पान:Yugant.pdf/251

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३४ / युगान्त

त्याचप्रमाणे बाण कोणाकोणाचे, तलवारी व म्याने कोणाकोणाची, ह्याचे वर्णन आहे. एकाही आयुधावर नाव मात्र नाही. तसेच, राजाचे गोधन मुद्रांकित असे. पण मुद्रेवर नाव असे, असे दिसत नाही. ही गोष्ट क्षत्रियांची. क्षत्रियांना लिहिणे-वाचणे आले नाही, तरी अगदी परवा-परवापर्यंत चालतच असे. पण इतरांच्याही बाबतीत लेखाचे नाव नाही. कृषी व गोरक्षण लेखनाशिवाय चालू शकते. आर्यांच्या आधी भारतात वसलेल्या सिंधुकाठच्या लोकांना लिपी होती, लिहिणे होते. आर्यांची लिपी पहिल्याने ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात सापडते. त्याआधी दोन शतके लेखन आले असल्यास बुद्धाच्या वेळी लेखन होतेसे दिसते. बुद्धयुगाला वणिग्युग म्हटले, तर ते अपेक्षितच आहे. कारण द्रव्याच्या उलाढाली लेखनाशिवाय होऊ शकत नाहीत. महाभारतात लेखनाचा व लेखनसाहित्याचा, शाई, पत्र व लेखणी यांतल्या कशाचाच उल्लेख नाही. लेखन असेल, पण असलेच, तर अपवादात्मक असावे. कदाचित सभा बांधणाऱ्या मयाला ती विद्या अवगत असली, तर कोण जाणे !
 रुक्मिणीची कथा ही महाभारताचा भाग नसली, तरी त्या कालातीलच ! कृष्ण कितीही श्रेष्ठ असला, तरी तोही त्या काळातील क्षत्रियच होता. तेव्हा रुक्मिणीने स्वयंवरापूर्वी प्रेमपत्रिका लिहिणे व कृष्णाला ती वाचता येणे दोन्ही गोष्टी असंभाव्य.
 जसे लेखन नव्हते, तशी विटांची वा दगडांची घरेही नव्हती. आर्य बहुधा लाकडी घरे बांधीत. पहिली बौद्ध लेणी ही लाकडी बांधणीच्या अनुकरणाची आहेत, असे जाणकारांचे मत आहे. यज्ञांत निरनिराळ्या चिती सांगितल्या आहेत. त्यांसाठी इष्टका म्हणजे वीट लागत असे. वीट करणे एकदा माहीत झाले, म्हणजे विटा घरांसाठी वापरणे शक्य आहे. पण तसा उल्लेख नाही. गरीब लोक आज बांधतात, तशी मातीची घरे बांधीत असतील.