पान:Yugant.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ३५

एकदा निरपेक्ष दृष्टीने पहायला शीक. आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. मरताना तरी डोळे बांधून मरू नकोस."

 धृतराष्ट्राला पुढे बोलवेना. इतरही बुडून गेली होती. बराच वेळ गेल्यावर गांधारी हळूच म्हणाली, "महाराज, मी डोळे सोडले आहेत, पण अजून मला नीट दिसत नाही. आयुष्यात पहिल्यांदा मोठ्या आवेगाने धृतराष्ट्राने गांधारीचे हात धरले आणि तो लहान मुलासारखा रडला. कुरूंच्या कुटुंबातील सुख-दुःखाचे भोक्ते गांधारी व धृतराष्ट्र होते. कुंती आणि विदुर हे साक्षी होते. पण आज साक्षींच्याही डोळ्यांना पाणी आले. पहिला उमाळा ओसरल्यावर धृतराष्ट्र कोमल आवाजात म्हणाला, "गांधारी, एकदोन दिवसांत कुंतीच्या मदतीने तू पहायला शिकशील. ज्या दिवशी तुला नीट दिसायला लागेल, त्या दिवशी हात धरून मला इथे आणून बसव." कोणालाच पुढे बोलवेना. पर्णकुटीत परत गेल्यावरही जो-तो आपल्या विचारांत मग्न होता.

 दोन दिवस झाले होते. गांधारीला डोळ्यांनी पाहून कृत्ये करायची सवय झाली होती. नेहमीच्या बसायच्या जागी राजाचा हात धरून त्याला घेऊन ती आली होती. परत सगळीजणे जवळजवळ बसली होती, जणू मधले दिवस गेलेच नाहीत, अशा तऱ्हेने मागील संभाषण चालू झाले. धृतराष्ट्राने खाली बसतानाही गांधारीचा हात आपल्या हातातच ठेवला होता. तो पुढे बोलू लागला, "गांधारी, तू माझ्यापेक्षा लहान आहेस. मी गेल्यावरही तुला आता स्वतंत्रपणे राहता येईल." डोळस बनलेल्या गांधारीने हे शब्द ऐकताच धृतराष्ट्राच्या तोंडावर हात ठेवला, "नाही महाराज, ते कदापि होणार नाही. मी जो हात धरला आहे तो सोडण्यासाठी नव्हे. मी जे डोळे उघडले आहेत, ते केवळ माझ्यासाठी नाहीत, आपल्या दोघांसाठी आहेत." धृतराष्ट्राला परत बोलवले नाही. बराच वेळ गेल्यावर मन शांत करून तो परत म्हणाला, "गांधारी, तुम्हां डोळसांना जे दिसत नाही, त्याचा मला वास येतो; ते मला ऐकू