पान:Yugant.pdf/216

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त /१९९
 
दहा
युगान्त


 अमक्या एका क्षणाला, दिवसाला वा वर्षाला एक युग संपले व दुसरे जन्मले, असे काही सांगता येत नाही. एक युग संपले, म्हणजे त्या युगात जे काय म्हणून होते, ते सर्व संपून नव्या युगाबरोबर नवी माणसे, समाजाची नवी घडी येते, असेही नाही. सोयीप्रमाणे कालप्रवाह अखंड चाललेला आहे. आपल्या,अभ्यासाचा,दृष्टिकोण असेल त्याप्रमाणे तुकडे पाडायचे व त्यांना दशके,सहस्त्रके, वा युगे अशी नावे द्यायची. महाभारताबरोबर एक युग संपले, ही कल्पना फार जुनी आहे. तीच मी उचलून धरलेली आहे.दुसऱ्या कोणालाही तितक्याच अधिकाराने ही कल्पना नाकारून दुसऱ्या तऱ्हेने कालाचे विभाग पाडता येतील. युग म्हणजे काय व त्याचा अंत झाला असे आपण का म्हणतो, हा दृष्टिकोण स्पष्ट केला म्हणजे झाले. काही गोष्टी महाभारताबरोबर नष्ट झाल्या,तर काही महाभारतापासून पुढे कित्येक शतके अगदी आजपर्यंत आपल्यांत चालू आहेत, असे दाखवता येईल. एका कालविभागाला 'युग’ म्हटले, ते केवळ काही गोष्टी त्यात होत्या, पुढे नव्हत्या, एवढ्याचसाठी नव्हे.