पायवाट/केशवसुत-काही प्रतिक्रिया

विकिस्रोत कडून
केशवसुत : काही प्रतिक्रिया


गतवर्ष हे कृष्णाजी केशव दामले उर्फ कवी केशवसुत यांचे जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रभर खाजगी व सरकारी पातळीवरून केशवसुतांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. आधुनिक मराठी वाङ्मयात जन्मशताब्दी साजरी होण्याचा मान एका कवीला प्रथमच मिळत आहे. पेशवाई बुडाल्यानंतर क्रमाक्रमाने महाराष्ट्रात जे नवे वातावरण निर्माण होत गेले, त्याला शंभर वर्षे झाल्याशिवाय कोणाची जन्मशताब्दी साजरी होणे शक्य नव्हते. १८१८ साली पेशवाई बुडाली. उघडच १९१८ पर्यंत जन्मशताब्दीचे प्रकरण उपस्थित झाले नाही. १९१८ साल उजाडले आणि पेशवाई संपल्याला शंभर वर्षे झाल्याची जाणीव निर्माण झाली. या घटनेचे स्मरण करूनच नरसिंह चिंतामण केळकरांनी आपला प्रसिद्ध ' मराठे व इंग्रज' हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर क्रमाक्रमाने जन्मशताब्दी साजरी होण्याचा मान पहिल्या पिढीतील निरनिराळ्या समाजसुधारकांना मिळत गेला.
 प्राचीन मराठी वाङ्मय व अर्वाचीन मराठी वाङ्मय यांचा साक्षात परस्परसंबंध असा नाहीच. पेशवाई बुडाल्याबरोबर सारा जुना अध्याय एकाएकी मिटल्यासारखा व संपल्यासारखा झाला. यानंतर पुन्हा एकदा क्रमिक पुस्तकांपासून आरंभ झालेला दिसतो. निरनिराळे समाजसुधारक आणि विचारवंत यांच्या लिखाणामुळे व नियतकालिकांमुळे सुधारणांचे व नव्या विचारांचे वारे महाराष्ट्रात प्रथम वाहू लागले. त्याबरोबरच शैक्षणिक कार्यक्रमाचे बीजारोपण झाले. या घटना घडून गेल्यानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी मराठी वाङ्मयाच्या एकेका शाखेला १८८० नंतर बहर येऊ लागला. हरिभाऊंच्या रूपाने मराठी कादंबरी, अण्णा किर्लोस्करांच्या रूपाने मराठी नाटक, केशवसुतांच्या रूपाने मराठी कविता ही एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी नव्या रूपात अवतीर्ण होण्यासाठी धडपड करू लागली. ललित वाङ्मयाचे अजून एक महत्त्वाचे क्षेत्र रिकामेच होते. ते म्हणजे लघुकथेचे. नाटक, कादंबरी व कविता यांची युगे सुरू झाल्यानंतर दोन-तीन दशकांनी गुर्जरांच्या रूपाने मराठी लघुकथा आकार घेऊ लागली. सर्व वाङ्मयात हे नवे मन्वंतर सुरू करणाऱ्या प्रतिभावंतांच्या जन्माला आता क्रमाने शंभर वर्षे होऊ लागली आहेत. अव्वल सुधारकांच्या जन्मशताब्दयांचे काळ १९३० च्या आसपास आणि वाङ्मयनिर्मात्यांच्या जन्मशताब्दयांचे काळ १९५०च्या आसपास, असा हा क्रम आहे.
 किर्लोस्करांची जन्मशताब्दी स्वतंत्ररीत्या साजरी झालीच नाही. नाट्यशताब्दीवरच समाधान मानावे लागले. दोन वर्षांपूर्वी हरिभाऊंची जन्मशताब्दी साजरी झाली. यानंतर केशवसुतांचा क्रम लागला. लेखकाच्या जन्मकाळापासून वाङ्मयाचे जन्मकाळ ठरविणे हे फारसे शास्त्रीय नाही, तरीसुद्धा स्थूलपणे आधुनिक मराठी वाङ्मय आता एक शतकाचे झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
 येथून पुढे दर एक-दोन वर्षांना एकेका साहित्यिकाची जन्मशताब्दी साजरी करण्याचा योग आपणाला येणार आहे, आणि त्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात आपण सारेच जण उत्साहाने भाग घेणार आहोत. कोणताही नवा, मोठा प्रतिभावंत लेखक जेव्हा प्रथम उदयाला येतो, तेव्हा समकालीनांकडून फार मोठ्या प्रमाणात त्याची उपेक्षा होते. यानंतरचा टप्पा त्याच्या लोकप्रियतेच्या उठावाचा असतो. काही कालानंतर पुन्हा विरोधी टीका होऊ लागते, व जन्मशताब्दीच्या वेळी नव्या उत्साहाने त्या प्रतिभावंताला कृतज्ञता अर्पण करताना लोक शक्यतो चांगले बोलून टाकतात. या सर्व घडामोडींतून एकेका लेखकाचे, कवीचे वाङ्मयीन मूल्यमापन स्थिर होत जाते. तसे केशवसुतांचेही वाङ्मयीन मूल्यमापन क्रमाने स्थिर होत आहे.
 केशवसुतांच्या कविता १८८५ च्या नंतर क्रमाक्रमाने वाचकांच्या समोर येऊ लागल्या. पण १८९८-९९ पर्यंत म्हणजे त्यांच्या कविता प्रकाशित होऊन एक तप उलटून जाईपर्यंत केशवसुतांचा उल्लेख फार मोठ्या आदराने करण्याची प्रथा रूढ झालेली नव्हती. १८९९ साली मोतीबुलासा यांनी मराठी कवितेचा आढावा घेतला आहे. यावेळी केशवसुतांची पहिली कविता प्रकाशित होऊन चौदा वर्षे झालेली होती. आधुनिक कवितेचा आढावा घेताना मोतीबुलासा यांनी आधुनिक कवींत रे. टिळकांचा उल्लेख केला आहे, पण केशवसुतांचा केलेला नाही. या घटनेबद्दल केशवसुतांचे अभिमानी काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी खेद व्यक्त केलेला आहे. ते म्हणतात-" विद्यमान कवींत आमचे बंधू दामले यांचा नंबर बराच वर लागेल असे निदान आमचे तरी मत आहे." या घटनेचा मुद्दाम उल्लेख करण्याचे एक कारण आहे. समकालीनांना ज्यांचा मोठेपणा पूर्णपणे उमगू शकला नाही असे केशवसुत हे काही एकमेव प्रतिभावंत नव्हत. उलट अशा प्रतिभावंतांचीच संख्या जास्त आहे. पण वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीने केशवसुतांच्या कवितेला आरंभ झाला आणि मराठी कवितेचे वातावरण संपूर्ण पालटले असे म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे. गौरवाच्या दृष्टीने हे ठीक आहे. पण सत्य असे आहे की, इसवी सन १९०० च्या सुमारापर्यंत केशवसुतांच्या चाहत्यांनासुद्धा " त्यांचा नंबर बराच वर लागेल " इतकेच वाटत होते हे स्पष्ट व्हावे. १९०५ साली केशवसुत वारले. या वेळेपर्यंत त्यांची कविता ग्रंथरूपाने प्रकाशित होण्याचा योग आलेला नव्हता. आज ज्यांना आपण दुय्यम कवी म्हणून किंवा कवीच म्हणणार नाही अशा पुष्कळांचे कवितासंग्रह अधूनमधून प्रकाशित होत होतेच. पण १९१७ सालापर्यंत म्हणजे मृत्यूनंतर बारा वर्षेपर्यंत केशवसुतांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला नव्हता. हरि नारायण आपटे यांच्यासारख्या केशवसुतांच्या चाहत्यांनी त्यांच्या अनेक कविता 'करमणुकी'त प्रकाशित केल्या. शेवटी त्यांनीच मित्रऋण म्हणून कवितासंग्रह प्रकाशित केला. समकालीनांनी केशवसुतांची जी उपेक्षा केली, तिचे काहीसे स्वरूप यावरून कळू शकेल.
 यानंतर गडकरी आणि त्यांचे मित्रमंडळ क्रमाने पुढे येऊ लागले. गोविंदाग्रजांनी आपण केशवसुतांचे सच्चे चेले आहोत अशी घोषणा केली व क्रमाने केशवसुतांच्या गुणगौरवाला प्रारंभ झाला. या गुणगौरव करणाऱ्या मंडळीत वाङ्मयाचे अभ्यासक व काव्याचे रसिकच होते असे नाही. भाषाशास्त्रज्ञ गुणे, प्रसिद्ध पंडित वै. का. राजवाडे हेही त्यांत होते. या दोघांही ज्येष्ठांनी केशवसुतांची गणना महाकवींमध्ये करून टाकली. केशवसुत हे युगप्रवर्तक कवी आहेत ही भूमिका यानंतर मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. १९१२ साली बालकवींनी आधुनिक मराठी कवितेचे स्वरूप सांगताना पुनःपुन्हा केशवसुतांचा आधार घेतला आहे. इथून केशवसुतांच्या लोकप्रियतेला बहर येऊ लागतो. या गौरवाची प्रतिक्रिया रविकिरण मंडळाच्या काळात सुरू होते. माधव ज्युलियनांनी केशवसुतांच्या कवितेवर जो प्रदीर्घ चिकित्सक लेख लिहिला आहे, त्याचा हेतू केशवसुतांचे मोठेपण उलगडून दाखवणे हा नाही, तर केशवसुतांच्या मोठेपणाचा जितका निरास करता येईल तितका करणे हाच आहे. इथून केशवसुतांची लोकप्रियता क्रमाने पडल्याचे दृश्य दिसायला लागते. प्रा. जोगांनी लिहिलेले 'केशवसुत काव्यदर्शन' हे पुस्तक पाहिले तर माझे म्हणणे अधिक स्पष्ट होऊ शकेल. जोगांनी केशवसुतांच्या वाड्मयातले विरोधकांनी दाखवलेले सर्व दोष जवळजवळ मान्यच करून टाकले आहेत, व केशवसुतांनी केलेल्या क्रांतीचे स्वरूप नवे विषय, वृत्तांचे प्रयोग इत्यादींतच हुडकण्याचा प्रयत्न केला आहे. हा तपशीलवारपणे दोष व मर्यादा नोंदविण्याचा आणि माफक स्तुती करण्याचा प्रयोग होता.
 यानंतर कुसुमाग्रज, अनिल इत्यादी कवी पुढे आले. पण या क्रांतिकवींनी आपण केशवसुतांचा वारसा पुढे चालवीत आहो असे कुठे अभिमानाने म्हटलेले दिसत नाही. सामाजिक प्रश्नांविषयी माफक आस्था असणाऱ्या तांब्यांनी केशवसुतांच्या कवितेविषयी जाहीर नापसंती दाखवलेली होतीच. त्याखेरीज सामाजिक प्रश्नांविषयी आस्था असणारे अनिल-कुसुमाग्रजांसारखे कवी होते. सामाजिक सुधारणावादापेक्षा सर्वांगीण क्रांतीचे व समाजवादी क्रांतीचे मोठेपण आणि मात्रावृत्तांपेक्षा मुक्तच्छंदाचे मोठेपण समजावून सांगण्यात या कालखंडात समीक्षकांना अधिक धन्यता वाटत होती. रविकिरण मंडळाच्या उदयापासून नवकाव्याच्या उदयापर्यंत असा एक कालखंड घेतला, तर त्या कालखंडात तांवे यांची कीर्ती इतर कुणाहीपेक्षा अधिक होती. त्यांची लोकप्रियताही भरपूर होती. तांब्यांना अनुयायीसुद्धा खूप मिळाले होते. “मागच्या कुणाचाही ज्यांच्यावर परिणाम नाही आणि समकालीनांवर व पुढीलांवर मात्र ज्याचा सर्वोत अधिक परिणाम आहे तो महाकवी, हे महाकवीचे लक्षण तांवे यांना सर्वांत अधिक लागू पडते.” असे केशवसुतांचे अभिमानी प्रा. जोग यांनीच म्हणून ठेवले आहे. केशवसुत आणि तांबे यांचा तौलनिक विचार करणारे काही फुटकळ लेखही या काळात लिहून झालेले आहेत.
 १९४५ नंतर क्रमाने नवकाव्य आकार धारण करू लागले. या नवकाव्याच्या पुरस्कर्त्यांनी तांवे, रविकिरण मंडळातील कवी व त्याआधीचे कवी या सर्वांचाच सरसकट अव्हेर केला. मराठीतील काही ज्येष्ठ टीकाकार मराठी काव्याचा आढावा घेताना तांबे यांचे नाव मुळातच गाळून टाकू लागले. नवकाव्याचे निर्माते मर्टेकर यांना केशवसुतांविषयी फारशी आस्था कधीच नव्हती. इतर सर्व कवी हे आधुनिक कवी असून त्यांचे आधुनिकत्व कालसापेक्ष आहे असे मढेकरांना वाटे. काळ जाईल तसे हे सर्व कवी प्राचीन ठरतील, कवितेच्या प्रकृतिधर्माने ठरणारे नवकवित्व फक्त बालकवींत आहे असे मकरांना वाटे. येथून मग एकेक मराठी टीकाकाराने बालकवींचा गौरव करण्यास प्रारंभ केला. काहींनी पारवा, काहींनी औदुंबर, काहींनी फुलराणी आपल्या डोळ्यांसमोर श्रेष्ठ कलाकृतीचा नमुना म्हणून गृहीत धरलेली होती. केशवसुतांच्याविषयी फारसे कुणी बोलतच नव्हते. रविकिरण मंडळाच्या कवितेवर ज्यांची अभिरुची पुष्ट झालेली आहे व त्या कालखंडात ज्यांच्या मनाची जडणघडण झालेली आहे, असे टीकाकार केशवसुतांची माफक स्तुती करत असत इतकेच काय ते! ही प्रवृत्ती भ. श्री. पंडितांच्या 'समग्र केशवसुता'त प्रतिबिंबित झालेली दिसते. आणि मग केशवसुतांची जन्मशताब्दी आली. या शताब्दीच्या संदर्भात केशवसुतांच्या गौरवाला पुन्हा एकदा उधाण आलेले आहे. कालपर्यंत केशवसुतांची प्रेमकविता फारशी सरस नाही यावर एकमत होते. आता त्यांची प्रेमकविता इतर कुणाही मराठी कवीपेक्षा भावोत्कट आहे असे काहींनी म्हणून टाकले आहे. केशवसुतांच्या चांगल्या कवितेत ज्यांचा कधीच कोणी समावेश केला नव्हता, अशाही कवितांची मराठीतील उत्कृष्ट कविता म्हणून रसग्रहणे करून दाखविली जात आहेत. कालपर्यंत संध्या चुकेल पण बालकवींचे नाव दररोज दोन-तीन वेळा तरी तोंडातून निघालेच पाहिजे अशी ज्यांची प्रतिज्ञा होती, ते आज केशवसुतांच्या तुलनेत बालकवी कधी येणेच शक्य नाही हा मुद्दा आग्रहाने स्पष्ट करीत आहेत. एका ज्येष्ठ टीकाकाराने तर जे ज्ञानेश्वराचे मन, जे तुकारामाचे मन तेच केशवसुतांचे मन आहे असा स्पष्ट अभिप्राय देऊन टाकला आहे.
 जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा प्रकार होतच असतो. लवकरच बालकवींची जन्मशताब्दी येईल. आणि मग पुन्हा एकदा प्रतिक्रिया सुरू होईल. हरिभाऊंबद्दल हाच प्रकार झालेला आहे. १९३० नंतर फडके यांची कलामूल्ये हरिभाऊंत नाहीत हा मुद्दा जवळजवळ सर्वमान्य होता. १९५० नंतर वामन मल्हार हे हरिभाऊंपेक्षा श्रेष्ठ कादंबरीकार आहेत असे मत निःसंकोचपणे अनेकजण देऊ लागले होते, याच सर्व टीकाकारांनी हरिभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने कलामूल्ये व जीवनमूल्ये यांपैकी कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी हरिभाऊंच्याएवढा मोठा कादंबरीकार मराठीत झालेलाच नाही, याची ग्वाही मोकळ्या मनाने देऊन टाकली. वामन मल्हारांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या प्रश्नाचा फेरविचार करणे शक्य होईल असे वाटते. केशवसुतांच्या लोकप्रियतेतील हे चढउतार मुद्दामच नोंदविलेले आहेत. एखाद्या प्रतिभावंताच्या वाङ्मयीन मूल्यमापनात अशा प्रतिक्रियांच्या चढउतारास निर्णायक महत्त्व नसते हे खरे, पण या चढउतारांच्यामागे काही वाङ्मयीन भूमिका असतात व त्याही वाङ्मयेतिहासात महत्वाच्या असतात. या सगळ्या क्रियाप्रतिक्रियांमधून एक सत्य शिल्लक राहते, ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. हे सत्य म्हणजे केशवसुतांच्या मृत्यूनंतर आज पन्नास-पंचावन्न वर्षांनीसुद्धा आपण तितक्याच उत्साहाने त्यांच्याविषयीच्या क्रिया-प्रतिक्रियांची नोंद करीत आहोत.
 पेशवाई संपल्यानंतरच्या आणि केशवसुतांपूर्वीच्या एकाही कवीला हे भाग्य लाभलेले नाही. कुंटे, पेटकर, लेंभे, मोगरे, महाजनी, कीर्तिकर इत्यादींची नावे काव्याच्या इतिहासात नामोल्लेखापुरतीच शिल्लक आहेत. खुद्द केशवसुतांच्या पिढीतील रे. टिळक, दत्त आणि विनायक हे तिघेही कवी ज्येष्ठ, पण त्यांच्याविषयी चर्चा करण्याचा उल्हास आज कुणालाच शिल्लक नाही. या कवींची जन्मशताब्दी साजरी केली तर औपचारिकरीत्या त्यांची स्तुती करणारे काही लेख लिहिले जातीलही. पण नव्याने त्यांचा अभ्यास करण्यास कुणी प्रवृत्त होणार नाही. किंबहुना केशवसुतांच्यानंतरचे गडकरी, तांवे आणि बालकवी हे कवी सोडले तर कुणाच्याविषयी आजच्या मराठी समीक्षकांना चर्चेचा उल्हास वाटणे शक्य नाही. अभ्यासक्रमात जरी ही कवि-मंडळी अधूनमधून भेटली, तरी त्यांची मूल्यमापने कशी स्थिर आणि वादातीत होऊन गेली आहेत. १९४५ पूर्वीच्या फक्त चारच कवींविषयी आज अनुकूल-प्रतिकूल चर्चा होणे शक्य आहे. या चारांपैकी स्वतः केशवसुत हे एक आहेत; आणि उरलेल्या दोघांनी त्यांचे शिष्यत्व पत्करलेले होते. गडकरी हे स्वतःला केशवसुतांचे चेले मानीत ही गोष्ट जशी प्रसिद्ध आहे, तसे बालकवीही स्वतःला केशवसुतांचे अनुयायी मानीत ही गोष्ट प्रसिद्ध नाही.
 आरंभीच्या काळात बालकवींना विनायक आणि केशवसुत यांच्याचविषयी फार आत्मीयता वाटत असे. सृष्टीमध्ये काव्याची पूर्णता आहे, सौंदर्याची पूर्णता आहे, निसर्गात आढळणारे गायन हे खरेखुरे परिपूर्ण गायन, त्या संगीताचे दिव्यत्व आपल्या काव्यात आले पाहिजे, ही जी बालकवींची निसर्गपूजनात अनेक ठिकाणी आढळणारी बैठक आहे, ती बालकवींनी केशवसुतांच्याकडूनच मिळविलेली आहे. १९०७ साली जळगावच्या कविसंमेलनात बालकवींना 'बालकवी' ही पदवी मिळाली, हे विधान आपण नेहमी करतो. पण या विधानामुळे पूर्ण सत्य समजून येत नाही. ज्या कवितेमुळे टोंबरे यांना 'बालकवी' ही पदवी मिळाली, ती खरे म्हणजे आपण ओळखतो त्या 'बालकवी'ची कविताच नव्हती. जळगाव संमेलनापर्यंतची ठोंबरे यांची कविता जुन्या वळणाची, बोधपर, उपदेशपर आणि वैराग्यपर अशी होती. बालकवींच्या कवितेतील प्रसिद्ध निसर्ग पूजन उद्भवलेले नव्हते. ज्या कवितेबद्दल बालकवींची एवढी मोठी प्रसिद्धा आहे ती सगळी कविता प्रामुख्याने बालकवी आणि टिळक, बालकवी आणि गडकरी यांचे संबंध आल्यानंतरची व बालकवी तुतारी मंडळात आल्यानंतरची आहे.
 इंग्रजी कवितेशी बालकवींचा परिचय फारच थोडा होता. त्याच्या कवितेला आधुनिक वळण नंतरच्या काळात मिळालेले आहे. इ. स. १९१२ साली बालकवींनी केशवसुतांच्या कविता निदान एकदा तरी वाचून पाहिल्या पाहिजेत असे मत दिले आहे. हे मत देताना बालकवी म्हणतात, " तथापि त्याच्या खाली एक पायरी आहे.” या खालच्या पायरीवर बालकवींनी लेंभे यांच्याबरोबर रे. टिळक, विनायक, चंद्रशेखर आदी कवींचा उल्लेख केला आहे. बालकवींची ही भूमिका आणि तुतारी मंडळातील त्यांचे सदस्यत्व लक्षात घेतले, तर केशवसुतांकडे पाहण्याची त्यांची भूमिका स्पष्ट समजण्याजोगी आहे. केशवसुत आणि त्यांच्या अनुयायांत गडकरी व बालकवी असे स्वरूप ध्यानात घेतले तर १९४५ पूर्वीच्या सर्व मराठी कवींच्यापेक्षा निराळे असे केशवसुतांचे मोठेपण थोडेसे दिसू शकेल. केशवसुतांचे एवढे जरी मोठेपण आपण वादातीत मानले तरी हे स्थानदेखील मराठी वाङ्मयात लहान नाही.
 केशवसुतांच्यासंबंधी आपण विचार करू लागलो म्हणजे तो विचार अपरिहार्यपणे युगप्रवर्तनाच्या संदर्भात होत जातो. एका अर्थी असे घडणे स्वाभाविक आहे. कारण केशवसुतांपासून मराठी कवितेत नवीन काय आले याचा विचार करण्याची परंपरा रूढ झाली आहे. या पद्धतीने विचार करीत असताना वाङ्मयाच्या व्यवहारात युगप्रवर्तक हा शब्द आपण कोणत्या अर्थाने वापरावा हाच पहिला महत्त्वाचा प्रश्न होऊ पाहत आहे. कारण हा शब्द पुष्कळदा वापरला जातो, पण तो व्यापक अर्थाने घ्यायचा की संकुचित अर्थाने घ्यायचा, यावर अजून सर्वांचे एकमत झालेले नाही; आणि तसे होणे शक्यही दिसत नाही. अगदी व्यापक अर्थाने युग हा शब्द वापरायचा असेल तर त्यात समाजजीवनाची सर्वच अंगोपांगे गृहीत धरली पाहिजेत. नव्या युगाबरोबर नवे समाजकारण, नवे अर्थकारण, नवे राजकारण अशी सर्व जीवनाची नव्याने मांडामांड घडली पाहिजे. या सर्वांच्याबरोबरच जीवनविषयक नव्या जाणिवा, नव्याने उद्भूत झालेली जीवनमूल्ये व त्यांचा वाङ्मयाच्या आशय-अभिव्यक्तीवर घडलेला परिणाम, यांचाही विचार केला पाहिजे. इतक्या व्यापक अर्थाने ज्यावेळी आपण युग हा शब्द वापरू लागतो, त्यावेळी वाङ्मयीन व्यवहारात वावरणाऱ्या व्यक्ती कधीच युगप्रवर्तक ठरू शकणार नाहीत. केशवसुत, हरिभाऊ किंवा अण्णा किर्लोस्कर यांच्यापैकी एकाला अगर तिघांनाही मिळून मग युगप्रवर्तक मानता येणार नाही. एवढ्या व्यापक अर्थाने ज्यावेळी युग हा शब्द आपण वापरतो, त्यावेळी या युगाच्या निर्मितीत व्यक्तीचे कर्तृत्व थोडेसे गौण असते. अशावेळी इंग्रजी राजवटीचे आगमन हीच युगप्रवर्तनाची खूण मानावी लागते. आपल्याकडे या युगप्रवर्तनाची जबाबदारी इंग्रज राजवटीवर टाकली, तर युरोपातील रिनेसान्सची जबाबदारी सांगताना कॉन्टंटिनोपलच्या पाडावाला कारणीभूत झालेली युद्धे व या युद्धांचे युरोपच्या समाजजीवनावर झालेले प्रत्यक्षअप्रत्यक्ष परिणाम विचारात घ्यावे लागतील. तिथेही या युगप्रवर्तनात बोकॅशिओ, डांटे किंवा शेक्सपिअर यांच्या नावाने युग टाकता येणार नाही.
 एवढ्या व्यापक अर्थाने युग हा शब्द वापरलाच पाहिजे असे काही आपणावर बंधन नाही. तसे तर काळाचे सातत्य सारखे चालूच असते. त्यात आपण आपल्या भूमिकेच्या सोयीने आणि विचाराच्या दृष्टीने टप्पे पाडीत असतो, विभाग निर्माण करत असतो. या विभागांची आणि टप्प्यांची निर्मिती ही आपल्या आकलनाची सोय असते. जेवढा विषय ज्यावेळी आपण आकलनासाठी घेतो, त्या मानाने त्या काळात एकेक व्यक्ती युगप्रवर्तक ठरत जाते. ज्या प्रवृत्ती पुढच्या काळात बलवान आणि व्यापक झालेल्या आढळून येतात, त्या प्रवृत्तींची पहिली ठळक उगमस्थळे पाहून असे युगप्रवर्तन निर्देशिले जाते. जर एकूण मराठी वाङ्मयाचा आपण विचार करू लागलो, तर हे युगप्रवर्तन विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्याकडे जाईल. केवळ कादंबरीचा विचार केल्यास हरिभाऊ, केवळ नाटकाचा विचार केल्यास अण्णासाहेब किर्लोस्कर, नुसता बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार केला तर आगरकर, अशी निरनिराळी माणसे युगप्रवर्तक ठरतील, मराठी कवितेत हे युग केशवसुतांच्यापासून सुरू होईल.
 एका दृष्टीने पाहिले तर केशवसुतांनी मराठी कवितेत जे युग एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी प्रवर्तित केले, त्या युगाची याच काळात युरोपात समाप्ती होऊन गेलेली होती. पण हरिभाऊ ज्या वास्तववादाच्या दृष्टीने पावले टाकीत होते, ती प्रवृत्ती समकालीन युरोपातही क्रमाने बलवान होत चालली होती. याहीपेक्षा युग या कल्पनेची मर्यादा आपण लहान करू शकतो. तशी केली म्हणजे 'राष्ट्रीय ' या संबोधनाने ओळखली जाणारी कविता ध्यानात घेऊन विनायकांच्या नावाने एक युग टाकता येईल. भावगीते, गझल आणि सुनीते विचारात घेऊन तांबे- माधव ज्युलियनांच्या नावे एक युग टाकता येईल., युगाची कल्पना सोयीवर आधारलेली असल्यामुळे ती पाहिजे तितकी मोठी किंवा पाहिजे तितकी छोटी करता येत असते. याचा अर्थच हा की चिपळूणकर, रानडे, टिळक, आगरकर, हरिभाऊ आपटे, केशवसुत, विनायक, किर्लोस्कर, म. ज्योतिबा फुले असे अनेक युगप्रवर्तक एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एकदम जमा झालेले आपल्याला दिसतात. युगप्रवर्तनाच्या कल्पनेच्या आहारी जाऊन एखादी वाङ्मयीन प्रवृत्ती ठळकपणे कुठे दिसते याचा शोध घेणे हे काम थोडे बेताने केले पाहिजे. वाङ्मयीन प्रवृत्तीचा आढळ होणे आणि या प्रवृत्तीशी निगडित असणारे अनुभव कलात्मक पातळीवर नेऊन पोचविणे या दोन बाबी भिन्न आहेत. निसर्गपूजन जिथून सुरू होते ती जागा आणि निसर्गपूजा ज्या ठिकाणी कलाकृतीत रूपांतरित होते ती जागा, या दोन्ही पुष्कळदा भिन्न असतात. वाङ्मयाच्या आकलनात हे दुसरे कार्य ज्यांनी केले, त्यांचे महत्त्व स्वयंभू असते. पहिले कार्य करणाऱ्यांचे महत्त्व सापेक्ष असते.
 वाङ्मयात युग बदलते असे आपण म्हणतो. या बदलणाऱ्या युगाचा आणि अक्षर वाङ्मय या कल्पनेचा संबंध काय याचाही विचार एकदा स्पष्टपणे केला पाहिजे. एकीकडे दीड हजार वर्षे टिकलेला कालिदास आणि दुसरीकडे दर वेळी बदलणारी युगे यांचा वाङ्मयसमीक्षेला एकत्र विचार केला पाहिजे. ललित वाङ्मयाच्या क्षेत्रात नवीन युग आले म्हणजे त्या युगाच्या पूर्वीच्या श्रेष्ठ कलाकृतींचे रसिकांना आवाहन करण्याचे सामर्थ्य किंवा रसिकांना कलात्मक आनंद देण्याचे सामर्थ्य संपुष्टात येते, असे आपण मानणार आहो की काय ? असे जर आपण मानणार नसू तर इंग्रजी राजवटीतही कवी म्हणून ज्ञानेश्वर-तुकारामाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिलेले आहे असे म्हणण्यास आपण तयार झाले पाहिजे. मी जाणूनबुजून तयार झाले पाहिजे असा शब्दप्रयोग केला आहे. कारण अशी आपली तयारी आहे व असे आपण म्हणतोच हे मला माहीत आहे. ज्ञानेश्वर-तुकारामाचा मोठेपणा अबाधित आहे असे म्हणताना कोणत्याही वाङ्मयसमीक्षकाला कधीच संकोच वाटलेला नाही. केशवसुतांच्यापासून आरंभ होणारे आधुनिक मराठी काव्य तुकारामाच्या वाङ्मयीन मोठेपणावर परिणाम करू शकत नाही, किंवा मतेकरांच्यापासून सुरू होणारे नवकाव्य बालकवींच्या मोठेपणावर परिणाम करू शकत नाही असे आपण मानतोच. पण हे मान्य करत असताना जी एक कबुली द्यावी लागते, तिकडे आपले फारसे लक्ष जात नाही. ती कबुली म्हणजे कोणत्याही युगातील कोणत्याही संप्रदायाच्या कलाकृती आपले युग व संप्रदाय ओलांडून पुढे जात असतात. असे जर झाले तरच ती अस्सल कलाकृती असते. या भूमिकेतून निर्माण होणारी दुसरी पोटभूमिका अशी की, एखाद्या कलाकृतीचे चांगले-वाईटपण तिच्या संप्रदायावर अगर तिच्या कालखंडावर अवलंबून नसते. यामुळेच शाश्वत वाङ्मयीन मूल्यांचा आग्रह आपण धरू शकतो. वाङ्मयीन व्यवहारात व कालप्रवाहात वाङ्मयीन मूल्ये बदलतात की नाहीत या प्रश्नाचे उत्तर मी बदलतात आणि बदलत नाहीत असे दुहेरी देऊ इच्छितो.
 कालप्रवाहात वाङ्मयीन मूल्ये बदलतात ती या अर्थाने की, एकेकाळी रसांना प्राधान्य देऊन वाङ्मयविवेचन केले जात असे. पुढच्या काळात अलंकारांना रसांच्याइतके महत्त्व आले. अव्वल इंग्रजीत कथानक व स्वभावरेखन यांना महत्त्व होते. आज आम्ही अनुभवाच्या स्वयंपूर्णतेला, सलगतेला आणि उत्कटतेला महत्त्व देत आहोत. दर काही पिढ्यांच्यानंतर वाङ्मयाकडे पाहण्याची रसिकांची दृष्टी बदललेली आढळून येते. वाङ्मयापासून असणाऱ्या अपेक्षा बदललेल्या दिसून येतात. या अर्थाने कालमानानुसार वाङ्मयीन मूल्ये बदलत असतात. पण बदलाच्या शेजारीच दुसरी एक क्रिया चालू असते. ज्यावेळी रसवाद वैभवावर होता, त्यावेळी रसवाद्यांनी कालिदास संस्कृतचा सर्वश्रेष्ठ नाटककार ठरवला. पुढे अलंकारवाद्यांनी अलंकाराच्या कसोटीवर पण कालिदासच सर्वश्रेष्ठ मानला. कालिदासाच्या काळी स्वभावरेखन ही कल्पना वाङ्मयसमीक्षेत जन्माला आलेली नव्हती. पण जेव्हा कथानकरचनेचा व स्वभावरचनेचा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळी पुन्हा याही कसोट्यांवर कालिदासच संस्कृतचा सर्वात मोठा नाटककार मानला गेला; या अर्थाने वाङ्मयीन मूल्ये बदलत नाहीत. आज वाङ्मयसमीक्षेत जी मूल्ये मी प्रमाण मानतो, ती केवळ आजच्या वाङ्मयाचे मूल्यमापन करण्यासाठी वापरायची मूल्ये नसतात, तर या मूल्यांच्या भूमिकेवरून सर्व काळांतले, सर्व देशांतले वाङ्मय तपासण्याची माझी इच्छा असते. आजची माझी वाङ्मयीन मूल्ये हा ललित वाङ्मयाकडून असणाऱ्या माझ्या अपेक्षांचा उच्चार असतो. या अपेक्षांना उतरत नाही त्याचा ललित वाङ्मय म्हणून माझ्याकडून स्वीकार होणे शक्य नसते. या वाङ्मयाविषयीच्या अपेक्षा बदलत जातात. पण श्रेष्ठ कलाकृतींचे श्रेष्ठत्व अबाधित राहते. फक्त श्रेष्ठतेचे स्पष्टीकरण करणारी स्पष्टीकरणे बदलत जातात. वाङ्मयीन निर्णय आधी येतात आणि श्रेष्ठ कलाकृतीबाबत हे निर्णय टिकून राहतात. वाङ्मयसमीक्षेचे कार्य या निर्णयाचे समाधानकारक स्पष्टीकरण देण्याचे असते.
 येथवरच्या विवेचनाचा धागा जर आपणास पटू शकत असेल, तर या विवेचनाचा उतरार्धही पटण्यास हरकत नसावी. तो म्हणजे कलाकृतीचा विचार हाच कलासमीक्षेतील मध्यवर्ती प्रश्न आहे. माझ्यासमोर असणारी आकृती कलाकृती आहे काय ? जर ती कलाकृती असेल, तर तिचा दर्जा कोणता ? प्रतवारीत तिचे स्थान काय ? हे प्रश्न समीक्षेतील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती प्रश्न आहेत. कलासमीक्षा काय आणि वाङ्मयसमीक्षा काय, दोन्हींतही खरे महत्त्व कलाकृतीच्या आकलन-आस्वादनाला आहे. या आकलनआस्वादनात युगप्रवर्तनाचा प्रश्न बव्हंशी गैरलागू आहे. अमुक कवी युगप्रवर्तक आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर केवळ वाङ्मयीन आकलन कधीच देऊ शकणार नाही. कारण कोणतोही कलाकृती कलाकृती म्हणून फक्त स्वतःची साक्ष देत असते.
 इतर सर्वच निमिर्तीप्रमाणे वाङ्मयीन निर्मिती हीसुद्धा एक सामाजिक घटना असते. आणि कोणत्याही सामाजिक घटनेकडे आपापल्या गरजेतून माणूस पाहतो, तसा वाङ्मयकृतीकडेसुद्धा तो पाहू शकेल. तेराव्या शतकातील मराठी भाषेतील विभक्तिप्रत्ययांचा विचार ज्ञानेश्वरीच्या आधारे करता येतोच, पण त्याला कोणी वाङ्मयीन आकलन म्हणणार नाही. कलाकृतीकडेसुद्धा वाङ्मयाखेरीज इतर दृष्टीने पाहता येणे शक्य आहे. पण हे पाहणे म्हणजे ललित वाङ्मयाचा आस्वाद नव्हे. अंजिट्याची चित्रकला चौथ्यापाचव्या शतकांतील केशभूषा, वेशभूपा, यासाठी पाहणे निराळे व कलाकृती म्हणून पाहणे निराळे. हे एकदा नीट समजून घेतले तर अमुक कवी युगप्रवर्तक आहे की नाही, हा विचार करण्याची शक्यता व सोय आपण गृहीत धरू शकतो व ती गृहीत धरूनही वाङ्मयीन आकलनात हे विवेचन दुय्यम व अप्रस्तुत मानू शकतो. केशवसुतांनी युगप्रवर्तन केले की नाही हा प्रश्न तुलनेने गौण आहे. त्यामानाने केशवसुतांनी कोणत्या काव्यकृती आणि अस्सल काव्यकृती जन्माला घातल्या, हाच मध्यवर्ती प्रश्न आहे. या अस्सल कलाकृतींची संख्या महत्त्वाची नाही. संख्या वाढविण्यासाठी त्यांची प्रत्येक कविता कलाकृती मानण्याची भाबडी गौरवबुद्धी बाळगण्याचे कारण नाही.
 शास्त्रात ज्याप्रमाणे नवा पायंडा टाकण्याला महत्त्व आहे, त्याप्रमाणे कलांच्या क्षेत्रात नवा पायंडा टाकण्याला मूलभूत महत्त्व नाही. कारण शास्त्रात नवी दिशा महत्त्वाची असते. एका प्रज्ञावंताने नवी दिशा दाखवली म्हणजे पुढच्या पिढ्या त्या नव्या दिशेने प्रवास करू शकतात. छोटे-छोटे दुवे जुळवून या दिशेने दिलेले दर्शन पूर्ण करू शकतात. म्हणूनच शास्त्रांच्या विचारात चुकांनाही महत्त्व असते. कारण एकेक चूक हीसुद्धा पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञांना सत्याकडे नेण्याचा दुवा असते. मागच्यांनी उपलब्ध करून ठेवलेल्या माहितीचा, दिशेचा, निर्णयाचा जो व जसा उपयोग शास्त्रात असतो, तो व तसा उपयोग कलांच्या क्षेत्रात नसतो. म्हणून कलांच्या क्षेत्रात नवा पायंडा टाकणे याला महत्त्व दुय्यम आहे. कलाक्षेत्रातील व वाङ्मयक्षेत्रातील जाणिवांचे आणि विचारांचे स्वरूप एवढे संकीर्ण असते की कोणत्या गोष्टीचा नवा पायंडा म्हणून उल्लेख होईल, याला या क्षेत्रात काही धरबंधच नसतो. कोल्हटकरांनी नटी-सूत्रधाराचा प्रवेश गाळला, विनोदासाठी स्वतंत्र उपकथानके घेतली, स्वतंत्र कथानके रचण्यास आरंभ केला, या बाबींचेही नवे पायंडे म्हणून उल्लेख होऊन जातात. मग कोल्हटकरांच्या नावे युग पाडले जाते. या घाईगर्दीने कोल्हटकरांच्या नाटकांचा कलाकृती म्हणून दर्जा काय, एवढा एकच प्रश्न राहून जातो. नाटकाचा इतिहास लिहिताना याही माहितीची गरज आहे, तिथे ती न नोंदवून चालणार नाही. पण नाटक चांगले की वाईट हे ठरविताना या माहितीची गरज नाही. तिथे ही नोंदविण्याची आवश्यकताही नाही. केशवसुतांनी मराठीत सुनीते आणली, वैणिके आणली, मराठी कवितेत समाजसुधारणेचे विचार आणले, प्रेम-कविता निर्माण केली. या साऱ्या नोंदींचे स्वरूप असे ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक महत्त्वाच्या नोंदी आपण कितीही जरी केल्या, तरी त्यामुळे केशवसुतांचे कवी म्हणून मूल्यमापन होण्यास फारशी मदत मिळणार नाही. कारण कलांच्या क्षेत्रात पायंड्यांचे महत्त्व फार कमी. पायंडा नवा असो की जुना, कलाकृतींची निर्मिती हीच खरी महत्त्वाची असते.
 शेवटी आपण युगप्रवर्तन ठरवणार तरी कशाच्या आधारे ? जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली म्हणजे काव्याचे विषय बदलतातच. अनुभव घेण्याची पद्धत बदलते, ते व्यक्त करण्याची पद्धतही बदलते. हा बदल होत असताना काव्यप्रतिमांची सृष्टीही थोडीफार बदलत असते. शैलीत बदल होतो. पण हा सारा बदल झाला आणि तो मोजून दाखवता आला तरी नव्या कलाकृती जन्माला येतीलच असे नाही. पंडिती काव्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवितेत आधीच्या पिढीपेक्षा असे नवे बदल होतेच. सामराजासारखा एखादा कवी कल्पना-नाविन्याच्या मागे धावताना, दिवसाच्या पेल्यातून प्रकाशरूपी दूध काळरूपी मांजर पिऊन गेले, असा पर्यायोक्ती अलंकार साधीतच होता. इंग्रजी अमदानी येण्यापूर्वी दहाव्या दर्जाचे पद्यकार असतात व ते वैराग्यपर गीते लिहीतच असतात. इंग्रजी अमदानीत आधुनिक मराठी काव्य सुरू झाले म्हणजे पद्यकार कमी होत नाहीत. उलट प्रत्येक कवी भुंगा, फुलपाखरू, मधमाशी यांच्या पाठीमागे हात धुवून लागतो. स्वतंत्र भारतात हे कवी चीनचे आक्रमण झाले की रोजी एक या वेगाने रणगीते लिहू लागतात. नेमके याच कारणामुळे केशवसुतांनी जे नवीन पायंडे टाकले, त्यांतील किती बाबी त्यांनी इंग्रजी कवितेवरून उचलल्या हा प्रश्न मला गौण वाटतो.
 इंग्रजी कवितेचे अनुकरण करून अगर संस्कृत कवितेचे अनुकरण करून चांगली कविता लिहिता येणे शक्य आहे. तसेच या दोन्ही अनुकरणांतून सुमार पद्यरचना बाहेर पडणे हेही शक्य आहे. अनुकरण करण्याच्या प्रयत्नात ज्यावेळी एखाद्या कवीला कलात्मक यश मिळून जाते, त्यावेळी ती साहित्यकृती अनुकरणाचे ठसे ओलांडून कितीतरी पुढे गेलेली असते. प्रत्येक कलाकृतीला तिचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते. या आपल्या अपूर्वत्वाला सावरून धरीतच ती आकृती कलाकृतीच्या दर्जाला पोचलेली असते. या अपूर्वत्वाचा उगम झाल्यानंतर ते केवळ अनुकरण राहत नाही. मग प्रेरणा इंग्रजी कवितेतील असली तरी प्रेमाचा अनुभव स्वतःचे स्वयंपूर्ण रूप धारण करून येतो.
 केशवसुतांच्या कवितेत अनुकरणाचा मुद्दा ओघाने आलेलाच आहे. तर याबाबत काही घटना नोंदविल्या पाहिजेत. केशवसुतांची कविता १८८५ सालापासून आपणाला उपलब्ध होते. यावेळी त्यांचे वय अठरा-एकोणीस वर्षांचे होते. यापूर्वी जर त्यांनी काही कविता केल्या असतील, तर त्या उपलब्ध नाहीत इतकेच आपण म्हणू शकतो. ही केशवसुतांची उपलब्ध असणारी पहिली कविता कालिदासाच्या रघुवंशातील काही श्लोकांचा अनुवाद करणारी आहे. या आरंभीच्या काळातच केशवसुत संस्कृत कवितेकडे वळले होते असे नसून पुढे १८८७ साली भारवीच्या 'किरातार्जुनीयम् 'मधील एक सर्ग त्यांनी अनुवादिलेला आहे. केशवसुतांना कालिदास अनुवादिण्याजोगा वाटला तर ते आपण समजू शकतो; पण भारवीचाही त्यांना अनुवाद करावासा वाटला, ही घटना चिन्त्य आहे. कारण भारवी हा संस्कृतच्या -हासकाळातला बहिरंगप्रधान व क्लिष्ट कवी आहे. १८९१ साली त्यांनी पुन्हा काही स्फुट श्लोक लिहिले आहेत. या स्फुट श्लोकांत परंपरागत सांकेतिक कल्पना, कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या अन्योक्तीप्रमाणे एकदोन अन्योक्ती, लाह्यांवरचे एक स्फुट यांचा समावेश आहे. या स्फुट इलोकांना संस्कृत श्लोकांचा आधार आहेच. इसवी सन १९०० मधील 'दिवाळी'सारख्या कवितेत एखाददुसऱ्या कडव्यात बाणभट्टाचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न आहे. असा दीर्घकाळपर्यंत केशवसुतांचा अधूनमधून प्रयत्न चालू होता व ते संस्कृत कवितेशी सांधा जोडण्याचा प्रयत्न चालू ठेवीत होते. जे संस्कृत काव्याच्याबाबत म्हणता येईल, तेच इंग्रजी कवितांच्याबाबतही म्हणण्यासारखे आहे.
 अगदी आरंभीच्या काळात केशवसुतांनी थॉमस हुडच्या एका कवितेचे मराठीत रूपांतर केलेले आहे. पुढच्या काळात ही प्रवृत्ती संपली असे मानण्याचे कारण नाही. अगदी शेवटच्या काळातसुद्धा निरनिराळ्या कवितांचे अनुकरण आणि अनुवादन करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच होता. यांपैकी 'पो'च्या 'रेव्हन' या कवितेचा भावानुवाद १९०१ सालचा आहे. या सर्व इंग्रजी अनुवादित कवितांच्यावर बायरन, शेली, कीट्स, कोलरिज, वर्ड्सवर्थ यांचा ठसा कमी आहे. त्यामानाने सामान्य कवींचे पडसाद व इमर्सनचे पडसाद अधिक मोठ्या प्रमाणावर आहेत. अनुकरण करण्यासाठी संस्कृतात 'मेघदूत' नव्हते किंवा प्रसिद्ध 'हैमकोशा'त बायरन, शेली, कीट्स, कोलरिज नव्हते असे नाही. पण केशवसुतांना त्यांचे अनुकरण करावेसे वाटले नाही, इतके मात्र खरे. आरंभीच्या काळात संस्कृतकडे वळलेली त्यांची दृष्टी पुढे बदलून इंग्रजीकडे गेली असेही नाही. तर कधी इंग्रजीशी, तर कधी संस्कृतशी सांधा जोडण्याचा त्यांचा प्रयत्न शेवटपर्यंत चालू होता असे दिसते.
 मराठी कवींमध्ये ज्ञानेश्वरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न तर केशवसुतांनी केलेला आहेच ( तत्त्वता बघता नामा वेगळा). पण रघुनाथ पंडितांचेही त्यांनी अनुकरण करून पाहिले आहे. याहीपेक्षा सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या भागात आधुनिक मराठी कवितेच्या या उद्गात्याने मोरोपंतांच्यासारखी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कवितेत वेगवेगळ्या प्रकारची यमके, अनुप्रास, किंबहुना श्लेषांचाही प्रयत्न केला आहे. शेवटच्या परिपक्व अवस्थेत केशवसुतांचे मत मोरोपंत हा महाकवी होता व त्याच्यासारखे महाकाव्य पुन्हा लिहिले पाहिजे असे झाले होते. आपल्या काव्यजीवनाच्या आरंभापासून आपल्या काव्यजीवनाच्या समाप्तीपर्यंत केशवसुत संस्कृत, मराठी, इंग्रजी अशा नानाविध कवींकडे सारखे अनुकरणासाठी वळत होते व यांपैकी कुठेतरी आपल्या कवितेचा घनिष्ठ सांधा जुळवू इच्छीत होते. अचानक त्यांचे देहावसान झाले नसते, तर आर्या गीती वृत्तातील एखादे मोरोपंती वळणाचे खंडकाव्य लिन केशवसुतांनी अर्वाचीन मराठी कवितेच्या समीक्षकांना चांगलेच पेचात आणले असते, असे मानावयास जागा आहे.
 केशवसुतांच्या कवितेत आढळणारा स्पष्ट अनुकरणाचा हा धावता उल्लेख करण्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण असे की केशवसुतांच्या कवितेने इंग्रजी वळण गिरवयाचा प्रयत्न केला इतकेच पुनःपुन्हा आपण नोंदवितो हे सत्य नव्हे, या घटनेकडे लक्ष वेधावे. दुसरे कारण हे की या नोंदी केशवसुतांच्या लहानपणाच्या बोधक किंवा मोठेपणाच्या द्योतक अशा नाहीत, इकडे लक्ष वेधावे. कोणताही कवी एकाकी, शून्यात उभा राहू शकत नाही. तो मागे कुठेतरी आपला सांधा जोडण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येक मोठा कवी आपल्या लगोलग मागच्या काव्यावर अत्यंत रुष्ट असतो. अशीच नवकवींच्या मनात रविकिरण मंडळाविषयी स्पष्ट दिसून येते. हीच रुष्टता समलीन काव्याविषयी केशवसुतांच्या मनात असण्याचा संभव आहे. अव्वल इंग्रजीतील ही कवितेशी केशवसुतांना समरस होणे शक्यच नव्हते. पण त्यांनाही कुठेतरी धरण्याही नावापुरता काट हवा असणारच. या काठाच्या शोधात केशवसुत हे कालिदासान भारवीपर्यंत आणि सुभापितकारांच्यापर्यंत, इमर्सनसारख्या बऱ्यापैकी कवीपासून मान्य कवीपर्यंत, व मराठीत ज्ञानेश्वरांच्यापासून मोरोपंतांपर्यंत फिरत राहिले. असा प्रयत्न केशवसुतांनी केला यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. हाच प्रयत्न अलेक्झांडर पोपच्या बाबतीत इलियटने केला आहे. आणि रामदास, तुकारामाशी सांधा जोडण्याचा प्रयत्न मढेकरांनी केला आहे. प्रत्येक मोठा कवी असा प्रयत्न करत असतो. उलट मला तर असे वाटते की इतका सगळा प्रयत्न करूनही केशवसुतांना स्थिरपणे कुणाही प्राचीनाचा पदर धरता आला नाही, कुठेही ते कायमचे रमू शकले नाहीत, यातच त्यांच्या मनोभूमिकेचे पुष्कळसे निराळेपण होते.
 केशवसुतांनी अनुकरण किती केले आणि ते कितीदा जमले हा केशवसुत या माणसाचा इतिहास आहे. ते कलावंताच्या प्रकृतीचे आकलन नव्हे. वाङ्मयीन व्यवहाराचा विचार करताना एकाच व्यक्तीमधील माणूस आणि कलावंत यांतील संवाद-विसंवादही आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. इंग्रजी कवितांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून केशवसुतांनी अनेकदा प्रेमकविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी आरंभापासून या प्रेमकविता आपण पाहू शकतो. परंपरेने स्त्रीचे वर्णन करावयाचे झाल्यास रतीशी निगडित असे ते करण्याची पद्धत होती. केशवसुतांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनाशी शक्यतो प्रामाणिक राहून प्रेमकविता लिहिण्याचा प्रयत्न 'प्रियेचे ध्यान 'सारख्या कवितांतून केलेला आहे. कृष्णाजी केशव दामले या माणसाला आपली बायको आवडत होती की नव्हती, हा माझ्यासमोरचा प्रश्न नाही. खरोखरच त्यांना पत्नीविषयी आत्यंतिक ओढ असेल. पत्नीला सोडून पुण्याला जावे लागणार, याचे त्यांना वाईटही वाटत असेल. ज्याप्रमाणे मुंगळा साखरेकडे समुत्सुक होऊन धावून गेला नसेल, त्याहीपेक्षा अधिक उत्कट ओढीने मी तुझ्याकडे धावत येईन ही भूमिका प्रामाणिकही असेल, हे सगळे गृहीत धरले तरी प्रेम ही भावना केशवसुतांना कधीच कवितेच्या पातळीवर नेता आलेली नाही, हे उघड आहे. मग केशवसुत प्रेम म्हणजे काय, ते कुठे मिळेल, असा विचार करीत असोत की स्वतःच्या पत्नीवर कविता लिहीत असोत. पुष्कळदा तर कवितेला आपली प्रेयसी गृहीत धरून केशवसुतांनी तिची विनवणी केलेली आहे. 'फिर्याद 'सारख्या कवितेत हा प्रकार आढळून येतो. पण केव्हाही ही भावना यशस्वितेने व्यक्त करणे त्यांना जमले नाही.
 ज्या पिढीत केशवसुत होते त्या पिढीची परिस्थिती व वातावरण पाहता केशवसुतांना प्रेमाची अभिव्यक्ती करणे जमले नसेल तर ते एकवेळ आपण समजू शकतो. पण आईविषयक एकही कविता त्यांना जमली नाही. आरंभीच्या कालखंडात या विषयावर एक कविता आहे. तशी अगदी शेवटी याच विषयावर अजून एक कविता आहे. पण काव्य म्हणून दोन्ही कविता फसलेल्या आहेत. केशवसुतांच्या कवितांत त्यांच्या मित्रावर कविता आहेत. मजुरावर कविता आहेत. मुलास झोडपणाऱ्या पंतोजीस पाहून त्यांनी कविता लिहिली आहे. तशी अंत्यजावरसुद्धा कविता लिहिली आहे. माणूस केशवसुतांचे मन, त्यांची विचार करण्याची पद्धत, नव्या प्रयोगांची धडपड यांचा आलेख काढण्याच्या दृष्टीने या कवितांना ऐतिहासिक महत्त्व असू शकते. पण साहित्यकृतीची पातळी गाठणे यांपैकी एकाही ठिकाणी कवीला जमलेले नाही. पुनःपुन्हा केशवसुत निसर्गावर कविता लिहीत असतात. एक तर या कविता लिहीत असताना निसर्ग सोडून देऊन अगर निसर्गाच्या साक्षात सौंदर्यप्रत्ययाला सोडून देऊन त्यांची कविता सांकेतिक वर्णनाकडे वळत राहते, किंवा अवांतर तपशील देत राहते. पुष्कळदा तर मला असेही वाटते की, 'कविता आणि प्रीती'सारखी कविता लिहिताना रघुनाथ पंडित त्यांच्या डोळ्यासमोर होता की काय ? एक सुरम्य स्थळ होते असे म्हटले की क्रमाने तिथे दाट वृक्ष होते, तळी, जलाचे पाट वाहत होते, तृणांच्या गार जागा होत्या, लतांच्या रांगा होत्या, फुलांचे बहर होते, त्यांवर भुंग्यांचे थवे होते, मधूनमधून पक्षी गात होते, हरिणे उड्या मारीत होती, पिसारे फुलविलेले मोर नाचत होते, रूपसुंदरी यौवन-मदभराने वाकून फिरत होत्या, त्यांच्या पायांतील नूपुर वाजत होते, असा सगळा पसारा केशवसुत मांडू लागतात. अक्षरवृत्तात ही कविता असती तर अठराव्या शतकातच टाकावी लागली असती. इतकेही करून या साऱ्या वर्णनामुळे फक्त सांकेतिकपणा तेवढा उघडा होतो. हे असे का म्हणून होते ? हा खरा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. माझे याला उत्तर असे आहे की केशवसुतांच्यामधील माणूस ही सारी धडपड करतो आहे. त्यांच्यामधील कलावंत यांपैकी कुठेच रमू शकलेला नाही.
 केशवसुतांच्या या व अशा गद्यप्राय कवितांनी त्यांच्या कवितेचा बहुसंख्य भाग व्यापलेला आहे. अशा कवितांमध्ये गद्यप्राय ओळी आहेत. अभिव्यक्तीची अडचण आहे. कारण मूळ कलात्मक अनुभवाचीच अडचण आहे. या कवितांकडे पाहून केशवसुतांची प्रतिभा हिणकस दर्जाची होती काय असा विचार एखाद्याच्या मनात सहज डोकावून जातो. आणि या भीतीमुळे त्रस्त झालेल्या मनाच्या अवस्थेत समीक्षक केशवसुतांची सापडेल ती कविता भावोत्कट, अप्रतिम आहे असे म्हणण्यासाठी धडपडू लागतात. पण केशवसुतांच्या प्रतिभेचा कस या फसलेल्या कवितांवरून ठरवता येणार नाही. कारण या फसलेल्या कवितांच्या शेजारी 'तुतारी', 'स्फूर्ती', 'नवा शिपाई', 'सतारीचे बोल', 'प्रतिभा','घुबड', 'आम्ही कोण', 'म्हातारी', 'वातचक्र', 'घड्याळ', 'शब्दांनो मागुते या', 'पर्जन्याप्रत ' याही कविता उभ्या आहेत. विशेष म्हणजे 'हरपले श्रेय ' व 'झपूर्झा' या कविता उभ्या आहेत. एकशेबत्तीस कवितांच्या यादीत याही चौदापंधरा कविता आहेत. या यादीत अजूनही व्यक्तिगत आवडीनिवडीप्रमाणे दहापर्यंत कविता समाविष्ट होऊ शकतील. या कविता पाहिल्यानंतर केशवसुतांची प्रतिमा हिणकस दर्जाची होती असे तर वाटत नाहीच, उलट ज्या दर्जाची प्रतिभा केशवसुतांच्याजवळ होती तेवढी अनुभवाची झेप आणि खोली आपल्या आवाक्यात घेणारी प्रतिभा आधुनिक मराठी कवींत मर्टेकर वजा जाता इतर कोणाजवळ होती की नाही याची शंका येऊ लागते. केशवसुतांच्या कवितेतील हे दोन थर आपण स्पष्ट डोळ्यांसमोर ठेवले पाहिजेत. यांतीत एक थर विविध कारची धडपड करणाऱ्या माणसाचा आहे. या थराची मोजदाद करून केशवसुतांना गप्रवर्तक म्हणायचे असेल तर ते कार्य जरूर करावे. माझ्या दृष्टीने दुसरा थर महत्त्वाचा आहे. कारण हा दुसरा थर म्हणजे श्रेष्ठ प्रतिभावंताचा कलात्मक आविष्कार आहे. केशवसुतांच्या व्यक्तिमत्त्वामधील धडपड्या माणूस आणि अस्सल कलावंत यांना पृथक ठेवण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.
 केशवसुतांच्याच काळी म्हणुन नव्हे तर कोणत्याही काळी हा प्रकार सदैव घडत असताना दिसतो. या प्रकारची दोन नमुनेदार उदाहरणे नजरेखालून घालण्यासारखी आहेत. १९५६ साली लोकमान्यांची जन्मशताब्दी झाली आणि मराठी कवींनी आपल्या कवितामधून मोठ्या प्रमाणात लोकमान्यांविषयीची कृतज्ञता, आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. हा श्रद्धांजली वाहण्याचाच कार्यक्रम होता. आणि मराठी कवींच्या मनात टिळकाच्या विषयीचा आदर विपुल प्रमाणात वसत होता. १९६२ साली चिनी आक्रमणाचा संदर्भ असणाऱ्या कविताही विपुल प्रमाणात लिहिल्या गेल्या. ज्या मंडळींनी या कविता लिहिलेल्या आहेत, त्यांच्यातील पुष्कळजण मराठीतील प्रथम श्रेणीचे प्रतिभावान कवी आहेत. तरीही या कविता काव्य म्हणून यशस्वी उरलेल्या नाहीत. या साऱ्या श्रेष्ठ प्रतिभावंतांना आणि मराठी कवींना लोकमान्यांच्याविषयी खराखुरा आदरच नव्हता, आपल्या मातृभूमीवर परकीय राष्ट्राने आक्रमण केले याबद्दल त्यांना खराखुरा त्वेषच आलेला नव्हता, हे म्हणणे सोपे आणि सवंग असले तरी बेजबाबदारपणाचे आहे.
 आदर असूनही, कृतज्ञता असूनही, चीड आणि संताप असूनही हा सारा अनुभव काव्याच्या पातळीवर अभिव्यक्त करण्यात यश येणे ही बाब अगदी निराळी आहे. या ठिकाणी समीक्षेत सदैव वापरले जाणारे प्रामाणिकपणाचे परिमाण अपुरे पडलेले दिसून येते. अनुभव प्रामाणिक असूनही आणि तो खराखुरा असूनही या अनुभवाची वाङ्मयीन अभिव्यक्ती मात्र सफल होत असताना दिसत नाही. अशा वेळी माणूस आणि कलावंत यांच्यातील विसंवाद स्पष्टपणे उघडा पडतो व असे म्हणावे लागते की माणसाला आदर होता, माणसाला चीड होती, पण त्याच्यातील कलावंत या ठिकाणी नेहमी तटस्थ राहिला होता. केशवसुतांच्या बाबतीतही नेमके हेच घडत गेलेले आहे. माणूस कृष्णाजी केशव दामले इंग्रजी कवितेचा चेहरा-मोहरा पाहून तशी कविता मराठीत घडविण्याचा प्रयत्न करीत होता. सुनीते, भावगीते मराठीत आणण्याचा या माणसाचा प्रयत्न होता. माणूस केशवसुतांचा निसर्गावर विश्वास होता. ही निसर्गावरील श्रद्धा पाश्चात्य परंपरेने त्यांना प्राप्त झाली होती. सौंदर्याची परिपूर्णता निसर्गात असते, संगीताचा सर्वश्रेष्ठ आविष्कार निसर्गात आहे, भ्रमर हा सर्वश्रेष्ठ कवी आहे इत्यादी कल्पना माणूस केशवसुतांत इंग्रजी कवितेच्या साहचर्याने उद्भूत झालेल्या होत्या. इहलोकवादाला सन्मुख असणारे, सुधारणांचा पुरस्कार करणारे, स्त्री-दास्य विमोचनात रस घेणारे मन हे माणूस केशवसुतांचे मन आहे. या माणूस केशवसुताने मराठी काव्याच्या इतिहासात नजरेत भरण्याजोगी कामगिरी केलेली दिसते. पण मूलतः ही कामगिरी कोल्हटकरांनी मराठी नाटकात केलेल्या कामगिरीसारखी, वरेरकरांनी इब्सेन मराठीत आणण्याबाबत केलेल्या धडपडीसारखी किंवा अधिक मोठ्या प्रमाणावर गुर्जरांनी मराठी लघुकथेत केलेल्या कामगिरीसारखी आहे. ही सर्व कामगिरी ललित वाङ्मयाच्या वाङ्मयबाह्य पण उपकारक आकलनाचा भाग असणारी अशी आहे. या माणूस केशवसुतांची समकालीनांनी योग्य ती बूज ठेवली की नाही. यावर चर्चा करणे आणि त्याबद्दल हळहळणे जर कोणाला आवश्यक वाटत असेल तर त्याने तसे करण्यास हरकत नाही.
 समकालीनांनी केशवसुतांना मान्यता दिली असे म्हणणाऱ्यांनी रे. टिळक आणि विनायकांच्या या काव्याविषयीच्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. त्यांची बूज ठेवली गेली नाही असे म्हणणाऱ्यांनी कै. मोतीवुलासा यांचा लेख दाखवावा. 'विविधज्ञानविस्तारा'त त्यांचा कविता छापली गेली नाही इकडे वाटल्यास बोट दाखवावे. पण या दोन्ही गोष्टी करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, माणूस केशवसुत ज्या घटना घडविण्यासाठी प्रयत्न करीत होते, मराठी कवितेला आकार देण्यासाठी धडपडत होते, त्यांतून कोणा समकालीनाला फारशी प्रेरणा मिळाली नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. रे. टिळकांच्या अगर बालकवींच्या काही कविता केशवसुतांचे अनुकरण करणाऱ्या आहेत हे जरी खरे असले, तरी टिळक, दत्त, बालकवी किंवा विनायक यांचे प्रेरणास्थान केशवसुत नव्हते. केशवसुत हा माणूस एकेक पायंडा मराठीत टाकण्याचा प्रयत्न करीत होता. पण या नव्या वाटा फारशा कलात्मक रीतीने त्यांनाच यशस्वी करता आल्या नाहीत, मग त्यातून समकालीनांना प्रेरणा ती काय मिळणार १ आणि ज्यांनी आपली प्रेरणा केशवसुत आहे अशी प्रथम घोषणा केली त्या गडकऱ्यांचे काव्य तपासले, तर त्याचा चेहरा-मोहरा फारच निराळा दिसतो.
 केशवसुतांच्या या सर्व धडपडीला व प्रयत्नाला महत्त्व आहे की नाही ? माझ्या मते या सर्व प्रयत्नाला महत्त्व आहेच. आज आधुनिक मराठी कवितेच्या ज्या प्रवृत्ती आपण नोंदवितो, त्यांतील बहुतेक सगळ्या एकत्रितरीत्या केशवसुतांत सापडतात. त्यामागे त्यांची जाणीवपूर्वक धडपड आहे. जणू या ठिकाणी केशवसुतांना आलेले अपयश पुढच्यांच्या यशाचा मार्ग मोकळा करते झाले. पण हे यश म्हणजे वाङ्मय-व्यवहारातील श्रेष्ठ प्रतिभावंताचे यश व महत्त्व नाही. नित्य नवी धडपड करणाऱ्या माणसाचे हे महत्त्व आहे. ज्यांनी कधीच कोणतीही धडपड केली नाही, मळलेल्या वाटेने जे संथ चालत राहिले, त्यांच्या तुलनेत अशी धडपड करताना जे अयशस्वी झाले त्यांचे अपयश निश्चितच अधिक मूल्यवान मानले गेले पाहिजे.
 केशवसुतांच्यासंबंधी विचार करताना नव्याने क्षीरसागरांनी विस्ताराने एक मुद्दा मांडलेला आहे. क्षीरसागरांचा मांडलेला मुद्दा तसा नवा नाही. कारण यापूर्वीच स्फुट लेखांतून तो त्यांनी मांडला होता. पण आता त्यांनी आपल्या मुद्दयाची तपशीलवार मांडणी टीकाविवेक' या ग्रंथात केलेली आहे. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे स्वतःला फार दिवसांपासून मराठी वाङ्मयातील रोमँटिसिझमचे एक समर्थक मानत आलेले आहेत. मराठी वाङ्मयात केशवसुतांच्या लोकप्रियतेचे चढउतार कसेही होवोत, क्षीरसागर त्यांचे नेहमीच चाहते व समर्थक राहिले. त्यांना केशवसुतांची जशी ओढ वाटली, तशी ओढ तांबे व गडकरी यांचीच वाटली. इतर कोण्याही कवीचा फार मोठ्या उत्साहाने क्षीरसागरांनी पुरस्कार केलेला नाही.
 केशवसुत हे मराठी काव्यातील एक युगप्रवर्तक कवी आहेत, याबद्दल क्षीरसागरांचा आरंभापासून आग्रह होता. मात्र केशवसुतांनी केलेले वृत्तांचे विविध प्रयोग यांत त्यांनी हे युगप्रवर्तन कधी शोधलेले नाही. केशवसुतांच्या कवितांत आलेला सुधारणावाद किंवा त्यांच्या कवितेतले नवे विषय यांविषयी क्षीरसागरांना मर्यादितच उल्हास होता. क्षीरसागरांना केशवसुतांचे जे आकर्षण वाटते, त्याचे कारण केशवसुत हे त्यांना मराठी वाङ्मयातील रोमॅटिसिझमचे आद्य प्रतिनिधी वाटतात हे आहे. किर्लोस्करांपासून मराठीत नवे नाटक सुरू होवो, हरिभाऊंपासून मराठी कादंबरी सुरू होवो, यांपैकी एकाचाही प्रकृतिधर्म रोमँटिक या संज्ञेला पात्र होईल असा नव्हता. विषय बदलले, मांडणी बदलली, वृत्त किंवा तंत्र बदलले म्हणजे वाङ्मयात युगप्रवर्तन होते असे क्षीरसागरांना वाटत नाही. त्यांचे म्हणणे असे की वाङ्मयात खरा बदल त्यावेळी होतो, ज्यावेळी विचार करणाऱ्या मनाचाच नवा घाट जन्माला येतो, एक नवे व्यक्तिमत्त्व साकार होते. सौंदर्यपूजक व्यक्तिमत्त्वाचा एक नवा नमुना केशवसुतांच्या रूपाने मराठी वाङ्मयाच्या परंपरेत सर्वस्वी अपूर्व होता. म्हणून केशवसुत हे युगप्रवर्तक कवी होत असे क्षीरसागरांना म्हणावयाचे आहे.
 क्षीरसागरांचे हे म्हणणे अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे आहे, यात वादच नाही. भारतीय संस्कृतीची सर्व परंपरा 'शिव' या मूल्याचे जतन करणारी परंपरा आहे. किंबहुना सर्व जगातच धर्मप्रधान, मध्ययुगीन संस्कृतीची मूल्यपरंपरा 'शिवा'चे सार्वभौमत्व मानणारी अशीच आहे. परंपरागत भारतीय जीवनात सत्यनिष्ठा नव्हती, अगर सौंदर्यासक्ती नव्हती असा याचा अर्थ नव्हे, तर धार्मिक वाङ्मयाला स्वतःसिद्ध प्रामाण्य असल्यामुळे 'सत्य' ही कल्पनाच 'शिवा'च्या छायेखाली वावरत होती. वेद जे सांगेल ते सत्य, साधुसंत सांगतील ते सत्य, आत्म्याच्या उद्धाराला जे उपकारक होईल ते सत्य; अशी सत्याची धारणा सतत 'शिवा'ला अनुसरणारी होती. हाच प्रकार सौंदर्याचाही होता. सत्य, शिव आणि सुंदर ही तिन्ही मूल्ये अंतिमतः त्या श्रेष्ठ परममंगलमयाच्या ठिकाणी एकत्र येतात अशी ही भूमिका होती. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता मोक्ष मानल्यानंतर मुमुक्षू अवस्थेच्या अलीकडच्या टप्यात धर्माने 'कर' म्हणून सांगितलेले करावे व पुण्य मिळवावे, धर्माने 'वर्ज्य ' म्हणून सांगितलेले करू नये आणि पाप टाळावे, हीच एक व्यवहाराची चौकट होती. पाप सहजगत्या टळत नाही, ते टाळण्याचा प्रयत्न' आणि या प्रयत्नातून चित्तशुद्धीच्या अवस्थेपर्यंत आले म्हणजे पाप-पुण्याच्या चौकटीपलीकडे जाऊन मोक्ष, ही या जीवनाची सर्वसामान्य मूल्ये होती. या प्रक्रियेत संयमाला महत्त्व होते. तपाला आणि पावित्र्याला महत्त्व होते. नानाविध पद्धतींचे चढउतार चालू असताना नाना कर्मकांडांमधून प्रत्येकजण आपापल्या परीने शिवाची उपासना करीत होता.
 या उपासनेत सत्याचाही एक धागा होता. पण ते सत्यही पुन्हा शिवच होते. विज्ञानाच्या उपासना त्याही वेळी चालूच होत्या. पण या उपासनांची प्रयोजने उपयुक्ततावादी किंवा धार्मिक अशी होती. उपयोगी पडेल असे औषध शोधण्यासाठी, हलक्या धातूचे सोने करण्यासाठी किंवा शरीर अमर करण्यासाठी विज्ञानाची ही धडपड होती. जीवनात कधीकधी हे विज्ञान शिवाच्या विरोधी उभे राहताना दिसत असते. याबाबत शिवाचे संरक्षण हीच सत्याची सर्वात मोठी उपासना आहे अशी आमच्या परंपरेची भूमिका होती. या पार्श्वभूमीवरच उपासनेत खंड नको, निष्कारण बुद्धिभेद नको, म्हणून आमच्या ज्योतिषशास्त्रज्ञांनी राहू आणि केतू हे ग्रह नसून छाया आहेत याचे ज्ञान झाल्यानंतरही गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले. सर्वांच्या कल्याणासाठी असत्य बोलावे असे सांगणारे काही अपवादही अशा परंपरेत सुप्रतिष्ठित रीतीने वावरताना दिसतात. या मध्ययुगीन परंपरावादात, हितकर असो की नसो, 'सत्य' ही स्वतंत्र निष्ठा, 'शिव' असो वा नसो, सौंदर्य ही एक स्वयंभू स्वतंत्र निष्ठा, ही भूमिकाच नव्हती; ते असणे शक्यही नव्हते.
 युरोपमध्येसुद्धा रिनेसान्सपर्यंत सत्य आणि सौंदर्य या स्वयंभू निष्ठा नव्हत्या. आपल्याकडे अव्वल समाजसुधारणेचे जे कार्य सुरू झाले, त्याचीही निष्ठा न्याय अगर सत्य अशी नसून दया, परोपकार, 'शिव' हीच होती. आगरकरांनी दया आणि परोपकार ही भूमिका बाजूला ठेवून मिल आणि स्पेन्सरचे अनुसरण करीत उपयुक्ततावादाची भूमिका घेतली. जे उपयोगी आहे, जे हितकारक आहे, जे सर्वांना अधिकांत अधिक सुख मिळवून देणारे आहे, त्याचा स्वीकार ही आगरकरांची भूमिका होती. जर केशवसुतांची भूमिका रोमँटिक म्हणजे सौंदर्यपूजकाची असेल, तर मग केशवसुत हे (विचारांच्या क्षेत्रात) आगरकरांचे अनुयायी आहेत या म्हणण्यातच काही अर्थ राहत नाही. दोन भिन्न विचारसणांच्या व्यक्तींचे कार्यक्रम कधीकधी एक येतात, म्हणून त्यांच्या भूमिका एकच समजण्याची चूक निदान आपण करणे बरोबर नाही.
 जी संस्कृती 'शिव' हे मूल्य प्रमाण मानते, ती या सर्व पार्थिव जगाचाच निषेध करणारी संस्कृती असते. त्या संस्कृतीची उभारणी संयम आणि वैराग्यावर असल्यामुळे माणसाचा अधःपात घडवून आणणारे वासनाविकार हे आपोआपच तिचे शत्रू ठरतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ही सर्व मोहाचीच रूपे आहेत. या मोहपाशातून सुटका करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही असे म्हणणारी मंडळी या विकारांना जागे करणाऱ्या इंद्रियांचीही शत्रू असतात. आणि इंद्रियांनी भोगले जाणारे बाह्य जगतही त्यांना शत्रू असते. या जगातील आकार, रंग, गंध सारेच मोहमय. त्यांची कक्षा जी इंद्रिये, ती मोहमय. आणि वासना ह्या शत्रू. ही भूमिका घेऊन इंद्रियांच्या पलीकडच्या जगातील अतींद्रिय कवटाळण्यासाठी निघालेली ही सारी मंडळी लौकिक जीवनातील सर्वच सुखे आणि आनंद यांचे वैरी असतात. निदान तशी त्यांची तात्त्विक भूमिका असते. म्हणून त्या जगात तत्त्वतः तरी राधाकृष्णाचा शृंगार वर्णन करून भक्तीला उपकारक होण्यापुरतीच शृंगाराला जागा मिळणार. कलांच्याही उपासनेचे प्रयोजन अशा ठिकाणी धर्माचा प्रचार, प्रसार आणि पुरस्कार इतकेच असते. सत्य आणि सौंदर्य या दोन स्वयंभू जीवननिष्ठांचा उदय विज्ञानाच्या अभिवृद्धीनंतर व व्यक्तिवादाच्या उदयानंतर होत असतो. विशेषतः सौंदर्य हे जेव्हा स्वयंभू मूल्य होते, त्यावेळी अशा व्यक्तींसाठी वासना व विकार माणसाचे जिवलग होतात. इंद्रिये त्याची सर्वांत जास्त विश्वासू मित्र होतात. पार्थिव जगातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा इंद्रियांनी आस्वाद घ्यावा आणि त्यांच्या मोहासक्तीत सर्व बंधने झुगारून विरघळून जावे, हीच एक जीवनाची इतिकर्तव्यता होऊन जाते. सौंदर्य या मूल्याला स्वयंभूपण द्यावे की न द्यावे, या मूल्याच्या उपासनेत सर्वस्वी हरवून जाऊन स्वतःला धन्य मानावे की न मानावे, यावर प्रत्येकाचा मतभेद प्रकृतिधर्माप्रमाणे होऊ शकेल. पण सौंदर्यपूजकाच्या जीवननिष्ठाच भिन्न असतात. मध्ययुगाच्या समाप्तीची घोषणा झाल्यानंतर उदयाला येणारे असे सौंदर्यपूजक मन हा मानवी व्यक्तिमत्त्वाचा अगदी नवा नमुना असतो, यावर मतभेद होण्याचे कारण नाही.
 जर केशवसुत मराठी वाङ्मयात अशा सौंदर्यपूजनाचे आरंभबिंदू असतील, तर केशवसुतांना युगप्रवर्तक का म्हणावे या महत्त्वाच्या प्रश्नाचे एक महत्त्वाचे उत्तर मिळाले असे म्हणण्यास हरकत नाही. सर्व वाङ्मयीन चर्चेत हे 'जर', 'तर' हीच खरी महत्त्वाची अडचण आहे. आणि म्हणूनच प्रश्न तसेच अनुत्तरित राहून जातात. मानवी व्यक्तिमत्त्वाचा नवा नमुना आणि वाङ्मयीन युग या दोन कल्पनांची सांधेजोड फारशी पक्की नाही, हीच एक अडचण आहे. असा व्यक्तिमत्त्वाचा कोणताही नवा नमुना किर्लोस्करांचा नव्हता. हरिभाऊंचा नव्हता. आणि युगे काय ललित वाङ्मयातच पडणार ? स्वतःच्या आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत युगे टाकण्याची वेळ येणार. अशावेळी व्यक्तिमत्त्वाचे इतके नवीन नमुने आणायचे कोठून ? सारी स्वयंभू मूल्येच बोटावर मोजण्याइतकी थोडी. एकेका निष्ठेचा स्वीकार करणारी मनेही थोडीच असणार. केशवसुतांचे मन सौंदर्यपूजक म्हणून एक नवे युग त्यांच्यापासून टाकले तर पुढच्या मर्ढेकरांचे काय ? हाही नमुना मराठीला नवीनच होता. या व्यक्तिमत्त्वाची जीवननिष्ठा कोणती सांगणार ? निसर्गाच्या साक्षात प्रत्ययात धुंद होऊन नवी स्वप्नसृष्टी निर्माण करणाऱ्या बालकवींच्या मनाची निष्ठा सौंदर्यपूजेशिवाय दुसरी कोणती सांगणार ?
 पण खरी अडचण यापुढे आहे. केशवसुतांचे मन हा सौंदर्यपूजक रोमँटिक व्यक्तिमत्त्वाचा एक नमुना होता या भूमिकेला केशवसुतांच्या कवितेत आधार नाही, हीच एक महत्त्वाची अडचण आहे. केशवसुतांनी अगदी शेवटच्या कवितेत 'जेथे ओढे वनराजी वृत्ति रमे तेथे माझी' असा उल्लेख केला आहे. या उल्लेखाच्या बरोबरच या वनराजीच्या सहवासात 'हरपलेल्या सहवासा'ची काही साक्ष मला पटते असेही ते म्हणतात. 'जिने मला वेडे केले तिच्यावरी ही फिर्याद ' या कवितेत, कुंजात असल्यामुळे माझी वृत्ती हर्पित झाली आणि प्रतिभेचा संचार झाला असे त्यांनी म्हटले आहे. कवीचा पाणिस्पर्शच या जगातील वस्तूंना सौंदर्यातिशय देऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. 'पूजितसे मी कवणाला तर मी पूजी अपुल्याला, अपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजितसे मी विश्वाला' हा व्यक्तिवादही केशवसुतांत आहे. असे अनेक उल्लेख गोळा करता येतील. पण या उल्लेखांचे ढीग जमा केले, तरी त्यामुळे केशवसुतांचे मन एक व्यक्तिवादी सौंदर्यपूजक मन होते हा मुद्दा सिद्ध होणार नाही. यांसारख्या उल्लेखांवरून काय होण्याची केशवसुतांची इच्छा होती इतकेच सांगता येते.
 या इच्छेला अनुकूल असा केशवसुतांचा प्रकृतिधर्म आपण हुडकू लागलो म्हणजे भावनेच्या आवेगात वाहत जाणे व वाहवत जाणे हा या कविमनाचा धर्म नाही ही गोष्ट उघड होते. रोमॅटिक प्रकृतिधर्म असणारे कवी आपल्या कवितेत नानाविध प्रतिमांची पखरण करणारे कवी असतात. बहरलेल्या पारिजातकाप्रमाणे त्यांची कविता कल्पनाविलासाने फुललेली असते. इंद्रियांना जाणवणाऱ्या सौंदर्यात हे कवी देहभान हरपून पोहत असतात आणि त्यांच्या कविता वाचताना रसिकांच्या इंद्रियांनाही पुन्हा नव्या जिभा फुटतात. भावनेची आर्तता, शैलीचा मुलायमपणा आणि स्वप्नसृष्टीची निर्मिती अशा कवितेत जागोजाग आढळत असते. हा असा प्रतिभेचा प्रकृतिधर्म आधुनिक मराठी कवितेत सर्वप्रथम आणि उत्कटपणे बालकवींत आढळतो. अर्थात तिथेही मर्यादा आहेतच. पण केशवसुतांच्या प्रकृतीतच ही प्रवृत्ती नाही. त्यांच्यातील माणूस निसर्गपूजन करू पाहतो. त्यांच्या इंद्रियांना निसर्गपूजन जाणवत असलेले दिसत नाही. त्यांच्यातील कलावंत, रंगगंधात वावरणारा नाही. केशवसुतांचा प्रकृतिधर्म नेहमीच अंतर्मुख आणि चिंतनशील राहिला. या चिंतनातून त्यांची कविता झेप घेते. ती सौंदर्यात हरवणारीही नव्हे, पुनःपुन्हा आपण त्याच एका मुद्दयाभोवती फिरतो आहोत. तो मुद्दा असा की, फसलेल्या कवितांचा आढावा म्हणजे माणूस केशवसुतांचा आढावा. कवी केशवसुतांसंबंधीचे कोणतेही मत त्यांनी साकार केलेल्या काव्यकृतींच्या आधारे नोंदवले जायला पाहिजे. कारण प्रतिभावंत म्हणून कवी केशवसुतांचे मोठेपण अशी काव्यकृती निर्माण करण्यातच होते.
 या दृष्टीने कलावंत म्हणून केशवसुतांच्या मोठेपणाचा शोध 'हरपले श्रेय' आणि 'झपूर्झ 'सारखी कविता तपासूनच घ्यावा लागेल. कारण अशा ठिकाणी आपल्याला शतकभर ओलांडता न आलेल्या प्रतिभावंताचा आढळ होतो. कधीकधी तर मला असेही वाटते की ' हरपले श्रेय' लिहिणारे केशवसुत एका वेगळ्या पातळीवर मढेकरांच्या कवितेचा मध्यवर्ती धागा सांभाळून धरीत आहेत. यंत्रयुगाच्या विकासानंतर आणि दोन महायुद्धांचा अनुभव गाठीशी जमा झाल्यानंतर जी विफलता मढेकरांना जाणवली, ती विफलता नुकतेच इंग्रजी राज्य सुरू झालेले आहे, सुधारणांचे आणि शिक्षणाचे नवे वारे वाहत आहे अशा नव्या उत्साहाने, ईर्षेने व जिद्दीने पेटून उठलेल्या केशवसुतांच्या पिढीला जाणवण्याचा संभव फार कमी होता. तरीही मूल्यांच्या पातळीवर प्रत्येकच पिढीतील विचारवंतांना एक प्रकारची हतबुद्धता आणि विफलता जाणवत असताना दिसतेच. हिचा धागा केशवसुतांच्या ' हरपले श्रेय 'मध्ये आपण पाहू शकतो. या कवितेतच केशवसुतांनी 'प्राप्त जाहले ते तुजला। तू मागितले जे देवाला' असा उल्लेख केला आहे. आणि ही सर्व मानवसंस्कृतीच्या गाभ्याची व्यथा आहे.
 ऑस्कर वाइल्डने एके ठिकाणी असे म्हटले आहे की, जीवन हे मूलतः शोकात्मच असते. पण ही शोकात्मिका दोन प्रकारची असते. ज्याची इच्छा केली, अभिलापा मनात ठेवली, ते मिळाले नाही तर एक दुःख होतेच. ती शोकात्मिका आहेच. पण नेमके जे मागितले, जे मिळण्यासाठी सर्वस्व देऊन टाकले, ज्याची जन्मभर अभिलाषा वाळगली, नेमके तेच मिळणे हीसुद्धा एक शोकांतिकाच आहे. आणि ही दुसरी शोकांतिका अधिक दारुण आहे. ऑस्कर वाइल्डने दुसऱ्या शोकांतिकेचे जे वर्णन केले आहे, तो अनुभव केशवसुतांच्या 'हरपले श्रेय' या कवितेत मोठ्या सामर्थ्याने प्रकट झाला आहे. एखाद्या मुलीवर प्रेम करावे, ती मिळावी म्हणून झुरावे, व शेवटी ती मिळू नये हे दुःख खरेच. पण या दुःखात एका समाधानाला जागा असते. तिथे माणसाचा पराभव होतो, मूल्यांचा पराभव होत नाही. पण नेमकी ही प्रेयसी प्राप्त व्हावी,आणि इतक्या परिश्रमाने ती प्राप्त झाल्यानंतर, सर्वोच्या विरोधाशी झगडून विजय मिळविल्यानंतर, इतक्या परिश्रमाने मिळविण्याच्या लायकीचे हे व्यक्तिमत्त्व नव्हते असे जेव्हा कळते, तेव्हा सारेच काही उद्ध्वस्त व विफल होऊन गेलेले असते. 'हरपले श्रेय' पाहत असताना पुनःपुन्हा एका मुद्दयाकडे माझे लक्ष वळले आहे. जे तू देवाला मागितले आहेस तेच तुझ्या पदरी पडले आहे, ज्याचे मोल तू दिलेस त्याचाच तुला लाभ झाला आहे, ही गोष्ट समजल्यामुळे फक्त सौदा चुकल्याची जाणीव होते. जीवनातील सारे हिरण्मय पणाला लावून हे मिळवलेले असते. आणि ते मिळवल्यानंतर जे मिळवले ते केवळ मृण्मय आहे, सगळा हतविनिमय झाला याची जाणीव होते.
 ही व्यथा ध्येयवाद्यांनी वेगवेगळ्या युगांत भोगलेली आहे. पहिले महायुद्ध जिंकल्यानंतर किंवा दुसरे महायुद्ध जिंकल्यानंतर इंग्लंडला ही व्यथा जाणवली आहे. ज्या पिढीने सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्य मिळवले, त्या पिढीला ऐन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या व्यथेची जाणीव झालेली आहे. अशा वेळी मागितलेली वस्तू मिळते, फक्त श्रेय मात्र हरवून जाते. या क्षणी सारी मूल्येच विफल झाल्यासारखी वाटायला लागतात. जे हातात धरलेले आहे, तरीही बोटाच्या फटीतून निसटलेले आहे, जे झावळ-झावळ दिसते, चकवा देते, सापडत मात्र नाही, अशा काहीशा विलक्षण मनःस्थितीत ही कविता आपल्याला नेऊन सोडते. या हरपलेल्या श्रेयाचा ध्यास घेऊन केशवसुत झुरू लागले म्हणजे हा कवी आपल्या कालखंडाच्या फारच पुढे जाऊन पोहोचल्यासारखा दिसू लागतो. या पातळीवर केशवसुत असले म्हणजे त्यांचे मन भोवतालच्या सुधारणावादापेक्षा कितीतरी पुढे निघून गेलेले असते. अशा कवितेच्या संपर्कात एकदा आपण आलो म्हणजे मोक्षाची परंपरागत तळमळ किंवा समकालीन सुधारणावाद यांचे संदर्भ निरुपयोगी होऊन जातात व कुटेतरी एकूण मानवजातीच्या दुःखाच्या गाभ्याजवळच आपण अचानक येऊन पोहोचलो आहोत असे वाटू लागते. या पातळीवर केशवसुतांना शब्द अडत नाहीत. मुद्दाम कल्पना हुडकाव्या लागत नाहीत. अभिव्यक्तीचा कोणताच त्रास होत नाही. या पातळीवर असताना त्यांना प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व हेच तिळावरील हलवा झाल्याची जाणीव होते. साखरेचा एकेक कण जो प्रत्येक तिळाने स्वतःच्याभोवती वेढून घेतला आहे, ती त्या तिळाची कमाई असते. ही कमाईच त्याचे माधुर्य असते. ते ह्या तिळाचे सौंदर्य, सामर्थ्य व वेगळे व्यक्तिमत्त्व असते. हीच साखर इतरांना बोचणारा काटाही आहे. प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्त्व हेच जर अशाप्रकारे त्याचा शत्रू व्हायला लागले तर मग या जगातील दुःख कसे संपेल, हा एक कायम चिंतेचा विषय झाल्याशिवाय राहत नाही.
 जनावरांची दुःखे त्यांच्या देहाच्या गरजांनी निर्माण केलेली असतात. सुधारणा आणि संस्कृती या दुःखांच्यावर उपाय शोधून काढू शकतील. पण जर माणसांची दुःखे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमधूनच निर्माण होत असतील तर हा कलह मन व्यापक केल्यामुळे तरी कधी संपणारा आहे की नाही कोण जाणे! या पातळीवर चिंतन करणाऱ्या मनाची झेप स्वाभाविकपणेच मोठी असणार. मग केशवसुतांना अशावेळी वेदकाळच्या ऋपिवयांशी आपला सांधा जुळला आहे असे वाटू लागते. या पातळीवर सर्व मानवाचे आपण प्रतिनिधी होत आहोत, हेही त्यांना जाणवते. तेजाचे पंख हेलावत जाणारी शक्ती त्यांना खुणावू लागते. तिचा देव्हारा आपल्या अंतःकरणात स्थापन केला जातो असे त्यांना वाटू लागते. वेदकाळच्या ऋषींशी आपला सांधा जुळला आहे हे जाणवले, म्हणजे काळाचा दुरावा संपूनच जातो. पण तरीही हा तटस्थ काळ शेजारी आपले अस्तित्व जाणून उभा आहे. आला क्षण, गेला क्षण असे सांगून हा काळ स्वतःचे अस्तित्व घोषित करतो.
 जीवनातल्या सर्व सुखांना हा काळ उपकारक होत नाही. तो कोणत्याही दुःखाचा वाटेकरी होत नाही. सर्व सुखदुःखांना अत्यंत निष्ठुरपणे 'आला क्षण गेला क्षण' एवढे एकच उत्तर काळ देत असतो. या पातळीवर केशवसुतांना सारे धैर्य एकवटून अज्ञाताच्या प्रदेशात उड्डाण करावेसे वाटू लागते. जे ज्ञात आहे त्याच्या कक्षा विस्तारून अज्ञाताचा काही प्रदेश ज्ञाताच्या कक्षेत आणावा; तो शेतीखाली, वहिवाटीखाली आणावा असे वाटू लागते. हे आपणाला जमेल की नाही याची शंका इथेही आहेच. त्या अज्ञाताच्या प्रदेशात मुक्काम ठोकणारा सनदी शेतकरी एखादाच असू शकेल. पण या अज्ञाताच्या कक्षेतून एखादी वनमाला, एखादे फूल ज्ञाताच्या प्रदेशात उचलून आणता येईल काय, याची वेहोषी केशवसुतांना चढते. या धुंद क्षणी त्यांना अस्पष्टपणे सृष्टीचे रहस्य दिसू लागते. या रहस्याशी असणारे सत्य व सौंदर्याचे संबंध दिसू लागतात. 'झपूर्झ' आणि 'हरपले श्रेय' ही अशी मराठी कवितेला अज्ञात असणाऱ्या प्रदेशातून केशवसुतांनी खुडून आणलेली, शतकभर अम्लान राहणारी फुले आहेत असे मला वाटते. आणि या संदर्भात कलावंत म्हणून केशवसुतांचे मोठेपण जाणवू लागते.
 मराठी कवितेचा विकास होत आहे असे आपण म्हणतो; एका मर्यादित अर्थाने हे म्हणणे खरेही आहे. जी निसर्गकविता केशवसुतांनी लिहिली, किंवा जी प्रेमकविता केशवसुतांनी लिहिली, त्याच्या कितीतरी पुढे मराठी कविता आज निघून गेली आहे. काव्याच्या रचनेचे जे प्रयोग केशवसुतांनी केले, त्याही पुढे घाटाबाबतची प्रयोगशीलता गेलेली आहे. पण 'झपूर्झ' आणि 'हरपले श्रेय' यांच्यापुढे मराठी कविता गेलेली आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर देताना थोडे जपूनच बोलले पाहिजे. या अर्थाने काव्याच्या प्रवाहात एखादी कलाकृती असे स्वरूप धारण करते की त्या स्वरूपातच ती आकृती परिपूर्ण होऊन थांबतं असे मानावे लागते.
 शेवटी हा पाहण्या-पाहण्यातला फरक आहे. काव्य म्हणून यशस्वी नसलेल्या पण नवा पायंडा टाकणाऱ्या कवितांची मोजदाद करून केशवसुतांनी मराठीत नवीन काय आणले व ते क्रमाने कसे रूढ झाले याचा विचार करू इच्छिणाऱ्यांना व त्या संदर्भात केशवसुतांचे युगप्रवर्तकत्व ठरविणाऱ्यांना ती मोकळीक असली पाहिजे; आणि ज्यांना केशवसुतांतील नवेनवे प्रयोग करण्याची धडपड करणारा माणूस जाणवतो, या माणसाशी फटकून विसंवादी राहणारा व निराळ्या वाटेने जाणारा प्रतिभावंत जाणवतो, त्यांना तो पाहण्याची मोकळीक असली पाहिजे. ज्यांना केशवसुतांचे कलात्मक आकलन करताना त्यांच्या कवितेतील गद्यप्राय विफल काव्याचे आधार घ्यावेसे वाटतात, व्याख्यानांचे आधार द्यावेसे वाटतात, त्यांना तसे करण्याची मोकळीक आहेच. पण ज्यांना कलेच्या पातळीवर सफल झालेल्या साहित्यकृतींवरच केशवसुत या प्रतिभावंताचे व्यक्तिमत्त्व शोधले पाहिजे असे वाटते, त्यांनाही ती मोकळीक असली पाहिजे. केशवसुतांच्या कवितेतील सफल साहित्यकृती कोणत्या यावर थोडाफार मतभेद होण्याचा संभव आहे, हेही जरी मान्य केले तरी या सफल साहित्यकृतींमधून अभिव्यक्त होणाऱ्या मनाचीही एक शिस्त आहे, त्याची एक संगती आहे हे जाणवत राहते. ही संगती निसर्गपूजकाची, स्त्री-सुधारणावाद्याची किंवा उपयुक्ततावादाला मान्यता देणाऱ्याची संगती नाही, तर वैचारिक अनुभव कलेच्या पातळीवर नेणारी व अधिक मूलभूत प्रश्नांचा विचार करणाऱ्या मनाची ही संगती आहे.

प्रतिष्ठान, सेप्टेंबर १९६७