पान:Yugant.pdf/220

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युगान्त /२०३

क्षत्रियांचे गोधन संभाळणाऱ्यांंत खूपसे चाकर व गोपाध्यक्ष म्हणजे राजपुरुष असत असे दिसते. ह्या वेळचे सामाजिक चित्र राजन्य, ब्राह्मण व सर्वसाधारण प्रजा म्हणजे 'विश्' व दास असे होते. ह्या काळानंतर वणिज धनवान व बलशाली झाले व त्यांनीच फक्त वैश्य वर्ण (तिसरा वर्ण) व्यापला; शेतकरी व गोपाल चौथ्या वर्गात गेले. ह्याचा अर्थ असाही करता येईल की, वैश्य-वर्गात असलेल्या धनवान लोकांच्या मालकीची जी जमीन होती, ती ते स्वतः (जुन्या 'विश्’- प्रमाणे) न करता गरीब शेतकऱ्यांंना किंवा भूमिहीन मजुरांना कसायला देत. भूमिहीन कामकरी स्थायिक नसून ते ह्या गावाहून त्या गावाला जाणारे लोक होते. ह्याशिवाय ह्या कामकरी वर्गात स्वतःचे असे दास होतेच. म्हणजे पुढील काळात वैश्य व शूद्र या वर्णाची व्यवस्था बदलली. वैश्य वा 'विश्' म्हणजे 'सर्वसाधारण प्रजा' न राहता 'वैश्य' नावाचा विशिष्ट कार्य करणारा वर्ण बनला; आणि मग सर्व तऱ्हेचे कारागीर, शेतकरी, गोपाल, परिचर्या करणारे व दास मिळून शुद्र वर्ण बनला काय? त्याचप्रमाणे सैन्यातही दोन प्रकार दिसतात. एक क्षत्रिय वर्ग व त्यांच्या जवळचे क्षत्रियांचेच आप्त व दुसरे पगारी(?) सैनिक. कृष्णाजवळ 'नारायणीय' नावाचे असे सैनिक होते. 'संशप्तक' हे अशाच तऱ्हेचे युद्धजीवी लोक होतेसे दिसते. ह्या लोकांचा दर्जा काय होता; तेही शूद्रच होते का? बाकीच्यांना (क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य-कृषक इत्यादीना) लढाईत वाटल्यास जाता येई, वाटल्यास अलिप्त राहता येई. पण हे लोक सैन्यात भरती झालेले व सैनिक म्हणून पोसलेले होते. त्यांना धनी सांगेल, त्याप्रमाणे लढाई करणे प्राप्त होते. म्हणजे ते 'क्रीतदास' होते. कृष्ण पांडवांच्या बाजूचा होता, पण 'नारायणीय' नावाचे योद्धे दुर्योधनाच्या बाजूने लढत होतेसे दिसते. वर्णसंस्थेत ह्या लोकांना स्थान काय होते, ते कळत नाही. भारतीय युद्धात भाग घेणारा समाज प्रामुख्याने त्रैवर्णिक होता. म्हणजे राजा, धार्मिक विधी करणारे ब्राह्मण व वैश्य ही मुख्य प्रजा, अशी