पान:Yugant.pdf/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ / युगान्त

लग्न करून न घेता दोन पिढ्यांच्या लग्नाच्या खटपटी त्याला कराव्या लागल्या. सत्यवतीला रथातून आणून तिचे बापाशी लग्न लावले, ही जशी काय त्याच्या पुढच्या आयुष्याची नांदीच झाली. विचित्रवीर्य, धृतराष्ट्र, पांडू व विदुर ह्यांची लग्ने भीष्माच्या पुढाकारानेच झाली. स्वतःचे मूल नसलेल्या ब्रह्मचाऱ्याचे सबंध आयुष्य दुसऱ्याची मुले संभाळण्यात गेले. ह्या गुंत्यात तो जो पडला, तो शेवटपर्यंत. त्यातून त्याला सुटताच आले नाही.
 सत्यवतीच्या थोरल्या मुलाला राज्यावर बसवले. पण तो एका भांडणात मारला गेला. दुसरा मुलगा विचित्रवीर्य लहान असतानाच गादीवर बसला. त्याचे लौकर लग्न झालेले बरे, असे वाटून भीष्माने त्यासाठी काशिराजाच्या तीन मुली स्वयंवर मंडपातून पळवून आणल्या. थोरली अंबा म्हणाली, "मी शाल्वला मनाने वरले आहे." त्याने तिला शाल्वाकडे पाठविले व तिच्या बहिणी अंबिका व अंबालिका ह्यांचे विचित्रवीर्याशी लग्न लावले. काशीहून मुली हस्तिनापुराला आणल्या, तो प्रवास काही दिवस चालला असणार. हस्तिनापुराला आणल्यावर. ‘मी मनाने दुसर्याची आहे’ हे सांगेपर्यंत काही दिवस गेले असणार व शाल्वाकडे जाण्यास आणखी काही दिवस लोटले. म्हणजे स्वयंवर मंडपातून शाल्वाकडे जाईपर्यंत काही आठवडे मध्ये गेले असणार. ‘इतके दिवस परक्याकडे राहिलेल्या मुलीचा मी स्वीकार करणार नाही,’ असे शाल्वाने सांगितल्यावर अंबा भीष्माकडे आली व म्हणू लागली, “ज्या अर्थी तू मला स्वयंवर मंडपातून जबरदस्तीने आणले आहेस, त्या अर्थी तू आता माझ्याशी लग्न केले पाहिजेस" ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे भीष्माने तिला नाकारली व अपमानित झालेल्या, धिक्कारलेल्या, कुठेही आसरा नाही अशा परिस्थितीत असलेल्या अंबेने स्वतःला जाळून घेतले.