पान:Yugant.pdf/209

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२ / युगान्त


 कृष्णाने चार युक्तीच्या गोष्टी सांगून त्याला थोपवले. दोन्ही बाजू रात्रंदिवस लढून दमल्या होत्या, तो दिवस युद्ध झाले.मग रात्रीची झोप झाल्यावर पुढल्या दिवशी द्रोण मारला गेला. अर्जुनाकडून कर्णाला मारवायचे होते. द्रोणाच्या वधामुळे अर्जुन खिन्न झाला होता. पांडवांमध्ये आपापसातच चांगली मोठी भांडणे लागली होती. सात्यकीचे व धृष्टद्युम्नाचे हमरीतुमरीवरून युद्धच जुंपायचे, पण कृष्ण मध्ये पडला.
 कर्णाच्या रथाचे चाक खाली गेले, तेव्हा अर्जुनाने त्याला मारले. तो अर्जुनाला थांबण्याची विनंती करीत होता. धर्माच्या गोष्टी बोलत होता. पण कृष्णाने त्याला उसंत मिळू दिली नाही.मागची सर्व वर्मे काढून, "कोठे गेला होता धर्म तुझा तेधवा वृषा सांग,” [कर्ण क्व ते धर्मस्तदा गतः] ह्या पालुपदाने अर्जुनाची सर्व अपमानाची आठवण कृष्णाने धगधगत जिवंत ठेविली. कर्ण मारला गेला.
 लढाई संपली; पण कृष्णाचे काम संपले नव्हते. केवळ अर्जुनाला नाही पण इतरांनाही त्याने परत वाचवले. गांधारीचा राग व शाप स्वतःवर घेतला. कृष्णाचे पाठीराखेपण नसते, तर पांडवांना कौरवांचा निःशेष नाश करणे शक्य नव्हते, हे गांधारीने जाणले होते. माझा एकही मुलगा तू जिवंत ठेविला नाहीस, असा ती कृष्णाला बोल लावते. ज्या भीमाने तिची मुले मारली, त्याला ती दोष देत नाही. “आमच्या कुलाचा जसा सर्वनाश झाला, तसा तुझ्याही कुलाचा होईल. आम्ही जसे मेलो, तसे तुम्हीही आपापसांत भांडून मराल.” असा तिने कृष्णाला शाप दिला. कृष्णाने तो शापही हसत झेलला. "बये! अपराध केलास; मुलाला वेळीच आवर घातला नाहीस, आता कशाला उगीच तळतळाट करतेस ?"असे त्याने गांधारीला बजाविले. “आम्ही यादव इतके बलाढ्य आहोत की, आमचा नाश करील, असा बाहेरचा शत्रु नाही. आमचा नाश झाला, तर आमच्याच मूर्खपणाने," असे त्याने सांगितले.