. देवलांचा काळ सोडा पण आजही एकही मान्य शंकराचार्य समाजसुधारणेला आचार्यपीठाची मान्यता देण्यास तयार नाही. किरकोळ तपशीलांच्या बाजूवर डॉ.कुर्तकोटींनी सुधारणेची बाजू कधीकधी घेतलेली दिसते. पण सनातनधर्मीय हिंदू समाजाने डॉ. कुर्तकोटींना आपले जगद्गुरू म्हणून कधी मान्यता दिली नाही. आचार्यपीठांची ही रीत जर पाहिली तर धर्मसुधारणेविषयी प्रयत्न करणारा, चुकीच्या रूढी मोडून काढण्यासाठी बद्धपरिकर झालेला, सुधारणेच्या प्रचारासाठी शिष्य नेमणारा शंकराचार्य कधी वास्तवात आढळण्याची शक्यता नाही हे स्पष्ट होईल. देवलांना हे पात्र संपूर्णपणे स्वप्नरंजनातून उभे करावे लागले.
 नाटकाच्या शेवटी हे शंकराचार्य प्रत्यक्षतः उपस्थित होतात. त्यांच्यासमोर वाद होतो. आणि त्यानंतर हे शंकराचार्य शारदा-कोदंडाच्या विवाहाला आशीर्वाद देऊन कोदंडाची बाजू पक्की करतात. कोदंडाच्या पाठीमागे शंकराचार्य उभे करून परंपरावादाची सोय झाली असेल, पण त्यामुळे वास्तववाद मावळला आणि आचार्यांचा हा विद्वान शिष्य शारदा-भुजंगनाथाचा विवाह अडवण्यासाठी काही बौद्धिक कामगिरी करतो म्हणावे तर तेही दिसत नाही. श्रींच्या आज्ञेने बाला-जरठ विवाह मोडला जात नाही, तो सगोत्र विवाह आहे या कारणावर मोडला जातो. श्रींच्यासमोर जो वाद होतो, त्यातही एक खोच आहे. ती ब्राह्मणांच्याशिवाय इतरांच्या लक्षात येणे कठीण आहे. श्रींच्यासमोर होणारा वाद बाला-जरठ विवाह करावा की करू नये या मुद्दयावर होत नाही. स्त्री विवाहित केव्हा समजावी या मुद्दयावर होतो. भुजंगनाथाबरोबर शारदेची सप्तपदी झालेली नाही, तेव्हा ती विवाहित नाही, हे सिद्ध करण्यासाठी महापंडितांनी कोणताच वाद करण्याची गरज नाही.
 कोदंडाशिवाय नाटक सुखान्त होत नाही, म्हणून आरंभापासून कोदंड आला. हा कोदंड उपरा वाटू नये म्हणून शारदेच्या विवाहाच्या कथानकात त्याचा सहभाग हवा. कोदंडाविषयीं शारदेला सूक्ष्म अनुरक्ती हवी. तशी सूक्ष्म अनुरक्ती शारदेविषयी कोदंडाच्याही मनात हवी. ही सगळी काळजी घेत देवल निघालेले असल्यामुळे आत्महत्या करायला शारदा मोकळी नाही. खरे म्हणजे टीकाकार मानतात त्याप्रमाणे शारदा आत्महत्या करायला नदीवर गेलेलीच नाही. तिला पहाटेच एक स्वप्न पडते. या स्वप्नात ती नदीवर आत्महत्या करायला जाते. आणि तिथे येऊन तिला कोदंड सोडवतो व तिचे पाणिग्रहण करतो. हे पहाटेचे पडलेले स्वप्न खरे होणार की काय, ही परीक्षा पाहण्यासाठी शारदा नदीवर गेली आहे. कोदंडाशी लग्न होण्यापूर्वीच शारदेने मनाने त्याला वरले आहे. शारदेची इच्छा आता अनुरूप वराशी लग्न व्हावे इतकीच राहिलेली नसून ती मनाने सर्वस्वी कोदंडाची झालेली आहे. तिला आता कोदंडाखेरीज दुसरा वर मान्य नाही. या संदर्भात नदीवर जाणाऱ्या शारदेला जीव देता येणे शक्य नव्हते. नाटककाराला शारदेचे प्रेमनिवेदन आणि कोदंडाचा प्रीतिस्वीकार घडवून आणायचा आहे. त्यासाठी हा प्रसंग आलेला आहे. नाटककाराने शारदेचे लग्न आरंभापासूनच कोदंडाशी टरविलेले आहे, त्यात बदल करणे शक्य नव्हते.
 एकदा नाटक सुखान्त करायचे हे ठरल्यामुळे आता देवल निश्चिंत झालेले होते. त्यांनी मनाशी ठरविलेली खलपात्रे कुट्ट काळ्या रंगात चितारण्यासाठी ते मोकळे होते, कारण हा व्यक्तिरेखांचा भडकपणा सुखान्त नाटकाच्या प्रकृतीला मानवणारा आहे. त्या दृष्टीने त्यांनी शारदेचा पिता कांचनभट संपूर्णपणे द्रव्यलोभी आणि निष्ठुर असा रंगवला. आपण म्हाताऱ्याला मुलगी देतो आहो याबाबतची वधूपित्याला स्वाभाविक असणारी खंत या व्यक्तिरेखेत संपूर्णपणे अनुपस्थित आहे. देवलांनी भुजंगनाथ पंचाहत्तर वर्षांचा केला. पण इतके पुरेसे न वाटल्यामुळे त्याला अधिक घृणास्पद करण्यासाठी तो त्यांनी चिक्कू, रंगेल, भोगपिपासू , लंपट, उतावळा, भित्रा अशा अनेक दुर्गुणांनी भरून टाकला आहे. सुदाम सावकारसुद्धा केवळ म्हातारा करून देवलांचे समाधान नव्हते. तो त्यांनी करूपही केला आहे. खलपात्रे घृणास्पद वाटावीत म्हणून कुरूप, दुर्गुणी करण्याची पद्धत परंपरेने चालत आलेली जुनीच पद्धत आहे. रंगभूमीवरील भुजंगनाथाचा प्रत्येक रंगेल उद्गार त्याच्याविषयी घृणाच वाढवतो.ती वाढावी, भुजंगनाथ हास्यास्पद ठरावा याची काळजी देवल घेतात. आपल्या नाट्यपरिणामासाठी सर्व वास्तवता गुंडाळून ठेवून बीभत्स हे विनोदी आहे असे दाखविण्यास देवल कचरले नाहीत. त्यासाठी त्यांनी लग्नाआधीच शारदा व भुजंगनाथ एकमेकांच्यासमोर आणून उभे केले आहेत. हे करण्यात देवलांचा हेतू शारदा-भुजंगनाथाची भेट घडविण्यापेक्षा भुजंगनाथ हास्यास्पद करून दाखविणे हाच अधिक दिसतो. या भेटीच्या प्रसंगी भुजंगनाथाचे म्हातारपण, त्याचे बहिरेपण, त्याची खोटी दातांची कवळी या साऱ्या बाबी उघड होतात. हे भुजंगनाथाचे 'वस्त्रहरण' शारदेपेक्षा प्रेक्षकांच्यासाठीच अधिक आहे. शारदेच्या तोंडून 'वये आजोबा माझे दिसता' ही गोष्ट देवल भुजंगनाथाला ऐकवतातच.
  शेवटी, भुजंगनाथ वृणेच्या व हास्यास्पदतेच्या भडक रंगात किती रंगवावा? हा म्हातारा एकीकडे चिक्कू तर दुसरीकडे सुंदर मुलगी मिळवण्यासाठी हजारो रुपये उधळणारा उधळ्या दाखविला आहे. तो एकीकडे लंपट तर दुसरीकडे अगदीच भित्रा, रंगेल आहे. लंपट माणसे काही प्रमाणात निर्लज्ज होतात. ती उधळीचं असतात, चिक्कू नसतात. ही संगती देवलांना मान्य नाही. परस्परविसंवादी ताणांनी ताणलेला भुजंगनाथ हा एक कृत्रिम बाहुला आहे. त्याला स्वतःची अशी कोणतीही शिस्त नाही. तो चिक्कू असेल तर त्याने लग्नावर पैसे उधळू नयेत. तो रंगेल म्हातारा असेल तर वेपपालट, गावपालट करण्याची, चार वर्षे अविवाहित राहण्याची शक्यता संपते. मूळ म्हाताऱ्या लंपटांना विवाहाची फारशी गरजच नसते. भुजंगनाथाला निश्चित असा आकारच येत नाही. तो पोकळ असल्यामुळेच जास्त नाद करतो ही वस्तुस्थिती आहे.
  हा काल्पनिकाचा पसारा इथेच संपत नाही. लग्न जुळविणे हा ज्याचा चरितार्थाचा प्रमुख उद्योग आहे असा एक भद्रेश्वर दीक्षित देवलांनी उभा केला आहे. हा भद्रेश्वर पुन्हा काल्पनिकच आहे. हिंदू समाजात लग्न जुळविणारे मध्यस्थ असत. ते पुष्कळदा लबाड असत. दोन्ही बाजूंनी पैसे खाणारेही असत. ही गोष्ट खरी आहे. पण धंदा म्हणून लग्ने जुळविणे हा परंपरागत व्यवसाय कधीच नव्हता. मुद्दाम श्रीमंत बिजवर हेरायचे, त्यांच्याकडे सोंगाडे ज्योतिषी पाठवायचे, बिजवरांना विवाहाला प्रवृत्त करायचे, त्यांना तरुण देखण्या मुली मिळवून द्यायच्या, यासाठी दलाली म्हणून काही हजार रुपये मिळवायचे, अशी पद्धत प्राचीन समाजात रूढावलेली नव्हती. ते व्यक्तिगत पाप असू शकते, तो व्यवसाय नव्हे. काल्पनिक कथा-कादंबऱ्यांतून वावरणारे कोणत्याच पापाची खंत न वाटणारे, निविलेले, बुद्धिमान पण बेरड असे हे खलपात्र आहे. वास्तवाच्या सृष्टीत ते कधीच नव्हते. देवलांनी वास्तवातला कांचनभट पुसला, भुजंगनाथ पुसून काढला. त्यात कल्पनेचे भडक रंग भरले. पण भद्रेश्वर तर सगळ्या भडक रंगांच्यानिशी त्यांनी कल्पनेतूनच उभा केला. हा कारस्थानकुशल भद्रेश्वर दीक्षित खरे म्हणजे स्कॉटच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांतून वावरायला पाहिजे.
  देवलांनी शारदेबाबत काय समजूत करून घेतली आहे, हे तर समजणेच कठीण आहे. या मुलीला अजून न्हाणसुद्धा आलेले नाही.भुजंगनाथाशी लग्न मोडल्यानंतर तिला ऋतुप्राप्ती होते. पण यापूर्वीच तिचे तारुण्य रसरशीत झालेले आहे. ती अंगापिंडाने सुडौल झालेली असून, वल्लरीला तर पाठीमागून पाहताना ती इंदिराकाकूसारखी दिसते. वयात न आलेली ही पोरगी कोदंडाला पाहिल्याबरोबर 'इतका तरुण आणि ब्रह्मचारी' असा विचार करू शकते. आपल्याहून लहान मैत्रिणींची लग्ने झाली, त्या संसार करू लागल्या, त्यांना क्वचित मुलेही झाली, आपले मात्र लग्न अजून झाले नाही, ते व्हावे म्हणून परमेश्वराला भीड घालण्याइतकी शारदा विवाहाला आतुर झालेली आहे. म्हाताऱ्या नवऱ्याबरोबर आपला संसार सुखाचा होणार नाही याची तिला पक्की जाण आहे. प्रेम अधिक की पैसा अधिक ? लग्नानंतर मुले होतील की विधवा होऊ ?-या सर्व प्रश्नांवर तिचे विचार नक्की ठरलेले आहेत. भुजंगनाथाशी लग्न ठरत असतानासुद्धा कोदंडाचे चिंतन करणारी, लग्न मोडण्याच्या दुःखात असतानासुद्धा कोदंड आपले पाणिग्रहण करतो असे स्वप्न पाहणारी शारदा वयात येण्यापूर्वीच खूपच ज्ञानी आणि जाणकार झालेली दिसते. यामुळेच की काय देवलांनी कोदंडाबरोबर तिचा सुरेख गांधर्व विवाह एकदा स्वप्नात आणि एकदा नदीकाठी घडवून दिलेला आहे. माझे पाणिग्रहण करून मला पत्करा किंवा मला मरू द्या, असा विलक्षण पेच कोदंडासमोर उभी करणारी शारदा सुंदर, सुबक, टेंगणी असेल, पण ती सरळ-साधी आहे यावर विश्वास बसणे कठीण होऊन जाते.
 शारदा-कोदंडाच्या भेटीचा योगायोग आपणाला पुन्हा कृत्रिमाच्या जगात घेऊन जातो. याखेरीज 'शारदे'त योगायोगाने भेटी आहेत. चोरून ऐकणे, डाव समजणे, वेष पालटणे, इशाऱ्याची पत्रे पाठवणे, नायकाने कैदेत पडणे, योग्य वेळी सुटणे, खलनायकास ऐनवेळी पोलिसांनी पकडणे, खलनायकाने विश्वासू म्हणून मानलेला सहकारी नायकाचा मित्र असणे, ऐन लग्नाच्या एक-दोन दिवस आधी गंगापुरातून लाचखोर अधिकारी बदलले जाऊन शुद्ध तुळशीपत्र असलेले अधिकारी तेथे येणे- हा मालमसाला भरपूर आहे. स्वप्ने केवळ शारदेलाच पडत नाहीत. ती भुजंगनाथालाही पडतात. शारदेच्या स्वप्नात कोदंड येऊन तिचे पाणिग्रहण करतो. भुजंगनाथाच्या स्वप्नात लनाची वरात निघताना राजदूत येऊन पकडतात व कोदंड हसतो असे येते. भद्रेश्वर दीक्षितांनाही स्वप्ने पडतातच. पण त्यांच्या स्वप्नात काय येते हे नाटकात सांगितलेले नाही. सगळ्या बाबी एकत्रितरीत्या विचारात घेतल्या, तर 'शारदे'त वास्तववादापेक्षा सांकेतिकतेचे, कृत्रिमाचे, स्वप्नरंजनाचे रंग अधिक गडद आहेत असा निर्णय घेणे भाग पडते.
  ही सगळी चर्चा 'शारदा' नाटक चांगले नाटक आहे की नाही या संदर्भात विचारात घ्यायची नाही. 'शारदा' हे समस्याप्रधान वास्तववादी नाटक आहे की नाही इतक्या मुद्दयापुरता हा विचार चालू आहे. 'शारदा' नाटकाची परिणामकारकता, त्याचे चांगलेपण हे वादातीत आहेच. एखादे नाटक चांगले असण्यासाठी ज्या प्रकारचा वास्तवाभास त्या नाटकात असावा लागतो, तो 'शारदे'त आहे. फक्त सामाजिक वास्तववाद या ठिकाणी नाही इतकाच माझा मुद्दा आहे. 'सौभद्रा'सारखे नाटक अतिशय लोकप्रिय झाले.या लोकप्रियतेचे बहिरंगाचे घटक आपण पाहू लागलो तर संगीत, प्रेमकथा, सुखी शेवट, कपट-कारस्थान, अनुरूप वरप्राप्ती अशा बाबी आपल्या हाताशी लागतात. 'शारदे'त हे सगळे बहिरंगाचे घटक आहेत. 'सौभद्रा'इतक्या लोकप्रिय न झालेल्या किंवा संपूर्णपणे अयशस्वी ठरलेल्या नाटकातही हे बहिरंगाचे घटक सापडू शकतात. अंतरंगाचे घटक म्हणून पाहिले तर 'सौभद्रा'त सांकेतिकच पण जिवंत व्यक्तिरेखा, त्या निर्माण करणारे संवाद, अतिशय स्थूल पण साम्य-विरोधावर असणारे नाट्य, या बाबी दिसू लागतात. कलात्मकता आणि लोकप्रियता यांतील फरक आपण जर मान्य करणार असू , तर सांकेतिक पात्रे अनुभवाला सोपे आणि साधे परिमाण देतात, ती अधिक परिणामकारक ठरतात असे आपणास आढळून येईल. नाट्याच्या परिणामकारकतेला स्थूल सांकेतिक पात्रे बाधा आणीत नाहीत. ही स्थूल सांकेतिक पात्रे जर पुरेशा प्रमाणात जिवंत करता आली तर मग ती अधिक लोकप्रिय होतात. शतकानुशतके जगातल्या सर्व लेखकांनी नाद करणारी सांकेतिक पात्रे अत्यंत लोकप्रिय करून दाखविलेली आहेत. 'शारदे'त हेही सगळे आहे.
 अतिशय प्रत्ययकारी आणि जिवंत अशी देवलांच्या संवादांची रचना आहे. सुप्त प्रेमकथा आहे. सर्व चित्रणात परंपरागत श्रद्धांची जपणूक आहे. त्याखेरीज त्यांनी सद्गुणांच्या विरुद्ध दुर्गुण सतत उभे ठेवलेले आहेत. पण याखेरीज 'शारदे'त अजून काही बाबी आहेत. व्यक्तिदर्शनाचे देवलांचे सामर्थ्य काहीही म्हटले तरी आपल्या समकालीन नाटककारांच्यापेक्षा वरचढ आणि सूक्ष्म आहे. नाट्याच्या आस्वादासाठी एक वास्तवाचा भास आवश्यक असतो. समोरचा नट अर्जुन आहे, सुभद्रा आहे हे तर मान्य करावेच लागते, पण समोरची कल्पित कथा खरीखुरी आहे हेही मान्य करावेच लागते. पौराणिक ऐतिहासिक किंवा काल्पनिक नाटक पाहताना म्हणजे 'सौभद्र', 'संशयकल्लोळ','मानापमान' पाहताना आपण कितीही समरस झालो तरी हे नाटक आहे, वास्तव नव्हे, हे भान आपण विसरू शकत नाही. 'शारदे'ने इतर परिणामकारक नाटकांच्यामध्ये असणारा जो वास्तवाभास होता, तो आत्मसात करण्यात तर यश मिळवलेच आहे पण हे जीवनाचे चित्र आहे असा भास निर्माण करण्यातही यश मिळवलेले आहे. आपण आपले जीवनच पाहतो आहो या समजुतीने 'शारदा' नाटक पाहणे प्रेक्षकांना शक्य होते.
 चांगल्या नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या या सगळ्या बाबी आत्मसात करून देवलांनी (कथानक व घटनांची कृत्रिमता बाजूला सारल्यास) विशेषतः शारदा आणि इंदिराबाई यांच्या व्यक्तिरेखांत नाटकातील वास्तववादाचा असामान्य विकास घडवून दाखवलेला आहे. किर्लोस्कर, कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी या चौकटीतच देवल बसतात. पण या चौकटीत मात्र ते सर्वात जास्त वास्तवाभिमुख यशस्वी नाटक लिहिणारे ठरले आहेत. मागे किर्लोस्कर आणि बाजूला खाडिलकर एकीकडे, आणि देवल दुसरीकडे असे उभे राहिले म्हणजे प्रथमदर्शनीच फार मोठे अंतर या दोन गटांत असल्याचा भास होतो. जसजसा आपण विचार करू लागतो, तसतसे या दोन गटांतले अंतर कमी होत चालल्यासारखे वाटायला लागते. हरिभाऊंच्यासारखा मनाने समाजसुधारणेला अनुकूल असणारा कादंबरीकार देवलांच्या नाटकाची प्रस्तावना लिहू लागला म्हणजे आज जे अंतर किर्लोस्कर-देवलांत आपण मानतो ते हरिभाऊंना जाणवत नव्हते की काय, असे वाटायला लागते.
 हरिभाऊ आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, “शाकुंतलादी नाटकांप्रमाणे या नाटकात नवरसांचे अत्यंत उदात्त असे स्वरूप नाही. रमणीयतेचे उदात्तरूप येथे नसून सौम्यरूप आहे.” हरिभाऊंनी कोदंडाची तुलना पुरूरवा आणि 'मालती माधवा'तील माधव यांच्याशी केलेली आहे. दुर्योधनाशी आपला विवाह होणार म्हणून आक्रोश करणाऱ्या सुभद्रेशी जर आपण समरस होऊ शकतो, तर मग शारदेशी समरस होणे काय कठीण आहे असा विचार त्यांच्या मनात येतो. त्यांना महाश्वेता आणि पुंडरीकाची स्वर्गीय प्रेमकथा लिहिणाऱ्या नाटककाराने पृथ्वीवरील दीन गायीकडे वळावे ही गोष्ट अभिनंदनीय वाटते. हरिभाऊंची समीक्षादृष्टी फार स्थूल आणि वरवरची आहे. पण त्यांच्यासारख्या समकालीनांना 'सौभद्र-शारदे'त फारसा फरक जाणवत नसे, ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे.
 देवल हे मराठीतील श्रेष्ठ नाटककार आहेत काय? त्यांचे नाटक समकालीनांपेक्षा जास्त जिवंत आहे काय? या प्रश्नाला माझे उत्तर 'होय' असे आहे. देवल सामाजिक समस्या चित्रित करणारे वास्तववादी नाटककार आहेत काय? याला माझे स्पष्ट उत्तर 'नाही' असे आहे. सर्वांच्याप्रमाणे मीही कालिदासाला महान नाटककारच मानतो. कालिदासाला कुणीच समस्याप्रधान वास्तववादी नाटके लिहिणारा नाटककार मानत नाहीत. मीही मानत नाही.
 देवलांच्याविषयी मला जे प्रामुख्याने सांगायचे होते ते सांगून संपलेले आहे. पण परिशिष्टवजा अशाही काही बाबी किरकोळ व तपशिलाच्या असल्या तरी येथे नोंदविणे आवश्यक वाटते. देवलांचे संपूर्णपणे स्वतंत्र असे एकच नाटक 'शारदा' आहे. त्यामुळे देवलांच्या नाटकातील संविधानक-रचनाकौशल्याबाबत बोलणे पुष्कळसे धाडसाचे आहे. तरीही पण असे म्हणता येईल की, देवलांच्या नाटकातील संविधानक-रचना गडकऱ्यांच्याइतकी सदोष नसते. या ठिकाणी संविधानक-रचना म्हणताना मला फक्त सुसंगत कथानक अभिप्रेत नाही. तर कथानकाच्या सुसंगतीपेक्षा नाट्याच्या उठावाच्या संदर्भात या कथानकाची मांडणी मला विशेष महत्त्वाची वाटते. कथानकाच्या मांडणीच्या दृष्टीने नेहमी देवल आणि खाडिलकर यांचा उल्लेख केला जातो. 'शारदा' नाटकाचा पुरावा असलाच तर या संविधानक-कौशल्याच्या विरोधी आहे. गडकरी निदान आपल्या नाटकाचा पहिला आणि शेवटचा अंक अतिशय प्रभावी ठेवतात; ही गोष्ट खाडिलकरांना ज्याप्रमाणे जमली नाही, त्याप्रमाणे देवलांनाही 'शारदे'त जम शकली नाही. क्रमाने 'शारदा' नाटक तिसऱ्या अंकाच्या तिसऱ्या प्रवेशापर्यंत सारखे रंगत जाते. इथून क्रमाने नाटकाची रचना शिथिल होत गेली आहे. चौथ्या अंकापासून तर हे नाटक कोसळतच जाते.अलीकडे या नाटकाचा प्रयोग करताना पुष्कळदा तिसऱ्या अंकाचा चौथा प्रवेश टाळला जातो. किंवा 'जो लोककल्याण साधावया जाण' हे पद घेऊन घाईघाईने उरकला जातो. चौथ्या अंकाचा पहिला प्रवेश, तिसरा, चौथा व पाचवा प्रवेश बहुशः गाळले जातात. पाचव्या अंकातील तिसरा आणि चौथा प्रवेश पुष्कळ संक्षिप्त केला जातो. पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशापासून शेवटच्या अंकाच्या शेवटच्या प्रवेशापर्यंत नाट्यप्रयोग क्रमाने रंगत जात नाही. देवलांच्या पिढीतील सगळ्याच नाटककारांच्या नाट्यरचनेत हा दोष आहे. परंतु प्रयोगाच्या सोयीखातर जेव्हा संक्षेप केला जातो, त्यावेळी मधले भाग गाळले जाणे हा एक स्वतंत्र भाग आहे. ज्या काळी नाटक सात-आठ तास चालत असे, त्या काळातील लिखाण जर चार-पाच तासांत बसवायचे असेल तर व्यवहारतः संक्षेप करणे भागच असते. पण या संक्षेपात जर नाटकाचे शेवट गाळल्या जाण्याच्या स्वरूपात दिसू लागले, तर नाटक संपण्यापूर्वी कुठेतरी आधीच नाट्य संपून जाते असे म्हणण्याची पाळी येते. ज्या काळात देवल नाटक लिहीत होते, त्या काळी आवश्यक असणाऱ्या अनेक घटना आज अनावश्यक ठरलेल्या आहेत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने कोदंडाने शारदेचे पाणिग्रहण केले की नाटक संपून जाते. कथानक सुसंगत असणे-नसणे यापेक्षा कथानकातील नाट्याचे आरंभ-शेवट नीट पकडता येणे महत्त्वाचे असते. खाडिलकरांच्या नाटकाच्या शेवटच्या भागाप्रमाणे देवलांच्याही नाटकाचे शेवटचे भाग कोसळत जातात.
 प्रयोगक्षमतेच्या दृष्टीने केवळ कथानकातील दुवे जोडणारे निवेदनवजा प्रवेश नाटकामध्ये असणे हे नाटककाराचे अपयश मानले पाहिजे. कथेसाठी आवश्यक असणाऱ्या या शुद्ध निवेदनाच्या नाट्यशून्य घटना नाटककाराला संवादाच्या ओघात सुचवता आल्या पाहिजेत. किर्लोस्करांपासून अशाप्रकारचे निवेदनपर प्रवेश सर्व नाटककारांनी वापरलेले आहेत. असे प्रवेश खाडिलकरांमध्ये कमी आहेत. गडकऱ्यांच्या नाटकात, विशेषतः 'प्रेमसंन्यास' आणि 'पुण्यप्रभावा'त अशा प्रवेशांची संख्या अधिक आहे. कोल्हटकरांची नाटकेच नाट्यशून्य असल्यामुळे अशा प्रवेशांची त्यांच्या नाटकांत मोजदाद करता येणे कटीण आहे. देवलांच्या 'शारदा' नाटकातही अशा नाटयशून्य कथनपर प्रवेशाचा अगदीच अभाव नाही. दुसऱ्या अंकाचा पहिला व चौथा प्रवेश, तिसऱ्या अंकाचा चौथा प्रवेश, चौथ्या अंकाचा पहिला, चौथा व पाचवा प्रवेश, पाचव्या अंकाचा तिसरा व चौथा प्रवेश अशा एकूण एकवीस प्रवेशांपैकी 'शारदे'तील आठ प्रवेश उघडच नाटयशून्य आहेत. काही प्रवेश खूप मोठे असणे, काही अगदीच लहान असणे हाही प्रकार देवलांच्या नाटकात आहेच. देवलांच्या समकालीन रंगभूमीचे हे सार्वत्रिक दोष होते. ते देवलांच्यामध्येही आहेत इतकाच याचा अर्थ.
 'शारदा' नाटकाचा पहिला अंक प्रदीर्घ असा एक-प्रवेशी अंक आहे. या एकप्रवेशी अंकातच कांचनभट वजा जाता नाटकातील सर्व प्रमुख पात्रांचा आपला परिचय होतो. मध्यवर्ती संघर्षाला आरंभही होतो. या प्रवेशामुळे काही समीक्षकांना इब्सेनच्या नाटयरचनेची आठवण होते.देवल हे समस्याप्रधान नाटककार मानले गेल्यामुळे त्यांचा विचार करताना मधूनमधून इब्सेनची आठवण होणे स्वाभाविक आहे. पण या अंकातील सर्व रचना बारकाईने पाहिली तर हा अंक एक-प्रवेशी अंक असला तरी त्याचे स्वरूप इब्सेनच्या अंकासारखे नसून संस्कृत नाटकातील अंकासारखे आहे असे दिसू लागते. या अंकाची विभागणी अनेक प्रवेशांत करायची राहून गेलेली आहे, इतकेच काय ते म्हणता येईल.
 देवलांच्या काळी नाटकातून पदांचे प्रमाण फार मोठे असे. या नाटककारांच्यासमोर संस्कृत नाटकातील पद्यविभाग असे. ही संस्कृत नाटकातील पद्ये जणू काही गाणी आहेत असे समजून त्यांचे रूपांतर पदांमध्ये करण्याची प्रथा मराठी रंगभूमीने स्वीकारली. ही प्रथा त्या काळी कुणालाही दोषस्वरूप म्हणून जाणवल्याचे दिसत नाही. देवलांच्या काळी न जाणवलेले पण आज जाणवणारे अनेक दोष या पदांमुळे निर्माण झालेले आहेत. काव्य, कल्पकता, भाषेचे लालित्य यांसाठी देवलांची पदे कधीच प्रसिद्ध नव्हती. या पदांची प्रसिद्धी साधेपणा आणि प्रसादगुण यांसाठी आहे. या पदांमध्ये काव्यगुणांचा अभाव असला तरी ती परिणामकारक ठरलेली आहेत. 'म्हातारा इतुका न', 'जा, जा जा झणी', 'मूर्तिमंत भीती उभी', इत्यादी पदे रंगभूमीवर अतिशय परिणामकारक ठरली यात वाद नाही. पण सारीच पदे अशी असण्याचा संभव नव्हता. समकालीन सर्वच नाटककारांच्याप्रमाणे देवलांच्या नाटकातील पद्य गद्य-संवादाचे काम करते. वादचर्चेचे सारांश देणे, दुसऱ्याची मते खोडून काढणे, आपला मुद्दा समजावून सांगणे इत्यादी कामे तर देवल पद्यातून करतातच, पण त्यांची पात्रे पुष्कळदा शिवीगाळही पद्यातून करतात. 'श्वानाहुन अति नीच तुम्ही', 'जठरानल शमवाया नीचा', 'नामे ब्राह्मण खरा असे हा चांडाळाहुन पापी'- अशी पद्ये याची उदाहरणे आहेत. कित्येकदा तर देवलाच्या पद्यांमधून साधे-सरळ गद्य सापडते ते पाहण्यासाठी पहिल्या अंकातील भुजगनाथाच्या तोंडचे कटावच पहिले पाहिजेत असे नाही. शारदेच्या तोंडचे पुढील पद पाहिले तरी पुरे : 'मागील जन्मीचे, आताचे मी ऋण देणे असेल तितुके फेडून घ्या तुमचे। तुमचे मजवरचे असे ते प्रेम धनाचे, नव्हे मनाचे कळाले मज पुरते। पुढच्या जन्मी तरी शिरावरी भार न ठेवा, हे मानिन मी उपकारचि भारी।' इत्यादी.
 देवलांचा विचार मराठी रंगभूमीच्या ज्या अवस्थेतून त्यांचा उदय होतो ता विसरून जाऊन करता येत नाही. कालखंडाच्या चौकटीच्या बाहेर नेऊन जर आपण देवलांचा विचार करू लागलो. तर अनेक चमत्कारिक प्रश्न उभे राहतात इतकेच मला म्हणायच आहे. देवलांचे वाङमयीन मोठेपण सर्वमान्यच आहे. त्या ठिकाणी मतभेद दाखविणे हा या विवेचनाचा हेतू नाही.

मराठवाडा, दिवाळी अंक १९६५