पान:Yugant.pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६४ / युगान्त

पश्चात्ताप पावून त्याला त्याने परत बोलावले, त्याची क्षमा मागितली, त्याला धाकटा भाऊ म्हणून मांडीवर बसवले, असे एक हृदयंगम वर्णन महाभारतात आहे. भाऊ तर खराच, पण अन्नवस्त्रांखेरीज कोठच्याही तऱ्हेचा हक्क नसलेला तो भाऊ होता. भीष्म कुलज्येष्ठ, पण पांडव-कौरवांच्या बाबतीत त्याची वृत्ती समान होती. भांडण होऊ नये म्हणून त्यानेही प्रयत्न केले, पण विदुराच्या मनाचा ओढा पांडवांकडे होता. पांडव अतिशय मोठे लढवय्ये, त्यांच्या हातून कौरवांचा नाश होईल, असे भीष्म वारंवार म्हणे. ही गोष्ट विदुरही जाणून होता. पण विदुराच्या बोलण्यात न्यायाची भाषा जास्ती येते. पांडवांच्या पोरकेपणाची कीवही त्यात आहे. असे का? स्वतः असहाय म्हणून हस्तिनापुराला आलेल्या पोरक्या पोरांच्याबद्दल त्याला कणव वाटत असे, असे तर नाही ना? आपल्याला राज्याचा अधिकारच नाही; पण ज्यांना तो आहे त्यांचा तरी जाऊ नये, अशी बुद्धी त्यामागे होती का?
 विदुर या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानी' असा आहे; आणि संबंध महाभारतात विदुराचा ज्ञानीपणा जो दिसतो, तो पारमार्थिक आहे. ह्या जगात समभावाने आणि न्यायाने वर्तन असावे; लोभ धरू नये व आत्म्याचे चिरंतनत्व ओळखावे, असा त्याचा आग्रह होता. ज्याच्यापुढे हे ज्ञान त्याने ओतले, तो धृतराष्ट्र दृष्टीने आंधळा होता. स्वतः राज्याचा अधिकारी असूनही ते न मिळाल्यामुळे तो दुखावला होता व आपल्याला मिळाले नाही ते मुलांना तरी मिळावे ह्या ईर्ष्येने सद्सद्विवेक नाहीसा झालेला असा होता. पहिल्या पहिल्यांदा म्हणजे पांडव लहान असताना विदुराचे म्हणणे त्याने मनावरच घेतले नाही; आणि मागाहून ऐकले तेव्हा 'मी काय करणार? मुले आता माझ्या हातात राहिली नाहीत' असे म्हणून तो उपदेश डावलला. विदुराजवळ शहाणपण होते, पण सत्ता नव्हती. द्रौपदी-स्वयंवरानंतर त्याने एकदाच धृतराष्ट्राला हिणवले; त्यानंतर सर्व युद्ध झाल्यावर तो म्हणाला, "आता रडून काय उपयोग?