पान:Yugant.pdf/250

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २३३
 

फासायलाही वापरतात. घोडा अश्वमेधात बळी देत. अजा क्षुद्र यागात उपयोगी पडत असेल. इतरही जनावरे मेध्य होती. मेध्य जनावरे खाद्यही होती. गो ही मेध्य व खाद्य दोन्ही होती का?
 महाभारतकालीन लोकांचे मुख्य धान्य काय होते, ते पुस्तकावरून कळत नाही. बहुधा जव असावे. क्षत्रिय भरपूर दारू पीत असत. धान्य जसे खाद्य होते, तसे देवाला पुरोडाशाच्या रूपाने अर्पण करावयाचे द्रव्यही असे. यागप्रधान धर्मात पत्र, पुष्प व फल ह्या तिहींनाही स्थान नव्हते. तशा तऱ्हेची पूजा महाभारतात नाही. गीतेत जरी ह्या तिन्हींचा ('पत्रं पुष्पं फलं तोयं यो मां भक्त्या' इत्यादी) उल्लेख असला, तरी तो नंतरचा समजला पाहिजे. महाभारतकाली जे आपले व आपल्या देवांचे खाद्य होते, ते मागाहून राहिले नाही. माणसे व देव दोन्ही बदलली.
 ज्याचा निर्णय करता येत नाही, अशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे : ती म्हणजे लिपी व लेखन. महाभारतकाली लोकांना लिहिता येत होते का? महाभारतात लेखनाचा उल्लेख नाही. लिपी असती, तर उल्लेख आलाच असता, अशी ठिकाणे असूनही उल्लेख येत नाही. म्हणून लिहिणे माहीत नसावेसे वाटते. सगळी तोंडी निरोपानिरोपी. दूत पाठवायचे, तेही लिहिलेली चिठ्ठी न देता तोंडी निरोप देऊन. विदुराने वारणावतला धर्माकडे आपला जो एक विश्वासू 'खनक' (=खणणारा) पाठवला, तो तोंडी निरोप देऊन. निरोप फार गुप्त स्वरूपाचा म्हणून तोंडी दिला असे म्हटले, तरी इतर प्रकरणे मुळीच गुप्त नव्हती. प्रत्येक सांगावा चार माणसे जमवून बोलण्याचा होता. विराटपर्वात शमीवृक्षाखाली उभे राहून अर्जुन उत्तराला कोणची शस्त्रे कोणाची, हे जेव्हा सांगतो, त्यावेळी एकातरी शस्त्रावर नाव असावे, अशी अपेक्षा असते. पण नाव नसून खुणा मात्र होत्या. सोन्याचे ठिपके (जातरूपस्य बिन्दवः) असलेले धनुष्य गांडीव, ज्याच्यावर सोन्याचे हत्ती ते भीमाचे, ज्याच्यावर इन्द्रगोप ते धर्माचे, ज्याच्यावर सोन्याचे सूर्य ते नकुलाचे