पान:Yugant.pdf/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त/२०५
 

अर्थाने व्यक्तिगतच राहिला.
 पुढचा प्रश्न : जाती होत्या का? वर्ण होते, पण जाती नव्हत्या, असे म्हणण्याकडे बऱ्याच जणांचा कल आहे. जातींची नावे फारशी वाचण्यात येत नाहीत. पण ज्यांना जाती म्हणता येईल, असे समूह होते, सूतांचे स्थान 'विश्’ व शूद्र ह्यांच्या वरचे होते की काय, अशी शंका शल्याच्या पुढील वाक्यावरून येते. कर्णाचा सारथी होण्याची विनंती दुर्योधनाने केली, तेव्हा रागावून शल्य म्हणाला, “शूद्र ब्रह्मक्षत्रविश ह्यांचे परिचारक ठरलेले आहेत. सूत ब्रह्मक्षत्रांचे परिचारक आहेत. विश व शूद्र ह्यांचे नाहीत. मूर्धाभिषेक झालेला मी कर्णाची नोकरी करावी, असे कसे होईल?"
 ब्रह्मक्षत्रविशां शूद्रा विहिताः परिचारकाः। ८.२३-३५.
 ब्रह्मक्षत्रस्य विहिताः सूता वैपरिचारकाः।
 न विशूद्रस्य.....   ८.२३.३८.

 ज्यांची लग्ने आपसातच बहुतांशी होतात, अशा माणसांचा मिळून झालेला समाज म्हणजे जात. जातीचा एक गुण असा असतो की, तीतील एखादा मनुष्य अमक्या वर्णाचा अशी सार्वत्रिक कबुली मिळाली, म्हणजे इतर जातभाई त्या वर्णाचे होऊ शकतात. कर्णाची धडपड वैयक्तिक होती. तो सर्व सूतांना क्षत्रियत्वाचे दार मोकळे करू इच्छित नव्हता. जन्माने क्षत्रिय आहोत, हे सिद्ध करण्याची त्याची धडपड होती. मेल्यावर क्षत्रियांच्या विधीने अग्निसंकार झाल्यामुळे क्षत्रियत्व त्याला एकट्याला मिळाले; त्याच्या मुलाला मिळाले नाही. कारण तो सूत स्त्रीपासून जन्माला आला होता. ही एकच गोष्ट जात ह्या सामाजिक समुहाचे अस्तित्व दाखवण्यास पुरेशी आहे. भारतातील जातिसंस्थेचा एक विशेष असा आहे की, वरच्या जातींतील लोकांना खालच्या जातींतील स्त्रियांशी प्रसंगी लग्नही करता येत असे, पण त्यामुळे त्या स्त्रियांच्या माहेरच्या मंडळींची जात बदलत नसे. उदा. सुदेष्णा व कालीसत्यवती. जाती