पान:Yugant.pdf/215

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८ / युगान्त


 त्याने प्रेम केले, सूड उगवला, तो आनंदाने नाचला, पांडवांनी राज्य घालविले तेव्हा दुःखाने हळहळला; पण हे सर्व करूनही तो गुंतला नाही. महाभारतात राधेचा कृष्ण नाही, कुंजवनात गोपाळांमध्ये वेणू बाजविणारा कृष्ण नाही, द्रौपदीच्या धाव्याला धावणारा कृष्ण नाही, रक्मिणीवल्लभ कृष्ण नाही. तो स्वतः सांगतो की, आपण अर्जुनावर प्रेम केले, पण वेळोवेळी कृतीने ते प्रेम व्यक्त होऊनही हृदयाचा ठाव घेण्यासारखे त्यात काही नाही. ‘सह नौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै’ अशा तऱ्हेचा तो संबंध होता; पण त्यातही तो कुठे गुंतून पडला नाही. सर्व मानवी कष्ट, मानवी सुखे, मानवी विकार त्याच्या चरित्रात होते, तरीही ह्या विलक्षण अलिप्ततेमुळे त्याला साकार करता येत नाही. त्याने गीता नुसती सांगितली नाही, तो गीता जगला.

फेब्रुवारी, १९६६