पान:Yugant.pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / १८७
 

तऱ्हेने कृष्णापुढे मोठे कठीण पेच टाकले. जे करायला पाहिजे त्यात माघार घेतली, जे करायला महाकठीण त्यात उताविळीने उडी घेतली, जे क्रमप्राप्त ते त्यावेळी थांबवण्याचा घाट घातला. अर्जुनाच्या कीर्तीला कायमचा काळिमा लागण्याचा संभव होता, अर्जुनाच्या शरीराला अपाय होण्याचा संभव होता, अर्जुनाचे मन खचले होते. ह्या सर्वांतून कृष्णाने त्याला वाचवले. आपल्या स्वतःला कृष्णाने जपले नाही, इतके अर्जुनाला जपले. गीतेत म्हटल्याप्रमाणे अगदी अक्षरशः कृष्णाने अर्जुनाचा 'योगक्षेम' वाहिला.
 ह्या सर्व वृत्तान्तात कृष्ण अर्जुनाशी बरोबरीच्या... गाढ मैत्रीच्या नात्यानेच वागत होता, असे दिसते. गीतेच्या पुढच्या पुढच्या अध्यायांत म्हटल्याप्रमाणे अर्जुनाला कृष्ण जर “त्वमादिदेवः पुरुषः प्रमाणम्” असे वाटते, तर कृष्णाला भीष्मावर चालून जाण्याचे, किंवा 'नुसते पाड, मारू नकोस,' अशी विनवणी करण्याचे कारणच पडले नसते.
 द्रोणपर्वात कृष्णार्जुनाचे नाते जास्ती बरोबरीचे व जिव्हाळ्याचे दाखवले आहे. "अर्जुन समोर असेपर्यंत मला पांडवांवर मात करणे शक्य नाही. तू त्याला दुसरीकडे अडकव, म्हणजे मी धर्माला बांधून जिवंत तुझ्याकडे आणतो," असे द्रोणाने सांगितल्यावरून अर्जुनाला संशप्तकांशी युद्धात अडकवण्याची युक्ती दुर्योधनाने योजिली. पहिल्या दिवशी धर्मास पकडता आले नाही. दुसऱ्या दिवशी द्रोणाने अभेद्य असा चक्रव्यूह रचला, अर्जुन संशप्तकांकडे गुंतला होता. एकट्या अभिमन्यूला व्यूह फोडणे माहीत होते. तो आत जाऊन शत्रूच्या तावडीत सापडून मारला गेला. अर्जुन संध्याकाळी परत येतो, तो मुलगा गेल्याचे त्याला कळले. "अभिमन्यू पुढे गेला, तेव्हा तुम्ही एवढे मोठे लढवय्ये काय करीत होता?" असे त्याने रागाने विचारले. तेव्हा धर्माने उत्तर दिले, "आम्ही त्याच्या मागोमाग होतो. पण सिंधुराज जयद्रथाने आम्हांला थोपविले. आम्ही शिकस्त केली, पण आम्हांला फळी फोडता आली नाही.' हे उत्तर ऐकल्यावर