पान:Yugant.pdf/236

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त/२१९ (साक्षी)
 

तसे राहणे शक्यच नाही, ‘अर्जुना, किती नाही म्हटलेस, तरी तुला युद्ध केल्याशिवाय रहायचे नाही. (प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति।) मग अशा बलात्काराने, अनिच्छेने करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून, परिणाम लक्षात घेऊन युद्ध कर, आत्मविस्मृती होऊ न देता कर,' असे ते सांगणे आहे.
 भारतीय युद्धाच्या काळात भक्तिमार्ग प्रसृत झाला नव्हता. अर्जुन हा कृष्णाचा ‘भक्त' म्हणजे प्रियसखा होता. कृष्णाने कितीही जीव तोडून सांगितले, तरी ज्या दोघांना मारायचे नाही, असे अर्जुन म्हणाला, त्यांना त्याने मारले नाही. ‘कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि' असे तो म्हणाला. भीष्माला,- शिखंडीच्या शरांनी जर्जर झालेल्या भीष्माला मोठ्या नाईलाजाने त्याने खाली पाडले. भीष्म भूमीवर पडला, पडलेलाच राहिला. लढाईला वाट मोकळी झाली. द्रोणाला अर्जुनाने मारलेच नाही. पण त्या दोघांचे व इतरांचेही मरण त्याने पाहिले. आपला दुसरा प्राणच अशा कृष्णाचेही मरण पाहिले. जगातील सुखाचा व दुःखाचा, मानाचा व मानहानीचा पेला तो पुरेपूर भरलेल्या मापाने प्याला व आपल्या पायांनी चालत जाता येईल तितके जाऊन पडेल तेथे मरायचे, असे मरण त्याने पत्करले. अर्जुनच नव्हे तर इतरही सर्व... कुंती, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी असेच जगले व असेच मेले. धडपड करायची ती त्यांनी केली, प्रसंगी त्याग केला, पण काहीतरी लोकोत्तर मिळणार ह्या हावेने नाही. हा जो आयुष्याचा मार्ग त्याला साजेसाच कठोर धारदार असा महाभारताचा कथावृत्तान्तही आहे.
 ह्यापुढच्या काळातल्या मूल्यांच्या कल्पना, देवादिकांच्या कल्पना व वाङ्मय ह्यांचे सबंध वळणच निराळे आहे. एका दृष्टीने भावविश्व रुंदावले. सबंध मानवजातीबद्दल कणव उत्पन्न झाली. एका दृष्टीने विचारात शिथिलता आली. इतरांबद्दल करुणा वाटते, तिचा उगम स्वतःबद्दल वाटणाऱ्या करुणेमध्ये आहे.