पान:Yugant.pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ७७

रामायणकथेतही पण जिंकणारा राजपुत्र ब्राह्मणांच्यामध्ये बसलेला दाखवला आहे; पण तो एक योगायोग होता, इतकेच. हा राजकुमार दशरथाचा मुलगा राम, हे सर्व सभेला माहीत होते. या लग्नाने प्रतिष्ठा मिळाली जानकीला. रामाला एक सुंदर व त्याच्यावर प्राणांपलीकडे प्रेम करणारी सहचरी मिळाली, यापलीकडे काही नाही. ज्या दृष्टीने रामायण लिहिले आहे, त्या दृष्टीने रामाला दुस-या कशाची गरजही नव्हती.
 द्रौपदी पांडवांची झाली. तिच्या माहेरी राहूनच पांडवांनी राज्याच्या भागाची वाटणी मागितली पांडवांचे पारडे इतके जड झाले होते की, धृतराष्ट्राला ही मागणी डावलता येईना. इंद्रप्रस्थाला धर्माबरोबर द्रौपदीलाही अभिषेक झाला व ते राज्य द्रौपदीमुळे मिळाले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. द्रौपदी पांडवांची प्रतिष्ठा होती; त्यांच्या एकत्चाची, अभेद्यतेची चालती-बोलती खूण होती.
 पांडव शूर होते, पण एकाला द्यूताचे व्यसन, एक आडदांड, एक लढाऊ पण राज्यावर मन नसलेला, धाकटे दोघे जुळे भाऊ, वडील भाऊ करतील त्याला साथ देणारे असे होते. पांडवांनी स्वतंत्रपणे काही राजकारण केले नाही. त्यांचे राजकारण श्रीकृष्णाने केले व त्यांची जपणूक दोन बायांनी केली. पांडू मेला, माद्री सती गेली व ही लहान लहान पाच मुले घेऊन कुंती हस्तिनापुराला आली. त्या दिवसापासून त्यांचे लग्न झाले त्या दिवसापर्यंत कुंतीने रात्रंदिवस मुलांवर पहारा केला. पांडवांना गंगेच्या काठी लांबच्या गावाला पाठविले, तेव्हा कुंतीला राजधानीत राहता आले असते पण ती त्यांच्याबरोबर गेली. लाक्षागृहातून सुटल्यावर त्यांच्याबरोबर राहिली. पांडवांचे आईवरचे प्रेम हेही एक कारण ह्या घटनेला देता येईल, पण तिचे जागृत मातृत्व हेच कारण ह्याच्या पाठीमागे मुख्यत्वे होते.