पान:Yugant.pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६ / युगान्त

वास्तपुस्त अधून-मधून घेत होता. गांधाराचे विचार हळूहळू मागे पडून राजकन्येचे मन न पाहिलेले हस्तिनापूर रंगवीत होते. हस्तिनापुराची मंडळी राजकन्येला मागणी घालायला आली, त्या वेळी त्यांनी आणलेल्या आहेराने सर्वांचे डोळे दिपून गेले होते. त्यांचे रथ, त्यांची अंगावरील वस्त्रप्रावरणे सर्वच मौल्यवान हात वागणे-बोलणेही गोड व नागर होते. आत्तासद्धा बरोबरच्या मंडळीत गांधारापेक्षा हस्तिनापूरचाच परिवार मोठा होता. प्रवास इतका लांबचा व इतका झपाट्याने चालला होता, की शेवटी शेवटी तर श्रमांमुळे राजकन्येचे मनही शरीराबरोबर थकले होते. कधी एकदाचा प्रवास संपेल, असे तिला झाले होते.
 एकदाचा प्रवास संपला! हस्तिनापुरातून गांधाराच्या राजकन्येला भीष्म सामोरा आला होता. राजधानीतून जाताना लोक दुतर्फा उभे राहून सत्कार करीत होते. पण या सभारंभाकडे लक्ष देण्याइतकी शक्ती राजकन्येस राहिली नव्हती. तिला नेमून दिलेल्या मंदिरात ती येऊन दाखल झाली. दोन दिवस ती म्लानपण पडूनच होती. पण तिची सखी राजकुलात फिरून येई व कुरूच्या वैभवाची नित्य-नवी वर्णने ऐकवी. गांधार-राजपुत्र शकुनी हा हस्तिनापुरातच कायम राहण्याचे ठरले आहे, ही बातमी ऐकून गांधारी चकित झाली. पण थोरला भाऊ राज्यावर बसणार असल्यामुळे धाकट्या भावाने दुसऱ्या राज्यात राहून कीर्ती व लक्ष्मी मिळवल्याची त्या काळातली पुष्कळ उदाहरणे तिला माहीत होती. इतक्या लांब आली तरी माहेर सर्वस्वी तुटले नाही; भाऊ तरी बरोबर आहे, असे वाटून तिला जरा बरे वाटले. दासीने येऊन शकुनीच्या नव्या राजवाड्याचे वर्णन केले, तेव्हा तर तिला आपल्या सासरच्या संपत्तीचा अभिमान वाटला. आज ती संध्याकाळी मंदिराच्या एका सौधावर उभी राहून, खाली दिसणारी गजबजलेली राजधानी व त्याच्या पलीकडची यमुनाकाठची विस्तीर्ण अरण्ये बघत होता. गांधारामध्ये एवढा मोठा सपाट प्रदेश तिला दिसलाच नव्हता.