पान:Yugant.pdf/68

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४८ / युगान्त

उचलून धरणारा पक्ष निर्माण झाला आहे. आपल्या बाजूचे कोणीच नाहीत. तो धनाढ्य आहे, आपण निद्रव्य. तो आपल्याला खात्रीने मारू शकेल. गुपचूप रहा. रोज मृगयेच्या निमित्ताने निसटून जायच्या वाटा माहीत करून घेऊ या. नक्षत्रांचा अभ्यास करून दिशा समजून घेऊ या व आता सुटकेसाठी बीळ खोदू या." पांडवांची दीन पराधीन स्थिती व कौरवांचा व धृतराष्ट्राचा दुष्टपणा येथे प्रत्ययास येतो.
 कुंती मुलांबरोबर राहिली. सावधपणे त्यांच्या कृतींना, मसलतींना सर्वस्वी हातभार लावीत राहिली. ज्या रात्री घर जाळले, त्या रात्री अंधारात झपाट्याने अंतर तोडताना बिचारीची त्रेधा झाली. नगर सोडून रानात पोहोचल्यावर वृक्षांच्या निबिडतेमुळे वर नक्षत्रेही पाहता येईनात. खाली झुडुपांमुळे चालताही येईना. तेव्हा भीमाने तिला खांद्यावर घेतले. शेवटी जवळपास जलचर पक्ष्यांचा आवाज ऐकून सर्वांना एका झाडाखाली बसून भीम पाणी आणायला गेला. तो परत येतो, तो ग्लानीमुळे सर्वांना झोप आली होती. भीम कुंतीबद्दल म्हणाला, “काय आश्चर्य आहे ! मऊ बिछान्यावर पडून झोप न येणारी ही आज जमिनीवर गाढ झोपली आहे !" पण जमिनीवर झोपणे हे कुंतीचे दुःख नव्हतेच मुळी! स्वतःच्या स्थानाबद्दल, हक्काबद्दल अत्यंत जागरूक; क्षत्रियत्वाचा अती अभिमान असलेली अशी ती बाई होती. जीवन ही तिच्या मते लढाई होती. लढाईच्या वेळी ती विचलित होत नसे.
 पुढील प्रवासात हेच दिसून येते. हिडिंबेबरोबर भीमाने राहण्यास तिने मनःपूर्वक संमती दिली, व खडतर वनप्रवासात मैत्रीण जोडली. याच हिडिंबेचा मुलगा पुढे युद्धाच्या वेळी अति आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडला. बकासुराचा वध करावयास तिने भीमाला गळ घातली. द्रौपदी पाचांची बायको करण्याचा निश्चयही तिचाच. पाचांचा न फुटणारा एकसंधपणा तिने साधला लग्नाआधी ते एका आईचे लौकिकाने होते, पण माद्रेयांना