पान:Yugant.pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७४ / युगान्त



झालेल्या गोष्टींची नोंद इतिहास करतो. घडेल ते सांगायच्या अनुषंगाने महाभारतात राजधान्या, अरण्ये, नद्या यांचीही वर्णने येतात. पण ती तितक्यापुरतीच. ज्या प्रमाणावर एकंदर गोष्ट रंगवलेली आहे, ते प्रमाणही स्थल, काल आणि व्यक्ती ह्या सर्वांच्याच बाबतीत खूप मोठे आहे. इतिहास सांगण्याच्या ओघात शूर आणि भ्याड, दुष्ट आणि सज्जन, उतावळे आणि संथ, सुंदर आणि कुरूप अशा कितीतरी स्त्री-पुरुषांची चित्रे त्यात आली आहेत. ह्यांपैकी कोणतेही सर्वस्वी एकाच रंगात रंगवलेले नाही. सर्व सद्गुण एका बाजूला व सर्व दुर्गुण एका बाजूला, असे चित्रण जवळजवळ नाहीच. लोकांसमोर काहीतरी आदर्श ठेवायचा, ह्याही बुद्धीने ते लिहिले गेले नाही. ह्याउलट रामायण हे एका आदर्श पुरुषाचे चरित्रगायन आहे. जे जे काय म्हणून जगात चांगले असेल, त्यांचा पुतळाच असा एक पुरुष श्रीरामचंद्र होता, व त्याचे चरित्र जगाला कळावे, म्हणून वाल्मीकीने हे काव्य लिहिले. जसा राम हा पुरुषांचा आदर्श, तशी सीता ही स्त्रियांचा आदर्श. सगळे रामायण मुळी आदर्शांनीच भरलेले आहे. आदर्श भाऊ, आदर्श सेवक, आदर्श प्रजाजन आणि आदर्श खलपुरुषसुद्धा. महाभारतात असामान्य व्यक्तीचे चित्रण नाही असे नाही. असामान्य व्यक्तीचे चित्रण असूनसुद्धा त्या व्यक्तीच्या सामान्यत्वाचा कधी विसर पडत नाही. रामायण ही केवळ दोन, नव्हे, एकाच व्यक्तीची कथा मुख्यत्वेकरून आहे. बाकीच्या ज्या काही व्यक्ती आलेल्या आहेत, त्या ह्या व्यक्तीला पार्श्वभूमी म्हणून, उठाव मिळावा म्हणून. रामाशेजारी दुसरी व्यक्ती सीता. सीतेला माहेर होते, सासर होते. तिचे माहेर नावापुरतेच माहेर. सासरच्या व्यक्तींशी संबंध थोडे जास्त दाखविले आहेत, पण त्यांतही सासरच्या व्यक्तींना पुरेसा उठाव मिळालेला नाही. सीता वनवासाला गेली; सीतेला गर्भारपणात रामाने टाकून दिली; सीतेला पृथ्वीने गिळली; हे सर्व सीतेला होत असता तिच्या माहेरची नाववार्तासुद्धा ऐकू येत नाही. जणू काही सीता म्हणजे अनाथाश्रमातून आणलेली मुलगी.