पान:Yugant.pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / ३३

रुद्ध पण उत्तेजित स्वराने म्हणाला, “खरोखर, फार मोठी शिक्षा दिलीस गांधारी. डोळ्यांना फडके बांधून लग्नाला उभी राहिलीस, त्या वेळी नाही मला इतके वाटले. मला वाटले, मी तुझी विनवणी करीन, माझ्या प्रेमाने तुझा राग विझवीन; पण तसे झाले नाही. रात्रीची शय्यागारात आलीस तीही डोळे बांधून, धडपडत, कोणाचा तरी हात धरून आलीस. मी जन्मांध. मला आंधळेपणाने वागायची सवय होती. पण तू जाणून-बुजून डोळे बांधले होतेस. तुझ्या शरीराला आंधळेपणाने वावरायची सवय नव्हती. कसली ती भयानक रात्र! त्याच वेळी मी तुला मारून कसे टाकले नाही, कोण जाणे !” गांधारीही कडवटपणे उत्तरली, “फार बरे झाले असते तसे होते तर. आयुष्यातील पुढचा ग्रंथ तरी टळला असता” “असे बोलू नकोस गांधारी," धृतराष्ट्र आवेगाने म्हणाला. “आम्ही कुरुकुलातले पुरुष कितीही नादान झालो, तरी क्षत्रियत्व विसरलो नाही. बायकांना मारण्याचे आमचे पौरुष नाही" असे म्हणून पहिलेच वाक्य जणू अडथळा न आल्यासारखे त्याने चालू केले, “मी माझ्या राजधानीत राजा होतो. तुझ्या डोळ्यांवरचे फडके फाडून काढता आले असते. मला वाटले, अधिकाराच्या बळावर करण्यापेक्षा सावकाशीने करीन. पण तुझ्या मनातली पहिल्या दिवशीची अढी कायमच राहिली. तुला मूल झाले, त्या वेळी मनात आले होते की, ‘गांधारी, माझ्यासाठी नाही, पण तुझ्या मुलाचे तोंड पाहण्यासाठी तरी डोळे उघड ग’ पण माझेही मन त्या वेळेपर्यंत कठीण झाले होते. मुलासाठी तू कदाचित डोळे उघडलेही असतेस; पण ते तुला करू देण्याची माझी तयारी नव्हती. तुला पुत्रमुख पहायला मिळत नाही, ह्याबद्दल मला एकप्रकारे सूडाचा आनंदच झाला. डोळे बांधून घेऊन सतीच्या थाटात तू वावरत होतीस. एकदा केलेल्या कृत्याच्या परिणामात तू जखडली गेली होतीस. तुला स्वतःला डोळे उघडणे शक्य नव्हते. फक्त माझ्या आज्ञेनेच ते तुला करता आले असते. आणि मी ती आज्ञा केली नाही.