पान:Yugant.pdf/217

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००/ युगान्त


 पूर्वी नसलेल्या, पुढे जास्त प्रमाणात आढळणाऱ्या समजुती, रीतीभाती ह्यांची सुरवात (म्हणजे- पुढच्या युगाची चाहूल) येथे जाणवते, म्हणूनही मी ह्या कालविभागाला ‘युग’ म्हणते. एका दृष्टीने एखाद्या युगाचा शेवटचा भाग त्या युगाचा प्रातिनिधिक नसून ती खरोखरीने संध्या- एका युगाची रात्र व दुसऱ्या युगाची पहाट असते. महाभारत अशाच तऱ्हेचे आहे. पण त्याच्या स्वरूपामुळे त्याला एक असामान्य वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. महाभारत म्हणजे त्या कालातले एका विशिष्ट वर्गातील लोक कसे राहत असत, ह्याची जंत्रीवजा माहिती नसून एक विशिष्ट कुटुंब घेऊन त्याच्या अनुषंगाने त्या काळाचे जीवन व विचार ह्यांचे खोल व व्यापक चित्रण ज्यात आहे, अशी एक दीर्घ कथा आहे. सर्व कथा छंदात सांगितलेली आहे आणि बऱ्याच प्रसंगी त्या छंदाला व त्यामुळे एकंदर कथेला खऱ्याखुऱ्या काव्याचे अविस्मरणीय रूप आले आहे.
 जुन्या पुराणकालीन समजुतीप्रमाणे पांडवांच्या राज्याची शेवटची वर्षे ही कलियुगाची सुरुवात आहे. द्वापरयुगाचा अंत आहे.पण भारतीय योद्धयांना तसे वाटत नव्हते, असे वाटते.* युग संपले, ही जाणीव युग संपून बराच काळ लोटल्यावर आलेल्या पिढीची... त्याचप्रमाणे पूर्वीचे क्षत्रिय-खरे(?) क्षत्रिय- महाभारत युद्धात नष्ट पावले, असा पुराणांचा दावा आहे. हीही समजूत मागाहूनची आलेली दिसते. युद्ध संपल्यावर निरनिराळ्या राजांचे वंश आपापल्या गादीवर बसले. खुद्द हस्तिनापूरला पांडवांचा नातू परीक्षित बसला, इन्द्रप्रस्थाला कृष्णाचा पणतू वज्र हा राजा झाला.इतर मुख्य यादवांचे वंशज दुसऱ्या राज्यांवर बसले, विदर्भाचा रुक्मी आपल्या राज्यावर होता, वगैरे वृत्तान्त लक्षात घेतला, म्हणजे क्षत्रियवर्ग नष्ट झाला, हा उत्तरकालीन दावा पटत नाही.पण जुन्या क्षत्रियवर्गाची रचना व घडी विस्कटली, ही गोष्ट मात्र ऐतिहासिकदृष्ट्या पटण्यासारखी आहे.


* ते त्यांना दाखवून दिले, हा भाग प्रक्षिप्त, मागाहून घुसडलेला वाटतो.