पान:Yugant.pdf/245

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२८ / युगान्त

ते युग स्वप्नाळू माणसांचे; आयुष्याला भ्यालेल्या माणसांचे. जे प्रत्यक्षात दिसत नाही, मिळत नाही, ते वाङ्मयद्वारा मिळवण्याची खटपट करणाऱ्यांचे. थोडे बौद्ध वाङ्मय, शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्रभाष्य व काही थोड्या कथा वगैरेंसारखे ग्रंथ सोडल्यास जवळजवळ सर्वच वाङ्मय ह्या धर्तीवरचे झाले.
 हे सर्व वाङ्मय टाकाऊ समजण्यास मी तयार नाही. त्यातील काही अतिहृद्य आहे, पण त्यात महाभारताची धार नाही. चिरकाल विचार करावयाला लावील असे काही नाही.
 उत्तरकालीन भक्तिकथा तर ह्याहीवर ताण करणाऱ्या आहेत. अजामिळाची कथा, चांगुणेची कथा, त्यांपैकीच. अजामिळाच्या कथेत सामाजिक मूल्यांचा पायाच मुळी उखडून टाकलेला आहे. चांगुणेच्या कथेतील भक्तीपायी केलेला त्यागही खोटा व त्यागाच्या सवाईने मिळालेले फळही खोटे!*
 भक्तीचा अतिरेक फक्त ईश्वरभक्तीतच नाही, तर गुरुभक्तीतही (व्यक्तिपूजेतही) दिसतो. 'यानि अस्माकं सुचरितानि तानि ग्रहीतव्यानि, नो इतराणि', हा महाभारतपूर्व किंवा महाभारतकालीन उपदेश व ज्ञानेश्वरांपासून तुकाराम-रामदासांपर्यंत वर्णिलेली गुरुपूजा ह्यांच्या मनोभूमिकेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. महाभारतासारख्या ग्रंथाने सुरुवात होऊन सर्वच वाङ्मय इतके मऊ-मऊ का झाले ? 'धियो यो न: प्रचोदयात्' अशी प्रार्थना करणारे स्वतःची बुद्धी सर्वस्वी दुसऱ्याच्या हवाली कसे करू लागले हे आपल्या समाजे-तिहासातील एक मोठे कोडेच आहे.


 
  • ह्या दृष्टीने पाहता 'द्रौपदी' मधील मी रचलेला शेवटचा भाग ही 'नरोटी' आहे. जे भीमाला कळले नाही, जे देण्याची शक्यता द्रौपदीला नव्हती, ते जणू दिलेच, असा भास मी निर्माण केला आहे. हे महाभारताच्या परंपरेला सोडून आहे.

एवढे कळते आहे, तर शेवटचा भाग लिहिलाच का? मीही माझ्याच युगातली आहे. डोळे व मन दुबळे असलेली आहे. महाभारताच्या प्रकाशाचा झोत मला सहन झाला नाही.